खलनिग्रहणाय:जीवघेणी चेंगराचेंगरी रोखणार कशी?
पोलिस प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे. चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहायला हवे. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्या गर्दीच्या ठिकाणी नेऊन या विषयाचे वास्तविक प्रशिक्षण दिले पाहिजे. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन तीस जणांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी तिरुपती येथील बालाजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविक ठार झाले होते. गेल्या साधारण दोन दशकात चेंगराचेंगरीच्या अशा घटनांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराजमधील अलीकडची दुर्घटना वगळता यातील बहुतांश घटनांची चौकशी पूर्ण झाली आहे. यापैकी काही प्रशासकीय, तर काही न्यायालयीन आहेत. या चौकशांच्या अहवालांमध्ये त्या त्या घटनेचे कारण देतानाच, संभाव्य उपाययोजनेबाबतही शिफारशी करण्यात आल्या आहेत. या घटनांच्या कारणांमध्ये; जास्त प्रमाणात झालेली गर्दी, गर्दीमध्ये निर्माण झालेली घबराट, तोकडी पोलिस व्यवस्था, अव्यवस्थित नियोजन, अफवा आदी महत्त्वाची कारणे दिली आहेत. अशा अहवालांच्या आधारे, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होणार आहे, तेथे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, याचे सखोल नियोजन करणे महत्त्वाचे असते. पूर्वी त्या ठिकाणी किती गर्दी झाली होती? अशा काही घटना घडल्या होत्या का? तसेच यंदा तिथे किती गर्दी होण्याची शक्यता आहे? आदी सर्व गोष्टींची माहिती प्रशासनाकडे असायला हवी. त्यानुसार गर्दीचा प्रवेश कुठून आणि कसा राहिल? गर्दीचा बाहेर पडण्याचा मार्ग कसा असेल? याचे नेमके नियोजन होणे महत्त्वाचे असते. काही कारणाने आतील गर्दी पुढे सरकत नसेल, तर प्रवेशद्वारातून येणारी गर्दी थांबवली पाहिजे, तसेच ठरविक अंतरांवर होल्डिंग एरिया ठेवला पाहिजे, जेणेकरुन गर्दी अनियंत्रित होणार नाही. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था चांगली असावी. गर्दीच्या नियंत्रणात कम्युनिकेशन अर्थात संप्रेषण प्रणाली फार महत्त्वाची ठरते. बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये व्यवस्थित संभाषण असले पाहिजे. त्यासाठी वॉकीटॉकीचा योग्य वापर आवश्यक आहे. अनेकदा अफवा पसरल्यानेही दुर्घटना घडतात. काही दिवसांपूर्वी जळगावजवळ ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या आणि दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रेनखाली १२ जण चिरडले गेले, तितकेच जखमी झाले. रांगेतील गर्दीतही अफवेमुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अफवा पसरु नयेत तसेच लोकांना अचूक आणि परिपूर्ण माहिती देणारी (पब्लिक अॅड्रेसिंग) सक्षम यंत्रणा असणे आवश्यक आहे. ही यंत्रणा प्रभावीपणे वापरण्यासाठी स्थानिक पोलिस, प्रशासन आणि देवस्थान समिती यांच्यात सुयोग्य समन्वय असला पाहिजे. जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे बाहेर जाण्याचे स्वतंत्र मार्ग आधीच निश्चित करावेत. या यंत्रणांना गर्दीच्या मानसिकतेचाही (मॉब सायकॉलॉजी) अभ्यास असायला हवा. त्याप्रमाणे जाण्या-येण्याचे मार्ग, प्रसाद वाटपाची वा थांबण्याची ठिकाणे निश्चित करुन त्यानुसार बंदोबस्त लावावा. पोलिसांचे ड्रिल आणि बंदोबस्ताचा सराव प्रत्यक्षातील परिस्थिती हाताळताना उपयुक्त ठरतो. अशा धार्मिक यात्रा, सोहळ्यांच्या ठिकाणी प्रथमोपचारासोबतच गंभीर प्रसंगी लागणाऱ्या वैद्यकीय उपचार सुविधांची उपलब्धता असणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय, सुस्थितीतील अग्निशमन वाहने योग्य ठिकाणी उभी असावीत. योग्य ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग असावे. गर्दीचे रिअल टाइम अवलोकन करुन आवश्यकतेनुसार तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे वापरली पाहिजे. गर्दी कुठे जास्त आणि कुठे कमी आहे, यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी नियंत्रण कक्षात कार्यक्षम अधिकारी नियुक्ती करावेत. गर्दीमुळे होऊ शकणाऱ्या दुर्घटनेसंदर्भात जनतेतही जागरुकता निर्माण केली पाहिजे. त्यासाठी देवस्थान समितीच्या सहाय्याने स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना पोलिसांसोबत नियुक्त केले जावे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबाबत आणि चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. मोठी गर्दी अपेक्षित असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, परिणामकारक पॅनिक मॅनेजमेंट, गर्दीचे लाइव्ह ट्रॅकिंग तसेच थर्मल आणि लेझर सेन्सरचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अशा महत्त्वाच्या उपायांचा त्यामध्ये समावेश आहे. पोलिस प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे. या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्या गर्दीच्या ठिकाणी नेऊन या विषयाचे वास्तविक प्रशिक्षण द्यायला हवे. ‘एनडीएमए’ याबाबत अनेक ठिकाणी प्रशिक्षणही आयोजित करते. चेंगराचेंगरीत लोकांचे बळी जाण्यामागे मानवी चुका हेच प्रमुख कारण असते. योग्य नियोजनाने अशा चुका दूर करुन हकनाक बळी जाणारे अमूल्य जीव वाचवता येतील. चेंगराचेंगरीच्या ठळक घटना (वर्ष - ठिकाण - बळी) - २००५ - मांढरदेवी यात्रा (महाराष्ट्र) - २९१ - २००८ - नैनादेवी यात्रा (हिमाचल प्रदेश) - १६२ - २००८ - चामुंडादेवी मंदिर (राजस्थान) - २२४ - २०१० - प्रतापगड (उत्तर प्रदेश) - ६३ - २०१३ - रतनगड (मध्य प्रदेश) - ११५ - २०१३ - प्रयागराज रेल्वे स्टेशन (उत्तर प्रदेश) - ३७ - २०१७ - एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन (मुंबई) - २२ - २०२२ - वैष्णोदेवी (जम्मू-काश्मीर) - १२ - २०२४ - हाथरस (उत्तर प्रदेश) - १२१ - २०२५ - तिरुपती (आंध्र प्रदेश) - ०६ - २०२५ - प्रयागराज संगम (उत्तर प्रदेश) - ३०
वेब वॉच:'पाताल लोक - 2' व्यवस्थेशी नव्या लढाईचा नवा थरार
हाथीराम चौधरी हा दिल्लीतील अतिशय हुशार पोलिस अधिकारी आहे. पण, त्याने केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय त्याचे उच्चपदस्थ घेतात. त्याच्या चुका काढण्यात पुढे असलेल्या अधिकारी वर्गाने त्याच्यातील धाडसी वृत्तीचे कधी कौतुक केलेच नाही. कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी असलेला हाथीराम सहृदयी आहे. मितभाषी असल्याने आपण केलेल्या कामाचा ढोल बडवणे त्याला जमत नाही. पण, त्याची खंत आहे की, इतके चांगले काम करूनही त्याच्या कामाची कुठेच कदर झाली नाही. घरी कमी वेळ दिल्यामुळे पत्नी नाराज आहे, मुलगाही त्याचे ऐकत नाही. एक दिवस एका गुन्ह्याचा तपास करताना, एका अनाथ झालेल्या बालकाला तो घरी घेऊन येतो. या मुलाच्या वडिलांच्या गायब होण्याचा तपास करताना त्याला वेगळेच धागेदोरे सापडतात. त्याची पाळेमुळे नागालँडमध्ये पोहोचलेली असतात. तिकडे दुसराच गुन्हा घडलेला असतो... अलीकडेच प्राइमवर रिलीज झालेल्या ‘पाताल लोक -२’मधील पहिल्या भागाचे कथानक असे सुरू होते. ‘पाताल लोक’ या गाजलेल्या वेब सिरीजचा पाच वर्षांच्या खंडानंतर आलेला हा दुसरा सीझन. यातील आठही एपिसोड प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि त्याचे मुख्य कारण आहे जयदीप अहलावतचा संयत अभिनय. हाथीराम चौधरी ही एका मितभाषी पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा आहे. कमीत कमी बोलणाऱ्या या व्यक्तीच्या मनात काय चालले असावे, हे जयदीपच्या चेहऱ्यावरून समजते. त्या अनाथ मुलाकडे बघणाऱ्या हाथीरामकडे बघितल्यावर प्रेक्षकांच्या लक्षात येते की, आता तो त्या बालकाला घरी घेऊन जाणार. पोलिस अधिकाऱ्याची कष्टप्रद नोकरी सोडून दरमहा दोन लाखाच्या नोकरीची ऑफर मिळताच जयदीपचा चेहरा बघून लक्षात येते की, पगारासाठी हा चौकीदारी करणार नाही. आणि घडतेही तसेच. अत्यंत चतुराईने, जीवाची बाजी लावून मोठी टोळी पकडल्यावर त्याचे श्रेय वरिष्ठ अधिकारी घेतात. ते प्रसिद्धीसाठी फोटो काढत असतता, तेव्हा हाथीराम बाजूला एका पायरीवर बसलेला असतो. त्याच्या शेजारी पोलिसांचा श्वान दिसतो. असे अनेक सूचक प्रसंग यामध्ये समोर येतात. हाथीराम अगदी मोजकेच बोलतो. जेव्हा एक अधिकारी म्हणतो, “प्रोटोकॉल की वजह से विर्क सर को इन्फॉर्म करना पडा।” त्यावेळी हाथीराम म्हणतो, “जरुरी हैं सर, प्रोटोकॉल फॉलो करना बहोत जरुरी है। वैसे भी रेस के घोडे को पता होता है की जितने के बाद मेडल उसको नही मिलनेवाला..” अशा संवादावेळी जयदीपने केलेला अभिनय ही एखाद्या इमानदार पोलिस अधिकाऱ्याची खंत वाटते. ‘थ्री ऑफ अस’ या उत्कृष्ट चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण धावरे यांचे उत्तम दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी ही या सिरीजची जमेची बाजू, तर एका मागोमाग एक एपिसोड बघण्यास भाग पाडणारी राहुल कनोजिया यांची बांधीव पटकथा, हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य. ही गुन्ह्याचा तपास असलेली थ्रिलर वेब सिरीज असली, तरी त्यातून अनेकांचे स्वभाव विशेष समोर येतात. पोलिस यंत्रणा कसे काम करते? त्यात इमानेइतबारे काम करणाऱ्या आणि संख्येने कमी असलेल्या पोलिसांची कशी फरपट होते? राजकीय व्यवस्था पोलिसांना कसे वापरून घेते? मोठ्या व्यवहारांमध्ये छोटे मासे जाळ्यात कसे अडकतात? अशा वास्तवावर हा सिरीज संयतपणे भाष्य करते. पहिल्या दोन भागांत घडणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना एकमेकांशी कशा संबंधित आहेत, याचे धागेदोरे प्रेक्षकांना पुढे उलगडत जातात. याचे श्रेय पटकथेप्रमाणेच संयुक्ता कझा यांच्या संकलनालाही आहे. कोणती घटना अंधारात घडते? लख्ख प्रकाशात काय घडते? प्रत्येक घटना वेगवेगळ्या रंगामध्ये कशाप्रकारे दाखवावी, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि त्यावर दिग्दर्शकाने विचार केला आहे. या सर्वाचा प्रेक्षकाच्या मानसिकतेवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होतो आणि त्यामुळेच ती कलाकृती मनाला भिडते. जयदीप अहलावतच्या अभिनयाप्रमाणेच ईश्वक सिंग, गुल पनाग, अनुराग अरोरा, तिलोत्तमा शोम यांचा अभिनय दाद देण्यासारखा आहे. यातील बरेच प्रसंग नागालँडमध्ये घडतात. त्यामुळे त्या राज्याचे सौंदर्य आणि तिथली संस्कृती यांचे दर्शनही घडते. जहनु बरुआ, प्रशांत तमंग अशा तिथल्या अनेक स्थानिक कलाकारांना या सिरीजमुळे आपले कलागुण दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले, हे महत्त्वाचे. अर्थात, त्यांनी या संधीचे सोने केले आहे. ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील निसर्गसंपन्न राज्यांचा या निमित्ताने परिचय होत आहे, ही बाब तितकीच सकारात्मक आहे. (संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)
रसिक स्पेशल:अशा ‘दंगली’ने कसा निर्माण होणार ‘दबदबा’?
‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावणे हा प्रत्येक पैलवानासाठी गौरवाचा क्षण असतो आणि त्यासाठी त्यांचा प्रवास निर्विवाद, पारदर्शक आणि न्याय्य असला पाहिजे. प्रशासनाने, संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी यामध्ये अनावश्यक हस्तक्षेप न करता फक्त खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य केले पाहिजे. तसे झाले तरच कुस्तीमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा दबदबा निर्माण होईल. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा गेल्या आठवडाभरापासून वादामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. १९६१ मध्ये सुरूवात झालेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रातील सर्वांत प्रतिष्ठेचे कुस्तीचे मैदान मानले जाते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या पैलवानांचे राष्ट्रीय स्तरावरील स्थान अधिक भक्कम होते. आजवर यातून अनेक कुस्तीपटूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेपही घेतली आहे. त्यामुळे ‘हिंदकेसरी’पासून ते जागतिक स्पर्धांतील सहभागासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हा महत्त्वाचा किताब मानला जातो. या स्पर्धेने आजवर असे अनेक दिग्गज पैलवान घडवले आहेत, ज्यांनी पुढे राज्यासाठी, देशासाठी पदके मिळवली. अहिल्यानगरमध्ये नुकत्याच झालेल्या यंदाच्या स्पर्धेत पराकोटीचा वाद झाला. दोन संघटनांतील चढाओढीमुळे या स्पर्धेला, त्यातून उद्भवलेल्या वादाला वेगळे वळण देण्याचाही प्रयत्न होत आहे. त्यातच दुर्दैवाने काही राजकीय नेतेमंडळीही आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर खाशबा जाधव यांच्या रुपाने देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची परंपरा आणि लौकिक वेगळा आहे. त्याला असे प्रकार कदापि शोभणारे नाहीत. या खेळाच्या व्यापक हितासाठी ते तत्काळ थांबले पाहिजेत. परवाच्या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये रेफ्रीची चूक झाली असेल, तर त्याबाबत एक समिती नेमून चौकशी व्हायला हवी. खेळाडूंना निर्णय वा निकाल चुकल्याचे वाटत असेल, तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज देऊन संबंधित रेफ्रीवर बंदीची मागणी केली पाहिजे. मात्र, त्यासाठी हीन भाषेचा वापर वा लाथा मारण्यासारखे प्रकार होणे पूर्णत: चुकीचे आहे. अशा गोष्टींमुळे कुस्ती आणि कुस्तीगीर या दोहोंची प्रतिष्ठा खालावते. म्हणून घडल्या प्रकाराचे समर्थन होऊच शकत नाही. तथापि, त्यानंतर संबंधित पैलवानांवर तब्बल तीन वर्षे बंदी घालण्याचा निर्णयही तितकाच अवास्तव आणि अनाठायी आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. या स्पर्धेपर्यंत येण्यासाठी पैलवानांना अनेक वर्षे कसून मेहनत करावी लागते. त्यामुळे एकदम एवढी मोठी शिक्षा देणे त्यांच्या आणि एकूणच राज्याच्या कुस्ती क्षेत्राच्या भवितव्यासाठी हानिकारक ठरू शकते. बंदी घातलेल्या शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्याकडून महाराष्ट्राला देश पातळीवर खूप मोठ्या अपेक्षा आहेत, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. खेळाडूंनीही कुस्तीगीर संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आपल्यावरील बंदी उठवण्यासाठी दाद मागायला हवी. आणि संघानेही कुस्ती क्षेत्राच्या तसेच खेळाडूंच्या हिताचा विचार करुन बंदी उठवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कुस्ती क्षेत्राची संघटनात्मक स्थितीही समजून घेतली पाहिजे. राज्याच्या कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हे दोन प्रमुख गट आहेत. भारतीय कुस्ती महासंघाने दोन वर्षांपूर्वी राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केली. त्यामुळे मान्यता असलेल्या राज्य कुस्तीगीर संघाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू पाठवले जातात. कुस्तीपटूंना अधिकृत स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना या संघाच्या माध्यमातून पुढे जावे लागते. उत्तराखंडमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही महाराष्ट्राचा संघ या संघटनेने पाठवला आहे. अर्थात, या दोन्ही संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी ‘मान्यता’ किंवा ‘श्रेष्ठत्वा’पेक्षाही या क्षेत्रातील आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा कुस्तीगीरांना कसा लाभ होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या वर्षीच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्याच. मात्र, या स्पर्धेतील निकालांपेक्षा ज्यांना कुस्तीतले काही कळत नाही अशांनीही या वादातून आपली प्रसिद्धी करून घेतली. राजकीय पक्षांनीही या वादावर आपले भांडवल केले. त्यामुळे खरी कुस्ती आणि पैलवानांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झाले. शिवाय, या सगळ्या वादामुळे राज्यातील कुस्तीपटूंना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खेळाडूंनी कोणत्याही संघटनांच्या संघर्षात न अडकता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची पायरी असते. त्यामुळे राजकारण आणि माध्यमांतील चर्चा, आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात खेळाडू अडकले, तर त्यांच्या सरावावर, एकाग्रतेवर आणि एकूणच कारकिर्दीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. एक तर कुस्ती क्षेत्रातील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि पैलवान महाराष्ट्रातील पैलवानांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आपल्या पैलवानांच्या मनोबलाचे अशाप्रकारे खच्चीकरण झाले, तर महाराष्ट्राच्या कुस्तीवर संकटाचे सावट येईल. त्यामुळे इथल्या संघटनांबरोबरच सर्व खेळाडू, वस्ताद, प्रशिक्षक, संघटकांनी परस्परांमध्ये एकी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राज्याच्या कुस्ती क्षेत्राच्या व्यापक हितासाठी ‘महाराष्ट्र केसरी’चे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहिले पाहिजे. संघटनांतील वाद, राजकीय हस्तक्षेप आणि मीडिया ट्रायलमुळे कुस्तीपटूंना अडथळे निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी. ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावणे हा प्रत्येक पैलवानासाठी गौरवाचा क्षण असतो आणि त्यासाठी त्यांचा प्रवास निर्विवाद, पारदर्शक आणि न्याय्य असला पाहिजे. प्रशासनाने, संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी यामध्ये अनावश्यक हस्तक्षेप न करता फक्त खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य केले पाहिजे. तसे झाले तर कुस्तीपटूंच्या परिश्रमांमुळे ‘महाराष्ट्र केसरी’चा लौकिक तर उंचावेलच; शिवाय त्यातूनच गुणवत्ता असलेले पैलवान राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचा दबदबा निर्माण करतील. (लेखक ज्येष्ठ कुस्ती संघटक आहेत.) (संपर्कः datjadhav1@gmail.com)
वेध मुत्सद्देगिरीचा...:'सय्यद अकबरुद्दीन' पाकिस्तानचे मनसुबे उधळणारा करारी अधिकारी
भारताने जम्मू - काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याबाबत १६ ऑगस्ट २०१९ या दिवशी संयुक्त राष्ट्रांमध्ये चर्चा सुरू होती. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाला विरोध करत हा विषय संयुक्त राष्ट्रांकडे नेला होता. या मुद्द्याचे भांडवल करून, काश्मीरप्रश्नी आम्ही किती संवेदनशील आहोत आणि भारत कसा काश्मिरी जनतेच्या विरोधात आहे, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. या विषयावरील बैठक संपल्यावर भारताकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तिच्या आडून भारताला काश्मीर मुद्द्यावर घेरण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानच्या तीन पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. परंतु, पाकिस्तानचे हे मनसुबे लीलया उधळून लावले, ते भारताचे संयुक्त राष्ट्रांतील तत्कालीन राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी. या परिषदेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने अकबरुद्दीन यांना, ‘तुम्ही पाकिस्तानसोबत संवाद कधी सुरू करणार?’ असा थेट प्रश्न विचारला. वरकरणी हा प्रश्न सहज आलेला आणि तसा सोपा वाटत असला, तरी मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने तो फसवा होता. ‘तुम्ही पाकिस्तानसोबत संवाद कधी सुरू करणार?’ या प्रश्नाचा गर्भित अर्थ असा होता की, तुम्ही पाकिस्तानसोबतचा संवाद बंद केला आहे, पाकिस्तान संवादासाठी आसुसलेला आहे, त्याची इच्छा आहे की तो पुन्हा सुरू व्हावा आणि भारत त्यात अडथळा आणत आहे. अशा वेळी एक मुत्सद्दी म्हणून किती दक्ष असले पाहिजे, याचे उदाहरण म्हणजे ही घटना. अकबरुद्दीन आपल्या स्थानावरून उठून त्या पत्रकाराकडे गेले आणि त्याच्याशी हस्तांदोलन करत ठामपणे म्हणाले, ‘भारत सिमला कराराला बांधील आहे आणि पाकिस्तानकडूनही तीच अपेक्षा आहे.’ त्यांच्या या वागणुकीने उपस्थितांची मने तर जिंकलीच; पण पाकिस्तानने केलेल्या कुरघोडीच्या प्रयत्नांमधली हवाच निघून गेली! पाकिस्तानच्या त्या पत्रकाराला उत्तर देताना त्यांनी समयसूचकता आणि सभ्यतेसोबतच करारीपणाचेही दर्शन घडवले. सय्यद अकबरुद्दीन यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत १९८५ मध्ये प्रवेश केला. १९९५ - ९८ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायमस्वरूपी मिशनमध्ये प्रथम सचिव म्हणून कार्य केले. याच दरम्यान १९९७ - ९८ मध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च संस्थेपैकी एक असलेल्या प्रशासन आणि अंदाजपत्रकीय प्रश्नांवरील सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. १९९८ - २००० या कालावधीत त्यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात कौन्सिलर म्हणून जबादारी पार पाडली. या काळात भारत - पाकिस्तान संबंधांविषयी त्यांचा सखोल अभ्यास झालाच; शिवाय पाकिस्तानच्या अंतर्गत स्थितीचाही अनुभव त्यांना मिळाला. २००६ - ११ दरम्यान व्हिएन्नातील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये (IAEA) बाह्यसंबंध आणि धोरण समन्वय विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या महासंचालकांचे विशेष सहायक म्हणूनही त्यांनी कार्य केले. २०१२ - १५ या काळात देशातील आणि जगातील राजकारण संक्रमणावस्थेत असताना भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. एप्रिल २०२० मध्ये संयुक्त राष्ट्रांतील भारताचा कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते निवृत्त झाले. संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय नागरी सेवक’ म्हणून काम करण्याचा मान मिळालेल्या मोजक्या भारतीय मुत्सद्द्यांमध्ये अकबरुद्दीन यांचा समावेश होतो. आपल्या अनुभवाचा नेमका उपयोग आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृती करण्याची तत्परता या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांची कारकीर्द अनन्यसाधारण राहिली. देशाच्या परराष्ट्र धोरणाचा वेध घेण्याचा ध्यास निवृत्तीनंतरही त्यांनी निरंतर सुरू ठेवला. ‘इंडिया व्हर्सेस यूके : द स्टोरी ऑफ अॅन अनप्रीसिडेंटेड डिप्लोमॅटिक विन’ या आपल्या पुस्तकात अकबरुद्दीन यांनी २०१७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ) निवडणुकीतील भारताच्या राजनैतिक संघर्षाचा सखोल आढावा घेतला आहे. स्वत: संयुक्त राष्ट्रांत कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना त्या घटनेची इत्यंभूत माहिती होती. त्यामुळे त्यांचे हे पुस्तक अधिक विश्वसनीय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपल्या देशाचे प्रतिनिधी असले पाहिजेत, याची जाणीव भारताला कुलभूषण जाधव प्रकरणानंतर झाली. संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीचा सदस्य असलेल्या ब्रिटनला मात देऊन भारताने ही ऐतिहासिक निवडणूक जिंकली. या निवडणुकीची यशोगाथा कथन करतानाच, आंतरराष्ट्रीय राजनयिक व्यवहारांचे बारकावे, अशा प्रकारच्या निवडणुकांतील जागतिक आव्हाने, अडचणी आणि रणनीती यांचे विस्तृत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. जागतिक स्तरावरच्या एरवी छोट्या वाटणाऱ्या घटनाही परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. त्यांची नोंद घेत, योग्य ती पावले उचलत आपल्या देशाचे हित साधण्यासाठी अशा मुत्सद्द्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. अशा प्रयत्नांच्या पराकाष्ठांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर अकबरुद्दीन यांचे हे पुस्तक वाचायला हवे. (संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)
माणूस माणसाला अडवण्याच्या संधीची वाट बघत असतो. पण, या अडवाअडवीत आपण आनंदाऐवजी दुःखाची रास निर्माण केली आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. आता हळूहळू रानावनात खळी सुरू होतील. ज्वाऱ्या बेहाड्या पडू लागल्या आहेत. काही अजून हुरड्यात आहेत. तसे तर हे हुरड्याचे आणि खळ्याचेही दिवस आहेत. जिथं लवकर ज्वाऱ्या पेरल्या होत्या, तिथली खळी आता सुरू झाली आहेत. काही ठिकाणी कमी पाऊस पडला होता. त्यामुळं तिथली ज्वारीही लवकर बेहाड्या पडली. खळे म्हणजे कणसांनी भरलेली बखळ अन् कडब्याची परसड. खळे म्हणजे शेतकऱ्याच्या घामाचे फळ नि त्याच्या कष्टाची रास. खळे संपले की रानात काहीच शिल्लक राहत नाही. तिथं जायची गरजच उरत नाही. सुगीत सगळीकडं पीक उभं असतं. शेतकऱ्याचं कुटुंब आनंदानं उधाणलेलं असतं. थंडीचे दिवस असतात, ऊनही कोवळं लागू लागतं. धुऱ्यावर हिरवंगार गवत वाढलेलं असतं. ही सगळी हिरवाई दवावर पोसलेली असते. पावसाळा संपून बरेच दिवस झालेले असतात, पण तरीही या दवावर रान हिरवं असतं आणि हिवावर माणूस गार असतो. त्यामुळं सगळ्या सृष्टीलाच पोषक असा हा ऋतू. या ऋतूचा समारोप म्हणजे खळे. खळे झाले की रान उनगते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होऊ लागतो. चुकार आणि मोकार गुरं रानावनात पालापाचोळा खात फिरत असतात. रान उदास-भकास वाटू लागतं. कुठं तरी जीव रमवावा म्हणून नंतर जत्रा-यात्रा सुरू होतात. त्याची मजा शेतकरी घेतच असतो; पण रानातली निसर्गाने प्रसन्न होऊन दिलेला आनंद संपलेला असतो. खळ्यातील कणसांची रास पाहून शेतकऱ्याचे काळीज भरून येते. टच्च दाण्याने भरलेली कणसं खळ्यात पसरलेली असतात, तेव्हा शेतकऱ्याच्या मनालाही मोती लगडतात. दाणे भरपूर होतील आणि वर्षभराची बेगमी होईल, याची त्याला खात्री वाटत असते. आजकाल रानात ज्वारीचे खळे करायला मजूर मिळणे अवघड झाले आहे. पण, एकेकाळी ज्वारीच्या खळ्यावर मजुरी मिळावी म्हणून गावातल्या बायाबापड्यांची धडपड असायची. त्यांच्या वाट्याला ओटी भरून कणसं यायची. शेतातली कसदार ज्वारी आपल्या वाट्याला यावी म्हणून या बायकांची कामावर घेण्यासाठी धडपड असायची. हे चित्र आता उलटे झाले आहे. कामाला माणूस मिळत नाही. जमाना बदलणारच, तो बदलतच असतो, त्याला इलाज नाही. त्यावर यंत्रयुगाने पर्याय दिले आहेत. आता हल्लर काम भागवत आहेत. माणसं पुढे जात आहेत. माणसं माणसांची नेहमीच अडवाअडवी करतात. मजुराला गरज होती, तेव्हा मालक अडवून पाहायचे. आता मालकाला गरज आहे, तर मजूर अडवून पाहताहेत. माणूस माणसाला अडवतो, हेच खरं. अडवण्याच्या संधीची तो वाट बघत असतो. या अडवाअडवीत आपण दुःखाची रास निर्माण केली आहे, हे माणसाच्या लक्षातच येत नाही. माणसाने माणसासाठी आनंदाची रास निर्माण करावी, हे अपेक्षित असताना असे काहीतरी भलतेच होत असते. त्यालाही नाईलाज आहे. कदाचित यालाच मानवी जीवन म्हणत असावेत. कुणीतरी कुणाची तरी मजा घेतो आणि कुणीतरी कुणाची तरी मजा पाहतो. एकेकाळी ज्वारीचे खळे हा एक उत्सवच असायचा. सगळे गावकरी खळ्याची वाट पाहायचे. आई या खळ्यावर खास जेवणाचा बेत करायची. दूरच्या रानात झोपडी किंवा मांडव नसल्यामुळं कडब्याच्या पेंढ्यांचेच तात्पुरते खोपे केले जायचे. त्यात दोन-तीन माणसं बसू शकायची. पण त्याखाली स्वयंपाक करायला गेलं, तर ठिणगीनं पेंढ्या पेटायची भीती वाटायची. त्यामुळं बैलगाडीच्या साट्याखाली तीन दगडाची चूल करून आई स्वयंपाक करायची. स्वयंपाक काय? तर घरून दह्याचं लोटकं भरून आणलेलं असायचं. भरपूर लसूण घातलेली शेंगदाण्याची चटणी कुटून आणलेली असायची. आई धपाटे करायची. खमंग, चवदार धपाटे. एका छिद्राचं, दोन छिद्राचं, पाच छिद्राचं, बारा छिद्राचं अशी ती भेंडुळं असायची. धपाट्याला आमच्याकडं भेंडुळं म्हणायचे. ‘बारा मिसळ्याचं भेंडुळं’ असंच त्याचं नाव होतं. गहू, ज्वारी, हरभरा, मूग, उडीद अशा अनेक धान्याचे मिश्रण दळून बारा मिसळीची भेंडुळं केलेली असायची. त्यात लसूण, कांदा, मेथी, चटणी, मीठ, सुंठ, कोथिंबीर असे पदार्थ टाकलेले असायचे. पाच धान्ये आणि सात मसाल्याचे पदार्थ असे मिळून ते बारा मिसळ्याचं भेंडुळं असायचं. त्यामुळं ते अतिशय खमंग लागायचं. आई भेंडुळे करायची. आम्ही त्याची वाटच पाहायचो. त्यातही खळ्यावरच अशी भेंडुळी खायला मिळायची. कारण तो खळ्याचाच मान असायचा. संध्याकाळी खळ्यावर निवद असायचा. त्यासाठी गावातले निवडक लोक बोलावलेले असायचे. चांदण्याच्या उजेडात खळ्याभोवती पंगत बसायची. खळ्याच्या मधोमध रास असायची. त्यावर दिवा लावलेला असायचा. आधी खळ्याला निवद दाखवला जायचा आणि मग माणसं जेवायला सुरुवात करायची. जेवण झाल्यावर कुणीतरी कथा सांगायचा. जमलेल्यांपैकी पंधरा-वीस माणसं रात्रभर कथा ऐकत तिथंच बसायची. त्या निमित्तानं राशीचं संरक्षण व्हायचं. चोराचिलटाची भीती नसायची. दुसऱ्या दिवशी रास उधळायला सुरूवात व्हायची. वाऱ्याची वाट पाहावी लागायची. बहिणाबाईंनी या वाऱ्याला ‘मारुतीचा बाप’ असं म्हटलेलं आहे. मरूत म्हणजे वारा. मारुती म्हणजे वाऱ्याचा पुत्र. हनुमानाला आपण वायुपुत्र म्हणतच असतो. बहिणाबाई म्हणतात.. ‘येरे येरे वाऱ्या, येरे मारुतीच्या बापा.. हात जोडीते मी तुला, बापा नको मारू थापा..” या वाऱ्याची वाट बघत शेतकरी रास उधळायचा. कधी कधी वारा थंड पडायचा आणि शेतकरी मेटाकुटीला यायचा. तिव्ह्यावर अण्णा उभे असायचे. मोठ्या वहिनी राशीतून टोपली भरून द्यायच्या. लहानग्या वहिनी तिव्ह्याखाली हातणी घेऊन बसलेल्या असायच्या. वाऱ्याने ज्वारीमधलं भुसकट निघून जायचं. निखळ दाणे खाली पडायचे. त्यात काही गोंडर असायचे. वहिनी हातणीने गोंडर बाजूला करायच्या. ताव्ह्याखाली निखळ शुभ्र पांढऱ्या दाण्याची रास दिसायची. ती जसजशी वाढंल तसतसा शेतकऱ्याचा ऊर आनंदानं भरून यायचा. संध्याकाळच्या वेळी वडील यायचे. राशीची पूजा होऊन रास मोजायला सुरूवात व्हायची. पोती भरली जायची. मग पोत्यांनी गाड्या भरल्या जायच्या. भरलेली एक एक गाडी घराकडं जायची. घरी आई ताट सजवून तयारच असायची. या गाडीच्या बैलांच्या पायाची पूजा करून रास घरात घेतली जायची. सगळीकडंच श्रद्धाभाव होता. रानाविषयी श्रद्धा, बैलाविषयी श्रद्धा, कामावरच्या मजुराविषयी श्रद्धा, कामावर श्रद्धा.. या श्रद्धाभावांनी अवघं आयुष्य उजळून निघालेलं असायचं. आता हा भाव राहिलेला नाही. काळ बदलला तसा भावही बदलला. त्यामुळं श्रद्धेच्या ठिकाणी व्यवहार आला. व्यवहार आला की रुक्षता येते. कामातला आनंद संपतो. (संपर्कः inbhalerao@gmail.com)
माझ्या हिश्श्याचे किस्से:नेहमी एकत्र जेवण करायचे तिन्ही कपूर बंधू
राज कपूर यांची जन्मशताब्दी सुरू झाल्यापासून मीडियात, सोशल मीडियात किंवा मित्रांशी बोलताना त्यांचा उल्लेख झाला नाही, असा एकही दिवस जात नाही. १४ डिसेंबर २०२४ ला राज कपूर यांची शंभरावी जयंती होती आणि १८ डिसेंबरला ‘सिंटा’ने त्यांच्या स्मरणार्थ एक खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे माझ्या लेखणीला त्यांच्याविषयी आणखी लिहायला प्रेरणा मिळाली. राज कपूर यांच्या सिनेमांचे आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से तुम्हाला माहीत असतीलच. पण, त्यांना खाण्याची आणि इतरांनी खाऊ घालण्याची किती आवड होती, हे खूप कमी लोकांना माहीत असेल. ‘आर. के.’चे सिनेमे जगभरात खूप प्रसिद्ध आहेत, पण ‘आर. के.’च्या जेवणाचीही फिल्म इंडस्ट्रीत तितकीच ख्याती आहे. आर. के. स्टुडिओ होता तोवर तिन्ही भाऊ (रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर) नियमितपणे दुपारी दोन वाजता ऑफिसला जायचे. डब्बूजी (रणधीर कपूर) आपल्यासोबत गाडीत टिफिन घेऊन यायचे. मग तिन्ही भाऊ जेवणाच्या टेबलावर बसायचे आणि शिपाई टिफिन काढून ठेवायचा. मग डब्बूजींचा एक नेहमीचा डायलॉग.. ‘यात काय असेल? काढायची का लॉटरी..?’ विश्वास ठेवा, कृष्णी आंटी ऑफिसच्या या टिफिनमध्ये जे पदार्थ पाठवायच्या, तेवढे तर कदाचित कुणाकडच्या स्नेहभोजनातही नसतील. त्यात मटन, चिकन, सी फूड असेल, भाज्याही असतील, दाळही असेल, पुलाव, रोट्या, पराठे असे किमान दहा पदार्थ तरी असायचेच. ज्यांना या तिघांपैकी कुणाला भेटायचे असेल आणि कृष्णा आंटी बंगल्यावरुन जेवण पाठवतात हे माहीत असेल, तर असे जवळचे लोक मीटिंगसाठी मुद्दाम दुपारी दोनची वेळ घ्यायचे, जेणेकरुन त्यांच्यासोबत या जेवणाचा आस्वाद घेता यावा. मीसुद्धा अनेकदा तिथे जेवलो आहे. टिफिन यायचा तिघांसाठी, पण त्यात एवढे पदार्थ असायचे की १०-१२ लोकांचे जेवण आरामात व्हायचे. एकवेळ या जेवणाचे राहू द्या. आम्ही न्यूयॉर्कमध्ये ‘आ अब लौट चले’चे शूटिंग करत होतो. या सिनेमाची कथा मी लिहिली होती. रणधीर आणि राजीव कपूर निर्माते, तर ऋषी कपूर दिग्दर्शक होते. त्यामध्ये अक्षय खन्ना, ऐश्वर्या रॉय, कादर खान, जसपाल भट्टी असे चांगले अभिनेते होते. साधारणपणे दिवसभराचे शूटिंग झाके की, उद्या कुठे कुठे शूटिंग होणार आहे, कशाकशाची गरज लागेल, याविषयी प्रॉडक्शन मॅनेजर आणि दिग्दर्शकासोबत निर्माता चर्चा करतो. पण, डब्बूजी यावर चर्चा करायचे की आज डिनरला कुठे जायचे? आणि उद्या लंच कुठून मागवायचे? शूटिंगच्या महिनाभरात हाच शिरस्ता असायचा. ही अशी एवढ्या मोठ्या मनाची माणसे आहेत. सामान्यत: अशा शूटिंगच्या वेळी युनिटमधील हीरो, हीरोइन, दिग्दर्शक, कॅमेरामन असे प्रमुख टेक्निशियन फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात आणि असिस्टंट, स्पॉटबॉय असे इतर सगळे टेक्निशियन लहान हॉटेलमध्ये थांबतात. पण, यांनी अगदी ऐश्वर्या रॉयपासून स्पॉट बॉयपर्यंत सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था न्यूयॉर्कमधील लेक्सिंटन या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये केली होती. तिथून जवळच असलेल्या दीवान हॉटेलला जेवणाचा ठेका दिला होता. तिथे रोज संध्याकाळी बुफेचे स्टॉल लागायचे आणि साऱ्या युनिटला भारतीय जेवण दिले जायचे. पण, प्रत्येकाने तिथेच जेवले पाहिजे असा आग्रह नव्हता. कुणाला न्यूयॉर्कच्या कुठल्याही अन्य रेस्टॉरंटमध्ये जेवायचे असेल आणि त्याने तिथे जाऊन जेवण केले, तर त्याचे जितके बिल असेल, तेवढे पैसे प्रॉडक्शन मॅनेजर त्याला द्यायचा. मी डब्बूजींना एकदा म्हणालो, माझे काही निर्माते मित्र म्हणताहेत की, डब्बूजी युनिटला वाईट सवय लावताहेत. त्यावर त्यांनी उत्तर दिले - माझा विचार वेगळा आहे. स्पॉट बॉय, लाइटमन हे आपल्या आधी झोपतात, आपल्यानंतर उठतात. ते पण घरदार सोडून कामासाठी अमेरिकेत आले आहेत. कंपनीचे मालक स्वत: जिथे राहतात तिथेच आपलीही व्यवस्था करतात, स्वत: जे खातात तेच आपल्याला खाऊ घालतात, हे पाहून ते मनोमन दुवा देत असतील, जास्त उत्साहाने काम करत असतील. मी देशभरात, जगभरात अनेक ठिकाणी शूटिंग केले, पण अशी प्रॉडक्शन कंपनी आजवर कुठेही पाहिली नाही. मला चांगले आठवतेय.. ही ४ डिसेंबर २०१७ ची गोष्ट आहे. मी आणि पत्नी घरात बोलत बसलो होतो. मला अमितजींचा मेसेज आला.. रूमी, शशी कपूरजी आता आपल्यात नाहीत.. ते वाचून मला अतीव दु:ख झाले. उत्तरादाखल मी त्यांना क़ैसर -उल - जाफ़री यांचा शेर लिहून पाठवला... हम ज़िन्दगी को अपनी कहाँ तक संभालते, इस कीमती किताब का कागज़ ख़राब था। रात्री मी पृथ्वी थिएटरसमोर शशीजींच्या घरी गेलो. तिथे सारा आर. के. परिवार जमला होता. मी नीतूजी आणि रणबीरशी बोलत असताना अमितजी उठून आमच्याकडे आले. नीतूजींना हा शेर ऐकवून ते म्हणाले की, मी रूमीला ही बातमी सांगितल्यावर त्याने मला हा शेर पाठवला. तो त्यांच्या लक्षात राहिला होता आणि त्याच रात्री आपल्या ब्लॉगमध्येही त्यांनी तो लिहिला. सगळ्यांना भेटल्यावर मी ऐश्वर्या रॉय आणि राणी मुखर्जी यांच्याशी बोलत होतो. तेवढ्यात कृष्णा आंटी आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही सगळे लगेच निघू नका, चेंबूरवरून जेवण मागवलेय.. आम्ही बसून राहिलो. थोड्या वेळात डबे आले. कृष्णा आंटी म्हणाल्या, जेवण तयार आहे, सगळे खाऊन घ्या.. मी उभा राहिलो आणि नजरेनेच पदार्थ मोजले. तब्बल १८ पदार्थ होते. तेवढे जेवण त्यांच्या घरून आले होते. तिथे उभे असलेल्या बोनी कपूरना मी म्हणालो, कपूर घराण्याचा पाहुणचार आणि आदरातिथ्याची ही पद्धत बघा.. त्यांनी सांगितले की, तुम्ही आज पाहताय, मी हे लहानपणापासून अनुभवत आलोय. आज राज कपूर यांच्या आठवणीत त्यांच्या ‘धरम करम’ सिनेमातील हे गाणे ऐका... एक दिन बिक जायेगा माटी के मोल, जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
रसिक स्पेशल:महाराष्ट्राचा विकास : नीती, नियत आणि तफावत
अन्य राज्यांच्या तुलनेत पुरोगामी आणि उद्योगप्रधान असलेला महाराष्ट्र चौथ्या स्थानावरुन पहिल्या स्थानाकडे न जाता दोन पायऱ्या खाली गेला असेल, तर राज्याच्या नेतृत्वाला आर्थिक धोरणाचे पुनर्मूल्यांकन आणि त्याच्या अंमलबजावणीचे फेरनियोजन करावे लागेल. अन्यथा, वित्तीय ‘नीती’ आणि विकासाची ‘नियत’ यातील ही तफावत राज्यासाठी घातक ठरेल. देशाच्या नीती आयोगाचा वित्तीय स्वास्थ्य निर्देशांक - २०२३ (Fiscal Health Index) हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास केला गेला आहे. राज्य सरकारांच्या खर्चाची गुणवत्ता, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची महसूल देण्याची क्षमता, त्यांनी कोविडच्या काळात काढलेली अधिकची सार्वजनिक कर्जे, त्या कर्जांचे संबंधित राज्यांच्या सकल उत्पन्नाशी असलेले प्रमाण, कर्जांची दीर्घकालीन सक्षमता, या आणि अशा अन्य निकषांवर राज्यांचे क्रमांक ठरवण्यात आले आहेत. ही क्रमवारी निश्चित करताना, २०१४-१५ ते २०१८-१९, २०१४-१५ ते २०२१-२२ आणि २०२२-२३ असे तीन भाग पाडण्यात आले आहेत. या मापनानुसार जे गुण पडतात आणि त्यावर आधारित राज्यांचे जे क्रमांक ठरतात, त्यावरून त्या त्या राज्याच्या आर्थिक आघाडीवर काय घडत असेल, याची आपण कल्पना करू शकतो. इथे प्रामुख्याने महाराष्ट्राला समोर ठेऊन त्या संदर्भातील काही मोजके आयाम आपण विचारात घेऊ. कोणत्याही देशाच्या वा राज्याच्या आर्थिक विकास प्रक्रियेत, कायदे आणि धोरणे ठरवणारे राजकीय नेतृत्व आणि त्यांची अंमलबजावणी करणारी प्रशासन यंत्रणा असे दोन खांब असतात. त्यातही राजकीय नेतृत्व सगळ्यात महत्त्वाचे असते. त्यामुळे विकासाच्या बाबतीत चांगले घडल्याचे श्रेय जसे या नेतृत्वाला मिळते, तसे काही चूक घडल्याचा दोषही त्यावरच येतो. वारसा, विशेषणे आणि वस्तुस्थितीवित्तीय स्वास्थ्य निर्देशांकातून दिसणाऱ्या स्थितीत २०२२ - २३ मध्ये ५०.३ गुण घेऊन १८ राज्यांमध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता. ओडिशा, छत्तीसगड, गोवा, झारखंड आणि गुजरात ही राज्ये आपल्यापुढे होती, तर उत्तर प्रदेश सातव्या क्रमांकावर होता. २०१४- २२ या पूर्ण काळातही ओडिशा पहिल्या क्रमांकावरच होता. तेव्हा महाराष्ट्र चौथ्या स्थानावर होता, २०२२-२३ मध्ये तो घसरून सहाव्या स्थानावर आला. छत्तीसगड पाचव्या स्थानावरून पुढे सरकत दुसऱ्या स्थानी पोहचला. झारखंडने मोठी झेप घेत दहाव्या स्थानावरून चौथे स्थान प्राप्त केले. तेलंगण आणि गुजरातने एक अंक पुढे जात अनुक्रमे नवव्यावरुन आठवे आणि सहाव्यावरून पाचवे स्थान मिळवले. अशा स्थितीत आपला महाराष्ट्र कसा खाली घसरला, याचे दु:ख मराठी माणसांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण तो देशातील भौगोलिकदृष्ट्या तिसऱ्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाज्वल्य इतिहासाचा, पुरोगामी विचारांचा आणि सर्व क्षेत्रांतील प्रागतिकतेचा वारसा आपल्या या राज्याला लाभला आहे. प्रत्यक्षात आपण ही विशेषणे केवळ आपलाच उत्साह वाढावा म्हणून वापरतो, कारण राज्याचे आर्थिक वास्तव काही वेगळेच आहे. २०१४-१५ पासून २०२२-२३ पर्यंतच्या या संपूर्ण काळात ओडिशाने दरवर्षी आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला. छत्तीसगड, तेलंगण, झारखंड या नवनिर्मित छोट्या राज्यांनी आपले स्थान उंचावले. पण, या बहुतांश काळात महाराष्ट्रामागे ‘डबल इंजिन’ची शक्ती असतानाही असे का घडले? वित्तीय विवेकाची वानवाआपण या अहवालातून (पृ. १९) २०२२-२३ साठीची आकडेवारी घेतल्यास असे दिसते की, खर्चाच्या गुणवत्तेत १८ पैकी ९ राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. तर, महसूल संकलनामध्ये मुंबई-पुण्याच्या औद्योगिकरणामुळे तीनच राज्ये आपल्यापुढे आहेत आणि १४ राज्ये मागे आहेत. वित्तीय विवेकाच्या बाबतीत ८ राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत पुढे आणि ९ राज्ये आपल्या मागे होती. कर्ज निर्देशांकात (व्याजाचे महसुली उत्पन्नाशी प्रमाण) फक्त दोनच राज्यांचा व्याजाचा भार महाराष्ट्रापेक्षा जास्त आणि बाकी पंधरा राज्यांचा व्याजभार कमी होता. कर्जांच्या निरंतर सक्षमतेत (Sustainability) तीन राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आणि १४ राज्ये मागे आहेत. बाकीच्या घटकांच्या तुलनेत, खर्चाच्या गुणवत्तेत ९ राज्ये आणि वित्तीय विवेकाच्या बाबतीत ८ राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असणे मराठी मनाला पटणारे नाही. आणि हे मराठी मन शिकायला तयार नसते, म्हणून असे घडते! सतत सगळ्या निकषांवर ओडिशाला प्रथम क्रमांकावर ठेवणाऱ्या तिथल्या राजकीय नेतृत्वाची प्रशंसा आपण करणार की नाही? वित्त व्यवस्थापनाचे अनुकरण हवेराज्यवार विश्लेषणात महाराष्ट्राविषयी असे म्हटले आहे की, (१) राज्याच्या सकल उत्पन्नाचा अंश म्हणून एकूण खर्च इतर प्रमुख राज्यांपेक्षा कमी आहे, (२) राज्याच्या एकूण खर्चांपैकी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रावरील खर्चाचे प्रमाण इतर प्रमुख राज्यांच्या तुलनेत कमी आहे, (३) राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील खर्चाची किंचितशी वाढ विचारात घेऊनही महाराष्ट्राचा खर्च इतर प्रमुख राज्यांपेक्षा कमी होता, (४) राज्य वस्तू आणि सेवाकरामुळे कर महसूल वाढला, पण करेतर महसूल कमी झाला आहे, (५) महसुली शिलकीऐवजी महसुली तूटच निर्माण झाली, (६) बांधील (Committed) खर्च वाढल्यामुळे इतर आवश्यक खर्चांनाही निधी मिळाला नाही. सार्वजनिक कर्ज वाढण्यामागचे एक कारण असे देण्यात आले आहे की, जुनी कर्जे फेडण्यासाठी (शिल्लक उत्पन्न नसल्यामुळे) सरकारला नवीन कर्जे काढावी लागली.सारांश, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आणि जनतेने कार्यक्षम वित्तीय व्यवस्थापनासाठी इतर राज्यांकडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. २०२३ ते २५ या दोन वर्षांत निवडणुकीच्या निमित्ताने लाडकी बहीण, कर्जमाफी, व्याजमाफी, वीज बिलमाफी, मोफत प्रवास अशा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अव्यवहार्य आणि अविवेकी योजना लागू करण्यात आल्या. निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या पक्षांचा विवेक अचानक जागा झाल्याने आता या योजनांची छाटणी सुरू झाली आहे. त्याचा लेखाजोखा अर्थातच नीती आयोगाच्या पुढच्या अहवालात येईल. विकासाचे अतिकेंद्रीकरण घातककेवळ काही मोठ्या शहरांमध्येच उद्योगांचे केंद्रीकरण करणे अविवेकी आहे. आता मुंबईतच तिसरी मुंबई विकसित होत आहे! पुण्यात सायकल आणि वाहने चालवणेच काय, पायी चालणेही अशक्य झाले आहे. या शहरांवरचे अतिविस्ताराचे ताण वाढत आहेत, तर दुसरीकडे अन्य शहरांचा, मागास प्रदेशांचा विकास अडला आहे. आधी तंत्रज्ञानशिक्षित मुलामुलींचे नोकरीसाठी आणि नंतर पालकांचे स्थलांतर होवून विदर्भ - मराठवाड्यात सामाजिक - मानसिक तणाव वाढत आहेत. ही प्रक्रिया दीर्घकाळापासून सुरू आहे. त्याकडे सरकारचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष आहे का? दावोसमध्ये जाहीर झालेले लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आणि लाखो रोजगारांच्या निर्मितीचे दावे भविष्यात प्रत्यक्षात आलेच, तर तोपर्यंत राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचे आणि वाढत्या बेरोजगारीचे आकडे आणखी पुढे गेलेले असतील. नीती आयोगाच्या पुढच्या अहवालात त्याचाही हिशेब मांडला जाईल. पण, ‘प्रागतिक’ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला एरवी ‘मागास’ म्हटल्या जाणाऱ्या राज्यांच्या मागे नेणारी ही आपली कोणती आर्थिक नीती आहे? समन्यायी, समतोल प्रगती साध्य करण्याचे हे असे कोणते मॉडेल आहे? आणि एकूणच त्यातून कोणता विकसित महाराष्ट्र उभा राहणार आहे? अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वांत पुरोगामी आणि उद्योगप्रधान असलेला महाराष्ट्र चौथ्या स्थानावरुन पहिल्या स्थानाकडे न जाता दोन पायऱ्या खाली गेला असेल, तर राज्याच्या नेतृत्वाला आर्थिक धोरणाचे पुनर्मूल्यांकन आणि त्याच्या अंमलबजावणीचे फेरनियोजन करावे लागेल. अन्यथा, वित्तीय ‘नीती’ आणि विकासाची ‘नियत’ यातील ही तफावत राज्यासाठी घातक ठरेल. (संपर्क - shreenivaskhandewale12@gmail.com )
रसिक स्पेशल:‘विकसित’ होण्याच्या वाटेवरची आव्हाने...
केवळ भौतिक प्रगती साधून ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होणार नाही. त्यासाठी सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि राजकीय विचारसरणीतील अंतर दूर केले पाहिजे. अन्यथा, विकसित राष्ट्र होण्यासाठी निश्चित केलेले २०४७ हे वर्ष केवळ आणखी एका संख्यात्मक ध्येयाचे प्रतीक ठरेल. आपण भारतीय लोक आता भौतिक विकासाला अग्रक्रम देत आहोत. परंतु, या विकासाच्या प्रक्रियेत प्रजासत्ताकीय संस्कृतीचा मात्र अभाव दिसत आहे. लोकांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे शासनकर्ते नव्वदच्या दशकात मजबुरी म्हणून आर्थिक विकासाच्या अमेरिकन प्रारूपामध्ये उतरले. वर्तमानात देशाची तीन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण, आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचे हे एकमेव ध्येय असले पाहिजे का, हा प्रश्न पडतो. देशाच्या संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असताना, केवळ लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करुन काही साध्य होणार नाही. तर, संविधानाची मूलतत्त्वे साकार करताना येणारे यशापयश आणि आव्हाने यांबद्दल चिंतन करणे आवश्यक आहे. भौतिक प्रगती आणि आर्थिक विकास उल्लेखनीय असला, तरी समावेशक, न्याय्य आणि समृद्ध समाजाचे स्वप्न अजूनही अनेक अडथळ्यांना तोंड देत आहे. ही अडथळ्यांची शर्यत निदान “विकसित भारत @ २०४७’ म्हणजे स्वातंत्र्याच्या शंभरीपर्यंत तरी संपवता येईल का, हा खरा प्रश्न आहे. भारताचे संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर आधारित आहे. ते अशा राष्ट्राची कल्पना करते, जिथे प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार असेल, जिथे प्रत्येकाला आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम केले जाईल. भेदभाव आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी ही तत्त्वे निश्चित करण्यात आली होती. या संविधानाच्या आधारे आपले लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र अपेक्षित ध्येय साकार करण्याच्या प्रवासात किती पुढे आले आहे, हे समजून घेण्यासाठी जगातील इतर यशस्वी प्रजासत्ताक देशांकडे पाहणे आवश्यक आहे. लोकशाहीची तत्त्वे, प्रजासत्ताकाची मूल्ये आणि त्यांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी अनुकरणीय असलेल्या पाच देशांचा त्या दृष्टीने विचार करू. अमेरिका : अमेरिकेने आपल्या संविधानाच्या आधारे स्वातंत्र्य, वैयक्तिक हक्क, नियंत्रण आणि संतुलनाची मजबूत व्यवस्था यशस्वी केली आहे. लोकांसाठी, लोकांचे सरकार, मतदानाचा अधिकार, मुक्त - पारदर्शक निवडणुका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या पहिल्याच प्रार्थना सभेत बिशप मारियन बड्डे यांनी स्थलांतरितांविषयीच्या आणि लिंगभावाबद्दलच्या धोरणावर त्यांना खडे बोल सुनावले. हे अमेरिकेच्या परिपक्व गणतंत्राचे द्योतक म्हणावे लागेल. फ्रान्स : १७८९ मधील फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या लोकशाही मूल्यांना जन्म दिला. धर्मनिरपेक्षता आणि वैयक्तिक स्वातंत्र्यांवर दिलेला भर फ्रान्सच्या प्रजासत्ताकाचे मोठे यश मानले जाते.जर्मनी : कायद्याचे राज्य, वैयक्तिक हक्क आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही जर्मन प्रजासत्ताकाची मुख्य तत्त्वे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर या देशाने लोकशाही तत्त्वे स्वीकारली आणि त्याद्वारे सर्व नागरिकांना समान संधी आणि अधिकार मिळतील, अशी व्यवस्था सुनिश्चित केली. गेल्या आठ दशकांच्या प्रवासात जर्मनीने या सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. दक्षिण आफ्रिका : १९९४ मध्ये वर्णभेदाच्या समाप्तीनंतर दक्षिण आफ्रिकेचे गणराज्यामध्ये रूपांतर झाले. तिथे मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि समानतेवर भर देणारी, लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन साधणारी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. वांशिक भेदभाव समूळ नष्ट करण्याच्या दिशेने या देशाने आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. ब्राझील : भारताप्रमाणेच ब्राझील हा संघराज्य प्रणाली असलेला एक मोठा, वैविध्यपूर्ण देश आहे. या देशाचे संविधान मानवी हक्कांचे समर्थन करते आणि लोकशाही, सामाजिक न्याय आणि निष्पक्ष न्यायाच्या अधिकारांची हमी देते. सामाजिक न्याय आणि मूलभूत सेवांच्या तरतुदींवर या गणराज्य व्यवस्थेचा भार असल्यामुळे गरीब लोकसंख्येसाठी प्रगतीशील धोरणे आखून ती यशस्वी करण्यात हा देश अग्रेसर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत? आपल्यासमोरची आव्हाने काय आहेत? आणि त्यांचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे, याबाबतचे चिंतन आवश्यक ठरते. भारताची संसदीय व्यवस्था अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रणालीपेक्षा वेगळी आहे. दोन्ही राष्ट्रे लोकशाही आदर्श मानतात. पण, भारताची विविधता आणि प्रादेशिक बारकाव्यांमुळे अधिक विकेंद्रित शासन व्यवस्था ही आपली गरज बनली आहे. संघराज्य व्यवस्था मजबूत करणे आणि उपेक्षित घटकांचे आवाज ऐकण्याला प्राधान्य देणे, ही या बाबतीतली भारतासमोरची मोठी आव्हाने आहेत. आपला देश बहुविधतेला प्राधान्य देतो. त्यामुळे इथे धार्मिक प्रथा आणि सांस्कृतिक ओळखी परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. धार्मिक विविधतेसह धर्मनिरपेक्षता अबाधित राखणे हे आपल्यासमोरचे खडतर आव्हान आहे. आर्थिक स्थिरता, शिक्षण आणि सामाजिक कल्याणकारी व्यवस्थांवर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक आहे. जातिभेद, गरिबी आणि असमानता या गोष्टीही आपल्यापुढचे एक मोठे आव्हान आहे. आपली समाजव्यवस्था आजही जातीआधारित भेदभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देते. अशा स्थितीत वर्णभेद नष्ट करण्यात दक्षिण आफ्रिकेने मिळवलेले यश राष्ट्रनिर्माण आणि सलोख्याच्या दृष्टीने आपल्यासाठी एक धडा आहे. दुसरीकडे, भौतिक प्रगती होत असूनही दर्जेदार शिक्षण, सुलभ आरोग्यसेवा, व्यापक स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या मूलभूत समस्यांना आजही आपल्या देशाला तोंड द्यावे लागते. विशेषतः ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव दूर होणे आवश्यक आहे. देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीही रुंदावत आहे. आर्थिक असमानता सामाजिक स्थिरतेला धोका निर्माण करते. समतायुक्त विकास घडवून आणण्यात अपयश आल्याने सर्व नागरिकांना समानता आणि न्यायाचे आश्वासन देणारी संविधानाची उद्दिष्टे कमकुवत होत असल्याचे दिसते. आपल्या लोकशाही प्रजासत्ताकासमोरची ही आव्हाने लक्षात घेता, परिपूर्ण विकासासाठी भविष्यात समावेशकतेवर केंद्रित धोरणे आखली पाहिजेत, जेणेकरून सर्वांत दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित आणि पीडित घटकांपर्यंत विकास पोहोचेल. त्याचवेळी पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक समता आणि हवामान बदल यांसारखे विषय अजेंड्यावर घेऊन आर्थिक विकासाचा संतुलित दृष्टिकोन साधणे आवश्यक आहे. केवळ भौतिक प्रगती साधून ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होणार नाही. त्यासाठी सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि राजकीय विचारसरणी यातील अंतर दूर केले पाहिजे. संविधान आणि प्रजासत्ताक पंचाहत्तरी पार करत असताना देशाने सर्वंकष मानवी विकासाच्या दिशेने किती पावले टाकली, हे महत्त्वाचे आहे. अन्यथा, विकसित राष्ट्र होण्यासाठी निश्चित केलेले २०४७ हे वर्ष केवळ आणखी एका संख्यात्मक ध्येयाचे प्रतीक ठरेल. (संपर्क : sukhadevsundare@gmail.com)
कबीररंग:चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाँव...
छांदोग्य उपनिषदात एक कथा आहे. एकदा एका माणसाला चोर पकडतात. गांधार या त्याच्या मायदेशापासून दूर नेतात आणि नेताना त्याचे डोळे बांधतात. पुढं त्याला वाळवंटात सोडून देतात. तुला पाहिजे तिकडं जा, असं सांगतात. मग तो ज्याला त्याला वाट विचारू लागतो. लोक सांगतील त्या दिशेनं जाऊ लागतो. याप्रमाणे गावोगाव हिंडता - हिंडता तो पुन्हा गांधार या त्याच्या मायदेशातच परततो. म्हणजे एवढं भ्रमण करूनही परत मूळ गावी येतो... सामान्य माणसाचंही असंच आहे. मायेनं पछाडलेल्या माणसाच्या डोळ्यांवर त्यानं स्वतःच पट्टी बांधून घेतल्यानं, आपलं कायमचं राहतं गाव जवळ असूनही ते दूर आहे, असा त्याचा समज होतो आणि तो वणवण फिरत राहतो. कबीर म्हणतात... नाँव न जानै गाँव का, बिन जाने किस जाँव। चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाँव।। हे जग आंधळं आहे का? की आपण आंधळे आहोत? आपल्या सान्निध्यात असलेल्या वस्तू आपल्याला जिथं आहेत, तिथं आणि जशा आहेत तशा का दिसत नाहीत, समजत नाहीत? ज्या वस्तू शोधायला पाहिजेत, त्यांचं नाव - गावही आपल्याला माहीत नाही. नीटपणे माहिती घेतल्याशिवाय शोध करायला निघाल्यानं विनाकारण आपली पायपीट होते. खरं तर काय शोधायचं असतं आपल्याला? आपल्याला कळतं का ते? की नुसतंच कालप्रवाहात आपणही वाहत जात असतो? प्रेमाची अखंड स्थिती म्हणजे काय, हे जाणून घ्यावं वाटतं. हृदयाची अमाप शांतता आपल्याला हवी असते. महत्त्वाचं म्हणजे, जगताना कुठल्याही शारीरिक आणि मानसिक बंधनांचा काच आपल्याला नको असतो. प्रेमाची अखंड स्थिती हवी असलेले आपण विषयसुखाच्या वाटेला लागतो. इंद्रियांच्या आपापसातील भांडणांमुळं न संपणाऱ्या मनाच्या कोलाहलात सापडतो आणि जाणीव मंदावून टाकणारी सारी बंधनं बहुतेक आपल्या श्वासासोबतच संपतात. आपल्याला जायचं असतं सुख-दुःखापासून मोकळं करणाऱ्या गावी आणि कुठं पोहोचतो आपण! प्रेम, शांतता आणि मुक्ती यांसारख्या मौल्यवान वस्तू कुठं शोधाव्यात, याचं ज्ञान असतं का आपल्याजवळ? म्हणूनच कबीर सांगतात... साधु सीप साहिब समुँद, निपजत मोती माहिं। बस्तु ठिकाने पाइये, नाल खाल में नाहिं।। ईश्वर हा समुद्र आहे, साधू म्हणजे त्यातील शिंपले आहे. सत्यवचनांचे मोती त्या शिंपल्यात तयार होतात. मोतीच शोधायचे असतील, तर समुद्रात बुडी घ्यायला हवी, नाल्यात आणि ओढ्यात ते कसे मिळतील? कबीर सांगताहेत : जीवनातल्या कुठल्याही मौल्यवान वस्तूचं योग्य आकलन झाल्यावर, खरं मोल कळल्यावर आणि तिचं आपल्या आयुष्यातील स्थान नीटपणे ध्यानात आल्यावरच तिचा आढळ आपल्याला कळू शकतो. या मौल्यवान वस्तूच्या शोधासाठी साधूंची वचनं, त्यांचा बोध आपल्यासाठी आवश्यक असतो. जीवनमुक्त साधूंचे दिशादर्शक वचनमोती आपल्या असण्याचा बोध खोलातून घेणाऱ्या सत्त्वशील साधकाच्या हृदयात असतात. ते उथळपणानं अनुभव घेणाऱ्या शब्दज्ञानी जनांच्या मनाच्या ओढ्यानाल्यात कुठले सापडायला? हे सारं आपल्या जीवनसाधनेतून जाणून घेणारं कबीरांचं सत्यनिष्ठ हृदय आपल्यासाठी कळवळतं. ते म्हणतात, हे सारं जगण्याचं दर्शन साधूनं घडवलं, तरी माणूस मोहमायेच्या अंधारात चाचपडतच राहतो. आत्मीय वस्तू त्याला दिसत नाही. कबीर ये जग आघरा, जैसी अंधी गाय। बछरा था सो मरि गया, ऊभी चाम चटाय।। कबीर आपल्या या दोह्यातून आणखी एका प्रतिकाच्या आधारानं जगाचा भ्रामक आंधळेपणा स्पष्ट करतात. माणसाला जे आहे ते जसंच्या तसं दिसत नाही. त्याच्या दृष्टीवर अज्ञानाची धूळ जमा झालेली असते. म्हणून वास्तविक दर्शनापासून तो वंचित राहतो. मायेचा पसारा दृष्टीत जमा झाल्यानं त्याची दृष्टी एखाद्या आंधळ्या गायीसारखी होते. गाय आपलं पारडू मेलं, तरी त्याचं अंग चाटत राहते. या प्रतिकातील गायीसारख्या आंधळेपणानं भरलेल्या जगाला कसं समजावता येईल, याची कबीरांच्या करुणामय हृदयाला चिंता वाटते. कबीरांची ही चिंता आपल्याला जगण्याच्या तातडीतून जाणवली, तर आपलं प्रेम, शांतता आणि मुक्ती यांच्या अखंड चित्तस्थितीला बाहेर शोधणं निरर्थक असल्याचा बोध आपल्याला होऊ शकेल. कबीरांना जीवनसाधकाचं हेच डोळसपण आपल्याला सांगायचं आहे! (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)
राज्य आहे लोकांचे...:राजकीय गुन्हेगारीकरणाचे प्रजासत्ताकापुढे आव्हान
नुकतेच आमच्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदरच्या वेळी जगाच्या विविध भागांमध्ये स्थायिक झालेले जुने सवंगडी जमले होते. यापैकी काही जण परदेशात उच्चपदस्थ होते. त्यापैकी सिंगापूर आणि आइसलँड इथून आलेले मित्र तिथल्या कायदा - सुव्यवस्थेबद्दल सांगत होते. तिथे आपला ८ वर्षांचा मुलगा किती निर्भयपणे एकटा टॅक्सीने फिरू शकतो, एखादी महागडी वस्तू रस्त्याच्या कडेला सोडून गेलात, तरी दोन दिवसांनी ती तशीच तिथे कशी परत सापडते, याचे कौतुक ऐकवत होते. भारतातील वातावरण आणि रोज येणाऱ्या गुन्ह्यांच्या बातम्या पाहता, इथे पाऊल ठेवल्यापासून आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत, प्रवासही दिवसाच करत आहोत, असे त्यांनी सांगितल्यावर मात्र भारतीय म्हणून मला त्याचे शल्य वाटले. आइसलँड आणि सिंगापूर हे गुन्हेगारीचे प्रमाण सर्वात कमी असलेले देश आहेत. भारत गुन्हेगारीच्या बाबतीत जगात ७७ व्या क्रमांकावर आहे आणि हे नक्कीच भूषणावह नाही. ही क्रमवारी ठरवताना केवळ नोंदवलेले गुन्हे गृहीत धरण्यात येतात. घडणारा प्रत्येक गुन्हा नोंदवला गेला, तर आपण कोणत्या क्रमांकावर असू, याची कल्पना न केलेली बरी. भारतातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि लोकांच्या मनात सतत दाटलेली भीती हे भारतीय लोकशाहीसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. वाढत्या गुन्हेगारीचा पहिला संदर्भ राजकारण आणि लोकप्रतिनिधींशी जोडला जाणे क्रमप्राप्त आहे. देशात गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांचे निकाल बघितले आणि त्यांची सरासरी काढली तर ३४ टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी २४ टक्के म्हणजे ५ पैकी एका खासदारावर गंभीर स्वरूपाचे व मोठी शिक्षा होऊ शकतील, असे गुन्हे दाखल आहेत. तीनपैकी एका आमदारावर गुन्हे दाखल आहेत. राजकीय आंदोलने , जमावबंदी असे छोटे गुन्हे वगळले तरी खून, अपहरण असे अत्यंत गंभीर गुन्हे असलेले कितीतरी लोक कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून जात आहेत, हा लोकशाहीतील केवढा मोठा विरोधाभास आहे! लोकप्रतिनिधींवरील आरोपाच्या प्रकरणांतील एक टक्क्यांहून कमी प्रकरणे निकालांपर्यंत पोहोचू शकतात. भारतीय न्यायव्यवस्थेच्या गती आणि शक्तीमध्ये प्रजासत्ताकाच्या ७५ वर्षांतही मोठी सुधारणा का होऊ शकली नाही, या सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात दडले आहे. न्यायव्यवस्था संथ, कमकुवत राहणे ही सत्ताधारी, विरोधक अशा सर्वांसाठी सोयीचे बनले आहे. निवडणुकांचे बहुतांश अर्थकारण काळ्या पैशावर चालते आणि गुन्हेगारी हा काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पदरी बाळगणे ही राजकारणाची रीत झाली आहे. आता हे संबंध इतक्या हीन पातळीवर गेले आहेत की, राजकीय पक्ष थेट गुन्हेगारांनाच तिकीट देऊ लागले आहेत. मोठ्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असूनही प्रचार न करता निवडून आल्याची कितीतरी उदाहरणे आपण पाहतो. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला अशी लोकमान्यता मिळाल्यामुळे खून, दरोडे, खंडणी असे छोटेमोठे गुन्हे दाखल असणे आणि गुंड, दबंग अशी प्रतिमा बनणे ही राजकीय पक्षांना हवीशी वाटणारी ‘पात्रता’ होऊन बसली आहे. लोकांनाही आपला लोकप्रतिनिधी गुन्हेगार का हवा आहे, हा एक सामाजिक संशोधनाचा विषय आहे. निवडणूक अर्ज भरताना स्वतःची संपत्ती आणि दाखल असलेले गुन्हे जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मग मतदान करताना आपण उमेदवारांचे शपथपत्र उघडून वाचतो का? स्वतःशी संबंधित एखादे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले की आपण आधी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतो. त्यांनी मदत करावी, अशी आपली अपेक्षा असते. थोडक्यात, आम्ही काही बेकायदेशीर केले तर आम्हाला वाचवा, तुम्ही केले तरी काही हरकत नाही, असा एक अलिखित करार मतदार - लोकप्रतिनिधींमध्ये दिसतो. सामान्य भारतीय माणूस हा अत्यंत पापभीरू , नियमांना घाबरणारा आहे. न्याय देणारी व्यवस्था कमकुवत आणि सोयी-सुविधा देणारे सरकार असमर्थ असल्याची त्याला जणू खात्रीच पटली आहे. त्यातच जात - धर्म, भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता दिवसेंदिवस अधिकच टोकदार होऊ लागल्याने तो धास्तावला आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एखादा बाहुबली आपल्याला सुरक्षा देऊ शकेल, अशी अपेक्षा कदाचित तो ठेवत असावा. एखादा साधा-सच्चा माणूस निवडून येईल आणि लोकप्रतिनिधी बनून आपले हक्क मिळवून देईल, यावरून सर्वसामन्य मतदाराचा विश्वास उडाला आहे. एकूणच अशा गोष्टींमुळे लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था कमकुवत होत आहेत. सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाचा केंद्रबिंदू असलेल्या सामान्य जनतेचे या संस्थांवरील नियंत्रण सुटत चालले आहे. ते कायम राहावे आणि आणखी मजबूत व्हावे, म्हणून आपल्या सामाजिक, राजकीय धारणा बदलल्या पाहिजेत. आमिषे, खोटी आश्वासने, फुकटच्या खैराती नाकारत गुन्हेगारीमुक्त प्रजासत्ताकासाठी ठाम आग्रह धरला पाहिजे. हे करू शकणारे नागरिकच लोकशाही वाचवू शकतील. (संपर्कः dramolaannadate@gmail.com)
पवनने ऐकलं नाही म्हणून वीरेंद्र अस्वस्थ झाला. लग्नाची गोष्ट पण पवनने ऐकली नाही. आपण उपयोगाच्या गोष्टी सांगतो; पण लोक ऐकत नाहीत, याचा वीरेंद्रला त्रास व्हायचा. वीरेंद्र आणि पवन एकाच ऑफिसमध्ये कामाला. पाच - सहा वर्षे झाली. दोघंही अकाऊंटमध्ये आहेत. पगार ठीकठाक. मैत्रीही फार नाही. म्हणजे कामच एवढं असतं की, बोलायलाही वेळ मिळत नाही. मग घरी जायची घाई. घर एक - दीड तास लांब. दोघे दोन दिशेला राहतात. वीरेंद्र तसा जन्मल्यापासून पुण्यातच राहतो. पवन बाहेरून आलाय. वीरेंद्र आईवडिलांसोबत राहतो. पवन एकटाच. हे लक्षात आलं कारण ऑफिससमोर एक राजस्थानी माणूस पोळीभाजीची गाडी लावतो. स्वस्त जेवण. पवन तिथेच जेवतो. एक दिवस वीरेंद्रने पाहिलं. त्याने मोठं भाषण दिलं पवनला. गाडीवर किती वाईट जेवण असतं, बाहेर जेवण केल्याने कसा पित्ताचा त्रास होतो, ते तेल कुठलं वापरतात, सोडा खूप घालतात.. अशा अनेक गोष्टी वीरेंद्र बोलत राहिला. मी कसा रोज घरून डबा आणतो, बाहेर काही खात नाही, हे कौतुक सांगत होता. पवन खूप वेळ ऐकत होता. मग बोलला, ‘मी एकटाच असतो रूमवर. आईवडील गावी असतात. त्यांना पैसे पाठवावे लागतात, म्हणून जेवतो इथे. स्वस्त आहे. दुसरा पर्याय नाही.’ वीरेंद्रला ती गोष्ट फार पटली नाही. पण, त्याच्याकडं दुसरा पर्याय नव्हता. अर्थात, रोज घरचा डबा खाताना त्याला पवनची आठवण यायची. तो गाड्यावर ते तेलकट जेवण खात असेल, हे डोळ्यासमोर दिसायचं. पण, त्याच्या हातात विचार करण्याशिवाय काही नव्हतं. दोघांचा पगार सारखाच होता. बाकी पुन्हा एकदा हा विषय निघाला होता, तेव्हा वीरेंद्र पवनला म्हणाला, ‘तू लग्न का करत नाहीस?’ पवन हसला. मग काही वेळाने त्याने वीरेंद्रला विचारलं, ‘माझं जाऊ दे. तू का लग्न करत नाहीस?’ मग वीरेंद्रही तसंच हसला. दोघांनाही कारण माहीत होतं. लग्न जमणं काही सोपी गोष्ट नव्हती. पगार कमी, मुलींच्या अपेक्षा जास्त. प्रयत्न तर दोघेही करत होते; पण यश येत नव्हतं. आणि लग्न जमत नाही, हे दुःख एकमेकांना शेअर करण्याएवढा त्यांचा दोस्तांना नव्हता. तरीही वीरेंद्र पवनबद्दल विचार करत राहायचा. तसा त्याचा स्वभावच होता. समोरच्या माणसाला काहीतरी सल्ला देत राहणे. ऑफिसमधले शिपाई दिसले की, त्यांना बचतीविषयी सांगत राहणे. अगदी ऑफिसातल्या मुलींना सेफ्टीसाठी चाकू असलेले नेलकटर वापरायचं सांगायलाही तो कमी करत नसे. एकदा तो फरशी पुसणाऱ्या मावशीला त्यांची पद्धत कशी चुकीची आहे, फरशी पुसताना पहिल्या केबिनपासून सुरूवात केली तर अंदाजे दहा मिनिटं वाचतील वगैरे सांगत होता. मावशी फक्त ‘मला कुठं घाई असते?’ एवढंच म्हणाल्या. पण, अशा उत्तराने वीरेंद्र कधी खचला नाही. तो सल्ले देतच राहायचा. पवनने वधू-वर सूचक मंडळात नोंदणी करावी, असा सल्ला त्याने चार-पाचदा दिला. पवन एवढे पैसे खर्चायला तयार नव्हता. जमवतील घरचे कधीतरी या विश्वासावर तो दिवस ढकलत होता. पण, पुन्हा वीरेंद्र त्याला गणित करून दाखवायचा. बायको आली, तिने स्वयंपाक करायला सुरूवात केली की किती पैसे वाचतील वगैरे.. ‘पण, बायको काय डबा बनवायला करायची का?’ पवन एवढंच म्हणाला. वीरेंद्र म्हणाला, ‘अर्थात..’ वीरेंद्रच आयुष्य अकाऊंट म्हणजे अकाऊंट. हिशेब. पुढचा विचार. पुढे हळूहळू ऑफिसात खूप गोष्टी घडू लागल्या. हा विषय वीरेंद्र विसरून गेला. पवन महिनाभर गावी गेला होता सुटी टाकून. ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटत होतं की त्याने नोकरी सोडली. कारण आधी दोन दिवसांत येतो म्हणून गावी गेलेला पवन महिना झाला तरी ‘आज येतो, उद्या येतो’ म्हणत होता. आधी वीरेंद्रने फार मनावर घेतलं नाही. पण, नंतर तो अस्वस्थ होऊ लागला. पवन आजारी तर पडला नसेल? एवढे दिवस बाहेर खायचा, नक्कीच पित्त वाढलं असेल. त्याने आपलं ऐकायला पाहिजे होतं. पवनने ऐकलं नाही म्हणून वीरेंद्र खूप अस्वस्थ झाला. लग्नाची गोष्ट पण पवनने ऐकली नाही. आपण एवढ्या उपयोगाच्या गोष्टी सांगतो; पण लोक ऐकत नाहीत, याचा वीरेंद्रला कायम त्रास व्हायचा. अर्थात एक - दोन दिवस. नंतर तो विसरून जायचा. पवनबद्दल विचार करणं सुटलं. त्याला कारणही तसंच झालं. वधू-वर सूचक मंडळातून त्याला एक स्थळ आलं. मुलगी अकाऊंटवालीच होती. दोघे भेटले. भारी गोष्ट म्हणजे, दोघांचा स्वभाव चांगलाच जुळला. तिलाही प्रत्येकीची चौकशी करायची सवय. कुणी काय केलं पाहिजे, हे आवर्जून सांगणे ही दोघांमधली कॉमन गोष्ट. म्हणजे दोघं केअरिंग आहेत, हे दोघांच्या घरच्यांना छान वाटलं. लग्न झालं. संसारात रमून गेला वीरेंद्र. पण, पुन्हा पवन आठवू लागला. कुठं असेल? तब्येत कशी असेल? त्याच्या पित्ताबद्दल चौकशी केली पाहिजे, असं मनात येऊन गेलं. खूप वेळा. पण, संसार आणि ऑफिस या भानगडीत वेळ मिळाला नाही. खूप गोष्टी राहून जातात. वेळ हे कारण. महिना झाला आणि पवन उगवला. एका महिन्यात भलताच बदलून गेला होता. गावी राहून जरा तेज आलं होतं चेहऱ्यावर. मूठभर मांस चढल्यासारखा दिसत होता. हे सगळं अर्थात वीरेंद्रच्या डोक्यात चालू होतं. आपण उगीच त्याच्या आजारपणाबद्दल विचार करून चिंतेत होतो, हा तर आणखी फिट होऊन आलाय. वीरेंद्र लंच ब्रेकपर्यंत काम कमी आणि हाच विचार जास्त करत होता. पण, ऑफिसमध्ये बोलायची सोय नव्हती. शेवटी लंच ब्रेक झाला. आता कधी एकदा पवनला गाठतो आणि प्रश्नांचा भडिमार करतो, असं झालं त्याला. पाच मिनिट, दहा मिनिट.. वीरेंद्र वाट बघत होता, पण पवन काही आला नाही. वीरेंद्र पोळीभाजीच्या गाडीपाशी उभा होता. त्याला लक्षात आलं की, आपल्या म्हणण्याप्रमाणे पवनने बाहेर गाडीवर जेवण बंद केलेलं दिसतंय. हे भारी आहे. वीरेंद्रला बरं वाटलं. मनोमन सुखावला तो. आणि पहिला घास घेतला. तेवढ्यात खांद्यावर हात ठेवला कुणी तरी. वीरेंद्रने दचकून मागं पाहिलं. पवन उभा होता. दोघांना आश्चर्याचा धक्का बसला होता. वीरेंद्र चक्क गाडीवर जेवत होता. तो हिरमुसला. शेवटी खरं बोलला.. ‘लग्न झालं, बायकोसोबत ऑफिसजवळच राहतो. आता आईवडील नसतात सोबत. आणि बायको सकाळी सकाळी उठून डबा करत नाही. तिला त्रास नको म्हणून गाडीवर जेवतो आजकाल..’ पवन त्याला ऑफिसमध्ये जाऊ म्हणाला. त्याने डबा आणला होता. पवनही लग्न करून आला होता. त्याच्या बायकोने डबा दिला होता. पवन आता रोज डबा घेऊन येणार होता. तो वीरेंद्रला म्हणाला, ‘आपण माझा डबा खात जाऊ.’ वीरेंद्र ‘नाही’ म्हणाला. त्याच्या लक्षात आलं, आपण फक्त सल्ले - सजेशन देतो, पवन सोल्युशन देणारा माणूस आहे. ‘माझा डबा खाऊ,’ असं आपण एकदा तरी म्हणायला हवं होतं. आपण उगीच स्वतःला फार केअरिंग समजत होतो. (संपर्कः jarvindas30@gmail.com)
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमधील गीतकार आणि शायरांच्या या मालिकेत आज एका अशा गीतकाराविषयी बोलू ज्यांच्या शायरीने देश-विदेशातील मुशायरे तर गाजवलेच; पण हिंदी सिनेमातील त्यांच्या गाण्यांमध्येही कसदार शायरी ऐकायला मिळायची. हे शायर - गीतकार म्हणजे राहत इंदोरी. मला अजूनही आठवतेय. ही साधारण १९७० च्या दशकाअखेरची गोष्ट असेल. भोपाळच्या रवींद्र भवनमध्ये ऑल इंडिया रेडिओने एक मुशायरा आयोजित केला होता. मी त्याला उपस्थित होतो. मुशायऱ्यात उद्घोषणा झाली.. ‘अब आपके सामने तशरीफ़ ला रहे हैं इंदौर से आये एक नौजवान शायर जनाब राहत इंदोरी..’ राहत भाई माइकसमोर आले आणि त्यांना पाहून सभागृहातले काही लोक हसले. राहत भाई म्हणाले, ‘लोकहो, माझ्याकडे नको, माझ्या शायरीकडे पाहा. आणि माझा दावा आहे की, माझ्या रचना ऐकल्यावर तुमच्यासमोर उभ्या असलेल्या या राहत इंदोरीबद्दल तुम्हाला प्रेम वाटले नाही, तर मी शायरी सोडून देईन. मी त्या सायंकाळच्या मैफिलीचा साक्षीदार आहे, त्यांनी आपल्या रचना सादर करायला सुरूवात केली आणि अक्षरश: मुशायरा गाजवला. सगळे ‘वाह, वाह’ करत होते. जे त्यांच्यावर हसले होते, ते खजील झाले. या गोष्टीवरुन मला राहत इंदोरी यांचाच एक शेर आठवतोय... अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूँ, वो मुझको मुर्दा समझ रहा है, उससे कहो मैं मरा नहीं हूँ। ही गोष्ट २००२ किंवा २००३ ची असावी. माझ्या एका सिनेमाचे काम सुरू होणार होते. त्याची कहाणी लिहितानाच आम्ही ठरवले होते की अानंद बक्षीजींकडून गाणी लिहून घ्यायची. पण, हे नियोजन सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे कुणाकडून गाणी लिहून घ्यायची, असा विचार सुरू असताना, राहत इंदोरी साहेबांना घ्यावे, असे सर्वांनी ठरवले. त्यामुळे मी राहत भाईंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते हाती लागत नव्हते. बाहेर आहेत, मुशायऱ्याला गेले आहेत, हेच प्रत्येक वेळी सांगितले जायचे. महिनाभरानंतर माझे राहत भाईंशी बोलणे होऊ शकले. तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनच बोलेन, असे मी त्यांना म्हणालो. ते माझ्याकडे आले. मी विचार केला की, तुमच्याकडून गाणी हवी आहेत, असे सांगितल्यावर ते खूप खुश होतील. मी त्यांना तसे सांगितले. ते म्हणाले, ‘रूमी भाई, तुम्हाला माझ्याविषयी माहीत नसावं. मी सिनेमाची गाणी लिहिणं बंद केलं आहे. आता मी गाणी लिहीत नाही.’ मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, ‘काय सांगता?’ त्यावर राहत भाईंनी सांगितले की, मी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’साठी शेवटचे लिहिले, त्यानंतर आता लिहीत नाही. मी विस्मयाने पुन्हा विचारलं की, तुम्ही सिनेमांसाठी गाणी लिहिणार नाही तर मग पैसाअडका - खर्चपाण्याचं काय..? हे एेकून ते खूप हसले. म्हणाले, ‘रूमी मियां, तुम्ही सिनेमावाले मला काय पैसे देणार? इथल्यापेक्षा मी खूप जास्त कमावतो.’ आता पूर्वीसारखे फारसे मुशायरेही होत नसावेत, असं मला वाटलं. म्हणून मी ‘कसं काय?’ असं विचारलं. ते म्हणाले, मी मुशायऱ्यांतून किती कमावतो, हे तुम्हाला माहीत आहे का? मी ‘नाही’ म्हणालो. त्यांनी सांगितलं की, मी अमेरिकेची एक टूर करतो. तिथे माझे मानधन ठरलेले असते. मी शनिवार-रविवारी मुशायरे करतो आणि आठवड्यांतील इतर दिवशी तिथले लोक मला स्नेहभोजनासाठी बोलावतात, भेटवस्तू देतात, कधी कधी लिफाफेही देतात. मी एकदम खुश आहे, सन्मानाने जगभरात फिरतो आहे. मी विचारलं, पण गाणी न लिहिण्याचा निर्णय तुम्ही अचानक कसा घेतला? मुशायऱ्यांसोबत गाणीही लिहित राहिला असतात.. त्यावर राहत भाई म्हणाले की, एका खूप मोठ्या निर्माता-दिग्दर्शकाने माझ्या गाण्याचा तिसरा मुखडा रिजेक्ट केला, तेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडताना मी एक शेर ऐकवला होता.. बहुत मुश्किल है ग़ज़लों की रोटियाँ खाना, बेहरे को भी शेर सुनाना पड़ता है.. त्या दिवसापासून सिनेमासाठी गाणी लिहायची नाहीत, असे मी ठरवले. एवढं सांगून राहत भाई परत गेले. दरम्यान असेच काही दिवस निघून गेले. २०११ मध्ये मी पुन्हा त्यांना फोन केला आणि मला काही बोलायचंय, कृपया माझ्या घरी या, असे सांगितले. राहत भाई माझ्याकडे आले. त्यांना म्हणालो की, मी ‘गली गली चोर है’ नावाचा एक सिनेमा सुरू करतोय. त्याचे लेखन आणि दिग्दर्शनही मीच करणार आहे. हा सिनेमा भ्रष्टाचारावर आहे. तुम्ही नेहमी व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात लिहून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करता, त्यामुळे या कथेसाठी गाणेही तुम्हालाच लिहावे लागेल. हे एेकून माझ्या प्रेमाखातर त्यांनी होकार दिला.वास्तविक हे खरे आहे की, सरकार कोणत्याही पक्षाचे असो; ते व्यवस्था आणि सरकारच्या विरोधात लिहीत राहायचे, त्यामुळे त्यांना देशाचा कोणताही नागरी सन्मान किंवा पद्म पुरस्कार मिळाला नाही. पण, त्यांना या गोष्टीचा खेद वा खंत नव्हती. त्यांनी खरा पुरस्कार देशातील जनतेची मने जिंकून मिळवला होता. त्यामुळे लोक आजही त्यांचा आणि त्यांच्या लेखनाचा सन्मान करतात. आज राहत इंदोरी साहेब आपल्यात नाहीत. त्यांचे पुत्र सतलज राहत इंदोरी हेही उत्तम युवा शायर आहेत आणि तेही वडिलांप्रमाणे मैफिली गाजवत आहेत. आज राहत इंदोरीजींच्या आठवणीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील त्यांनी लिहिलेले हे गाणे ऐका, पाहा आणि चांगला, मोठा शायर एखादे आयटम साँग लिहितो, तेव्हा त्यातही किती खोल अर्थ दडलेला असतो, याचा अनुभव घ्या. देख लें, आँखों में आँखें डाल सीख लें, हर पल में जीना यार... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
देश - परदेश:अमृतकाळातील ‘आदर्श’ गाव!
एकीकडे आपल्या गावात आर्थिक प्रगती आणि वाढते बकालपण असे विरोधाभासी चित्र दिसते, तर दुसरीकडे नागालँडमधील खोनोमा तसेच ओडिशातील कालराबंक अशा गावांत कमालीच्या स्वच्छता - सुविधांचे दर्शन घडते. तिथे श्रीमंतीचा झगमगाट नाही, पण गरिबीचे दर्शनही नाही. दृष्ट लागावी अशी ही गावे आहेत! दिल्लीत असलो तरी मी अगदी नियमितपणे माझ्या गावाची वारी करतो. अगदी एखादा महिना चुकला तरी पुढच्या महिन्यात जातो. वर्षातून सात – आठ तरी भेटी निश्चितच होतात. माझी ऊर्जा अक्षय ठेवण्यात गावाच्या या भेटी फार मोठी भूमिका निभावतात. मी उल्हसित होऊन दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाचा सामना करायला परत येतो. या नियमित भेटींमुळे गावात होणारे सूक्ष्म आणि स्थूल असे दोन्ही बदल माझ्या नजरेतून सुटत नाहीत. गांधीजींनी ‘गावाकडे चला’ अशी घोषणा दिली, मात्र गेल्या पंचाहत्तर वर्षांत शहरांकडे जाणारे लोंढे थांबले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील माझ्या गावाबद्दल बोलायचे तर विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत आमच्या भागातील गावे संपन्न आहेत. माझ्या गावाची आर्थिक प्रगती वाखाणण्यासारखी आहे. सहकारी (आणि आता खासगी) साखर कारखाने, मुबलक पाणी यांच्या बळावर शेतकऱ्यांच्या खिशात बऱ्यापैकी पैसा आहे. गावात शाळा - कॉलेज आहेतच; पण अनेक मुलं - मुली शेजारच्या इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली शहरातही शिकायला जातात. गावातील पन्नासच्या वर युवक सैन्यात आहेत आणि ७०० ते ८०० युवक – युवती देशात व देशाबाहेर अधिकारपदावर आहेत. प्रत्येक घरापुढे चारचाकी नसेल, पण दुचाकी नक्की दिसेल. चारचाकी वाहनांप्रमाणेच ट्रक - ट्रॅक्टर, रिक्षा, स्कूल बस यांचीही रेलचेल आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर अनेकदा छोटी - मोठी वाहतूक कोंडीही होते. कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनही घरोघरी पोहोचले आहेत. उत्तम प्रकारे सहकारी संस्था चालवल्या जात आहेत. साक्षरतेचे प्रमाणही ९५ ते ९७ टक्के असावे. या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा अशी ही प्रगती आहे. पण, याचा अर्थ सगळे आलबेल आणि अभिमानास्पद आहे, अशातला भाग नाही. गावात प्रवेश करण्याच्या थोडे आधी एक छोटा ओढा आहे. तिथे पूर्वी पाणी प्रवाहित असायचं आणि पावसाळ्यात वरच्या बाजूला छोटे मासेही दिसायचे. आता तिथे प्लॅस्टिकच्या बाटल्या, कोकचे कॅन, टाकाऊ वस्तू, जुन्या गाद्या अशा गोष्टींनी हा भाग व्यापलेला दिसतो. गेल्या दोन वर्षांत त्यामध्ये भरच पडली आहे. जातपात पूर्वीही होती, आता शिक्षण घेऊनही गावातल्या संस्था जातवार विभागताना दिसतात. प्रत्येक निवडणुकीत जात आणि पैसा याच कसोट्या जुने आणि नवे, युवा नेते वापरतात. ग्रामपंचायतीतही भ्रष्टाचार घुसल्याची चर्चा असून, राजकारणातील स्पर्धात्मकता टोकाला पोहोचली आहे. नदीच्या प्रदूषणाचे रडगाणे गेली दोन – तीन दशके तसेच आहे. आणि नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आताही नाक धरुनच जावे लागते. ‘हागणदारीमुक्त’ अशा गावात संडासमध्ये पाणी नसणे आणि सुरक्षित दरवाजे नसणे ही समस्या आहे. अधूनमधून स्वच्छ करण्याचे प्रयत्न करुनही गावतलावातील जलपर्णी वाढतेच आहे आणि ते पाणी पिण्याोग्यही नाही. प्रत्येक घरात नळाचे पाणी आहे, तरी जमिनीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पोटाचे विकार बळावले आहेतच; शिवाय आमचा सगळा तालुकाच कॅन्सरच्या रुग्णसंख्येत अग्रस्थानी पोहोचला आहे. आमच्या युवकांना आजूबाजूच्या भागात लग्नासाठी जोडीदार मिळत नाही, पण पैसे देऊन सुदूर प्रांतांतून मुली आणल्या जातात. एरवी कट्टर जातिवाद पाळणारे गावकरी अशावेळी मात्र जातपात बघत नाहीत. गावाच्या बाहेर असलेल्या कचरा डेपोतील अस्ताव्यस्त पसरलेला कचरा जणू गााच्या भविष्याविषयी सावधानीचा इशारा देतो आहे. या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये मी दोन आदर्श गावे पाहिली. त्यांच्याविषयी लिहिणे आवश्यक आहे. नागालँडची राजधानी कोहिमा या शहरापासून केवळ काही अंतरावर असलेल्या खोनोमा नावाच्या गावाला आशियातील सर्वांत स्वच्छ गाव मानले जाते. डोंगराच्या कुशीतील हे गाव स्वच्छ तर आहेच; पण प्रत्येक घरासमोर सुंदर हिरवळ, बाग, फुलझाडे बहरलेली दिसतात. पारंपरिक घरे, शेती, शाळा, वन संरक्षण अशा सर्वच बाबतीत मन मोहवून टाकणारे हे गाव आहे. मी पाहिलेले दुसरे गाव ओडिशाच्या राजधानीपासून सव्वा तासाच्या अंतरावरचे कालराबंक. या गावाला अनेक जण आदर्श गाव तर मानतातच, पण हे देशातील पहिले ‘स्मार्ट गाव’ मानले जाते. निसर्गरम्य परिसरातील या गावात १०० टक्के साक्षरता आहेच; शिवाय गावात उत्तम प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. सर्व ग्रामस्थांकडे आरोग्य विमा आहे. ओडिया आणि इंग्रजी माध्यमातील उत्तम शाळा, पोलिस चौकी, पोस्ट ऑफिस, मोफत वाय फाय, पथदिवे, हागणदारीमुक्त परिसर, पाण्यासाठीचा कृत्रिम तलाव आणि युवकांना नोकरीची उपलब्धता ही या गावाची काही वैशिष्ट्ये. मी भेट दिली तेव्हा तिथला शंभर खाटांचा दवाखाना तयार होत आलेला दिसला. विशेष म्हणजे, हे स्वप्न अच्युत सामंत आणि त्यांची बहीण इतिराणी सामंत या भावंडाच्या प्रयत्नाने साकार झाले आहे. या गावात श्रीमंतीचा झगमगाट नाही, पण गरिबीचे दर्शनही नाही. खोनोमा असो की कालराबंक; दृष्ट लागावी अशी ही गावे आहेत! (संपर्कः dmulay58@gmail.com)
रसिक स्पेशल:प्रजासत्ताकाचा आत्मशोध...
आता धनिक, नोकरशहा आणि राजकीय पक्ष विचार करतात. लोकांना विचार करण्याची सवय उरली नाही. परिणामी माणूस व्यक्ती म्हणून विस्कटलेला आहे. समाज एक गर्दी बनला आहे, एक ढीग झाला आहे. ढीग कोणीही कसाही हाताळावा. सत्ता ढिगातून हवं ते वेचते, बाकीचा ढीग... ढीगच राहतो. पंचाहत्तरीतील प्रजासत्ताक असं सैरभैर झालं आहे. यातून सावरत त्याला आत्मशोध घ्यावा लागेल... पंचाहत्तर वर्षांपूर्वी... भारतात १९५० मध्ये प्रथमच सिंहासनावर कोणीच बसणार नव्हतं. राजा - राणी इतिहासजमा झाले, सिंहासन संग्रहालयात गेलं होतं. सिंहासनासारखीच एक खुर्ची लोकसभेत बसवण्यात आली. त्या खुर्चीवर सभापती बसले. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचं सभागृह ते चालवू लागले. देशाचं सरकार चालवणारी माणसं या सभापतींसमोर उभं राहून, आपण काय काय करणार आहोत, ते सांगू लागली. सभागृहातले लोक नागरिकांच्या वतीनं गाऱ्हाणी आणि मागण्या मांडू लागले. कोट्यवधी लोकांच्या वतीनं त्यांचे हे प्रतिनिधी देशाचा कारभार हाकू लागले. राज्यघटनेनं लोकांना कारभार करण्याचा अधिकार दिला, त्यांच्या वतीनं प्रतिनिधी संसद, विधिमंडळे चालवू लागले. एका अर्थाने हे प्रजेची सत्ता आल्याचं द्योतक होतं. *आज प्रजा आणि सत्ता यात नातं उरलेलं नाही. प्रजेची इच्छा सत्तेला कळत नाही. प्रजा आणि सत्ता यांच्यात थेट दुतर्फा संबंध राहिलेला नाही. सत्ता स्वतःच्या वळणानं चालत राहते. त्यातून प्रजेचं जे काही व्हायचं ते होत राहतं. भारतात आणि जगातही. सत्ता म्हणजे सरकार. सरकार म्हणजे निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षानं चालवलेलं सरकार. लोकशाही अगदी बाल्यावस्थेत होती, तेव्हा रोम - ग्रीसमध्ये नगरजन चौकात गोळा होत, चर्चा करत, निर्णय घेत. नगरं मोठी झाली. कारभार नगरांपुरता नव्हे, तर अधिक मोठ्या लोकसंख्येसाठी करावा लागला. इतकी माणसं थेट गोळा होणं शक्य नव्हतं. लोकांनी प्रतिनिधी निवडावेत आणि प्रतिनिधींनी राज्य करावं, हे ठरलं. भारतात १९७२ - ७४ च्या सुमाराला असंतोष होता. गुजरात आणि बिहारमध्ये, काही अंशी देशात जनता असंतुष्ट होती, तिच्या मनासारखं होत नव्हतं. त्या राज्यात आणि देशात लोकांनीच निवडून दिलेली सरकारं होती आणि तरीही लोकांना वाटत होतं की, ही सरकारे आपलं मन ओळखू शकत नाहीत. या स्थितीला सत्ताधारी काँग्रेस पक्ष कारणीभूत आहे, त्या पक्षातला भ्रष्टाचार कारणीभूत आहे, असं काही लोकांना वाटलं. ते एकत्र आले. जेपी अर्थात जयप्रकाश नारायण यांनी असंतोषाचं नेतृत्व केलं. आपला प्रतिनिधी नीट काम करत नसेल तर त्याला परत बोलवावं, असा विचार त्यांनी मांडला. काँग्रेसचे समर्थक म्हणाले की, हा सारा विरोधी पक्षांचा डाव आहे. लोकप्रतिनिधींना परत बोलावणं व्यवहार्य नाही. सतत लोकप्रतिनिधींना परत बोलवत राहिलं, तर कारभार होणार कसा? सरकारं चालू द्यावीत, जनता आणि सरकारांमध्ये संवाद घडवून आणावा. जेपींची चळवळ यशस्वी झाली. काँग्रेसची सरकारे पडली. विरोधकांची सरकारे निवडून आली. त्यानंतर आजवर असं दिसतंय की, कोणतंही सरकार आलं तरी बहुतांश जनता असंतुष्ट असते. आज भाजपची सरकारे आहेत. हा पक्ष म्हणतो की, त्यांनी उत्तम कारभार केलाय, जनता अत्यंत सुखात आहे. त्यासाठी तो काही आकडेही देतो. विरोधक अनेक उदाहरणं देऊन जनता दुःखात आहे, असं सांगतात. अर्थशास्त्र जाणणारे शक्यतो तटस्थपणे काही उदाहरणं आणि आकडे देतात. त्यातून जनता म्हणतात तशी सुखात नाही, असं दिसतं. ही १९७५ सारख्या स्थितीची लक्षणे तर नाहीत ना, असं वाटू लागतं. *निवडणुकीचा खर्च फार वाढलाय. प्रचार महाग झालाय. लोकांना पैसा खाऊ घालण्याचा खर्च खूप वाढलाय. सभेसाठी, मिरवणुकीसाठी माणसं गोळा करावी लागतीत, ती पैसे मागतात. पुढारी पैसा कमावत असतील, तर आम्हाला त्यात वाटा का मिळू नये, असं लोक उघडपणे बोलतात. पक्षांना पैसा गोळा करावा लागतो. तो पैसा ६० टक्के लोकसंख्या असलेल्या गरिबांकडून येणं शक्य नाही. लोकसंख्येत ३५ टक्के असलेल्या मध्यम - उच्च मध्यमवर्गीयांकडून थोडासा पैसा येतो. पण, हा वर्ग एक पैसा देतो आणि दहा पैशाचा गवगवा करतो. मग उरतात समाजातले १ ते ५ टक्के श्रीमंत. ते नाना वाटांनी राजकीय पक्षांना पैसे देतात. सत्ताधारी पक्षाला पैसे देणाऱ्यांचा फायदा पाहावाच लागतो. ते तरी दिलेला पैसा परत कसा मिळवणार? सरकारकडं (ते चालवणाऱ्या पक्षांकडं) येणारा बहुतेक पैसा धनिकांकडून येतो. गरीब माणूस कर भरत नाही. आपण वापरतो त्या प्रत्येक बारीकसारीक वस्तूवर कर भरून बहुसंख्य जनता सरकारला पैसे देते.रस्ते खराब. हवा खराब. रोगराई भरपूर. औषधपाणी करता करता खिसा रिकामा होतो. शिक्षण मिळते, पण शिकणाऱ्यांची आकडे साक्षरता, भाषा साक्षरताही जेमतेमच असते, तर्कशक्ती वगैरे सोडूनच द्या. राजकीय पक्ष सरकार आणि माध्यमांच्या आधारे एवढा धुरळा उडवतात की देशातील सामान्य माणूस डोळे चोळत राहतो, त्याला सभोवतालच्या वास्तवाचा अर्थ कळत नाही. निवडणूक येते तेव्हा धुरळा फार वाढतो. हा माणूस आपल्यापुढं काय चाललंय ते पाहू लागतो, तेव्हा पक्षांनी दिलेले पैसे, मांस, मद्य, कपडे, भांडी समोर येतात. त्याचाही अर्थ त्याला कळत नसतो. तो मतदान करून बसतो. कधी कधी आपण मत कोणाला दिलं आणि कोण निवडून आला, याचा पत्ता त्याला लागत नाही. *जाहिरात, माध्यमांतून येणाऱ्या प्रतिमा आणि शब्द, इव्हेंट यांवर या गणराज्यातील प्रजेचं विचार करणं अवलंबून आहे. ती आपल्या बाबतीतले निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. या लोकांच्या ज्ञानात आणि माहितीत भर पडते, ती सार्वजनिक माध्यमातून. पण, त्यातील बहुतांश आता धनिकांनी ताब्यात घेतली आहेत. लोकांनी काय खावं, कसे कपडे घालावेत, औषधं कोणती घ्यावीत, पोरं कुठल्या शिक्षण संस्थात घालावीत, मतं कोणाला द्यावीत, कोणता राजकीय विचार करावा, हे सारं ते ठरवतात. उंची कपडे, उत्तम प्रकाशयोजना, उत्साहवर्धक संगीत, प्रभावी सूत्रधार आणि परिणामकारक पात्रं यांचा वापर ते करतात. गायक, खेळाडू, शिक्षक, डॉक्टर, कलाकार अशी मंडळी दिखाऊ पद्धतीनं पोकळ आशय लोकांसमोर पोहोचवतात. माणसांची डोकी आणि मन या आशयावर पोसली जातात. धनिक, नोकरशहा आणि राजकीय पक्ष विचार करतात. लोकांना विचार करण्याची सवय उरली नाही. त्यांनी विचार करण्याची आवश्यकता नाही, अशी स्थिती तयार झाली आहे. माणसं जगण्याच्या चक्रात इतकी अडकलीत की त्यांना विचार करायला वेळच मिळत नाही. अशातच त्यामध्ये जात येते, धर्म येतो, पंथ येतो. मग प्रत्येकाची स्वतंत्र आर्थिक स्थिती येते, कौटुंबिक स्थिती येते. हज्जार झेंगटं... परिणामी माणूस व्यक्ती म्हणून विस्कटलेला आहे. कुटुंबं विस्कटलेली आहेत. समाज ही एक गर्दी बनली आहे, एक ढीग झाला आहे. ढीग कोणीही कसाही हाताळावा, ढिगाचं काहीही करावं, ढीग स्वतः काहीही करू शकत नाही. सत्ता ढिगातून हवं ते वेचते, बाकीचा ढीग.. ढीगच राहतो. दुर्दैवाने पंचाहत्तरीतील प्रजासत्ताक असं काहीसं सैरभैर झालं आहे. * मग यावर मार्ग काय? समोरचा माणूस सांगेल - हे वस्त्र वापरा, ही टूथपेस्ट वापरा, हा पदार्थ खा, अमूक शाळेत जा, तमूकला फॉलो करा; त्यामुळं तुम्हाला स्वर्गसुख लाभेल, चिरंजीव आनंद मिळेल.. सांगू दे त्याला. काहीही सांगू देत.आपण आपला विवेक वापरावा. आपल्या कृतीमुळं निसर्गावर काही विपरीत परिणाम होत नाही ना? आपल्या वागण्यानं कोणाला त्रास होत नाही ना? आपल्यामुळं कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात नाहीय ना? असा विचार करुन नंतरच निर्णय घ्यावा. पटलं नाही तर नम्रपणे नकार द्यावा. आपले हात - पाय, डोकं वापरात राहील, एकूण शरीर आणि बुद्धी सुदृढ राहील, अशा रीतीनं आपण जगावं. हे शक्य असल्याचं गांधीजींनी दाखवून दिलं होतं. व्यापार करता येतो, कारखानदारी करता येते, पैसे कमावता येतात आणि त्याचवेळी समाज सुखी ठेवण्यासाठी संस्थाही उभारता येतात, हे टाटांनी दाखवून दिलं. गांधीजी आपल्यातलेच होते आणि टाटाही आपल्यातलेच होते. एवढं पुरेसं नाही काय? (संपर्कः damlenilkanth@gmail.com)
रान सोबती:बिलगले गवत पायात, निळे अस्मान उन्हाला हसले, क्षितिजाच्या कडा चिंब, झाल्या गुलालात!
मनसोक्त जीवन जगणारा अवलिया. झाडं करपू लागलीय की, ज्यांचं मन ही करपू लागतं, असं निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा निसर्गप्रेमी. बालकांसोबत रमणारा, कामात तसूभरही चालढकल न करणारा, कोणत्याच बंधनात न अडकणारा मुक्त पत्रकार. स्वत:चं स्वतंत्र पठडीतलं लिखाण, फेसबुकवर त्यांच्या लिखाणाचे अनंत चाहते, शंभरीच्या जवळपास ग्रंथाचे लेखक. तरीही ‘मला साहित्यिक म्हणू नका’, असा आर्जव. एवढ्या रहाटगाड्यात आरोग्याची काळजी घेणारा. समाजभान जपत ‘सेवालया’स तनमनधनाने भरभरून अर्पण करणारा. त्याचा गाजावाजा न करणारा. पत्रकार मित्राच्या मृत्यूने अस्वस्थ होणारा, हळव्या मनाचा ‘बाप’ माणूस. कोविडनं जगाला भयभयीत केलं, अनेकांच्या मनात अनेक विचारांचं काहूर माजवलं, जीवन निरर्थक झाल्यासारखं भासलं, अशा काळात ‘रानसोबती’ ही मात्रा शोधणारा सिद्धहस्त लेखक, ज्येष्ठ पत्रकार महारूद्र मंगनाळे. लॉकडाऊनच्या काळातील शेती, शेतीसमोरील आव्हाने, कष्टकऱ्यांचं तत्त्वज्ञान, वेळेचा सदुपयोग. शारीरिक श्रमाचे मोल, वाचन, ग्रंथांचा प्रेमी ‘रानसोबती’तून कळतो. शेती जगणारा, नवं तंत्रज्ञान आत्मसात करणारा, इतरांचे भले व्हावे, असे चिंतणारा. स्वत:च्या ढंगाने जगणारा, जसं जगत आहे, तो अचूक शब्दात गुंफणारा अविलया ‘रानसोबती’त कळतो. प्राण्यांना जीव लावणारा. या ग्रंथातून प्राण्यांवर न प्रेम करणारेही त्यावर प्रेम करतील, असं लेखन करणारा. तसंच मृत्यूची व मृत्यूनंतरची वास्तविकता अन् नियोजन करणारा व्यक्ती असं कृतीशील जीवन जगणारा व्यक्तीही या ग्रंथातून कळतो. मला रानसोबती या पुस्तकानं तर खरंच भारून टाकलंय. लेखक मंगनाळे यांचं निसर्गासोबतचं रानसोबती होऊन जगणं आपल्यालाही एका वेगळ्या जगात घेऊन जातं. आजच्या काळात निसर्गाशी एकरूप होऊन, असं कोणीतरी जगतयं, याचंच आश्चर्य वाटतं. हेवा वाटतो. कारण हे जगणं सोपं नाही. यासाठी व्यावहारिक जगातून बाहेर पडावं लागतं! खरं तर निसर्ग सगळ्यांनाच आवडतो. निसर्गासोबत जगावं वाटतं. पण ते शक्य नाही. याचं कारण निसर्गाचं जग व व्यावहारिक जग ही दोन वेगळी आहेत. या दोन्ही जगात एकाचवेळी एकरूप होऊन जगणं तसं कठीणच. अपवादात्मक लोक सोडले तर सगळेजण जगण्याच्या संघर्षात अडकून पडलेत. कौटुंबिक आयुष्य जगायचं तर केवळ निसर्गात राहून भागत नाही. व्यावहारिक जगातच ही लढाई लढावी लागते. या जगात ‘निसर्ग’ हा शब्द तोंडी लावण्यापुरताच असतो. भारतीय माणूस घाण्याच्या बैलासारखं एक चाकोरीबद्ध जीवन जगतो. बालपण, शिक्षण, नोकरी वा व्यवसाय, लग्न, लेकरं आणि पुन्हा लेकरांच्या करिअरसाठी कष्ट करणं. यात आयुष्य कधी संपून जाते, ते कळतही नाही. अपवाद सोडले तर बहुतेकजण या चौकटीतच जगतात. कुटुंबव्यवस्था म्हणजे ही चौकट. ती ओलांडण्याचं धाडस अपवादात्मक लोक करतात. साहजिकच मूठभर लोकांच्या वाट्याला असं वेगळं जगणं येतं शाळेची पायरी चढेपर्यंतचं जगणं निरागस, बालपणाचं! तोपर्यंतच ते त्याच्या मनाला वाटेल तसं जगू शकतं. मातीत, चिखलात लोळू शकतं. पाण्यात खेळू शकतं. वस्तुंची फेकाफेक, कागदं फाडणं, वाटेल तसे हातवारे करणं, आरडाओरडा करणं आणि भूक लागली, की जोरात रडणं...असं सर्व काही ते करू शकतं. हे करण्यावर बंधनं घालणं म्हणजे त्याचं बालपण संपलं, हे घोषित करणं. लेकरू खेड्यात, गावात जन्मलं असेल तरच त्याचा शेती, मातीशी, निसर्गाशी थोडातरी संबंध येतो. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या लेकराचा निसर्गाशी संबंध येतोच. मात्र, मूल फ्लॅट संस्कृतीत जन्मलेलं असेल तर, त्याचा निसर्गाशी संबंध येत नाही. त्याला हळूहळू निसर्ग कळतो, तो शहरातील बागेत, पुस्तकातून नाही तर टीव्हीच्या माध्यमातून. पुढे मोठा झाल्यावर पर्यटनातून. पण एवढ्यातून त्याला निसर्ग किती कळणार ? आणि त्याला निसर्गाबद्दल प्रेम तरी कसं निर्माण होणार ? हे समजून घेण्याची गरज आहे. लेकरू शाळेत चाललं, की त्याच्यावर संस्कार केले जातात. म्हणजे...हे करू नको. ते करू नको..हे चांगलं, ते वाईट... हे खा, ते खाऊ नको..वगैरे...वगैरे! असं बरचं काही मुलांच्या डोक्यात भरलं जातं. यात मुलांना काय हवं, याचा विचारच नसतो. आपल्या शिक्षण व्यवस्थेत लेकरांची इच्छा काय आहे ?, याचा कुठंच विचार व्हायला हवाच. मुलांनी काय शिकावं, हेही मोठी माणसंच ठरवतात. गंमत म्हणजे यात काही चुकीचं आहे, असं कोणाला वाटत नाही. मी मंगनाळे सरांची बरीच पुस्तकं विद्यापीठात शिकत असल्यापासून वाचलीत. अजूनही वाचत आहे. फेसबुकवरचं त्यांचं लिखाण वेळ मिळेल, तसं वाचत असतोच. ‘रानसोबती’ नुकतंच वाचलं. या पुस्तकांमधील हर्ष, गबरू,अन्वी या लेकरांचं निसर्गासोबतचं स्वच्छंदी जगणं बघून माझ्या मनात हे सगळं येऊन गेलं. शाळेबाहेरचं निसर्ग शिक्षण या लेकरांना इथं मिळतयं. हे शिक्षण म्हणजे आयुष्यभराची अमूल्य अशी शिदोरीच. निसर्गात राहणं, फिरणं सगळ्याच लेकरांना आवडतं. पण ते फार कमी मुलांच्या वाट्याला येतं. दररोजच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक मुलांना घरी वेळ देऊ शकत नाहीत. ते त्यांना काय निसर्गात घेऊन जाणार ? डोंगरावर फिरणं, पक्षी, प्राणी बघणं, झाडांची, वेलींची माहिती घेणं, झाडावर चढणं, मातीत घसरगुंडी खेळणं, चिखलात फिरणं, पावसात भिजणं या सगळ्या गोष्टी प्रत्येक लेकराला हव्या हव्याशा वाटणाऱ्याच असतात. असं जगण्याचं भाग्य ‘रानसोबती’मधील लेकरांना लाभलंय. त्यांच्या जगण्याचाही मला हेवा वाटतोच. तसा तो इतरांनाही वाटल्याशिवाय राहणार नाही. मी हे बालपण बऱ्याच प्रमाणात अनुभवलंय. पण ते माझ्या लेकरांच्या वाट्याला देण्याचा प्रयत्नही करायला हवा. लेखक केवळ स्वत:च रानसोबती बनत नाही तर, सोबतच्या लेकरांनाही रानसोबती बनण्याची संधी देतो, ही बाब मला खूप मोलाची, प्रेरणादायी वाटते. रूद्रा (लेखकाचं शॉर्ट नाव) लेकरांना माळावर फिरायला नेतो. तिथं कुठल्या तरी अज्ञात प्राण्यानं छोटासा बोगदा केलाय. रूद्रा त्याला कोल्ह्याचं घर म्हणतो. लेकरंही त्याला तेच म्हणतात आणि आश्चर्य म्हणजे एके दिवशी त्या बोगद्यातून कोल्ह्याची छोटी-छोटी पिलं निघतात. ती पाहून लेकरं खूष होतात. त्याचे फोटो काढले जातात. कोल्हे बघायला मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा केला जातो. रूद्रा लेकरांसोबत फिरता फिरता त्यांना झाडा-झुडपांची, पक्ष्यांची माहिती सांगतो. त्यांच्या आवाजाची नक्कल करायला शिकवतो. त्यांना त्यांच्या मनासारखं वागायचं स्वातंत्र्य देतो...यातून नकळतपणे मनात रूजतात ते खरेखुरे संस्कार ! जे, की आयुष्यभर टिकून राहतात. लेकरं आपल्या आवडत्या व्यक्तीचं कळत नकळत अनुकरण करत असतातच. रुद्राचं वृक्षप्रेम लेकरांमध्येही उतरलंय. या पुस्तकातील ही नोंद बोलकी आहे. मळ्यात झाडांची कटींग करीत असताना अचानक हर्षनं प्रश्न केला, बाबा आपण ट्री सर्व्हंट आहोत का? ...मी म्हटलं, हो...माणसांचे नोकर होण्यापेक्षा वृक्षाचे नोकर बनून जगणं खूप आनंददायी....हर्ष बोलला, मी ट्री सर्व्हंट बनणार बाबा...मी म्हटलं, माझा पाठिंबा आहे तुला ! हा संवाद किती बोलका आहे. मुलांना झाडं लावण्याचं महत्त्व सांगून परिणाम होण्याची खात्री नाही. पण हर्षनं रुद्रा हट परिसरात बाबानं जोपासलेलं जंगल बघितलं. त्याला वाटलं,आपण टी सर्व्हंट व्हायला हवं. रीद्रा पुस्तकप्रेमी. सतत लिहितो. वाचतो. हटवर त्याचं छोटसं ग्रंथालयही आहे. त्या प्रभावामुळे हर्ष हा सहावी-सातवीत शिकणारा मुलगाही जाडजूड पुस्तकं वाचू लागतो. गांधी आणि रजनीश वाचून त्यांचे वाढदिवस साजरे करण्याची आठवण करून देतो, तेव्हा मीही हे वाचून चकीत होतो. रानसोबती ४४८ पृष्ठांच्या नोंदींमध्ये शेकडो बाबी आहेत. निसर्ग आहे, पाऊस, पीकं, पाणी आहे. शेतीतल्या समस्या आहेत. शेतकामांच्या विस्तृत नोंदी आहेत आणि क्षणाक्षणाला बदलणारा आनंददायी निसर्गही आहे. कोरोनामुळं निर्माण झालेल्या प्रश्नांची चर्चा आहे. जनावरांचा बाजार आहे. तिथले बारकावे, उलाढाली आहेत. ज्याला लेख म्हणता येईल अशा तीन-चार पानांच्या ४०-५० नोंदी आहेत. मला तर या नोंदीत काही कादंबरीची बीजं दिसतात. रूद्रा हटवरच्या माणसांसोबतच जनावरं, कुत्र्या-मांजरांवरही यात भरभरून लिहिलंय. रुद्राच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, कुठलीही माहिती देताना तिला तो ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी बनवतो. साहजिकच तो मजकूर अधिक वाचनीय बनतो. वाचनीयता हे या लेखनाचे बलस्थान आहे. एखादी नोंद वाचायला घेतली की, वाचक ती वाचत वाचत पुढे सरकतो. सामान्य वाचकही यात रमून जातो. रॉकी या कुत्र्याचा अपघाती मृत्यू झाला. काळविटाचे शिंग कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यात अडकल्याने तो दगावतो. ही घटना नोंदवताना लेखक, रॉकीचा संपूर्ण इतिहास सांगतो. रॉकीचं बालपण, त्याच्या गंमतीजमती तो जिवंतपणे आपल्या समोर उभं करतो. हे लेखन वाचून वाचकही गहिवरल्याशिवाय राहणार नाही, हे महारूद्र यांच्या लिखाणाचं बलस्थान. हॅप्पी नावाच्या कुत्रीचं बाळंतपण, तिच्या सहाही पिल्ल्यांचा जन्मानंतर काही तासात झालेला मृत्यू, ही घटनाही वाचकांना अशीच अस्वस्थ करते. पिल्लांच्या मृत्यूवर लिहिलेल्या कविता वाचताना आपणही त्या दु:खाचे भागीदार बनतो. हॅप्पीवर दोन कुत्र्यांनी केलेला हल्ला, तिचं जखमी होणं हा प्रसंगही लेखक आपल्या समोर घडत असल्यासारखा उभा करतो. याचं कारण कुत्रे लेखकासाठी केवळ प्राणी नाहीत तर, त्याचे रानसोबती आहेत. प्राण्यांवर जीवापाड प्रेम असल्याशिवाय कोणी असं लेखन करू शकत नाही. रूद्रा हा केवळ लेखक नाही. तो एक पत्रकार आहे. पत्रकार हा कुठल्याही घटना-घडामोडीकडे तटस्थतेने बघू शकतो. त्याचं योग्य मूल्यमापन करू शकतो. लेखक स्वत: शेतीत कष्ट करतो. यादृष्टीने तो शेतकरी आहेच. तरीही तो शेतीतील प्रश्नांकडे तटस्थपणे बघतो. सर्वसाधारण शेतकऱ्याला ते शक्य नाही. शेतीचे प्रश्न तो नेमकेपणानं मांडतो. यात भाबडेपणा,दीनवाणेपणा किंवा आक्रस्ताळेपणा नाही. तो सरकार वा अन्य कोणाकडून अवास्तव अपेक्षा व्यक्त करीत नाही, की, रडगाणे गात नाही. निसर्ग हा त्याच्या नियमांनी बद्ध आहे. त्याप्रमाणेच तो चालणार. निसर्गाच्या लेखी माणूस नावाचा प्राणीच नाही. त्यामुळं कोणाचं भलं-बुरं करण्याशी त्याचा संबंध नाही, हे वास्तव तो वारंवार नोंदवतो. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तो सूचकपणे उपाय सांगतो. पण तो कोणाला सल्ला वा मार्गदर्शन करीत नाही. हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. ‘रानसोबती’मधील लेखनात सगळीकडं रूद्रा आहे. आपलं नित्याचं जगणं इतक्या खुलेपणाने क्वचितच कोणी मांडलं असावं. उठल्यापासून ते झोपेपर्यंतचा अख्खा दिनक्रमचं तो वेगवेगळ्या नोंदीतून सहजतेने मांडतो. पेरणी, पेरणी पूर्वीची मशागत, यामध्ये दुबार, तिबार पेरणी, छाटणी, हरित क्रांती, प्राध्यापक पेशा सोडून अर्धांगिनीची मिळालेली साथ यांचं महत्तव, यासह शेतीतील पायकुटी, कोळपणी, मूग वापणे, तुरीची धाट आदीप्रकारचे शब्दही कळतात. याचबरोबर ‘रानसोबती’ वाचताना असं वाटतं की, आपणच रुद्रा हटवर, माळावर त्याच्यासोबत फिरतोय. काम करतोय. फोटोसह केलेल्या खाण्याच्या नोंदी आपली भूक जागी करतात. वाटतं आपणही दही,चटणी,भाकरी खायला हवी. चिवड्याची चव अनुभवायला हवी. काळा चहा असो की, काळी कॉफी, ती लेकरांसोबत पिताना त्याचाही तो उत्सव करतो. रानसोबती या पुस्तकात सगळ्या तारीखवार (01 जानेवारी 2020 ते 27 जून 2021) नोंदी आहेत. एकप्रकारची ही रोजनिशीच आहे. यातून लेखकाचं निसर्गासोबतचं जगणं साकार झालंय. साधी, सोपी प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक कोणीही वाचू शकतो. ‘जगलं, अनुभवलं अन् ते लिहिलं’ अशी लेखकाची भूमिका आहे. त्यामुळे यात कल्पनारम्य असं काही नाही. निसर्गासोबतचं वास्तव जगणं यात आहे. यात आलेल्या विषयांची व्याप्ती बघितली तर, भविष्यात रानसोबती याच नावाची कादंबरी होऊ शकते, असं मला वाटते. ती व्हावी यासाठी मी शुभेच्छा देतो. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांनी वेळ काढून हे पुस्तक वाचायलाच हवं, असं मला वाटतं. हे पुस्तक तुम्हाला एका वेगळ्या जगण्याचा परिचय नक्कीच करून देईल, असा माझा विश्वास आहे. ज्येष्ठ कवीवर्य, साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनीही ‘रानसोबती’च्या लेखनाला ‘अभिजात साहित्याचा दर्जा मिळवून देणारं पुस्तकंय. मराठीतला असा अनमोल ठेवा आहे. थोरोच्या लेखनाचं कौतुक असणारांनी हेही लेखन वाचून पाहिलं तर त्यांना थोरोनं पुनर्जन्म घेतल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही’, असं नमूद केलंय. त्यामुळंही ‘रानसोबती’ वाचायलाच हवं. लातूरच्या मुक्तरंग प्रकाशनानं हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. हे पुस्तक वाचताना कवी ना. धों. महानोर यांच्या दोन वेगवेगळ्या कवितेतल्या ओळी आठवतात. ते म्हणतात... बिलगले गवत पायात, निळे अस्मान उन्हाला हसले, क्षितिजाच्या कडा चिंब, झाल्या गुलालात! (लेखक सहायक संचालक (माहिती) असून ते विभागीय माहिती कार्यालय लातूर येथे कार्यरत आहेत.)
कबीररंग:लघुता से प्रभुता मिलै, प्रभुता से प्रभु दूरि...
कबीरांनी देहाचं सार आणि असार असणं याचं आपल्या दोह्यांतून, पदांतून सातत्यानं जागरण केलं आहे. आपल्या इच्छा सतत सुखाच्या भोगांमागं धावत असतात. भोगसुखात अडथळा आला की मन दुःखीकष्टी होतं. इच्छा टाकून देता येत नाहीत, त्याचं एका अनासक्तीतून व्यवस्थापन करता येत नाही. मन इच्छेच्या जाळ्यात जन्मभर अडकून पडतं. मनाला अमर्याद मोकळेपण लाभत नाही. कबीर म्हणतात, इंद्रियांच्या ताब्यात इच्छा गेल्यानं मन सतत असंतुष्ट राहतं. पण, देहबुद्धी समजून घेऊन अखंड प्रेमभावात राहिल्यानं मन सैरभैर होत नाही, ते ईश्वराशी जोडलं जातं. हाच तर मुक्तीचा अर्थ असतो. देहाच्या संगतीत भोगसुख घेता येतं, देहाच्या संगतीत विवेक नसेल, तर मन विकारग्रस्त होऊ शकतं. पण, कबीर देहाकडं इच्छेच्या जाळीतून कायमचं बाहेर पडायचं एक साधन म्हणून पाहतात. या दोह्यांच्या अभ्यासातून देहाचं साधन शुद्ध स्वरूपात जिज्ञासू साधकाला जाणवू शकतं. जग में बैरी कोइ नहीं जो मन शीतल होय। या आपाको डारि दै, दया करै सब कोय।। कबीर म्हणतात, आपलं मन ‘मी आणि माझंपण’ याच्या तापदायक झळांनी वेढलेलं नसेल आणि ते स्वाभाविक असेल, तर आपल्याला सर्वात्मकाच्या दयेचा लाभ होतो. हे वाचताना आपल्या मनात सहज प्रश्न उमटतो : आपल्याला सर्वात्मकाच्या दयेचा लाभ होतो म्हणजे काय? मन शीतल तेव्हाच असतं, जेव्हा ते भोगसुख देणाऱ्या इंद्रियांकडून नियंत्रित नसतं. ते शुद्ध चेतनेशी, उच्चतम ‘मी’शी जोडलेलं असतं. या स्थितीत आपल्यातील उणेपण जाणून घेणाऱ्या जीवनशक्तीचा आपल्याला आधार लाभतो. रचनात्मक ऊर्जा कार्यरत होते. यासाठी सर्वात्मकाचा सहवास, नियतीचे संकेत पूरक-पोषक होतात. आपलं हृदय समस्त जीवांचं असणं जाणून त्यांच्याविषयीच्या करुणेनं भरून येतं. कबीर म्हणतात, हीच ईश्वराची दया असते, जी केवळ मन शांत असताना लाभते. काम क्रोध मद लोभ की जब लग मन में खान। कह मूरख, कह पंडिता दोनो एक समान।। आपल्या मनात काय असतं? सुखाची इच्छा, तृप्ती-अतृप्तीच्या विचारांची आंदोलनं, ‘मीपण, माझंपण’, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ यांसारखे विकार, यांनीच तर मन नेहमी भरलेलं असतं! आपलं मन रिकामं कधीच नसतं. कबीर म्हणतात, आपलं मन सुखाच्या इच्छेने निर्माण झालेल्या विचार-विकारांची खाण असतं. ते मूर्ख आणि तथाकथित पंडित यांच्यात फरक करत नाहीत. ते म्हणतात, पंडितांच्या मनांवर काम, क्रोध, मद, लोभ अशा विकारांचा ताबा असेल, तर ते मूर्खाहून वेगळे नाहीत. कारण खरे ज्ञानी देहाला, मनाला जीवनाचा उद्देश निर्धारित करू देत नाहीत. ते मनाचं आणि इंद्रियांच्या विषयाचं स्वाभाविक व्यवस्थापन सहज करू शकतात. म्हणूनच ते देहाला, मनाला जाणून फक्त आत्मबुद्धीलाच आपल्या जीवनयात्रेचं निर्धारण करू देतात. लघुता से प्रभुता मिलै, प्रभुता से प्रभु दूरि। चींटी शक्कर ले चली, हाथी के सिर धूरि।। कबीरांचं प्रतिकात्मक भाषेतील सांगणं किती सहज आणि सुबोध आहे, ते जाणून घेण्यासारखं आहे. या दोह्यांतील लघुता आणि प्रभुता यांची जोडणी नीटपणे अभ्यासण्यासारखी आहे. हे कबीरांनी घडवलेलं जीवनदर्शन आहे. लीनता, नम्रता ही परमप्रेम करणाऱ्या जीवाची लक्षणं आहेत आणि यानेच तर खरं मोठेपण लाभतं. एखादं झाड फळभारानं भुईवर झुकावं तशीच जीवाची लीनता आणि नम्रता असते. ही स्थिती सहज स्वभावातून साधलेली असते. माणसाचं समाजमान्यतेच्या, लोकप्रतिष्ठेच्या आणि अहमच्या संकल्पनेचं एक मोठेपण असतं. पण, या मोठेपणापासून प्रभूचं असणं खूप दूर असतं. त्यात माणसाच्या कर्तेपणाचा अंशही नसतो. माणसाच्या सहजस्थितीत नम्रता असते. यासाठी कबीर एक जीवनाशी जोडलेलं प्रतीक योजतात. लीनता असल्यानं मुंगी साखरेचा दाणा सहज वाहून नेते. भार वाहून नेत असल्याची जाणीव तिला नसते. पण, आपल्या मोठेपणामुळं हत्तीला माथ्यावरून धूळ वाहून न्यावी लागते. तथाकथित पंडितासाठी ईश्वराचं सान्निध्य शब्दांची धूळ वाहून नेण्यासारखं असतं. मात्र, भक्तासाठी ते भावात्मक सोबत्यासारखं असतं. देहभाव, मनोभाव या पलीकडचा आत्मभाव उमजावा, यासाठीच कबीरांचं हे दोह्यांतून तळमळीनं सांगणं आहे. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)
रसिक स्पेशल:मानव आणि वन्यजीव संघर्षावर उपाय काय?
महाराष्ट्रात अलीकडे माणूस आणि वन्यजीवांतील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यावर मार्ग शोधण्यासाठी ८ - ९ जानेवारीला चंद्रपूरमध्ये ‘वाइल्डकॉन-२०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. संरक्षित क्षेत्राबाहेरच्या जंगलात तसेच मानवी वस्तीजवळ होणारा वन्यजीवांसोबतचा संघर्ष आणि संभाव्य उपायांवर यावेळी मंथन झाले. गेल्या काही वर्षांत देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघ - बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: संरक्षित जंगलांपेक्षा असंरक्षित जंगलांत वाघांची संख्या वाढत आहे. एकीकडे वन्यजीवांची संख्या अशी वाढत असताना जंगल मात्र कमी होत आहे. शिवाय, शिकारीच्या घटना आणि वाघांच्या भ्रमणमार्गातील अडथळे वाढत आहेत. परिणामी एकमेकांवरील हल्ल्यात वाघ किंवा अन्य वन्यप्राणी आणि माणसांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर तातडीने उपाय न केल्यास जनआक्रोश वाढेल आणि वाघांच्या संरक्षणातही अडथळे निर्माण होतील. चंद्रपुरात ताडोबा वन विभागाने घेतलेल्या ‘वाइल्डकॉन-२०२५’मध्ये सुचवण्यात आलेले उपाय मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. यापैकी काही महत्त्वाचे उपाय असे : 1) वन्यजीवांचे व्यवस्थापन : वाघ, बिबटे, अस्वल, नीलगायी, रानडुक्कर, वानर, हरीण या प्राण्यांची वाढती संख्या मानव-वन्यजीव संघर्षाला आणि मृत्यूला कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, मात्र हे खरे नाही. वाढत्या वन्यजीवांसाठी जंगले आणि भ्रमणमार्ग राहिले नाहीत, हे खरे कारण आहे. आपण एकूण भूभागाच्या ९५ टक्के जमीन माणसांसाठी आणि फक्त ५ टक्के वन्यजीवांसाठी ठेवली आहे. हा नैसर्गिक न्याय नाही. या वन्यजीवांसाठी अधिवास उपलब्ध नसल्याने त्यांची संख्या नियंत्रित ठेवावी लागेल आणि त्यासाठी वन विभागाला सुयोग्य वन्यजीव व्यवस्थापन करावे लागेल. तसे झाले तर हा संघर्ष पूर्णपणे संपणार नसला, तरी निश्चितपणे कमी होईल. 2) जंगलांचे संरक्षण, संवर्धन : वाघ आणि अन्य वन्यजीवांसाठी मोठ्या जंगलांची गरज असते. देशाच्या स्वातंत्र्यावेळी राज्यात ३० % जंगल होते, आज ते केवळ १७ % उरले आहे. आज केवळ अभयारण्येच शिल्लक राहिली आहेत. उर्वरित जंगले अतिक्रमणे, ग्रामीण आणि शहरी विकासकामांमुळे नष्ट होत आहेत. त्यामुळेच विदर्भातील वाढत्या वाघांना पुरेशी जंगले आणि भ्रमणमार्ग राहिले नाहीत. त्यामुळे आज आहेत तेवढ्या वाघांना आणि वन्यजीवांना सामावून घ्यायचे असेल, तर सध्याची जंगले टिकवतानाच नवी जंगलेही निर्माण केली पाहिजेत.- भ्रमणमार्ग सुरक्षित करणे : एका जागेवरून दुसरीकडे जाणे हा वन्यप्राण्यांचा स्वभाव असतो. वाघांची बछडे मोठी झाली की त्यांना दुसरी जागा शोधावी लागते. हे वन्यजीव मिलनासाठी तसेच अन्नाच्या शोधात भ्रमण करीत असतात. पण, शेती आणि गावांसाठी होणारी जंगलतोड, अनियंत्रित विकासकामे यांमुळे वाघांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातूनच व्याघ्र - मानव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे आपण वन्यजीवांचे भ्रमणमार्ग सुरक्षित करणार नाही तोपर्यंत मानवावरील हल्ले सुरूच राहतील. 3) मानवी हस्तक्षेप कमी करणे : ग्रामीण भागातील लोक जंगलात उदरनिर्वाहाची साधने शोधतात. शेती अवजारांचे लाकडू, काड्या-मोळ्या, बांबू, मोहफुले, तेंदुपत्ता आणि अन्य वनोपज आणण्यासाठी ते जंगलात जातात. गुराखीही बकऱ्या, गुरे-ढोरे चारण्यासाठी तिथे जातात. या लोकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. त्यांना गावातच आवश्यक साधने, चराऊ कुरणे मिळाली तर ते जंगलात जाणार नाहीत. शिकारी, लाकूडतोड अशा अवैध प्रकारांमुळे वन्यजीवांचा माणसाशी संघर्ष वाढतो आहे. त्यामुळे जंगलातील मानवी हा हस्तक्षेप कमी केला पाहिजे. 4) समस्याग्रस्त गावांचे पुनर्वसन : व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील गावांच्या तुलनेत संघर्षग्रस्त बफर क्षेत्रातील आणि बाह्य गावांचे पुनर्वसन होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक व्याघ्र - मानव संघर्ष ब्रह्मपुरी विभागात होतो, कारण हा वाघांचा भ्रमणमार्ग आहे आणि तिथेच गावांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडक गावांचे पुनर्वसन करुन अन्य गावांमध्ये नियमित निरीक्षणे, लोकांच्या सतर्कतेसाठी ‘एआय’ आधारित साधने या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. 5) शेती आणि गावांना संरक्षण : व्याघ्र - मानव संघर्षात बहुतांश मानवी मृत्यू जंगलात झाले असले, तरी काही घटना गावाजवळही घडल्या आहेत. बिबट्या बहुदा गावाजवळ आढळतो, त्यामुळे लोकांना शेतात जायची किंवा रात्री बाहेर पडण्याची भीती असते. त्यातूनच अशा वन्यजीवांना मारण्याच्या घटना घडतात. जंगलाजवळच्या गावांना आणि शेतीला सोलर कुंपण लावणे हा त्यावरील एक पर्याय आहे. 6) वन्यजीवांसाठी पुरेसे अन्न - पाणी : वाघ किंवा वन्यजीव वनाबाहेर निघतात तेव्हा त्यांना पाणी मिळत नाही. तळे आणि जलसाठे तयार केल्यास ते गावाजवळ येणार नाहीत. संरक्षित क्षेत्राबाहेर त्यांच्यासाठी पुरेसे अन्न नसते. त्यासाठी कुरणे तयार करून प्राण्यांची संख्या वाढवावी. चंद्रपुरातील परिषदेत अशा अल्प तसेच दीर्घकालीन उपायांवर चर्चा झाली. वन विभाग, ग्रामस्थ, अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांना त्यावर कालबद्ध पद्धतीने काम करावे लागेल. या उपायांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास व्याघ्र - मानव संघर्ष आणि त्यातून होणारे माणसांचे मृत्यू निश्चितपणे कमी करता येतील. दृष्टिक्षेपात... - राज्यातील वाघांची संख्या - ४४६- ताडोबासह चंद्रपुरातील वाघ - ३००+- अनैसर्गिक मृत्यू झालेले वाघ - ५०+- वन्यजीवांशी संघर्षात मानवी मृत्यू :- चंद्रपूर - १६८, गडचिरोली - ४०, अहमदनगर - १४, यवतमाळ - ११, गोंदिया - ७, नाशिक - १०, भंडारा - ८- राज्यातील एकूण बळी - ३००(२०१९ ते २०२३ दरम्यानची आकडेवारी) लोकसहभाग, लोकशिक्षण हवे : वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणात स्थानिक लोकांचे सहकार्य मिळत नाही, तोवर त्या बाबतीत कायमस्वरूपी उपाय करता येत नाहीत. व्याघ्र - मानव संघर्षाबाबत आक्रस्ताळी भूमिका न घेता, लोकांची मने जिंकून, त्यांच्या सहभागातून वन्यजीव व्यवस्थापन यशस्वी होऊ शकते. त्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून नागरिक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागेल. सध्या वन विभाग आणि स्वयंसेवी संस्था ही कामे करीत आहेत. पण, त्यातील उणिवा दूर करुन या अभियानाचे सातत्य टिकवले पाहिजे. (संपर्कः smchopane@gmail.com)
देश - परदेश:मुद्रांकित, मनमोहक मनमोहन
डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून केलेले कार्य आणि पंतप्रधान म्हणून दिलेले योगदान महत्त्वाचे होतेच, पण त्याहून महत्त्वाचे होते ते त्यांचे साधे आणि पारदर्शी व्यक्तित्व. माणूस म्हणून त्यांची गुणवत्ता आजच्या काहीशा दूषित राजकीय विसंवादी वातावरणात नंदादीपासारखी प्रेरणादायी ठरावी. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशभर उमटलेली शोकात्मक प्रतिक्रिया काही अंशी अनपेक्षित होती. गेल्या दहाएक वर्षांमधील देशातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांच्या कर्तृत्वाविषयीची चर्चा होण तर दूर; देशाचे पंतप्रधानपद भूषवलेली ही व्यक्ती संपूर्णपणे विस्मृतीत गेली की काय, असे वाटत होते. पण, तसे झाले नाही. किंबहुना, त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून दु:ख व्यक्त झाले. आज ज्या आर्थिक विकासाची चर्चा होते, भारतात ज्या सुधारणांमुळे आर्थिक विकासाचे तुंबलेले पाणी मोकळे झाले, ते करणाऱ्यांमध्ये एक अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेले पायाभूत काम कारणीभूत आहे, याचे स्मरण करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग या जोडगोळीने १९९० च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून वाचवण्याबरोबरच सर्वच क्षेत्रांत आलेल्या ‘लायसन्स राज’ आणि ‘इन्स्पेक्टर राज’ या दोहोंना तिलांजली दिली. हे काम खूप अवघड होते आणि त्यासाठी भल्याभल्यांची टीका सहन करुन या दोघांनी आपली ऐतिहासिक भूमिका धैर्याने पार पाडली. इतकेच नव्हे, तर आपल्या या यशाचा ढिंढोरा पिटण्याचे निम्न दर्जाचे कामही केले नाही. डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून केलेले कार्य आणि पंतप्रधान म्हणून दिलेले योगदान महत्त्वाचे होतेच, पण त्याहून महत्त्वाचे होते ते त्यांचे साधे आणि पारदर्शी व्यक्तित्व. माणूस म्हणून त्यांची गुणवत्ता आजच्या काहीशा दूषित राजकीय विसंवादी वातावरणात नंदादीपासारखी प्रेरणादायी ठरावी. त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येण्याचे थोडेफार भाग्य मला मिळाले आणि प्रत्येक चर्चेत, संवादात त्यांच्या मोठेपणाचा परिचय झाला. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी २००९ ते २०१३ पर्यंत भारताचा मालदीवमधील उच्चायुक्त होतो. विदेश नीतीमध्ये ‘पी ५’ देशांइतकेच शेजारच्या देशांचे महत्त्व असते. ‘पी ५’ देश म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेले अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड आणि फ्रान्स. या देशांतील भारतीय राजदूतांना तसेच शेजारच्या देशांतील उच्चायुक्त / राजदूत यांना पंतप्रधानांना भेटण्याची संधी वारंवार मिळते. मुख्य म्हणजे, या राजदूतांना वर्षातून ४-५ वेळा वेगवेगळ्या कारणांनी भारतात बोलावले जाते. कारण शेजारच्या राष्ट्रांमधील प्रत्येक घटनेचा आपल्यावर परिणाम होत असतो. अशा प्रत्येक दौऱ्यावेळी मला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेण्याची संधी मिळाली. या प्रत्येक भेटीत एक व्यक्ती म्हणून आणि भारतासारख्या विशाल देशाचा पंतप्रधान अशा दोन भूमिकांतून मला त्यांचे दर्शन झाले. नियुक्ती झाल्यानंतरच्या पहिल्या भेटीत त्यांनी मला सांगितलेले आठवते.. ‘त्या देशातील शासनाबरोबरच तिथल्या जनतेशी संवाद ठेवा. छोटा देश आहे, पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. नव्याने मिळालेली लोकशाही त्यांनी टिकवायला हवी. तिथल्या स्थानिक संस्थांशी संपर्क ठेवा.’ राजदूताने स्थानिक सरकारइतकाच तिथल्या जनतेचा संपर्क ठेवणे महत्त्वाचे आहे, हा त्यांचा संदेश सर्वच राजदूतांसाठी मोलाचा आहे. स्वत:च्या हस्तिदंती मनोऱ्यात राहून त्या देशाबरोबरचे व्यापारी, सांस्कृतिक, आर्थिक संबंध वाढवता येणार नाहीत, असे ते सांगत. त्यांना दिलेल्या सगळ्या नोट्स आणि ब्रीफ ते तपशिलात वाचतात, हे त्यांच्या प्रश्नांवरुन कळत असे. प्रत्येक भेटीला समयसीमा असूनही त्यांनी कधी घाईगर्दीत औपचारिक चर्चा केली नाही. आणि अशा भेटीतून प्रत्येक वेळी विचारासाठी आणि कृतीसाठी काही ना काही मुद्दे घेऊनच मी बाहेर पडायचो. त्यांच्या शांत, संयत आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वात समोरच्या व्यक्तीला आश्वस्त करत बोलण्याचे, मत व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असे. मालदीवमध्ये २०११ च्या नोव्हेंबरमध्ये ‘सार्क’ शिखर परिषदेसाठी ते आले होते. माले विमानतळावर त्यांचे विमान उतरले. मी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे उच्चायुक्त या नात्याने विमानाची शिडी चढून त्यांच्या स्वागतासाठी आत गेलो. तेसुद्धा खाली उतरण्यासाठी तयार होऊन उभे होते. मी त्यांचे हस्तांदोलन करुन स्वागत केले. त्यांनी त्यांचे सवयीचे मंद स्मित केले. नंतर विचारले, ‘अमुक एक प्रस्ताव मालदीवकडून आला आहे, पण या बाबतीत मला पूर्वसूचना मिळाली नाही.’ मी त्या एक-दीड मिनिटात त्यांच्यापुढे माझी बाजू मांडली. ती त्यांना कदाचित पटली नसावी. पण, त्यांच्या व्यक्तिमत्वातील ऋजुता त्यांना संताप येऊ देत नसावी. मी त्यांच्याबरोबरच शिडीवरुन एक पायरी खाली राहत उतरलो. मी आतून थोडासा अस्वस्थ झालो होतो. शेवटच्या पायरीवरून उतरताना ते म्हणाले, ‘काळजी करु नका, आपण काय करायचे ते पाहू.’ माझी अस्वस्थता त्यांच्या लक्षात आली असणार. त्यानंतर माझं मन शांत झालं आणि मी पुढच्या तयारीला लागलो. त्यानंतर जवळपास पूर्ण तीन दिवस त्यांचा सहवास लाभला. अतिशय गुंतागुंतीची व्यवस्था करण्याची आवश्यकता असणाऱ्या त्या भेटीत मी एकदाही त्यांना अशांत, अस्वस्थ किंवा रागावलेले पाहिले नाही. व्यवस्थेतील कमतरतेमुळे किंवा ऐनवेळच्या समस्यांमुळे त्यांना राग यावा असे छोटे प्रसंगही एक-दोनदा घडले. पण, त्यांनी कधी उघड वक्तव्य केले नाही किंवा उच्चायुक्त म्हणून मला झाडले नाही. मालदीवचे पोस्टिंग संपवून मी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कौन्सुल जनरल म्हणून रुजू झालो. तिथे डॉ. मनमोहन सिंग यांनी भेट दिली. भारताच्या राजदूत निरुपमा राव यासुद्धा उपस्थित होत्या. मीही स्वागतासाठी रांगेत तिसऱ्या क्रमांकावर उभा होतो. शिडीवरुन उतरुन हस्तांदोलन करत ते माझ्यासमोर आले. हस्तांदोलन करत असताना, ‘झाला का व्यवस्थित स्थिरस्थावर? किती महिने झाले येऊन? दोन्ही पोस्टिंगमध्ये जमीन-अस्मानचे अंतर आहे..’ असा संवाद साधून शुभेच्छाही दिल्या. हे त्यांचे विचारणे वरवर औपचारिक वाटले, तरी त्यातून त्यांच्यातील पंतप्रधान या भूमिकेपेक्षा आपुलकीने विचारपूस करणाऱ्या सहृदय माणसाचे दर्शन झाले. त्यांचे असे साधे, पण मनमोहक व्यक्तित्व कायमचे मनामध्ये मुद्रांकित झाले आहे. (संपर्कः dmulay58@gmail.com)
माझ्या हिश्श्याचे किस्से:गीतकार योगेश यांचे एका गाण्याने बदलले आयुष्य!
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज अशा व्यक्तीविषयी, जिला मी आयुष्यात केवळ दोनदा भेटलो; पण माझ्या यशामध्ये तिचे योगदान मोठे आहे. ही व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध शायर, कवी आणि गीतकार योगेशजी. ही गोष्ट १९८७ वा ८८ ची असावी. माझे मित्र कमल शुक्लाजींच्या ऑफिसमध्ये मी बसलो होतो. त्याचवेळी तिथे योगेशजी आले. थोड्याच वेळात तिथे निदा फाजलीजी सुद्धा आले. मी त्यांना आधीपासून ओळखत होतो, पण योगेशजी आणि निदाजींना एकमेकांशी गप्पा मारताना बघण्याचा अनुभव माझ्यासाठी नवा होता. मी शांत बसलो होतो. त्यावेळी माझ्याकडे ना पात्रता होती, ना माझे तेवढे वय होते. मी त्यांचे बोलणे ऐकत राहिलो. योगेशजी जे बोलत होते, त्यातील आवर्जून सांगाव्यात अशा गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे. योगेशजी सांगत होते की, ते इंटरचे शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना दोन बहिणी होत्या, आई होती. ते म्हणाले, ‘त्यावेळी वडिलांच्या क्रियाकर्माचा खर्च कोण करणार, याची चर्चा नातेवाईक करत होते. ते ऐकून मला खूप वेदना झाल्या.’ योगेशजींनी सांगितले की, नोकरी मिळेल म्हणून मी शॉर्टहँड शिकलो. त्या काळी शॉर्टहँड झालेल्यांना सहज नोकरी मिळायची. मी कामासाठी, पैसे कमावण्यासाठी उतावीळ झालो होतो, पण नोकरी काही मिळाली नाही. सत्यप्रकाश नावाचा माझा जवळचा मित्र होता. त्याला मी सत्तू म्हणायचो. आम्ही दोघांनी मुंबईत जाऊन काम शोधायचे ठरवले. मुंबईत राहण्याची सोय नव्हती म्हणून काही दिवस आर्य समाजमध्ये राहिलो. माझे आतेभाऊ फिल्म इंडस्ट्रीत मोठे लेखक होते. मी आणि सत्तू त्यांना खूप वेळा भेटलो. त्यांना म्हणायचो की, तुम्ही मोठे लेखक आहात, आम्हाला कुठे तरी नोकरी लावून द्या. गीतकार बनण्याचा विचारही त्या वेळेपर्यंत माझ्या मनात आला नव्हता. त्यांच्याकडूनही काही मदत मिळाली नाही. एकेदिवशी आम्ही त्यांच्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा सत्तू म्हणाला, ‘आता मनात एक खूणगाठ बांध की तू फिल्म इंडस्ट्रीतच काम करशील आणि नावही कमावशील.’ मी विचारले, ‘पण पोटापाण्याचे काय?’ सत्तू म्हणाला, ‘मी नोकरी करेन आणि तू काम मिळवण्याचा प्रयत्न कर.’ त्यानंतर त्याने मिळेल ती नोकरी केली, पण मला काम करु दिले नाही. तो सकाळी कामावर जायचा. मग मी स्टोव्हवर भाकऱ्या करायचो. त्या बांधून घेऊन कामाच्या शोधात फिरायचो. त्याच दरम्यान माझी गुलशन बावराशी ओळख झाली. मला लहानपणापासून कविता, शेरो - शायरीची आवड होती. मैफिलींतही मी काही रचना ऐकवायचो. गुलशनशी माझी मैत्री झाली आणि आमच्या मैफिली रंगू लागल्या. तो कविता ऐकवायचा. लोक दाद द्यायचे. त्यामुळे मग मी पण काही लिहायचो, ते ऐकवायचो. आपणही लिहू शकतो, याचा मला हळूहळू शोध लागत गेला. एकेदिवशी बावराने माझी रॉबिन बॅनर्जींशी ओळख करुन दिली. मी त्यांना माझ्या काही कविता दिल्या. त्यावर ते म्हणाले की, गाणे असे तयार होत नाही. मग त्यांनी हार्मोनियमवर एक धुन वाजवली आणि मला सांगितले की, या चालीप्रमाणे काही लिही. तेव्हा मला पहिल्यांदा समजले की आपल्या कवितेवरुन धुन बनणार नाही, गाणे अशा चालींवरच तयार होते. मी त्या चालीनुसार गाणे लिहून दिले. पुढे रॉबिनजींसोबत आम्ही अनेक सिनेमे केले. पण, सगळे सी ग्रेडचे होते. ते रिलीज झाल्यावरही आम्हाला काही फायदा झाला नाही, करिअर बनले नाही. हां, काही पैसे मिळाले. कंपनी आम्हाला गाण्याच्या रेकॉर्ड द्यायची. पण, त्या ऐकणार कुठे? ग्रामोफोन घेण्याची ऐपत नव्हती. सलिल चौधरींची पत्नी ही रॉबिनजींची मानलेली बहीण होती. त्यांच्याकडे चांगला ग्रामोफोन होता, त्यामुळे आम्ही तिथे जाऊन गाणी ऐकायचो. एकेदिवशी आम्ही तिला म्हणालो, दीदी, आमची सलिलदांसोबत ओळख करुन दे. तिने आमची भेट घालून दिली आणि सलिलदांना सांगितले की, एकदा याच्याकडून गाणी लिहून घ्या. सलिलदा म्हणाले, हा सी ग्रेड सिनेमांची गाणी लिहितोय, आपल्यासाठी कसा लिहू शकेल? असो. दरम्यान शैलेंद्रजींचे आकस्मिक निधन झाले. एकेदिवशी सलिलदा चांगल्या मूडमध्ये होते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला एक चाल ऐकवली आणि म्हणाले, मी परत येतो, तोपर्यंत तू या चालीवर गाणे लिही. ते निघून गेले आणि मी ती चालच विसरलो! माझे हात-पाय गार पडले. सलिलदा येण्याआधी पळून जावं असं वाटलं. त्यांच्या घरातून बाहेर पडलो आणि त्याचवेळी मनात विचार आला की, योगेश, आज तू पळून गेलास तर पुन्हा कधी इथे येऊ शकणार नाहीस. मी माघारी फिरलो आणि जणू चमत्कार झाला. मला ती चाल आठवू लागली, त्याप्रमाणे मी काही शब्दही बसवले. दादा परत आले. त्यांना हे गाणे आवडले. ते रेकॉर्डही झाले. सलिलदांनी माझ्याकडून आणखी गाणी लिहून घेतली. माझी तीन गाणी मुकेशजींच्या आवाजात रेकॉर्ड झाली. तो बासू भट्टाचार्यांचा सिनेमा होता, पण मध्येच बंद पडला. एकेदिवशी ऋषिदांनी सलिलदांना बोलावले. त्यावेळी सलिलदा ‘आनंद’साठी संगीत देत होते. हृषिदांना ते म्हणाले, माझ्याकडे तीन गाणी आहेत, ती एेकून घ्या. तिन्ही गाणी ऐकल्यावर त्यातील एक गाणे हृषिदांनी आधीच्या निर्मात्याकडून विकत घेतले. ते होते.. कहीं दूर जब दिन ढल जाए... बस! या गाण्याने माझ्या आयुष्याची वाट सोपी केली. योगेशजींच्या या गोष्टीवरून मला कतील शिफाईंचा शेर आठवतोय... अच्छा यक़ीं नहीं है तो कश्ती डुबा के देख, इक तू ही नाख़ुदा नहीं, ज़ालिम ख़ुदा भी है। योगेशजींशी माझी दुसरी भेट खंडव्यामध्ये झाली. त्या कार्यक्रमात २०१५-१६ चा किशोरकुमार राष्ट्रीय सन्मान मला आणि २०१६-१७ चा योगेशजींना प्रदान करण्यात आला. मी त्यांना म्हणालो, ‘तुमच्यासोबत आज मलाही हा एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे. पण, मी इथवर पोहोचण्यात तुमचाही हातभार लागला आहे.’ त्यावर त्यांनी ‘कसे काय?’ असे विचारले. मी सांगितले, काही वर्षांपूर्वी तुम्ही कमल शुक्लाजींच्या ऑफिसात आला होतात. निदा फाजलीजींशी तुमच्या गप्पा सुरू होत्या, तेव्हा मी तिथे शांतपणे बसलो होतो. मी खूप लहान होतो. तुम्ही जी वेदना कथन करत होतात, त्यावेळी मीही तशाच स्थितीतून जात होतो. त्या दिवशी मनात विचार आला की, आपणही अशाच त्रासातून जात आहोत आणि ईश्वराला वाटले तर एकेदिवशी तुमच्यासारख्या स्थानावर नक्की पोहोचू. आज योगेशजींच्या आठवणीत त्यांनी लिहिलेले ‘आनंद’मधील हे गाणे ऐका... जिंदगी कैसी है पहेली हाय... कभी ये हंसाए, कभी ये रुलाए… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
मित्रांनी डॉक्टरांची मदत घेतली. पण, डंपर एक शब्द बोलला नाही. डॉक्टरांनी सिनेमाबद्दल विचारलं. हिरो कोण? हिरोईन कोण? तरीही डंपर काही बोलला नाही. दोन वर्षे झाली त्या गोष्टीला. पण, आजही त्या गावात कुणी कुणाला ‘डंपर’ म्हणत नाही. त्याला कारण पण तसंच आहे. वाळूच डंपर चालवणारा एक तरुण. लोक त्याला ‘डंपर’ म्हणू लागले. वाळूच्या धंद्यात हळूहळू त्याचे दिवस बदलले. पैसा कमावला. शहरात फिरू लागला. त्या वर्षी महिनाभर गायब होता. एरवी बाहेरून आला की मजेत असायचा. मुंबईचे किस्से सांगायचा. पण, यावेळी आला तेव्हा डंपर जरा उदासच होता. फार कुणाशी बोलत नव्हता. एकटा एकटा राहायचा. कधी शेतात न जाणारा डंपर शेतात जाऊन बसायला लागला. आधी घरच्यांना बरं वाटलं. कारण डंपर आधी गावात थांबायचं नावच घ्यायचा नाही. सारखा तालुक्यात. मित्रमंडळी सोबत. दिवसा पत्त्याचा अड्डा, रात्री ढाबा. दिवस मजेत जात होते. पैसा खेळता होता. घरच्यांना कधी विचारायची हिंमत झाली नाही, कारण डंपर आता श्रीमंत झाला होता. दोन बाइक आणि एक कार घेतली होती दोन वर्षात. वय फक्त बावीस. दोन पोरींसोबत अफेअर. दोघींनाही माहीत. पण, दोघी त्याला कधी रागावल्या नाहीत. एकमेकींना इनबॉक्समध्ये शिव्या देतात. कधी एकदा डंपर बोलवतो आणि बाइकवर फिरायला नेतो, याची वाट बघतात. त्यांच्या स्वप्नात डंपरपेक्षा त्याची चार लाखाची बाइकच जास्त येते. डंपर गावी आला आणि सगळं बदलून गेलं. कुणाशी बोलणं नाही, कुणाला भेटणं नाही. दिवसभर फोन धरून बसलेला. काहीतरी बघत. आणि डोळ्यात पाणी. कधी डोळे एकदम कोरडे. एकटक मोबाइल बघत बसलेला डंपर. असं काय बघायचा तो? एक सिनेमा होता. शेजारून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटायचं. नेहमी रोमँटिक गाणी मोठमोठ्याने ऐकणारा, सतत जोरजोरात खिदळण्याचे आवाज असलेले रील बघत बसणारा डंपर एवढं सिरिअस काय पाहतोय? बरं, कुणी जवळ आला की सिनेमा बंद करून डंपर शांत बसून राहायचा. मनात आलं तर जेवायचा. नाही तर तसाच झाडाखाली झोपी जायचा. घरचे काळजीत होते. काही देवाचं आहे, असा मित्रांचा समज झाला. त्या दृष्टीने काही हालचाली झाल्या, पण फरक पडला नाही. मित्रांनी डॉक्टरांची मदत घेतली. पण, डंपर एक शब्द बोलला नाही. डॉक्टरांनी सिनेमाबद्दल विचारलं. हिरो कोण? हिरोईन कोण? तरीही डंपर काही बोलला नाही. एक मात्र लोकांच्या बोलण्यातून लक्षात आलं होतं की, तो एकच सिनेमा बघतो. त्याचं म्युझिक नेहमी ऐकू येतं. ते बॅकग्राऊंड म्युझिक आता इतरांना पाठ झालं होतं. पण, सिनेमा काही कुणाच्या लक्षात येत नव्हता. अर्थात तो साऊथचा असणार हा सगळ्यांचा अंदाज होता. कारण त्या संगीतात एक थरार होता. वेड लावलं होतं त्या सिनेमाने डंपरला. दिवस-रात्र तो सिनेमा बघायचा. नाही तर काहीच करायचा नाही. डॉक्टर काहीच न कळल्याने निघून गेले. पण, डंपरच्या आईवडिलांनी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचे पाय धरले. दोन तास रडत होते दोघं. पोरगा हातचा गेला होता. त्यांची दयनीय अवस्था बघून डॉक्टरांनी काहीतरी इलाज करायचं आश्वासन दिलं. तसाही डंपर डॉक्टरांच्या नात्यात होता. बायकोकडून. दोन दिवसांनी डॉक्टर पुन्हा डंपरकडे त्याच्या गावी गेले. त्याच्याशी बोलू लागले. पण, डंपर काहीच बोलायला तयार नव्हता. आता घरच्यांकडून डॉक्टरांना कळलं होतं की, डंपर रात्री गायब असतो. त्यांनी त्याचा पाठलाग करायचं ठरवलं. डॉक्टर मानसिक रोगावर उपचार करायचे. असे खूप पेशंट त्यांनी पाहिले होते. पण, ही केस जरा वेगळी होती. डॉक्टर रात्री गुपचूप डंपरच्या मागे निघाले. डंपर एका निर्जन जागी पोचला. तिथं एका दगडावर मोबाइल ठेवला. सिनेमा सुरू केला. हळूहळू तिथली वाळू कपाळाला लावू लागला. तोंडाला लावू लागला. डोळे एकटक सिनेमाकडं. काही क्षण डॉक्टर घाबरले. गुप्तधनासारखी भानगड असणार, याची त्यांना खात्री झाली, कारण तो आता सगळ्या अंगाला वाळू फासू लागला. डॉक्टर नकळत आणखी जवळ जाऊ लागले. त्यांनाही आता तो सिनेमा कोणता आहे, हे बघण्याची उत्सुकता होती. पण, जास्त जवळ जाणं धोकादायक होतं. त्यात डंपर आता त्या वाळूत लोळू लागला होता. डॉक्टरांना बॅकग्राउंड म्युझिक ऐकू येत होतं; पण सिनेमा दिसत नव्हता. डॉक्टरनी आपला मोबाइल काढला. कॅमेरा झूम केला. हळूहळू त्यांना डंपरने दगडावर ठेवलेल्या मोबाइलमधला सिनेमा दिसू लागला. जे दिसतंय ते बघून डॉक्टर हैराण झाले. थरार होता सगळा. एवढा थरारक सिनेमा डॉक्टरांनी कधी पहिला नव्हता. वेगात जाणाऱ्या गाड्या, पाठलागाची दृश्यं, अचानक चार - पाच लोक त्या व्हीलनला पकडतात, व्हीलन जोरजोरात ओरडू लागतो. हे लोक त्याला लाथाबुक्क्यांनी मारू लागतात. मग गाडीतून काठी काढतात. गज काढतात... हे बघता बघता डॉक्टर घामेघूम होतात. त्यांचे हात थरथर कापू लागतात. कारण डॉक्टर ज्याला सिनेमा समजत होते, तो सिनेमा नव्हता. ते ज्याला व्हिलन समजत होते तो हिरो होता. अवैध वाळूच्या विरोधात तक्रार करणारा, बातम्या लिहिणारा तो पत्रकार होता. आणि व्हीलन होते मारहाण करत शूटिंग करणारे वाळू तस्कर. त्यांच्यातच डंपरही होता. डंपर गाडी चालवत होता. डॉक्टर डंपरला त्या मोबाइलमध्ये बघत होते. आता डॉक्टरांना सगळं लक्षात आलं. एक क्रूर हत्या झाली होती. त्यातल्या आरोपींनी घटनेचं शूटिंग केलं होतं. ते पकडले गेले; पण डंपर तिथेच गाडीत होता, याची कुणालाच कल्पना नव्हती. डंपर खरं तर मारहाण करत नव्हता. स्वतःच घाबरून गेला होता. पण, आपण त्या गुन्ह्यात आहोत, याची खंत त्याला सोडत नव्हती. आरोपींनी केलेलं शूटिंग त्याच रात्री एकमेकांना शेअर केलं. डंपरला पण. रीलसारखं म्युझिक लावून त्यांनी त्या हत्येचा सिनेमाच बनवला होता. पण, डंपर त्या दिवसापासून वेडाच झाला. ते दृश्य त्याला बघवत नव्हतं. आणि बघितल्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. तो मातीत लोळत राहिला. डॉक्टर आधी घाबरून त्याच्याजवळ गेले नव्हते. नंतर प्रचंड राग येऊन तिथून धावतच निघून गेले. त्यांना घृणा वाटली डंपरची. डंपर खूप दिवस वाळूत लोळत असलेला दिसला लोकांना. गावातले लोकही त्याला बघत नव्हते. त्याचा मोबाइल एव्हाना चोरीला गेला होता. पण, ते दृश्य डंपर कधीच विसरू शकला नाही. ओरडत राहिला, लोळत राहिला. काही दिवस कुत्री भुंकायची. नंतर तीही त्या दिशेला जायची बंद झाली. गावातले लोक म्हणतात, डंपरची गोष्ट खोटी आहे, त्याने वाळूचा धंदा सोडला होता, तो आरोपी नव्हता. पण, एक गोष्ट खरी होती. त्या गुन्ह्याची डंपरला लाज वाटत होती. (संपर्कः jarvindas30@gmail.com)
राज्य आहे लोकांचे...:मजबूत लोकशाहीसाठी हवे पारदर्शक, उत्तरदायी प्रशासन
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींच्या बरोबरीने राज्यशकट चालवण्यासाठी नोकरशाहीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाला लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. लोकप्रतिनिधींनी जनतेसाठीच्या कल्याणकारी योजना मांडाव्यात आणि प्रशासनाने त्या कायद्याच्या, राज्यघटनेच्या चौकटीत बसवून त्यावर अंमलबजावणी करावी, अशी ही परस्परपूरक व्यवस्था होती. पण, जशी लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली राजकीय व्यवस्था भरकटली तशी प्रशासनाचे उत्तरदायित्वही मूळ उद्देशापासून दुरावले. त्यातूनच मग प्रशासकीय कामात होणाऱ्या असह्य विलंबामुळे ‘लालफितीचा कारभार’, ‘दफ्तरदिरंगाई’, ‘लायसन्स राज’ हे शब्दप्रयोग रुढ झाले. प्रत्येक भारतीयाच्या मनाला खुपणारी गोष्ट म्हणजे, अगदी लहान कामासाठी शासकीय कार्यालयात गेल्यावर ते कधी होईल? कसे होईल? होईल की नाही? याची उत्तरेही नीट मिळत नाहीत. शिकलेल्या किंवा प्रशासनात ओळख असलेल्या व्यक्तीचे एकवेळ निभावून जाते; पण अशिक्षित वा कुठल्याही प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क नसलेल्या सर्वसामान्य माणसाला शासकीय कार्यालयात स्थान नाही, असेच चित्र दिसते. याचा परिणाम म्हणून आजही ग्रामीण भागातील अनेक लोकांकडे रेशन कार्ड, जन्माचे दाखले अशी अत्यावश्यक कागदपत्रे नसतात. जगात सन २००० नंतर डिजिटल क्रांतीचे वारे वाहू लागले. त्यानंतर आपल्याकडेही ई - गव्हर्नन्स संकल्पनेअंतर्गत अनेक बदल जाहीर झाले. पण, घरी बसून संगणकीकृत प्रक्रियेतून सहज मिळू शकतील अशा कित्येक कागदपत्रांसाठी आजही शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. सर्वसामान्य माणसाची कामे ही आपली जबाबदारी नव्हे, तर कर्तव्य आहे, अशी भावना भावना फार थोड्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते. राज्याचे मुख्य शासकीय - प्रशासकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर रोज हजारो लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून ताटकळत उभे असतात. या लोकांची कामे नेमकी काय असतात, याची माहिती घेतली तर लक्षात येते की, खालच्या कार्यालयात काम अडकल्याने त्यांना मंत्रालयाची वाट धरावी लागली आहे. मंत्रालयातील प्रवेश अधिकाधिक अवघड करून जनतेला आत येण्यापासून रोखण्यासाठी नियम बनवले जातात. पण, ही गर्दी इथे येतेच का? आणि ती तशी होऊ नये म्हणून प्रशासन कसे गतिमान आणि उत्तरदायी करता येईल, असा विचार होत नाही. आता त्या बाबतीत काही सकारात्मक घोषणा केल्या जात असल्या, तरी सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक हा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमात फारसा कधी नसतो, हे वास्तव आहे. प्रशासकीय सेवेला विलंबाचा हा आजार जडण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. राजकीय नेत्यांना दर पाच वर्षांनी निवडणूक लढवावी लागते आणि अनिश्चिततेमुळे काही प्रमाणात तरी कामाच्या बाबतीत जागरूक राहावे लागते. पण, प्रशासकीय सेवेला सर्व प्रकारच्या सुरक्षेचे कवच मिळाले आहे. केवळ काम करत नाही एवढ्या कारणाने कुठल्या सरकारी बाबूला नोकरीवरून काढून टाकण्याचे अधिकार कोणाला नाहीत. झालीच तर फार फार बदली होते. निवृत्तीनंतरही शासकीय अधिकाऱ्यांच्या सुविधा कमी होत नाहीत. खरे तर राजकीय व्यवस्थेला दिशा देऊन त्यांच्याकडून योग्य कार्य घडवून आणता येईल, असे अधिकार प्रशासनाला असतात. पण, प्रशासनातील लोक अपवाद वगळता चांगल्या कामांऐवजी अनिष्ट गोष्टींसाठी राजकीय नेत्यांशी हातमिळवणी करताना दिसतात. राजकीय व्यवस्थेइतकाच प्रशासनातील भ्रष्टाचार हाही चिंतेचा मुद्दा बनला आहे. आधी बेकायदेशीर आणि चाकोरीबाहेरच्या कामासाठीच भ्रष्टाचार व्हायचा. आता मात्र नियमात असलेल्या कामासाठीही पैसे मोजावे लागण्याचे अनेक अनुभव सर्वसामान्यांना नेहमीच येतात. त्यावर तक्रार करण्याची सोय असली, तरी सरकार दफ्तरी कामे अडकलेल्या सामान्यांमध्ये नसते. तक्रार करून, भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्यवाही होऊनही त्यातून सहीसलामत सुटका होण्याच्या अनेक कायदेशीर पळवाटा असल्याने या यंत्रणेतील कुणाचे फारसे वाकडे होत नाही. आणि त्यामुळेच ती अधिकाधिक बेलगाम होत गेली. मुळात ब्रिटिशांनी भारतात निर्माण केलेली प्रशासकीय व्यवस्था स्वातंत्र्यानंतर भारताने नाव बदलून जशीच्या तशी स्वीकारली. वास्तविक सत्ता ही सामान्य माणसाला उत्तरदायी असावी, हाच लोकशाही आणि राज्यघटनेचा मुख्य गाभा असल्याने ब्रिटिशकालीन व्यवस्था बदलायला हवी होती. स्वातंत्र्याला ७७ वर्षे झाल्यावर तरी आता ही प्रशासन व्यवस्था पूर्णपणे नव्या स्वरूपात आणणे आवश्यक झाले आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह रीफॉर्म कमिटी अस्तित्वात आहे. पण, तीसुद्धा एक प्रशासकीय व्यवस्थाच असल्याने प्रशासनाप्रमाणेच तीही काम करते. त्यामुळेच या कमिटीकडून प्रशासनात म्हणाव्या तशा सुधारणा झाल्या नाहीत. प्रशासन बदलवायचे असेल, तर समाजाला आणि सर्वसामान्यांना आधी स्वत:ला बदलावे लागेल. शासकीय कार्यालयात फारसा चांगला अनुभव आलेला नसतो, तरीही प्रत्येक कुटुंब मुलाला सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा ठेवते आणि जावई प्रशासकीय अधिकारी असावा, असा आग्रह धरते. म्हणजे आपल्याला ही व्यवस्था वाईट असल्याचे रडगाणे गायचे असते आणि त्याचवेळी बिघडलेल्या व्यवस्थेचे लाभार्थीही व्हायचे असते. अशा सोयीच्या भूमिकेमुळे प्रशासनामध्ये आमूलाग्र बदल घडणार नाही. त्यासाठी शासन आणि समाजाला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. प्रसंगी व्यवस्थेला भिडावेही लागेल. कारण पूर्णपणे कायापालट झालेले, पारदर्शक तितकेच उत्तरदायी प्रशासन हा लोकशाहीतील सर्वांत आश्वासक आणि निर्णायक बदल असेल. (संपर्कः dramolaannadate@gmail.com)
वेब वॉच:जेव्हा गंभीर विषयातील ‘पाणी’च निघून जाते...
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा ज्वलंत प्रश्न भेडसावतो. जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी गावागावांत चर खोदण्याचे काम पाणी फाउंडेशनने सुरू केले. ते करताना श्रमदानासाठी ग्रामस्थांना एकत्र आणणे, त्यांच्यात या नवीन संकल्पनेविषयी विश्वास निर्माण करतानाच त्यांना एकजुटीने या एका उद्देशासाठी प्रेरित करण्याचे काम या गावांमध्ये करण्यात आले. ‘पाणी’ हा सिनेमा म्हणजे त्यातीलच एका गावकरी युवकाची कहाणी. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा नुकताच प्राइमवर उपलब्ध झाला आहे. अशा संकल्पनेवरील सिनेमासाठी पटकथाही सशक्त असायला हवी. नितीन दीक्षित यांनी अशी पटकथा उभी केली आहे. नागरदवाडीतील पाण्याच्या समस्येमुळे गावकरी असलेल्या नायकाशी लग्न करण्यास नायिका नकार देते आणि त्यामुळे नायक जिद्दीने पेटून उठतो. हे कथानक सत्यघटनेवर आधारित आहे. मग गावकऱ्यांचा विरोध, गावातील राजकारणी लोकांनी ठरल्याप्रमाणे काम बंद करण्यासाठी काही गुंड पाठवणे, ते सापडणे आणि त्यातून नायकाचे नेतृत्व गावकऱ्यांनी स्वीकारणे या चिरपरिचित क्रमाने ही पटकथा पुढे सरकते. दिग्दर्शक आदिनाथ कोठारेंनी कथेतील संघर्ष प्रभावीपणे पुढे आणून हा सिनेमा चित्रित न करता स्वतःच साकारलेला नायक सतत दाखवण्याचा मार्ग पत्करल्याने सिनेमा अपेक्षित परिणाम साधत नाही. अर्जुन सोरते यांची सिनेमॅटोग्राफी ही सिनेमाची त्यातल्या त्यात सर्वात उजवी बाजू. निव्वळ अर्थपूर्ण फ्रेम्स, बोलका कॅमेरा अनुभवण्यासाठी हा सिनेमा बघावा. चित्रपटाचा ओपनिंग सीन कमालीच्या कौशल्याने चित्रित केल्यामुळे अपेक्षा वाढतात आणि पुढेही या सिनेमॅटोग्राफीने अशीच कमाल दाखवली आहे. फोकस-आउट ऑफ फोकसचा खेळ मराठी सिनेमांमध्ये यापूर्वी इतक्या प्रभावीपणे फार कमी प्रमाणात बघण्यास मिळाला आहे. आदिनाथ कोठारे यांचा हनुमंत केंद्रे हा गावातील युवक पटवून घ्यावा लागतो. सिनेमामध्ये ‘नायक’ आदिनाथ कोठारे नसलेले प्रसंग जवळपास नाहीतच. गावातला हा युवक सर्वांना एकत्र आणतो. पुरुषांना एकत्र आणणारा युवक तोच आणि स्त्रियांची एकजूट करणाराही तोच. गावकरी एकत्र आले, तरी विहीर खणून पाणी पहिल्यांदा कोणाला सापडते, या प्रश्नाचे उत्तरही एकच. ऋचा वैद्य यांनी ‘सुवर्णा’ ही नायिका साकारताना एकाच चेहऱ्याने वावरण्याची खबरदारी घेतली आहे. नायिकेच्या मेकअपमध्येही अनेक प्रसंगांत विसंगती दिसतात. कधी तिला सुंदर, तर कधी सामान्य दाखवले आहे. त्यामध्ये एकसमान धागा किंवा विचार दिसत नाही. सुबोध भावे प्रत्येक मराठी चित्रपटात दिसत असले, तरी मराठी चित्रपट यशस्वी ठरण्याचा तो फॉर्म्युला नाही, हे सिद्ध झाले आहे. शिवाय, ते सगळीकडे एकाच पद्धतीचा अभिनय करतात, त्यातही वैविध्य नाही. ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्याचे काम रजत कपूर यांनी केले आहे. विशेष म्हणजे, सुबोध भावे आणि रजत कपूर सिनेमाच्या सुरूवातीनंतर कथेतून गायब झाले आहेत. गिरीश जोशींनी साकारलेले प्रमोद हे प्रारंभी नायकाला मार्गदर्शन करताना दिसतात, पण मराठी नायक चतुर आणि चतुरस्त्र असल्यामुळे पटकथा लेखकाने हा मार्गदर्शक पुन्हा चित्रपटात दिसणार नाही, याची जणू खबरदारी घेतली आहे. या सिनेमाचा नायक आणि दिग्दर्शक स्वत: आदिनाथ कोठारेच आहेत. नायकाने पहार मारल्यावर सापडलेल्या पाण्याचा फवारा इतका मोठा आहे की, त्याच्या उंचीपेक्षाही उंच तुषार निरंतर उडत राहतात आणि त्या पाण्यातून नायक विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या नायिकेकडे पाहतो! टीमवर्कचे महत्त्व दाखवण्याऐवजी सगळा बदल एकटा नायक घडवून आणतो आणि हे अविश्वसनीय वाटते. नागदरवाडीमध्ये पाणी सापडले असले, तरीही पटकथा लिहिताना, दिग्दर्शन करताना हा विषय पाण्यावर केंद्रित करण्याऐवजी नायकाच्या प्रेमावर केंद्रित केल्याने त्याचा प्रभाव पडत नाही. आणखी एक मराठी सिनेमा बघितला, एवढेच समाधान त्यातून मिळते. हनुमंत आणि सुवर्णा यांचे लग्न होते, ते त्याने केलेला पण पूर्ण केल्यामुळे, हे निर्विवाद. पण, त्याचे चित्रीकरण करताना अनेक शिलेदारांपैकी एक असे न दाखवता त्याला हिरो केले आहे. पटकथा - संवाद लेखनासोबतच नितीन दीक्षित यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु, आदिनाथ कोठारेंनी नेमके काय दिग्दर्शन केले, हे शोधावे लागते. अर्थात दीक्षित यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार आदिनाथ यांनी केल्याचे श्रेयनामावली सांगते. अनमोल भावे यांचे ध्वनी संयोजन उत्तम. पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विषय महाराष्ट्राच्या मातीतला आहे. पण, त्यावर प्रभावी सिनेमा झाला असता, तर तो गावोगावी दाखवून त्याद्वारे जनजागृती होऊ शकली असती, अशी खंत नंतर वाटत राहते. (संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)
डायरीची पाने:पुषा आइतवारची गोष्ट
पौषातल्या रविवारची सकाळ निसर्गाच्या रंग, गंध अन् आकारात रमवायची. ती मनाला विलक्षण वेगळ्या भावविश्वात न्यायची. कसला तरी उदात्त आनंद मिळवून द्यायची. सध्या पौष महिना सुरू आहे आणि आज रविवारही आहे. पौष महिन्यातील रविवार विशेष समजला जातो. आमच्याकडं रविवारला आईतवार म्हणायचे. खरं तर हा सूर्याचा वार. रवी म्हणजे सूर्य आणि आदित्य म्हणजे देखील सूर्यच. त्याचं संस्कृत नाव आदित्यवार असंच आहे. त्या आदित्यवाराचंच बोलीत आईतवार झालं. पौष महिन्यातल्या रविवारी सूर्याची पूजा करतात. ती का करतात, ते नेमकं नाही सांगता येणार. असेल त्याचं काहीतरी कारण. पण, लहानपणी पौष महिन्यातील रविवारी सकाळी सकाळी या पुजेचं सामान गोळा करण्याचं काम माझ्याकडं असायचं. ते मला फार आनंददायक वाटायचं. एरवीही घरात अमावस्या, पौर्णिमा असेल आणि त्या दिवशी उटी, उपहार असेल, तर देवाला लागणारी फुलं गोळा करण्याचं काम माझ्याकडंच असे. त्यामुळं त्या दिवशी पहाटेच उठून जिथं कुठं फुलाची झाडं आहेत, तिथं जाऊन फुलं गोळा करण्याचं काम मी करायचो. तेव्हा फार वेगळी अशी फुलं आमच्या गावात नव्हती. फुलाची कुठली झाडंही नव्हती. फक्त पांढऱ्या आणि तांबड्या रंगाची कण्हेरीची फुलं मात्र तीन - चार ठिकाणी मिळायची. असलीच तर कुणाच्या शेतातल्या बांधावर झेंडूची झाडं असायची. झेंडूचा गडद रंग आणि उग्र वास फार आवडायचा. बाकी बारा मैलात एक चमेलीचं झाडंही होतं. त्याचाही वेगळा गंध यायचा. जाई, जुई, शेवंती, मोगरा, गुलाब ही फुलांची नावंही आम्हाला माहीत नव्हती. कण्हेरीचं एक झाड दतराव बापूराव यांच्या ओढ्याकाठच्या झऱ्यावर होतं, बारा मैलातल्या कॅनॉलवरच्या बंगल्यावर काही झाडं होती. तिथून ही फुलं आणावी लागायची. पण, पौष महिन्यातील रविवारी या फुलांची फारशी गरज नसायची. असली तर चालायची आणि नसली तरी भागायचं. पौष महिन्यातल्या रविवारी शेतात असलेली प्रत्येक गोष्ट पुजेला असली तरी चालायची. विशेषच वस्तू पाहिजे, असं या पुजेचं नसायचं. पण या पुजेसाठी हरभऱ्याचा डहाळा, वाळूक, बोरं, उसाचं टिपरू, करडईच्या रंगीत फुलांचा केशर अशा शेतातल्या गोष्टी आई हमखास आणायला सांगायची. इतरांच्या घरी पाटावर सूर्य काढून सूर्याची पूजा केली जात असे. सोनार कुटुंबातील माझा मित्र प्रभाकर याच्या घरी त्याची आई पाटावर सुंदर सूर्याचं चित्र काढून त्याची पूजा करायची. पण, आमच्या घरी सूर्य काढला जात नसे. आमचे जे महानुभावांचे देव देव्हाऱ्यात आहेत, त्यासमोरच ही सगळी पूजा केली जायची. खरं तर रविवारच्या या पुजेला सूर्याची पूजा म्हणून जास्त महत्त्व असायचं. पण, महानुभावेतर लोक जो जो सण साजरा करतात, त्यांच्या देवाची पूजा करतात, तो सण आपणही साजरा करायचा; मात्र आपल्याच देवाची पूजा करून, अशी महानुभाव अनुयायांची रीत असायची. त्यामुळं आमच्या घरी पुषा रविवारी आमच्याच देवाची पूजा केली जायची. पण, ती करण्याची पद्धत नेहमीसारखी नसायची. अन्य लोकांच्या घरी सूर्याच्या पुजेची जी पद्धत होती, त्या प्रकारेच ही पूजा केली जायची. पाटावर या सगळ्या वस्तू ठेवून त्यांना हळद-कुंकू वाहिलं जायचं. हा सगळा पाटावर ठेवलेला रानमेवा आणि त्यावर वाहिलेलं हळदी-कुंकू, देवासमोर लावलेला तेलाचा दिवा किंवा फुलवात, अगरबत्ती हे सगळंच मोठं छान वाटायचं. पाहत राहावं वाटायचं. मांडलेली ही पूजा दिवसभर तशीच देवासमोर ठेवली जायची. संध्याकाळच्या वेळी ती उचलली जायची. इतका वेळ देवाच्या पुजेमध्ये असलेल्या या सगळ्या वस्तू खाण्याची आम्हाला परवानगी मिळायची. त्यामुळे पुजेतलं वाळूक, बोरं, उसाचं कांडं आम्हाला खायला मिळत. हरभऱ्याचा डहाळा खाण्यासारखा असेल, तर तोही आम्ही खायचो. करडीच्या फुलाचे केशर मात्र खायच्या उपयोगाचे नसत. पण, ते डोळ्याला फारच अाल्हाददायक वाटायचे. मला करडीचं फुल खूपच छान वाटायचं. या सगळ्या वस्तू पाटावर मांडून त्यावर करडईच्या फुलाचे केशर पसरले, तरी ते हळदी-कुंकू लावल्यासारखं वाटायचं. कारण हे केशर जर्द लाल आणि गर्द पिवळ्या रंगाचे असायचं. बऱ्याचदा शेतातही हे केशर हातावर घेऊन मी त्याकडं पाहत राहायचो. या गोष्टी फार आनंददायक वाटायच्या. हरभऱ्याच्या झाडाला येणारी जांभळी फुलं, वाळकाच्या झाडाला येणारी पिवळी फुलं, ज्वारीच्या कणसावर येणारा पिवळा फुलोरा या सगळ्याच गोष्टी तळहातावर घेऊन बघत राहाव्यात, असं वाटायचं. निसर्गानं या वस्तूंना दिलेले आकार, रंग आणि गंध विलक्षण वेगवेगळा असायचा. त्यामुळं पंचेंद्रियांना सुख मिळायचं. रंगानं डोळे निवायचे, गंधानं घ्राणेंद्रिय सुखावायचं, आकारानं मन प्रसन्न व्हायचं आणि मनातल्या मनात खूप आनंद वाटायचा. हे सगळं निसर्गाचं कौतुक आहे, याची तेव्हा जाणीव नसायची. हे काहीतरी विलक्षण आहे, असं मात्र वाटत राहायचं. त्या विलक्षणाकडं पाहात त्याचा अानंद अनुभवाचा. कधी कधी मी ही फुलं पुडीत बांधून ठेवायचो. काही दिवसानंतर त्या पुड्या उकलून पाहिल्या की, त्या फुलांचा रंग नष्ट झालेला असायचा, पण गंध मात्र मोहोळाच्या मधासारखा यायचा. जणू मधमाशा या फुलातून जो गंध नेत असत, तोच इथं साठलेला असायचा. हरभऱ्याच्या झाडाचा आकार, त्याच्या फांदीचा आकार, त्याच्या पानाचा आकार हे सगळंच काही विलक्षण वाटायचं. ओल्या भाजीची चव भारी वाटायची. हरभऱ्याच्या झाडावर आलेली आंब आमच्या चोळण्याला लागायची आणि चोळण्याला रक्ताचा डाग पडल्यासारखं वाटायचं. त्यामुळं हरभऱ्याच्या पिकातून जाताना थंडीच्या दिवसात पायाला हरभरा झोंबला तरी चालेल, पण चोळणा वर करावा लागायचा. नाही तर त्या चोळण्याला पडलेले डाग नंतर कितीही साबण लावला तरी निघायचे नाहीत. पौष महिन्यातल्या या चार रविवारची सकाळ अशी मस्तपैकी निसर्गाच्या रंग, गंध अन् आकारात रमून जायला भाग पाडायची. ती मनाला विलक्षण वेगळ्या भावविश्वात न्यायची. कसला तरी उदात्त आनंद मिळवून द्यायची. (संपर्कः inbhalerao@gmail.com)
काही दिवसांपूर्वी मी कमर जलालाबादी आणि आनंद बक्षी यांच्याविषयी लिहिले होते. त्यानंतर अनेकांनी मेसेज, मेलद्वारे तसेच व्यक्तिगत चर्चेतून, तुम्ही इतर गीतकारांबद्दलही लिहा, असे मला सुचवले. त्यामुळे मी विचार केला की, आपल्याच भोपाळ शहरातील उत्तम कवी, गीतकार आणि ‘चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो..’ यासारखी अविस्मरणीय गाणी लिहिणाऱ्या कैफ भोपाली यांच्यापासूनच त्याची सुरूवात करावी. मला आठवतंय, जेव्हा मी सुभाष घईजींचे सासरे अख्तर फारूखी साहेबांना भेटलो आणि त्यांना मी भोपाळचा आहे, असे सांगितले तेव्हा ते उभे राहिले अन् मला मिठी मारली. म्हणाले, ‘तू माझे प्रिय मित्र, शायर कैफ भोपाली यांच्या गावचा आहेस!’ त्यांनी मला पुढे सांगितले की, मी कमाल अमरोही साहेबांकडे प्रॉडक्शनमध्ये काम करायचो. कैफ साहेब गाणी लिहिण्यासाठी भोपाळहून यायचे, तेव्हा तिथे माझी ड्यूटी लागायची. कमाल साहेब म्हणायचे, अख्तर, तू दुसरे कोणतेही काम करु नकोस. ऑफिस, स्टुडिओ सगळे विसरून जा. तुला फक्त एकच काम करायचेय, ते म्हणजे कैफ साहेबांची बडदास्त ठेवणे. त्यांच्यासाठी जेवणाची उत्तम व्यवस्था कर. रात्री त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जा. बस, फक्त त्यांना खूश ठेव. कारण कैफ साहेब मनमौजी स्वभावाचे होते आणि ते केवळ कमाल अमरोहींसाठीच गाणी लिहायचे. माझी कैफ साहेबांसोबत चांगली मैत्री आहे, हे इंडस्ट्रीतील लोकांना समजल्यावर शंकर जयकिशन, मदन मोहन, सलिल चौधरी, अनिल विश्वास, बी. आर. चोप्रा, यश आनंद, रामानंद सागर असे त्यावेळचे मोठमोठे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक मला म्हणायचे की, कैफ साहेबांसोबत आमची भेट घालून द्या, आम्हाला त्यांच्याकडून गाणी लिहून घ्यायची आहेत. पण, कैफ साहेब स्पष्ट नकार द्यायचे. ते म्हणायचे की, सिनेमांची गाणी लिहिणे हे माझे काम नाही. मी शायर आहे आणि कमाल माझा मित्र आहे, म्हणून फक्त त्याच्यासाठी गाणी लिहून देतो. कमाल अमरोहींना कैफ साहेब अनेकदा थट्टेने म्हणायचे की, तू आपले नाव चुकीच्या पद्धतीने लिहितोस. तुझे नाव असायला पाहिजे कमाल अमरोहवी आणि लिहितो मात्र अमरोही. त्यावर कमाल साहेब हसून उत्तर द्यायचे, मी नेहमी काही तरी वेगळे करतो. त्यामुळे आपले नावही वेगळ्या पद्धतीनेच लिहितो. अख्तर साहेबांनी मला सांगितले की, मद्य किंवा मद्यपींना कुणी नावे ठेवली तर कैफ साहेबांना वाईट वाटायचे. एकेदिवशी सायंकाळी काम संपले, अंधार पडू लागला होता. आम्ही सगळे परत निघण्यासाठी कमाल स्टुडिओच्या गेटवर उभे होतो. त्याचवेळी तिथे मळलेले, फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अशा अवतारातील एक भिकारी आला. तो थेट कमाल साहेब आणि कैफ साहेबांजवळ आला. त्यांच्याकडे पाहून म्हणाला, ‘साहेब, खायला काही नाही. जेवायला थोडे पैसे द्या.’ तो हे बोलला आणि त्याचवेळी त्याच्या तोंडातून देशी दारुचा खूप घाण भपकारा आला. कमाल साहेब त्याला फटकारत म्हणाले, ‘तुझ्याकडे खायला पैसे नाहीत, पण दारु प्यायला मात्र आहेत. दारुडा कुठला. चल, जा इथून.’ हे ऐकून कैफ साहेबांना वाईट वाटले आणि त्यांनी त्याचवेळी एक शेर ऐकवला... शाइस्तगान-ए-शहर मुझे ख्वाह कुछ कहें, सड़कों का हुस्न है मिरी आवारगी के साथ। ही १९९१ मधली गोष्ट आहे. माझी लिखाणाची सुरूवात होत होती. साजिद नाडियादवालासाठी मी ‘चांद चकोरी’ नावाची एक प्रेमकहाणी लिहित होतो. मी साजिदला सांगितले की, आपण कैफ साहेबांकडून गाणी लिहून घेऊ. त्यानेही होकार दिला. त्यावेळी तिथेच असलेले लेखक फैज साहेब म्हणाले की, कैफ साहेब तर कमाल अमरोहींशिवाय कुणासाठीही गाणी लिहित नाहीत. मी म्हणालो की, मीसुद्धा भोपाळी आहे, त्यांना लिहिण्यासाठी राजी करेन. मी भोपाळला जाणारच आहे, त्यांचा होकार घेऊनच परत येईन. मी भोपाळला पोहोचलो. एअरपोर्टवरून घरी पोहोचलो. समोर टेबलावर वृत्तपत्र ठेवले होते. त्याच्या पहिल्या पानावर कैफ भोपाली यांचा तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्यासोबतचा फोटो छापला होता. कैफ भोपालींची तब्येत अत्यंत गंभीर असल्याची बातमी होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. तो फोटो पाहिल्यावर मला खूप दु:ख झाले. त्यांची प्रकृती सुधारावी, म्हणून मी प्रार्थना केली. सायंकाळी रेडिओ स्टेशनवर ऑल इंडिया मुशायरा होता. मी तिथे पोहोचलो. त्या ठिकाणी मोठमोठे शायर आले होते. शेरी भोपाली मुशायऱ्याचे संचालन करत होते. अचानक काही हालचाल सुरू झाली. पाहिले तर कैफ साहेबांना तिथे आणण्यात आले होते. मी थक्क झालो. त्यांना तीन-चार तक्क्यांचा आधार देऊन बसवण्यात आले. त्यांचे वजन खूपच कमी झालेले होते. शेरी साहेब म्हणाले, ‘हा कैफ वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहे. आपण सगळे त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करु. मी खूप जगलोय, आता याला जगायचंय आणि खूप उत्तमोत्तम शेर ऐकवायचेत..’ तिथे असलेल्या सर्वांना वाटत होते की, कैफ साहेब या अशा आजारी अवस्थेत कसे काय शेर सादर करणार? पण, कैफ साहेबांच्या समोर माइक ठेवण्यात आला आणि त्यांनी शायरी एेकवत अशी मैफिल रंगवली की ते आजारी आहेत हेही लोक विसरुन गेले. लोक फर्माइशवर फर्माईश करत होते आणि कैफ साहेब गझला, शेर ऐकवतच होते. मला वाटते तो कैफ साहेबांचा अखेरचा मुशायरा होता. ते या जगातून निघून गेले, पण त्यांचे शब्द चिरंतन आहेत. त्यांची कन्या परवीन कैफ ही खूप उत्तम शायरा आहे. ती कैफ साहेबांचे नाव आणि काम पुढे नेत आहे. कैफ भोपालींच्या आठवणीत ‘शंकर हुसैन’ सिनेमातील हे गाणे ऐका... अपने आप रातों में चिलमनें सरकती हैं चौंकते हैं दरवाजें सीढ़ियां धड़कती हैं… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
खलनिग्रहणाय:कुटुंबव्यवस्था सावरायला हवी
कुटुंबव्यवस्था बळकट असेल, तरच आपला समाज आणि देश मजबूत राहील. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेविषयी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या घटनेनंतर तरी सरकार आणि न्यायपालिका ही व्यवस्था सावरण्यासाठी सकारात्मक पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये अतुल सुभाष नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी २२ पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली आणि जवळपास दीड तासाचा एक व्हिडिओही बनवून ठेवला. त्यामध्ये त्यांनी आपली पत्नी, सासू आणि मेहुण्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे, जौनपूरमधील कुटुंब न्यायालयाच्या महिला न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केला. बेंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अतुल सुभाष यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक केली आहे. मात्र, अतुल यांनी आरोप ठेवलेल्या महिला न्यायाधीशांवर पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे तर न्यायव्यवस्थेवर असे आरोप लावले जाणे अत्यंत क्लेशदायक आहे. या व्यवस्थेमध्ये किती तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे, हे या घटनेने अत्यंत प्रखरपणे समोर आले आहे. आत्महत्येची ही घटना उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबव्यवस्थेचे ठसठशीत उदाहरण आहे. भारतीय संस्कृतीत संयुक्त कुटुंबव्यवस्थेला महत्त्व दिले गेले आहे. कुटुंब मजबूत असेल, तर समाजही स्वस्थ आणि सुदृढ बनू शकतो. मात्र, आजकाल विविध कारणांनी ही कुटुंबव्यवस्था कोसळताना दिसते. सध्या एकल कुटुंबाची पद्धत रूढ झाली आहे. पती आणि पत्नी हे दोघेही काम करत असल्याने मुलांच्या संगोपनावर परिणाम होतो. मुलांना आजी - आजोबा, काका - काकू, मामा - मामी, आत्या, मावशी अशा जवळच्या नात्यातील लोकांचा सहवास मिळत नाही. यामुळे त्यांचा विकास खुंटतो, त्यांच्यामध्ये सामाजिक भावना रूजत नाही. दुसरीकडे, समाजात चंगळवादही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे माणूस जास्त प्रमाणात स्वार्थी होत चालला आहे. या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होऊ लागला आहे. या प्रश्नाविषयी झालेल्या अभ्यासातून इतर अनेक कारणेही पुढे आली आहेत. संयुक्त कुटुंब नसल्यामुळे कुटुंबांमध्ये शारीरिक, मानसिक वा लैंगिक शोषणाचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येते. पोलिस दलामध्ये काम करताना ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. हल्ली मद्यपान तसेच अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या गोष्टींचाही कुटुंबांवर अतिशय वाईट परिणाम होत आहे. धार्मिक, नैतिक आणि पारंपरिक मूल्यांच्या ऱ्हासामुळे अनैतिक संबंधांसारखे प्रकार वाढले आहेत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही संकल्पना अनेकांना सोयीची वाटत असली, तरी आपल्या कुटुंबव्यवस्थेला ती मारक ठरली आहे. तणावग्रस्त जीवन, चंगळवाद, आर्थिक अडचणी, व्यावसायिक संघर्ष यामुळे अनेक कुटुंबांतील सदस्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची उदाहरणे समोर येत आहेत. एका स र्वेक्षणानुसार, समाजातील पाचपैकी प्रत्येक दुसरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मनोविकाराने ग्रस्त आहे. कुटुंबामध्ये परस्पर विश्वासाचा, संवादाचा, सलोख्याचा अभाव निर्माण झाल्याने प्रेम आणि आपुलकी आटत चालली आहे. प्रत्येकाच्या गरजा अवास्तव वाढल्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. नैराश्यातून, विफलतेतून होणाऱ्या आत्महत्या आणि घडणारे गुन्हे रोखायचे असतील, तर कुटुंबव्यवस्थ सावरण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षणापासून कुटुंबव्यवस्थेचे आणि एकत्र राहण्याचे महत्त्व मुलांना पटवून दिले पाहिजे. शिवाय, संयुक्त कुटुंबव्यवस्थेलाही प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील सण - उत्सव सर्वांनी मिळून साजरे केले, प्रथा - परंपरा एकत्रपणे पाळल्या तर भावनिक बंध मजबूत होतात. कुटुंबातील सर्वांनी संधी मिळेल तेव्हा एकमेकांसोबत वेळ व्यतित केला पाहिजे. तसेच दूरच्या नातेवाईकांशीही संबंध ठेवायला हवेत. मद्यपानाचे व्यसन कुटुंबासाठी घातक ठरते. त्यामुळे मद्य तसेच अमली पदार्थांवर नियंत्रणही फार गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली पाहिजेत. अशा पदार्थांच्या आहारी गेलेल्यांसाठी उपचार तसेच समुपदेशनाची व्यवस्था हवी. पारंपरिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलिसांकडे समुपदेशन केंद्र असतात, पण त्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागाकडूनही त्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना व्हायला हव्यात. कुटुंबव्यवस्थेसाठी काम करणाऱ्या ‘एनजीओं’ची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतील कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अशा अधिकाधिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या मेडिएशन अर्थात मध्यस्थीमुळेही अनेक कौटुंबिक कलह दूर होऊ शकतात. या संदर्भात लोकन्यायालयही मोठी भूमिका बजावू शकते. कुटुंबव्यवस्था बळकट असेल, तरच आपला समाज आणि देश मजबूत राहील. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेविषयी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या घटनेनंतर तरी सरकार आणि न्यायपालिका ही व्यवस्था सावरण्यासाठी सकारात्मक पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे. समाजानेही अशा संवेदनशील विषयांवर मूक प्रेक्षकाची भूमिका न घेता त्यासाठीच्या सुधारणांकरीता लोकशाही मार्गाने दबाव निर्माण केला पाहिजे. ऐकण्या - बोलण्याची कला मानवी आयुष्यातील संवादाचे मोल प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. ऐकणे हीसुद्धा एक कला आहे. कुटुंबातील प्रत्येकाने दुसऱ्याचे बोलणे नीट, समजून घेत ऐकायला हवे. काही कारणाने कुटुंबात वाद निर्माण झालाच तर ज्येष्ठ, जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यायला हवा. अनेकदा मानसिक विकारही एखाद्या कुटुंबाला उद्ध्वस्त करतात. अशावेळी आवर्जून मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा अनेक कुटुंबांना मी ओळखतो, जिथे खूप कलह होता; पण या प्रकारे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यावर मात्र परिस्थिती बदलली. कुटुंबातील प्रत्येकाने योग आणि ध्यानधारणाही केली पाहिजे. योगसाधनेमुळे तणाव कमी होतो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण येते. नियमित ध्यान केल्याने दृष्टीही विशाल होते. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)
रसिक स्पेशल:नवतंत्रज्ञानाच्या अद्भूत आविष्कारांसाठी सज्ज व्हा!
नुकत्याच सरलेल्या वर्षाने जगाला तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड वेगाने पुढे नेले. जगण्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रावर नवे शोध आणि मानवी नवोन्मेषाचा प्रभाव पडला. आता नव्या वर्षात विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा विस्तार काही पटींनी वाढेल आणि त्या गतीमुळे आपल्या आयुष्यातही आमूलाग्र बदल घडू लागतील. जगभरात २०२४ मध्ये अनेक नव्या गोष्टी, अतर्क्य, अनपेक्षित घडामोडी घडल्या. त्यातही सर्व स्तरांतील लोकांच्या जगण्यावर प्रभाव टाकणारा, त्यांच्यासाठी औत्सुक्याचा ठरलेला आणि त्यामुळेच चर्चेतही राहिलेला विषय म्हणजे नवतंत्रज्ञानाची झेप! त्यामुळे सरलेल्या वर्षात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काय घडले याचा धांडोळा घेतानाच, त्यातून या नव्या वर्षात आणखी काय घडू शकते, याचाही वेध घ्यायला हवा. ‘जेन - एआय’मुळे नवी क्रांती गेल्या वर्षी झपाट्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाकडे पाहताना अर्थातच पहिले नाव समोर येते, ते जग बदलून टाकणाऱ्या ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे! ‘एआय’च्या क्षेत्राकडे गेल्या वर्षीपर्यंत लोक कुतूहलमिश्रित आश्चर्याच्या नजरेने बघायचे. आता ‘एआय’मध्ये नव्याने अक्षरश: वाटेल ते करू शकण्याची क्षमता निर्माण झाल्यामुळे लोक त्याकडे काहीशा भीतीच्या नजरेने पाहू लागले आहेत. ‘जनरेटिव्ह एआय’ (जेन- एआय) अर्थात नवनिर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हवी ती माहिती, सॉफ्टवेअर, त्रिमितीय प्रारुपे, अगदी खऱ्या वाटतील अशा लेखन-चित्रकृती, चित्रफिती, ध्वनिफिती असं काहीही निर्माण करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आली आहे. त्यातून आणखी किती आणि कोणते बदल घडतील, हे आज कुणालाही नेमकेपणे सांगता येणार नाही. जगभरात जवळपास प्रत्येक तंत्राधारित कामात आणि उद्योगात आता ‘जेन-एआय’चा समावेश होत आहे. यामुळे भविष्यात माणसाची उत्पादकता व क्षमता यामध्ये प्रचंड वाढ होईल. क्वांटम कॉम्प्युटरच्या दिशेने... दुसरी मोठी घडामोड ‘क्वांटम’ संगणकांच्या संदर्भातील आहे. आयबीएम आणि गुगल या कंपन्यांनी त्या बाबतीत आघाडी घेतली आहे. या विषयी सोप्या शब्दांत सांगायचं तर सध्या संगणकांची भाषा ‘बायनरी’ म्हणजे ० आणि १ ची असते. अशा ० किंवा १ ला ‘बिट’ म्हणतात. जणू एखादा दिवा बंद असणे किंवा चालू असणे, अशी ही स्थिती असते. क्वांटम संगणकांत मात्र बिटऐवजी ‘क्युबिट’ वापरतात. म्हणजेच दिवा फक्त बंद किंवा चालू असण्याऐवजी एकाच वेळी बंद आणि चालूही असू शकेल, अशी स्थिती. यामुळे संगणकाची माहिती साठवण्याची, त्यावर काम करण्याची क्षमता कैकपटींनी वाढते. २०२५ मध्ये ही प्रगती आणखी पुढे जाऊन प्रत्यक्षात क्वांटम संगणक तयार होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडेल. ‘सिक्स-जी’ बदलेल ‘रिअॅलिटी’ दूरसंचार क्षेत्रात ‘फाइव्ह-जी’पाठोपाठ ‘सिक्स-जी’ तंत्रज्ञान अवतरत आहे. त्यामुळे अतिवेगाने संदेश, डेटा पाठवला जाण्याबरोबरच आभासी जगामध्ये रममाण होण्यासाठीच्या ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ आणि ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’ यांसारख्या क्षेत्रांत प्रचंड बदल होतील. ‘सिक्स-जी’मुळे मनोरंजन, आरोग्यसेवा, चालकविरहित गाड्या, विविध यंत्रांचे किंवा यंत्रणांचे एकमेकांसोबतचे संदेशवहन यांमध्ये आमूलाग्र बदल घडतील. या तंत्रज्ञानाच्या विकसनाबाबत २०२४ मध्ये मोठ्या घडामोडी घडल्या, आता नव्या वर्षात ते प्रत्यक्षात अवतरण्यासाठीची परिस्थिती तयार झाली आहे. माणसासोबत काम करतील ‘कोबोट’ गेल्या वर्षी ‘एआय’ आधारित यंत्रमानव अनेक आव्हानात्मक कामे करताना आपल्याला दिसले. अवघड शस्त्रक्रिया करणे, वृद्धांची काळजी घेणे, कारखान्यांतील धोकादायक कामे, हॉटेलमधील कामे अशा अनेक गोष्टी ते करत आहेत. साहजिकच, नव्या वर्षात अनेक कंपन्या आणि आस्थापना आपले काम सोपे करुन खर्च कमी करण्यासाठी या रोबोट तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात मदत घेतील. या तंत्राच्या बाबतीत घडलेली अत्यंत रोमहर्षक घडामोड म्हणजे ‘कोबोट’ अर्थात ‘कोलॅबरेटिव्ह रोबोट’. यामध्ये माणसासोबत यंत्रमानव एकत्र काम करतात आणि जिथे एकसारखे किंवा धोकादायक काम असेल, तिथे ते माणसाची जागाही घेतात. जनुकांनुसार उपचार जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही २०२४ मध्ये बरीच प्रगती झाली. नव्या औषधांची निर्मिती तसेच जनुकांचे गुणधर्म बदलणे अशा अत्यंत मूलभूत कामांमध्ये या तंत्राचा वापर महत्त्वाचा ठरला. त्यातही ‘एआय’चा मोठा वाटा होता. उदाहरणार्थ, ‘वैयक्तिक पातळीवर कर्करोगावरचे औषधोपचार’ शक्य होतील, अशी घोषणा गेल्या वर्षी पहिल्यांदाच झाली. एखाद्याच्या शरीरातील जनुकांनुसार त्याच्या आजारावर उपचार करण्याची ही अत्यंत महत्त्वाची, संजीवक संकल्पना नव्या वर्षात मूर्त स्वरूपात येऊ शकते. शाश्वत उर्जेकडे... शाश्वत उर्जेच्या बाबतीतही गेल्या वर्षी आशादायी वाटचाल सुरू होती. क्षमतेत वाढ आणि खर्चात घट अशा दोन्ही आघाड्यांवर ही प्रगती होत आहे. सौरऊर्जेसाठी ‘पेरोव्हस्काइट’ नावाचे खनिज वापरण्याविषयी बरेच संशोधन सुरू आहे. या खनिजाची ऊर्जा निर्मितीक्षमता जास्त असते आणि वाढत्या उत्पादनामुळे त्याच्या किमतीही आवाक्यात येत आहेत. त्याचबरोबर, वातावरणातील कार्बन गोळा करुन ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा वापर करण्यासाठीच्या संशोधनातही २०२४ मध्ये मोठी प्रगती झाली. टेस्ला, वायमो, क्रूझ आदी कंपन्या चालकविरहित वाहनांच्या निर्मितीत पुढे गेल्या आहेत. भारतामध्ये नजीकच्या भविष्यात अशा गाड्या येणे कदाचित कठीण असेल; पण अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये मात्र त्या लवकरच रस्त्यांवर धावताना दिसतील. प्राण्यांच्या स्टेम सेलपासून कृत्रिम मांस मांसाहारामुळे निसर्गाची हानी होत असल्याची टीका होते. त्यावर उपाय म्हणून प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मांस तयार करण्याची भन्नाट संकल्पना आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उदाहरणार्थ, नेदरलँडची ‘मीटेबल’ ही कंपनी जिवंत प्राण्यांतील ‘स्टेम सेल’ काढून, त्यांना कृत्रिमरीत्या पोषण देऊन जिवंत प्राण्याच्या शरीरात असतात तसे स्नायू आणि स्निग्ध पदार्थ बनवते. अशा प्रकारे प्रयोगशाळेत बनलेले हे मांस फक्त चार दिवसांत खाण्यायोग्य स्थितीमध्ये तयार होते. यामुळे मांसाहारावर निर्बंध न आणताही निसर्गाची हानी टाळणे शक्य होईल, असा दावा केला जात आहे. वजन घटवणे ते दीर्घायु होण्यापर्यंत... जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे जगातील मोठ्या लोकसंख्येला वाढत्या वजनाची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे आपोआप भूक नियंत्रित करून वजन घटवण्याच्या गोळ्यांबद्दल गेल्या वर्षी प्रचंड कुतूहल निर्माण झाले. जगातील अनेक कंपन्या अशा गोळ्यांची निर्मिती करत असल्या, तरी ‘ऑझेम्पिक’ या गोळीची बरीच चर्चा झाली. एलॉन मस्क यांच्यापासून जगभरातील अनेक ‘सेलिब्रिटी’ ही गोळी घेतात. एकीकडे या गोळ्यांच्या दुष्परिणामांविषयी इशारा दिला जात असतानाही येत्या काळात अशा प्रकारच्या औषध - गोळ्यांचे प्रमाण वाढण्याचीच शक्यता आहे. त्याचवेळी, ‘चिरतरूण राहणे’ किंवा ‘दीडशे-दोनशे वर्षे जगणे’, ‘अमरत्व प्राप्त करणे’ अशा गोष्टींवर २०२४ मध्ये खूप चर्चा होत होती. आता प्रत्यक्षात अशक्य वाटणाऱ्या अशा संकल्पनांवर बरेच संशोधन होत आहे आणि नव्या वर्षात ते आणखी पुढे जाईल. (संपर्कः akahate@gmail.com)
कबीररंग:तन को जोगी सब करै, मन को करै न कोय...
कबीरांची दृष्टी ईश्वरावर परम प्रेम करणाऱ्या संतांची आहे. ही दृष्टी ईश्वरप्रेमाला बाधक ठरणाऱ्या ढोंगी साधूंच्या वृत्तीतील विचार-विखार सजगपणे उघड करून समाजासमोर मांडते आणि त्या पलीकडं जाऊन सर्व जीवमात्रांतील प्राणतत्त्व एक असल्याचंही साधकांना दाखवते. कबीरांचा विशेष असा आहे की, ते साधूंच्या उक्ती आणि कृतीतील, राहणी आणि विचारसरणीतील आणि दृश्य तना-मनातील भेद अत्यंत तीव्रतेनं आपल्या या दोह्यांतून व्यक्त करतात. अशा वेळी भरपिकातील तणाची कापणी करणाऱ्या कोयत्याची धार त्यांच्या शब्दांना येते. ढोंगी साधूंच्या दांभिकपणाची, खोटेपणाची, मान मिरवण्याच्या वृत्तीची, समाजात अनर्थ निर्माण करणाऱ्या बुद्धीची चीड त्यांच्या शब्दांतून, प्रतिकांतून आणि कथनाच्या रीतीतून आपल्यापर्यंत पोहोचते. आपण जसे नाहीत तसं जाणीवपूर्वक दाखवण्याच्या वृत्तीचा सखोल अभ्यास करून ती दूर सारल्याशिवाय अध्यात्माच्या वाटेवरून कुठलाही साधक चालू शकत नाही, हे कबीरांचं हिताचं सांगणं आहे. ते म्हणतात... मन मैला तन ऊजरा, बगुला कपटी अंग। तासो तो कौवा भला, तन मन एकहि अंग।। आपण पाहतो की, बगळ्याचा रंग पांढरा शुभ्र असतो. तळ्यांतल्या एका ओल्या खडकावर निश्चल बसून त्याचं डोळे मिटून चाललेलं ध्यान हे खरं ध्यान नसतं. शांत तळ्यातली एखादी मासळी पाण्याच्या पृष्ठभागावर आली की निमिषार्धात ती चोचीत धरून गिळता यावी, यासाठीच हे त्याचं ध्यानाचं ढोंग असतं. खऱ्या ध्यानात असं ढोंग नसतं, स्वार्थ साधण्यासाठीचा अभिनय नसतो. बगळा वरून दिसायला पांढरा असला, तरी त्याचा हेतू शुद्ध नसतो. त्याचं मन स्वार्थीपणानं मळलेलं असतं. कबीर म्हणतात, या ढोंगी बगळ्यापेक्षा आत-बाहेरून एकच रंग असलेला कावळा बरा. कारण त्याच्या तना-मनाच्या रंगांत अंतर नसतं. एकाच रंगासारखी त्याची वृत्ती आतून-बाहेरून एकच असते. दोन पक्ष्यांच्या या रंगभेदातून दिसणं आणि असणं यातला फरक कबीर किती परिणामकारकतेनं व्यक्त करतात! तन को जोगी सब करै, मन को करै न कोय। सहजै सब सिधि पाइये, जो मन जोगी होय।। कबीर म्हणतात, तथाकथित साधू आपला वेष बदलतात. गळ्यात, मनगटावर रुद्राक्षांच्या माळा घालतात. कपाळावर, दंडावर भस्माचे पट्टे ओढतात. हे या साधूंचं बाह्यदर्शन असतं. ते आपल्या देहाच्या दृश्याकारासाठी स्वतःला क्लेशही करून घेतात. व्रतं, उपवास करतात आणि प्रसंगी कंदमुळं खाऊन राहतात. कमीत कमी सुख-सोयींचा आधार घेऊन देह जगवतात. देहाच्या इच्छा शम-दमानं नियंत्रित करण्यात कधी कधी यश मिळवतात. अशा साधूंना फक्त देहभाव उमजलेला असतो. पण, मनोगती कळली नाही तर भक्तिभाव उमजत नाही, असं मार्मिक सूचन कबीर करतात. मनोगती कळणाऱ्या साधूंना सर्व सिद्धी प्राप्त होतात, सर्व सुखं लाभतात. पण, त्यासाठी त्यांना एखाद्या योगी पुरूषाची संगती लाभावी लागते. तरच त्यांचं तन आणि मन सहज अनासक्त होऊन जीवन मंगलमय होतं. ढोंगी साधूंच्या जीवनाविषयीची ही निरीक्षणं नोंदवताना, त्यांचे वृत्ती-विशेष कथन करताना साधकानं कोणती काळजी घ्यायची, याबाबत कबीर अत्यंत तळमळीनं सांगतात... भेष देख मत भूलिये, बूझि लीजिये ज्ञान। बिना कसोटी होत नहि, कंचन की पहचान।। आपल्या आसपास कितीतरी ढोंगी साधूंचा, स्वघोषित साक्षात्कारी पुरुषांचा, चमत्कारी बाबांचा, संमोहित करणाऱ्या तथाकथित गुरुंचा आणि इंद्रिय सुखांची क्षणजीवी प्रलोभनं दाखवणाऱ्या संधिसाधूंचा वावर आहे. मन भ्रांतीत हरवलं जाऊ शकण्याच्या या काळात आपण खरं साधुत्व कसं शोधणार? त्याचे खरे मापदंड कसे ठरवणार? खूप कठीण आहे हे! कारण आपल्या रोजच्या जगण्यातील व्यथा-वेदनांचा विसर पाडणारा कुणी तथाकथित साधू आपल्याला जवळचा वाटू शकतो. पण, हे वाटणं भ्रामक असू शकतं. कबीर म्हणतात, आपल्याला आदर्श वाटणाऱ्या अशा साधूंना अनुसरण्यापूर्वी सोन्याप्रमाणेच त्यांची परीक्षा करायला हवी. सोन्याच्या शुद्धतेची पारख करणारं साधन आपल्याला ज्ञात असायला हवं. सोन्याचं वस्तुनिष्ठ मूल्य आपण जाणल्याशिवाय त्याचं धातू असणं त्याचा रंग, भावात्मक मूल्य आणि त्याच्या दागिन्यांची सुंदरता आपल्या दृष्टीला उमजेल कशी? सोनं हा शब्द म्हणजे सोनं नसतं. कबीरांना सुचवायचंय की, फक्त शब्दांतून संमोहित करणाऱ्या साधूंपासून खऱ्या साधकांनी सदैव सावधान असलं पाहिजे. ही शब्दांपलीकडची सावधानता अनमोल आहे. कारण तीच ‘असत’च्या अनुभवातून ‘सत’चं दर्शन हृदयात पोहोचवणारी आहे. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)
राज्य आहे लोकांचे...:पैसे न घेता मतदान हाच लोकशाहीचा नवा धर्म!
भारतीय निवडणुकांमध्ये ‘मतदान विकणे’ हा प्रकार कधी सुरू झाला, हे नेमकेपणे कोणालाच सांगता येणार नाही. पण, अलीकडच्या काळात मत विकत घेण्याचा उच्चांक आणि लोकशाहीच्या अवमूल्यनाचा नीचांक होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधी मतदान करतात त्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत थेट पैसे देण्याचे प्रारूप अवलंबले जात असल्याचे पूर्वी म्हणजे किमान तीन दशकांपासून ऐकण्यात यायचे. त्यातूनच ‘घोडेबाजार’ हा शब्दप्रयोग जन्माला आला. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच नव्हे, तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही मतांसाठी पैसे दिले - घेतले जाणे, हे एव्हाना ‘ओपन सिक्रेट’ म्हणून रुढ झाले आहे. अलीकडे झालेल्या निवडणुकीतील तीन ते चार प्रातिनिधिक अनुभव मती गुंग करणारे आणि कुठल्याही विवेकनिष्ठ नागरिकाला काळजी वाटावी असे आहेत. एका मतदारसंघातील विश्लेषण करत एक मतदार सांगत होता - “उमेदवार खूप चांगले होते, निवडून यायला हवे होते; पण त्यांचे पैसे शेवटच्या दिवशी पोहोचलेच नाहीत.” दुसऱ्या प्रसंगात, एक पत्रकार मित्र मतदानासाठी गेला आणि तिथे मदतीसाठी बसलेल्या एका उमेदवाराच्या प्रतिनिधीने मतदानाची स्लीप वगैरे देऊन झाल्यावर खुलेपणाने पैसे देऊ केले. मित्राने ते नाकारल्यावर कार्यकर्त्याने आश्चर्य व्यक्त करत विचारले की, तुम्ही पैसे न घेता मतदान करणार? तिसऱ्या प्रसंगात निवडणूक व्यवस्थापनात सक्रिय असलेल्या एका मित्राने व्हाट्स अॅपवरील मेसेज दाखवत सांगितले - आपण साहित्यात वाचतो आणि आदर्शवादी भाषणात ऐकतो तो शाहू, फुले, आंबेडकरांचा स्वाभिमानी महाराष्ट्र मला निवडणुकीत मतदारांमध्ये कुठेही दिसला नाही. आमच्या कुटुंबात १३ मते आहेत, पण तुमचे पैसे पोहोचले नाहीत, असा मेसेज चाळीस हजार रुपये महिना पेन्शन असलेल्या एका शिक्षित व्यक्तीने पाठवला होता. मतदार आणि उमेदवारांमध्ये होणाऱ्या पैशांच्या थेट आणि मोठ्या रकमेच्या उलाढालीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन मुख्य उमेदवार असल्यास त्यांच्यामध्ये एका मतासाठी कोण किती रक्कम मोजायला तयार आहे, याची चढाओढ लागते. त्यातही कुठल्या उमेदवाराची पैसे वाटण्याची यंत्रणा किती सक्षम आहे, यावर त्याचे यश ठरू लागले आहे. प्रचार सभांमध्ये बऱ्याचदा नेते ‘पैसे कोणाकडूनही घ्या, पण मतदान आम्हालाच करा,’ असे जाहीरपणे सांगतात. निवडणुकांतील गैरप्रकार इतक्या हीन पातळीवर पोहोचले आहेत. प्रत्येक मताची किंमत मोजल्यामुळे आपण मतदारांना उत्तरदायी असल्याची उमेदवाराची भावना संपून जाते. निवडून आलेल्या उमेदवाराने आपल्या मतांच्या जीवावरच हे पैसे कमावले आहेत किंवा पुन्हा निवडून आला तर तोही कमावणारच आहे, म्हणून त्याने दिलेल्या पैशावर आपला अधिकार आहे, असे मतदार मानू लागले आहेत. आणि लोकशाहीसाठी हाच मोठा धोका ठरला आहे. विशेष म्हणजे, उच्चशिक्षित आणि सधन मतदारही मतदानासाठी पैशाचा मोह बाजूला ठेवू शकलेला नाही. पण, पैसे वा अन्य आमिषाला बळी पडून मतदार लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावून बसतातच; शिवाय त्यांच्या भ्रष्टाचारालाही लोकमान्यता देतात. मतदारांना पैसे वाटण्याच्या अनिष्ट प्रकारामुळे निवडणुकीचा खर्च इतका वाढला आहे की, त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती निवडणूक लढवण्याचा विचारच करू शकत नाही. तिकीट देताना बहुतांश पक्षही उमेदवाराची ‘खर्च करण्याची’ क्षमता तपासूनच तिकीट देतात. म्हणून आर्थिक परिस्थिती हा हल्लीच्या राजकारणात येण्याचा पहिला निकष ठरला आहे. म्हणजे राजकारण हा एका अर्थाने भांडवलशाहीचाच दुसरा चेहरा बनू लागला आहे. मोठे उद्योग समूह राजकीय पक्षांना आर्थिक मदत देऊन स्वतःला हवी ती धोरणे राबवून घेतात, अशी तक्रार केली जायची. आता राजकारण हाच उद्योग होऊन निवडणुका हा कॉर्पोरेट इव्हेंट झाला आहे. ज्या सर्वसामन्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुका होतात, त्यामध्ये त्यांच जागा राहात नसेल, तर ती व्यवस्था त्यांच्या भल्यासाठी उपयोगी पडणार कशी? एवढे होऊनही मतदार फक्त आणि फक्त पैसे घेऊन आणि त्याला जागून ज्याचे पैसे घेतले त्यालाच प्रामाणिकपणे मतदान करतात का? हाही एक संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत किमान एका तरी मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी कुणीही पैसे वाटायचे नाहीत, असे ठरवावे आणि काय जनमत बाहेर येते, ते पाहण्याचा प्रयोग करून बघावा. दुसऱ्या बाजूने, किमान एका तरी मतदारसंघातील मतदारांनी आपला स्वाभिमान जागवत, आम्हाला तुमचा एक रुपयाही नको, त्याशिवाय कोणाला मतदान करायचे हे ठरवू, असा बाणा दाखवायला हवा. एका छोट्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मला भाषणासाठी बोलावले होते. त्यावेळी मी लोकांना एक भावनिक आवाहन केले. ‘आपण देशाला आपली माता मानत असू, तर मत विकणे म्हणजे मातेला विकण्यासारखे आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शपथ घ्या की, येत्या निवडणुकीत आम्ही पैसे घेऊन मत विकणार नाही,’ अशी शपथ लोकांना दिली. त्या गावातील सगळ्यांनी निवडणुकीत उमेदवारांचे पैसे नाकारल्याचे मला नंतर कळले. उमेदवारांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले. पैसे न घेता मतदान करणे हाच लोकशाहीचा नवा धर्म मानून तो घराघरात पोहोचवण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे. कारण पैसे न घेणारा स्वाभिमानी मतदारच लोकशाहीचे रक्षण करू शकतो. (संपर्कः dramolaannadate@gmail.com)
शेवटी खूप दिवस रखडलेला निकाल लागला. धनंजय पुन्हा पास झाला होता. मेन्स सुद्धा. मुलाखतही! आता नियुक्ती. बातमी ऐकून सगळं गाव खुश झालं... धनंजय दहावीत कसाबसा पास झाला. खरं तर नापास झाला असता, तरी त्याला एवढं दु:ख झालं नसतं, जेवढं दु:ख पस्तीस टक्के मिळवून काठावर पास झाल्याचं झालं. सगळीकडं चर्चा झाली. बातमी पण आली एका ठिकाणी. धनंजय खजील झाला होता. त्यानंतर त्यानं मन लाऊन अभ्यास केला. ठरवून कला शाखेत गेला. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पुण्यात जायचं होतं. पण, नेमकं बहिणीचं लग्न आलं. तरी घरच्यांनी हार मानली नाही. कर्ज काढून पैसे दिले. धनंजय पुण्यात गेला. सुरूवातीला खूप अवघड जात होतं सगळं. गावात असताना कधी पेपर वाचला नव्हता. कधी इंग्रजी काही वाचायचा विषयच नव्हता. आता पश्चात्ताप होत होता. पण, माघार घेऊन चालणार नव्हतं. तयारी करत राहिला. पहिल्याच प्रयत्नात प्री पास झाला. आईबापाला मूठभर मांस वाढल्यासारखं वाटलं. मेन्स पास झाल्यासारखा सोहळा झाला. दहा-बारा नातेवाईक आवर्जून घरी आले. मटण बनलं. धनंजयच्या घरच्यांशी गावातले लोक बरे वागू लागले. उद्या मोठा अधिकारी होणार, तर संबंध बरे पाहिजेत. हळूहळू लोक धनंजयला ‘साहेब’ म्हणू लागले. कधी गावाकडं आला, तर आवर्जून घरी बोलावू लागले. काहींनी मुली दाखवल्या नात्यातल्या. पण, मुख्य परीक्षा बाकी होत्या. धनंजय सांगायचा, ‘अजून वेळ आहे, अधिकारी झाल्याशिवाय बाकी काही विचार करणार नाहीय.’ त्याचं एकच स्वप्न होतं.. लाल दिवा. लहानपणापासून धनंजयला लाल दिव्याचं आकर्षण. त्याचे वडील शेतकरी चळवळीत होते. एकदा असंच काही तरी आंदोलन होतं. पोलिसांची गाडी आली. अधिकारी रुबाबात उतरला. लोकांना अटक करायचे आदेश दिले. मोठ्या गाडीत लोक भरून नेले. धनंजयचे वडील पण होते त्यात. दहा - बारा दिवसांनी वडील आले. त्यांना वाटलं, नेहमीप्रमाणे धनंजय धावत येईल; पण तो आला नाही. नाराज झाला होता. का या मोर्चाच्या भानगडीत पडता? सोडून द्या शेती, म्हणत होता. वडील म्हणाले, नाही कोणत्या भानगडीत पडत. पण, तू अधिकारी हो. मोठा अधिकारी. मग गरज पडणार नाही. सगळी कामं चांगली होतील. मोर्चे काढायचे काम पडणार नाही. लहान वयात धनंजयला ते सोपं वाटलं. आवडलं. त्यानं आनंदानं होकार दिला. मग लाल दिव्याची गाडी दिसली की बापलेकाला उगाच आनंद व्हायचा. स्वप्न जगतच होते दोघं. आणि आता ते स्वप्न खरं व्हायची वेळ आली होती. पण, ती जवळ नव्हती. खूप महिने परीक्षाच झाली नाही. झाली तर धनंजय मेन्समध्ये थोडक्यात मागे पडला, पण खचला नाही. पुन्हा तयारीला लागला. म्हणता म्हणता तीन वर्षे झाली. धनंजय लवकरच अधिकारी होईल, या आशेवर कर्ज देणारे लोक शांत होते. पण, आता त्यांचा तगादा सुरू झाला. नवीन कर्ज मिळण्याची शक्यता नव्हती. कधी नव्हे ते तोंड लपवयची वेळ येऊ लागली बापावर. पण, वाट बघण्याशिवाय हातात काही नव्हतं. आणि वाट बघण्याची सवय शेतकऱ्याएवढी कुणालाच नसते. धनंजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. हळूहळू त्यानं छोटं-मोठं काम करून स्वतःचा खर्च भागवायला सुरूवात केली. घरी पैसे पाठवायचं स्वप्न बघणारा धनंजय स्वतःचा खर्च भागवता भागवता मेटाकुटीला येत होता. पण, हिंमत हरला नव्हता. अभ्यास करत होता. धडधाकट दिसणारा धनंजय हळूहळू अगदीच खंगत चालला. परीक्षा दिली होती. मेहनत केली होती, पण पुढं काही हालचाल नव्हती. वाट बघण्यात महिने निघून गेले. घरचे सारखे फोन करायचे. उत्तर नव्हतं. बाप कर्जवाल्यांना कंटाळून गेला होता. शेवटी दोन एकरातली एक एकर विकावी लागली. शेवटी खूप दिवस रखडलेला निकाल लागला. धनंजय पुन्हा पास झाला होता. मेन्स सुद्धा. मुलाखतही! आता नियुक्ती. बातमी ऐकून सगळं गाव खुश झालं. पोरानं आईबापाच्या कष्टाचं चीज केलं. कर्जासाठी तगादा लावणारे, शिवीगाळ करणारे प्रेमाने बोलायला लागले. आजवर दयेने आणि चेष्टेने बघणारे आता धनंजयच्या आईबापाकडं कौतुकानं बघू लागले. पण, हे सगळं किती दिवस चालणार होतं? लोक येता-जाता एकच विचारायचे, ‘कुठं पोस्ट मिळाली?’ पण, अजून पोस्ट निघतच नव्हती. कुणी तरी कोर्टात गेलं होतं, म्हणून कारण झालं. पोस्ट निघायला एक वर्ष लागलं. धनंजय रोज मंत्रालयात फोन करायचा. ओळखीच्या अधिकारी लोकांना भेटायचा. पण, कुठून काही उत्तर येत नव्हतं. धनंजय खचला होता. आईवडील तर रडकुंडीला आले होते. त्यांनी त्यांना जे समजत होतं ते केलं. देवाला नवस केला. पूजा मांडली. पत्रिका दाखवली. ज्योतिषी म्हणायचा, ‘पुढच्या महिन्यात काम होईल.’ पण, त्यानं म्हणून काय होणार होतं? सरकार काहीच म्हणत नव्हतं. कोर्टाला वेळ मिळत नव्हता. दुसरं वर्ष पण संपलं. धनंजयने दुसरी कुठली परीक्षाही दिली नव्हती. पोटापाण्यासाठी वाटेल ते करण्यातही जीव रमत नव्हता. एका अधिकाऱ्याने धनंजय आणि त्याच्यासारख्या पोस्ट अडकलेल्या चार - पाच जणांची मंत्री महोदयांशी भेट करून दिली. दोन मुलं तर मंत्र्यांच्या मतदासंघांतलीच होती. त्यांनी मनावर घेतलं. पोरांना सोबत घेऊन फिरले. एका महिन्यात पोस्ट निघेल, असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. दिवस जात राहिले. आणि एक दिवस सरकार पडलं. विरोधक सत्तेवर आले. आता मंत्री महोदय तरी काय करणार होते? त्यांचाच लाल दिवा गेला होता. आईवडील डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते. धनंजयला सुद्धा गावाकडं लाल दिव्याच्या गाडीत जायची घाई होती. पण, मार्ग दिसत नव्हता. खचलेला माणूस एक ना एक दिवस मार्ग शोधतोच. तो चांगला की वाईट, याचा विचार अनेकदा त्याच्या डोक्यात येत नाही. तो मार्ग धनंजयनेही निवडला. लाल दिव्याच्या गाडीत गावी गेला. आईवडील अन् सगळं गाव गोळा झालं. धनंजयची बॉडी आली होती. अॅम्ब्युलन्स नावाच्या लालदिव्याच्या गाडीत... (संपर्कः jarvindas30@gmail.com)
माझ्या हिश्शाचे किस्से:मोहम्मद रफींना ‘देवदूत’ म्हटले जायचे..!
ज्यांना सुरांचे बादशहा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील देवदूत म्हटले जायचे, त्या मोहम्मद रफी साहेबांची २४ डिसेंबरला शंभरावी जयंती होती. त्यामुळे या भागात त्यांच्याविषयी लिहावे, असा विचार मनात आला. लिहायला बसलो, तेव्हा लक्ष्मीकांतजी, धर्मेंद्रजी, सचिन पिळगांवकरजी, सुभाष घईजी, अमिताभ बच्चनजी, उदित नारायणजी अशा या इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींनी माझ्या मनात फेर धरला. प्रत्येक जण रफी साहेबांचा चाहता होता. जो त्यांना भेटला तो आणि जो नाही भेटला तोसुद्धा. लोकांना ते प्रचंड आवडायचे, जणू ते त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले होते. त्या काळातील सगळे निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते रफी साहेब गेल्यावरही त्यांचाच शोध घेत राहिले. त्याच शोधातून अनेक गायक पुढे आले. मला एकदा धरमजींनी सांगितले होते- जाने क्या ढूंढ़ती रहती है ये आँखें मुझमें.. हे माझे पहिले गाणे रफी साहेबांनी गायले होते. त्यांची खासियत म्हणजे, त्या त्या अभिनेत्याचा आवाज, संवादफेक, बोलण्याची पद्धत, देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव समजून घेत ते गायचे. त्यामुळे तो अभिनेताच गाणे गातोय असे वाटायचे. ते आपल्या आवाजांतून जे भाव व्यक्त करायचे, त्यामुळे त्या अभिनेत्याला हावभावांवर फार कष्ट घ्यावे लागायचे नाहीत. धरमजींनी सनीला लाँच करण्यासाठी ‘बेताब’ची सुरूवात केली. त्यावेळी रफी साहेबांच्या आवाजाचा शोध घेता घेता त्यांना शब्बीरकुमार भेटले. त्यांना ब्रेक मिळाला. पुढे मोहम्मद अजीज यांचा शोध लागला. त्यांच्याकडूनही गाणी गाऊन घेतली गेली. धरमजींनी ‘बरसात’ सिनेमातून बॉबी देओलला लाँच केले. तेव्हा माझा ‘आजमाइश’ हा सिनेमा बनत होता. त्यातील गाणी सोनू निगमने गायली होती. धरमजींनी मग ‘बरसात’मध्ये सोनू निगमकडूनच रफी साहेबांसारखी गाणी गाऊन घेतली. त्यानंतर त्यांनी ‘यमला पगला दीवाना’ बनवताना..‘मैं जट यमला पगला दीवाना..’ हे मूळचे रफी साहेबांच्या आवाजातील गाणे री-रेकॉर्ड केले. सोनू निगमचा आवाज रफी साहेबांसारखाच असल्याने त्याच्याकडूनच ते गाऊन घेतले. हे गाणेही सुपरहिट झाले. मला सुभाष घईजींनी सांगितले- मी एखादे गाणे बनवताना रफी साहेबांचाच शोध घेत असतो. रफी साहेबांसारखाच आवाज, तशीच एक्स्प्रेशन्स यावीत, असा विचार करतो. ‘कर्मा’चा टायटल ट्रॅक बनवताना विचार केला की, रफी साहेब असते तर त्यांनी तो कसा गायला असता? मग मी ते गाणे मोहम्मद अजीज यांच्याकडून गाऊन घेतले. ‘विधाता’मध्ये दिलीपकुमार आणि शम्मी कपूर यांचे एक गाणे होते.. ‘हांथो की चंद लकीरों का..’ ते मी सुरेश वाडकर आणि अन्वर यांच्याकडून गाऊन घेतले, कारण अन्वर यांचा आवाजही रफी साहेबांशी मिळताजुळता होता. मग ‘परदेस’, ‘ताल’मध्ये सोनू निगमकडून गाणी गाऊन घेतली. रेकॉर्डिंगच्या आधी मी प्रत्येक गायकाला सांगायचो की, डोळे बंद करुन हाच विचार करा, हे गाणे रफी साहेबांनी कसे गायले असते? या सगळ्या गायकांनी माझी गाणी खूप चांगली गायली आणि ती हिट झाली. यावरुन मला शम्मी कपूरजींचा किस्सा आठवला. ते प्रत्येक गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी रफी साहेबांच्या सोबत असायचे आणि या गाण्यात आपण काय करणार आहोत, ते त्यांना सांगायचे. एकदा शम्मीजींनी त्यांना सांगितले की, या गाण्याचा मुखडा - अंतरा एकाच दमात गायलात तर आणखी चांगलं होईल. रफी साहेब म्हणाले, ‘ठीक आहे, प्रयत्न करतो’. आणि मग त्यांनी एका श्वासात मुखडा - अंतरा गाऊन ते गाणे पूर्ण केले. ‘ब्रह्मचारी’ सिनेमातील हे गाणे होते.. ‘दिल के झरोखों में तुझको बिठाकर, यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर..’ या गोष्टीवरुन मला आसी उल्दनी यांचा एक शेर आठवतोय... सब्र पर दिल को तो आमादा किया है लेकिन, होश उड़ जाते हैं अब भी तिरी आवाज़ के साथ। जसे रफी साहेब हे शम्मीजींचा आवाज होते, तसे मुकेश हे राज कपूर साहेबांचा आवाज होते. वास्तविक रफी साहेबांनी ‘बरसात’मध्ये राज साहेबांसाठी.. ‘मैं ज़िन्दगी में हर दम रोता ही रहा हूँ..’ हे सुपरहिट गाणे गायले होते. पण, राज साहेब म्हणायचे, माझ्या आवाजाला आणि चेहऱ्याला मुकेश यांचाच आवाज सूट होतो. पुढे ‘संगम’ सिनेमाची तयारी सुरू झाली. राजेंद्रकुमारांचे आवडते गायक रफी साहेब होते. राज साहेबांनी सांगितले की, माझ्या आणि राजेंद्रकुमार यांच्या पार्श्वगायनाचा आवाज वेगवेगळाच हवा. मग रफी साहेबांना बोलावले. त्यांनी गाणे गायले.. ‘मेरा प्रेम पत्र पढ़कर तुम नाराज़ ना होना..’ या गाण्याचे रेकॉर्डिंग संपले. प्रॉडक्शनचा एक जण रफी साहेबांकडे आला आणि नोटांनी भरलेले एक पाकीट त्यांना दिले. रफी साहेबांनी विचारले, ‘राज साहेब कुठे आहेत?’ तेव्हा त्याने सांगितले की, त्यांच्या मुलाला ताप आलाय. त्याला बरे वाटत नाहीय, म्हणून घरी गेले आहेत. रफी साहेब कारमध्ये बसले आणि थेट राज साहेबांच्या बंगल्यावर पोहोचले. राज साहेब, कृष्णाजींना आश्चर्य वाटले की रफी साहेब असे अचानक घरी कसे आले? रफी साहेब म्हणाले, ‘तुमचा मुलगा राजीव तापाने आजारी असल्याचे समजले. त्याला बघायला आलोय.’ त्यावेळी राजीव दीड-दोन वर्षांचे होते. रफी साहेब त्या खोलीत गेले. राजीवना पाहिले. आपल्या खिशातून नोटांचे ते पाकीट काढले आणि राजीवच्या उशीखाली ठेऊन दिले. ते पाहून राज साहेबांनी, ‘रफी साहेब, हे काय करताय?’ असे विचारले. रफी साहेब म्हणाले, ‘हा उतारा आहे, राजीव बरा व्हावा म्हणून.. ईश्वराने त्याला चांगले आरोग्य द्यावे..’ असे देवदूत होते रफी साहेब. आज त्यांच्या आठवणीत ‘कश्मीर की कली’चे हे गाणे ऐका... तारीफ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
रसिक स्पेशल:‘डॉक्टर’ होते म्हणून...
मनमोहन सिंग नावाच्या ‘तज्ज्ञ’ डॉक्टराने रुग्णशय्येवर निपचित पडलेल्या अर्थव्यवस्थेचे अचूक निदान केले अन् योग्य वेळी नेमके उपचार दिले, म्हणून ती खडखडीत बरी झाली. आज तिची सुधारलेली ‘तब्येत’ पाहताना जसा आनंद होतो, तसा हे ‘डॉक्टर’ नसते तर काय झाले असते? या विचाराने मनात काहूरही उठते. विसाव्या शतकाच्या अखेरीस रसातळाला जाऊ लागलेल्या या देशाला एकविसाव्या शतकासाठी नवी उभारी देण्यात त्यांनी दिलेले योगदान इतिहास विसरणार नाही. तत्कालीन नियोजन आयोग आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा निकटचा सहवास लाभलेल्या अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी उलगडलेले त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू... डॉ. मनमोहन सिंग हे राजकारणात येण्याच्या पूर्वी, किंबहुना ते राजकारणापासून दहा हात दूर होते, तेव्हापासून माझा त्यांच्याशी संपर्क होता. ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि मी स्वतः ३१ वर्षे रिझर्व्ह बँकेमध्ये काम केले आहे. तिथे त्यांची जी कारकीर्द होती, ती निश्चितच चांगली होती, मात्र उत्तुंग अशी नव्हती. डॉ. मनमोहन सिंग खऱ्या अर्थाने सर्वपरिचित झाले, त्यांना अर्थतज्ज्ञ म्हणून थोरवी लाभली, ती ते अर्थमंत्री झाल्यावर! दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर... आपल्या देशावर १९९१ मध्ये एक अभूतपूर्व आरिष्ट आले होते. देशाची वित्तीय तूट वाढत जाऊन राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडेसहा टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. ती साडेतीन ते चार टक्के असावी असा संकेत आहे. एकीकडे सरकारी खर्चामध्ये बेसुमार वाढ आणि दुसरीकडे कर आकारणीत वाढ न होण्यामुळे ही तूट खूप वाढली होती. आता अशी कल्पनाही करता येत नाही, पण महागाईचा दर १७-१८ टक्क्यांवर पोहोचला होता. परिणामी परकीय चलनाची गंगाजळी आटत आटत जाऊन केवळ एक अब्ज डॉलर इतकीच उरली होती. आता देशाकडे असलेल्या परकीय चलनाची गंगाजळी जास्त आहे, कमी आहे की नेमकी आवश्यक तेवढीच आहे, हे ओळखण्याचा निकष काय? तर त्यावेळी हा निकष असा होता की, किमान चार महिन्यांच्या आयातीसाठी पुरेल इतका परकीय चलनाचा साठा आपल्याकडे असला पाहिजे. १९९१ मध्ये इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती की, फक्त पंधरा दिवसांच्या आयातीला पुरेल इतकाच परकीय चलनाचा मर्यादित साठा आपल्याकडे उरला होता. त्यामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला होता. त्या आधीचे आपल्या अर्थव्यवस्थेचे ट्रॅक रेकॉर्ड अतिशय उत्तम होते. देशावरील सगळी कर्ज आपण वेळेवर फेडत आलो होतो. कर्ज काही प्रमाणात वाढले होते, पण त्याची परतफेड नियमितपणे होत होती. पण, १९९१ च्या मे महिन्यात अशी दारुण परिस्थिती उद्भवली की, आपल्याकडे तेलाच्या आयातीलाही पैसे राहिले नव्हते. आणि तेलाची आयात थांबली असती, तर काय झाले असते? सगळे उद्योग-धंदे बंद पडले असते. म्हणजे अगदी फूटवेअरपासून ते कॉम्प्युटरच्या हार्डवेअर- सॉफ्टवेअरपर्यंत सगळ्या गोष्टींचे उत्पादन थांबले असते. अशा या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये निर्णायक स्वरुपाचे आर्थिक धोरण अत्यंत आवश्यक होते. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात भारतीय अर्थव्यवस्था एवढी विकलांग कधीच झाली नव्हती. जगातील कोणताही देश आपल्याला मदत करायला तयार नव्हता. भारताचे नाव जगाच्या आर्थिक इतिहासातून पुसले जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आपल्याला ४७ टन सोने गहाण ठेऊन पैसे उभे करावे लागले. धोरणे बदलली, स्थिती पालटलीअशा या विदारक पार्श्वभूमीवर देशात नवे सरकार आले. त्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने झळाळी आली. त्यांनी अर्थव्यवस्थेची धुरा समर्थपणे पेलली आणि देशाच्या एकूणच अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जे धोरण स्वीकारले, त्याला ‘खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण’ (खाउजा) असे संबोधले जाते. देशातील उद्योजक - व्यावसायिक नियमांच्या बंधनात बांधले गेले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला ‘लायसन्स आणि परमिट राज’ म्हटले जात होते. प्रत्येक गोष्टीसाठी कुठले तरी लायसन्स घ्यावे लागायचे, सरकारच्या कुठल्या तरी यंत्रणेचा त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत सापडली होती. डॉ. मनमोहन सिंगांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोठा धक्का दिला आणि अशा सगळ्या बंधनांमधून देशातील उद्योजकांची सुटका केली. त्यामुळे भारतीय उद्योजकांची उद्यमशीलता झपाट्याने वाढत गेली. त्यातूनच अर्थव्यवस्था तर सावरलीच; पण पुढच्या प्रगतीची मजबूत पायाभरणीही झाली. १९५१ ते १९९१ या चाळीस वर्षांत आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा दर केवळ ३.५ टक्के, तर लोकसंख्या वाढीचा दर २.२ टक्के होता. म्हणजे आपले दरडोई उत्पन्न वर्षाला फक्त १.३ टक्के इतक्या अत्यंत धीम्या गतीने वाढत होते. देशाच्या आर्थिक विकासाची गती हीच राहिली असती, तर आपले दरडोई उत्पन्न दुप्पट व्हायला जवळपास ५८ वर्षे लागली असती. डॉ. मनमोहन सिंगांनी हे चित्र बदलले. त्यांनी जी धोरणे स्वीकारली त्यामुळे आर्थिक विकास वेगाने सुरू झाला. १९९२ ते २००२ या काळात विकासाचा दर सरासरी ६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यानंतर २००२ ते २००५ मध्ये तो ८ टक्क्यांवर गेला. पुढे २००८ मध्ये तो तब्बल ९.५ टक्क्यांवर पोहोचला. वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि अत्यवस्थ स्थितीत गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे हे खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवन होते. फुलासारख्या मृदू व्यक्तिमत्वाच्या डॉ. मनमोहन सिंगांनी ज्या वज्रासारख्या कणखरपणे नवी धोरणे राबवली, त्यामुळेच तिला ही संजीवनी लाभली. त्यामुळे नव्वदच्या दशकात आणि त्यानंतरच्या काळात देशाच्या जो आर्थिक विकास होत गेला, त्याचा पाया भक्कम करण्याचे श्रेय डॉ. सिंग यांच्याकडेच जाते. आज आपण जी प्रगती अनुभवतो आहे, तिची बीजे त्यांनी १९९१ च्या विपरित परिस्थितीत रुजवली होती, हे कुणीही नाकारु शकत नाही. एका अर्थाने आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य डॉ. सिंग यांनी केले. ऋषितुल्य व्यक्तित्व, कमालीची ऋजुता डॉ. सिंग पुढे पंतप्रधान झाले. या सगळ्या कालखंडामध्ये माझा व्यक्तिगत रुपात त्यांच्याशी अत्यंत निकटचा संबंध होता. मी त्यांचा जणू मानसपुत्रच होतो. २००५ मध्ये त्यांनी माझ्या सात पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान निवासस्थानात आयोजित केले. तो सोहळा आणि पुढेही त्यांच्याकडून लाभलेला स्नेह हा माझ्यासह आमच्या कुटुंबीयांसाठी ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. स्वत: पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या नियोजन आयोगावर सदस्य म्हणून २००९ मध्ये त्यांनी माझी निवड केली. त्याचदरम्यान, श्रीमती सोनिया गांधी या अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेवरही माझी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसोबत एकाच वेळी काम करण्याची संधी मला मिळाली. नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून डॉ. सिंग यांनी माझ्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी माझा नियमित संपर्क यायचा. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, नेतृत्वाचे, प्रशासकीय कौशल्याचे आणि दूरदृष्टीचे अनेक पैलू मला जवळून अनुभवता आले. यातून मला खूप शिकता आले, माझे ज्ञान नव्याने उजळत गेले. या सगळ्या ३५ वर्षांच्या प्रवासात मला उमगलेले डॉ. मनमोहन सिंग हे एक अत्यंत ऋषितुल्य असे व्यक्ती होते. ते अतिशय साधे, निगर्वी आणि विनम्र होते. आणि त्यांची ही विनम्रता खरी होती. बऱ्याच लोकांकडे खोटी विनम्रता असते, तशी ती त्यांच्याकडे नव्हती. एका सच्चा देशभक्ताची नम्रता त्यांच्या ठायी होती. विशेष म्हणजे, आपल्यावर टीका झाली, तरी ती शांतपणे ऐकत असत, त्यातून काही सुधारणा करता येईल का, याकडे लक्ष देत असत. टीका करणाऱ्यांवरतीच टीका करायची, हे त्यांचे कधीच तंत्र नव्हते. त्यांचा मोठेपणा म्हणजे, एवढे सगळे काम करुनही त्यांची वृत्ती मात्र अत्यंत विनयी, सात्विक अशी होती. एवढ्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्तीकडे इतकी कमालीची ऋजुता असू शकते, याची अनुभूती त्यांच्या सहवासाचा लाभ झालेल्या माझ्यासारख्यांना नक्कीच येत असे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका द्रष्टा अर्थनीतिकार आणि निष्ठावान देशभक्त काळाच्या पडद्याआड गेला आहे. या ‘तज्ज्ञ’ डॉक्टराने रुग्णशय्येवर निपचित पडलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेचे अचूक निदान केले अन् योग्य वेळी नेमके उपचार दिले, म्हणून ती खडखडीत बरी झाली. आज तिची सुधारलेली ‘तब्येत’ पाहताना जसा आनंद होतो, तसा हे ‘डॉक्टर’ नसते तर काय झाले असते? या विचाराने मनात काहूरही उठते. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस रसातळाला जाऊ लागलेल्या या देशाला एकविसाव्या शतकासाठी नवी उभारी देण्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले योगदान येणाऱ्या शतकांचा इतिहासही विसरणार नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली..! (संपर्कः drnarendra.jadhav@gmail.com)
वेब वॉच:‘अग्नी’ फायर ब्रिगेडच्या शौर्याची ‘ज्वलंत’ कहाणी
आपल्याकडे फायर ब्रिगेडच्या कामाचे कौतुक झाल्याची उदाहरणे कमीच आहेत. या दलातील जवानांच्या शौर्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. आग लागल्याची बातमी होते; पण ती कोणी, कशी आटोक्यात आणली, त्यांनी शौर्याने किती जणांचे प्राण कसे वाचवले, या विषयीच्या बातम्या ‘ब्रेकिंग’ मानल्या जात नाहीत. आग कोणाच्या हलगर्जीमुळे लागली, याचा तपास झाला, तरी त्याचा गवगवा होत नाही. शौर्य पदकांच्या बाबतीतही अनेकदा फायर ब्रिगेडच्या जवानांकडे दुय्यमपणे पाहिले जाते. आगीशी निरंतर खेळ सुरू असला, तरी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत नाही, त्यांचे कौतुक होत नाही. अशा अनेक ‘ज्वलंत’ प्रश्नांचा वेध घेणारा ‘अग्नी’ हा सिनेमा नुकताच प्राइमवर रिलीज झाला आहे. सिनेमासाठी उत्तम विषय निवडल्यावर पुढची पायरी असते पटकथा लेखनाची. अशा विषयावर पटकथा लिहिताना त्यातील बारकावे प्रेक्षकांना सांगण्यापूर्वी लेखकाला त्याचा अभ्यास करावा लागतो. आवेश न आणता हा अभ्यास दाखवण्यात पटकथा लिहिण्याचे कौशल्य असते. तांत्रिक बाबींची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना त्यात थोडा ‘ड्रामा’ही असावा लागतो, अन्यथा तो सिनेमाऐवजी डॉक्युमेंटरी होण्याचा धोका असतो. पण, हिंदी सिनेमांमध्ये अशा ड्रामेबाजीवर इतका भर दिला जातो, तितका मूळ विषयाचा अभ्यास दुर्लक्षित राहतो आणि तिथेच हे सिनेमे फसतात. ‘चार घटकाची करमणूक’ हे सूत्र सिनेमा थिएटरमध्ये चालण्यासाठी वापरले जाते, पण ओटीटीच्या प्रेक्षकांना ‘कंटेन्ट’ मिळाला नाही, तर ते रिमोटचा वापर करतात. राहुल ढोलकिया आणि विजय मौर्य यांनी फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांचे कार्य समोर आणताना, ‘नायक-खलनायक’ अशा पद्धतीने मांडणी करून ‘अग्नी’ची पटकथा सस्पेन्स थ्रिलर केली आहे. खलनायकाची भूमिका संबंधित कलाकाराने उत्तम केली असली, तरी ते पात्र हिंदी सिनेमाप्रमाणे मासलेवाईक झाले आहे. स्वतःची बाजू प्रेक्षकांना सांगण्याची संधी खलनायकाला दिली आहे. आग लागली असताना खलनायक स्वत:च, आपण हा गुन्हा का करतो आहे, हे वेळ काढून सांगत राहतो, हा प्रसंग फिल्मी झाला आहे. अशा गोष्टींमुळे ‘अग्नी’ हा एरवी सर्वसाधारण सिनेमा झाला असता, पण कलाकारांची निवड उत्तमपणे केल्याने तो एकदा तरी बघावा असा झाला आहे. प्रतीक गांधीने साकारलेला फायर ब्रिगेड अधिकारी आणि दिव्येन्दु शर्माचा पोलिस अधिकारी त्या दोन पात्रांमधील हेवेदावे प्रसंग पेरल्यामुळे प्रेक्षणीय ठरले आहेत. अर्थात, या सिनेमाचा बराचसा भाग फायर ब्रिगेडच्या शौर्यापेक्षा फायर ब्रिगेड विरुद्ध पोलिस अशा नाट्याने तापला आहे. प्रतीक गांधीने ‘स्कॅम’ या वेब सिरीजमध्ये उत्तम काम केले होते. “प्यार का पंचनामा’,‘मिर्झापूर’ अशा अनेक कलाकृतींमधून दिव्येंदुने लक्षणीय अभिनय केला आहे. सई ताम्हणकरने फायर ब्रिगेड अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारताना केलेला संयत अभिनय आवर्जून बघावा असा आहे. मोजके संवाद, पण उत्तम रिअॅक्शनमधून तिने अभिनयाचे लाजवाब दर्शन घडवले आहे. ‘अग्नी’ हा मुंबई फायर ब्रिगेड संबंधित असल्यामुळे सिनेमातील संवाद हिंदी-मराठी आहेत. बरेच कलाकारही मराठी आहेत. जितेंद्र जोशीने न पटणारी भूमिका चांगली साकारली आहे. सखी गोखले, अनंत जोग यांच्या भूमिका उत्तम. संयमी खेरला उत्तम सिनेमांमध्ये जास्त फुटेजच्या भूमिका मिळतात. पण, त्यातील वैविध्य दाखवण्याची संधी तिने इथे वाया घालवल्याचे जाणवते. राहुल ढोलकियांनी दिग्दर्शन करताना कथेतला ‘ड्रामा’ पुढे आणला आणि फायर ब्रिगेडचा प्रश्न मागे पडला आहे. “परझानिया’सारख्या दर्जेदार सिनेमाच्या दिग्दर्शकाने ‘रईस’सारख्या चित्रपटांचा मार्ग स्वीकारावा, हे जरा खटकते. प्रॉडक्शन डिझाइनमध्ये आणखी चांगले काम व्हायला हवे होते. आगीचे सर्वच प्रसंग व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरून दाखवले आहेत. त्यामुळे त्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा आणि भडकपणा जाणवतो. पोलिसाच्या रुपातील नायक आगीच्या ज्वाळांतून हेल्मेट आणि सुरक्षा साधनांशिवाय सुखरूप चालतो, पळतो, त्याला किरकोळ खरचटते, पण जराही भाजत नाही! बऱ्याच वेळा फायर ब्रिगेडचे कर्मचारी, विशेषतः प्रमुख कलाकार डोक्यावर हेल्मेट न घालता खुलेपणाने आगीतून जाता-येताना दाखवले आहेत. अशा गोष्टी या प्रकारच्या कथा विषयासाठी सर्वथा गैर आहेत. भारतात २०२२ मध्ये पहिल्या महिला फायर ब्रिगेडची नेमणूक केली गेली. पण, ही कथा महिलेशिवाय कशी पुढे सरकणार, असा प्रश्न सिनेमा तयार करणाऱ्यांना पडला असावा. त्यामुळे ‘अग्नी’च्या फायर ब्रिगेडमध्ये एक नायिकाही आहे आणि याच टीममध्ये तिचे प्रेम प्रकरण रंगले आहे. म्हणून मग त्या दोघांचे एक गाणे ओघाने आलेच! त्यासाठी ‘जागी बदन में ज्वाला..’ किंवा ‘आग हैं लगी हुई..’ अशी जुनी गाणी रिमिक्स करून न वापरल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शकांचे आभारच मानायला हवे! (संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)
वेध मुत्सद्देगिरीचा...:शिवशंकर मेनन यांनी ‘पंचसूत्री’द्वारे दिला परराष्ट्र धोरणाला आकार
वैभवशाली वारसा, अनुभवाची संपन्न शिदोरी आणि परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यास या बळावर शीतयुद्धोत्तर भारतीय परराष्ट्र धोरणाला रचनात्मक आकार देणारा मुत्सद्दी म्हणून शिवशंकर मेनन यांच्याकडे पाहिले जाते. मुत्सद्देगिरीचे उपजत कौशल्य आणि बहुभाषी व्यक्तिमत्वाच्या साथीने त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या. मेनन १९७२ मध्ये परराष्ट्र सेवेत दाखल झाले. १९७४ ते १९७९ या दरम्यान त्यांना चीनमध्ये सचिव (द्वितीय) तसेच अवर सचिव म्हणून जबाबदारी मिळाली. पुढे १९८६ ते १९८९ या कालावधीत ते पुन्हा चीनमध्ये कौन्सिलर म्हणून कार्यरत होते. वास्तविक चीनच्या दृष्टीने हा काळ अत्यंत संक्रमणाचा होता. माओच्या राजवटीतून बाहेर येऊन डेंग यांच्या नेतृत्वाखाली हा देश कूस बदलत होता. एकीकडे १९७९ मध्ये स्वीकारलेले उदारीकरणाचे धोरण पुढे जात होते आणि दुसरीकडे याच काळात म्हणजे १९८९ मध्ये घडलेल्या, या देशाच्या इतिहासातील ‘जालियनवाला हत्याकांड’ मानल्या जाणाऱ्या ‘तियानमेन स्क्वेअर’च्या घटनेने चीन पुरता ढवळून निघाला होता. अशा मोठ्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार होण्याची वेळ कोणत्याही मुत्सद्द्याच्या वाट्याला येणे तसे दुर्मिळच. मेनन या दोन्ही घटनांचे साक्षीदार ठरले. चीनच्या या संक्रमणकाळाचा जवळून अनुभव घेणाऱ्या मेनन यांना १९८९ ते १९९२ दरम्यान जपानमधील आपल्या सेवेच्या काळात शीतयुद्ध समाप्तीचे आशियावर होत असलेले परिणाम अभ्यासण्याची संधी मिळाली. जपानमध्ये हे दशक ‘लॉस्ट डीकेड' म्हणून ओळखले जाते. त्या काळात हा देश अतिशय बिकट अशा आर्थिक परिस्थितीला सामोरा जात होता. जपानमधील या स्थितीचा परिणाम संपूर्ण आशियावर होणार, याचा अंदाज मेनन यांना आलाच होता. आशियातील या दोन प्रमुख देशांतील अशा ऐतिहासिक बदलांचा जवळून घेतेलेला अनुभव मेनन यांच्या विचाराला कलाटणी देणारा ठरला. त्यातून जागतिक राजकारणाकडे बघण्याची त्यांची दृष्टी आमूलाग्र बदलली आणि जगातील या नव्या परिस्थितीला अनुरूप असा दृष्टिकोन भारतीय परराष्ट्र धोरणात बिंबवण्यास त्यांनी सुरूवात केली. मेनन हे १९९५ ते ९७ दरम्यान इस्रायलमधील उच्चायुक्त बनले. या काळात त्यांनी भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंधाविषयीचा गैरसमज दूर करण्यास प्राधान्य दिले. राजकीय विचारांचा बळी ठरलेल्या भारत - इस्रायल संबंधांना आर्थिक आयाम देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न त्यांनी केला. आज भारत-इस्रायल संबंध ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचे थोडेफार श्रेय मेनन यांनाही जाते. पुढे त्यांनी श्रीलंकेमधील उच्चायुक्त (१९९७-२०००), चीनमध्ये राजदूत (२०००-०३) आणि पाकिस्तानमधील उच्चायुक्त (२००३-०६) म्हणून जबाबदारी सांभाळली. हा काळ चीनचा दक्षिण आशियातील वाढता हस्तक्षेप, चीन - पाकिस्तान यांची वाढती मैत्री, पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात दहशतवादाचा वापर तसेच दक्षिण आशियाई देशांमध्ये चीनचे वाढत्या आकर्षणाचा होता. त्यामुळे एका अर्थाने दक्षिण आशियातील भारताचे वर्चस्व धोक्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मेनन यांच्या चीनमधील कारकिर्दीत तिथे भेट देऊन त्या देशाचा दक्षिण आशियातील हस्तक्षेप क्षीण करण्याचा प्रयत्न केला. वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी पाकिस्तानसोबत ‘संयोग संवाद प्रक्रिया’ सुरू करण्यास प्राधान्य दिले. भारताच्या दृष्टीने कायमच संवेदनशील असणाऱ्या दक्षिण आशियात अत्यंत मोक्याच्या वेळी महत्त्वाच्या देशांमध्ये सेवा बजावण्याची दुर्मिळ संधी प्राप्त झालेल्या मेनन यांनी शांतता, समन्वय, सहकार्य, संयम आणि समतोल या पंचसूत्रीला नेहमीच प्राधान्य दिले. या पंचसूत्रीच्या आधारे, कोणताही गाजावाजा न करता त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला आव्हानात्मक परिस्थितीतून अत्यंत अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६-०९ या काळात परराष्ट्र सचिवपदी त्यांची नियुक्ती केली. भारत – अमेरिकेतील ऐतिहासिक अणुकरार पूर्णत्वास जाणे आणि २००८ या एकाच वर्षात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, चीन आणि रशिया या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांच्या प्रमुखांनी भारताला भेट देणे अशा दुर्मिळ घटना या काळात मेनन यांच्या नेतृत्वाखाली घडल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेत डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या आपल्या दुसऱ्या कारकिर्दीत त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (२०१०-१४) म्हणून नियुक्ती केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेतील त्रुटी शोधून ती ही व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्याचे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून मेनन यांनी केले. आपल्या पंचसूत्रीद्वारे देशाचे परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला दिशादर्शन करण्याचे काम निवृत्तीनंतरही ते अविरतपणे करत आहेत. (संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)
खलनिग्रहणाय:गुन्हेगारी आणि पारंपरिक मूल्ये
आपली जुनी समाजव्यवस्था तुटून गेली, पण जी नवीन व्यवस्था आली, ती तेवढी प्रभावशाली नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या मुळावर इलाज करण्यासाठी भारतीय ज्ञान-परंपरा जोपासत, प्रासंगिक गोष्टींचे पुनरुज्जीवन करावे लागेल. संस्कारांची परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधला, तर समाजातील गुन्हे निश्चित कमी होतील. समाजामध्ये दिवसेंदिवस सर्वच प्रकारच्या गुन्हेगारीची वाढ होत आहे. त्यातही महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे अत्यंत चिंताजनक आहेत. त्याचवेळी सायबर फ्रॉडने उच्छाद मांडला आहे. आर्थिक गुन्हांचा विळखाही वाढत आहे. एकीकडे गुन्हे नियंत्रणात पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे सर्व न्यायालयांमध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हे प्रलंबित आहेत. अशा पार्श्वभूमीवर समाजात गुन्हे का घडतात, याचा याविषयी अनेक मते मांडली जातात. काही तज्ज्ञ सांगतात की, आर्थिक कारणामुळे गुन्हे घडतात. काहींच्या मते गुन्हे घडण्याचे कारण सामाजिक असते. आणखी काही जण सांगतात की त्यामागे मानसशास्त्रीय कारणे असतात, तर काहींना गुन्हे घडण्यामागे सांप्रदायिक उन्माद हेही कारण असल्याचे वाटते. गुन्ह्यांचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, प्रासंगिकतेनुसार ही सगळी कारणे कुठे ना कुठे लागू होतात. पण, सगळ्यात महत्त्वाचे कारण माणसाच्या जडणघडणीत दडलेले असते. या जडणघडणीलाच भारतीय संस्कृतीमध्ये ‘संस्कार’ म्हणतात. लहानपणापासून माणूस जे बघतो आणि अनुभवतो, त्या गोष्टी त्याच्या मेंदूवर कायमच्या कोरल्या जातात आणि भविष्यात त्याची वागणूकही त्यानुसारच घडत जाते. भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे आणि ती वैश्विक मूल्यांवर आधारित आहे. या संस्कृतीमध्ये सर्वांच्या भल्याची कामना करण्यात आलीआहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा या संस्कृतीचा उद्घोष आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा संस्कृतीचा आत्मा आहे. स्त्रीला या संस्कृतीने देवी मानले आहे. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे जो जसे करेल, तसे भरेल हाही या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. योग, ध्यानधारणेतून मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीचा मार्ग सांगण्यात आला आहे. आज जगभरात योग करणाऱ्यांची संख्या काही कोटींवर पोहोचली आहे. संयुक्त परिवार ही भारताची एक प्राचीन परंपरा आहे. काका, मामा, मावसा या सर्व नात्यांसाठी इंग्रजीमध्ये जसा ‘अंकल’ हा एकच शब्द आहे; तसा काकू, मावशी, आत्या, मामी या सर्वांसाठीही एकच शब्द आहे- आंटी. पण, भारतीय संस्कृतीने प्रत्येक नात्याला एक वेगळे नाव दिले आहे. ही संस्कृती आध्यात्मिक आहे. ती भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंदला जास्त महत्त्व देते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंवर कसे नियंत्रण ठेवता येईल, याचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्मयोग हे मनाच्या शुद्धीचे मार्ग आहेत आणि ते आपापल्या पद्धतीने माणसाला ईश्वराजवळ नेतात, अशी या संस्कृतीची धारणा आहे. अशा या भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आत्मसंयम आहे. आत्मसंयम म्हणजे मनावर ताबा मिळवणे. तो कसा मिळवावा, यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. इंद्रियनिग्रह हा अशा आत्मसंयमाचाच भाग आहे. आत्मसंयम वाढवण्यासाठीच आपल्याकडे जप, व्रत, उपवास केले जातात. भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा अनेक प्रथा कोणत्या ना कोणत्या रुपाने रुजलेल्या आहेत. भारत हा आध्यात्मिक पाया असलेला देश आहे. त्यामुळे साहजिकच आध्यात्मिक साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळापासून या साधनेद्वारे आत्मा आणि परमात्म्याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी विशाल आणि व्यापक बनली आहे. ही संस्कृती सगळीकडे ईश्वराचे अस्तित्व असल्याचे मानते. अगदी दगड-माती, झाडे-वेली, नदी-सागर, पक्षी-प्राणी या सर्वांची पूजा केली जाते. त्यामुळे दयाभाव हे या संस्कृतीचे मूळ आहे. षड् आस्तिक दर्शन वेगवेगळ्या पद्धतीने सत्याचे वर्णन करते. एकम् सद् विप्रा बहुधा वदन्ति। या उक्तीप्रमाणे असे मानले जाते की, सत्य एकच आहे, विद्वान लोक ते विविध प्रकारे मांडतात. गुन्हेगारी मानसिकता वाढू नये म्हणून भारतीय जीवनपद्धतीचे हे सगळे संस्कार आपल्या शिक्षण पद्धतीत समाविष्ट होणे गरजेचे आहे. इंग्रजांनी जी शिक्षण पद्धत लागू केली, ती पूर्णपणे भौतिकवादी दृष्टिकोनावर आधारित आहे. या शिक्षण पद्धतीमुळे भारताची अस्मिताच अस्तित्वहीन झाली आहे. शिक्षण एक चांगले चारित्र्य निर्माण करते. स्वस्थ शरीर, विकसित मन आणि नैतिक भावना या शिक्षण पद्धतीचे मूलाधार आहेत. शिक्षण माणसामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करते. त्यामुळे लहान वयातच कायद्यांचे पालन करणे शिकवायला हवे. संविधान सर्वोच्च आहे आणि त्याचे पालन करणे आपले आद्यकर्तव्य आहे, ही गोष्ट सर्व मुलांच्या मनात रुजवली पाहिजे. लहानपणापासून मुलांना खेळण्याची संधी द्यायला हवी. कारण मैदानी खेळ हा फक्त शारीरिक व्यायाम नसून मानसिक विकासाचेही ते मोठे माध्यम आहे. मनामध्ये असलेले ताणतणाव खेळाने दूर होतात. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, योगाभ्यासामुळे एक संतुलित व्यक्तिमत्व विकसित होते. भावनेवर बुद्धीचा ताबा असला की माणसाचा तोल जात नाही आणि आपल्या मनावर त्याचे पूर्ण नियंत्रण राहते. भविष्यात गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्यासाठी मनावरचे नियंत्रण हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. आपली जुनी समाजव्यवस्था तुटून गेली, पण जी नवीन व्यवस्था आली, ती तेवढी प्रभावशाली नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या मुळावर इलाज करण्यासाठी भारतीय ज्ञान-परंपरा जोपासत, सध्या प्रासंगिक असलेल्या गोष्टींचे पुनरुज्जीवन करावे लागेल. संस्कारांची परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधला, तर समाजातील गुन्हे काही प्रमाणात निश्चितच कमी होतील. नैतिकता खालावली, तणाव वाढलापूर्वी गावागावांत रामायण, महाभारत, भागवतकथा तसेच ज्ञानेश्वरी, तुकारामगाथेवर कीर्तन-प्रवचने व्हायची. त्यातून चांगले काय आणि वाईट काय, याचे ज्ञान होत मनांवर सुसंस्कार व्हायचे. या संस्कारांचा समाजव्यवस्थेवर मोठा पगडा होता. जीवनशैलीही साधारण होती. साधे जीवन आणि उच्च विचार हा सिद्धांत रुढ होता. आता बदलत्या काळात ही परंपरा जवळपास बंद झाली आहे. परिणामी नैतिकतेची पातळी खालावली आहे आणि त्यातूनच गावोगावी तणाव वाढत आहे. अशा गोष्टीही गुन्हेगारी वाढण्याला कारणीभूत ठरत आहेत. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)
कापसाच्या हंगामाशिवाय पेंडखजूर कधी खायला मिळायची नाही. त्यामुळं वेचणीचा काळ म्हणजे पेंडखजुरीचा गोड काळ, असं आमच्या डोक्यात पक्कं बसलं आहे. सध्या सगळीकडं कापूस वेचणीची घाई सुरू आहे. रानात माणसं मिळत नाहीत. कापूस वेचणी खूप महागली आहे. रोजानं आलेल्या बायका वेळ काढत कसाबसा कापूस वेचतात, पण किलोनं म्हटलं तर त्या एकेका दिवशी तीस ते चाळीस किलो कापूस वेचतात. हे सगळं पाहताना मला माझं लहानपण आठवतं. घरातली सगळी माणसं लेकराबाळांसह या काळात कापूस वेचायला जायची. उलट रोजागारावरच्या बायका तेव्हा कमीच लागायच्या. आज मात्र सगळ्यांना स्वतःच्या शेतात काम करायचा कंटाळा येतो आणि रोजगारी बायका मिळणं मुश्किल झालं आहे. त्यामुळं आता कापूस वेचणी हे लोकांना महासंकट वाटू लागलंय. पण, आमच्या काळी वेचणी खूप आनंददायक होती. गाणी म्हणत, गप्पागोष्टी करत घरातली सगळी माणसं कापूस वेचायची. कापूस हे आमच्या मराठवाड्यातलं तसं जुनं पीक. त्या काळात आमच्याकडं ‘बगडा’ नावाची कापसाची एक जात होती. त्याची उंची गुडघ्याखालीच असायची. बगड्याला बोंडं आणि कापूसही कमीच असायचा. सुरूवातीच्या काळात, म्हणजे माझ्या शालेय जीवनात हा बगडा कापूस वेचायला मी नेहमी जायचो. स्वतःच्या घरचा कापूस वेचायला वहिनीसोबत आणि बहिणीच्या सासरी गेलं की तिथं तिच्यासोबत वेचायला जात असे. घरी कापूस वेचायचो, तेव्हा त्याचं मोल रोजगारी बायकांबरोबर मी हक्कानं मागून घ्यायचो. पैशाच्या लालचेनं का होईना, काम करायला शिकतोय ना! म्हणून घरचे लोकही पैसे द्यायचे. ते पैसे पुन्हा वडिलांकडं जमा असायचे. ते किती झालेत, याचा कायम घोळ असायचा. ते कधीच परत मिळायचे नाहीत. कारण नवे कपडे आणले की वडील सांगायचे, तुझ्या पैशातले एवढे कटले. आम्हालाही वाटायचं, आपण आपल्या पैशाचे कपडे घेतले, कटू दे कटले तर! शर्ट अंगावर घालताना तो आपण कमावलेल्या पैशाचा आहे, याचा आनंद प्रत्यक्ष हातात पैसे घेण्यापेक्षा जास्त असायचा. बहीण चतुरबाईच्या सासरी गेलो की तिच्यासोबत शेतात जायचो. कापसाच्या रानात आम्ही दोघंच असायचो. तेव्हा ती पाखरांच्या गोष्टी सांगायची. तिला पाखरांची भाषा कळायची. एकेक पाखरू शीळ घालतं म्हणजे काय म्हणतं? ते तसं का म्हणतं? त्याच्या पाठीमागची कथाही सांगायची. त्यातल्या काहींचा उपयोग मी माझ्या लेखनात करून घेतला. काही अशाच वाऱ्यावर गेल्या आहेत. आपला भोवताल जिवंत आहे आणि त्यातल्या प्रत्येक घटकाची एक कथा आहे, हे लक्षात येऊन तेव्हा इतकं उदात्त वाटायचं की रानावनातही खूप करमायचं. आपल्या भोवतीचं जग किती सुखी, समृद्ध आणि आनंदी आहे, असं वाटायचं. हे सगळं करताना बहिणीचा सासुरवास हलका व्हायचा. तिच्या कथा - गाणी माझं आणि तिचंही मनोरंजन करायचे. तिचं मन हलकं हलकं व्हायचं. मी कापूस वेचायला जायचो, त्या दिवशी घरी परत आलं की बहिणीची सासू, ज्यांना मी आत्या म्हणायचो; त्या मला पेंडखजूर खायला द्यायच्या. एका अर्थानं मी शेतात केलेल्या कामाची ती गोड मजुरी असायची. शिवाय, मी गावी परत निघायचो, तेव्हा शंकर दाजी तालुक्याला जाऊन माझ्यासाठी कापड आणायचे. मला टेलरकडं न्यायचे. तो माझं माप घेऊन छान कपडे शिवायचा. त्याच्याकडं जाण्यात मला खूप आनंद वाटायचा, कारण त्याच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं एक कॅलेंडर लावलेलं असायचं. त्यात बाबासाहेब शाळेत जाताना, परदेशात जाताना, मंत्री असताना, राज्यघटना लिहिताना असे फोटो होते. ते मला फार पाहावे वाटायचे. शेतातून कापूस आला की, तो घरातल्या अंबारात भरून ठेवणे, हा एक कार्यक्रम असायचा. अंबरात कापूस भरताना तो तुडवून भरला जायचा. त्यासाठी आम्हा सर्व लेकरांना अंबारात उतरवायचे आणि कापूस टाकायचे. आम्ही तो तुडवून त्यावर उड्या मारून मारून जास्तीत जास्त कापूस अंबारात भरायचो. खूप मजा यायची. कापसावर उड्या मारताना फार आनंद वाटायचा. अंबार भरत आल्यावर कधी कधी त्यावर आम्ही झोपायचोही. कारण तेव्हा घरी गादी नव्हती, गादीवर झोपण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळं हा अख्खा कापूस आणि त्यावर झोपणं म्हणजे गादीपेक्षाही भारी वाटायचं. कापसाचा एक विशिष्ट गंध यायचा. तो छान वाटायचा. आम्ही लेकरं त्या कापसावर उड्या मारत राहायचो आणि थकलो की लोळत राहायचो. तिथंच एकमेकांना गोष्टी सांगत बसायचो. कापूस अंबारात भरण्यासारखाच तो विकायला नेताना गाडीवर भोत भरणे, हा एक कार्यक्रम असायचा. संध्याकाळी गाड्या लावल्या जात. त्यावर भोत उभे केले जात आणि त्यात कापूस भरला जाई. आम्ही मुलं तोही कापूस तुडवून द्यायचो. टच्चून कापूस भरला की भोत शिवले जायचे आणि पहाटेच गाड्या हिंगोली किंवा पूर्णेच्या आडतीवर जायच्या. या भोतावर बसून दादासोबत जायची संधी कधी तरी आम्हाला मिळायची. त्या निमित्तानं एक वेळ हॉटेलमध्ये भजी खायला मिळायची. कधी कधी दादा जिलबीही खाऊ घालायचा. ती मजा खूप भारी वाटायची. त्यामुळं कुठल्या तरी निमित्तानं एकदा कापसाच्या भोतावर जायला पाहिजे, असं वाटायचं. शेतातला कापूस गेला की, मग बोंदरी वेचणं सुरू व्हायचं. बोंदरी म्हणजे कापसाचा सरवा असायचा. राहिलीसाहिली बोंडं, झाडाझुडपात उडून गेलेला, खडोळीनं बाभळीवर खोप्यासाठी नेलेला कापूस आम्ही काढायचो. या संदर्भात एक कविताही मी लिहिली होती. ‘माझ्या काबाडाचे धनी’मध्ये ती आहे. शरद जोशी आणि मारुती चितमपल्ली यांना ती फार आवडली होती. शरद जोशींनी एका भाषणात तिचा उल्लेख केला होता. त्यांचं ते भाषण ‘मळ्यातील अंगार’ या पुस्तकात आलं आहे. मारुती चितमपल्लींनी मला या कवितेविषयी सविस्तर पत्र लिहिलं. भीमराव धोंडे यांच्या शेतकरी आत्महत्यांवर आधारित ‘तहान’ या सिनेमात ही कविता गाणं म्हणून वापरली आहे. प्रशांत मोरे या कवी मित्रानं ती गायली आहे. ठाकूर नावाच्या संगीतकारानं तिला संगीत दिलं आहे. ही बोंदरी म्हणजे आमच्या मालकीचा कापूस असायचा. त्यात थोडाफार कचरा असायचा आणि त्याचा रंगही मळकट असायचा. त्यामुळं त्याला चांगल्या कापसाइतका भाव मिळत नसे. पण, गावातले दुकानदार त्याच्या भारंभार पेंडखजूर द्यायचे. म्हणजे एका तागड्यात कापूस, दुसऱ्या तागड्यात पेंडखजूर टाकून कापसाच्या वजनाइतकी खजूर दिली जायची. पेंडखजूर खायला मिळायची, त्यामुळं आम्ही रानातला असा कापूस बोंदरीच्या रूपात गोळा करून न्यायचो. कापसाच्या हंगामाशिवाय आम्हाला पेंडखजूर कधी खायला मिळायची नाही. त्यामुळं कापूस वेचणीचा काळ म्हणजे पेंडखजुरीचा गोड काळ, असंच आमच्या डोक्यात पक्कं बसलं आहे. (संपर्कः inbhalerao@gmail.com)
माझ्या हिश्श्याचे किस्से:भेट म्हणून दिली होती ड्रायव्हरसह कार...
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये गेल्या आठवड्यात मी राज कपूरजींची शंभरावी जयंती आणि रणधीर कपूरजींनी मला भेट दिलेल्या त्यांच्या सोफ्याची गोष्ट सांगितली होती. पण, राज कपूर यांचे व्यक्तित्व आणि भारतीय सिनेमासाठीचे त्यांचे योगदान एक-दोन भागांमध्ये लिहिले जाऊ शकत नाही. त्यामुळे आणखी किमान एक भाग लिहून काही गोष्टी तुम्हाला सांगाव्यात, असा विचार मनात आला. म्हणून आजचा भाग राज कपूर यांच्याविषयी. राज कपूर यांची शंभरावी जयंती भव्यदिव्य पद्धतीने साजरी झाली. त्या दिवशी पीव्हीआरमध्ये चहुबाजूला त्यांच्या सिनेमांची पोस्टर लागली होते. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील क्षणांचे; पृथ्वीराज कपूरजी, शम्मी कपूर, शशी कपूर, बहीण उम्मी, ऋषी कपूर, रणधीर कपूर यांच्यासोबतचे फोटो लावले होते. त्यांची सारी वाद्ये- ढोलकी, तबला, सारंगी, हार्मोनियम, अकॉर्डियन खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली होती. ‘आवारा’, ‘मेरा नाम जोकर’ अशा सिनेमांच्या स्टँडीसोबत लोक फोटो काढून घेत होते. दुसऱ्या बाजूला एक बँड राज कपूर यांची गाणी वाजवत होता. गाडीतून उतरताच मी पाहिले की प्रवेशद्वारावर संपूर्ण परिवार उभा होता. रणधीर कपूर आणि बबिताजी खुर्चीवर बसलेले होते. नीतू कपूर, नीला आंटी, केतन देसाई, कंचन देसाई, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, रीमा, मनोज जैन आणि त्यांची मुले, रिद्धिमा येणाऱ्यांचे स्वागत करत होते. मुलगी अल्फिया आणि मुलगा साहिर यांना घेऊन मी तिथे पोहोचलो, तेव्हा सर्वांत आधी मला नीतूजींनी पाहिले आणि आपल्या स्टाइलमध्ये ‘रूमीजी..’ अशी साद घालत माझी गळाभेट घेतली. त्यानंतर रणबीरची भेट झाली आणि साहजिकच चिंटूजींची आठवण निघाली. ते आमच्यासोबत नसल्याची जाणीव प्रकर्षाने होत होती. विशेष म्हणजे, या परिवारातील सगळे जण प्रवेशद्वारावर उभे राहून येणाऱ्यांचे स्वागत करत होते, त्यांना भेटत होते, त्यांच्याशी गप्पाही मारत होते. मी मुलांना म्हणालो, ‘बघा, हा परिवार किती अनोखा आहे, प्रेमळ आहे, अाजही किती जमिनीवर आहे. इथे स्वागताला उभे असलेले रणबीर, आलिया, करिश्मा, करीना, नीतूजी हे सगळे मोठे स्टार आहेत आणि त्यांच्याभोवती एवढी गर्दी आहे. त्यांच्यासाठी कसलीही विशेष सुरक्षा नाही. जो यायचा तो त्यांना सहजपणे भेटून आत जात आहे.’ मला तिथे बोनी कपूर साहेब भेटले. मग राज कपूर साहेब आणि कृष्णा आंटींची आठवण निघाली. या दोघांच्या अनेक जुन्या आठवणींवर आम्ही बोलत होतो. राज कपूर साहेबांचा जवळचा सहवास लाभलेल्यांमध्ये बोनी कपूरजी होते. बोनीजी राज साहेबांचे खूप आवडते होते. ते सांगत होते, राज कपूर साहेब इतके ध्येयासक्त होते की, त्यांनी आपली सगळी कमाई सिनेमांवर, स्टुडिओंवर खर्च केली आणि नंतर स्वत:चे घर बांधले. मी म्हणालो, ‘हो, मलाही कृष्णा आंटींनी सांगितले होते की त्यांचे निम्मे आयुष्य भाड्याच्या घरामध्ये गेलेय. त्या म्हणाल्या होत्या, मी त्यांच्याशी (राज साहेब) भांडायचे, नाराज व्हायचे. त्यांना म्हणायचे की, तुम्ही फक्त स्टुडिओ उभारत आहात, आधी घर तरी बांधा. ते मला प्रेमाने समजावायचे की, कृष्णा, सिनेमा हे माझे पॅशन आहे आणि सिनेमा स्टुडिओमुळे तयार होतो, घरामुळे नाही. आपला स्वत:चा एक स्टुडिओ असावा, हे कोणत्याही चित्रपट निर्मात्याचे स्वप्न असते. त्यावर मी म्हणायचे की, मी एक गृहिणी आहे आणि आपले स्वत:चे घर असावे, हे प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते. त्यावर राज कपूर साहेब हसून म्हणायचे.. कृष्णा, माझे स्वप्न पूर्ण होईल आणि तुझेही स्वप्न साकार होईल! ‘मेरा नाम जोकर’नंतर त्यांना आपला स्टुडिओही गहाण ठेवावा लागला. पुढे ‘बॉबी’ प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचे कर्ज फिटले आणि त्यानंतरही काही वर्षांनी त्यांनी घर खरेदी केले. जिथे ते इतकी वर्षे भाड्याने राहात होते, ते घर त्यांनी कृष्णा आंटींना भेट दिले. या गोष्टीवरून मला अमीर क़ज़लबाश यांचा एक शेर आठवतोय... मिरे जुनूँ का नतीजा ज़रूर निकलेगा, इसी सियाह समुंदर से नूर निकलेगा। मला बोनीजींनी सांगितले, ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर साहेबांवर कर्ज झाले होते. एक दिवस ख़्वाजा अहमद अब्बास त्यांच्याकडे आले आणि त्यांना एक कथा-कल्पना ऐकवली. ते म्हणाले, मी सांगतो आहे म्हणून तुम्ही या कथेवर सिनेमा बनवा, तुमचे सगळे कर्ज फिटून जाईल. आणि मग राज कपूर साहेबांनी ‘बॉबी’ बनवला. हा सिनेमा इतका िहट झाला की खरोखरच त्यांचे सगळे कर्ज फिटले. एके दिवशी राज साहेबांनी एक अॅम्बेसेडर कार विकत घेतली आणि ते अब्बास साहेबांकडे गेले. त्यांना म्हणाले, ‘ही कार माझ्याकडून तुम्हाला भेट! आणि गाडीत जो ड्रायव्हर बसला आहे, तो सुद्धा तुमचाच ड्रायव्हर असेल. त्याचा पगार आर. के. प्रॉडक्शन देईल आणि ज्या पंपावर ‘आर. के”चे खाते आहे तिथूनच या गाडीतही पेट्रोल भरले जाईल.’ त्यांनी ड्रायव्हर आणि पेट्रोलसह ती गाडी भेट दिली. एकदा त्यांच्याकडे इन्कम टॅक्सची काही रक्कम बाकी राहिली होती. ती देण्यासाठी स्वत: खरेदी केलेला श्रीकांत स्टुडिओ त्यांनी विकला; पण कुणा मंत्र्याला, नेत्याला वा अधिकाऱ्याला सांगून ही रक्कम माफ करुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. राज कपूर हे अशा दिलदार, उमद्या व्यक्तिमत्वाचे होते. आज त्यांच्या आठवणीत ‘अनाडी’ सिनेमाचे हे गाणे ऐका... सब कुछ सीखा हमने, न सीखी होशियारी... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
रसिक स्पेशल:...अन्यथा, ऱ्हास अटळ आहे!
उत्तम कथा, कसदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमूल्ये, अफलातून लोकेशन्स आणि चोख मार्केटिंग यांच्या बळावर दाक्षिणात्य सिनेमांचा यशोरथ वेगाने धावतोय. त्याला आवर घालण्याची चर्चा करण्याऐवजी हिंदी आणि मराठी सिनेमांनीही तशी धाव घेण्याची तयारी केली पाहिजे. त्यासाठी ‘पुष्पा’च्या आडून येणाऱ्या हाका सावधपणे ऐकल्या पाहिजेत ! अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा - द रुल’ हा सिक्वेलपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. मूळच्या तेलुगू भाषेतील या सिनेमाने एव्हाना भारतीय सिनेमांच्या उत्पन्नाचे आजवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पहिल्या आठवड्यात एक हजार कोटींची कमाई करणारा तो पहिला सिनेमा ठरला आहे. वास्तविक या सिनेमात व्हीएफएक्स आणि धमाकेदार अॅक्शनची स्टाइलबाज मांडणी वगळता विशेष काही नाही. त्यातील गाणीही पहिल्या भागाच्या तुलनेत जास्त लोकप्रिय झाली नाहीत. मग तरीही तो इतकी कमाई कशी काय करू शकला? मार्केटिंग, पब्लिसिटीचे यश‘पुष्पा’चे हे यश त्याच्या तुफान मार्केटिंग आणि माऊथ पब्लिसिटीमध्ये आहे. प्रदर्शनापूर्वीच केवळ टिझर आणि ट्रेलरच्या माध्यमातून तसेच ब्रँड पब्लिसिटीतून जवळपास शंभर कोटींची कमाई या सिनेमाने केली. देशभरातील विविध शहरांत तसेच विदेशांतही भव्य-दिव्य पब्लिसिटी कॅम्पेन केले गेले. या सिनेमाच्या डोळे दीपवणाऱ्या कमाईचे गणित विक्रमी स्क्रीन ब्लॉकिंग आणि बुकिंगमध्येही दडले आहे. देशभरातील शेकडो थिएटर या सिनेमासाठी आधीच ब्लॉक केले गेले, तर काही हजार स्क्रीन बुक करण्यात आले. ‘पुष्पा’ रिलीज होईल, तेव्हा प्रेक्षकांना दुसऱ्या सिनेमांचे फारसे ऑप्शन राहणार नाहीत, याची दक्षता वितरकांकडून घेतली गेली. काही मेट्रो शहरांत पहिल्या ठराविक दिवसांत तिकीट दरही वाढीव ठेवले गेले. जोडीला टीव्ही चॅनल, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया तसेच गॉसिपिंगमधून ‘पुष्पा’ सतत चर्चेत राहील, याची नीट खबरदारी घेतली गेली. अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे या सिनेमाने केलेली विक्रमी कमाई! आशय, शैली अन् तंत्राचे नावीन्य‘पुष्पा - दोन'चे हे आर्थिक यश एखादा सिनेमा काढताना व्यावसायिक गणिते कशी मांडावीत, याचे उत्तम उदाहरण ठरावे. या तुलनेत फार कमी हिंदी सिनेमे अशी अफाट कमाई करतात. या वर्षी आलेल्या सिनेमांमध्ये चांगल्या कमाईच्या बाबतीत अॅनिमल, लापता लेडीज, तसेच पठाण, जवान, गदर- भाग दोन अशी काही मोजकी नावे घेता येतील. मात्र, दक्षिणेकडील सिनेमे विलक्षण प्रमाणात तिकीटबारीवर कमाई करताहेत. लोकमानसाला भिडणारा आशय, वेगळ्या व्यक्तिरेखा, अनोखी शैली आणि नव्या तंत्रज्ञानाचा नेमका वापर यामुळे त्यांना हे यश मिळत आहे, ते कमी लेखता येणार नाही. एस. एस. राजामौलींचा ‘आरआरआर’, अभिनेता यशचा अॅक्शनपट ‘केजीएफ-२’ आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमांनी देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर जे गारुड केलं, तशी संधी हिंदी चित्रपटांनाही होती; मात्र तिचे सोने करता आले नाही. हिंदी सिनेमे का मागे पडले?दक्षिणेच्या मानाने हिंदी सिनेमा मागे पडलाय, हे मान्यच करावे लागेल. एक काळ होता, जेव्हा सगळीकडे केवळ येऊ घातलेल्या हिंदी सिनेमांची चर्चा असायची. त्यातली गाणी, सीन, संवाद, अॅक्शन, तांत्रिक वैशिष्ट्य यांची माहिती झळकत राहायची. ही वातावरणनिर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे, तरीही आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत, याबद्दल लोकांमध्ये फारशी उत्सुकता दिसत नाही. उलट दक्षिणेकडील कोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत, त्यांचा ‘यूएसपी’ काय आहे, याविषयी लोक भरभरून बोलतात. दाक्षिणात्य सिनेमांना मिळालेले व्यावसायिक यश अभिनंदनपात्र का आहे, याची अलीकडे चर्चा होते. त्यातून धडा घेत हिंदी सिनेमानेही थोडीफार कूस बदलायला सुरूवात केली आहे. ओटीटीवरील तसेच नियमित हिंदी सिनेमांच्या आशय- विषयात याचे प्रतिबिंब दिसू लागले आहे. वितरण, विपणन पद्धतीतही बदल होत आहेत. या गोष्टींमुळे फरक पडला आणि त्यात सातत्य राहिले, तरच हिंदी सिनेमांचे जुने दिवस परत येतील. मराठी सिनेमा कुठं आहे..?या सगळ्याच्या तुलनेत मराठी सिनेमा कुठे दिसतो, याचे उत्तर निराशाजनक आहे. त्याच त्या साचेबद्ध कथा, त्यातील त्याच बंदिस्त व्यक्तिरेखा, त्या साकारणारे तेच ते चेहरे, प्रयोगशीलतेचे दुर्भिक्ष्य आणि कमालीचे कल्पनादारिद्र्य असलेले सादरीकरण! अशा पठडीबद्ध सिनेमांकडे मराठी प्रेक्षकही हल्ली फारसा वळत नाही, तिथे तो अन्य भाषांमध्ये जावून कमाईचा विक्रम वगैरे करेल, ही कल्पनाही कुणी करणार नाही. त्यातही एखाद्याने वेगळा प्रयोग करत, नव्या दमाच्या लोकांना घेऊन, कसदार आशयाचा सिनेमा काढला तर त्यालाही यश मिळत नाही, कारण त्याची काहीच पब्लिसिटी झालेली नसते. त्याला किमान पन्नास स्क्रीनही मिळत नाहीत, हेही वास्तव आहे. ही सगळी विलक्षण साचलेपणाची, उदासीनतेची लक्षणे आहेत. शंभर वर्षांहून मोठा वारसा असलेल्या मराठी सिनेमाच्या परिघात शंभर कोटीची कमाई करणारा ‘सैराट’चा एकच सुवर्णबिंदू आहे. अलीकडे तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कल्याण - डोंबिवली इतकेच मराठी सिनेमाचे क्षेत्र उरलेय की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. ग्रामीण तसेच निमशहरी नागरजीवनाचे फारसे प्रतिनिधित्व तो करत नाही. मग त्या भागातील लोक मराठी सिनेमावर फुली मारत असतील, तर त्यात त्यांचा दोष नाही. विजय सेथूपती अभिनित ‘महाराजा’ हा मल्याळी सिनेमा चिनी भाषेत डब होऊन चार हजार स्क्रीनवर रिलीज होतो आणि मराठी सिनेमा आपल्याच राज्यात स्क्रीन्स मिळत नाहीत म्हणून रडत राहतो. असे का होतेय, याचे उत्तर शोधताना केवळ प्रेक्षकांच्या माथ्यावर खापर फोडून मोकळे होता येणार नाही. त्यासाठी मराठी सिनेक्षेत्राने कठोर आत्मपरीक्षण करुन स्वत:ला मुळापासून बदलले पाहिजे. अन्यथा, ऱ्हास अटळ आहे! ‘पुष्पा’ हा खूप दर्जेदार सिनेमा आहे, असा याचा मुळीच अर्थ नाही. उलट तो एक टिपिकल भडक, बटबटीत नि काहीसा ओंगळवाणा सिनेमा आहे, असे म्हणता येईल. तथापि, उत्तम कथा, बांधीव पटकथा, भिडणारा आशय, कसदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमूल्ये, अफलातून लोकेशन्स आणि चोख मार्केटिंग या गोष्टींच्या बळावर एकूणच दाक्षिणात्य सिनेमांचा यशोरथ वेगाने धावतोय. त्याला आवर घालण्याची चर्चा करण्याऐवजी हिंदी आणि मराठी सिनेमांनीही तशी धाव घेण्याची तयारी केली पाहिजे. त्यासाठी ‘पुष्पा’च्या आडून येणाऱ्या हाका सावधपणे ऐकल्या पाहिजेत! संपर्कः sameerbapu@gmail.com
रसिक स्पेशल:जगण्यासाठी आता ‘वाचलं’ही पाहिजे!
सोशल मीडियाच्या या प्रभावकाळात भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न अधिक गडद होत आहेत. भौतिक सुविधांनी घरे संपन्न होत असताना कुटुंबात, नात्यात, त्यात गुंतलेल्या मनांमध्ये मात्र रितेपणा येतो आहे. हा विरोधाभास दूर सारत आयुष्य सकस बनवण्यासाठी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. पुणे पुस्तक महोत्सवाने त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या यशानंतर राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे दुसरा, अधिक मोठा आणि दिमाखदार महोत्सव १४ ते २२ डिसेंबरदरम्यान होत आहे. त्याची सुरूवात ११ डिसेंबरला शांतता... पुणेकर वाचत आहेत!’ या अनोख्या उपक्रमाने झाली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक प्रकाशन संस्था आणि विक्रेत्यांची दालने साहित्याचा अनमोल खजिना वाचकांपुढे खुला करणार आहेत. मराठीला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठीजनांनी दहा वर्षे केलेल्या पाठपुराव्याची ही फलश्रुती आहे. त्या पार्श्वभूमीवर या पुस्तक महोत्सवाला अधिक उस्फूर्त प्रतिसाद लाभेल. या महोत्सवात मराठीबरोबरच देशातील अन्य भाषांची तसेच विदेशी भाषांतील विपुल पुस्तके अनुवादित स्वरूपात उपलब्ध असतील. देश-विदेशात जसे दरवर्षी चित्रपट महोत्सव होतात, नाट्य आणि संगीत महोत्सवांचे आयोजन होते, तसे पुस्तक महोत्सव भरवले जात नाहीत. ही उणीव पुणे पुस्तक महोत्सवाने यशस्वीपणे भरून काढली आहे. एेतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गणेशोत्सव, सवाई गंधर्व संगीत महोत्सव आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आदी सांस्कृतिक सोहळे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचे नेहमीच आकर्षण असते. त्यात आता ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चाही समावेश होईल. हा महोत्सव आणि पुणेकरांच्या पुस्तक वाचनासारख्या उपक्रमामुळे भविष्यात पुण्याला ‘पुस्तकप्रेमींचे शहर’ अशी ओळखही लाभेल. बदलत्या काळात वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी अशा प्रकारच्या पुस्तक महोत्सवांना वेगळे महत्त्व आले आहे. टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटच्या या जमान्यात माणसांना बघे बनवणाऱ्या समाजमाध्यमांचा पूर आला असताना वाचन संस्कृती कशी टिकवायची आणि न वाचणाऱ्यांना वाचनाकडे कसे वळवायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी विविध उपाय करावे लागतील. सांस्कृतिक कार्यक्रम आणि लेखक -वाचक भेटींसह आयोजित होणारे असे भव्य पुस्तक महोत्सव हा त्यापैकी एक प्रभावी उपाय ठरू शकतात. प्रत्येक साक्षर आणि सुशिक्षित माणसाने सुसंस्कृत, बहुश्रुत बनून देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी उत्तम वाचक तरी झालेच पाहिजे. त्यासाठी दररोज शक्य होईल तितके वाचन केले पाहिजे. कारण पुस्तके माणसांना जे ज्ञान, जी दृष्टी देतात, ती चित्रपट, नाटक वा संगीतातून मिळेलच असे नाही. पुस्तक वाचन म्हणजे लेखक ललित साहित्यातून जे जीवनविश्व उलगडतो किंवा ललितेतर साहित्यातून जे वैचारिक ज्ञान देतो, त्याच्याशी आपले अनुभव आणि ज्ञान पडताळत वाचक आपल्या मनात त्याचे प्रतिरुप उमटवतात. अशा स्थितीत वाचक हा लेखकस्वरूप होतो आणि पुस्तक हे या एकात्म अनुभूतीचे साधन ठरते. ही आदर्श वाचन प्रक्रिया आहे, ती पुस्तकांच्या वाचनातूनच आत्मसात करता येते. त्यासाठी प्रत्येक मुलावर आईवडिलांनी किंवा शाळेने जाणीवपूर्वक आणि मुलांची जिज्ञासा जागृत करीत वाचन संस्कार करावे लागतात. पुढच्या आयुष्यात अशी वाचन संस्कारित पिढी केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर सुजाण, सजग आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून देशाचाही आधार होऊ शकते. आता अभिजात दर्जा लाभलेली मराठी पुढील काळात तरुणाईसाठी जगातील नवे ज्ञान – तंत्रज्ञान शिकवणारी आणि रोजगार देणारी भाषा झाली पाहिजे, तरच ती इंग्रजीच्या तोडीची समर्थ भाषा होईल. पण, त्यासाठीची पहिली अट मात्र वाचन हीच आहे. त्यामुळे अशा पुस्तक महोत्सवांच्या उद्देशामध्ये, मराठी आणि अन्य अभिजात भाषांच्या साहित्याचे स्वतंत्र दालन असण्याला व तिचे सांस्कृतिक कार्यक्रमातून दर्शन घडवण्यालाही स्थान असले पाहिजे. आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा महत्त्वाच्या ज्ञानशाखांची आणि संविधान व कायदा, महापुरुषांची व त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके अशी वैचारिक तसेच माहितीपर पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होतील, याकडेही आयोजकांनी लक्ष द्यायला हवे. वाचन संस्कृतीद्वारे बहुश्रुत, विज्ञाननिष्ठ आणि देशप्रेमी नागरिक घडवण्याचे काम मुख्यत: सरकारचे आहे. ‘गाव तिथे वाचनालय’ या ध्येयापासून अजूनही महाराष्ट्रातील सुमारे तीस हजार गावे वंचित आहेत. शिवाय, शालेय ग्रंथालयांना नियमितपणे नवी पुस्तके पुरवली जात नाहीत. अनेक शाळांमध्ये ग्रंथपालांची पदे रिक्त आहेत, त्यांच्या सन्मानजनक वेतानाचा प्रश्नही प्रलंबित आहे. खरे तर हा सरकारी तिजोरीवरचा खर्च नव्हे, तर ही मानव विकासासाठीची आणि उद्याचा समाज व देश घडवण्यासाठीची गुंतवणूक आहे. त्यासाठी सरकारने आणि प्रागतिक समाज म्हणून आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. पुण्यातून गावोगावी पोहोचावी वाचनसंस्कृतीची ज्ञानगंगा... सार्वजनिक आणि शालेय ग्रंथालये ही वाचन संस्कृती वाढवण्याची महत्त्वाची माध्यमे आहेत. ती अधिक परिपूर्ण आणि पुस्तकांनी संपन्न होऊन त्या गावात, तिथल्या शाळांमध्ये वाचन संस्कृती अधिक विकसित होण्यासाठीही ‘पुणे पुस्तक महोत्सव’ मोठे योगदान देऊ शकतो. त्यासाठी महोत्सवाच्या आयोजकांनी या काही पुढाकारांबाबत विचार करावा... - विविध शहरांत पुस्तक महोत्सव आणि वाचन उपक्रम घेण्यासाठी स्थानिक संस्थांना मार्गदर्शन करणे. - सार्वजनिक वाचनालयांचे तसेच शालेय ग्रंथपाल आणि भाषा शिक्षक यांच्यासाठी वाचन प्रशिक्षण कार्यशाळा घेणे. - विद्यार्थी आणि सामान्य वाचकांवर वाचन संस्कार करण्याविषयी मार्गदर्शन करणे. - राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धा आयोजित करणे. - आठवड्यात किमान एक पुस्तक वाचणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना बक्षिसे देणे. - विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवण्यासाठी अशाच स्पर्धा शिक्षकांसाठीही घेणे. (संपर्कः laxmikant05@yahoo.co.in)
माझ्या हिश्श्याचे किस्से:राज कपूर यांच्या खास सोफ्याची कहाणी
तीन दिवसांपूर्वी, म्हणजे गुरुवारी नीतू कपूरजींशी माझे बोलणे झाले, तेव्हा त्यांनी सांगितले की, १४ डिसेंबरला राज कपूर साहेबांची शंभरावी जयंती आहे. त्या निमित्ताने पीव्हीआरमध्ये एक रेड कार्पेट इव्हेन्ट होणार आहे. त्यावेळी राज साहेबांचे निवडक सिनेमेही दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाला सहकुटुंब येण्याचे आमंत्रण नीतूजींनी मला दिले. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये हिंदी चित्रसृष्टीतील महान व्यक्तित्व ठरलेल्या राज कपूर साहेबांविषयी... हा योगायोग होता की, नीतूजींच्या फोननंतर लगेच मला एका पत्रकाराचा फोन आला. ‘तुम्ही आर. के. प्रॉडक्शनचे शेवटचे लेखक होतात,’ अशी त्यांनी मला आठवण करुन दिली. त्यावर मी त्यांना सांगितले की, मला लानपणापासूनच सिनेमे पाहण्याची आवड होती. विशेषत: मी जेव्हा आर. के. प्रॉडक्शनचे सिनेमे बघायचो, तेव्हा सिनेमाच्या सुरूवातीला पापाजी म्हणजे पृथ्वीराज कपूर शिवलिंगाच्या समोर बसून पूजा करत असल्याचे दिसायचे. त्यानंतरच टायटल सुरू व्हायचे. त्यामध्ये सिनेमाशी संबंधित सगळ्या लोकांची म्हणजे दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक आदींची नावे यायची. जेव्हा जेव्हा मी ते दृश्य बघायचो तेव्हा वाटायचे की, यात आपलेही नाव असते तर..? आणि बघा, ईश्वराने माझी मनोकामना ऐकली आणि माझे हे स्वप्न साकार झाले. पण, दु:ख याच गोष्टीचे वाटतेय की, माझी इच्छा पूर्ण तर झाली, पण ती राज कपूर साहेबांच्या निधनानंतर. ते गेल्यानंतर मी आर. के. प्रॉडक्शनसाठी काम केले. या गोष्टीवरुन मला मिर्झा गालिब यांचा एक शेर आठवतोय... हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले। तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी डब्बूजी म्हणजे रणधीर कपूर यांनी मला सांगितले की, आमचा देवनारमधील बंगला विकला आहे. काही दिवसांतच तो पाडला जाईल आणि तिथे एक नवी इमारत उभी राहील. मी डब्बूजींना सांगितले की तो पाडण्याआधी तुम्ही तिथे एक डिनर ठेवायला हवे. त्यांनी माझे म्हणणे ऐकले आणि मग त्या घरी डिनरचे आयोजन केले. आम्ही सगळे जण तिथे गेलो. बोनी कपूर, शत्रुजी, पूनमजी, अंजू महेंद्रू, शशी रंजन, अनू रंजन यांच्यासह बरेच लोक होते. जावेद अख्तर साहेबही आले होते. आम्ही साऱ्यांनी तिथे एक संस्मरणीय संध्याकाळ अनुभवली. प्रत्येकाच्या मनात हिच भावना होती की, आपण या बंगल्याला शेवटचे बघतो आहोत, आता तो पुन्हा दिसणार नाही. मी नंतर घरी आलो आणि झोपून गेलो. सकाळी उठल्यावरही माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की, आता ते घर पुन्हा पाहायला मिळणार नाही. मग माझ्या मनात काय विचार आला माहीत नाही. मी डब्बूजींना फोन केला आणि म्हणालो की, हा बंगला पाडला जाण्याआधी मला तिथली राज कपूर साहेबांची एखादी वस्तू हवी आहे. कपूर परिवार मनाने किती मोठा आहे, हे सगळ्या जगाला माहीत आहे. ते मला लगेच म्हणाले, बंगल्यावर जा आणि जे पाहिजे ते घेऊन ये. मग मी माझ्या मुलाला- साहिलला घेऊन त्या बंगल्यावर पोहोचलो. त्या बंगल्याकडे मन भरून पाहून घेतलं. मी मुलाला म्हणालो, तू खूप नशीबवान आहेस, तुला हा बंगला पाहायला मिळाला. मग मी प्रत्येक ठिकाणचे; बंगल्यातील ड्रॉइंग रूम, राज कपूर – कृष्णा आंटींची बेडरूम, त्यांची मसाज चेअर, तिथले लॉन अशा अनेक गोष्टींचे फोटो काढले, व्हिडिओ बनवले. त्याचवेळी मनात हा विचारही येत होता की, राज कपूर साहेबांची कोणती वस्तू आठवण म्हणून आपण सोबत न्यावी? पहिल्यांदा मी विचार केला की, त्यांचा बेड आणि ड्रेसिंग टेबल घ्यावा. पण, ते आकाराने खूप मोठे होते. आमचा फ्लॅट छोटा असल्याने त्यात एवढा मोठा बेड ठेवता आला नसता. मग विचार केला, पेंटिंग घेऊन जावे. ते फ्लॅटमध्ये लावता येईल. परंतु, मनात दुसरा विचार आला की, पेंटिंग तर लाखो-करोडोंचे असेल. डब्बूजींना वाटेल, याने दिलेल्या शब्दाचा गैरफायदा घेतला, लाखो रुपयांचे पेंटिंग घेऊन गेला. मी व्हरांड्यात गेलो. तेथे झोक्याच्या जवळ एक सोफा ठेवलेला होता. डब्बूजींनी मला कधीतरी सांगितले होते की, राज कपूर साहेबांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची कामे याच सोफ्यावर बसून केली होती. मेरा नाम जोकर, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम या सिनेमांच्या मीटिंग याच सोफ्यावर बसून केल्या होत्या. काही सिनेमांच्या लेखनाच्या बैठकाही त्यांनी याच सोफ्यावरुन केल्या होत्या. त्यामुळे आपण हा सोफाच घ्यावा, आपण यावर लिखाणासाठी बसू तेव्हा त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील, असे मला वाटले. म्हणून मग त्यांचा आशीर्वाद आणि आठवण म्हणून मी तो सोफा फ्लॅटवर घेऊन आलो. हा सोफा आजही माझ्या घरी ठेवलेला आहे. तो माझ्या मित्रपरिवारातही प्रसिद्ध आहे. आमच्याकडे येणारे अनेक जण, ‘हा सोफा कुठे तरी पाहिल्यासारखा वाटतोय,’ असे म्हणतात, तेव्हा मी त्यांना हा राज कपूर साहेबांचा सोफा असल्याचे सांगतो. राज कपूर साहेब बंगल्यात ज्यावर बसलेले असायचे, तो हाच सोफा आहे ना? असे त्यातील काही जण विचारतात. मग मी त्यांना, ‘हो, हा तोच सोफा आहे,’ असे सांगतो. राज कपूर प्रॉडक्शनच्या सिनेमात आपले नाव येते आणि त्यांचा सोफा आपल्या घरी आहे, या जाणिवेने मला आपण खूप भाग्यवान आहोत, असे वाटत राहते. राज कपूर साहेबांच्या स्मृतींमध्ये आज त्यांच्या ‘श्री ४२०’मधील हे गाणे ऐका... प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
कुत्रे भुंकू लागल्याने सदा पुढं पळून गेला होता. पोलिसाला ते बिलकुल आवडलं नाही. आपल्या बिझनेस पार्टनरने संकटात टाकून पळून जाणं कुणाला आवडेल? गावाचं बस स्थानक. दिवसभरात तीन - चारच बस, त्यामुळं प्रत्येक गाडीला गर्दी. त्यात ही रात्री शेवटची बस. बस आली आणि पंधरा - वीस लोक दाराच्या दिशेनं निघाले. प्रत्येक जण दुसऱ्याला लोटून पुढं जाण्याच्या प्रयत्नात. जागा मिळवण्यासाठी धडपड. त्याच गर्दीत मनोज होता. तो तसा शहरात राहणारा. पण, व्यवसायामुळं फिरस्तीवर असणारा. त्याचा विम्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. व्यवसायामुळं राहतो एकदम टापटीप. तो सदाच्या नजरेत भरला. पाकीटमार सदा आपलं सावज हेरण्यात पटाईत. मनोज गर्दीत जरा मागे पडला. शेवटी बसमध्ये शिरू लागला. तेवढ्यात सदाने डाव साधला.पाकीट मारून माघारी फिरला. पण, शेजारी असलेल्या एकाने बघितलंच. तो ओरडू लागला.. पाकीट मारलं.. पाकीट मारलं.. सगळे बघू लागले. पण, ते ऐकून सदाने धूम ठोकली. मनोजला लक्षात आलं, आपलंच पाकीट मारलं गेलंय. तो पण पळू लागला. पण, तेवढ्यात एक पोलिस आला. तो मनोजला म्हणाला, ‘मी पकडतो चोराला..’ पोलिस सदाच्या मागं पळू लागला. तसाही सदा दिसेनासा झाला होता. शेवटची बस सोडून चालणार नव्हतं. मनोज निराश होऊन गाडीत बसला. आसपास बसलेल्या सगळ्यांना त्याची दया आली. एक - दोघांनी त्याचं तिकीट काढायची तयारी दाखवली. पण, मनोजच्या खिशात तेवढे पैसे होते. हळूहळू लोक पाकीट चोरल्याचे जुने किस्से सांगू लागले. त्यातून मनोजला लक्षात आलं की, या बसस्थानकात चोरीला गेलेलं पाकीट कधीच परत मिळालं नाही. बिचारा तोंड लटकवून बसला. पोलिस सदाच्या मागे धावत होता, ओरडत होता. पण, सदा वेगात पळत होता. मागं वळून बघतही नव्हता. रात्रीची वेळ. त्यात निर्जन पायवाट. अचानक कुत्रे भुंकू लागले. पोलिस घाबरून थांबला. कुत्रे पण एवढे दीड शहाणे.. चोर सोडून पोलिसाला भुंकत होते. पोलिस खूप वेळ शांत उभा राहिला. कुत्रे शांत झाले. तसा पोलिस पुन्हा वेगात निघाला. हळूहळू वेग वाढवत तो एका ठिकाणी पोचला. छोटी चहाची टपरी होती. अर्थात बंदच होती. पण, ठरल्याप्रमाणं सदा तिथं लपून बसला होता. पोलिसाची आणि त्याची मिलीभगत होती. चुकून पाकीट मारताना सदा सापडला, तर पोलिस त्याचा पाठलाग करायचा. मध्ये पडायचा. त्यामुळं गेल्या दोन वर्षांत सदाला जेलची हवा खायची वेळ आली नव्हती. त्या बदल्यात सदाने पोलिसाला अर्धी कमाई द्यायची ठरलेलं होतं. आता पोलिस पोचला. पण, संतापला होता. कारण आवाज देऊनही सदा थांबला नव्हता. फार धोका नसेल, तर पोलिस आवाज देणार आणि सदाने थांबायचं, हे ठरलेलं होतं. कारण उगाच एवढी धावपळ पोलिसाला मानवत नव्हती. बरं बाइक असून ती वापरता यायची नाही. कारण अशावेळी ज्याचं पाकीट चोरीला जायचं, तो बाइकवर बसून सोबत यायचा हट्टच धरायचा. म्हणून मोठ्या नाईलाजाने पोलिस धावतच सदाचा पाठलाग करायचा. त्यात आज ज्याचं पाकीट मारलंय, तो शेवटची बस असल्यानं निघून गेला होता. तरीही सदा उगाच पळत राहिला, याचा पोलिसाला राग आला होता. दमला होता बिचारा. सदाला हे माहीत होतं. त्यानं दोन मिनिट शिव्या खाऊन घेतल्या. पण, कुत्रे भुंकू लागल्याने तो पुढं पळून गेला होता. पोलिसाला ते काही पटलं नाही. आवडलं तर बिलकुल नाही. आपल्या बिझनेस पार्टनरने आपल्याला संकटात टाकून पळून जाणं कुणाला आवडेल? पण, रात्र खूप झाली होती. बाइक तिथंच टपरीपाशी होती. घरी जायची वेळ झाली होती. पोलिसाने आपला हिस्सा मागितला. सदाने पाकीट काढलं. त्या अंधारातही दोघांना दिसत होत की पाकिटात एकही रुपया नाही. दोघेही अवाक् झाले. पोलिस तर भडकला. आता त्याच्या मनात वेगळीच शंका आली. सदा आपण आवाज देत असतानाही का थांबला नाही, हे त्याच्या लक्षात आलं. सदाने नक्कीच काही तरी घोळ घातलेला होता. खूप वेळ बाचाबाची झाली. पोलिस खूप शिव्या देतोय, हे बघून सदाने त्याला एक जोरदार शिवी हासडली. म्हणाला, ‘खरा पोलिस असल्यासारखा माज करू नको!’ अरे हो, हा पोलिस खराखुरा पोलिस नव्हता. खाकी कपडे घालून फिरणारा तोतया होता. सदा आणि पोलिस दोघांनी खूप डोकं लावून ही पद्धत वापरायला सुरूवात केली होती. पोलिसाने आता नमते घेत पुन्हा शेवटची आशा म्हणून पाकीट चाचपून पाहिलं. पण, त्यात प्लॅस्टिकच्या छोट्या पाकिटात असलेली एक गणपतीची प्रतिमा होती. देवाचा फोटो बघून पोलिसाच्या डोक्यात वेगळाच विचार आला. कधी तरी पाकीट परत केलं, तर लोकांचा विश्वास बसेल.. खरं तर एखाद्या बस स्थानकात ते दोघे महिना - पंधरा दिवसापेक्षा जास्त थांबायचे नाहीत. तरी पोलिसाने बाइक काढली. बस जायची तो रस्ता गाठला. बस थांबवून पाकीट परत केलं. प्रवाशांना हा अनुभव नवीन होता. मनोजच्या डोळ्यात तर पाणी आलं. पोलिसाने पाकीट चेक करायला सांगितलं. कंडक्टरने बसमधले दिवे लावले. मनोजने पाकीट बघितलं. गणपतीची प्रतिमा.. तिचं दर्शन घेतलं. म्हणाला, ‘पैसे नव्हतेच. ही मूर्ती महत्त्वाची.’ पोलिस म्हणाला, ‘एवढं मानता गणपतीला?’ मनोज म्हणाला, ‘सोन्याचा आहे हा साहेब, म्हणून जीव जळत होता..’ प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर डोकावणारी गणपतीची प्रतिमा खरोखर सोन्याची होती. लोक नेहमी पाकिटात ठेवतात तसा पाच - दहा रुपयाचा गणपती समजून पोलिस आणि सदाने मोठी चूक केली होती. पण, मनोज खुश होता. त्यानं पोलिसाला आग्रह करून सेल्फी काढली. एवढी प्रामाणिक माणसं कुठं भेटतात आजकाल? खरी गडबड दुसऱ्या दिवशी झाली. तो फोटो मनोजने फेसबुकवर टाकला. प्रामाणिक पोलिस भेटला, अशी छान कौतुकाची पोस्ट लिहिली. पण, तिथंच घोळ झाला. हा पोलिस कोण? म्हणून खात्यात विचारणा सुरू झाली. आपल्या प्रामाणिक सहकारी पोलिसाबद्दल आपल्याला माहिती नाही, हे पोलिसांना खटकलं. त्यांनी त्याचा कसून शोध घेतला. आणि कौतुकानं फोटो काढायला तयार झालेला पोलिस जेलमध्ये गेला. सदा आता नव्या, डमी पोलिसाच्या शोधात आहे.. जो प्रामाणिक नसेल अशा... (संपर्कः jarvindas30@gmail.com)
राज्य आहे लोकांचे...:‘कल्ट पॉलिटिक्स’ आणि नवी सरंजामशाही
जो साम, दाम, दंड, भेद वापरत बाहुबली बनत जातो अशा एखाद्या नेत्याभोवती राजकारण फिरत राहणे म्हणजे ‘कल्ट पॉलिटिक्स’. एखाद्या सर्वसामान्य माणसालाही लोकप्रतिनिधित्वाची संधी देणारी लोकशाही व्यवस्था ही नेत्यांना वलय देऊन असे ‘कल्ट पॉलिटिक्स’ निर्माण करण्यासाठी कधीच नव्हती. राजकारणाच्या या प्रकारात एखाद्या नेत्याला एवढी टोकाची लोकप्रियता मिळत जाते की त्याने काहीही केले, कसेही वागले तरी लोकांना ते भारीच वाटते आणि ‘साहेबांनी केलं म्हणजे योग्यच असलं पाहिजे,’ अशी मतिभ्रष्ट करणारी सामूहिक मानसिकता बनत जाते. पूर्वी असा बाहुबली नेता बनण्यासाठी चार - पाच वेळा निवडून यावे लागायचे. आता ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्यालाही आपण खूप विशेष आहोत आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळी वागणूक मिळायला हवी, असे वाटते. लोकप्रतिनिधींना मान दिलाही पाहिजे; पण अतिनम्रता हे जसे भयाचे लक्षण मानले जाते, तसे आता या अतिसन्मानाचे रुपांतर भीती आणि लाचारीत होऊन बसले आहे. परिणामी आपण लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचे आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करुन देण्याचे धैर्य गमावून बसलो आहोत. त्यामुळे लोकशाही सुधारायची असेल आणि लोकप्रतिनिधींनी लोकहिताची कामे करावी, असे वाटत असेल तर आधी त्यांच्या भोवतीचे वलय संपवायला हवे. आजही आपल्याकडे अशी कित्येक गावे आहेत ज्यांना जोडणारा रस्ता नाही. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यापासून आरोग्यापर्यंतचे अनेक प्रश्न कायम आहेत. पण, अशा गावात लोकप्रतिनिधी वा कुठलाही नेता येणार असेल, तर त्याच्यावर जेसीबीने फुले उधळली जातात. एखादे विकासकाम झाले, तरी त्याचा असा काही गवगवा किंवा कौतुक केले जाते की, जणू अत्यंत अशक्यप्राय गोष्टच या लोकप्रतिनिधीने साध्य करून अवघ्या गावावर उपकार केले आहेत. वास्तविक अशी कामे त्यांनी करणे अपेक्षितच आहे, त्यात अजिबात वेगळे काही नाही. स्वखुशीने लोकसेवेचे क्षेत्र निवडल्यावर त्यासाठी रोज सत्कार होणे आणि सदैव विशेष व्यक्ती म्हणून खास वागणूक मिळणे अपेक्षित नसते. पण, आपणच नेत्यांविषयीची साहेबी धारणा सोडायला तयार नाही. त्यामुळेच अभिनंदनाचे फ्लेक्स, वाढदिवस शुभेच्छांच्या होर्डिंगनी गावे आणि शहरे बकाल बनत चालली आहेत.‘फोमो’ म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट ही मानसिकता सर्वसामान्य लोकांनी समजून घेतली पाहिजे. आपण नेत्यांचे गुणगान केले नाही तर आपले काही खरे नाही, या ‘फोमो’तून बाहेर येत लोकप्रतिनिधी नेमके कशासाठी असतात, या गोष्टीला आपण प्राधान्य दिले तर त्यांना वाढदिवसाला पुष्पगुच्छ देण्याच्या धन्यतेतून आपली सुटका होईल. आपल्याकडे ‘पॉलिटिकल नार्सिसिझम’च्या (राजकीय आत्मप्रौढी) प्रभावाने इतका नीचांक गाठला आहे की, अनेक लोक आपल्या वाढदिवशी स्वत:च पुष्पगुच्छ, केक आणून नेत्यांना स्वतःला शुभेच्छा देण्यास भाग पाडू लागले आहेत! या आधीही राजकारणातील ‘व्हीआयपी’ संस्कृती संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मंत्री आणि पालकमंत्र्यांना सलामी देण्यासाठी पोलिस तासन् तास ताटकळत उभे राहायचे. कायदा आणि सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न असताना पोलिस यंत्रणा ‘व्हीआयपीं’च्या सुरक्षेत गुंतून राहायची. अर्थात, काही खरोखर अतिमहत्त्वाच्या असलेल्या नेत्यांना सुरक्षा आवश्यक असते, यात शंकाच नाही. पण, अनेकदा नेत्यांच्या निकटवर्तीयांना उगाचच राज्यमंत्रिपदाचा वगैरे दर्जा देऊन त्यांना सुरक्षा प्रदान करत या व्हीआयपी संस्कृतीला खतपाणी घातले जाते. लोकांनाही अशा कडेकोट बंदोबस्तातील नेता आपल्या घरीदारी येण्याचे कोण कौतुक वाटते! पण, त्यामुळे आपली पावले पुन्हा उलट दिशेने सरंजामशाहीकडे निघाली आहेत, याचे कुणालाही भान राहत नाही. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाहीचे पर्व सुरू झाले. आपण राज्यघटना स्वीकारली त्या घटनेला पंचाहत्तर वर्षे होऊनही लोक मात्र राजेशाहीतील मानसिकतेतून बाहेर यायला तयार नाहीत. त्यामुळे पूर्वी सुभेदार - सामंतांना जशी वतने होती तशी विधानसभा, लोकसभेची नवी वतने निर्माण झाली. नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी कर्तव्ये बाजूला ठेवत स्वतःच्या आणि कुटुंबकबिल्याच्या भल्याकडे लक्ष दिले. काहींनी त्यात थोडा बदल केला. बारशापासून ते बाराव्यापर्यंतच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, लोकांच्या व्यक्तिगत गरजा भागवणे, आर्थिक मदत देणे असे निवडणुका जिंकण्याचे नवे प्रारूप त्यांनी विकसित केले. ते यशस्वी होत गेले तसे विकासाचे मूळ मुद्दे बाजूला पडले आणि नेत्यांचे वलय मात्र वाढत गेले. आता किमान भविष्यात तरी राजकीय नेते, लोकप्रतिनिधींच्या भोवती निर्माण केलेले मोठेपणाचे हे अनावश्यक वलय बाजूला सारुन त्यांना खऱ्या कर्तव्यांची जाणीव करून दिली पाहिजे. तसे झाले तरच नव्या सरंजामशाहीकडे निघालेला आपला देश आणि समाज पुन्हा खऱ्या ‘लोक’शाहीकडे वळेल. (संपर्कः dramolaannadate@gmail.com)
कबीररंग:इस घट अंतर सात समुंदर, इसी में नौ लख तारा...
कबीरांची भक्ती ईश्वराप्रति परम प्रेमरूपा आहे. या भक्तीचं स्वरूप आपण कसं समजून घेऊ शकतो? भक्तीची व्याख्या करून की भक्तीची परिभाषा जाणून घेऊन, असे प्रश्न सहज मनात येतात. काही गोष्टी अशा असतात की, त्या गोष्टींचा अनुभव आल्यावर केवळ त्यांचं वर्णन केलं जाऊ शकतं. त्या विषयी थोडं सूत्रातून सांगता येतं. पण, हे सर्व आपण चाखलेल्या एखाद्या पदार्थाच्या स्वादासारखं आहे. या स्वादाचं वर्णन ज्यांच्याकडं लवचिक धारणाशक्ती आहे, समजून घेण्याचं साधं कुतूहल आहे, उत्साह आहे आणि खरी तळमळ आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतं. कबीर आपल्या परमप्रेम रूप असण्याच्या स्थितीचा अनुभव सर्वपरिचित प्रतिकांतून आपल्याला असाच घडवतात. आपण भक्तिमय व्हावं, यासाठी केलेला त्यांचा हा प्रेमळ प्रयास आहे. या संदर्भातील एका पदात कबीर म्हणतात... इस घट अंतर बाग-बगीचे, इसी में सिरजनहारा। आपल्याला लाभलेला देह, हे मन आणि ही विचार-विवेकाची बुद्धी म्हणजेच आपला सकल नरदेह होय. नरदेहाच्या ठायी असलेलं जगण्याचं शहाणपण ही खूप मोठी गोष्ट आहे. ते शहाणपण कुठं बाहेर नाही. बाहेरच्या सृष्टीचा बोधही अंतरातच होतो; पण आपण मात्र सुख, दुःख, आनंद आणि मुक्तीचा बोध बाहेर असल्याचं जन्मभर मानत राहतो. इंद्रियांसोबत राहून बाहेरच्या जगात आतल्या सुखाचा शोध घेत राहतो. ही क्रिया उफराटी आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही आणि आपण त्याचे परिणाम भोगत राहतो. कबीरांच्या दृष्टीने, आपल्याला लाभलेला नरदेहाचा घट हाच बोधप्राप्तीचं उत्तम साधन आहे. हे आपल्या हृदयात उतरवण्यासाठीच कबीरांचं हे पद आहे, या पदांतील प्रतीकं आहेत. कबीर म्हणतात, जीवनसाधकाच्या या देहघटातच हे आनंद-सुखाचे फुलबाग आहेत. त्या बागेची लावणी, निगराणी, त्याला बागपण देणारा माळीसुद्धा याच घटात आहे. तो आपल्या देह, मन आणि बुद्धीचा सिरजनहारा म्हणजे सृजनात्मा आहे. आणखी काही प्रतिकांतून या विधात्याकडून लाभलेल्या देहघटाचं मोल अधोरेखित करताना कबीर म्हणतात... इस घट अंतर सात समुंदर, इसी में नौ लख तारा। इस घट अंतर पारस मोती, इसी में परखनहारा।। याचा अर्थ असा की, सात समुद्र, नऊ लाख तारे याच देहाच्या आत असलेल्या अंतरीच्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. इथं सात आणि नऊ लाख असं या सृष्टीचं संख्यात्मक दर्शन आपण करून घ्यायचं का? तर हे कबीरांना अपेक्षित नसावं. दृश्यकेंद्र आतच तर आहे! ते निसर्गदत्त सृष्टीचं आणि आपल्या आतल्या सृष्टीचं एकाच वेळी पूर्ण दर्शन करून देऊ शकतं. आपणच विश्व आहोत, हे अद्वैत आत्मानुभूतीतून किती सहजपणे कबीर येथे सांगतात! परीस म्हणजे आपलं हृदय परिवर्तन करणाऱ्या गुरुचा स्पर्श असू शकतो. डोळ्यांतले आनंदाचे अश्रू मोती असतात. मोत्यांचं शुद्धपण पारखणारा रत्नपारखी बाहेर कुठं नाही, तर तो आपल्या अंतरातच आहे, असं कबीर म्हणतात. नरदेहातला अंतरात्मा एक आहे आणि तो दृश्यात नाही, तर तो असा सदासर्वकाळ आपल्या अंतरीच आहे. कबीर म्हणतात की, या अद्भूत देहघटाला चेतनेचं अधिष्ठान आहे, हे असलं घटाचं साधन पशुदेहात नाही. केवळ माणसाकडंच बोधप्राप्तीसाठीचं अवकाश आणि अवसर आहे. यमयातनेचे अरिष्ट चुकवण्यासाठीची युक्ती केवळ माणसाकडं आहे आणि हा अवघा देहघट अंतःकरणाच्या स्वाधीन आहे. इस घट अंतर अनहद गरजै, इसी में उठत फुहारा। कहत कबीर सुनो भाई साधो, इसी में साईं हमारा।। हा देहघटच प्रकट - अप्रकट जगाचा आधार आहे. त्याच्या ठायी दृश्य आणि ते पाहणाऱ्या द्रष्ट्याला जाणून घेऊ शकणारी चेतना आहे. ही चेतना प्राण्यांजवळ नाही. ते या घटातच असण्याशी जोडलेलं स्फुरण - केंद्र आहे. नवनवीन कल्पना सुचण्याचं! त्या नीटपणे व्यक्त करण्याची कला साधकाच्या अंतरात आहे. कबीर म्हणतात, तो सृष्टीचा निर्माता, समग्र सृष्टीचा अनुभवक आणि आत - बाहेरचा भेद नसलेल्या सृष्टीचा स्वामी नरदेहाच्या घटातच आहे. या सान्त घटातच अनंत आकाश सामावलेलं आहे. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)
रसिक स्पेशल:फिनफ्लुएन्सर्सचे मायाजाल
‘सेबी’ने अलीकडेच ‘बाप ऑफ चार्ट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘फिनफ्लुएन्सर’ला कथित बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेले १७ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिले. शिवाय, बेकायदा कृत्यासाठी दंड का करू नये? अशी नोटीसही दिली. या घटनेने शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांच्या विश्वात खळबळ तर उडालीच; पण ‘फिनफ्लुएन्सर’ची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. कोरोना महामारीनंतर आपल्या जगण्याशी आणि रोजच्या व्यवहाराशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्या. प्रत्यक्षातील गाठीभेटींऐवजी आभासी भेटी सुरू झाल्या. झूम, गुगल आणि तत्सम मीटिंग लोकप्रिय झाल्या. त्याप्रमाणेच यूट्यूबच्या युगाचीही सुरूवात झाली. डेटा स्वस्त झाला, घराघरात आणि प्रत्येक हातात स्मार्ट फोन आले. समाजाच्या सर्व थरांमध्ये ज्ञान – माहिती - मनोरंजनाची गंगा वाहू लागली. याच दरम्यान शेअर बाजार कोसळले आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू झाले. उर्वरित जगाच्या मानाने भारतीय अर्थव्यवस्था बरीच स्थिर होती. परदेशात स्वस्त झालेला पैसा भरभरून भारतात आला. बाजार खाली आल्याने ब्लू-चिप शेअर्स अत्यंत आकर्षक भावाला आले होतेच, मागणी वाढल्यामुळे ते वर जाऊ लागले. याच दरम्यान ‘घरी राहून काम’ करण्याची (Work from Home) पद्धत रुढ झाली आणि कमावती मंडळी घरातून काम करु लागली. अशातच आधी उत्सुकतेतून आणि नंतर छोट्या ट्रेडमध्ये मिळालेल्या पैशांमुळे शेअर बाजाराचे आकर्षण वाढू लागले. कॉलेजमध्ये जाणारी मुले घरीच होती. ती आधीच तंत्रस्नेही असल्याने शेअर बाजाराचा मोह आणि झटपट श्रीमंत होण्याचा नाद वाढला. त्यामुळे यूट्यूबवर अर्थविषयक शिक्षण देणारी मंडळी वाढली. त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून (Likes किंवा Hits) किंवा फॉलोअर / सबस्क्रायबरच्या संख्येवरून त्यांची लोकप्रियता ठरत होती. जितके अधिक सबस्क्रायबर तितका तो ‘तज्ज्ञ’ शिक्षक असे मानून आभासी विश्वातील अशा गुरुजींची आणि त्यांच्या भक्तांची संख्या वाढायची. ही गर्दी वाढेल तशी अधिक लाभाच्या अपेक्षेने अशा प्रकारच्या संवादकांच्या आणि त्यांच्या सबस्क्रायबरच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत गेली. पुढे या प्रकारे आभासी माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ठरणाऱ्या आर्थिक विषयातील संवादकांना ‘फिनफ्लुएन्सर’ असे संबोधले जाऊ लागले. यामध्ये चांगला अभ्यास असलेले, तळमळीने अर्थविषयक जागृती करणारे तज्ज्ञ जसे होते, तसे निरागस आणि भाबड्या लोकांचा विश्वास कमावून त्याचा फायदा घेणारे ‘स्वयंघोषित तज्ज्ञ’ही होते. त्यातूनच शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने एक नवा फंडा सुरू झाला. गुंतवणूकदारांचा विश्वास मिळण्यासाठी उच्च परताव्याचा दावा केला जाऊ लागला. उदाहरणार्थ, तुमचे पैसे दुप्पट, चौपट, अनेक पट करा, त्यासाठी आमच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश घ्या. किरकोळ फी भरून लक्षाधीश अथवा कोट्यधीश व्हा वगैरे वगैरे... असे शिक्षण घेण्याच्या निमित्ताने भोळाभाबडा पण झटपट पैसे मिळवण्यासाठी उतावीळ झालेला गुंतवणूकदार जाळ्यात आला की, त्याला आपल्या व्हाट्स अॅप किंवा टेलिग्राम समूहाचे सदस्य करून पैसे काही पटीने वाढण्याची टीप देतो म्हणून सांगायचे. कित्येकदा गुंतवणूकदाराला शेअर्स विकत घ्यायला सांगण्याआधी स्वत:च ते शेअर विकत घ्यायचे आणि मोठ्या संख्येने शेअरची मागणी वाढली की, जवळचे शेअर विकून टाकायचे... असाच दावा करत ‘चार्ट का बाप’ने किमान १७ कोटींचा नफा मिळवल्याचा आरोप आहे. दुसरी पद्धत म्हणजे, निम्म्या लोकांना एकच शेअर विकत घ्यायला सांगायचे आणि उरलेल्यांना तोच शेअर विकायला सांगायचे. यात कुणाला तरी पैसे मिळणारच. मधल्या मध्ये हा फिनफ्लुएन्सर मात्र स्वत:चे साम्राज्य वाढवतो. आणखी एक प्रकार म्हणजे, टीव्हीवरील लोकप्रियतेचा फायदा घेऊन, ‘आज घ्या, उद्या विका’ योजनेखाली सामान्य गुंतवणूकदारांना कुठला तरी शेअर घ्यायला सांगायचे. त्या आधीच आपले बगलबच्चे तो शेअर विकत घेतील, हे बघायचे. दुसऱ्या दिवशी सामान्य गुंतवणूकदार विकत घ्यायला आले की, आपल्या खिशातले हे शेअर्स त्यांच्या गळ्यात मारायचे आणि स्वत:चे उखळ पांढरे करायचे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाने असे गैरमार्ग अवलंबणाऱ्या किंवा अवास्तव प्रलोभने दाखवणाऱ्या फिनफ्लुएन्सर्सच्या मायाजालापासून सावध राहिले पाहिजे. आपली गुंतवणूक केवळ अधिक लाभदायी होण्याकडे नव्हे, तर ती तितकीच सुरक्षितही असेल, याकडे लक्ष द्यायला हवे. ‘सेबी’कडे नोंदणी आवश्यक - ‘सेबी’ने गैरमार्गाने पैसे मिळवणाऱ्यांना शेअर बाजारात भाग घेण्यास मनाई केली आहे. - आर्थिक शिक्षण देण्यास हरकत नसली, तरी त्या व्यक्तीची ‘सेबी’कडे नोंदणी हवी. - सदर व्यक्तीने गुंतवणूकदाराला कुठलेही अवाजवी प्रलोभन (उदा. आमचा शिक्षणक्रम केल्यास करोडपती व्हाल / आमच्या समूहाचे सदस्य झाल्यास तुम्हाला टीप देऊ / अमुक शेअर दोन वर्षांत पाचपट होणार आहे.) दाखवू नये. सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे? - केवळ झटपट पैसे मिळवण्याचा मोह आणि स्वत:ला त्यातले ज्ञान नसणे ही दोन कारणे अशा फसवणुकीमागे असल्याचे ‘सेबी’चे म्हणणे आहे. मग अशा वेळी सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे? - शेअर बाजार हा जुगार किंवा जादू नव्हे. त्यामुळे कोणत्याही अवास्तव प्रलोभनांवर विश्वास ठेऊ नये. - जो माणूस आपले पैसे वर्षभरात दुप्पट करू शकतो, त्याला आपली गरजच काय? तो स्वत:चे पैसे काही पटींनी का वाढवत नाही, हा साधा विचार करावा. - शेअरची किंमत त्या कंपनीच्या कामगिरीवर आणि तिच्या भविष्यावर अवलंबून असते. अपेक्षेप्रमाणे घडले नाही तर तोटाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे. - दीर्घकालीन फायद्यासाठी संबंधित कंपनीचे व्यवस्थापन चोख आणि कामकाज उत्तम हवे. तसे असेल तर थोडा संयम आणि वाजवी अपेक्षा ठेवल्यास दीर्घकाळात भांडवलात नक्की वाढ होते. - शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीत धोका वाटत असल्यास म्युचुअल फंडाला प्राधान्य द्यावे. संपत्ती निर्मितीचा तो राजमार्ग आहे. (संपर्कः kreatwealth@gmail.com)
खलनिग्रहणाय:मनमानी कारभार की कायद्याचे राज्य?
आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था राज्यघटनेप्रमाणे चालते. या व्यवस्थेत ‘कायद्याचे राज्य’ अभिप्रेत असते आणि सगळे कामकाज त्यानुसार होणे अपेक्षित असते. पण, अनेकदा राजकारणी नेते आणि अधिकारी तसे वागत नाहीत. नियम-कायद्यांना बगल देण्याच्या या वृत्तीमुळे लोकांच्या मनात व्यवस्थेविषयी चीड निर्माण होते. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने ‘बुलडोझर जस्टिस’वर महत्त्वाचा निर्णय दिला. देशभरात या प्रकारच्या कारवाईवर बंदी घालतानाच, त्या बाबतीत काही अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वेही आखून दिली आहेत. कोणी फक्त आरोपी आहे किंवा त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे, एवढ्या कारणासाठी त्याच्या घरावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांमध्ये कायदेशीर मार्गांचा अवलंब न करता, केवळ आरोप असलेल्या लोकांवर अशी बुलडोझर कारवाई करण्यात आली. अशी कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगताना न्यायालयाने या संदर्भात दिलेले निर्देश शासन आणि प्रशासन दोन्हींसाठी बंधनकारक आहेत. नागरिक म्हणून प्रत्येकाला त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. यातील प्रमुख निर्देश असे: १. कारवाईसाठी १५ दिवसाची नोटिस दिली पाहिजे. पहिली नोटिस पोस्टाने पाठवावी, दुसरी घराच्या दर्शनी बाजूवर लावावी. संबंधित व्यक्तीला नोटिस मिळाल्यापासून १५ दिवसांची कालावधी गणला जावा. २. या नोटिशीची एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावी. जिल्हाधिकारी त्यासाठी एक समन्वयक नेमतील, तो या बाबतीत पालिका / महापालिकेच्या संपर्कात राहील. ३. संबंधिताने कोणत्या नियमांचे उल्लंघन केलेआहे, त्याच्या घराचा कोणता भाग तोडण्यात येणार आहे, याचा नोटिशीत स्पष्टपणे उल्लेख असावा. त्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यासमोर सुनावणी घेणे बंधनकारक असेल. ४. प्राधिकृत अधिकारी या सुनावणीच्या नोंदी करुन, कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले आहे? ते समझोता होण्यायोग्य आहे का? घराचा कोणता भाग तोडला जाईल? आदी तपशील असलेला आदेश काढेल. ५. नियमांचे उल्लंघन हे समझोता होण्यायोग्य नसेल, तर हा अधिकारी तसे सांगेल आणि सदर व्यक्तीला स्वतः घराचा अवैध भाग तोडण्याची संधी देईल. ६. घर तोडण्याच्या अंतिम आदेशापासून १५ दिवसाचा अवधी संबंधित व्यक्तीला न्यायालयात अपिलासाठी देण्यात येईल. ७. या अवधीत अपील करण्यात आले नाही, तर दोन पंचांच्या समक्ष निरीक्षण अहवाल तयार करून संबंधित बांधकाम तोडण्यात येईल. ८. तोडण्याच्या संपूर्ण कारवाईचे चित्रण करुन, तिथे उपस्थित पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांच्या नावांसह विस्तृत अहवाल पालिका आयुक्तांकडे पाठवणे बंधनकारक असेल. या निर्देशांचे पालन बंधनकारक आहे. त्यांचे उल्लंघन झाले, तर तो न्यायालयाचा अवमान मानून कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, संबंधित अधिकाऱ्यांवर खटलाही दाखल केला जाईल. चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली, तर संबंधित अधिकारी पाडलेल्या घरांची स्वतःच्या खर्चाने पुनर्बांधणी करतील. या निर्णयानुसार, आरोपी असो वा गुन्हेगार असो; कोणाचेही घर बेकायदेशीरपणे पाडता येणार नाही. ते नियमबाह्य पद्धतीने बांधले असेल, तर कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही करणे उचित आहे, असा त्याचा अर्थ आहे. मात्र, असे बेकायदेशीर बांधकाम होत असताना संबंधित अधिकारी काय करत होते? याचा जाबही विचारला जाणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होतील. अनेक पीडितांना न्याय मिळेल आणि भविष्यात होणाऱ्या अन्यायालाही पायबंद बसेल. त्याचवेळी, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या शासन आणि प्रशासनावर अंकुश येईल. सामान्य लोक आयुष्यभराची कमाई खर्च करून घर बांधतात. ते अशाप्रकारे जमीनदोस्त केले तर ते कुटुंब पूर्णपणे तुटते, त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होते. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेविषयी सामान्य जनतेच्या मनात विश्वास वाढेल. आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था राज्यघटनेप्रमाणे चालते. या व्यवस्थेत ‘कायद्याचे राज्य’ अभिप्रेत असते आणि सगळे कामकाज त्यानुसार होणे अपेक्षित असते. पण, अनेकदा राजकारणी नेते आणि अधिकारी तसे वागत नाहीत. नियम-कायद्यांना बगल देण्याच्या या वृत्तीमुळे लोकांच्या मनात व्यवस्थेविषयी चीड निर्माण होते. या संतापाचे रुपांतर हळूहळू सामाजिक अराजकतेमध्ये होऊन अंतिमत: लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. अलीकडच्या काळात राजकीय हस्तक्षेप झुगारून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. चांगले पोस्टिंग मिळवण्यासाठी आणि राजकीय नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी अनेक अधिकारी त्यांच्या पुढे पुढे करत राहतात. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे हे कार्यपालिका अर्थात प्रशासनाचे काम असते. हे आदेश कायद्याला धरुन आहेत का, ते पाहण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची असते. प्रत्येक गोष्टीसाठी सामान्य माणूस न्यायालयात जाऊ शकत नाही. शिवाय, न्यायालयीन प्रक्रिया वेळखाऊ आणि खूप खर्चिक असते. त्यामुळे प्रशासनाने आपले काम नियमाप्रमाणे केले, तर सामान्यांना न्याय मिळेल आणि न्यायालयात हेलपाटेही घ्यावे लागणार नाहीत. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)
माझ्या हिश्श्याचे किस्से:ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार मानले जायचे बाबूभाई मिस्त्री
अलीकडेच मी या सदरामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कॅमेरामन अशोक मेहताजी, मनमोहन सिंगजी आणि राधू करमाकरजी यांच्याविषयी लिहिले. आजच्या भागासाठी लिहायला बसलो तेव्हा मला वाटले की या इंडस्ट्रीतील दुसरे एक महान कॅमेरामन, दिग्दर्शक आणि ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार बाबूभाई मिस्त्री यांच्याबद्दल लिहिले नाही तर ही मालिका अधुरी राहील. भारतात काॅम्प्युटर ग्राफिक्स आणि व्हीएफएक्सचे तंत्र येण्यापूर्वीच बाबूभाईंनी चालत्या शूटिंगमध्ये अशा अनेक ट्रिक केल्या, ज्या कुठल्याही व्हीएफएक्सच्या तोडीस तोड ठरतील. त्यामुळे आज मी बाबूभाई मिस्त्री यांच्याबद्दल सांगणार आहे. मित्रांनो, बाबूभाई मिस्त्रींचा जन्म ५ सप्टेंबर १९१८ ला गुजरातमध्ये सुरत येथे झाला. त्यांचे मूळ नाव अब्दुस समद होते. त्यांचा जन्म गुजराती मुस्लिम कुटुंबात झाला होता. स्पेशल इफेक्ट्स आणि ट्रिक फोटोग्राफीसाठी बाबूभाई ओळखले जायचे. पण, त्यांना खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक मिळाला तो १९३७ मध्ये विजय भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ख्वाब की दुनिया’ या सिनेमातून. या सिनेमानंतर बाबूभाई ट्रिक मास्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे १९४२ मध्ये ‘मुकाबला’ या सिनेमाचे त्यांनी सहदिग्दर्शन केले. या सिनेमातून बाबूभाईंनी भारतात सर्वप्रथम स्प्लिट स्क्रीन दाखवली. बाबूभाईंना मी व्यक्तिशः भेटलो नाही. पण, त्यांच्याबद्दलचे िकस्से जुन्या लाइटमनकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ऐकले आहेत. ते एक चांगले कॅमेरामन तर होतेच; पण एक उत्तम दिग्दर्शकही होते. त्यांनी संपूर्ण रामायण, महाभारत, हर हर गंगे आणि हातिम ताई अशा अनेक सिनेमांचे दिग्दर्शन केले. ट्रिक फोटोग्राफीच्या जादूने त्यांनी हे सिनेमे अजरामर केले. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर गणेशोत्सवाचा मांडव घातलेला असायचा. तिथे पडदा लावून संपूर्ण रामायण आणि महाभारत हे सिनेमे दाखवले जायचे. ते मी अनेकदा पाहिले. हनुमानजी उड्डाण करायचे.. कुंभकर्ण डोंगरावर हात ठेवून झोपायचा.. खाली युद्ध सुरू आहे, रावणाची सेना लढते आहे.. पर्वत कोसळताहेत.. अशी दृश्ये पाहून आम्ही टाळ्या वाजवायचो. मोठेपणी मुंबईत आल्यावर मला कळले की, या सिनेमांचे दिग्दर्शन बाबूभाईंनी केले होते. बाबूभाई आपल्या प्रत्येक सिनेमात नव्या ट्रिकचा वापर करायचे. एकदा ते महालातील दृश्याचे शूटिंग करत होते. हे दृश्य अशा प्रकारे चित्रीत करायचे होते की, त्यातील पात्र महालात अंथरलेल्या गालिचावर चढून सिंहासनाकडे जाऊ लागताच सिंहासनावर बसलेला माणूस त्याला शाप देईल आणि त्याचवेळी त्याच्या पायाखालची जमीन खचून जाईल. बाबूभाईंनी महालाच्या मध्यात खड्डा करून तो पाण्याने भरला. वारा आत येऊ नये म्हणून सगळे दरवाजे - खिडक्या बंद केले. महाराष्ट्रातील सर्वोत्तम रांगोळी कलाकार महिलेकडून विविधरंगी फुलांची सुंदर रांगोळी काढली. ती पाहताना गालिचाच अंथरलाय, असा भास व्हायचा. दृश्यातील ते पात्र गालिचापासून थोडे दूर उभे होते. हाताने इशारा करताच ते गालिचावर चढले आणि पाण्यात पडले. पण, पडद्यावर पाहताना मात्र जणू तिथली जमीनच खचली आहे, असे वाटायचे. बाबूभाईंनी आपल्या अद्भूत कल्पनाशक्तीच्या बळावर सिनेमांमध्ये अशी अनेक अप्रतिम दृश्ये घेतली. यावरुन बाबूभाईंसाठी मला जिगर मुरादाबादी यांचा एक शेर आठवतोय... अपना ज़माना आप बनाते हैं अहल-ए-दिल, हम वो नहीं कि जिन को ज़माना बना गया। बाबूभाईंचे असे कितीतरी किस्से फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. जुन्या लोकांनी मला सांगितले की, एकदा बाबूभाई खंडाळ्यात की फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होते. एका दृश्यात त्यांना बर्फाच्छादित पर्वत दाखवायचा होता. त्यावेळी बशीरभाई लाइटमन होते. बाबूभाईंनी पर्वताचे चित्र काढलेली पारदर्शक काच कॅमेऱ्यासमोर फिक्स केली. ब्रश आणि पांढरा रंग घेतला. काचेवरच्या चित्रातील पर्वताचे शिखर पांढऱ्या रंगाने हलकेच रंगवले. ते कॅमेऱ्यातून पाहताना मात्र पर्वताच्या शिखरावर बर्फ जमा झाल्यासारखे दिसत होते! बाबूभाईंनी आपल्या सिनेमांमध्ये कॅमेरा ब्लॉक करुन, निगेटिव्ह ब्लॉक करुन अशा अनेक ट्रिक्स आणि ऑन सेट ट्रिक्स वापरल्या. ते खऱ्या अर्थाने ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार होते. आज बाबूभाईंच्या स्मरणार्थ ‘हातिम ताई’ सिनेमातील हे गाणे ऐका... ज़रा करम ऐ खुदा इधर कर दे, ख़ताये हमसे हुई है तू दर गुज़र कर दे... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
डायरीची पाने:'थंडी' गुलाबी अन् बोचरी
पोरांसोबत मी शाळेत जायचो. मन लावून शिकायचो. कविता पाठ करायचो. त्याच कविता शेतात काम करताना उंच आवाजात म्हणायचो. त्यात खूप आनंद मिळायचा. सध्या थंडीचे दिवस आहेत. आमच्या परभणीत ऊन आणि थंडीही टोकाची असते. आम्ही आता या हवामानाला सरावलो आहोत. पण, मुलं आणि वयस्कर माणसं प्रत्येक ऋतूबदलाच्या वेळी आजारी पडतात. हा बदल त्यांच्यासाठी सुखकारक नसतो. ते उबदार कपडे घालून शेकोटीभोवती वेळ घालवतात. मर्ढेकरांनी मुंबईच्या थंडीला ‘गोड हिवाळा’ म्हटलंय. उकाड्यानं कायम हैराण असलेल्या मुंबईकरांना हिवाळा गोड वाटणं स्वाभाविकच आहे. थंडीचं हे रूप पाहिलं की, मला माझं गावाकडचं बालपण आठवतं. थंडीचे दिवस म्हणजे मजाही असायची आणि सजाही. मजा असायची ती ऊस, बोरं, जांब (पेरू), टाहाळ (ओला हरभरा) खाण्याची आणि सजा असायची ती इतक्या भयंकर थंडीत पहाटेच उठून पाखरं हाकायला जाण्याची. मी आणि माझी मोठी बहीण मुक्तूबाई पाखरं हाकायला जायचो. आमच्या रानमळ्यात ज्वारी पेरलेली असायची. तिथं पाखरं हाकायला जावं लागायचं. रानमळा शिवेवर म्हणजे खूप लांब होता. त्यामुळं पाखरं उठून ज्वारीवर झेपावण्याआधी तिथं पोहोचावं लागायचं. त्यासाठी पाखरांच्याही खूप आधी उठून, सगळं उरकून निघावं लागायचं. मी भित्रा होतो आणि मुक्तूबाई रगेल होती.आमची माय मारकुटी होती, बाबा हळवे होते. पण, तेव्हा ते घरी नसायचे. पहाटेच उठून सगळं उरकून ते कामाला निघून गेलेले असायचे. आम्हाला उठवून पाखरामागं हाकायचं काम मायकडं असायचं. माय मुक्तूबाईला उठवण्यासाठी हाका मारायची, पण ती दाद देत नसे. माय तिच्या अंगावरचं पांघरूण ओढायची. थंडीमुळं मुक्तूबाई आपोआपच उठून डोळे चोळत बसायची. माय तिच्यावर ओरडायची. त्यालाही मुक्तूबाई दाद देत नसे. मग माय बकुटीला धरून तिला न्हाणीवर नेऊन बसवायची. तिच्या हातावर राखुंडीचा ढेपसा ठेवून दात घासायला लावायची. तोंड धुतलं की चुलीपुढं आणून बसवायची. रात्रीचं, सकाळचं जे असेल ते खाऊ घालायची. हातात काठी घेऊन, तिला धाक दाखवत शेताच्या वाटेला लावायची. माय मुक्तूबाईकडून जसं सगळं करून घ्यायची, त्या भीतीनं मीही सगळं उरकायचो आणि तिच्या मागं मागं शेताला निघायचो. मुक्तूबाई चिडलेली असायची. आपला राग ती माझ्यावर काढायची. तिच्या आणि मायच्या आपाधापीत मी का हसत होतो? म्हणून माझ्या पाठीत बुक्का घालायची. मी रडत रडत तिच्या मागं चालायचो. रानात गेल्यावर सगळी कामं मलाच सांगून ती माळ्यावर बसून राहायची. माळा म्हणजे पिकाच्या मधोमध पाखरं राखण्यासाठी तयार केलेला चार डिळ्यांचा लहानसा मांडव. त्यावर उभं राहून पाखरं हाकायची. शेताकडं जाताना मुक्तूबाई दुसऱ्याच्या शेतातला ऊस मोडून घ्यायची. मला भीती वाटायची. मालकानं बघितलं, तर तो मारील, असं वाटायचं. पण, ती भीत नव्हती. बिनधास्त एक-दोन ऊस मोडून घ्यायची. शेतात गेल्यावर माळ्यावर बसून ऊस साळायची. त्याचे तुकडे करायची आणि खात बसायची. चिवट्या माळ्याखाली टाकायची. चिमण्यांचा थवा कुठं बसलाय, ते वरून सांगायची, तिकडं पळवायची. त्या बदल्यात ती मला उसाचं कांडं द्यायची. आमच्याकडं तेव्हा ऊस नव्हता. ऊस खाऊ वाटायचा, पण तो दुसऱ्याच्या शेतातून घेऊन खायची हिंमत माझ्यात नव्हती. त्यामुळं मुक्तूबाई सांगेल ती कामं मी करीत राहायचो. ऊस संपला की मुक्तूबाई ज्वारीतला टाहाळ उपटायची. त्याच्यावरची आंब धुवायला जवळपास पाणी नसल्यामुळं तो टाहाळ आम्ही तसाच खायचो. थंडीनं आधीच उललेल्या ओठांना ती आंब झोंबायची. ओठ चुरचुर करायचे. आंब जास्त असंल तर मुक्तूबाई टाहाळ मातीत घोळसायची. मातीला लागून आंब कमी व्हायची. टाहाळ खाऊन झाला की ती वाळकं तोडायची. आम्ही कोवळे वाळकं खायचो. असं आमचं सतत काहीतरी खाणं सुरू असायचं. उसाच्या चिवट्या, हरभऱ्याची झाडं, वाळकाच्या बियांचा गड्डा हे सगळं आम्ही माळ्याखाली टाकायचो. एक दिवस हा ढीग माळ्याला भिडायचा. मग घरून येताना मुक्तूबाई काडीपेटी आणायची आणि तो कचरा जाळायची. आम्ही ऊस चोरून खाल्ल्याचा पुरावा नष्ट करायची. आपण शेतातलं काय आणि किती खाल्लं, त्याचाही मागमूस ठेवायची नाही. ऊस, टाहाळ, वाळकं कितीही खाल्ले, तरी पोट भरतच नसे. लोक म्हणायचे, यानं कधीच पोट भरत नसतं. भाराभर टाहाळ खाल्ला अन् पोट चिरून पाहिलं, तर शिपभरही दाणे निघणार नाहीत. वाळकाचं तर खाताना तोंडातच पाणी व्हायचं. शिवाय, पाखरामागं सारखं पळून पळून खाल्लेलं हजम होऊन जायचं. पुन्हा खाऊ वाटायचं. आमच्यासारखंच चिमण्यांचंही होतं. त्यांना कितीदाही उठवलं, तरी त्या पुन्हा येऊन बसायच्या नि दाणे खात राहायच्या. त्यांचं पोट काही भरायचं नाही. त्यांच्या खाण्याला आम्ही वैतागायचो आणि आमच्या खाण्याला घरचे वैतागायचे. घरची कामं उरकून पाठीमागून वहिनी भाजी-भाकरी घेऊन यायच्या. आम्हाला ‘आता जेवा,’ असं म्हणायच्या. आम्ही लगेच जेवायला बसायचो. आम्ही काहीबाही खाल्लेलं सांगायचो, तेव्हा वहिनी म्हणायच्या, ‘त्या चिमणचाऱ्यानं काय होतंय? भाजी भाकरीशिवाय पोट भरत नाही.’ वहिनीनं त्या खाण्यासाठी वापरलेला ‘चिमणचारा’ हा शब्द मला फार आवडायचा. जेवण करून मी घरी यायचो. मग घरच्या दुसऱ्या वहिनी मला आंघोळ घालायच्या. डोक्याला तेल लावायच्या. तेच हात तोंडावरून आणि हातापायावरून फिरवायच्या. थंडीच्या कडाक्यानं उललेली त्वचा मऊ व्हायची. उललेल्या ओठाला वहिनी कुंकवाच्या बगव्यातलं मेण लावायची. त्यामुळं ओठ कडकडत नसत. माझ्या केसांचा भांग पाडून, कपाळावर गंध लावून माझ्या काखेत दप्तर अडकवायची आणि शाळेच्या रस्त्याला लावून द्यायची. पोरांसोबत मी शाळेत जायचो. मन लावून शिकायचो. कविता पाठ करायचो. त्याच कविता शेतात काम करताना उंच आवाजात म्हणायचो. त्यात खूप खूप आनंद मिळायचा. तेव्हा मी आठ - नऊ वर्षांचा असेन. शाळा संपली की घरी दप्तर टाकून पुन्हा शेतात जावं लागायचं. शेतात जी कामं सुरू आहेत, मोठी माणसं जे काम करताहेत, त्यांना मदत करायची. वहिनी वैरण काढत असंल, तर तिला ती काढू लागायची. दादा दूध काढत असंल, तर त्याला वासरू आखडू लागायचं. दावण साफ करू लागायची. गुरांची सोड-बांध करू लागायची. सगळी कामं संपली की मावळायची वाट बघत बसायचं. दिवस मावळताच सगळ्यांसोबत घरी जायचं, पण रिकाम्या हातानं नाही. वहिनींच्या डोक्यावर गोवऱ्यांचं टोपलं असायचं. दादाच्या डोक्यावर पराठ्याचा भारा असायचा. बाबाच्या हातात शेतातला काहीतरी भाजीपाला असायचा. माझ्या हातात दुधाची किटली असायची. घरी आलं की हातपाय धुवायचे आणि जेवायला बसायचं. घरी थांबलेल्या वहिनीनं आणि मायनं गरम गरम भाकरी-भाजी करून ठेवलेली असायची. काम करून दमून, थकून केलेलं ते जेवण अमृताच्या चवीचं असायचं. मग हिवाळ्याच्या त्या थंड हवेत येणारी रात्रीची झोप स्वर्गीय सुखाची असायची... (संपर्कः inbhalerao@gmail.com)
वेब वॉच:'वालई' केळी मजुरांच्या मुलांचे घुसमटलेले जग
केळी हे तुलनेने स्वस्त आणि अधिक पौष्टिक असे फळ मानले जाते. भारतात महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन होते. त्यातही आंध्र प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ५८ लाख टन केळी उत्पादन होते, असे आकडेवारी सांगते. पण, केवळ सर्वांत जास्त उत्पादन होते या निकषामुळे केळी स्वस्त मिळतात का? नाही! केळीच्या बागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना मिळणारा मेहेनताना अत्यल्प असला, तरी बाजारात मात्र केळीचे दर चढेच असतात. केळीचे मोठमोठे घड झाडावरून उतरवायचे, ते डोक्यावर घेऊन बागांमधून वाट काढत ट्रकपर्यंत जायचे आणि मग त्यामध्ये ते भरायचे.. हे काम दिवसभर करण्याचे किती पैसे या मजुरांना मिळत असतील? हातावर पोट असणाऱ्या अशा असंघटित मजुरांचे प्रश्न काय आहेत? हे प्रश्न एरवी कुणाला पडणारही नाहीत. पण, याच विषयावर सिनेमा काढला तर तो कोण बघणार? लेखक-दिग्दर्शक मारी सेल्वाराजा यांचा ‘वालई’ (Vaazhai) हा सिनेमा या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. डिस्ने हॉटस्टारवर सादर झालेल्या या सिनेमाची कथा सेल्वाराजा यांचीच आहे. त्यांनी आपलीच गोष्ट एका लहान मुलाच्या नजरेतून मांडली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या - शिवानंदनच्या घरी त्याची मोठी बहीण आणि त्याची आई असे तिघे राहात असतात. त्यांची गुजराण केळीचे घड वाहून नेण्याच्या मजुरीतून होत असते. कधी कधी शिवालाही या कामाला जावे लागते, पण त्याला हे काम आवडत नाही. त्याऐवजी त्याला शाळेत जायला आवडते. तो वर्गातला सर्वांत हुशार विद्यार्थी असतो. कुणाच्याही बालपणातील शाळेचे दिवस खूप रम्य असतात. पण, शिवाची परिस्थिती इतकी बिकट असते की, त्याला शाळेऐवजी कामावर जावे लागते. या गोष्टीचा त्याला विलक्षण राग असतो. या कथेत पुढे काय घडते, यापेक्षा ते ज्या पद्धतीने सादर केले आहे, ते फार महत्त्वाचे आहे. सिनेमाच्या सुरूवातीला एक मोठे रान दिसते, तिथे अनेक झाडे आहेत. शिवा मोठमोठ्याने हाका मारतो आहे. डोंगरावरून लंगडत लंगडत जाणारा, रडकुंडीला आलेला हा मुलगा काय शोधतोय, हे लवकरच समजते. विलोभनीय सिनेमॅटोग्राफी, अप्रतिम प्रकाशयोजना ही या सिनेमाची वैशिष्ट्ये पहिल्या पाच मिनिटांतच जाणवू लागतात. डोक्यावरचे केळाचे घड तो नदीत फेकून देतो आणि आपल्याला केळाच्या बागांचे विहंगम दृश्य दिसते. त्याचवेळी पडद्यावर अक्षरे उमटतात... Vaazhai ज्याचा उच्चार होतो, वालई म्हणजे केळी. सकाळ होताच शिवाची बहीण त्याला उठवते आणि म्हणते, ‘उठ, आज केळीच्या घडांची हमाली करायला जायचं नाहीय, उठ!’ हे ऐकताच तो उत्साहानं उठतो. खरं तर त्याला रोजची सकाळ विलक्षण भीतीदायक वाटत असते. कारण शाळेत जाण्याऐवजी त्याला मजुरी करावी लागायची. या सिनेमातील प्रत्येक दृश्य अर्थपूर्ण आहे. दिवस उजाडताच कोंबड्या खुराड्यातून बाहेर काढल्या जातात आणि पिल्लं इकडंतिकडं बागडतात. हातावर पोट असलेल्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असली, तरी शिवाचं भावविश्व खूप तरल असतं. त्याला नदीत पोहायला आवडतं, नदीकाठी मित्रांबरोबर गप्पा मारायला आवडतात, केळीच्या खोडाची होडी करून त्यावर मित्रांसोबत नाचायला आवडतं. गणवेश घालून शाळेत जाणं हा तर त्याच्यासाठी खूप आनंदाचा क्षण! कारण त्याला तिथं किंमत असते. शिक्षक नेहमीच त्याचं कौतुक करतात. शिवाच्या आयुष्यातील असे विरोधाभास सिनेमात दिसत राहतात, कमीत कमी संवादांतून ते अधिक बोलके होतात. सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने लेखक - दिग्दर्शक कॅमेऱ्यातून व्यक्त होतात. इथे थेनी ईश्वर यांची सिनेमॅटोग्राफी दाद देण्यासारखी आहे. संतोष नारायणन यांच्या संगीताला तमिळनाडूच्या मातीचा सुगंध आहे. पोनवेल एम. याने साकारलेली शिवानंदनची भूमिका हा या सिनेमाचा हायलाइट आहे. इतका नैसर्गिक अभिनय एका शाळकरी मुलाने केला आहे, त्यामध्ये त्याचे आणि दिग्दर्शकाचेही कौतुक आहे. दिव्या दोरायस्वामी (बहीण), जानकी (आई), राघुल (मित्र), निखिला विमल (शिक्षिका) या सर्वांचा अभिनय इतका सहजसुंदर आहे की, आपण सिनेमा बघतो आहोत, हे क्षणभर विसरुन जातो. एखादा तुलनेने उपेक्षित असलेला सामाजिक प्रश्न किती कल्पकतेने मांडता येतो, याचे उत्तम उदाहरण लेखक - दिग्दर्शक मारी सेल्वराजा यांनी ‘वालई’तून उभे केले आहे. ‘ऑस्कर’ला पाठवण्यासाठी याची निवड झाली होती आणि तो पहिल्या दहा सिनेमांच्या यादीतही होता. पण, भारतातील सर्वोत्तम सिनेमा म्हणून तो पुढे पाठवण्यात आपण कमी पडलो. अशा स्थानिक प्रश्नांच्या उत्तम मांडणीमुळे एखादा प्रादेशिक सिनेमा जागतिक दर्जाचाही होऊ शकतो. महाराष्ट्रातील ऊस कामगारांचे, त्यांच्या कुटुंबांचे, मुलांच्या शिक्षणाचे असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. तेही अशा पद्धतीने मांडता येऊ शकतात, हे हा सिनेमा बघताना जाणवत राहते. (संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)
रसिक स्पेशल:‘महा’सरकारपुढे महाआव्हानांचे तिढे!
अनेकदा एका पक्षाच्या सरकारपेक्षा आघाडीचे सरकार अधिक कार्यक्षम ठरते. राज्याला आता असे भक्कम सरकार मिळाले असले, तरी समोर अनेक आव्हाने उभी आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्यातील जनतेला ज्या राजकारणाचा अक्षरश: वीट आला होता, त्या चिखलात पुन्हा न पडता, प्रगतीची नवी संस्कृती रुजवत महाराष्ट्राला अग्रेसर बनवण्यासाठी या महाबहुमताच्या सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. युद्ध त्वेषानं लढावं लागतं आणि विजय विनयाने स्वीकारायचा असतो. महाराष्ट्राच्या या निवडणुकीचं युद्ध अगदी सर्वच अर्थाने त्वेषानं लढलं गेलं. पण, त्यानंतर राज्याच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे आता या शक्तीचा उन्माद न दाखवता उलट त्या बहुमतात जो अपेक्षांचा दबाव लपलेला आहे, त्याचा सन्मान करत नव्या सरकारला वाटचाल करावी लागणार आहे. महाराष्ट्र जो लोकसंख्येच्या दृष्टीनं देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात तब्बल १३ टक्क्यांच्या आसपास वाटा आहे, त्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांना मिळाली आहे. यातली एक संधी केवळ ७२ तासांची होती, तरी २०१४ ते २०१९ ही पूर्ण पाच वर्षांची टर्म त्यांना मिळाली होती. आणि असा पूर्ण कार्यकाळ महाराष्ट्राच्या आजवरच्या २० मुख्यमंत्र्यांपैकी केवळ वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच मिळाला. त्यातूनच ही संधी किती महत्त्वाची आणि मोलाची आहे, हे लक्षात यावं. २०१९ च्या निवडणुकीवेळी ‘मी पुन्हा येईन’ हा त्यांचा नारा होता. पण, यावेळी पुन्हा येईन असं न सांगताच ते परत आले आहेत. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री असा प्रवास करत ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे असा त्यांचा वादळी प्रवास राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणाचा झालेला चिखल, आरक्षणाच्या मागण्यांसारख्या टोकदार आंदोलनांमुळे बिघडलेला सामाजिक समतोल, लोकप्रिय योजनांच्या खैरातीत रिकामी होऊ लागलेली राज्याची तिजोरी, कायदा-सुव्यवस्थेची; विशेषत: महिलांच्या सुरक्षेची झालेली परवड, शेतीसमोरची आव्हाने आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला धार्मिक उन्माद या सगळ्याच आघाड्यांवर महाराष्ट्राला तत्काळ डागडुजीची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या राजकारणातील पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत फडणवीस यांना उत्तम प्रशासकाच्या हाताने महाराष्ट्राची ही उसवलेली वीण शिवावी लागणार आहे. या जबाबदारीचं भान ठेवूनच नव्या सरकारला काम करावं लागेल. आर्थिक आघाडीवरची कसरत निवडणुकांचं राजकारण आणि वास्तवातील स्थिती यात काय अंतर असतं, याची झलक सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटपासून येऊ लागली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता १५०० वरुन वाढवून २१०० रुपये करण्याचं निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने जाहीर केलं. पण, पहिल्या कॅबिनेटमध्ये त्या विषयी निर्णय झाला नाही. त्यामुळे या वाढीसाठी पुढच्या बजेटपर्यंत थांबावं लागेल, असं दिसतंय. किसान सन्मान निधीला पात्र नसलेल्या शेतकऱ्यांचे लाभ जसे थांबवले गेले, तसंच लाडकी बहीण योजनेचाही गरजूंनाच लाभ होईल हे बघावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यावरील कर्जाचा आकडा ९० हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असताना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे या दोन्हींची कसरत सरकारला करावी लागणार आहे. सामाजिक अस्वस्थतेचं आव्हान आमचं सरकार होतं तोपर्यंत मराठा आरक्षण टिकलं होतं, नंतरच्या सरकारच्या काळात ते गेलं, असं भाजप म्हणत आला आहे. आरक्षण घटनात्मकदृष्ट्या योग्य की अयोग्य हे तपासण्याचं काम कोर्टाचं असतं. त्यामुळे ज्या सरकारनं तो कायदा केला, त्याच कायद्याची ती परीक्षा असते ना? पण, हायकोर्टात आम्ही टिकवलं, सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडी सरकार टिकवू शकली नाही, असे आरोप करण्यात आले. आता पुढची पाच वर्षे भाजपचेच सरकार असताना हे आरक्षण टिकवून ठेवणे, हीसुद्धा एक परीक्षा असेल. याच वर्षी फेब्रुवारीत सरकारने नवीन कायदा करुन मराठा समाजाला ‘एसईबीसी’अंतर्गत आरक्षण दिलं आहे. सोबत कुणबी प्रमाणपत्रांचा वादही सुरू आहेच. त्यावरुन होणारे मनोज जरांगे पाटील यांचे संभाव्य आंदोलन सरकार कसे हाताळते? आरक्षणाच्या प्रश्नावरुन आता जातीजातींना एकमेकांमध्ये झुंजवत ठेवण्यापेक्षा तुटत गेलेले हे एकोप्याचे धागे जुळवण्यासाठी ज्या दीर्घकालीन उपायांची, रोखठोक भूमिकांची गरज आहे, ती सरकारने पूर्ण केली पाहिजे. गेल्या दशकभरापासून महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रश्न आणि त्यावरुन होणारी आंदोलने यांमुळे सातत्याने सामाजिक अस्वस्थतेचे जे दर्शन घडत होतं, त्याला आता कुठे तरी पूर्णविराम मिळायला हवा. काय हवं? विकास की विखार? प्रचारात ‘व्होट जिहाद’, ‘बटेंगे तो कटेंगे’ यांसारखी विभाजनकारी भाषा जोरकसपणे वापरली गेली. पण, सत्तेत आल्यानंतर सरकार सर्वांचं असतं. सामाजिक सलोखा, शांतता असेल, तर तिथे उद्योगस्नेही वातावरणही आपोआप तयार होतं. महाराष्ट्राचे हे वेगळेपण हीच देशात आपली ओळख बनली आहे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे धार्मिक विखाराची बाधा कमी आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत जिथे भरभराटीने औद्योगिक प्रगती झाली, त्या पहिल्या पाच राज्यांमध्ये किमान चार दक्षिणेकडील आहेत. आपल्या राजकीय नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी या बाबतीत महाराष्ट्राला उत्तरेकडे झुकवलं असलं, तरी प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी पुन्हा दक्षिणकडे बघत या धार्मिक विखाराची धग शमवावी लागेल. आकड्यांचे दावे विरुद्ध वास्तव दरडोई उत्पन्न, विकासदर आणि देशाच्या प्रगतीमधील वाटा या सर्व आघाड्यांवर कायम अग्रेसर राहणाऱ्या महाराष्ट्राची गेल्या काही वर्षांत सगळ्याच मानकांमध्ये झालेली घसरण चिंताजनक आहे. प्रकल्प येत आहेत यापेक्षा प्रकल्प जात आहेत, यावरुनच राज्याचं राजकारण तापत राहिलं. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्रासारख्या राज्याचा क्रमांक सध्या देशात सहावा आहे. दुसरीकडे, देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक मात्र महाराष्ट्रात होत असल्याचे दाखले दिले जात आहेत. पण मग ही गुंतवणूक नेमकी कुणाच्या कामाची ठरतेय? त्यातून राज्यातील जनतेच्या उत्पन्नात भर का पडत नाही? राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध का होत नाहीत? ही स्थिती बदलली तरच केले जाणारे आकड्यांचे दावे खरे ठरतील. आता नव्या, भक्कम बहुमताच्या सरकारला आमदार पळवापळवी, पक्ष फोडाफोडी असे उद्योग करण्यात वेळ घालवावा लागणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. नवे प्रकल्प आणि प्रगतीची परिभाषा फडणवीसांनी त्यांच्या कारकिर्दीत जे दूरगामी प्रकल्प मार्गी लावले, त्यात जलयुक्त शिवार योजना, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांचा समावेश करावा लागेल. यातील वाढवण बंदराची आता केवळ पायाभरणी झाली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची परिभाषा बदलण्याची ताकद या एका प्रकल्पात आहे. त्याची पूर्तता गतिमानतेनं व्हावी, ही अपेक्षा आहेच. या टर्ममध्ये नवी कुठली महत्त्वाकांक्षी योजना डोक्यात आहे का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यावर फडणवीसांनी ‘नदीजोड प्रकल्प’ असं उत्तर दिलं आहे. सोबतच शक्तिपीठ महामार्ग हाही मराठवाड्याच्या दृष्टीनं कायापालट करणारा असेल, हा त्यांचा दावा आहे.नव्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ १३२ इतके आहे. छोटे मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून हा आकडा १३७ वर पोहोचतो. त्यामुळे हा पक्ष बहुमतापासून केवळ ८ अंकांनी दूर असल्याने आता कुठल्याही राजकीय अस्थिरतेची शक्यता नाही. मित्रपक्षांपैकी एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा पहिल्या दिवसापासून सुरू असली, तरी सरकार उलथंपालथं होणार नाही, हे या आकड्यांनीच स्पष्ट केलं आहे. शिवाय, महायुतीने आपल्या राजकीय व्यवस्थेत अजित पवारांना शाहू - फुले - आंबेडकरांचा विचार जपण्याचीही मुभा दिली आहे. त्यामुळे सरकारच्या कामातही ही सर्वसमावेशकता दिसत राहील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. एकूणच, महाराष्ट्राला विकासाचा नवा चेहरा देण्यासाठी ही पाच वर्षे खर्च व्हायला हवीत. अनेकदा एका पक्षाच्या सरकारपेक्षा आघाडीचे सरकार अधिक कार्यक्षम आणि सर्वांगीण विकास करणारे ठरते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत राज्यातील जनतेला ज्या राजकारणाचा अक्षरश: वीट आला होता, त्या चिखलात पुन्हा न पडता, प्रगतीची नवी संस्कृती रुजवत महाराष्ट्राला अग्रेसर बनवण्यासाठी या महाबहुमताच्या सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. (संपर्कः pshantkadam@gmail.com)
कबीररंग:प्रेम बिना धीरज नहीं, बिरह बिना बैराग...
आपल्याला आत्मीय असलेल्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं, तेव्हा ते सगळंच कुठं शब्दांतून व्यक्त होत असतं? प्रेमाची भाषा मौन असल्याचं प्रेमात बुडालेल्या मनाला जाणवत असतं. पण, प्रेम हृदयातून बोलू पाहतं. स्वतःला व्यक्त होता यावं, ही आपल्या हृदयाच्या तळाशी असलेली एक गहिरी आस असते. प्रेम पूर्णपणे व्यक्त होत नसतं, तेव्हा आपल्या डोळ्यांतून घळाघळा आसवं वाहू लागतात. प्रेमाचा आशय दुसऱ्याला सांगायचा असतो आणि शब्द अपुरे पडतात. प्रेम दुसऱ्यासोबत वाटून घ्यायचं असतं आणि ते साधत नसतं. आपल्या ध्यानात येतं की, प्रेम शब्दांहून खूप व्यापक आहे! शब्द विषयगत आहेत आणि प्रेम अंतरात्म्याची प्रतिती आहे. प्रेमातली आसवं प्रार्थनापूर्ण आहेत, हे जाणवण्याच्या स्थितीत कबीर थेट आपल्या हृदयाशी जोडले जातात. भौतिक जगापलीकडच्या प्रेमाची निरंतर राहणारी खूण आपल्याला दाखवतात. नेह निबाहै ही बनै, सोचै बनै आन। तन दे मन दे शीश दे, नेह न दीजै जान।। दोन जिवांतलं प्रेम नात्यातला ओलावा जपत असतं तेव्हा कबीर म्हणतात, तिथं विचार प्रधान नसतो. प्रेमाचं अवतरण मुळी विचार-अविचाराच्या द्वंद्वातून जन्माला आलेलं नसतं. हे प्रेमी जिवांनी जाणलं तर देह, मन आणि बुद्धी यांचं समर्पित होणं सहज होतं. कबीरांचं सांगणं आहे की, या समर्पणाहून प्रेमाचं आटून न जाणं महत्त्वाचं आहे. प्रेमाचं अवतरण जीवनाहून खूप मोठं आहे. या दोह्यातून मानवी मनाच्या प्रेमभावाचं अखंड असणं कबीर गडद करतात. देह जाऊ देत, पण प्रेम जाता कामा नये. मनानं निर्माण केलेली प्रत्येक वस्तू जाणारी असते; मात्र प्रेम या जगाची निर्मिती नसते. प्रेम करणं, प्रेमपूर्ण जगणं हा आपला स्वभाव असतो, आपलं स्वरूप असतं. म्हणून तर कबीर म्हणतात : ‘नेह न दीजै जान’. केवळ प्रेम आपल्या मागे राहावं! पिया चाहै प्रेम रस, राखा चाहै मान। दोय खड्ग एक म्यान में, देखा सुना न कान।। कबीर म्हणतात, प्रेम करणाऱ्यानं एक सूत्र ध्यानात असू द्यावं : ज्याला प्रेमाचा रस चाखायचा आहे, त्यानं समाजातील मान्यता, लोकप्रतिष्ठा, मानपान आणि पत यांचा विचार करता कामा नये. या दोन गोष्टी एकाच हृदयात नांदू शकत नाहीत. प्रेमातील रस हा त्यागामधला असतो, भोगातला नसतो. उदाहरण म्हणून देवावर, देशावर, एखाद्या अमूर्त कलेवर प्रेम करणारी कुणी व्यक्ती आपण पाहिली, तिचं जीवन पाहिलं, तर तिच्या भौतिक जीवनाची फरफट आपल्या ध्यानात येईल. त्या व्यक्तीला केवढ्या तरी सामाजिक उपेक्षेला सामोरं जावं लागतं. कधी कधी तर ती लोकांतील अप्रतिष्ठेच्या खाईत पडलेली असते. प्रेम आत्मप्रतिष्ठा देते. जीवनावरची श्रद्धा आणि विरहार्त असताना सहनबळ देते. कबीर म्हणतात... प्रेम बिना धीरज नहीं, बिरह बिना बैराग। सतगुरु बिन जावै नहीं मनसा का दाग।। प्रेम स्वतःला विरघळवून ‘तू’मध्ये मिसळून जातं, तेव्हा काही मागण्याची भावना मनात उरत नाही. केवळ देण्याच्या इच्छेनं हृदय संतुष्ट असतं. असं हृदय खूप सहनशील असतं. ते केवळ आपल्याला लाभलेलं दुसऱ्याला वाटून देत असतं. शुद्ध प्रेमातला विरह देहभेट लांबल्याचा नसतो, तर नुसत्या दर्शनाची आस दुर्लभ झाल्याचाही असतो. विरहाची आर्तता प्रेमळ हृदयाला सामान्य मोहांपासून दूर करते. कबीर सांगतात, मनावरचे विकारांच्या संस्कारांचे डाग याच भावस्थितीत दृष्टीस पडतात. हेच चेतनेचं उन्नयन असतं. पण, हे डाग पुसले जाण्यासाठी आपल्याहून अधिक शुद्ध चेतनेचं कुणी सहज साधनेतून भेटावं लागतं. ते सद्गुरुच तर असतात! दोन जीवांतल्या प्रेमाचा आलेख हा असा देहभाव, मनोभाव जाणून घेऊन अनासक्त होण्यानं होतो. आपल्यासारख्या भौतिक जगात गुंतलेल्या माणसांना केवळ प्रेमच मुक्त करतं, हे कबीरांचं सांगणं अनंत प्रेमातलं आहे. ते हृदयानं जाणून घेण्यातच आपलं हित आहे. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)
राज्य आहे लोकांचे:लोकांच्या समस्यांपासून निवडणुका दुरावतात तेव्हा...
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये जे घडले आणि त्यानंतर आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत जे जनमत समोर आले, ते येणारी अनेक वर्षे देशातील लोकशाहीसाठी एक केस स्टडी बनून राहणार आहे. लोकशाही प्रक्रियेच्या सबलीकरणा साठी काही सकारात्मक आणि काही नकारात्मक अशा दोन्ही बाजू या निमित्ताने पुढे आल्या. अशा सर्व बाबी समोर ठेऊनच या निवडणुकांचा परामर्श घेतला पाहिजे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नव्या चेहऱ्यांना, तरुणांना, महिलांना संधी देण्याच्या घोषणा धुडकावून पारंपरिक पद्धतीने उमेदवार निवडले. यात नवखे चेहरे होते, ते मोठ्या राजकीय कुटुंबातीलच. अलीकडच्या काळात ‘सक्षम’ उमेदवार याचा अर्थ कार्यक्षमतेपेक्षा भरमसाट पैसे खर्च करणारा असा होतो. त्यामुळे काही तरी वेगळे करू पाहणाऱ्या किंवा पारंपरिक राजकारणाचा पट बदलू पाहणाऱ्या नव्या रक्ताला राजकारणात आणि त्यातही निवडणुकीच्या रिंगणात ‘स्पेस’ मिळण्याचा प्रश्न या निवडणुकीतही अनुत्तरित राहिला. सर्वच पक्षांकडून सर्वाधिक पैशांची उलाढाल झालेली निवडणूक म्हणूनही या निवडणुकीची नोंद होईल. राजकारणातून अमाप पैसा कमावणे आणि त्यातील एक भाग निवडणुकीसाठी विशिष्ट प्रकारे खर्च करून परत निवडून येणे, हा पॅटर्न काही अपवाद वगळता यावेळीही दिसून आला. राजकारण आणि निवडणुका या दोन गोष्टींना वेगळे करणारी ही निवडणूक ठरली. राजकारण म्हणजे एखाद्या पक्षाची मूलभूत विचारसरणी हा त्याचा पाया म्हणून समाजात रुजवणे आणि त्या आधारे पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक लढवणे. पण, या दोन गोष्टींचा आता अर्थाअर्थी संबंध उरला नसल्याचे लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक वास्तव या निवडणुकीतून समोर आले. पक्ष आणि उमेदवार जसे दीर्घकालीन विचार न करता ‘व्यावहारिक’ झाले, तसे मतदारही आपल्याला तातडीने काय लाभ होईल, या विचाराकडे झुकल्याचे दिसले. या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजना हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला. तो मताधिक्क्य वाढवण्यात परावर्तित झाल्याने येणाऱ्या काळात रेवडीचे राजकारण, त्यातही महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रकार वाढतील. पण, यातून बाहेर आले ते केवळ निवडणूक जिंकण्याचे तंत्र. सर्वच पक्षांनी १० टक्क्यांपेक्षा कमी महिला उमेदवार दिले आणि निवडून आलेल्यांमध्ये त्याही पेक्षा कमी महिला आहेत. ‘लाडकी बहीण’च्या प्रभावामुळे प्रत्यक्ष राजकारणात महिला-भगिनींना प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा मात्र विरुन गेला. महायुतीला मिळालेले बहुमत ही राज्यासाठी स्थिर सरकारच्या दृष्टीने जमेची बाजू असली, तरी ते एकतर्फी असल्याने कमकुवत आणि जवळपास अस्तित्वहीन विरोधी पक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीसाठी ही नकारात्मक बाजू मानली जाते. अर्थात याला विरोधी महाविकास आघाडीतील पक्षही आणि त्यांचे नेतेही जबाबदार आहेतच. काँग्रेसच्या नेत्यांना तर दरबारी राजकारणातून बाहेर पडत, १९६३ च्या ‘कामराज मॉडेल’ची आठवण आणि शिकवण देण्याची वेळ आली आहे. राजकारणाचा अतिरेक होऊन शीर्षस्थ नेत्यांचा तळागाळाशी संबंध तुटतो आणि नेतेगिरी, भाषणे, पदे, निवडणुका याच हस्तदंती दुनियेत पक्षाचे नेतृत्व रमते, तेव्हा कामराज मॉडेलची आठवण अनिवार्य ठरते. १९६३ मध्ये काँग्रेस पक्षात मरगळ आली तेव्हा मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री कुमारस्वामी कामराज यांनी एक प्रस्ताव ठेवला. सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व कुठलेही पद न घेता पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये जाऊन कामे करावी, पक्षबांधणी करावी आणि पक्षाची विचारसरणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावी, असा हा प्रस्ताव होता. तो स्वीकारला गेला. ६ मुख्यमंत्री आणि ८ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे देत पक्षाचे काम सुरू केले. त्यामुळे विरोधी पक्षांना कात टाकायची असेल, तर आजच्या काळातही हे ‘कामराज मॉडेल’ राबवावे लागेल. ‘बटेंगे तो कटेंगे’सारखी घोषणा तसेच मराठा - ओबीसी ध्रुवीकरण या दोन गोष्टींमुळे ही निवडणूक धर्म आणि जात या दोन्हींपासून लांब राहू शकली नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वीही जातीचा मुद्दा असायचा. धर्माचा मुद्दा आला, तर तो लोकसभेच्या निवडणुकीत यायचा. आता मात्र महाराष्ट्रात अगदी छोट्या निवडणुकीतही धर्माच्या मुद्द्याचा प्रवेश झाल्याचे दिसते. त्याचप्रमाणे, निवडणूक जिंकण्यासाठी अगदी कमी वेळेत, आधुनिक प्रचारतंत्र वापरून मतदारांच्या मनात विशिष्ट नॅरेटिव्ह रुजवण्याचे, त्यांच्या सद्सद्विवेकावर ताबा मिळवण्याचे प्रकार निखळ लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्यच मानले पाहिजेत. गेल्या पाच वर्षांत राज्याने कोरोना महामारीप्रमाणेच महागाई, बेरोजगारी, दुष्काळ-अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, स्पर्धा परीक्षा - प्रवेश परीक्षांतील घोटाळे अशी कित्येक संकटे अनुभवली. निवडणुकीच्या चर्चेत आणि प्रचारात मात्र दुर्दैवाने हे मुद्दे कुठेही नव्हते. त्यामुळे राजकारण आणि सामाजिक मुद्दे, निवडणुका आणि सामान्यांचे प्रश्न या गोष्टी एका लयीत येण्यासाठी अजून बरीच वाट पाहावी लागेल, असे दिसते. (संपर्कः dramolaannadate@gmail.com)
सासऱ्यांनी दिव्याला सांगून प्रथमेशला महापालिकेच्या निवडणुकीत उभं केलं. ते सरकारी नोकरीत असल्याने उभे राहू शकत नव्हते. पण, जावयाला उभं करून बघू म्हणाले. प्रथमेश जन्मला तेंव्हापासून त्याचं जिंकायचं राहूनच गेलं. म्हणजे त्याच्या आईवडिलांची खूप इच्छा होती की मुलगी व्हावी. सगळे म्हणायचे, मुलगा होईल. बरेच नातेवाईक मुलगा होईल म्हणून पैजही लावून बसले होते. पण, आईवडिलांना विश्वास होता, मुलगीच होईल. पण, झाला प्रथमेश. त्या काळात पैजेवर पंचवीस हजार तरी हरले होते प्रथमेशचे आईवडील. अर्थात त्यात बिचाऱ्या प्रथमेशचा काय दोष? पण, शाळेतही त्याच्या नशिबात कधी विजय आला नाही. म्हणजे चहाचा कप सोडला, तर दुसरा कप त्याच्या हाती आलाच नाही. नाही म्हणायला पाचवीत एकदा तो धावण्याच्या शर्यतीत पहिला येत होता. अंतिम रेषा अगदी पन्नास मीटरवर होती. पण, नेमकी त्याची चड्डी सुटली. ती सावरत तो एका जागी उभा राहिला, बाकी सगळे पुढे निघून गेले. पहिला येता येता बिचारा शेवटचा आला. नशीबसुद्धा चड्डीसारखं त्याला ऐनवेळी धोका द्यायचं. तरी प्रथमेशला मानलं पाहिजे. आजवर त्याने प्रयत्न सोडले नाहीत. कधी खचला नाही. दुसरा कुणी असता, तर त्याने कुठल्या स्पर्धेत भागच घेतला नसता. पण, प्रथमेश हार मानणारा नव्हता. त्याने पाच वर्षे बुद्धिबळपटू होण्यासाठी कसून मेहनत केली. लोकांशी खेळून आपण हरतो म्हणून तो संगणकाशी खेळायचा. सराव करायचा. त्याला विश्वविजेता व्हायचं होतं. पण, पहिल्याच स्पर्धेत अवघ्या पाचव्या चालीत त्याला एकाने चेकमेट केलं. प्रथमेशने दुसरा खेळ निवडला. तो क्रिकेटचा सराव करू लागला. सगळा दोष प्रथमेशचा नव्हता. त्याचे वडील त्याला जिंकलेलं बघण्यासाठी वेडे झाले होते. मुलगा कपिलदेव व्हावा, ही त्यांची इच्छा. मग प्रथमेशला ते स्वतःच मैदानात नेऊ लागले. गल्लीतली पोरं गोळा करून त्यांना फलंदाजी करायला लावायची. प्रथमेश गोलंदाजी करायचा. प्रथमेशच्या सुमार गोलंदाजीला वैतागून पोरांनी येणं बंद केलं. वडील पोरांना पैसे देऊ लागले. एक रुपया, दोन रुपये करता करता हजारो रुपये गेले. पण, प्रथमेशची गोलंदाजी काही सुधारत नव्हती. उलट दोन पोरं या नादात चांगले फलंदाज झाले. जिल्ह्याच्या संघात गेले. हजारो रुपये घालवल्यावर वडिलांनी मुलाला यशस्वी गोलंदाज बनवायचा नाद सोडून दिला. आई नाराज झाली. एक दिवस प्रथमेशचा मामा आला. मामाने प्रथमेशला वसीम अक्रम बनवायचं ठरवलं. त्याने नवीनच युक्ती केली. कुणाला फलंदाजी करायला न लावता त्याने फक्त एक स्टम्प लावला. मामा विकेट कीपर झाला. प्रथमेश गोलंदाजी करू लागला. पण, तो स्टम्प काही उडायचं नाव घेईना. मामाही थकला होता. पण, भाचाला नाराज करायचं त्याच्या जीवावर आलं. त्याने एक आयडिया केली. त्याने प्रथमेशशी एक पैज लावली. मामाने आपली सोन्याची अंगठी स्टम्पवर ठेवली. आता प्रथमेशने तो स्टम्प उडवला, तर ती अंगठी मामा प्रथमेशला देणार, असं ठरलं. अर्धा तास गोलंदाजी करून थकलेला प्रथमेश जरा उत्साहात आला. दहा-पंधरा चेंडू टाकल्यावर एकदाचा तो स्ट्म्प उडाला. हो एकदाचा उडाला. आणि प्रथमेश पहिल्यांदा पैज जिंकला. छे! प्रथमेशने स्टम्प एवढ्या जोरात उडवला की, तो लांब अगदी चुलीत गेला. पण, अंगठी काही दिसेना. दीड तास मामा-भाचे आणि बघे अशा सगळ्यांनी मिळून ती सोन्याची अंगठी शोधली. अंधार झाला. दुसऱ्या दिवशी प्रथमेशच्या वडिलांनीही येऊन अंगठी शोधली, पण ती मिळाली नाही. पुढं मामा वर्षभर भाचाच्या घरी आला नाही. तर, असा प्रथमेश कसाबसा पास झाला. त्यानं कशीबशी नोकरी मिळवली. पण, त्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, तो कधीच निराश नसायचा. कुणालाही मदत करणं, हा त्याचा स्वभाव. त्याबद्दल सगळ्या कॉलनीत त्याची ख्याती होती. कुणीही त्याचं कौतुकच करायचं. पण, हे कौतुक डोक्यात जायला वेळ लागला नाही. यावेळी हे कौतुक सासरच्या लोकांच्या डोक्यात गेलं. आता प्रथमेश आईवडिलांसोबत राहात नव्हता. सासऱ्याने त्याला वेगळ्या भागात घर घेऊन दिलं. प्रथमेश एकुलता एक मुलगा असून त्याचा कधी फायदा झाला नाही. पण, एकुलता एक जावई असल्याने लाड सुरू होते. सासऱ्यांनी मुलीला म्हणजे दिव्याला सांगून प्रथमेशला महापालिकेच्या निवडणुकीत उभं केलं. सासरे सरकारी नोकरीत असल्याने उभे राहू शकत नव्हते. पण, जावयाला उभं करून बघू म्हणाले. तसे ते वेगळ्या शहरात राहायचे. पण, जावयासाठी त्यांनी पैसे खर्च केले. दोन दिवस मुक्काम ठोकून प्रचार केला. जो तो जावयाबद्दल छान बोलायचा, त्यामुळं त्यांना आनंद व्हायचा. प्रथमेशची बायकोही खुश होती. निकालाचा दिवस उजाडला. शेवटपर्यंत प्रथमेशच्या मतात वाढ झाली नाही. सुरूवातीला त्याला एक मत पडलं. तेवढंच. बाकी कुणाचंच मत नाही. प्रथमेशला पहिल्यांदा खचलेलं पाहिलं लोकांनी. प्रथमेशची बायको मात्र जास्त अस्वस्थ होती. तिला सारखं वाटत होतं की, प्रथमेशला काय वाटत असेल? एकच मत पडल्यामुळं सगळा गोंधळ झाला होता. आपण नवऱ्याला मत दिलं नाही, अशी लोक चर्चा करताहेत, हे तिच्या कानी येऊ लागलं. तशी ती खूपच टेन्शनमध्ये आली. प्रथमेश घरी आलाच नव्हता. फोनही उचलत नव्हता. तो काय विचार करत असेल, हाच विचार दिव्याच्या मनात चालू होता. रात्री उशिरापर्यंत प्रथमेश घरी आला नाही, तेव्हा ती बिचारी रडवेली झाली. तरी वडिलांनी फोन करून तिला धीर दिला. पण, दिव्याला दिसत होतं.. एका मतामुळं संसार मोडणार. खूप विचार करून डोळे लाल झाले. जेवायची तर इच्छाही उरलेली नव्हती. शेवटी एकदाचा प्रथमेश आला. त्याला पाहून दिव्या हैराण झाली. तो चक्क शिट्टी वाजवत आला होता. आल्यावर तिला ‘सॉरी’ म्हणाला. दिव्याला हे सगळं वेगळंच वाटत होतं. प्रथमेश सॉरी म्हणाला कारण त्याला उशीर झाला होता. त्याला उशीर झाला होता कारण तो दिव्यासाठी गिफ्ट आणायला गेला होता. तिच्या आवडीची पर्स. ती काही केल्या मिळत नव्हती. मिळाली. पण, पर्स का? प्रथमेशने सांगितलं की, त्याचं स्वतःचं मत त्याच्या चुकीने बाद झालं होतं. निकालाची त्याला एवढीच भीती होती की, शून्य मतं पडू नयेत. पण, तसं झालं नाही. दिव्याच्या एका मतामुळे त्याची अब्रू वाचली. ते खरंच होतं. दिव्या संध्याकाळपासून विचार करत होती की, आपलं मत बाद झालं नाही ना? आता विनाकारण प्रथमेशचा आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही ना? पण, तसं झालं नाही. प्रथमेश त्या एका मतामुळं आनंदी होता. त्याला पहिल्यांदाच जिंकल्यासारखं वाटत होतं... (संपर्कः jarvindas30@gmail.com)
अलीकडेच मी दोन महान कॅमेरामन अशोक मेहता आणि मनमोहन सिंह यांच्याविषयी लिहिले होते. ते वाचून मला अनेकांचे फोन आणि ई मेल आले. काही जण म्हणाले की, सिनेमाच्या निर्मितीमध्ये कॅमेरामनची भूमिका किती महत्त्वाची असते हे आम्हाला समजले, कारण प्रेक्षकांना सिनेमा तोच तर दाखवत असतो. त्यांच्याविषयी आम्हाला माहिती मिळाल्याने खूप बरे वाटले. या प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला की, भारतातील आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील आणखी एका मोठ्या कॅमेरामनबद्दलही आपण लिहिले पाहिजे. त्यांचे नाव आहे राधू करमाकर. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये राधूजींविषयी... राधूजी महान कॅमेरामन होते. ते राज कपूर यांचा उजवा हातच होते म्हणाना. १९९३ ची ही गोष्ट आहे. मी ऋषी कपूर यांच्या घरी त्यांच्यासोबत बोलत बसलो होतो. तो लँडलाइन फोनचा काळ होता. फोन वाजला आणि तो उचलताच ऋषीजींनी ‘काय?’ असे उद्गार काढले. त्यांच्या बोलण्यावरुन काही वाईट बातमी असणार, हे माझ्या लक्षात आले. त्यांनी फोन ठेवला, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. मी विचारले, ‘चिंटूजी, सगळे ठीक आहे ना?’ ते रडू लागले. म्हणाले, ‘कार अपघातात राधूजींचे निधन झाले आहे. ते आता आपल्यात नाहीत..’ चिंटूजी खूप भावविवश झाले होते. मी त्यांना पाणी दिले. ते म्हणाले की, पिताजींच्या दोन भक्कम बाजू होत्या. एक राधू करमाकर आणि दुसरे रेकॉर्डिस्ट अल्लाउद्दीन खां साहेब. दोघांनाही अनैसर्गिक मृत्यू आला. बेंगळुरूमध्ये संजय खान यांच्या टिपू सुलतान या मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीत भाजल्याने अल्लाउद्दीन खां साहेबांचा मृत्यू झाला होता. राधूजींचा मृत्यू अपघातात झाला. चिंटूजी मला राधूजींबद्दल सांगत होते. ते म्हणाले की, मी पहिल्यांदा स्वत:ला पडद्यावर पाहिले तेही राधूजींच्या नजरेनेच. ‘मेरा नाम जोकर’ माझा पहिला सिनेमा होता. तो राधूजींनीच शूट केला होता आणि त्यानंतर ज्या सिनेमातून हीरो म्हणून माझे लाँचिंग झाले, त्या ‘बॉबी’चे शूटिंगही त्यांनीच केले होते. अशा अनेक आठवणी चिंटूजींनी सांगितल्या. पुढे एकदा मनमोहनजींनी राधूजींची आठवण जागवली. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’मध्ये मनजी त्यांचे सहायक होते. त्यांनी सांगितले की, या सिमेमात झीनत अमान यांच्या गाण्यात सूर्योदयाचे दृश्य चित्रीत करायचे होते. सूर्य उगवतोय आणि झीनत चालत येताहेत, असा तो शॉट होता. आम्ही सगळे सहायक आणि लाइटमन पहाटे पाचलाच जावून शॉट रेडी करुन बसलो होतो. झीनत अमान आल्या, तयारही झाल्या. पण, दिग्दर्शक असलेले राज कपूर साहेब आले नव्हते. ते आठ वाजता आले, तोवर सूर्य वर आला होता. त्यामुळे शॉट घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी राधूजींनी पुन्हा सगळी तयारी केली, राज साहेब पुन्हा आठ वाजता आले आणि म्हणाले, ‘अरे राधू, रात्री झोप येत नव्हती..’ राज कपूर साहेबांना सकाळी उठायला थोडा उशीर होतो, हे सगळ्यांना माहीत होते. तिसऱ्या दिवशीही राज साहेब उशिरा आल्यावर राधूजी म्हणाले, आज काहीही झालं तरी मी शॉट घेणारच! राज साहेबांनी ‘कसा काय?’ असं विचारलं. राधूजी हुशार कॅमेरामन होते. त्यांनी मशीनच्या सहाय्याने हवेत धूर सोडला, त्यामुळे धुके तयार झाले. त्यांच्याकडे एक खास फिल्टर होता. त्यातून ते थोड्या लाल, निळ्या रंगांचा वापर करत. हा फिल्टर लावून आणि आसमंतात सोडलेल्या धुरातून त्यांनी सकाळी आठला असा शॉट घेतला की तो अगदी सूर्योदयाचा वाटावा. हे दृश्य सिनेमात दिसते. राधूजी आपल्या कलेमध्ये असे माहीर होते. यावरुन मला अकमल इमाम यांचा एक शेर आठवतोय... उंगलियों के हुनर से ऐ ‘अकमल’ शक्ल पाती है चाक पर मिट्टी। आणखी एक कमालीची गोष्ट. राज कपूर साहेब ‘संगम’ हा पहिला रंगीत सिनेमा बनवत होते. त्यावेळी भारतात रंगीत फिल्मविषयी फारसे जाणकार लोक नव्हते. राधूजींनीही रंगीत फिल्मचे काम केले नव्हते. त्यामुळे राज साहेबांनी हॉलीवूडमधील एका मोठ्या कॅमेरामनशी संपर्क साधला आणि आपण पहिला रंगीत सिनेमा बनवत आहोत आणि तुम्ही तो करावा, असे सांगितले. त्या कॅमेरामनने उत्तर दिले की, आधी तुमचा एखादा सिनेमा मला पाठवा. तुम्ही कसे दिग्दर्शन करता, ते मला पाहू द्या. त्यानंतरच मी निर्णय घेईन. मग राज साहेबांनी ‘श्री ४२०’ची प्रिंट पाठवली. त्या कॅमेरामनकडून पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, तुमच्या कॅमेरामनने जे लाइटिंग वापरले आहे, जो अँगल लावला आहे आणि ज्या प्रकारे शूट केले आहे, त्यावरुन वाटतेय की ते माझ्यापेक्षाही उत्तम कॅमेरामन आहेत. त्यांना फक्त कलर टेक्नॉलॉजी शिकावी लागेल. माझ्याकडे दोन महिन्यांसाठी त्यांना पाठवा, मी कलरच्या सगळ्या गोष्टी शिकवतो. राधूजींनी त्यांच्याकडे पाठवण्यात आले. तिथून शिकून ते परत आले आणि त्यानंतर ‘संगम’चे शूटिंग झाले. हॉलीवूडच्या कॅमेरामनचे ते पत्र आर. के. स्टुडिओत ठेवले होते. पण, स्टुडिओला लागलेल्या आगीत हे पत्रही जळाले. राज कपूर साहेबांनी राधूजींना दिग्दर्शक म्हणूनही काम दिले. त्या सिनेमाचे नाव होते ‘जिस देश में गंगा बहती है’. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. आज राधूजींच्या स्मृतींमध्ये ‘जिस देश में गंगा बहती है’मधील हे गाणे ऐका... होंठों पे सच्चाई रहती है, जहां दिल में सफाई रहती है, हम उस देश के वासी हैं, जिस देश में गंगा बहती है… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
देश - परदेश:दिल हरवलेली दिल्ली
दिल्लीतील प्रदूषणाने निर्माण झालेल्या जीवन-मरणाच्या परिस्थितीत नेमकं काय करावं, हा प्रश्न पडला आहे. दिल्ली सोडून जावं तर कुठं जावं? पोटापाण्याचं काय? मुलांच्या शिक्षणाचं काय? आणि सध्याची ही स्थिती बदलायला किती वर्षे लागतील? या दूषित वातावरणात राजधानीचा स्मार्टनेस कुठं गुदमरलाय अन् दिलदार दिल्लीचं ‘दिल’ कुठं हरवलंय, तेच कळत नाही. गेल्या पंधरवड्यात एका बाजूला ‘महा’राष्ट्रात निवडणुकांचा ‘महा’धुरळा उडत होता, तर दुसरीकडे दिल्लीत प्रदूषणाचा ‘महा’कहर सुरू झाला. भारताची राजधानी दिल्ली. इथं देशाचे सगळे महत्त्वाचे निर्णय होतात. पंतप्रधानांच्या कार्यालयासह सर्व मंत्रालये इथे आहेत. देशाचे आर्थिक अंदाजपत्रक इथेच तयार होते. सगळ्या योजनांना आकार देणारा, त्यासाठीचे निर्णय घेणारा नीती आयोग प्रत्येक प्रश्नाचा तपशीलवार अभ्यास करुन धोरणांचा गोषवारा इथेच ठरवतो. देशातील विविध प्रश्नांवर आलेल्या घटनात्मक पेचांवर विचारविमर्श करणारे सर्वोच्च न्यायालय इथेच आहे. शिवाय, देशाच्या प्रगतीसाठी कायदेकानून बनवणारी संसदही इथेच आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर गेली कित्येक वर्षे उपाय का निघत नाही, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे ‘नेहमीच असते इथे प्रदूषण’ अशी या प्रदूषणाची आम्हा सर्वांना सवय झाली आहे. पण, या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नामुळे संपूर्ण दिल्ली आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार केला तर संताप आल्याशिवाय राहात नाही. जगातील पहिल्या १५ अत्याधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरे असतील? अशी १२ शहरे आहेत. ‘आयक्यू एअर’ या स्विस संस्थेची २०२३ ची आकडेवारी पाहिली, तर आपली मान लज्जेने खाली जाते. दिल्ली सर्व प्रदूषित शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर, तर नवी दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी आणखी तपशिलात जाऊन पाहिली, तर पहिल्या ५० शहरांमधील ४२ शहरे भारतातील आहेत. जगातील अतिप्रदूषित देशांमध्ये भारताचा क्रमांक खूप वरचा आहे. पण, वास्तविकता अशी आहे की, कोणाला दोष द्यावा हेही कळत नाही. दिल्लीतील प्रदूषणाविषयी दरवर्षी होते तीच कंटाळवाणी आणि निष्पळ चर्चा सध्या सुरू आहे. एकदा नोव्हेंबर आला, थंडी पडू लागली की ही चर्चा सुरू होते. दिवाळीच्या आधी चिनी फटाक्यांवर निर्बंध घालण्याचा आणि दिवाळीच्या दिवसांत फटाके उडवण्यावर बंदी घालण्याचा न्यायालयाचा आदेश येतो. प्रमाण कमी झाले असले, तरी फटाके वाजतात म्हणजे वाजतातच. भारतीयांची मानसिकता समजणे अवघड आहे. शासनाचा आदेश, पोलिसांची देखरेख, न्यायालयाचा निर्णय, सरकारचे पूर्ण पानांचे वृत्तपत्रीय आवाहन आणि ‘हे सर्व दंडनीय अपराध आहेत,’ अशी सावधानीची सूचना असूनही लोक फटाके कुठून आणतात आणि कसे उडवतात, हेच कळत नाही. पुढे लग्नाचा मोसम येतो आणि फटाके उडतच राहतात. प्रदूषणाबरोबरच या सर्वांचा ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, परीक्षार्थी विद्यार्थी यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा कुणीच कसा विचार करत नाही? आपण सगळे इतके बधीर आणि असंवेदनशील कसे झालो आहोत? दिल्लीच्या प्रदूषणाला कारणीभूत घटक कोणते आहेत? औद्योगिक प्रदूषण, कचरा, वाहतुकीचे दुष्परिणाम, घरांमधील धुराने होणारे प्रदूषण, पाचोळा जाळणे आणि डिझेल जनरेटर्स आदी गोष्टी या समस्येच्या मुळाशी आहेत. आजकाल दिल्लीचा एक्यूआय ३०० – ४०० असा माणसाच्या आणि प्राणी-पक्षी या सर्वांच्या जिवाला धोकादायक आहे. दीड कोटीच्या वर वाहने असलेल्या या शहरात दिवसागणिक नवी वाहने वाढताहेत. दरवर्षी प्रदूषणाचे विक्रम मोडणारे असे शहर म्हणजे दिल्ली. दिल्ली सरकार, केंद्र सरकार, प्रदूषण नियंत्रण विभाग, दिल्ली जल बोर्ड, दिल्ली महापालिका अशा अनेक संस्था या परिस्थितीला जबाबदार आहेत. राष्ट्रीय हरित प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, मानवाधिकार आयोग या सर्व संस्था सातत्याने परिस्थितीवर नजर ठेऊन असतात. दरवर्षी दिल्ली शासनाबरोबरच हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश यांचे प्रशासन परिस्थिती सुधारत असल्याबद्दल आणि आपण करत असलेल्या कार्यवाहीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करतात. पण, प्रत्यक्षात परिणाम शून्य! जनतेच्या सहनशीलतेचा आता अंत झालेला असला, तरी असहाय्य जनता हूं की चूं करत नाही. आता पुन्हा एकदा दिल्लीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल. जाहीरनामे, प्रचार-प्रसार, उंच आवाजातील भाषणे, आश्वासने, पोस्टरबाजी या सर्वांचा पाऊस पडेल. सर्वपक्षीय नेतेच नव्हे, तर जनताही त्यात स्वत:ला सुखनैव वाहवून घेईल. राजधानी क्षेत्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणच काम करतो आहोत, असा आभास तयार करण्याच्या नादात आमच्या सर्वांचे श्वास-उच्छ्वास बंद करु पाहणाऱ्या प्रदूषणाचा सगळ्यांना विसर पडेल.विचार करणाऱ्या व्यक्तींना मात्र या जीवन-मरणाच्या परिस्थितीत नेमकं काय करावं, हा प्रश्न पडला आहे. दिल्ली सोडून जावं तर कुठं जावं? पोटापाण्याचं काय? मुलांच्या शिक्षणाचं काय? प्रदूषणमुक्त अशी किती शहरे आहेत? आणि सध्याची ही स्थिती बदलायला किती वर्षे लागतील? नव्या दिल्लीतील नागरी सुविधा दिल्लीच्या इतर भागात नाहीत. पाण्याचा अनियमित पुरवठा, पादचारी मार्गांचा अभाव किंवा तुटलेल्या फरशा, अधूनमधून कचऱ्याचे ढीग, कागद आणि प्लास्टिकचे तुकडे... या एकूणच दूषित वातावरणात राजधानीचा स्मार्टनेस कुठं गुदमरलाय अन् दिलदार दिल्लीचं ‘दिल’ कुठं हरवलंय, तेच कळत नाही. यावर उपाय आहे का? हो. समस्त दिल्लीकरांना थंडीचे चार - पाच महिने दिल्ली सोडावी किंवा राजधानी दिल्लीऐवजी नव्या राजधानीचा दिल्लीपासून दूर पर्याय शोधावा. पण, हे खरेच शक्य होईल? काहीच सांगता येत नाही. त्यामुळे तूर्त ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’. (संपर्कः dmulay58@gmail.com)
रसिक स्पेशल:निवडणूक निकाल अन् शेअर बाजारातील तेजी
शेअर बाजार निर्देशांकात झालेली वाढ किंवा तेजीची सुरूवात आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल या गोष्टी एकाच काळात घडल्या, तरी त्यांचा एकमेकांशी कारणे - परिणाम असा संबंध नसतो. तथापि, निवडणूक निकाल हा निर्देशांकातील वाढीवर परिणाम करणारा घटक मानला, तरी तो फक्त ‘एक’ घटक असू शकतो, ‘एकमेव’ नाही! आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचे तसेच देशातील काही लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. याच दरम्यान शेअर बाजारही सकारात्मक सूर आळवू लागला. त्यामुळे निर्देशांकातील या वाढीमागे विधानसभा निवडणुकीचा निकाल, विशेषत: महाराष्ट्रात भाजपला मिळालेले भरघोस यश हे कारण असल्याची मांडणी काही जण करु लागले. महाराष्ट्रात आता ‘दमदार सरकार’ येणार असल्याने बाजराने उसळी घेतल्याचा दावाही ते करत होते. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे, ते देशाचे अर्थकारण ठरवण्यात अग्रेसर असते, हा मुद्दाही ठळकपणे मांडत होते. सुमारे ३५ वर्षे मी भारतीय गुंतवणूक क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळे असे खरेच काही घडू शकते का, हा विचार मनात येऊ लागला. त्यावर अभ्यास करताना, महाराष्ट्रातील निवडणूक निकालांचा आणि शेअर बाजारातील वाढीचा अर्थाअर्थी काही संबंध नसल्याचे दिसले. मी पक्का महाराष्ट्रीयन असूनही हे दावे सरसकटपणे आणि तेही सहजासहजी मान्य करणे मला अवघड जात होते. तत्त्व म्हणून, तपशील म्हणून आणि तथ्य म्हणूनही! ‘फ्युचर’ अपेक्षितच नसेल तर..? मुळात अशी चर्चा होण्याचे एक कारण म्हणजे, देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. विदेशी वित्त संस्थांच्या आपल्या देशातील गुंतवणुकीचा विचार करता महाराष्ट्र हे राज्य त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. अगदी गेल्या तीन महिन्यांच्या काळात देशातील इतर राज्यांपेक्षा सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. पण म्हणून निर्देशांकातील वाढीचे श्रेय विधानसभा निवडणूक निकालाला देता येईल का? याबाबतीत निष्कर्ष काढताना काही तथ्ये समजून घ्यायला हवीत. विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी २० नोव्हेंबरला झाले. त्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे साडेपाच टक्के वाढ झाली. निवडणुकीचे निकाल शनिवारी, २३ नोव्हेंबरला जाहीर झाले. पण, शेअर बाजारातील निर्देशांकात तर गुरुवारपासूनच वाढ होत होती. बुधवारी सायंकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. तथापि, त्यानंतरही जिथे सर्व राजकीय पक्षांना निकाल काही प्रमाणात अनपेक्षित असतील असे वाटत होते, तिथे शेअर बाजाराला मात्र हे निकाल असेच लागण्याची अपेक्षा होती, असे मानणे सयुक्तिक होणार नाही. त्यामुळे जे नव्हतेच ते कसे होणार? अगदी Stock Market Always Discounts The Future हे बाजाराचे ‘लाडके तत्त्व’ लावायचे ठरवले, तरी असे काही ‘फ्युचर’ आहे, हे अपेक्षित असावे लागते. तसे इथे होते का? याचे उत्तर नकारात्मक असू शकते. अर्थचक्र मंदावण्याचा काळ मर्यादितदुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, लोकसभा निवडणुका आणि त्यांच्या निकालांचा शेअर बाजारावर किंवा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रावर जितका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, प्रकट किंवा प्रच्छन्न असा परिणाम होतो तितका, तेवढा आणि तसा परिणाम विधानसभा निवडणुका आणि निकालाचा होत नाही. कारण लोकसभा निवडणूक निकालाचा राष्ट्रीय आर्थिक धोरणावर जेवढा परिणाम होतो किंवा होऊ शकतो, तेवढा तो विधानसभा निवडणुकांमुळे होत नसतो. त्यातही असा प्रभाव पडणारच असेल, तर कोणत्याही निवडणुकीतील मतदान किती टप्प्यांमध्ये पार पडले, याचा नीट विचार करणे क्रमप्राप्त ठरते. कारण मतदानाचे टप्पे जितके जास्त तितका आचारसंहितेचा काळ जास्त. आणि आचारसंहितेच्या काळात धोरणात्मक निर्णय होत नाहीत. त्यामुळे अर्थचक्र मंदावण्याचा कालावधी वाढतो. महाराष्ट्रात सर्व २८८ मतदारसंघांत एकाच टप्प्यात, एकाच दिवशी मतदान झाले. त्यानंतर तीन दिवसांत निकाल लागले. या निवडणुकीची घोषणा ते निकाल हा आचारसंहितेचा काळ तुलनेने बराच मर्यादित होता. त्यामुळे बाजाराने निर्देशांकात सकारात्मक आणि तीही एकापेक्षा जास्त दिवस वाढ दाखवावी, अशी परिस्थिती नव्हती. ‘पॉलिटिकल प्रॉडक्टस्’चा चढ-उतारआणखी एका महत्त्वाच्या आणि वेगळ्या स्वरूपाच्या घटकाचा मात्र इथे नक्कीच विचार केला पाहिजे. विधानसभा निवडणुका आणि निकाल यांचा संपूर्ण शेअर बाजारावर फारसा परिणाम आणि तोही मध्यम ते दीर्घकाळ झाला नाही, तरी काही विशिष्ट क्षेत्रांतील कंपन्या आणि त्यांच्या शेअर्सचे भाव यावर मात्र अल्प ते मध्यम काळासाठी नक्कीच परिणाम होऊ शकतो. त्यातही विपरीत परिणाम लगेच होतो. या दृष्टीने तेल, ऊर्जा, कोळसा, खते यांसारखी राजकीयदृष्ट्या संवेदनशील उत्पादने (ज्यांना एका अर्थाने ‘पॉलिटिकल प्रॉडक्टस्’ म्हटले जाते) तयार करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवावे लागते. अशा कंपन्यांचे संबंधित निर्देशांकात किती महत्त्व (Weightage) आहे, यावर ते अवलंबून असते. उदाहरण द्यायचे, तर निवडणूक काळात किंवा जाहीरनाम्यात अनेकदा अशी घोषणा केली जाते की, आमचा पक्ष सत्तेवर आल्यास संपूर्ण किंवा अमुक इतके युनिट वीज मोफत देऊ किंवा शेतीपंपांना वीज मोफत देऊ. साहजिकच, असा पक्ष निकालानंतर सत्तेच्या परिघात अाल्यास वीज कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात विपरीत चढ-उतार होऊ शकतात. दुसरे उदाहरण तेल कंपन्यांचे घेता येईल. आजवरच्या निवडणुकांचा अनुभव असा आहे की, आचारसंहिता काळात पेट्रोल, डिझेल, केरोसिन, घरगुती वापराचा गॅस यांच्या किमतीत बदल होत नाहीत. वाढ तर होत नाहीच नाही. या काळात अशा वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण काही कमी होत नसते. त्यामुळे संबंधित कंपन्या या वस्तू खुल्या बाजारातून खरेदी करत असतातच. त्यांच्या पुरवठ्यात खंड पडणे सरकारला परवडणारे नसल्याने मिळेल त्या भावाने त्यांची खरेदी सुरू राहते. खरेदीचा दर आणि वाहतूक खर्च काहीही असला, तरी आचारसंहिता काळात संबंधित कंपन्यांना या वस्तू नियंत्रित दरातच विकाव्या लागतात. याचा ताण या कंपन्यांवर येतो. त्यामुळे आचारसंहिता संपताच पेट्रोलियम कंपन्या भाववाढ करतात. परवा सीएनजीचे दर वाढल्यावर आपण हा अनुभव घेतला आहेच. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर अशी स्थिती असल्याने त्याचा ताणही अधिक असतो. विधानसभा निवडणूक राज्यापुरती असल्याने हा ताण मर्यादित असतो. म्हणूनही विधानसभा निवडणुकांचा शेअर बाजारावरील परिणाम तुलनेने मर्यादित राहतो. या आणि अशा विविध घटकांमुळे ही गोष्ट निश्चित होते की, देशाच्या शेअर बाजार निर्देशांकात झालेली वाढ किंवा तेजीची सुरूवात आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल या गोष्टी एकाच काळात घडल्या, तरी त्यांचा एकमेकांशी कारणे - परिणाम ( Cause - Effect) असा संबंध नसतो. कुणाला तसा अगदी बादरायण संबंध जोडायचाच असेल, तर तो बादरायणच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एकूणच निवडणूक निकाल हा निर्देशांकातील वाढीवर परिणाम करणारा घटक मानला, तरी तो फक्त ‘एक’ घटक असू शकतो, ‘एकमेव’ नाही! (संपर्कः chandrashekhartilak@gmail.com)
कबीर रंग:मंगन से क्या मांगिए, बिन मांगे जो देय...
कबीरांच्या पदातील, दोह्यांतील प्रतिकांतून त्यांची चिंतन-भूमी जीवनाचीच असल्याचं जाणवतं. रोजच्या जगण्याशी जोडलेल्या या प्रतिकांमुळं कबीरांची सत्य सांगण्याची रीत प्रत्ययकारी होते. कबीरांची भाषा अनेक बोली-भाषांच्या मिश्रणातून तयार झाली असल्यानं तिच्यात लोकभाषेचा बाज आहे. भाषेतील शब्दांशी आपण अडून राहिलो, तर कबीरांचं ‘मसि कागद छुओ नही’ आणि “लिखालिखी की है नही, देखादेखी बात’ यांतलं मर्म आपल्या ध्यानात येणार नाही.कबीरांचं अनुभवकथन हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याच्या तीव्र तळमळीतून घडलेलं आहे. एक भक्त म्हणून ज्या अवस्थांमधून त्यांना जावं लागलं, त्या अवस्थांची वर्णनं कबीरांच्या पदात, दोह्यांत आपल्याला दिसतात. देवाजवळ केलेल्या प्रार्थनेत आणि मागणीत फरक असल्याचं कबीर सांगतात. साधारण भक्त देवाजवळ कुठल्या न कुठल्या सुखाचं मागणं मागतो. कबीर म्हणतात की, या मागणीत सुख पहिल्या स्थानावर आणि देव दुसऱ्या स्थानावर असतो. मात्र, प्रार्थनेत आपल्या हृदयाच्या स्थितीचं अपेक्षा नसलेलं निवेदन असतं. कबीर हृदयातून गातात... मोर फकिरवा मांगि जाय,मैं तो देखहू न पौल्यौं। ते म्हणतात, मी तर फकीर आहे. घरादारातल्या माणसांना जवळून निरखतो, तर तिथं आधीच मला कित्येक मागणारे दिसतात. देणारं कुणी नाहीच काय, असं माझ्या फकीर- मनात येतं. कित्येक जण सधन असतात, पदं-उपाधी असलेली असतात. एवढी प्रस्थापित असूनही आपल्या वासनांच्या पलीकडचं ती पाहू शकत नाहीत. नसून असण्यातली फकिरी त्यांना जाणवत नाही. जोवर ही जगण्यात उणेपणाची भावना आहे, तोवर मागायची वृत्ती राहते. गरजा भागलेले अजून काहीची मागणी करतात, न भागलेले तर असंतुष्ट मनाचं भिक्षापात्र घेऊन देवाच्या दारात उभे असतात! मंगन से क्या मांगिए,बिन मांगे जो देय। कबीर म्हणतात, आपण ज्या संबंधित माणसाला मागतो, त्याच्या हातात भिक्षापात्र असेल, तर त्याला काय मागावं?मागितल्यावर मिळतं त्यात मौज कुठली? आत्मप्रतिष्ठा कसली? देव तर आईवडिलांकडून जन्माला आल्याचा अनुभव देतो, असतेपणाचं भान देतो, सृष्टीदर्शनाची रीत शिकायची स्थिती निर्माण करतो आणि अंतिम सत्याचा बोध घडवून आणतो. अशा महादानी देवाला सोडून ज्यांच्या मागण्या कधीच संपणार नाहीत त्यांना भिक्षा कशाला मागायची? न मागता देव आपलं मन, हृदय जाणतो, त्याला काहीच न मागता हृदयाची स्थिती निवेदन करणं उचित! कबीरांना हीच खऱ्या भक्ताची हृदयस्थिती वाटते. म्हणून कबीर या पदातून सुचवतात की, भक्त देवाजवळ काहीच मागत नाही आणि त्याच्यावर मनाच्या शांततेची, हृदयाच्या समाधानाची अनायासे कृपावर्षा होते. देवाजवळ काहीच न मागण्याच्या मनाच्या स्थितीतून आपण ‘जे आहे’ त्याचं स्वस्थपणे आकलन करून घेऊ शकतो. आपली अधिकाची हाव आणि इंद्रियगत सुखाच्या बदलांमागे धावण्याची वृत्ती आपल्याला उमजते. आपल्या श्रद्धावान मनाला ‘देणारा’ उमजतो आणि आतला घेणाराही उमजतो. कबीर म्हणतात... कहै कबीर मैं हौं वाही को,होनी होय सो होय। आता मी कधीच म्हणत नाही की असं व्हावं तसं व्हावं. मनाच्या अपेक्षा विरलेल्या असतात, इच्छा बाळगण्यातली निरर्थकता उमजलेली असते, परिस्थिती आणि मनःस्थिती बदलण्याचे सायास त्यांच्या मर्यादेसह जाणिवेत आलेले असतात, या अशा चित्ताच्या स्थितीत कबीर म्हणतात की, आपले प्राण ईश्वरावर सारं सोपवून देतात. यामुळं हृदयावरचा भार हलका होतो. चित्त चिंतामुक्त झाल्यानं आता जीवनात जे घडेल ते ईश्वराच्या इच्छेनं घडेल, अशी दृढता चित्ताला येते, असं ते अनुभवातून सांगतात. कबीरांनी दिलेलं यांतलं नियतीचं सूचन स्मरणीय आहे. केवळ भक्तालाच नियती दृष्टीसमोरच्या वस्तूसारखी लख्ख दिसू शकते आणि त्याच्या चित्ताला प्रार्थनेचा अर्थ उमजू लागतो. कबीरांच्या पदाचा हा भावार्थ आपल्याला प्रार्थनाशील करतो. (संपर्क - hemkiranpatki@gmail.com)
राज्य आहे लोकांचे...:वरची सभागृहे खरेच ‘वरिष्ठ’ राहिलीत का?
भारतीय लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा ही थेट लोकांमधून निवडून जाऊन राज्यव्यवस्था चालवण्याची आणि बदलण्याची संधी असते. यासोबत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे विभागवार निर्माण करून शिक्षित मतदारांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याची संधी देण्यात आली आहे. लोकांमधून निवडून जाण्याव्यतिरिक्त लोकशाही प्रक्रियेच्या मजबुतीसाठी राज्यसभा आणि विधान परिषद अशी वेगळी व्यवस्थाही निर्माण करण्यात आली. सध्या ६ राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. या सभागृहांना वरिष्ठ म्हणजे लोकसभा आणि विधानसभेपेक्षा वरची सभागृहे मानले गेले आहे. पण, गेल्या काही वर्षांत या सभागृहांसाठी सदस्य निवडण्याचे निकष आणि नेमणुकीचे प्रमाण बघता ही खरेच ‘वरिष्ठ’ राहिली आहेत का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. बौद्धिक, वैचारिक, सामाजिक क्षेत्रांबरोबरतच कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील पारंगत लोकांच्या सहभागामुळे संसदीय लोकशाही आणि शासन अधिक प्रभावी होईल, या विचारातून ही व्यवस्था निर्माण झाली. ज्या लोकांना निवडणूक लढवणे शक्य नाही, आपापल्या क्षेत्रातील कौशल्य आणि व्यस्ततेमुळे ज्यांना लोकांमधून निवडून जाण्यात राजकीय अडथळे येऊ शकतात, त्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक मार्ग म्हणून वरिष्ठ सभागृहांकडे बघितले जायचे. किंबहुना तेथील लोक अधिक ज्ञानी, विचारी म्हणून ते वरचे सभागृह मानले जाऊ लागले. या सोबतच राजकीय संघटनेत आणि पक्षबांधणीमध्ये अनेक वर्षे घालवलेल्यांनाही या सभागृहात काही प्रमाणात संधी मिळणे ही गोष्टही समजण्यासारखी आहे. पण, हे सभागृह पूर्ण राजकीय किंवा कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत आणि त्याचे सदस्य असलेल्या, राजकारणात सक्रिय असलेल्यांनीच भरलेले असावे, असा कधीही त्यामागचा हेतू नव्हता. गेल्या साधारण वीस वर्षांत मात्र या सभागृहांचे स्वरूप बदलत गेले. विधान परिषदेच्या काही जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि काही जागांसाठी विधानसभेचे प्रतिनिधी मतदान करतात. या निवडणुका प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाप्रमाणे जेवढ्या जागा आहेत, तितकेच उमेदवार अशी बिनविरोध झाली नाही तर त्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक खर्चिक होतात. राजकीय संदर्भात ‘घोडेबाजार’ या शब्दप्रयोगाचा वापर सुरू झाला, तो याच निवडणुकांमुळे. मग अशी स्थिती असेल, तर या सभागृहात विचारी, अराजकीय व्यक्ती जाणार कशी? त्यातच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या अशा जागा म्हणजे पक्षासाठी मागच्या व पुढच्या दाराने निधीचा स्त्रोत असू शकतो, हा शोध पक्षांना लागला. त्यामुळे अनेक पुंजीपतींची वर्णी या सभागृहांमध्ये लागू लागली. पुढे ही सभागृहे पक्षांसाठी राजकीय खरेदी-विक्रीचा बाजार ठरू लागला. काही अराजकीय किंवा राजकारणाच्या वर्तुळातील पण विचारवंत, अभ्यासू लोकांना या सभागृहांमध्ये संधी मिळालीही; मात्र अशी उदाहरणे विरळच होत गेली. राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त आणि विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्यांचाही समावेश असतो. ही नियुक्ती असल्याने ती राजकारणापासून अलिप्त असणे अपेक्षित असते. पण, यासाठीची नावे मंत्रिमंडळ बैठकीत सत्ताधारी पक्षच ठरवतात आणि या नावांची यादी केवळ स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाते. राज्य सरकार एका पक्षाचे आणि राज्यपाल दुसऱ्या राजकीय पार्श्वभूमीचे असल्यास अशा नियुक्त्यांचे काय होते, हेही महाराष्ट्राने अनुभवले आहे.एकेकाळी या दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर अगदी मध्यरात्रीपर्यंत चर्चा चालत. पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच सत्ताधारी आणि विरोधी नेते त्यावेळी आवर्जून उपस्थित राहत. या सभागृहांमध्ये मांडलेल्या अनेक प्रश्नांनी देशाच्या आणि राज्याच्या धोरणांना दिशा दिली गेली. वि. स. पागे यांनी १९७२ च्या दुष्काळात सुचवलेली रोजगार हमी योजना, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी संस्था सुरू करण्याचा निर्णय असे अनेक ऐतिहासिक निर्णय या वरिष्ठ सभागृहांतील चर्चेतून आले. आता मात्र ‘वरच्या’ समजल्या जाणाऱ्या या सभागृहांमध्ये अनेकदा अत्यंत ‘खालची’ भाषा वापरली जाते. दोन्हीकडील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याने त्यांचे निलंबन झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. याच सभागृहांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून सदस्य निवडले जातात. पण, या निवडणुका कधी होतात हेही अनेकदा मतदारांना कळत नाही. या निवडणुकांसाठी दर सहा वर्षांनी नव्याने नोंदणी करण्याची सक्ती कशासाठी, हेही न उमगण्यासारखे आहे. एकदा एखाद्या विभागात पदवीधर म्हणून नोंदणी केली की प्रत्येक निवडणुकीत मतदान करता यायला हवे. या निवडणुका त्यांच्या मतदारांपासून इतक्या लांब गेल्या आहेत की, आपला शिक्षक आणि पदवीधर आमदार कोण, हेही त्या मतदारांना माहीत नसते. लोकशाहीमध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे महत्त्व आहेच. त्यातून अगदी अल्पशिक्षित व्यक्तीलाही राज्यकर्ता बनण्याची संधी मिळते, हे या व्यवस्थेचे वेगळेपण आहे. पण म्हणून सुशिक्षित वा उच्चशिक्षितांना संधी मिळू नये, असा याचा अर्थ नाही. अशी संधी राज्यसभा आणि विधान परिषदेसारख्या सभागृहांमुळे उपलब्ध होते. राज्यकर्ते आणि कल्याणकारी राज्याची व्यवस्था कशी असावी, हे सांगताना प्लेटो म्हणतो- ‘विचारी, बुद्धिमान आणि तत्त्ववेत्ते राज्यकर्ते बनत नाहीत, तोपर्यंत शहरांची त्रासापासून पूर्ण मुक्तता होणार नाही.’ म्हणून तत्त्ववेत्त्यांना सामावून घेणाऱ्या सभागृहांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक आहे. (संपर्क - dramolaannadate@gmail.com)
ललितला जयश्रीची डायरी सापडली. जयश्री सगळ्या गोष्टी त्याला कौतुकाने दाखवायची. पण, ही डायरी कधी दाखवली नव्हती. ललित ती बघू लागला. त्यात प्रेमकविता होत्या... जयश्रीचा आज वाढदिवस. पण, नवऱ्याचा सकाळपासून पत्ता नाही. लग्नाला एकच वर्ष होत आलंय, पण एवढ्यात नवरा आपला वाढदिवस विसरला, याचा तिला खूप राग आला. मधूनच ती मनाची समजूत घालत होती की, नवरा काहीतरी सरप्राइज देणार असेल. पण, संध्याकाळ झाली तशी तिची उरलीसुरली आशा मावळली. नवरा नक्कीच विसरला असणार, याची खात्री झाली. खरं तर तिचा नवरा ललित काही विसरभोळा नव्हता. बारीकसारीक गोष्टी त्याच्या लक्षात राहायच्या. मागच्याच महिन्यात त्याने सासूला आवर्जून सकाळी सकाळी शुभेच्छा पाठवल्या होत्या. जयश्रीने न सांगता. खूपदा जयश्री बाहेर पडताना घराच्या खिडक्या बंद करणं विसरायची. पण, ललित आवर्जून घराच्या खिडक्या, गॅस, पंखे बंद आहेत का, हे चेक करतो. असा माणूस आपला वाढदिवस कसा विसरू शकतो, याचा जयश्रीला खूप त्रास होत होता. एरवी नवरा कामावर गेला की, जयश्री आरामात टीव्हीवर एखादा तरी सिनेमा बघून काढते. पण, आज तिचं सिनेमा बघण्यातही मन नव्हतं. ललित लवकर येईल आणि आपण कुठे तरी बाहेर फिरायला जाऊ, असं वाटलं होतं तिला. तो नक्की चायनीज खायला घेऊन जाईल, याची खात्री होती तिला. तिनं अशी मनोमन खूप स्वप्न रंगवली होती. पण, रात्रीचे दहा वाजले तरी ललित आला नव्हता, ना फोन उचलत होता. जयश्रीने एवढा वेळ रोखून धरलेले अश्रू आता मोकाट सुटले होते. रडून रडून बिचारी झोपी गेली. आणि कधी तरी साडेअकरा वाजता घराची बेल वाजली. ललित शांतपणे घरी आला. जयश्री वाट बघत होती की, किमान शुभेच्छा तरी देईल.. पण, नाव नाही. बिचारी जेवायला वाढू लागली. तो हातपाय धुऊन बसला. गोडधोड का केलंय, हे सुद्धा विचारलं नाही. जयश्री जरा रागातच बसून राहिली. पण, बारा वाजले आणि त्याने तिला नवा कोरा फोन काढून दिला. जयश्रीला खूप दिवसापासून फोन घ्यायचा होता. ललितने बाकी सगळे खर्च टाळून इएमआयवर नवीन फोन खरेदी केला होता तिच्यासाठी. पुन्हा एकदा जयश्रीच्या डोळ्यात अश्रू आले. आनंदाचे. सकाळ झाली. नवरा कामावर गेला. जयश्री मैत्रिणीला फोन दाखवायला निघाली. ललित कालच्या दिवशी वेळ देऊ शकला नाही म्हणून आज मुद्दाम अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन घरी आला. जयश्री घरी नव्हती. तो जरा निराश झाला. फोन करू लागला, पण जयश्रीने फोन उचलला नाही. कालच नवीन फोन घेतलाय. ललित जरा गोंधळून गेला. त्याच्याकडं चावी होती. घरात टीव्ही बघत बसला. तासभर झाला तरी जयश्रीचा फोन नाही. त्याने पुन्हा फोन लावला, तरी जयश्रीने फोन उचलला नाही. ललित अस्वस्थ झाला. जरा चिंता वाटल्यानं त्याने तिच्या मैत्रिणीला फोन लावला. पण, तिला काहीच माहीत नव्हतं. काही वेळाने ललितने जयश्रीच्या घरी फोन केला. पण, तिच्या घरच्यांना तिचा फोन आलाच नव्हता. तीन-चार ठिकाणी फोन करूनही काहीच खबरबात कळत नव्हती. ललितला चिंता वाटू लागली. बरं करणार काय? बायको फोन उचलत नाही, ही गोष्ट फार लोकांना सांगण्यासारखी नव्हती. आणि शोध घेऊन घ्यायचा कुठं? पाच वाजत आले. ललित अस्वस्थ झाला. त्याला घरात बसणं असह्य होऊ लागलं. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. त्याने घरात जरा इकडंतिकडं शोधाशोध केली. खरं सांगायचं तर तिने आपल्यासाठी काही चिठ्ठी बिठ्ठी तर ठेवली नाही ना? असा विचार त्याच्या मनात आला. नंतर त्याने विचार केला की, एवढा नवा कोरा मोबाइल घेऊन दिल्यावर ती चिठ्ठी का लिहून ठेवेल? पण, सिनेमातले काही प्रसंग डोक्यातून जात नाहीत. आधी चिठ्ठी शोधू लागतो माणूस. शोधाशोध करताना ललितला जयश्रीची डायरी सापडली. जयश्री सगळ्या गोष्टी त्याला कौतुकाने दाखवायची. पण, ही डायरी कधी दाखवली नव्हती. ललित ती बघू लागला. त्यात प्रेमकविता होत्या. जयश्री कविता लिहिते, ही गोष्ट त्याला माहीत होती. पण, तिनं चाळीस - पन्नास कविता लिहिल्या असतील, अशी शंकाही त्याला आली नव्हती. त्याने सलग दहा - बारा कविता वाचल्या. सगळ्या कवितेत प्रेम ऊतू चालेललं होतं. पण, कुठलीच कविता आपल्यावर आहे, असं त्याला वाटलं नाही. ते वर्णन आपलं नाही, याची जणू त्याची खात्रीच पटली होती. कुणावर लिहिल्या असतील तिनं कविता? कुणावर एवढं जीवापाड प्रेम असेल जयश्रीचं? म्हणजे होतं की आहे? आता मात्र ललित अजूनच अस्वस्थ झाला. त्याला आठवलं, खूपदा जयश्री एकटीच फोन बघत हसत असायची. मेसेज वाचत. ललितला एकेक गोष्ट आठवू लागली. एकदा आपण गावी गेलो होतो, तेव्हा जयश्री मैत्रिणीकडे राहायला म्हणून गेली होती. पण, त्या मैत्रिणीची जयश्रीने कधीच ओळख करून दिली नाही. म्हणाली तिची बदली झालीय. म्हणजे ती मैत्रीण नसून..? ललितच्या डोक्यात या क्षणी ज्या वेगाने विचार येत होते, तसे आयुष्यात कधीच आले नव्हते. आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडं होतं. त्याच्या ओळखीचे एक पीएसआय होते. ललित घाईत त्यांच्याकडं गेला. पीएसआयनी त्याला शांत केलं. आपण मोबाइलचं लोकेशन शोधू, असा मार्ग सुचवला. जे लोकेशन दिसत होतं, त्या दिशेने दोघे निघाले. जवळ पोचले आणि त्यांना धक्काच बसला. तो एक बंगला होता. नगरसेवकाचा. आता पीएसआय पण जरा शांतच झाले. कारण नगरसेवकावर चार खुनाचे आरोप होते. त्यातला एक खून पोलिस हवालदाराचा होता. दोघांनाही काय करावं कळत नव्हतं. त्यात पीएसआयनी आपल्याला किती माहिती आहे, या अभिमानात नगरसेवक कसा बायकांच्या बाबतीत लंपट आहे, याच्या चार-दोन गोष्टी सांगितल्या. त्या ऐकून ललित पार खचला. तरी कशीबशी हिंमत करून दोघे आत शिरले. नगरसेवकाची बायको होती. तिला घडला प्रकार सांगितला.. मोबाइलचं लोकेशन इथे दाखवतंय.. ती म्हणाली, नगरसेवक बाहेर गेलेत, पण घरात नोकर आहेत, त्यांची चौकशी करा. अखेर एका नोकराने कबूल केलं की, त्याने रिक्षात बसलेल्या बाईच्या हातावर धक्का मारून मोबाइल चोरला होता. त्याने मुकाट्याने मोबाइल परत केला. अचानक जयश्रीच्या फोनवर रिंग आली. ललितने फोन उचलला. जयश्रीच बोलत होती. फोन उचलला गेला, याचा तिला आनंद झाला. ती विनवणी करत होती.. ‘माझ्या नवऱ्याने कालच फोन घेतलाय, मी त्याला तोंड दाखवू शकणार नाही, त्याने कर्ज काढून फोन घेतलाय.. मला जीव द्यावा लागेल, प्लीज फोन परत करा. फोन मिळाल्याशिवाय मी घरी जाऊ शकत नाही.. माझा नवरा खूप कष्ट करतो, त्याचे पैसे वाया जाऊ देणार नाही..’ ललित ऐकत होता. जयश्री रडवेली झाली होती. ललितला आपण काय काय विचार करत बसलो होतो, याचा पश्चाताप झाला. लाज वाटली. जयश्रीच्या कविता आठवू लागल्या. अचानक त्या कवितेतला प्रियकर आपणच आहोत, याची खात्री पटली. तो बोलला, ‘जयश्री, मी ललित. फोन मिळाला..’ (संपर्क - jarvindas30@gmail.com)
माझ्या हिश्श्याचे किस्से:...तर मनमोहन कॅमेरामन नाही, गायक असते!
मागच्या आठवड्यात मी कॅमेरामन अशोक मेहता यांच्याविषयी सांगितले होते. आणखी एक कॅमेरामन, जे माझ्या खूप जवळचे आहेत, ते म्हणजे मनमोहन सिंह. त्यांनी एका हिंदी सिनेमाचे दिग्दर्शनही केले. त्याचे डायलॉग मी लिहिले होते. त्या सिनेमाचे नाव होते, “पहला पहला प्यार’. मनमोहन सिंह त्याचे दिग्दर्शक आणि कॅमेरामनही होते. आज मी त्यांच्याबद्दल सांगणार आहे. मनमोहन सिंह हे हरियाणातील सिरसाचे रहिवासी. ते १९७७ मध्ये ‘एफटीआयआय’मधून उत्तीर्ण झाले. ते खूप चांगले गायकही आहेत. लहानपणापासून त्यांनी गायनाचे धडे घेतले. ते पुण्यात ‘एफटीआयआय’मध्ये शिकत असताना राज कपूर तिथल्या एका कार्यक्रमाला आले होते. तेव्हा मनमोहन सिंहांनी गायलेले गाणे ऐकून ते त्यांच्या आवाजाचे इतके चाहते झाले की, मनजींना आपल्या फार्मवर बोलावून त्यांचं गाणं ऐकायचे. एके दिवशी राज कपूरजी मनजींना म्हणाले की, मी “सत्यम् शिवम् सुंदरम्’ हा सिनेमा सुरू करतोय आणि त्यातील सगळी गाणी मी तुझ्याकडूनच गाऊन घेईन. मनमोहन सिंहांनी सांगत होते.. ‘हे ऐकल्यावर माझ्या आनंदाला तर पारावरच उरला नाही. मग लक्ष्मीकांत प्यारेलालजींकडून गाण्याचे कम्पोजिशन बनवण्यात आले. बक्षी साहेबांनी गाणी लिहिली.’ त्या गाण्यांचा मनमोहन सिंह रियाजही करत होते. ‘एफटीआयआय’मधून उत्तीर्ण झाल्यावर राज साहेब त्यांना म्हणाले की, तू मंुबईला जाऊ नकोस, इथेच राहा. वर्षभर तिथेच राहून त्यांनी गाण्यांचा सराव केला. कुठलाही कार्यक्रम असला की राज कपूर साहेब मनमोहनजींना म्हणायचे, चल, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ची गाणी गा आणि मनजी गाणी गायचे. पण, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ सुरू होण्यापूर्वीच मुकेशजींचे अचानक निधन झाले. मनजींनी सांगितले की, त्या घटनेनंतर राज साहेबांनी मला बोलावून घेतले. ते खूप भावूक झाले होते. माझ्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले, मला माफ कर, मी या सिनेमात तुझ्याकडून गाणे गाऊन घेऊ शकणार नाही. कारण माझा मित्र, माझा भाऊ मुकेश मला सोडून गेलाय.. आता ही गाणी त्याचा मुलगा नितीश मुकेशकडून गाऊन घेणे, हे माझे कर्तव्य आहे. नाहीतर मी वर गेल्यावर मुकेशला कसे तोंड दाखवू? पण, मी तुला वचन देतो.. एक कहाणी आहे माझ्या डोक्यात.. ‘हिना’. त्यावर मी सिनेमा बनवेन, तेव्हा तुझ्याकडून नक्की गाणी गाऊन घेईन. मग राज साहेबांनी ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’मध्ये राधू कर्माकर यांचा सहायक म्हणून त्यांची नियुक्ती केली. अशा तऱ्हेने त्यांनी सहायक कॅमेरामन म्हणून काम केले. मग मनजी मुंबईत आले आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये गुंतले. या दरम्यान त्यांनी “एहसास’ हा सिनेमा केला होता आणि त्यानंतर त्यांनी “बेताब’ आणि “सौतन’ हे सिनेमेही केले. ते ‘बेताब’ आणि ‘सौतन’ करत होते, तेव्हाच त्यांना एका गाण्याची ऑफर आली. त्या सिनेमाचे नाव होते “लावा’. आर. डी. बर्मन संगीत दिग्दर्शक होते. आशा भोसलेंसोबतचे हे द्वंद्वगीत होते. मनजी बंगळुरूमध्ये “सौतन’चे शूटिंग करत होते. तेथून ते िवमानाने आले, गाणं गायलं आणि पुन्हा परत गेले. या दरम्यान इकडे राज साहेबांनी “राम तेरी गंगा मैली’ बनवला, पण मनजींसोबत त्यांची भेट झाली नाही आणि मनजीही आपल्या सिनेमॅटोग्राफीत गुंतून गेले होते. मनजींनी सांगत होते.. आता गाण्याच्या संधीची वाट पाहायची की ज्याचे शिक्षण घेऊन आलोय, ते काम करायचे, याचा निर्णय मला घ्यायचा होता. मग मी सिनेमॅटोग्राफीची निवड केली. ‘राम तेरी गंगा मैली’ रिलीज झाल्यावर राज साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, आता मी ‘हिना’ सुरू करतोय. मी तुला वचन दिले होते की, यातील गाणी तुझ्याकडून गाऊन घेईन.’ मनजी पुढे म्हणाले.. मी ‘हिना’च्या गाण्यांचा रियाज सुरू. पण, नियतीने काही विचित्रच लिहून ठेवले होते. याच दरम्यान राज साहेबांचे निधन झाले. या गोष्टीवरुन मला सलीम कौसर यांचा एक शेर आठवतोय... मैं ख्याल हूँ किसी और का, मुझे सोचता कोई और है,मैं नसीब हूँ किसी और का, मुझे माँगता कोई और है। मनजी सांगत होते.. माझ्या नशिबात गाण्यापेक्षा सिनेमॅटोग्राफीच लिहिली आहे, या विचाराने माझे मन निराश झाले. पुढे रणधीर कपूर यांनी ‘हिना’ दिग्दर्शित केला. त्यांनी नवी गाणी तयार केली, चालीही बदलल्या आणि ती त्यांच्या गायकांकडून गाऊन घेतली. त्यानंतर मी पूर्णपणे सिनेमॅटोग्राफीवर लक्ष केंद्रित केले. मग ‘चालबाज’, यशजींचा ‘चांदनी’, ‘डर’, गुलजार साहेबांचा ‘हुतूतू’ हे सिनेमे तयार झाले. मला त्यासाठी काम करताना आनंद मिळत होता.. त्या काळी बहुतांश सिनेमांमध्ये जी चांगली फोटोग्राफी होती, ती मनामोहन सिंग यांची होती. मनमोहनजींनी त्यानंतर ‘लावा’, ‘लैला’, ‘प्रीती’, ‘वारिस’मध्येही गाणी गायली. पण, त्यांचा मुख्य व्यवसाय सिनेमॅटोग्राफीच राहिला. त्यांना ‘चांदनी’, ‘डर’च्या सिनेमॅटोग्राफीसाठी फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. ‘दिल तो पागल है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘मोहब्बते’चीही त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली. त्यानंतर त्यांनी “जिया ऐनु’पासून पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शन सुरू केले. पंजाबीमध्ये त्यांनी लागोपाठ सुपरहिट चित्रपट केले, आजही करत आहेत. मनजींनी असेच चांगले चित्रपट करत राहावेत, अशी मी मनापासून प्रार्थना करतो. मनमोहनजींसाठी त्यांनीच लताजींसोबत गायलेले “वारिस’मधील हे द्वंद्वगीत ऐका... मेरे प्यार की उमर हो इतनी सनम,तेरे नाम से शुरू तेरे नाम पे ख़त्म...स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
देश - परदेश:राजकारणाचे शुद्धीकरण महत्त्वाचे
डॉ. कलाम सांगत होते... ‘भारतात लोकशाही टिकून आहे, यावर फक्त समाधान मानून चालणार नाही. राजकारणाचे शुद्धीकरण, राजकीय प्रक्रियांची पारदर्शकताही तितकीच महत्त्वाची आहे.’डॉ. कलामांसोबतच्या काल्पनिक संवादाचा अंतिम भाग...भाग : २ थोडावेळ चर्चा झाल्यानंतर मला वाटू लागले की, डॉ. कलामांना जाऊन १० वर्षे होत आली. या काळात भारतात दोन सार्वत्रिक निवडणुका तर झाल्याच; पण अनेक बदलांना देश सामोरा गेला. अमृत महोत्सवी वर्ष मागे जाऊन ‘अमृतकाळा’ची सुरूवात झाली. केंद्रात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आला आणि संख्याबळ कमी झाल्याने एकीकडे नितीशकुमार आणि दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांचा आधार घेतला. ‘लाडली बहना’, ‘लाडकी बहीण’, नि:शुल्क वीज, नि:शुल्क धान्य वगैरे ‘नि:शुल्क’ योजना हा दररोजच्या जीवनाचा भाग म्हणून स्वीकारल्या गेल्या. त्याचबरोबर नवे रस्ते- पूल, नवी विमानतळे, विमानमार्ग, डिजिटल अर्थव्यवस्था या आणि अशा इतर अनेक विषयांवर बोलून डॉ. कलामांचे मन जाणून घ्यावेसे वाटले. मी : थोडेसे आजच्या परिस्थितीविषयी काही प्रश्न विचारु का?डॉ. कलाम : जरुर. मी सतत माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना, त्यातही शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन दिले आहे. प्रश्न मुक्तपणे विचारण्याची सोय असलेल्या देशांचीच प्रगती होते. विषेशत: अस्वस्थ करणारे प्रश्न आणि एरवी अप्रिय वाटणारे प्रश्नही आपण विचारायला हवेत. तसे नसेल तर समाजाला योग्य प्रकारे उत्तरे मिळणार नाहीत. तसेच सत्याकडे आणि प्रगतीकडे नेणारा मार्गही दिसेनासा होतो. विचारा. काहीही विचारा...मी : रोखठोक प्रश्न विचारतो. देशातील सध्याच्या राजकारणाविषयी काय वाटते तुम्हाला?डॉ. कलाम : मी आयुष्यभर राजकारणावर बोलायचे टाळले. पण, आता मलाही स्पष्ट बोलायची संधी आहे. एकतर कोणतीही राज्यव्यवस्था परिपूर्ण नसते. लोकशाही त्याला अपवाद नाही. याचा अर्थ परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करु नये, असा नव्हे. ते करणे हे राज्यकर्त्यांचे मुख्य काम आहे. तो रस्ता संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचा आहे. भारतात लोकशाही टिकून आहे, यावर फक्त समाधान मानून चालणार नाही. अन्याय, अत्याचार, शोषण, विषमता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे रोग देशाच्या आरोग्याला बाधक आहेत. या सर्वांपासून दूर असणारी नेतेमंडळी कुठे आहेत? आपल्या किती लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, बघा. राजकारणाचे शुद्धीकरण, राजकीय प्रक्रियांचे पारदर्शिकत्व महत्त्वाचे आहे.मी : यावर काही ठोस उपाय सांगू शकाल का?डॉ. कलाम : देशाला अनेक सुधारणांची अपेक्षा आहे. पण, ज्यावाचून सर्वसामान्य परिस्थितीत सुधारणा होणे शक्य नाही, अशा काही सुधारणांचा उल्लेख मी करतो. सर्वप्रथम निवडणूक प्रक्रियेत सुधारणा हवी. विविध क्षेत्रांत निपुण असणाऱ्या नागरिकांनी राजकारणात यावे अशा वातावरणाची निर्मिती, निवडणुकांच्या प्रचारात वाटेल ती आश्वासने देण्यावर आणि अर्वाच्य भाषा वापरण्यावर कडक नियंत्रण, खर्चाच्या सीमा कमी करत, अवाढव्य खर्चावर करडी देखरेख, निवडणूक आयुक्तांची गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया अशा सर्व सुधारणा निवडणूक प्रक्रियेमध्ये आवश्यक आहेत. सुधारणेचे दुसरे क्षेत्र आहे प्रशासकीय सुधारणा. अधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया युवकांवर अन्याय करणारी असू नये. प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम करणे, याबरोबरच भ्रष्टाचार आणि दिरंगाईवरती पूर्ण अंकुश असणे आवश्यक आहे. अलीकडे आयोगांच्या निवड प्रक्रियेविषयी शंका घ्यावी, असे वाटणारे अनेक घोटाळे समोर आले आहेत. जनतेचा नागरी सेवांच्या निवड प्रक्रियेवरचा विश्वास उडणे ही फार मोठी शोकांतिका ठरेल. तिसरी सुधारणा ही न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भातील आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेत गुणवत्तेसह पारदर्शकता येणे आवश्यक आहे. न्यायप्रक्रियेतील विलंब ही नित्याची बाब आहे, ही समजूत आपण केव्हा बदलू शकणार आहोत? शिवाय, सगळे निर्णय आजही इंग्रजीतच होतात, हे लोकशाही तत्त्वाच्या विरुद्धच नाही का? चौथी सुधारणा ही पोलिस व्यवस्थेतील सुधारणा. त्यात कारागृहांतील व्यवस्थेच्या सुधारणाही आल्या. पोलिसांच्या कामाच्या वेळा, त्यांचे मानसिक स्वास्थ्य, राहण्याची व्यवस्था या गोष्टींचे नियमन आणि त्याचबरोबर कैद्यांवरचे अत्याचार, नागरिकांबरोबरचा दुर्व्यवहार, दबावाला बळी पडून निष्पाप लोकांवर कारवाई या गोष्टी पूर्णत: बंद व्हायला हव्यात. या बाबतीत काही ठोस पावले उचलावी लागतील. याचा परिणाम सामाजिक सौहार्द, अनुशासन, परस्पर विश्वास वाढण्यात होईल. मी : धन्यवाद! बरेच तपशीलवार उत्तर दिलेत. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बरीच चर्चा आहे. याविषयी तुमचे मत काय आहे?डॉ. कलाम : हा शेवटचा प्रश्न बरं का.. मला मिसाइल लाँचिंगसाठी जायचे आहे.. ‘एआय’चा प्रवास हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील एक अपरिहार्य टप्पा आहे. पण, मानवी प्रगतीबरोबरच मानवी विनाशाची नांदीही ‘एआय’ घेऊन आले आहे. तुम्ही फ्रान्सिस फुकुयामाचे ‘अवर पोस्टह्युमन फ्युचर’ पुस्तक वाचले आहे का? आणि दुसरे एक पुस्तक युवाल हरारी या लेखकाचे ‘Twenty One Lessons for Twenty First Century’ हे वाचा. या दोन्ही पुस्तकामध्ये येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाच्या विघातक शक्यतांची खूप सुंदर उकल केलेली आहे. थोडक्यात सांगायचे तर, विज्ञान-तंत्रज्ञान आणि प्रगती या सर्वांना मानवी चेहरा नसेल, तर असे तंत्रज्ञान व अशी प्रगती व्यर्थ आहे.’बरंय तर काळजी घ्या, समाजासाठी काही चांगलं करा. युवकांना बरोबर घ्या. भेटू... डॉ. कलाम उठले. नेहमीचं मंद स्मित आणि छानसं हस्तांदोलन करुन ते विद्यापीठाच्या महाद्वारातून बाहेर जाण्यासाठी निघाले. मी बराच वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा राहिलो. (संपर्क - dmulay58@gmail.com)
या आठवड्यासाठी मी कॉलम लिहायला बसलो, तेव्हा मला अशोक मेहताजींची आठवण आली. वाटलं की, आपण सिनेमाच्या कॅमेरामनबद्दल बोलत नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. अशोकजींवर लिहिलं पाहिजे, असा मनात विचार आला. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज अशोक मेहता यांच्याबद्दल... अशोकजींनी मला सांगितले होते की, त्यांचा जन्म काबुलमध्ये झाला आणि बालपणीचे शिक्षण पश्तू आणि पारशीमध्ये झाले होते. तेरा - चौदाव्या वर्षी ते घरातून कसेबसे बाहेर पडले आणि मुंबईत पोहोचले. येथे येऊन खूप कष्ट केले. शाळा-कॉलेजात जाऊ शकले नाहीत; पण आयुष्याच्या अनुभवाची शिकवणी मात्र कमी वयातच सुरू झाली. अशोकजींनी सांगितले की, मी स्टेशनबाहेर, फूटपाथवर, दारूच्या दुकानासमोर उकडलेली अंडी विकायचो. नंतर आशा स्टुडिओत नोकरी केली आणि पुढे श्रीकांत स्टुडिओमध्ये कॅन्टीन बॉय झालो. त्यानंतर ऑफिस बॉयही झालो. नंतर सुतारकामातील गोष्टी आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखी कला विभागाशी संबंधित सर्व कामे केली. मी लहानपणापासून खूप मेहनती होतो. कोणतेही काम मी लहान किंवा मोठे मानत नव्हतो. मी जगण्यासाठी काम करत होतो आणि जे काही करत होतो, ते मला खूप कामी आलेे. अशोकजी पुढे सांगत होते.. ऑफिस बॉय झाल्यावर मी कॅमेरा अटेंडंट झालो. मग सुदर्शन नाग यांचा चीफ अटेंडंट बनलो. राज मारब्रोस हे एक दिग्दर्शक होते. “द विटनेस’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. पण, तो रिलीज झाला नाही. त्यात शशी कपूर अभिनय करत होते. ते माझ्या कामाने खूप प्रभावित झाले. त्यानंतर शशी कपूर इतरांसमोरही माझे कौतुक करू लागले आणि हा खूप चांगले काम करताे, असे सांगू लागले. ते इंडस्ट्रीत प्रत्येकाकडे माझ्या नावाची शिफारस करायचे. त्यानंतर त्यांनी “३६ चौरंगी लेन’ हा सिनेमा सुरू केला.हा सिनेमा अशोकजींसाठी सर्वात मोठा ब्रेक होता. या पहिल्याच सिनेमामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर अशोकजींनी मागे वळून पाहिलेच नाही. अपर्णा सेन, गिरीश कर्नाड, श्याम बेनेगल, जब्बार पटेल, शेखर कपूर, सुभाष घई, सतीश कौशिक यांच्यासारखे आर्ट फिल्मचे िदग्दर्शक असाे वा कमर्शियल सिनेमांचे दिग्दर्शक असो; अशोकजींनी सर्वांसोबत काम केले. अशोकजी जितके उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर होते, तितकेच ते एक धाडसी माणूसही होते. असीम बजाजजींनी मला सांगितले होते की, ‘त्रिमूर्ती’ सिनेमाचे शूटिंग सुरू होते. डॉ. मोहन आगाशे त्यात खलनायक होते. त्यांच्यावरील एका दृश्याचा सेट लावण्यात आला होता. बऱ्याच वरती लाकडाचा एक फ्लोअर बनवला होता आणि त्यावर लायटिंग लावण्यात आले होते. जिथे लाइटचे सगळे स्विच बसवले होते, त्या जंक्शनवर अचानक आग लागली. हे पाहताच अशोकजींनी तत्काळ उडी मारली आणि केबल हातात धरून तिला लटकले, जेणेकरून ती त्या जंक्शनपासून तुटून वेगळी व्हावी. ही केबल जळाली असती, तर संपूर्ण सेटला आग लागली असती. केबलमध्ये करंट होता, पण जिथे आग लागली होती, तिथून ती वेगळी झाली. अशोकजी तारेला लटकून राहिले आणि लाइट बंद करा, असे ओरडत राहिले. जेव्हा जनरेटर बंद झाला आणि त्यावरचा विद्युतप्रवाह थांबला, तेव्हाच अशोकजी खाली उतरले. असीमजींनी मला ‘खलनायक’च्या शूटिंगवेळी घडलेली घटनाही सांगितली होती. “चोली के पीछे क्या है’ या गाण्याच्या शूटिंगसाठी सेटवर सगळीकडे काचा लावल्या होत्या. सर्व दरवाजे - खिडक्या बंद होत्या. खिडक्यांच्या मागे निळे कापड लावले होते. सगळे जण कामात व्यस्त होते. अचानक अशोकजी धावू लागल्याचे सर्वांना दिसले. त्या कापडाला आग लागल्याचे कुणाच्या लक्षात आले नव्हते. खिडकी काचांनी बंदिस्त होती. अशोकजींनी अगदी सुपरमॅनसारखी झेप घेत आपले हॅट घातलेले डोके काचेवर आपटून काच तोडली आणि पलीकडे जाऊन पडले. लगेच ते कापड ओढून आग विझवू लागले, तेव्हा तिथे आग लागली होती हे सर्वांच्या लक्षात आले. अशोकजींच्या हिमतीची ही कहाणी एेकून मला शकील बदायूनींचा एक शेर आठवतोय... चाहिए खुद पे यकीन - ऐ - कामिल हौसला किसका बढ़ाता है कोई। आम्ही ग्रीसच्या अथेन्समध्ये “चलते चलते’चे शूटिंग करत होतो. त्या लोकेशनजवळ काही बांगलादेशी लोक उभे होते. अशोकजी त्यांच्याशी बंगालीत बोलत असल्याचे मला दिसले. नंतर आम्ही काही खाण्यासाठी म्हणून चालतच तिथल्या एका गल्लीत गेलो. तिथे एका पठाणाचे कबाबचे दुकान होतो. अशोकजी त्याच्याशी पश्तूमध्ये बोलू लागले. त्यांच्या लाइट डिपार्टमेंटमध्ये एक मराठी सहकारी होता. ते त्याच्याशी मराठीत बोलायचे. मी एकदम अवाक् झालो. मी त्याबद्दल विचारल्यावर अशोकजी म्हणाले की, आपल्याला हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, पंजाबी, फारसी, पश्तूसह नऊ भाषा येतात. अशोकजी असे प्रतिभावान आणि हुशार होते. त्यांनी असे काम करुन ठेवले आहे की पुढच्या पिढ्याही त्यातून लायटिंग, अँगल शिकतील. आज त्यांच्या स्मरणार्थ, त्यांनी चित्रीत केलेल्या “चालबाज’मधील हे गाणे ऐका... न जाने कहाँ से आयी थी, न जाने कहाँ को जायेगी... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
रसिक स्पेशल:कशामुळे झाले पानिपत?
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडकडून ०-३ असा लाजिरवाणा पराभव पत्करला. या ‘व्हाइट वॉश’नंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली असे संघातील दिग्गज खेळाडू टीकेच्या लक्ष्यस्थानी सापडले आहेत. या मालिकेत भारताचे नेमके काय चुकले, याचा हा लेखाजोखा... रोम जळत होते, तेव्हा नीरो फिडल वाजवण्यात गर्क होता.. हे एक ऐतिहासिक सत्य. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने नेहमीच याचे उदाहरण दिले जाते. नेमके तसेच काहीसे भारतीय क्रिकेटमध्ये घडते आहे. एकीकडे कसोटीसारख्या सर्वोच्च क्रिकेट प्रकारात भारतीय संघाने न्यूझीलंडकडून ०-३ असा मानहानिकारक पराभव स्वीकारला. या पानिपताचे शोकपर्व सुरू असताना भारतीय क्रिकेटच्या दृष्टिकोनाचे वाभाडे निघणे स्वाभाविकच आहे. परंतु, त्यातून बोध घेण्याऐवजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ‘आयपीएल’ची लिलाव प्रक्रिया अरबांच्या देशात आयोजित करण्यात मश्गूल आहे. हीच ती ‘नीरोवृत्ती’. झटपट सामन्यांची कसोटीवर कुरघोडीन्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी, कसोटी क्रिकेट सामना पाच दिवसांचा करावा, अशी मागणी केली. गेल्या पाच वर्षांत भारतात झालेल्या २५ कसोटी सामन्यांपैकी २० सामने पाचव्या दिवसापर्यंत टिकलेच नाहीत. याचप्रमाणे जागतिक स्तरावरील सामन्यांचे विश्लेषण केले, तर १२७ कसोटींपैकी ७६ सामने चार किंवा कमी दिवसांतच निकाली निघाले आहेत. हे असे का घडते आहे? …तर याचे उत्तर ‘आयपीएल’ आणि जगभरात होणाऱ्या लीग क्रिकेटमध्ये दडले आहे. खेळपट्टीवर टिकाव धरून चिवट फलंदाजी करु शकणारे फलंदाज घडणे जसे कमी झाले आहे, तसे कसोटी क्रिकेटला साजेसे गोलंदाजही तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उलट लीगमुळे दुखापतींचे प्रमाण वाढल्याने हार्दिक पंड्यासारखे चार षटकांचे गोलंदाज मोठ्या प्रमाणात उदयास येऊ लागले आहेत. अतिआत्मविश्वासाची धुंदी नडलीभारत-न्यूझीलंड मालिकेआधी भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका २-० अशी आरामात खिशात घातली होती, तर किवी संघ श्रीलंकेतून ०-२ असा दारुण पराभव पत्करून आला होता. त्यामुळे मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका म्हणजे एकापेक्षा एक यशोगाथा साकारतील, जणू अशाच अतिआत्मविश्वासाच्या धुंदीत भारतीय संघ होता. फिरकीच्या तालावर न्यूझीलंडचे फलंदाज केवळ हजेरीवीर ठरतील, अशी खात्री मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना होती. पण, बेंगळुरुमध्ये ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाजांना साथ मिळाली आणि भारतीय संघ पहिल्या डावात फक्त ४६ धावांत गारद झाल्यावर सर्वांचे डोळे खाडकन् उघडले. ही पहिली कसोटी न्यूझीलंडने आठ गडी राखून जिंकली. फिरकीच्या सापळ्यात आपलीच शिकारया घातचक्रातून भारताचा संघ बाहेर पडावा, यासाठी फिरकीचे सापळे रचण्यात आले. पण, भारतीय फलंदाजांचीच यात शिकार झाली आणि ही जिंकण्याची आशा मग धूसर ठरू लागली. न्यूझीलंडच्या एजाझ पटेल (१५ बळी), मिचेल सँटनर (१३ बळी) आणि ग्लेन फिलिप्स (८ बळी) या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. भारताने या वर्षाच्या पूर्वार्धात इंग्लंडविरुद्धची मालिका ४-१ अशी जिंकली होती. त्यावेळी भारतीय फलंदाजांची फिरकीविरुद्धची सरासरी ३९.९ धावा अशी होती. पण, न्यूझीलंडविरुद्ध ही सरासरी २४.४ धावा अशी चिंताजनक ठरली. एकंदर मालिकेत भारताचे ३७ फलंदाज फिरकीपुढे गारद झाले. पुण्याच्या दुसऱ्या कसोटीत ११३ धावांनी, तर मुंबईच्या तिसऱ्या कसोटीत २५ धावांनी न्यूझीलंडने विजय मिळवत भारताला ‘व्हाइट वॉश’ दिला. जे घडत होते, त्यावर विश्वास बसणे कठीण होते. केन विल्यमसनशिवाय आलेल्या टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने ‘न भूतो’ असा पराक्रम गाजवला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रोहित, विराटच्या क्षमतेची ‘कसोटी’ प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार रोहित खेळपट्टीचा अंदाज घेण्यात वारंवार चुकले. पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजीचे सूत्र रोहितला या मालिकेत योग्य पद्धतीने जपता आले नाही. २, ५२, ०, ८, १८, ११ या रोहितच्या सहा डावांतील धावा. यात बेंगळुरुमधले एकमेव अर्धशतक. १५.१७ च्या सरासरीने एकूण ९१ धावा काढणारा रोहित वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही माऱ्यापुढे टिकाव धरू शकला नाही. जी कथा रोहितची, तीच विराटची. ०, ७०, १, १७, ४, १ या विराटच्या सहा डावांतील धावा. विराटने १५.५० च्या सरासरीने एकूण ९६ धावा काढल्या. त्याचेही एकमेव अर्धशतक बेंगळुरुतले. ही खेळी वगळल्यास विराटच्या अन्य डावांतील सरासरी जेमतेम ४.६ धावांची राहिली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विराट धावांसाठी झगडताना दिसत होता. परिणामी विश्वविजेतेपदानंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या रोहित (वय ३७) आणि विराट (वय ३६) यांनी आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. श्रेयस अय्यर, ईशान किशन, हार्दिक पंड्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी शिस्तीचा बडगा दाखवणारे ‘बीसीसीआय’ रोहित-विराटची मर्जी सांभाळून, वर्कलोड मॅनेजमेंटचे कारण दाखवत त्यांना विश्रांती देत असतेच. पण, त्यांनी वर्षाला काही रणजी सामने खेळावेत, अशी अट घालण्यास मात्र धजावत नाही. या स्थितीत आगामी ऑस्ट्रेलियाचा प्रदीर्घ दौरा या वरिष्ठांसह एकूणच भारतीय संघासाठी अग्निपरीक्षेचा ठरेल. भारताचा टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मार्ग आता आणखी बिकट झाला आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील चार सामने जिंकावे लागतील. भारताने ऑस्ट्रेलियाच्या या आधीच्या दोन दौऱ्यांतील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे. पण, मोहम्मद शमीची दुखापत आणि संघाचा सध्याचा एकूणच फॉर्म पाहता हे आव्हान अवघड आहे. त्यामुळे कामगिरी सुधारण्याचे दडपण वरिष्ठ क्रिकेटपटूंवर असेल. भारतीय संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एका अर्थाने दिलेला सल्लाच महत्त्वाचा आहे. कसोटी खेळाडू घडवावे लागतील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तळाच्या फलंदाजांवर विसंबून राहणे धोक्याचे ठरले. शिवाय, रविचंद्रन अश्विन (वय ३८) आणि रवींद्र जडेजा (वय ३६) या फिरकी जोडगोळीची कारकीर्दही अस्ताकडे वाटचाल करीत आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यापेक्षा उत्तमोत्तम क्रिकेटपटू सध्या भारताकडे आहेत, ही गर्जना आपण आधीच करून टाकली आहे. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत यांनी कसोटी क्रिकेटला साजेसा खेळ केला; पण हे सातत्य के. एल. राहुल, सर्फराज खान यांच्यात दिसून आले नाही. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटच्या प्रचलित देशांतर्गत सामन्यांच्या पद्धतीत बदल करून दर्जेदार कसोटी क्रिकेटपटू घडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. (संपर्कः prashantkeni@gmail.com)
रसिक स्पेशल:महासत्ता पुन्हा त्याच कुशीवर वळते तेव्हा...
रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष, चीनचा विस्तारवाद, दहशतवादाचा धोका, हवामान बदलाचे आव्हान आणि अस्थिर जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची ‘महाशक्ती’ बायडेन यांच्या काळात क्षीण झाली होती. आता ‘अमेरिका फर्स्ट’ अशी प्रखर राष्ट्रवादी आणि तितकीच व्यवहारी भूमिका घेणारे ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी आल्याने हे प्रश्न सुटणार की आणखी चिघळणार, हे येणारा काळच सांगेल. जगातील सर्वांत जुनी लोकशाही मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीतून महासत्तेने आपली कूस बदलली आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवडून आले. ट्रम्प हे उत्तम व्यावसायिक आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी टोकाच्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि त्यामुळेच त्यांच्या विजयाचा रस्ता मोकळा झाला. अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे दिलेले आश्वासन, स्थलांतरितांना अमेरिकेत घुसू न देता त्यांना मेक्सिकोतच अडकवून ठेवण्यासाठी ‘रिमेन इन मेक्सिको’चा दिलेला नारा, इस्लामी मूलतत्त्ववादाला विरोध, चीन आणि मेक्सिकोला धडा शिकविण्याची जाहीर भाषा, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन' अशा अनेक घोषणांतून त्यांनी मतदारांच्या भावनेला हात घातला. ट्रम्प यांच्या अशा टोकाच्या राष्ट्रवादी प्रचारतंत्राची लोकशाही मूल्यांच्या चौकटीत विस्ताराने समीक्षा होऊ शकेल. पण तूर्तास, ट्रम्प यांचे आजवरचे ‘मूड’ बघता त्यांच्या परत येण्याचे जगावर तसेच भारतीय उपखंडावर आणि भारतावर काय परिणाम होतील, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. रशिया - युक्रेन युद्ध थांबवतील?आज ट्रम्प रशिया - युक्रेन युद्ध थांबवण्याची भाषा करीत आहेत. पण, त्यांची या संदर्भातील आजवरची भूमिका पाहता ते त्यासाठी खरेच काही ठोस पावले उचलतील का, हा प्रश्न आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात रशियासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनला अब्जावधी डॉलरची मदत दिल्याबद्दल त्यांनी अलीकडेच बायडेन प्रशासनावर टीका केली होती. ‘नाटो’च्या बजेटबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे रशिया - युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत ते आता करीत असलेल्या वक्तव्याविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे. मध्य-पूर्वेतील अशांततेची धग इस्रायलची राजधानी म्हणून तेल अवीवऐवजी जेरुसलेमला मान्यता देण्याला ट्रम्प यांनी एका अर्थाने समर्थन दिले होते. मध्य-पूर्वेतील संकट आणि विशेषतः इस्रायल विरुद्ध हमास + पॅलेस्टाइन + इराण संघर्ष अमेरिकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि देशाच्या अंतर्गत सामाजिक, आर्थिक रचनेवर या युद्धाचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी हे युद्ध लवकरात लवकर थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांची इस्रायल आणि अरब देशांबाबत घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेतील अशांततेच्या आगीचे लोट कमी होतात की ते आणखी वाढतात, हे पाहावे लागेल. ‘पॅरिस करारा’चे भवितव्य अधांतरीसध्याची जागतिक तापमानवाढ औद्योगिकरण होण्यापूर्वीच्या पातळीवर आणणे, ती सरासरी २ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणे अशा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी २०१५ मध्ये पॅरिस हवामान करार करण्यात आला होता. या करारावर अमेरिकेने स्वाक्षरी केली होती. मात्र दोनच वर्षांनी, २०१७ मध्ये ट्रम्प यांनी या करारातून काढता पाय घेतला. सत्ताबदल झाल्यावर बायडेन यांनी २०२१ मध्ये अमेरिकेला करारात आणले. पण, आता ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यामुळे ते पॅरिस कराराबाबत काय निर्णय घेतात, यावर जागतिक तापमानवाढीचे परिणाम रोखण्याच्या प्रयत्नाचे भवितव्य अवलंबून असेल. भारतीय उपखंडातील सत्ता-संतुलनट्रम्प यांच्या येण्यामुळे भारतीय उपखंडातील सध्याच्या सत्ता-संतुलनावरही परिणाम होईल. पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका आदी देशांवरील चीनचा प्रभाव आणि बांगलादेशातील राजकीय अराजक यांबाबत अमेरिकेच्या धोरणात बदल अपेक्षित आहे. ट्रम्प यांची चीन आणि इस्लामी राष्ट्रांविषयीची कठोर भूमिका या उपखंडामध्ये भारताला सहायक ठरू शकते. पाकिस्तान, काश्मीरबाबतची भूमिकापाकिस्तान आणि चीनचे संबंध लपून राहिलेले नाहीत. चीनच्या विस्तारवादाला ट्रम्प यांचा विरोध आहेच; शिवाय पाकिस्तान हे दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान आहे, हेही ते जाणून आहेत. ही बाब वरकरणी भारतासाठी अनुकूल असली, तरी काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याची भूमिका जुलै २०१९ मध्ये याच ट्रम्प यांनी घेतली होती. त्यामुळे पाकिस्तान आणि काश्मीरबाबत त्यांच्या संभाव्य पवित्र्याविषयी भारताला सावध राहावे लागेल. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची चिंताट्रम्प यांनी आपल्या प्रचारादरम्यान, बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी चिंता व्यक्त केली होती. बायडेन आणि कमला हॅरिस यांनी बांगलादेशला अराजकाकडे ढकलल्याचा आरोपही त्यांनी केला होता. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या प्रशासनाला आतापर्यंत बायडेन यांचे विशेष समर्थन प्राप्त होते. ट्रम्प यांच्या कार्यकाळात मात्र ही परिस्थिती बदलू शकेल. भारत-अमेरिका संबंधांना बळकटीट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्याने भारत - अमेरिका परस्परसंबंधांमध्ये संधी आणि आव्हानांचा नवा टप्पा पाहायला मिळेल. सामायिक मूल्ये आणि सामरिक हितसंबंध हे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांचा आधार आहेत. भू-राजकीय स्थिती, आर्थिक आणि लष्करी क्षमतांमुळे भारत युरेशिया तसेच इंडो - पॅसिफिक अशा विशिष्ट प्रदेशांमध्ये अमेरिकेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार देश बनला आहे. ही भागीदारी पुढच्या काळात आणखी बळकट होऊ शकते. लष्करी सुरक्षा आणि चीनला शहबायडेन यांच्या काळात २०२२-२३ मध्ये भारतासोबत करण्यात आलेल्या ‘इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी’ (ICET) आणि GE-HAL यांसारख्या संरक्षण करारांमुळे लष्करी संबंध मजबूत होत आहेत. चीनचा प्रभाव रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची ‘क्वाड’ संघटना मजबूत करण्यात आली होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या आगामी कार्यकाळात भारत - अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्र खरेदी, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त युद्धाभ्यासला गती मिळण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय व्यापार वाढला, पण... भारत आणि अमेरिकेदरम्यान २०२३-२४ मध्ये १२८.७८ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १० लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. या काळात भारताने अमेरिकेला केलेली निर्यात सुमारे सहा लाख कोटी रुपयांवर गेली होती. मात्र, ट्रम्प यांनी यावेळी ‘अमेरिका फर्स्ट’ हे तत्त्व स्वीकारले असल्याने भारताला स्वतःचे हित साध्य करणे कठीण ठरू शकते. ट्रम्प भारताला ‘टॅरिफ किंग’ म्हणजेच अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लावणारा देश मानतात. त्यामुळे ट्रम्प प्रशासन भारताकडून लावले जाणारे कर आणि अन्य बंधने कमी करण्यासाठी दबाव टाकू शकते. व्हिसा धोरणाची टांगती तलवारट्रम्प यांनी गेल्या वेळी एच - १ बी व्हिसावर बंदी घातली होती. त्यामुळे आयटी, फार्मा आणि टेक्सटाइल यांसारख्या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला होता. २०२३ मध्ये एकूण ३.८६ लाख स्थलांतरितांना एच - १ बी व्हिसा देण्यात आला, त्यापैकी २.७९ लाख भारतीय होते. आता ट्रम्प परत आले आहेत आणि ते आधीच एच - १ बी व्हिसाबाबत नकारात्मक आहेत. त्यांनी पुन्हा त्यासाठी अटी - शर्ती लादल्या, तर त्याचा थेट फटका भारतीय आयटी, फार्मा, टेक्सटाइल, वित्त आणि इतर व्यावसायिकांना बसेल. एकूणच, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष, चीनचे वाढते वर्चस्व, दहशतवादाचा विस्तार, हवामान बदलाचे आव्हान आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या हेलकाव्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची ‘महाशक्ती’ बायडेन यांच्या काळात क्षीण झाली होती. आता ‘अमेरिका फर्स्ट’ अशी प्रखर राष्ट्रवादी आणि तितकीच व्यवहारी भूमिका घेणारे ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी अाल्याने हे प्रश्न सुटणार की आणखी चिघळणार, हे येणारा काळच सांगेल. (संपर्कः sukhadevsundare@gmail.com)
वेब वॉच:'मानवत मर्डर्स', एका थरारक हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडताना...
मानवत हे १५ हजार वस्तीचे परभणी जिल्ह्यातील एक छोटे गाव. तिथे १९७२ ते १९७४ या काळात सात स्त्रियांचे खून होतात. हे नरबळी की जादूटोणा? गावामध्ये काही मांत्रिक असतात. अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा संपत्तीचा साठा कुठे आहे, याचा सुगावा लावायचा असेल, तर मांत्रिकांची मदत घेण्याची प्रथा त्या भागात असते. अशा परिस्थितीत एकामागोमाग एक असे खून होण्यास सुरूवात होते. तीन लहान मुली गायब होतात. चार विवाहित स्त्रियांची कुऱ्हाडीने हत्या होते. काही मृतदेह त्याच ठिकाणी सापडतात, तर काही खुनाच्या ठिकाणापासून दुसरीकडे आढळतात. याचा माग काढणे स्थानिक पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे, असे वाटल्यामुळे स्पेशल क्राइम ब्रँचचे डेप्युटी कमिशनर रमाकांत कुलकर्णी यांना परभणीला पाठवण्यात येते. १९६८ मध्ये रामन राघव या खुन्याला पकडण्यात कुलकर्णींना यश मिळाले असल्याने या सलग होणाऱ्या खुनांचा तातडीने तपास करण्यासाठी त्यांची निवड होते. अशा खुनांचा तपास करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे मानले जायचे. या लौकिकाप्रमाणे ते इथे घडणाऱ्या खुनांच्याही तळाशी पोहोचतात... साधारण पन्नास वर्षांपूर्वी मानवतमध्ये घडलेल्या त्या खुनांच्या घटना आणि तपासाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, तो एका वेब सिरीजमुळे. मानवतमध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सिरीज नुकतीच सोनी लिव्हवर रिलीज झाली आहे. आठ भागांची ही मराठी मालिका रमाकांत कुलकर्णी लिखित ‘Footprints on the Sands of Crime’ (2004) या पुस्तकावर आधारित आहे. गिरीश जोशी यांनी लिहिलेली आखीव पटकथा या वेब-मालिकेमध्ये प्रेक्षकांना बांधून ठेवते. कुऱ्हाडीने केलेले काही घाव दाखवले असले, तरी खून / रक्ताच्या चिळकांड्या दाखवण्यावर या मालिकेचा भर नाही, हे विशेष! अशा सत्यघटनेवर आधारित वेब सिरीज दोन पद्धतीने लिहिता / दिग्दर्शित करता येते. गावकऱ्यांमध्ये असलेली अंधश्रद्धा – त्यातून होणारे खून – खुनांचा तपास ही पटकथा लिहिण्याची एक पद्धत. परंतु, वेब सिरीजची पटकथा लिहिताना भर पोलिस तपासावर दिला आहे. खुनांच्या तपासासाठी रमाकांत कुलकर्णी यांची नेमणूक होणे, एकेका खुनाची त्यांनी घेतलेली माहिती आणि त्या अनुषंगाने तपासाच्या वेळी घडणारे नाट्य, अशा प्रकारे सिरीजच्या एकेका भागातून प्रेक्षकांना या घटनाक्रमाचा उलगडा होत जातो. आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजच्या पहिल्या तीन भागांमधील घटनाक्रम संथ आहे. पुढील तीन भागांमध्ये तपासाला एक दिशा सापडते आणि शेवटच्या दोन भागांमध्ये सस्पेन्सचा उलगडा होतो. फैजल महाडिक यांचे संकलन दाद देण्यासारखे आहे. पटकथा उत्तम असली, तरी भाषा परभणीची स्थानिक वाटत नाही. या मराठी सिरीजच्या निमित्ताने त्या मातीतल्या भाषेचा सुगंध महाराष्ट्रात पोहोचला असता. रमाकांत कुलकर्णींचा सहायक नेहमी त्यांना एकच प्रश्न विचारत असतो, ‘सर, आता तपासाची पुढची दिशा काय?’ मुख्य तपास अधिकारी हुशार दाखवताना बाकीचे इतके बधीर असलेले का दाखवावेत, हा प्रश्न पडतो. अभिनयाची बाजू सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांनी उत्तम सांभाळली आहे. पण, खरी कमाल केली आहे सई ताम्हणकरने. सईने पकडलेले भूमिकेचे बेअरिंग कमालीचे आहे. समिन्द्रीबाईचे बावरलेपण, देशी दारूच्या भट्टीवर तिचे गूढ वागणे, मुलीला शोधताना होणारी तिची घालमेल, उत्तमरावच्या घरात होणारी तिची घुसमट असे भूमिकेचे अनेक पैलू सईने कमालीच्या कौशल्याने साकारले आहेत. मकरंद अनासपुरेंनी खलप्रवृत्तीचे बेअरिंग उत्तम सांभाळले आहे, पण काही प्रसंगात ते सोडून ‘अनासपुरी’ स्टाइलने त्यांचे हसणे खटकणारे आहे. रमाकांत कुलकर्णी या पात्रासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यामागचे प्रयोजन समजले नाही. पूर्ण सिरीजमध्ये ते एकाच चेहऱ्याने वावरताना आणि एकाच टोनमध्ये बोलताना दिसतात. अलीकडे याला संयत अभिनयाची शैली म्हणत असावेत. वेशभूषेवर उत्तम खर्च केला असल्यामुळे सगळ्यांचे कपडे नवे दिसतात. मात्र, गोवारीकरांचा विग खटकतो. सस्पेन्स समजण्यासाठी वेब सिरीजच्या प्रेक्षकांना सातव्या भागापर्यंत खिळवून ठेवण्यात ‘मानवत’ कमी पडते. पण, ही मालिका आवर्जून बघावी अशी आहे. ‘लंपन’, ‘मानवत मर्डर्स’सारख्या उत्तम दर्जाच्या सिरीज मराठीमध्ये बऱ्याच काळानंतर येत आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. (संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)
दसरा आणि दिवाळीच्या मधल्या काळात साळीची कापणी सुरू व्हायची. त्यामुळं आम्ही सकाळ-संध्याकाळ शेतात असायचो. या काळात साळीच्या शेतात खूप करमायचं. सध्या साळवनाचे दिवस आहेत. साळवन म्हणजे साळीचं शेत. विशिष्ट पीक ज्या शेतात आहे, त्या शेताला तात्कालिक नाव पडतं. ज्या शेतात गव्हाचे पीक आहे, त्याला गव्हाळी म्हणतात. १९७० पर्यंत आमच्या गावाला गहू, साळ, भुईमूग, ऊस, केळी ही पिकं माहीत नव्हती. त्यानंतर आमच्या गावात धरणाचं पाणी आलं आणि गावात नवी पिकंही आली. जमिनीला बारमाही पाणी मिळालं. त्यामुळं या पाण्यावर येणारी ऊस, केळी, संत्री, मोसंबीसारखी अनेक पिकं आली. पूर्वी वर्षात एकच पीक यायचं. आता तीन-तीन येऊ लागली. त्यात गहू आला, भुईमुगाच्या शेंगा आल्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साळीचं पीक आलं. आमच्या खारीच्या रानात वराड्याच्या ठिकाणी हे साळीचं पीक घेतलं जाऊ लागलं. तिकडं पलीकडं चोपणातल्या रानातही साळ पिकवली जाऊ लागली. त्या आधी क्वचित कधी सणावाराला भात खायला मिळायचा. आता अधूनमधून नेहमीच भात खायला मिळू लागला. गव्हाची पोळीही नेहमीचीच झाली. गावाच्या पूर्वेला, शेवटी आमचं घर होतं. घरासमोरूनच आमचं शेत सुरू व्हायचं. तिथूनच पळशीकडं जाणारा रस्ताही निघायचा. त्या रस्त्याच्या उजव्या हाताला शिवेपर्यंत सगळं आमचं शेत होतं. ते नंतर वडील आणि चुलत्यांच्या वाटण्यांमध्ये तीन जागी विभागलं गेलं. आम्ही शाळेत बसलो की पाठीमागं आमच्या खारीतलं साळवन दिसायचं. आम्ही घरून निघालो की उजव्या हाताला साळवनाच्या काठाकाठानं शाळेत जायचो. तेव्हा या साळीचा सुगंध छाती भरून घ्यायचो. ही नवीन साळ आणि तिचा हा सुगंध सर्वांच्याच कौतुकाचा विषय होता. त्यामुळं रस्त्यानं जाणारे-येणारे शेजारच्या गावचे लोकही छाती भरून हा वास घेऊन जायचे. आम्ही वर्गात बसलेलो असताना या शेतावरून वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत आली की तिच्यासोबत हा सुगंध यायचा आणि मस्त वाटायचं. माझी ‘पेरा’ या संग्रहात असलेली एक कविता त्याच काळाचं प्रतिबिंब आहे. ती कविता अशी आहे... साळ पिवळी पिकली। ओल्या भारानं वाकली सुगंधली ओटीपोटी। जणू चंदनाची उटी चिक झाला घट्ट घट्ट। जणू साखरेचे पीठ कुसळाचा करव। जणू तल्वारीचं पातं आता कोवळ्या हातानं। चिमणीच्याच दातानं नाळ कापावी कापावी। आणि अग्नीला ओपावी तेव्हा भावानं नवीन मढीसाळ आणली होती. ती सरत्याने पेरावी लागत नसे, तर तिची रोपं आणून शेतात लावावी लागत. परभणीच्या कृषी विद्यापीठाकडून सुरूवातीला या सगळ्या पिकाच्या लागवडीचं शिक्षण दिलं गेलं. आमच्या गावचे सरपंच सखारामजी यांच्या शेतात या साळीची रोपं मिळत असे. ती आणून आमच्या खारीच्या शेतात लावली जायची. रोपं लावायच्या आधी शेतात मढ्या तयार कराव्या लागायच्या. या मढीत घेतलेली साळ म्हणून तिला मढीसाळ असं नाव पडलं होतं. मढी म्हणजे काय? तर मोठं संपूर्ण वावरच वाकानासारखं बांध घालून तयार करायचं आणि त्यात चिखलाचा राडा करायचा. त्या राड्यात ही रोपं नुसती ठेवली की आपोआप आत जायची. आम्ही आमच्या पाहुणेरावळ्यांच्या गावी जुनी साळ पाहिली होती, तशी ही साळ नव्हती. ती बारीक जिऱ्यासारखी होती आणि तिच्यात सुगंधी तांदूळ होता. या साळीचं आमच्या शेतात आलेलं पीक एवढं सुंदर होतं की कृषी विद्यापीठाचे लोकही आश्चर्य करू लागले. विद्यापीठाकडून आदर्श शेतकरी म्हणून दत्तू दादाचा सत्कारही करण्यात आला होता. या नवीन पिकाची पाहणी करायला विद्यापीठाची टीम गावात आली होती. दसरा आणि दिवाळीच्या मधल्या काळात या साळीची कापणी सुरू व्हायची. त्यामुळं आम्ही सकाळ-संध्याकाळ शेतात असायचो. शाळा असेल तोवर शाळेत असायचो. नेमकीच थंडीची सुरूवात झालेली असायची. या काळात साळीच्या शेतात खूप करमायचं. ही साळ कणाकणानं वाढताना पाहता यायची. तेव्हापासूनच तिचा सुगंध छातीत भरलेला असायचा. खळं सुरू झालं की, आम्ही शेतातच रमायचो. खळ्याचं गुत्तं दिलं असेल, तर आमच्या गावचे बुद्धाचे शंकरमामा आणि त्यांचं कुटुंब साळ कापून तिची सुडी घालीत. सगळी साळ कापून झाली की, दुसऱ्या दिवसापासून तिचं खळं घालीत. जमीन सवान करून, पाण्यानं भिजवून, ठोकून, तुडवून गच्च केली जायची आणि आत औताची खोडं किंवा बाज आणून ठेवली जायची. त्याच्यावर चारी बाजूनं उभं राहून सगळे जण साळ बडवायचे. त्यातून साळी बाजूला पडायच्या आणि तणसाच्या पेंढ्या खळ्याबाहेर फेकल्या जायच्या. साळीची रास तयार व्हायची. मग तिव्ह्यावर उभं राहून साळ उधळून तिच्यातला कचरा बाहेर काढला जायचा आणि पोती भरली जायची. साळ काढून झाली की शेतातली उंदराची बिळं खोदण्यासाठी वडार, कैकाडी गावात बांधव येत. ते त्या बिळांतून खूप साळ बाहेर काढत. उंदरांनी साळीचे तुरे बिळात नेऊन ठेवलेले असत. रानात पडलेल्या साळीच्या एकेका कणासाठी माणसं, उंदरं, पाखरं, जनावरं यांची स्पर्धा सुरू व्हायची. हे सगळं दृश्य मी लहानपणी पाहिलं होतं, तेच पुढं माझ्या एका कवितेत आलं. ‘पीकपाणी’ या माझ्या संग्रहातली शेवटची सर्वा नावाची कविता याच प्रसंगावर आधारित आहे. या साळीच्या शेताच्या आठवणी खूपच रम्य आहेत. कधी कधी रात्रीच्या वेळी शेतातल्या गड्यांसोबत बाजेवर आम्हीही सुडीला राखण म्हणून झोपायचो. तेव्हा दसरा-दिवाळीच्या दरम्यान स्वच्छ आभाळ आणि चांदणं पडलेलं असे. सालगडी आकाशातल्या एकेका ताऱ्याची ओळख करून देत असे. त्याला हे सगळं आकाशवाचन येत असायचं. पण अर्थातच ते पुस्तकातल्यासारखं नसायचं. वेगवेगळ्या ताऱ्यांची नावं, त्यांचे आकार, त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या पाठीमागच्या लोककथा हे सगळं ऐकायला मिळायचं. हे ऐकत ऐकत आम्ही त्या साळवनात रात्री सुडीच्या शेजारी बाजेवर झोपी जायचो. कधी झोप लागली, तेही कळायचं नाही. पुढं आमच्या या शेताचं गावाकडच्या भावानं प्लॉटिंग केलं. तुकडे करून ही जमीन लोकांना घर बांधण्यासाठी विकली. आता तिथं एक पर्यायी गाव उभं राहिलं आहे. कधीमधी गावाकडं गेलं आणि या नव्या वस्ती शेजारून जाऊ लागलो की, काळजात कळ उठते. याच ठिकाणी आपल्याला लहानपणी साळवन होतं. तिथं माणसं राबायची आणि उंदरा-मांजराच्या जीवजित्राबांसह एक सृष्टी नांदायची. ती सगळीच सृष्टी आता नाहीशी झाली आहे. तिथं सिमेंटची घरं उभी राहिली आहेत. गावातलीच माणसं तिथं राहतात. आपलीच माणसं आहेत ती. त्यांच्याविषयी प्रेमच आहे. पण, आपण आपल्या स्मृतीच्या डोहात शिरलो की आपोआपच डोळ्यांचा डोह होऊन जातो. (संपर्कः inbhalerao@gmail.com)
खलनिग्रहणाय:किल्लारी भूकंपानंतरचे धक्के आठवताना...
लातूर-उस्मानाबादमधील विनाशकारी भूकंपाला नुकतीच ३१ वर्षे झाली. या भूकंपग्रस्त भागात काम करताना मिळालेले अनुभव आयुष्यभर विसरता येणार नाहीत. तेव्हा माणसाच्या जगण्याचा क्षणभंगूरपणा जाणवलाच; पण दु:ख, विरह, असहायता, प्रेम, औदार्य, लोभ, मोह.. अशा कितीतरी भावभावनांचे दर्शन एकाच वेळी घडत होते... तो दिवस होता ३० सप्टेंबर १९९३. त्या वेळी मी पंढरपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होतो. पंढरपूर शहरातील गणपती विसर्जन मिलवणुकीचा बंदोबस्त संपवून नुकताच घरी आलो होतो. पहाटेचे साडेतीन-पावणेचार वाजले असावेत. काही क्षणांत म्हणजे, ३ वाजून ५६ मिनिटांनी जमीन हादरू लागली. दोन-चार सेकंद नेमके काय होतेय, ते कळले नाही. पण, लगेच लक्षात आले की, हा भूकंपाचा मोठा धक्का आहे. तेवढ्यात पंढरपूर शहर पोलिस निरीक्षकांचा फोन आला की, भूकंपाने शहरात अनेक जुन्या घरांची मोठी पडझड झाली आहे, त्याखाली अनेक लोक दबले आहेत. माझी चार वर्षांची मुलगी या धक्क्याने घाबरली होती, ती मला घट्ट पकडून रडत होती. तिची समजूत घालून पत्नीला सांगून घराबाहेर पडलो. शहरात सगळीकडे लोक रस्त्यावर उभे होते. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दाटली होती. शहरातील जुन्या, मध्यवर्ती भागात फिरलो, तर अनेक घरे पडली होती. काही लोकांचा मृत्यू झाला होता, अनेक लोक जखमी झाले होते. शहरात सगळीकडे पाहणी करून सकाळी सहाच्या सुमारास मी पोलिस स्टेशनमध्ये येऊन बसलो. त्यानंतर कळले की, लातूर आणि उस्मानाबादमध्ये (तत्कालीन नाव) भूकंपामुळे हाहाकार झाला आहे, तिथे हजारो लोक मरण पावले आहेत. दुसऱ्याच दिवशी, १ ऑक्टोबरला माझी पदोन्नती झाली आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून माझी उस्मानाबादला नेमणूक करण्यात आली. पंढरपूरचा चार्ज ताबडतोब सोडून उस्मानाबादला रुजू होण्याचा आदेशही सोलापूर पोलिस कंट्रोल रूममधून आला. मी पत्नी आणि मुलीला बिहारमधील मूळगावी पाठवून उस्मानाबादला रवाना झालो. तत्कालीन पोलिस अधीक्षक विष्णुदेव मिश्रा साहेबांशी संपर्क केला आणि मला आदेश मिळाला की मी उमरग्याला पोहोचावे. २ ऑक्टोबरला मी उमरग्याला पोहोचलो. तिथे मिश्रा साहेब आणि औरंगाबादचे डीआयजी चक्रवर्ती साहेब तिथे तळ ठोकून होते. उस्मानाबादच्या सास्तूर गावात सर्वाधिक हानी झाली होती. त्या गावात आणि परिसरातील गावांमध्ये जवळपास ४ हजार लोक मृत्युमुखी पडले होते. लातूरमधील किल्लारी हे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू होते. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ९ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अतिशय भयानक आणि बिकट अशी ही परिस्थिती होती. सुरूवातीला पोलिस घटनास्थळांवर पोहोचले; पण त्यांनाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची जाणीव नव्हती. घरांमध्ये दबलेल्या लोकांना बाहेर काढणे अतिशय कठीण होते. जखमींना दवाखान्यात घेऊन जाणेही एवढे सोपे नव्हते. स्वयंसेवी संस्था आणि लोकांच्या मदतीने आम्ही जखमींना दवाखान्यात पोहोचवत होतो. तोपर्यंत मदतीसाठी अनेक संघटना पुढे आल्या होत्या. सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार या भागात तळ ठोकून होते. प्रचंड प्रमाणात पोलिसांची कुमक भूकंपग्रस्त भागात पाठवण्यात आली होती. या सगळ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय करणे हे एक आव्हान होते. पण, स्थानिक लोकांच्या मदतीमुळे ही व्यवस्था करता आली.ही आपत्ती प्रचंड विनाशकारी होती. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कर त्या भागात दाखल झाल्यावर या कामाला आणखी गती मिळाली. ताबडतोड तात्पुरते निवारा शेड उभे करण्यात आले. अनेक दवाखानेही उघडण्यात आले. हे काम सुरू असताना पाऊसही पडायचा, त्यामुळे कामात व्यत्यय यायचा. लष्कराशी समन्वय साधण्याचे काम माझ्याकडे देण्यात आले. उमरगा तालुक्यातील पोलिस दलाच्या संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारीही मला देण्यात आली. या संकटातही हात धुवून घेण्यासाठी त्या भागात बाहेरून अनेक चोरटे शिरले होते. त्यांचा बंदोबस्त करतानाही अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य जनता आमच्या मदतीला आले. भूकंपग्रस्त भागात काही दिवसांत प्रचंड गर्दी झाली आणि पूर्णपणे वाहतूक थांबली. त्यामुळे तो संपूर्ण भागच सील करुन अनधिकृत लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली. या काळात ‘व्हीआयपीं’ची वर्दळही खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती. अनेक राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच पंतप्रधानही तिथे येऊन गेले. हे सर्व करताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण पडत होता. पण, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून महाराष्ट्र पोलिसांनी चोख कामगिरी बजावली. अशी अनेक घरे होती, जिथले संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबच मृत्युमुखी पडले होते. काही घरांतील एक वा दोन जण वाचले होते. कित्येक लहान मुलं अनाथ झाली होती, असंख्य स्त्रियांना वैधव्य आले होते, अनेक पुरुषांनी पत्नीला गमावले होते... सगळं दृश्य अत्यंत विदारक अन् हृदय हेलावून टाकणारं होतं.. आम्ही रात्री गस्त घालताना वयोवृद्ध महिला आमच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडायच्या. अनेक जणींची मन:स्थिती इतकी बिघडली होती की त्या आम्हाला पकडून, ‘तू एवढे दिवस आईला सोडून कुठं गेला होता..?’ असं विचारुन रडू लागायच्या. पोस्ट ट्रॉमेटिक सिंड्रोम फार मोठ्या प्रमाणात दिसू लागला होता. त्यामुळे सरकारने अन्य जिल्ह्यांतून मानसोपचारतज्ज्ञ बोलावून घेतले. अनेक ठिकाणी रामायण आणि ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू करण्यात आली. यात मन गुंतल्यामुळे पीडितांना बराच धीर मिळत होता. आम्ही अनेक ठिकाणी गावकऱ्यांना गोळा करुन तिथे भजन - कीर्तने सुरू केली. आमचे पोलिस या भजनी मंडळींसोबत रात्री गावांमध्ये जाऊन भजन-कीर्तनात सहभागी व्हायचे. मी स्वत:ही अनेक ठिकाणी प्रवचनाचे कार्यक्रम केले. लोकांच्या मनावर या सगळ्या गोष्टींच्या खूप चांगला परिणाम दिसून आला. भजन, कीर्तन आणि नामजपामुळे मानसिक तणाव दूर होतो व मनावर सकारात्मक परिणाम होतात, हे अनेक शास्त्रीय प्रयोगांमध्ये सिद्ध झाले आहे. लातूर-उस्मानाबादमधील या विनाशकारी भूकंपाला नुकतीच ३१ वर्षे झाली. त्यावेळी भूकंपग्रस्त भागात काम करताना जे अनुभव मिळाले, ते आयुष्यभर विसरता येणार नाहीत. माणसाच्या जगण्याचा क्षणभंगूरपणा तर जाणवलाच; पण दु:ख, विरह, वेदना, असहायता, प्रेम, कणव, औदार्य, लोभ, मोह... अशा कितीतरी मानवी भावभावनांचे दर्शन एकाच वेळी घडत होते. पुढे अनेक वेळा हैदराबादच्या राष्ट्रीय पोलिस अकादमीमधील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांसमोर या भूकंपाच्या काळात आलेल्या अनुभवांवर व्याख्यान देण्याची मला संधी मिळाली. अशा घटना माणसाच्या वाट्याला कधीही येऊ नयेत. पण, दुर्दैवाने अशी आपत्ती आलीच, तर या अनुभवांचे हे संचित नव्या अधिकाऱ्यांना निश्चितच कामी येईल. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)
वेध मुत्सद्देगिरीचा...:'मुचकुंद दुबे' कठीण काळात कसब दाखवणारा अधिकारी
जागतिक राजकारणामध्ये घडणाऱ्या स्थित्यंतराला नेटाने सामोरे जाणे हे १९८० आणि १९९० च्या दशकात भारतीय परराष्ट्र धोरणासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. जागतिक राजकारणातील हे स्थित्यंतर अनपेक्षित तर होतेच; पण ते अत्यंत गुंतागुंतीचेही होते. आपल्या अनुभवाच्या जोरावर ज्या मुत्सद्यांनी या बदलांचे आव्हान पेलले, त्यामध्ये मुचकुंद दुबे यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांच्या या अनुभवामुळेच १९९० - ९१ या अत्यंत कठीण काळात त्यांना देशाच्या परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. १९५७ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंच्या काळात भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केलेल्या दुबे यांना पुढे राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह आणि पी. व्ही. नरसिंह राव यांसह अनेक पंतप्रधानांसोबत भारतीय परराष्ट्र धोरणाची धुरा सांभाळण्याची अत्यंत दुर्मिळ अशी संधी मिळाली. आपल्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्यावर दुबे यांनी या प्रत्येक संधीचे सोने केले. ज्यावेळी त्यांनी परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी सांभाळली, त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत म्हणजेच २ ऑगस्ट १९९० ते २८ फेब्रुवारी १९९१ या काळात इराक आणि कुवेत यांच्यात युद्ध सुरू झाले. अशावेळी भारतीयांना देशात सुखरूप परत आणणे, हा भारतीय परराष्ट्र विभागासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. व्ही. सी. शुक्लांसारख्या अननुभवी नेत्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी होती. शुक्लांचे उपमंत्री आणि पहिल्यांदाच खासदार झालेले दिग्विजयसिंग यांनाही परराष्ट्र धोरणाविषयी अनुभव नव्हता. परराष्ट्र मंत्रालयातील या समस्येबरोबरच भारतीय राजकारणातही अस्थिरता होती. आघाड्यांच्या राजकारणाची नुकतीच सुरूवात झाली होती. शुक्लांना मिळालेले परराष्ट्रमंत्रिपद हा आघाडीच्या राजकारणाचाच परिपाक होता. या पार्श्वभूमीवर दुबे यांचा अनुभव तर दांडगा होताच; पण तटस्थपणा ही त्यांची ताकद होती. या ताकदीच्या जोरावरच त्यांनी इराण-कुवेत युद्धात अडकलेल्या भारतीयांची विक्रमी संख्येने सुटका केली. ‘ऑपरेशन अजय’ नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या या मोहिमेत सुमारे १ लाख ७० हजार भारतीयांना साधारण ५०० विमानांच्या फेऱ्यांद्वारे भारतात सुखरूप आणण्यात आले. हवाई वाहतुकीच्या मर्यादा, अपुरी कागदपत्रे आणि विस्कळीत संवाद यंत्रणा यांवर मात करून दुबेंनी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अशा प्रकारची सर्वांत मोठी मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. भारत जगातील कोणत्याही संकटातून भारतीयांना सुखरूप बाहेर काढू शकतो, हा संदेश यातून जागतिक समुदायाला दिला गेला. परराष्ट्र सेवेतून निवृत्ती झाल्यावरही दुबे यांनी आपल्यातील मुत्सद्द्याला निवृत्त केले नाही. आज प्रचलित असलेल्या ‘ग्लोबल साउथ’ संकल्पनेविषयी अर्थात अतिविकसनशील आणि विकसनशील देशांच्या समस्यांविषयी ते खूप संवेदनशील होते. त्यासाठी सामाजिक विकास, शिक्षण आणि न्याय यासाठी ते प्रचंड आग्रही राहिले. जात, वर्ग, लिंग आणि धर्म यावर आधारित कोणताही भेदभाव न करता गुणवत्तेवर आधारित शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी सामान्य शालेय शिक्षण प्रणालीचा पुरस्कार केला. ही शिक्षण प्रणाली हाच विकसित देशाचा पाया आहे, असे त्यांचे मत होते. बिहारच्या कॉमन स्कूल कमिशनचे अध्यक्ष म्हणून २००७ मध्ये त्यांनी जो अहवाल सादर केला, त्यामध्ये त्यांनी या प्रणालीवर विशेष भर दिला होता. मात्र, ही प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाविषयी त्यांनी खंतही व्यक्त केली होती. शिक्षणाच्या अधिकाराच्या विकृतीकरणामुळे ते अत्यंत चिंतित होते. दुबे यांचे सामान्य शालेय शिक्षण प्रणालीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले नसले, तरी ते स्वतः न्याय, समानता आणि प्रामाणिकतेचे प्रतीक होते. मुत्सद्देगिरीचे कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रातील तळमळ याबरोबरच त्यांनी साहित्य आणि अनुवादाच्या क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध केले. १९५३ मध्ये त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चा हिंदीत अनुवाद केला. त्याचप्रमाणे, बांगलादेशातील प्रसिद्ध कवी शम्सउर रहमान आणि सूफी संत लालन शाह फकीर यांच्या कवितांचाही त्यांनी अनुवाद केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डी. लिट्. या पदवीने सन्मानित केले. दक्षिण आशियातील देशांचे संबंध हे राजकारणापुरते सीमित असू नये, तर त्यांच्यात सांस्कृतिक ऋणानुबंध असले पाहिजेत, ही भावना त्यांच्या या अनुवाद कार्यामागे होती. अलीकडेच २६ जूनला, वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. देशाला परराष्ट्र धोरणात यश मिळवून देण्यासाठी मुत्सद्देगिरीसोबतच राजकारण, शिक्षण, साहित्य या गोष्टी किती आवश्यक आहेत आणि एखादा राजनयिक अधिकारी त्यांचा आपल्या विचारात व कृतीत समावेश करुन, देशाला त्याचा कसा लाभ मिळवून देऊ शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ मुचकुंद दुबे यांनी घालून दिला आहे. (संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)
सुरेंद्र पाटील यांची चिखलवाटा ही कादंबरी नुकतीच अक्षरदान प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. सुरेंद्र पाटील म्हणजे गाव-माती-बोलीशी एकरूप झालेलं मोकळंढाकळं व्यक्तिमत्त्व. आम्ही एकाच भागातले असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक पुस्तकात येणारी संवेदना आपली वाटते. चिखलवाटा ही कादंबरी सुरेंद्र पाटील सरांच्या भोवरा या कथेचे विस्तारीत रूप. ही कांदबरी जाणीव आणि वेदनेचे विविध कंगोरे आपणासमोर मांडते. आरंभी एका कुटुंबाची वाटणारी कथा शेवटच्या टप्प्यामध्ये संपूर्ण समाजाची बनून जाते. व्यंकटच्या रूपाने एखाद्या घरातील पहिल्या नोकरदाराची गाव - घर व स्वतःची नोकरी, संसार यामध्ये कशी ओढाताण होते? तो कसा न गावचा व शहराचाही राहत नाही? त्याला ना ग्रामीण जीवनाचा आनंद घेता येतो ना नोकरीचा. याचं वास्तव चित्रण सरांनी केले आहे. जसे, शहरात प्लॉट की गावाकडच्या शेतीत बोअर, बायकोच्या नोकरीचं डोनेशन की पुतणीचं लग्न अशा अनेक प्रसंगात व्यंकटची चाललेली घालमेल एखाद्या घरातील विशेषतः शेतकरी घरातील पहिल्या नोकरदार व्यक्तीची घालमेल आहे. ती त्याला शेवटपर्यंत कुठलाच होऊ देत नाही. विशेषतः ही घालमेल आमच्या सारख्या कुणब्याच्या पिढीतील पहिले नोकरदार प्रत्यक्ष अनुभवत आहोत. तसेच आज ही शेती कसा आतभट्ट्याचा व्यवहार बनली आहे. याचं प्रभावी चित्रण केलेलं आहे. रोजगाऱ्यापासून ते व्यापाऱ्यापर्यंत शेतकरी आज कसा नागवला जातो, तो कसा बिछायत बनला आहे, याची प्रभावी मांडणी लेखकांनी केलेली आहे. तसेच नव्वदच्या दशकात महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण देशभर शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनाने शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झालेला होता. आपल्या घामाला दाम मागण्याची उर्मी या चळवळीने शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली. परंतु हळूहळू मुख्य नेत्यापासून ते अनेक प्रमुख कार्यकर्ते राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून विविध पदं बळकावली अन् तिकडं हळूहळू चळवळीतील हवा निघायला सुरूवात झाली. त्यात छातीवर रक्तवर्णी बिल्ला लावून प्रत्यक्ष गावागावात अधिकारी आणि राजकारण्याशी संघर्ष करणारा कार्यकर्ता यात होरपळला गेला. अर्जुन सारख्या हजारों सामान्य कार्यकर्त्याची संघटनेच्या नादात आपल्या घर, लेकरं बाळं कुटुंबाकडं झालेलं दुर्लक्ष, त्याला आर्थिक, मानसिक दृष्ट्या पार कोलमडून उलथवून टाकलं... एका सच्च्या प्रामाणिक, कार्यकर्त्याची कशी फरपट झाली याचं वास्तव चित्रण केलेलं आहे. अर्जुनचं पुढे येणारं वाक्य संघटना, चळवळी, नेते या सगळ्यांनाच अंतर्मुख करायला लावतं, खिशातले पैसे घालून कुठवर फिरावं ह्या संघटनेत ? निसते भाषणं आयकून आन रास्ता रोको करून जीव जाजावला. मालाच्या भावाचा प्रश्न सुटंल मनून हामी संघटनेत गेलो, न्हाई त्या भानगडी केल्या, पर शेतकऱ्याच्या आडचनी जिथल्या तिथंच . जोशी काय तर भलं करत्याल आसं वाटू लालतं. पर त्येंला बी राजकारनात घुसायचा नाद लागलाय... संघटनेच्या पायात हामच्यासारख्या कार्यकर्त्याचा, त्येंच्या संसाराचा काय धुराळा झालाय ते त्येंला काय माहीत? आबाच्या रूपाने एका चिवट, स्वाभिमानी व प्रामाणिक शेतकऱ्याची व्यथा कथा मांडली गेली आहे. जी आज आदर्शवत वाटते आहे. विशेषता जे लोक आज गावाकडील शेती - बाडी विकून शहरी भौतिक सुखाच्या मागे पळत आहेत. परंतु घरी सारी बंडाळ, पोरी उजवायला घरी दमडी नाही, कितीही संकट येऊ दे, जमीन विकू न देणं एका प्रामाणिक, निष्ठावान कुणब्याची आपल्या मातीशी इमानदारी आहे . चिखलवाटा या कादंबरीचं वेगळेपण म्हणजे या कादंबरीची सहज सुलभ लातूरी बोली... जसे, बायलीला या पावसाच्या, आमदा बी हा भाड्या गुंगारा देतो काय की? देवावानी वाट बघू लालेत समदे! आमदा ह्येनं झोला दिला तर काय खरं न्हाई! कादंबरीत परिसरातील म्हणींची जागोजागी केलेली पेरणीही लक्ष वेधून घेते. एकंदरीत शेती, नामशेष होत चाललेल्या चळवळी, गाव- शहरात वेगाने वाढणारे अंतर , संपत चाललेलं गावपण आणि स्वतःच्याच कोशात रममाण होणारी नाती गोती, याचं सहजसोप्या निवेदनाद्वारे केलेलं चित्रण काळजाचा ठाव घेणारं झालं आहे . सुरेंद्र पाटील कादंबरीमध्ये चित्रमयरित्या प्रसंग असा उभा करतात, की कथा आपलीच वाटायला लागते. (लेखक किल्लारी येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात अध्यापन करतात.)
आजच्या रविवारसाठी कोणत्या विषयावर कॉलम लिहावा, याचा विचार करत असताना शफी इनामदार यांची मला आठवण झाली. परवाच २३ ऑक्टोबरला त्यांचा जन्मदिवस होता. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये त्यांच्याविषयीच तुम्हाला काही सांगावे, असे मनात आले. शफी इनामदार हे मूळचे कोकणी होते. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये त्यांचा जन्म झाला. पण, नंतर ते मुंबईत आले आणि त्यांचे संपूर्ण शिक्षण तिथेच झाले. त्यांनी गुजराती रंगभूमी गाजवली. पुढे ते पृथ्वी थिएटरमध्ये आले. ते ‘इप्टा’मध्ये दाखल झाले आणि त्यांच्या अभिनयाचा प्रवास असाच पुढे सरकत गेला. ते एक अष्टपैलू अभिनेता होते. ‘इप्टा’मध्ये आल्यावर ते बलराज साहनींच्या व्यक्तिमत्त्वाने, त्यांच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले. त्यांनी बलराजजींना रंगभूमीवरील आपला आदर्श मानले. चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांप्रमाणेच दिलीपकुमार हे त्यांचेही आवडते अभिनेते होते. पृथ्वी थिएटरमध्ये त्यांचा अभिनय पाहून शशी कपूर साहेब खूप प्रभावित झाले. त्यावेळी ते “विजेता’ या सिनेमाची निर्मिती करत होते. त्याचे दिग्दर्शक होते गोविंद निहलानी. शशीजींनी ‘विजेता’मध्ये शफीजींना भूमिका दिली. त्यांनी त्यात इतकं अप्रतिम काम केलं की, त्यामुळे प्रभावित होऊन गोविंद निहलानींसारख्या महान दिग्दर्शकाने त्यांना आपल्या ‘अर्धसत्य’ या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका दिली. तिथून शफी इनामदार यांच्या अभिनयाचा जो प्रवास सुरू झाला, तो पुढे जात राहिला. त्यांनी अनेक सुंदर आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या सगळ्या व्यक्तिरेखा लोकांच्या कायम लक्षात राहिल्या. त्यानंतर १९८० च्या दशकात दूरदर्शनवर “ये जो है जिंदगी’ नावाची एक मालिका आली. मला आजही आठवतेय की, त्यावेळी टीव्ही पाहणारे देशभरातील कोणीही त्या मालिकेचा एकही भाग चुकवत नव्हते. राकेश बेदी, स्वरूप संपत आणि शफी इनामदार यांच्या व्यक्तिरेखा जणू घराघरातील सदस्य बनल्या होत्या. सगळे जण त्या पात्रांचे, विशेषतः शफी इनामदारांचे चाहते झाले होते. त्या काळी साधारणपणे कोणत्याही टीव्ही मालिकेचे खूप कमी एपिसोड बनवले जायचे. पण, या मालिकेचे जवळपास ६० वा ६५ भाग बनवण्यात आले होते. ही मालिका दर शुक्रवारी रात्री सादर व्हायची. त्यामुळे सिनेमांचे वितरक चिंतेत असायचे, कारण त्या दिवशी कितीही चांगला सिनेमा लागला, तरी लोक “ये जो है जिंदगी’मुळे थिएटरकडे फिरकायचेही नाहीत. परिणामी शुक्रवारी सिनेमांचा गल्ला कमी व्हायचा. ही होती “ये जो हैं जिंदगी’ची क्रेझ. असो. त्यानंतर शफी इनामदार काम करत राहिले. माझी त्यांच्याशी पहिली भेट बिरला मातोश्रीमध्ये झाली होती. मी त्यांचे ‘अदा’ हे नाटक पाहायला गेलो होतो. हे नाटक आणि त्यातील त्यांचा अभिनय दोन्ही अप्रतिम होते. नाटकनंतर मी त्यांना ग्रीन रुममध्ये भेटायला गेलो. माझ्यासोबत जे होते, त्यांनी माझी ओळख करून दिली. मी त्यांच्यापेक्षा २०-२१ वर्षांनी लहान होतो. त्यांनी विचारले, ‘कुठले आहात?’ मी म्हणालो, ‘भोपाळचा..’ मग त्यांनी विचारले की, काय काम केले आहे? मी सांगितले, ‘सर, मी शाळेतील नाटके आणि वादविवाद स्पर्धेतून सुरूवात केली. त्यानंतर नाटकात कामे करत राहिलो, अजूनही करतो आहे.’ हे ऐकून ते अचानक उठले आणि मला मिठी मारुन म्हणाले, ‘मी पण शाळेतील नाटके आणि वादविवाद स्पर्धेनेच सुरुवात केली होती. त्यानंतर मी रंगभूमीवर काम सुरू केले आणि आजपर्यंत करतो आहे. त्यामुळं आपल्यामध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे, तूसुद्धा शाळेत नाटके, वादविवाद स्पर्धा केल्या आहेत आणि मीही केल्या आहेत.’ शफी इनामदारांसारख्या कलाकाराच्या स्मरणार्थ एक शेर आठवतोय... सलाम उस पर अगर ऐसा कोई फ़नकार हो जाए, सियाही ख़ून बन जाए क़लम तलवार हो जाए। माझ्यासारख्या एका नवख्या माणसाशी ते इतक्या जिव्हाळ्याने, प्रेमाने भेटले, याचा मला खूप आनंद झाला. पुढे माझा चित्रपट प्रवास सुरू झाला आणि ऋषी कपूर यांच्यामुळे त्यांची पुन्हा भेट झाली. शफी इनामदार हे ऋषी कपूर आणि नाना पाटेकर यांना घेऊन “हम दोनो’ सिनेमाचे दिग्दर्शन करत होते. मग माझ्या त्यांच्याशी भेटी होत राहिल्या आणि आमच्यात चांगली मैत्री झाली. एकेदिवशी मला त्यांचा फोन आला. ही कदाचित १९९५ अखेरची गोष्ट असावी. ते मला म्हणाले की, ‘यार रुमी, तू ऑफिसला ये. मला तुझ्याशी बोलायचंय.’ मी ‘कुठल्या ऑफिसला?’ असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, निर्माता सुधाकर बोकाडेंच्या ऑफिसात ये. मी आधीच सुधाकरजींचा सिनेमा करत होतो आणि तिथेही माझी शफीजींची भेट झाली होती. मी सुधाकरजींच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. सीमा सोसायटी चार बंगला इथे हे ऑफिस होते. तिथे ते मला भेटले. म्हणाले, “यार, एक नाटक आहे, “बा रिटायर झाली.’ मी ‘हम दोनो’ सिनेमानंतर ते बनवण्याचा विचार करतोय. मी सचिन भौमिकजींशी बोललो आहे. ते पटकथा लिहिणार आहेत आणि तू त्याचे संवाद तयार कर. मी म्हणालो की, तुम्ही दिग्दर्शन करत आहात आणि त्या सिनेमासाठी मी लिहिणार नाही, असे होणार नाही. ते म्हणाले, ‘मग ठीक आहे. मी शूटिंग आणि काही कामात अडकलोय, त्यातून मोकळा होईन. मला फक्त तुला सांगायचे होते आणि तुझा होकार हवा होता.’ मी म्हणालो, ‘माझ्याकडून शंभर टक्के ओके आहे, असे समजा.’ त्यानंतर माझी सचिन भौमिक यांच्यासोबत बैठक झाली. आम्ही कथेविषयी चर्चा केली, त्यांनी कथेची संकल्पना सांगितली आणि म्हणाले की, मी जया बच्चन यांना घेण्याचा विचार करतोय. पण, मला कळले नाही की ईश्वराच्या मनात काय होते? तो १३ मार्चचा दिवस होता. ते आपल्या घरात टीव्हीवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट सामना बघत होते. तो पाहात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आपल्याला सोडून या जगातून निघून गेले. पण, त्यांचे कार्य, त्यांची कामगिरी, त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांच्या आणि फिल्म इंडस्ट्रीच्या सदैव सोबत राहतील. रूमी जाफरीबॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक
रसिक स्पेशल:नवे गृहनिर्माण धोरण आणि परवडणारी घरे
राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण आखताना या क्षेत्रांशी संबंधित ग्राहक, विकासक, नगररचनाकार, वास्तुविशारद यांच्या समस्या जाणून सर्वमान्य उपायांचा मध्यममार्ग काढावा लागेल. गरीब-वंचित घटकांना, अतिक्रमण करणाऱ्यांना मोफत घरे मिळत असताना गरजू मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे खरोखरच परवडावीत, अशी सरकारची इच्छा असल्याचे या धोरणातून प्रतिबिंबित व्हायला हवे.निवारा ही माणसाची प्राथमिक गरज आहे. पूर्वी लोक भाड्याच्या घरात राहायचे आणि निवृत्तीच्या वेळी गावाकडे अथवा आवडत्या ठिकाणी स्वतःचे घर बांधण्याचा विचार करीत. मध्यंतरीच्या काळात सुलभतेने कर्ज उपलब्ध होऊ लागले, लोकांची क्रयशक्ती वाढली आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी सोयीस्कर असे स्वतःचे घर असावे, ही इच्छा लोकांच्या मनात वाढीस लागली. त्यामुळे बांधकाम व्यवसाय झपाट्याने वाढू लागला, त्यात अनिष्ट प्रथाही रुजल्या.या वाढीमुळे २००५ पूर्वी घेतलेल्या घराच्या किमती एवढ्या वाढल्या की, अनेक लोक त्याकडे गुंतवणूक म्हणूनही पाहू लागले. यातच मोफत घरे देण्यासारख्या योजना आल्या. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने किमतीत प्रचंड वाढ झाली. त्यावर उपाय म्हणून चटई क्षेत्रात वाढ, पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यात आलं. सिडको, म्हाडा यांसारख्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थांनी सदनिका बांधून, त्यांच्या सोडती काढून काही अंशी गरज भागवण्याचा प्रयत्न केला. कालांतराने अशा घरांच्या किमती एवढ्या वाढल्या की अन्य विकासकांच्या तुलनेत या संस्थांच्या दरातील आणि दर्जातील कमी तफावतीमुळे त्यांच्या सदनिका पडून राहू लागल्या. छोट्या सदनिकांच्या तुलनेत मोठी घरे कमी खर्चिक आणि अधिक सोयीची वाटल्याने खासगी विकासकांनी अशा सदनिकांची संख्या वाढवली. त्यातून किमती एवढ्या वाढल्या की, शहरात घर घेणे सामान्यांसाठी अशक्य झाले. त्यामुळे ‘परवडणारी घरे’ ही संकल्पना फक्त कागदावरच राहिली. घरे परवडणारी न राहिल्याने लोक दूरवर राहू लागले. त्यातून वाहतूक व्यवस्थेवरील ताण आणि प्रवासाचा कालावधीही वाढला. या दोन्ही गोष्टी फारशी सुखकारक नाहीत. नव्या गृहनिर्माण धोरणाची तयारीप्रधानमंत्री आवास योजनेतून २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने एका वर्षात पाच लाख परवडणारी घरे बांधायचे ठरवले होते. हे उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकलो नाही. आपल्या पूर्वीच्या गृहनिर्माण धोरणाचा कोणताही लेखाजोखा न मांडता आता १७ वर्षांनंतर बदललेल्या परिस्थितीचा विचार करून शासन गृहनिर्माण धोरण जाहीर करू इच्छित आहे. त्याप्रमाणे सरकारने नवीन गृहनिर्माण घोरणाचा ९४ पानी मसुदा सप्टेंबरअखेरीस जाहीर केला. हा मसुदा रेरा कायद्यानुसार स्थापन झालेल्या ‘महारेरा’ या नियामकांच्या शक्तीचा पुरेपूर वापर करून घेत नाही. या मसुद्यावर जनतेच्या हरकती / सूचना मागवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली गेली. यामागे केवळ विकासकांच्या फायद्याचा विचार केला जातोय, असे सकृतदर्शनी वाटत होते. त्यामुळेच “मुंबई ग्राहक पंचायत” या स्वयंसेवी संस्थेने त्याला विरोध करून अभ्यासासाठी मुदत वाढवण्याची मागणी केली. तिला सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाल्याने आता या मसुद्यावरील हरकती, सूचनांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता नवे गृहनिर्माण धोरण नव्या सरकारकडूनच जाहीर केले जाईल. गृहनिर्माण क्षेत्रापुढच्या मोठ्या समस्या- घरांच्या न परवडणाऱ्या किमती.- प्रकल्पपूर्तीला लागणारा दीर्घ कालावधी.- अडकून राहिलेले किंवा अर्धवट राहिलेले प्रकल्प.- प्रत्येक ठिकाणी मंजुरी / परवानगी मिळवताना होणारा भ्रष्टाचार.- अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे.- तक्रार निवारणाच्या प्रभावी यंत्रणेचा अभाव.- मोठ्या प्रमाणावरील शासकीय कर. सध्या गृहखरेदीसाठी मोजलेल्या रकमेतील ५० टक्के अधिक रक्कम प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सरकारला कररूपाने मिळत आहे. कोणते उपाय करता येतील?- सध्या प्रकल्पाला बांधकाम मंजुरी मिळवण्यापासून सदनिका राहण्यास योग्य यासाठीची मंजुरी मिळवण्यात कालहरण आणि सर्वाधिक भ्रष्टाचार होतो. त्यांची अंतिम किंमत ग्राहकाला मोजावी लागते. यासाठी पूर्ण पारदर्शक एक खिडकी यंत्रणा अत्यावश्यक आहे. अशी यंत्रणा निर्माण करताना शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या नियमनातील अडथळे दूर केले जावेत. विशिष्ट कालावधीनंतर आपोआप मंजुरी मिळेल, अशा तरतुदी असल्या पाहिजेत. शासनाने २०१७-१८ मध्ये यावर विचार करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. विविध परवानग्या बाह्ययंत्रणेद्वारे द्याव्यात, अशी सूचना या समितीने केली होती.- तयार घर आणि नियोजित प्रकल्पातील घर यांच्या किमतीत खूप फरक असल्याने बहुतांश लोक नियोजित प्रकल्पात घर घेणे पसंत करतात आणि प्रकल्प रेंगाळल्याने किंवा अर्धवट राहिल्याने अडचणीत येतात. घर ताब्यात नसल्याने एकीकडे भाडे द्यावे लागते आणि दुसरीकडे ईएमआय सुरू राहतो. त्यामुळे अशा ग्राहकांना आर्थिक अडचणी येतात, त्यातून मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे अधिकाधिक पूर्ण झालेली घरे मोठ्या प्रमाणात कशी उपलब्ध होतील, यावर उपाय योजून अंमलबजावणी करण्याची आणि त्याचे फायदे ग्राहकापर्यंत कसे पोहोचतील, ते पाहणारी कायदेशीर यंत्रणा हवी. हे काम महारेरामार्फत होऊ शकते.- जितक्या घरांची मागणी आहे, तेवढी घरे उपलब्ध होतील का? यामुळे नागरी यंत्रणांवर पडणारा ताण यांचा विचार करून व्यापारी संस्थांचे विकेंद्रीकरण करुन त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागतील.- अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे ‘शेवटची संधी’ म्हणून नियमित करत गेल्याने अनेक भू-माफियांचा उदय झाला आणि राजकीय पाठबळावर अशा अनेकांचा तोच व्यवसाय झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण रोखणे, तेथे बांधकाम न होऊ देणे यासाठी राजकीय हस्तक्षेप विरहित स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल.- यातील तक्रारीची योग्य दखल घेणारी प्रभावी यंत्रणा हवी. रेरा कायदा आणि सामंजस्य मंचामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरीही अनेक तक्रारी प्रलंबित असून, त्या रेरा कायद्यात येतात की नाही, याबाबत संदिग्धता आहे. ती दूर होणे आवश्यक आहे.- मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने महसूल मिळवायचे साधन म्हणून शासनाने या क्षेत्राकडे पाहू नये. गृहनिर्माण क्षेत्रापुढच्या समस्या आणि उपाय यांची ही यादी वाढवता येईल, त्याबाबत मतभेदही असू शकतील. शासनाने खासगी क्षेत्रांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात गृहनिर्मिती करून खूप मोठ्या संख्येने भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध करावीत, असाही एक पर्याय आहे. यासाठी विकासकांना उपलब्ध भूखंडातील २५ टक्के भूखंड विनामूल्य अथवा अल्प मूल्याने उपलब्ध करून द्यावेत. आपले स्वत:चे घर असावे, या ध्येयाने झपाटून जात कर्ज काढून उमेदीची पुढची वीस वर्षे वाया घालवणाऱ्या ग्राहकांची मनोवृत्ती बदलण्याचे प्रयत्न करावे लागतील. तरीही ज्यांना स्वतःच्या मालकीचे घर हवेच असेल, तर त्यांच्यासाठी तयार घरे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी विकासकांना आणि ग्राहकांना आर्थिक सवलतीही देता येतील. या क्षेत्रांशी संबंधित ग्राहक, विकासक, नगररचनाकार, वास्तुविशारद यांच्या समस्या जाणून सर्वमान्य उपायांचा मध्यममार्ग काढावा लागेल. गरिब-वंचित घटकांना, अतिक्रमण करणाऱ्यांना मोफत घरे मिळत असताना गरजू मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे खरोखरच परवडावीत, अशी सरकारची इच्छा असल्याचे नव्या गृहनिर्माण धोरणातून प्रतिबिंबित व्हायला हवे. त्यासाठी गरज आहे ती तीव्र राजकीय इच्छाशक्तीची! उदय पिंगळेudaypingale@yahoo.com
रसिक स्पेशल:दिवाळीची ‘अशीही’ खरेदी!
झटपट श्रीमंत होण्याचा कुठलाही कायदेशीर मार्ग अस्तित्वात नाही. दरमहा शिस्तबद्ध गुंतवणूक करुन भविष्यातील आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा एकमेव चांगला आणि उजळ मार्ग आहे. त्यामुळे या दिवाळीत आजच्या गरजेपेक्षा उद्याच्या आवश्यकतेसाठी अशा प्रकारे थोडीफार वेगळी ‘खरेदी’ करायला काय हरकत आहे?बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आलीय. दिवाळीच्या खरेदीसाठी रस्ते ओसंडून वाहताहेत, वाहतूक कोंडी होऊ लागलीय. दरवर्षी दिवाळीच्या खरेदीचा मुख्य रोख कुटुंबाला नवे कपडे घेण्याकडे असतो. त्यानंतर होते सोने खरेदी. या दोन्ही प्रकारच्या खरेदीत भरपूर उत्साह दिसून येतो. याशिवाय, आता दिवाळीच्या सुट्यांत देशात किंवा परदेशात सहलीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विमान प्रवासाचे दर कितीही वाढले, तरी विमानातील गर्दी आणि पर्यटनाचा ओढा कमी होत नाही. प्रश्न असा आहे की, दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने हाती येणारा बोनस, वेतन, वेतनवाढ आणि अतिरिक्त कामाच्या मोबदल्यात किंवा प्रोत्साहनरुपी मिळणारी रक्कम या प्रकारच्या तात्कालिक खरेदीवर खर्चून पुन्हा पुढच्या वर्षीच्या अशाच ‘बोनस’ची वाट पाहायची की दरवर्षी दिवाळी खरेदीसाठी हमखास रक्कम हाती येईल, अशी सोय करुन ठेवायची? ‘कॅश फ्लो’चे महत्त्व जाणून घ्या‘रीच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा लेखक रिचर्ड कियासाकी म्हणतो की, अशा अॅसेटस गोळा करा, ज्या पुढे कॅश फ्लो (रोकड प्रवाह) निर्माण करतील. म्हणजे गाठीला भांडवल असल्यास जमीन (अथवा प्लॉट) विकत घ्यायच्या ऐवजी एखादे दुकान विकत घ्या, ते भाडेकरूला देऊन मिळणाऱ्या भाड्याच्या रूपाने दरमहा घरात रोकड येत राहील. त्यातून आपली देणी भागवा. त्याचबरोबर शेअर्समध्ये भांडवल गुंतवा, म्हणजे लाभांशापोटी काही रक्कम घरी येत राहील. पुढे बोनस शेअर्स हाती आल्यास त्यातील काही विक्रीसाठी बाजूला ठेवा. असे सतत करून आपली देणी येणाऱ्या नफ्यातून किंवा व्याजातून भागत राहिली, तर पैसे कधीच कमी पडणार नाहीत. शेअर्सची निवड करणे कठीण जात असेल, तर म्युचुअल फंड आहेतच! त्यात भांडवल गुंतवावे. खरे तर हाच शाश्वत संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग आहे. आता हे सगळं करायचं कसं? तर त्यासाठी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा पूर्ण लाभ घेता आला पाहिजे. तुम्ही म्हणाल, असं काय वेगळं आहे आपल्या अर्थव्यवस्थेत? तर त्याचं उत्तर आहे...1. भारत हा जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताने अलीकडेच चीनला मागे टाकून १.५ अब्ज लोकसंख्या ओलांडली आहे.2. भारताची लोकसंख्या केवळ सर्वाधिक आहे असे नव्हे, तर लोकसंख्येत तरुणांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. आज आपल्या देशाचे सरासरी वय २९ वर्षे आहे. २०५० पर्यंत ते अधिकाधिक ३८ वर्षापर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. जितका तरूण देश, तितक्या त्याच्या गरजा जास्त! अर्थातच जगात सर्वांत मोठा खप असलेली आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारतात आहे.3. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सात टक्के आहे. त्या तुलनेत उर्वरित जग फार मागे पडते.4. कित्येक उद्योगांत आपण जगामध्ये अग्रणी आहोत. इंग्रजी भाषा आत्मसात केलेले कुशल मनुष्यबळ ही आपली खासियत आहे.5. चीनच्या दरडोई उत्पन्नाने २००७ मध्ये २६०० डॉलर पार केले आणि त्यानंतर पुढील पाच - सात वर्षांत ते दुप्पट झाले. आज ते १२ हजार ६०० डॉलर आहे. साहजिकच, अमेरिकेनंतर चीन हा दोन नंबरचा देश झाला आहे. भारताने २०२३ मध्ये २६०० डॉलर दरडोई उत्पन्नाचा टप्पा पार केला. पुढील पाच ते सहा वर्षांत हे उत्पन्न दुप्पट होईल. त्यातून अधिक सुबत्ता येईल. तसाच जगाचा इतिहास आहे.6. सीमा सुरक्षित असलेला, दूरदर्शी नेतृत्वाचा देश सहजच परदेशी गुंतवणूक आकर्षित करतो. आज आपल्याकडे हेच होत आहे. त्यातून नवे तंत्रज्ञान भारतात येत आहे आणि देशातील प्रचंड मागणी पुरवत असतानाच, उच्च गुणवत्ता असलेली अनेक उत्पादने निर्यात करण्याची क्षमता भारतीय उद्योगात आली आहे. शेअर्समधील गुंतवणूकआपल्याला या अर्थव्यवस्थेचा भाग होऊन, त्यातून स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल, तर त्यासाठी या दिवाळीची खरेदी थोडी वेगळी असायला हवी. चांगला नफा होत असलेला आणि दरवर्षी वाढता असलेला शेअर निवडून तो दिवाळीनिमित्त घेता येईल. नफा जसजसा वाढेल, तशी शेअरची किंमत वाढते. नव्या गुंतवणूकदाराने सहसा ओळखीचा शेअर घ्यावा. केवळ उदाहरण म्हणून पाहायचे तर आयसीआयसीआय बँकेचे देता येईल. या बँकेच्या शाखा सर्वत्र पसरलेल्या आपण पाहतो. क्वचित एखादे वाहन घेताना शोरूममध्ये ग्राहकाला गाठून त्याला कर्ज देणारे त्यांचे कर्मचारी पाहतो. हा शेअर २०२० मध्ये ४०० रुपये होता, तो आज १२५० आहे. असाच सामान्य माणसाच्या परिचयाचा दुसरा शेअर सुचवायचा तर तो म्हणजे भारती एअरटेल. आज घराघरात किमान दोन-तीन मोबाइल फोन असतात. आणि त्यासाठीची सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्या फक्त तीन आहेत. त्यापैकी भारती एअरटेल ही कंपनी आहे. हा शेअर देखील सप्टेंबर २०२० मध्ये ४२० रुपये होता, तो आज १६६० रुपये आहे. अर्थात, ही केवळ उदाहरणे आहेत. चांगला सल्लागार आणि बाजाराच्या अभ्यासाशिवाय अशा कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य नसते. म्युच्युअल फंडाचा पर्यायशेअर विकत घेणे कठीण वाटले तर त्याच ताकदीच्या विविध शेअर्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाकडे बघता येईल. या फंडातील गुंतवणूक अत्यंत सोपी आहे. अगदी ५०० किंवा हजार रुपये दरमहा ‘एसआयपी’च्या (सीप) माध्यमातून गुंतवणे सहज शक्य आहे. त्यासाठी चांगल्या, वैविध्यपूर्ण शेअर्समध्ये गुंतवणूक करणारी योजना हवी. नवखे असाल तर यासाठीही सल्लागाराची मदत घेणे योग्य ठरते. अगदी अठराशे रुपये दरमहा गुंतवल्यास वीस वर्षात वीस लाख रुपये हाती येऊ शकतात. हीच चक्रव्याढ व्याजाची गंमत आहे. भविष्यातील आपली सगळी स्वप्ने पूर्ण करण्याचा हाच मार्ग आहे. ‘ईटीएफ’ आणि गोल्ड बाँडसोने हा भारतीयांच्या खास आवडीचा विषय आहे. सोने-चांदी खरेदी जरूर करावी, पण ती केवळ दागिन्यांची करताना विचारही करावा. कारण यात होणाऱ्या गुंतवणुकीतून भाव वाढला तरी नफा ताब्यात घेणार कसा? पत्नीच्या दागिन्यांचा किंवा सौभाग्य अलंकाराचा एखादा तुकडा विकण्यास आजही आपला समाज धजावत नाही, तशी आपली मानसिकताही नसते. मग कियासाकीचे सांगणेही ऐकायचे आहे आणि गुंतवणुकीतील वाढीव नफाही मिळवायचाय, तर सोन्या-चांदीतील गुंतवणूक काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पद्धतीनेही करायला हवी. शेअर बाजारात गोल्ड बीस आणि सिल्व्हर बीस या नावाने सोन्यात व चांदीत गुंतवणूक करणारे ‘ईटीएफ’ मिळतात. ही गुंतवणूक सुरक्षित तर असतेच; पण त्यात कुठलीही घट न होता बाजारभावाने ती कधीही थोडी थोडी विकत घेता अथवा विकता येते. सरकारचे गोल्ड बाँड तर प्रसिद्ध आहेतच. त्यावर २.५ टक्के वार्षिक व्याजही मिळते आणि मुदतीअंती विकताना होणारा नफा करमुक्त आहे. हे बाँडसुद्धा सरकारकडून थेट डीमॅट खात्यात विकत घेता येतात.मित्रहो, झटपट श्रीमंत होण्याचा कुठलाही कायदेशीर मार्ग अस्तित्वात नाही. म्हणूनच फ्युचर्स, बिटकॉइन, ड्रीम इलेव्हन किंवा सट्ट्याचा रमी गेम अशा कुठल्याही गोष्टीच्या नादी न लागता, दरमहा शिस्तबद्ध गुंतवणूक करुन भविष्यातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हाच एकमेव चांगला आणि उजळ मार्ग आहे. त्यामुळे या दिवाळीत आजच्या गरजेपेक्षा उद्याच्या आवश्यकतेसाठीही थोडीफार खरेदी करायला काय हरकत आहे? लक्ष्मीपूजनाला गोल्ड बीस घेऊन शाश्वत लक्ष्मीची आपल्या डीमॅट खात्यात प्रतिष्ठापना करा किंवा पाडव्याला एखाद्या चांगल्या फंडातील ‘सीप’ची मुहूर्तमेढ करा. अशा नव्या रुपातील खरेदीमुळे केवळ दिवाळीतच नव्हे, तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपले घर संपन्नतेच्या प्रकाशात लखलखत राहील, हे निश्चित! भूषण महाजनkreatwealth@gmail.com
अलीकडेच या संपूर्ण देशाला अशा धक्क्यातून जावे लागले, ज्याविषयी बोलतानाही मन जड होत आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतनजी नवल टाटा यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. म्हणून माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज रतनजी टाटा यांच्याबद्दल सांगणार आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाप्रमाणे मलाही रतनजी टाटा यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. आपल्या चांगल्या स्वभावाने आणि उद्योगातील कौशल्याने त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रियता मिळवली होती. टाटा समूहाच्या विविध व्यवसायांबद्दल सर्वांना माहिती असली, तरी फार कमी लोकांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे रतन टाटा यांनी २००४ मध्ये ‘ऐतबार’ नावाच्या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांची प्रमुख भूमिका होती. तो सिनेमा फारसा न चालल्याने टाटांचे खूप नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी त्या सिनेमानंतर फिल्म इंडस्ट्री सोडली. तथापि, रतन टाटाजींना संगीत आणि कलेची आवड होती. म्हणूनच त्यांनी सीबीएस इंडिया नावाची म्युझिक कंपनी सुरू केली होती. आपल्या या म्युझिक कंपनीच्या पहिल्या अल्बमसाठी त्यांनी पाकिस्तानी पॉप स्टार जोहेब हसन आणि त्यांची बहीण नाझिया हसन यांना साइन केले होते. जोहेब हसन यांचे ‘डिस्को दीवाने’ हे गाणे खूप हिट झाले होते. त्यांच्यातील टॅलेंट लक्षात घेऊन रतन टाटांनी जोहेबना विम्बल्डनमधील त्यांच्या घरी कॉल केला. जोहेबच्या आईने कॉल उचलला. रतन टाटाजी त्यांना म्हणाले, ‘मी भारतातून रतन बोलतो आहे. मी एक म्युझिक कंपनी सुरू करणार आहे आणि मला असे वाटते की, माझ्या म्युझिक कंपनीचा पहिला अल्बम जोहेबच्या आवाजातला असावा.’ जोहेब सांगतात की, त्यानंतर रतन टाटाजींसोबत त्यांचे बऱ्याचदा बोलणे झाले. पण, त्यांच्या बोलण्यातून आणि साधेपणामुळे ते खरोखर कोण आहेत, याची मला कल्पना आली नाही. आमच्याच संवाद सुरू झाला आणि वाढत गेला. नंतर सीबीएस इंडियाचा पहिला म्युझिक अल्बम ‘यंग तरंग’ लाँच झाला. या लाँचिंगनंतर संपूर्ण भारतात आणि दक्षिण आशियात म्युझिक अल्बमचा प्रारंभ झाला. ‘यंग तरंग’च्या यशाने ‘डिस्को दीवाने’च्या यशालाही मागे टाकले. त्यावेळी अमेरिकेत एम टीव्ही नुकताच सुरू झाला होता. या वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी ‘यंग तरंग’ची गाणी ऐकून आम्हाला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. दूरदर्शनने भारतात या अल्बमचे संगीत व्हिडिओ प्रसारित केले. जोहेबने सांगितले की, ‘१९८४ ला मुंबईत हॉटेल ताजमध्ये यंग तरंग’चे लाँचिंग झाले. त्या दिवशी रतनजी टाटा कोण आहेत, हे मला समजले. एवढे महान व्यक्तिमत्त्व इतक्या साधेपणाने आणि सतत चेहऱ्यावर हसू घेऊन जगू शकते, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. टाटाजींच्या या साधेपणावरुन एक प्रसिद्ध शेर आठवतोय... चाल वो चल की पस- ऐ-मर्ग तुझे याद करें, काम वो कर की ज़माने में तेरा नाम रहे। जोहेबने सांगितले की, ‘यंग तरंग’ अल्बम लाँच झाल्यावर रतन टाटाजींनी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. मी आणि माझी बहीण नाझियाने होकार दिला. टाटाजींच्या घरी जाण्यापूर्वी आमच्या मनात हजारो विचार चालू होते. आम्ही पुन्हा पुन्हा विचार करत होतो की, भारतातील सर्वात मोठ्या श्रीमंत व्यक्तींपैकी हे एक आहेत, त्यांचे संपूर्ण जगभरात इतके मोठे नाव आहे. त्यांचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नसेल. तिथे नोकरांच्या लांबच्या लांब रांगा असतील, मोठ्या थाटामाटात ही असामी राहात असेल. पण विश्वास ठेवा, भारतातील सर्वांत ख्यातनाम श्रीमंतापैकी एक असलेले रतनजी टाटा एका सामान्य २ बीएचके फ्लॅटमध्ये राहात होते. त्या फ्लॅटमध्ये त्यांच्यासोबत त्यांची बहीण, एक नोकर आणि एक अल्सेशियन कुत्रा होता. त्यावेळी त्या व्यक्तीचा साधेपणा पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आज एखाद्याला थोडेफार यश मिळाले तरी तो गर्विष्ठ बनतो. पण, माझ्यासमोर मात्र रतनजी टाटा यांचे हे अनोखे उदाहरण होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके मोठे असूनही त्यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले आणि आमच्यावर कुटुंबातील सदस्यांसारखे प्रेम केले. तर मित्रांनो, असे होते रतनजी टाटा. शेवटी मला माझ्या बालपणातील एक विनोद आठवतोय. १९७० च्या दशकातील ही गोष्ट आहे. एक ब्रिटिश प्रवासी एअर इंडियातून भारतात आला. त्याने विचारले की, हे विमान कोणाचे आहे? कोणीतरी सांगितले, ‘टाटांचे.’ विमानतळावर उतरल्यावर विचारले की, हे विमानतळ कोणाचे आहे? कोणीतरी म्हणाले, ‘टाटांचे.’ गाडीत बसून निघाला. त्याला गाडी खूप आवडली. त्याने चालकाला विचारले की, ही गाडी कोण बनवतो? उत्तर आले, ‘टाटा.’ हा प्रवासी हायवेवरून जात होता. त्याला एक ट्रक दिसला आणि त्याने विचारले, खूप छान ट्रक आहे, ते कोण बनवतो? त्याला कोणीतरी सांगितले, ‘टाटा.’ ड्रायव्हरने त्याला विचारले, कुठे जायचेय? हा प्रवासी म्हणाला, मुंबईतील सर्वोत्तम हॉटेलमध्ये घेऊन चल.. ड्रायव्हर त्याला ताजमहाल हॉटेलमध्ये घेऊन गेला. तो हॉटेलजवळ पोहोचला, हॉटेल पाहिलं आणि म्हणाला, ‘वा! काय हॉटेल आहे! कोणाचं आहे हे हॉटेल?’ कोणीतरी सांगितलं.. ‘टाटांचं’. हॉटेलात त्याला वेलकम चहा देण्यात आला, त्याने एक घोट घेतला नि म्हणाला. ‘वा! काय चहा आहे! कोण बनवतो?’ कोणीतरी म्हणाले.. ‘टाटा.’ तो खोलीत आला. त्याने एसी चालू करताच खोली थंड झाली. त्यानं पुन्हा विचारलं, ‘छान.. हा एसी कोण बनवतो?’ वेटरने सांगितले, ‘टाटा.’ तो अंघोळीला गेला. तिथला साबण त्याला खूप आवडला. त्याने बाहेर आल्यावर विचारलं, की हे साबण कोण तयार करतो? वेटरने उत्तर दिले.. ‘टाटा’. तो ब्रिटिश प्रवासी म्हणाला, या देशाचे नाव इंडिया का आहे? खरं तर याचे नाव ‘टाटा’ असायला हवे होते... हा विनोद १९७० च्या दशकातला आहे, पण वास्तवात टाटांचे आपल्या रोजच्या आयुष्यात खूप मोठे योगदान आहे. टाटा ही एकच कंपनी आहे, जिच्याबद्दल आपण अभिमानाने सांगू शकतो की, हो, आम्ही टाटाचं मीठ खाल्लं आहे! आज रतनजी टाटा यांच्या आठवणीत राजेश खन्ना यांच्या ‘आराधना’तील त्यांच्या आवडीचं गाणं ऐका... मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आयी रुत मस्तानी कब आएगी तू... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
गोष्ट सांगतो ऐका...:जालीम इलाज
दामले काका आता सत्तरीत आहेत. सोसायटीत राहणाऱ्या एका मित्राने निनादला फोन केला आणि सांगितलं की, काकाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. निनाद भडकला... दामले काका एकटेच राहतात. पुण्यातल्या कितीतरी म्हाताऱ्या माणसांसारखे. मुलगा युरोपात आहे. चांगली नोकरी आहे. सून आणि नातू मुलासोबत युरोपात आहेत. इकडे काका थ्री बीएचकेमध्ये एकटे. त्यातली फक्त एक बेडरूम आणि हॉल एवढंच त्यांचं आयुष्य. पण, एकदा बेडरूममध्ये चक्कर आली. खूप आवाज दिला, पण बेडरूममधून आवाज बाहेर जात नाही. त्या बाजूला पार्किंग एरिया आहे. काकांना दरदरून घाम सुटला होता. आपला शेवट जवळ आलेला दिसू लागला होता. पण, अचानक स्वयंपाकवाली बाई आली. तिचा मोबाइल विसरला म्हणून. तिच्याकडं एक चावी ठेवलेली असतेच घराची. ती आली आणि डॉक्टरांना बोलावलं. बीपी लो झाला होता. बाकी काही टेन्शन नव्हतं. पण, त्या दिवसापासून दामले काका हॉलमध्येच झोपतात. तिन्ही बेडरूम बंद असतात. हॉलच्या खिडकीतून ते सोसायटीतल्या लोकांना बघत बसतात. खाली छोट्या गार्डनमध्ये योगासनं करत असलेल्या पाटलांना त्यांची सून नाश्त्याला बोलवते, मुळे काकूंचा नातू त्यांचा हात धरून फिरत असतो. हे सगळं बघून काकांना उगाच निराश व्हायला होतं. त्यामुळं आजकाल ते फारसे कुणात मिसळत नाहीत. कारण लोक भेटले की घरगुती गोष्टी बोलतात. वय झालेली माणसं सारखी आपल्या सुना-नातवंडावर बोलतात. वैताग येतो काकांना. त्यात वर्तमानपत्रातल्या बातम्या. कुणीतरी वृद्ध स्त्रीचा मृतदेह घरात तीन दिवस तसाच पडून होता, वास आला म्हणून शेजाऱ्यांनी तक्रार केली, मग कळले.. किंवा शेजारच्या सोसायटीतले आजोबा गेले, तेव्हा अमेरिकेतल्या नातवाने सांगितलं की अंत्यसंस्कार करून टाका, मी पैसे पाठवतो; पण येऊ शकत नाही.. असल्या गोष्टी ऐकून दामले काका हैराण होतात. खूपदा न जेवता तसेच झोपी जातात. आपला मुलगा कष्टाळू आहे, असं काका सगळ्यांना सांगत असतात. आणि सून पण एकदम चांगली आहे, तिनं नातवाला शुभंकरोति शिकवलीय, एकही सण चुकवत नाही वगैरे वगैरे सांगताना त्यांच्या डोळ्यात कौतुक असतं. मुलाला आता आणखी दोन प्रमोशन मिळाले की, तो युरोपातल्या कंपनीचा ‘सीइओ’ होणार आहे. त्याच्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असणार आहे. मुलाचे त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. पण, अशात तो जरा वैतागलाय. कारण इकडं पुण्यातून फार बऱ्या गोष्टी त्याच्या कानावर पडत नाहीत. सोसायटीतले दोन-चार लोक त्याच्या संपर्कात असतात. त्यांच्याकडून त्याला आपल्या पप्पाच्या म्हणजे दामले काकांच्या अपडेट मिळत असतात. खरं तर या लोकांच्या तो संपर्कात आहे, ते त्यांची सोसायटी री-डेव्हलपमेंटला जाणारंय म्हणून. तो पाच-सात लोकांचा ग्रुप आहे. त्यात आधी दामले काका होते. पण, त्यांचा या री-डेव्हलपमेंटला विरोध आहे. म्हणून त्यांना काढून सोसायटीच्या लोकांनी मुलाला म्हणजे निनादला ग्रुपमध्ये सामील केलं. त्यावर, बिल्डरशी काय बोलणं चालू आहे, तो किती जागा द्यायला तयार आहे वगैरे अपडेट असतात. पण, त्यातल्याच काही लोकांनी या महिन्यात निनादला पर्सनल मेसेज केले. प्रकरण जरा गंभीर होतं. निनादला आपले पप्पा असं काही करतील, यावर विश्वासच बसला नाही. दामले काका सत्तरीत आहेत. सोसायटीत राहणाऱ्या एका मित्राने निनादला फोन केला आणि सांगितलं की, काकाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. निनाद भडकला. पण, आणखी दोन-तीन लोकांनी तीच तक्रार केली. शेवटी सोसायटीचे कोषाध्यक्ष असलेल्या वैद्य काकांनी निनादला खरा प्रकार सांगितला. गेल्या महिन्यापासून दामले काका जरा विचित्र वागताहेत. त्यांनी बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मेडिकलवाल्याला, ‘व्हायग्रा मिळेल का?’ म्हणून विचारलं. बिचारा घाबरून गेला. काका त्याच्या चांगल्या ओळखीचे. अगदी शांत, सज्जन. कधी कुणाशी उगाच बोलणार नाहीत का वेळ वाया घालवणार नाहीत. आपल्या कामाशी काम. फार तर रस्त्यावरच्या कुत्र्याला बिस्कीट विकत घेऊन खाऊ घालतील. पण, एरवी कुठं टाइमपास नाही. आणि ते असे अचानक पंधरा मिनिटं मेडिकलसमोर उभे राहतात काय, बाकी कुणी गिऱ्हाईक नाही बघून आपल्याजवळ येतात काय आणि हळूच कानात असा प्रश्न विचारतात काय.. सगळ्याच गोष्टी मेडिकलवाल्याला हैराण करणाऱ्या होत्या. बरं, काकांना तो ओळखत असला, तरी फार बोलणं नसायचं. त्याने ‘नाही’ म्हणून सांगितल्यावर काकांनी आपल्या चेहऱ्यावरची निराशा अजिबात लपवली नाही. ते गेल्या क्षणी मेडिकलवाल्याने त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या आपल्या दोन-तीन मित्रांना फोन करून घडला प्रकार सांगितला. ते दोघे तिघे ‘काय? काय?’ म्हणत पुन्हा पुन्हा घडला प्रकार ऐकत राहिले. गमतीची गोष्ट म्हणजे, कुणालाच मेडिकलवाल्यावर विश्वास बसला नाही. मेडिकलवाल्याला वाटलं की, आता पुन्हा काही दामले काका येणार नाहीत. पण, दुसऱ्या दिशी काका मेडिकलवर हजर. पुन्हा दहा मिनिटं बाकीचे गिऱ्हाईक जायची वाट बघत राहिले. कुणीच नाही असं पाहून मेडिकलवाल्याजवळ गेले. हळूच विचारलं, ‘व्हायग्रा आलं?’ त्याला कालचा प्रकार चुकून झाला, असं वाटलं होतं. कदाचित काकांना व्हायग्रा म्हणजे भलतंच काही वाटत असेल, असंही वाटलं एक क्षण त्याला. पण, आता तसा प्रकार दिसत नव्हता. कारण तो आजही नाही म्हणाला तेव्हा काका भडकले. ‘कशाला मेडिकल उघडलं?’ म्हणाले. मेडिकलवाला संतापला असता एरवी. पण, आज तो शांत बसला. काकांना ते का हवंय? हा विचार करत राहिला. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळी काका आले. आज मात्र सोसाटीचे कोषाध्यक्ष मेडिकलमध्ये आधीच येऊन बसले होते. आतमध्ये, कुणाला दिसणार नाही असे. मेडिकलवाल्याने आज विचारलंच. ‘का हवाय व्हायग्रा?’ काका म्हणाले, ‘तुला माहीत नाही? या वयातल्या लोकांसाठी जालीम इलाज आहे तो..’ आत बसलेल्या वैद्यांना हसूही आलं आणि रागही. काका चिडचिड करत निघून गेले. वैद्यांनी तडक निनादला फोन लावून सांगितलं. त्याला हा मोठा धक्का होता. तो तातडीने फ्लाइट पकडून भारतात आला. थेट घरी. काका काहीच न घडल्यासारखे त्याच्याशी बोलत होते. तो आल्याने आनंदात होते. निनादचा मात्र संताप वाढत होता. त्याने एका क्षणी विचारलंच. ‘व्हायग्र