SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

माझ्या हिश्श्याचे किस्से:सतीश कौशिक यांनी ‘बिग-बीं’कडून करून घेतला पूर्ण सीन

सतीश कौशिक हे माझे खूप जवळचे मित्र, उत्तम कलाकार आणि त्यापेक्षाही सर्वात चांगला माणूस होते. आज सतीश कौशिक यांच्याविषयी बोलताना मला पंकज पाराशर यांचीही आठवण येत आहे. दूरदर्शनवरील ‘करमचंद’ ही प्रसिद्ध मालिका त्यांनीच बनवली होती. ‘जलवा’ आणि ‘चालबाज’सारखे सिनेमे तयार केले. पंकज पाराशर यांनीच सतीश कौशिक यांना पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर संधी दिली होती. पंकजजींनी सांगितले की, ‘एफटीआयआय’मध्ये आम्ही शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट. तिथला अॅक्टिंगचा कोर्स १९७५ ला बंद झाला होता. १९७७ मध्ये आम्हाला एक सिनेमा बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला. पण, तेव्हा ‘एफटीआयआय’मध्ये कुणी अॅक्टर नव्हते. त्यामुळे आम्ही दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तून (एनएसडी) अॅक्टर बोलावले. १० - १५ अॅक्टर आले. मला एक गाणे तयार करायचे होते, ज्यामध्ये एक तरुण - तरुणी आणि एका बागकाम करणाऱ्या माळीदादाची भूमिका होती. माळीदादाच्या भूमिकेसाठी मी अनुपम खेर यांची निवड केली. सकाळी शूटिंग होते. आम्ही रात्री झोपायला गेलो. रात्री अचानक माझ्या खोलीचा दरवाजा खटखटू लागला. कुणीतरी दार उघडले, तेव्हा धोतर-छाटणी घातलेले, डोक्यावर गमछा बांधलेले आणि हातात झाडे कापायची कात्री घेतलेले सतीश कौशिक बाहेर उभे होते. म्हणाले, ‘बघा साहेब, मी परफेक्ट माळीदादा वाटतोय. तो काश्मिरी आहे.. देखणा, गोरा-गोमटा.. तुम्ही मला माळीदादा म्हणून घ्या..’ मग आम्ही सतीश यांना ती भूमिका दिली. ज्या बागेत शूटिंग होते, ती ‘एफटीआयआय’पासून जवळपास तासाभराच्या अंतरावर होती. आम्ही परत आलो, तेव्हा समजले की, शूटिंगच्या ठिकाणी सकाळी नऊला बस जाणार असल्याचे अनुपम खेरना सांगून सतीश स्वत: मात्र माळीदादाची भूमिका करण्यासाठी सहा वाजताच बसमध्ये बसून निघून गेले होते. यावरुन मला वसीम बरेलवी यांचा एक शेर आठवतोय... जहां रहेगा वहीं रौशनी लुटाएगा किसी चराग का अपना मकां नहीं होता। काळ पुढे सरकला. ८-१० वर्षांनंतर पंकज पाराशर यांनी ‘जलवा’ सिनेमाचे काम सुरू केले. पंकजजींनी त्याविषयी सांगितले की, या सिनेमातील सब-इन्स्पेक्टर रामू घडियालीच्या भूमिकेसाठी मी सतीश यांना घेतले. शूटिंग गोव्यामध्ये होते. त्यामुळे आम्ही बसने येत-जात असू. जॉनी लीवरचाही हा सुरूवातीचा काळ होता. बसमध्ये जॉनीने अशोककुमार यांची एकदम कमालीची अॅक्टिंग करुन दाखवली. ती पाहिल्यावर मी म्हणालो, ‘अरे, हे सिनेमात घ्या..’ जॉनीने आणखी काही तरी करुन दाखवले. मी असिस्टंटला सांगितले की, हेसुद्धा सिनेमात घ्या. रात्री सतीशनी माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. ‘काय झाले?’ असे विचारल्यावर म्हणाले, ‘यार, तू त्याचा रोल वाढवतोय, माझा मात्र नाही वाढवत.’ मी म्हणालो..भाई, तुझा रोल एकदम परफेक्ट आहे. त्यावर त्यांनी सांगितले की, मी एक प्रसंग तयार केला आहे. खूप चांगला आहे, तो सिनेमात घ्या. बघा, खूप हिट होईल.. बस, एखाद्या मोठ्या अभिनेत्याला गेस्ट आर्टिस्ट म्हणून आणा.. मी म्हणालो, आता अनुपम खेर खूप मोठे स्टार बनलेत, त्यांनाच घेऊ.. त्यावर सतीश म्हणाले, ‘नको, अमिताभ बच्चन यांना घ्या.. त्यांच्यासोबत मी हा सीन करेन. माझी गॅरंटी आहे, तो नक्की हिट होईल.’ मी याविषयी निर्माते गुल आनंद यांना सांगितले. ते म्हणाले की, मी अमिताभ बच्चन यांना आणू शकत नाही. पण, त्यांच्यासोबत तुमची भेट घालून देऊ शकतो. मग मीटिंग फिक्स झाली. अमिताभजी फिल्म सिटीमध्ये ‘शहंशाह’चे शूटिंग करत होते. आम्ही तिथे पोहोचलो. त्यांची भेट झाल्यावर मी त्यांना म्हणालो की, सर, तुमच्याकडून आम्हाला एक छोटासा गेस्ट अॅपिअरन्स हवा आहे. त्यांनी ‘सीन काय आहे?’ विचारल्यावर सांगितले की, अमिताभ बच्चन आपले दोस्त आहेत, अशा थापा सतीश कौशिक मारत असतो. अशात एकेदिवशी तुम्ही खरेच येता आणि फक्त ‘नो’ एवढेच म्हणून निघून जाता. अमिताभजी राजी झाले; पण त्यांनी सांगितले की, माझ्याकडे तारखाच नाहीत. १८ दिवस तर इथेच ‘शहंशाह’चे शूटिंग करतोय.. मी म्हणालो, ‘सर, एक काम करू. आम्ही इथेच कॅमेरा घेऊन येतो. तुम्ही फक्त दोन मिनिटांसाठी मागून यायचे आणि ‘नो’ म्हणून निघून जायचे.’ दुसऱ्या दिवशी आम्ही रिहर्सल केली. सतीशने आपला डायलॉग म्हटला आणि त्यात पुन्हा सुधारणा केल्याने तो पूर्ण एक पानाचा सीन तयार झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ११ वाजता निरोप मिळाला की, अमितजी येत आहेत, शॉट तयार ठेवा.. आम्ही त्याप्रमाणे तयारी केली. अमितजी आले. मला म्हणाले, ‘चला, करुन घेऊ. ‘नो’ एवढेच तर म्हणायचे आहे..’ मी सांगितले, ‘सर, एक पूर्ण सीन आहे..’ एका पूर्ण पानाचा सीन पाहून अमितजींनी नकार दिला. पण, तो सीन शूट झाला, याचे सगळे श्रेय जाते सतीश कौशिकना. कारण बच्चन साहेबांनी ‘नो’ म्हणताच सतीश पुढे येऊन म्हणाले, ‘तुम्ही वाचू नका, मी तुम्हाला अॅक्टिंग करुन दाखवतो..’ त्यानंतर सतीश अॅक्टिंग करू लागले. अमितजींच्या स्टाइलमध्ये त्यांचा डायलॉगही म्हटला. अमितजींनीही ते लक्षपूर्वक पाहिले. मग त्यांनी कागद घेतला, पाहिला आणि विचारले, ‘काय देणार मला?’ मी म्हटले, गुलाबाचे फूल.. त्यावर ते म्हणाले, ‘चला, टेक घ्या..’ मग अमितजींनी एका टेकमध्ये शॉट ओके केला. अशाप्रकारे ‘जलवा’तील त्या जबरदस्त सीनचे श्रेय सतीश कौशिक यांना जाते. आज त्यांच्या याच ‘जलवा’ सिनेमातील हे गाणे ऐका... देखो देखो ये है जलवा... स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 18 May 2025 4:53 am

डायरीची पाने:चोपनातला आंबा

सध्या सगळीकडं रसाळीचे दिवस सुरू आहेत. घरोघर रसाळीची जेवणं दिली जात आहेत. पाहुणेरावळे बोलवले जात आहेत. पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस याची स्वर्गीय चव लोक चाखत आहेत. बाजारात आंब्याचे ढीगच्या ढीग लागलेले दिसत आहेत. नव्या बाजारांमध्ये आंब्याच्या चवडी रचून शिखरं केली जात आहेत. अर्थातच सगळीकडं आंबा आणि आंबाच दिसतो आहे. हा आंबा कुणाला आवडत नाही? आंब्याचं वेड जगात सगळीकडं, सर्वांनाच असतं. सगळीकडं आंबा पिकत नाही, पण आता जगात सर्वत्र आंबा मिळतो. कारण सगळं जगच आता एक खेडं झालं आहे. कोकणातला हापूस आंबा जगभरातले लोक खातात. पूर्वी राजेलोक खास आमराया लावायचे. श्रीमंत माणसं आपापल्या शेतात आमराई लावायचे. आणि त्या आमराया सगळ्यांना गोडवा पुरवायच्या. महान शायर मिर्झा गालिब यांच्यापासून ते त्या काळातील राजा-महाराजांपर्यंत सगळ्यांना आमराया आवडायच्या. हैदराबादच्या निजामानं मराठवाड्यात अनेक ठिकाणी आमराया लावल्या होत्या आणि तिथले आंबे रसाळीच्या काळात हैदराबादला जायचे. राजा काय अन् प्रजा काय, आंब्याच्या गोडीची ओढ सगळ्यांनाच असते.आमच्या शेतात एकच आंब्याचं झाड होतं. त्याचं नावच पडलं होतं ‘चोपनातला आंबा’. चोपन म्हणजे ओढ्याकाठची खार धरणारी जमीन. अशाच जमिनीतला हा आंबा, म्हणून त्याला हे नाव पडलं होतं. हा आंबा खूप मोठ्या आकाराचा असायचा आणि कच्चा खाताना वाळकासारखा मधुर लागायचा. त्यामुळं लोक तो कच्चाच खायचे. या आंब्याचं पिकलेलं फळ कधीच कुणी पाहिलं नाही. कारण पिकेपर्यंत त्या झाडाला आंबे टिकतच नसत. एक तर गळून जात, नाही तर लोक खाऊन टाकत. आमच्या गावात इतकं चांगलं आंब्याचं झाड दुसरं नव्हतं. आमच्या गावशिवारात तशी आंब्याची झाडं कमीच होती. एखाद - दुसरी आमराई होती आणि एकटंदुकटं झाड कुणाकुणाच्या शेतात होतं. या सगळ्यांमध्ये आमच्या या झाडाचा आंबा खूपच देखणा आणि चवदार असायचा. त्याचा आकार, त्याची साल पाहणाराला भुरळ घालणारी आणि खाणाऱ्याला वेड लावणारी होती. मी वडिलांना सहज विचारलं, ‘हे आंब्याचं रोप कुठून आणलं?’ तर तेव्हा आंब्याचं रोप वगैरे असं कोणी आणत नसे. आंब्याची कोय आणून ती शेतात लावली जायची. वडील म्हणाले, ‘हे वावर आधी आमचे चुलते लिंबाजी यांच्या मालकीचं होतं. लिंबाजींच्या एका मुलाची सासुरवाडी रांजोणा होती. तिथं रसाळी खायला बोलवलेल्या त्या जावयाने, म्हणजे आमच्या चुलत्याने त्यांच्या शेतातल्या आवडलेल्या आंब्याची एक कोय आणून इथं लावली.’ म्हणजे हे आंब्याचं वाण वसमतजवळच्या रांजोणा गावावरून आलेलं होतं. असं आजोळाहून, सासरवाडीहून आंब्याचं वाण सर्वत्र वाटलं जायचं. रसाळीसोबत कोयी बांधून दिल्या जात आणि आपापल्या शेतात त्या लावल्या जायच्या. त्यातून अशा आमराया बहरायच्या. चोपनातल्या आंब्याची माझी वैयक्तिक आठवण खूप चांगली आहे. शेतात काम करताना, गुरं राखत असताना किंवा सुटीच्या दिवशी शेताची राखण करायला गेल्यावर मी या झाडाच्या फांदीच्या बेळक्यात बसून ‘नवे नवनीत’ हे ज. शा. देशपांडे यांनी संपादित केलेलं, सातशे वर्षातील मराठी कवितेचं संकलन वाचायचो. त्यातल्या काही कविता मी उंच आवाजात म्हणायचो. आपल्यातच रमून गायचो. खूप खूप आनंद वाटायचा. या आंब्याच्या बेळक्यात बसूनच मी स्वत:वर मराठीतल्या सातशे वर्षांच्या कवितेचे संस्कार करून घेतले आहेत. त्यामुळं या झाडाचं आणि माझं नातं असं कितीतरी रसाळ आहे. हे झाड स्वत:चा गोडवा मला देऊ शकलं नाही, पण मराठी कवितेतला गोडवा माझ्यात रुजवण्याचं काम या झाडानं केलं. ते माझ्या आयुष्याला पुरून उरलं आहे. ‘या झाडाला फार आंबे का लागत नाहीत? लागले तर रसाळीपर्यंत का टिकत नाहीत?’ असं एकदा मी आईला विचारलं. तिनं मला विलक्षण गोष्ट सांगितली... ‘एखाद्या निपुत्रिक बाईनं आंब्याच्या झाडाखाली आंघोळ केली की तिच्यातला दोष त्या आंब्यात उतरतो आणि तिची कूस भरली जाऊन तिला मूलंबाळं व्हायला लागतात. त्यामुळं त्या आंब्याला फळ लागत नाही. लागलं तर टिकत नाही.’ मी विचारलं, ‘मग आपल्या चोपनातल्या आंब्याखाली कुणी आंघोळ केली? कधी केली?’ त्यावर ती म्हणाली, ‘असं सगळ्यांना माहीत असताना का कुणी आंघोळ करत असतं? रात्री - बेरात्री सगळे लोक झोपले असताना कुणीतरी येऊन गुपचूप हे काम करून जातं. त्यामुळं आपल्याला ते कसं माहीत होणार?’ मी पुन्हा विचारलं, ‘शेजारपाजारच्या कुण्या निपुत्रिक बाईला अचानक लेकरू झालं, असं घडलंय का? म्हणजे आपल्याला अंदाज करता येईल की, त्या बाईनं आपल्या आंब्याच्या झाडाखाली आंघोळ केली असावी..’ पण, आईनं काही मला कुणाचं नाव सांगितलं नाही. पुढं माझं शिक्षण संपलं. शिक्षणाच्या निमित्तानं मी आधी गाव सोडलं आणि नंतर नोकरीमुळं गाव कायमचं सुटलं. परभणीत स्थायिक झालो. एकनाथनगरमध्ये स्वत:चं घर बांधलं. त्यानंतर बारा वर्षांनी त्याला कंपाउंड वॉल बांधली. ती बांधल्यावर घराभोवती झाडं लावता आली. ही सगळी फळझाडं माझा विद्यार्थी अरुण चव्हाळ यानं लावली. त्यात त्यानं तीन आंब्याची झाडं लावली. ही तीनही झाडं केशर वाणाची आहेत. त्याला भलीमोठी फळं लागतात. यावर्षीही कमी प्रमाणात का होईना, पण फळं लागली. हा आंबा पक्व झाला आणि हातात घेतला की, मला तो साक्षात चोपनातल्या आंब्यासारखा दिसतो. चोपनातल्या आंब्याची रसाळी मला खाता आली नाही. ती पूर्वजांनी लावलेली होती. पण, विद्यार्थी म्हणजे आपला वंशज असतो. त्यानं पूर्वजाच्या घराभोवती लावलेली आमराई मात्र खूप फळाला आली. दरवर्षी आम्ही त्या आंब्याची रसाळी खातो. या आंब्याची चव देवगड हापूसलाही नाही. हा आंबा माचून चोखताना जो स्वर्गीय आनंद होतो, तो इतर कुठल्याच आंब्यानं मला आतापर्यंत दिलेला नाही. विद्यार्थ्यानं दिलेली ही देणगी माझ्यासाठी कायमची गोड झाली आहे. त्यानं पूर्वजांचा आंब्याच्या कोयी वाटण्याच्या पुण्याईचा वसा पुढं सुरू ठेवला आहे. अरुण, माझ्या चोपनातलं आंब्याचं झाड आता राहिलेलं नाही. पण, त्याची आठवण करून देणारी तीन-तीन झाडं तू माझ्या घराभोवती लावली आहेस. पूर्वपरंपरा सुरू ठेवत माझ्या आयुष्यात गोडवा भरल्याबद्दल मी तुझा कायमचा ऋणी आहे. (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 18 May 2025 4:48 am

‘एआय’च्या विश्वात...:आता ‘एआय’च ठरवेल...‘जेवायला काय बनवायचं?’

खाद्यपदार्थ हा आपल्या सगळ्याचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. नवनवे पदार्थ बनवणं आणि ते चाखणं प्रत्येकालच आवडतं. आता तुम्ही म्हणालं की, ‘एआय’चा विषय सुरू असताना त्यात मध्येच हे खाद्यपदार्थ / पाककला कुठून आलं? तर त्याचं कारण म्हणजे, आता हे ‘एआय’ तुमच्या किचनमध्येही प्रवेश करू लागलं आहे. स्मार्ट किचन उपकरणे; जसे की ‘एआय’ ओव्हन, स्मार्ट रेफ्रिजरेटर, व्हाइस कमांडवर चालणारे मिक्सर, रोबोट शेफ यांमुळे स्वयंपाकाची अनुभूती आणि पारंपरिक स्वयंपाकघराचा लूकही बदलतो आहे. उदाहरणार्थ, ‘एआय’आधारित ओव्हन स्वयंचलितपणे तापमान आणि वेळ सेट करतो. स्मार्ट रेफ्रिजरेटर आपल्या वस्तूंची यादी ठेवतो आणि गरज पडल्यास मोबाइल अ‍ॅपद्वारे खरेदीची आठवण करून देतो. ‘आज जेवायला काहीतरी वेगळं कर, नेहमीचं नको..’ हे घरातल्यांचं वाक्य ऐकू आलं की बहुतांश गृहिणींना, ‘आज काय बनवायचं?’ हा प्रश्न पडतो आणि काय बनवायचं हे ठरवण्यात त्यांचा बराच वेळही जातो. घरामध्ये कुणी तरी डाएट कॉन्शस असतं, तर कुणाची पथ्यपाणी सुरू असतात. हे सांभाळत प्रत्येकाला आवडेल आणि मानवेल असं जेवण बनवणं ही त्या गृहिणीसाठी कसरतच असते. पण, ‘एआय’ आधारित किचन रोबोट आता स्वयंपाकही करू शकतात. काही रोबोट हजारो रेसिपी ‘शिकून’ त्या अचूक रीतीने तयार करतात. केवळ एका क्लिकवर तुम्हाला नेमक्या चवीचे, गरमागरम जेवण मिळते. त्यामुळे श्रमाची आणि वेळेची मोठी बचत होते. याशिवाय, ‘एआय’ अॅप्लिकेशन्स रेसिपीही सुचवतात, आहारातील पोषणमूल्यांचे विश्लेषण करतात आणि डाएट प्लॅनही तयार करतात. म्हणजे ‘एआय’ तुमच्या फिटनेसप्रमाणे किंवा मधुमेह असेल, तर त्यानुसार योग्य आहार योजनेसह रेसिपी सुचवते. यासाठी वापरली जाणारी काही टूल्स पाहू... Chef GPT : या टूलमध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेले पदार्थ / जिन्नस लिहायचे. तुम्हाला स्नॅक्स, ब्रेकफास्ट, लंच, डीनर यापैकी काय बनवायचे आहे, हे निवडायचे. मग तुमच्याकडे स्वयंपाकाची कुठली साधने आहेत? तुम्हाला किती वेळ आहे? तुम्ही पाककलेत किती निपुण आहात? या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे टूल तुम्हाला रेसिपी सुचवते. फक्त रेसिपीच नव्हे, तर त्यातून तुम्हाला कुठले आणि किती न्युट्रिएंट, किती कॅलरी मिळतील, हेही सांगते. या टूलच्या Paid Version मध्ये तुम्हाला आपल्या डाएटच्या गरजेनुसार आहाराचा प्लॅन बनवून मिळू शकतो. एवढंच काय, त्या रेसिपीला लागणारा एखादा जिन्नस घरात नसेल, तर हे टूल शॉपिंग लिस्टमध्ये त्याची नोंद करून ते ऑर्डरही करते. Let’s Foodie : हे टूलही Chef GPT सारखेच घरात असलेल्या सामग्रीपासून रेसिपी बनवून देते. पण, याची खासियत अशी की, हे रेसिपीसोबतच पाककलेतील विविध प्रकार, म्हणजे गॅसवर अन्न शिजवणे, बेकिंग, फ्रोझन म्हणजे अन्न थंड करणे यासोबत कोणते अन्न कुठल्या तापमानापर्यंत साठवून ठेवावे, अशा सर्व गोष्टीदेखील सांगते.Meal Practice : हे टूल फक्त रेसिपी न देता तुमच्या डाएटच्या गरजेनुसार / आहारतज्ज्ञांनी सुचवलेल्या तक्त्यानुसार विविध रेसिपी सुचवते. डाएट करणाऱ्या आणि आरोग्याविषयी सजग असलेल्यांसाठी हे टूल उपयुक्त आहे. म्हणजे, टेस्टी भी, हेल्दी भी और व्हरायटी भी.. असं म्हणायला हरकत नाही. Smart / AI Cooking Assistant : आपण आतापर्यंत जे टूल्स पाहिले ते फक्त रेसिपी देतात. पण, एखादं असं टूल मिळालं, जे संपूर्ण पदार्थ बनवूनच देत असेल, तर हॉटेलसारखं जेवण अगदी रोज घरी बनवता येईल. अगदी आपल्या साध्या मिक्सरसारखं दिसणाऱ्या या मशीनमध्ये एक छोटा वजनकाटा आणि एक छोटी स्क्रीन असते. एक हजाराहून जास्त रेसिपी यामध्ये इन-बिल्ट असतात. स्क्रीनवरून आपल्याला हवी ती रेसिपी सिलेक्ट करायची, ती किती लोकांसाठी बनवायची आहे, हेही सांगायचे आणि आता त्या रेसिपीसाठी लागणारे सगळे जिन्नस त्यांच्या दिलेल्या प्रमाणासह त्यात टाकायचे. हे मशीन कापणे, मळणे, परतणे, ढवळणे, शिजवणे अशा सर्व गोष्टी करून पदार्थ तयार करून देते. अशा प्रकारची विविध ‘एआय’ टूल वापरून आपण आवडीचे पदार्थ घरच्या घरी लगेच बनवू शकतो, यात शंका नाही. किचन रोबोट तर यापेक्षाही पुढची पावलं टाकत आहेत. ते अगदी आपण जसे हाताने पराठे लाटतो, तशी कृती करून दाखवतात! त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होते, जिन्नसांच्या नेमक्या प्रमाणामुळे अन्नाची चव सुधारते. एकूणच, आज ‘एआय’ आपले किचन स्मार्ट करत आहे. त्यातून उद्या आपला आहार अधिक वैयक्तिकृत आणि आरोग्यदायी होऊ शकेल. कदाचित काही वर्षांनी आपल्या किचनमधून ‘एss आईss’ अशा प्रेमळ हाकेऐवजी ‘एss आयss’ असा सूर ऐकायला येईल. पण, या सगळ्या गोष्टींबरोबर काही प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहेत.त्यापैकी, ‘माणसांचे स्वयंपाककलेशी असलेले भावनिक नाते आणि हाताने केलेल्या स्वयंपाकाची लज्जत ‘एआय’ आणू शकेल का?’ या कळीच्या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी ‘नाही’ असे आहे. (संपर्कः ameyp7@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 18 May 2025 4:42 am

बुकमार्क:एक प्रवास... जगण्याच्या श्रेयस - प्रेयसाच्या शोधात!

कॉर्पोरेट क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण आपल्या आतली हाक ऐकतो आणि नोकरीचा त्याग करत आयुष्याचे वास्तव आणि रहस्य जाणून घेण्याच्या ध्यासाने जगाच्या प्रवासाला निघतो.. ही गोष्ट आहे मानस दिवाण यांची. पत्नी अनुराधा यांच्यासोबत केलेल्या १८ देशांच्या प्रवासातील अनोखा अनुभव त्यांनी ‘डिअर जर्नी’ या पुस्तकाच्या स्वरुपात वाचकांपुढे ठेवला आहे. या इंग्रजीतील प्रवासवर्णनाचे त्यांनी दोन भाग केले आहेत. त्यापैकी ‘फ्री व्हीलिंग’मधून प्रवासाचे तपशील समोर येतात, तर ‘विदिन’मध्ये लेखकाने आभासातून वास्तवाकडे जाताना आपल्या अंत:दृष्टीला जाणवलेल्या गोष्टींचा सुरेख पट मांडला आहे. प्रवास माणसाच्या जीवनधारणेशी निगडीत असतो. तो लिहून ठेवण्याची परंपराही फार प्राचीन आहे. भारतीय साहित्यात अनेक दिग्गजांनी सांस्कृतिक प्रवासाचे महत्त्व विविध अंगांनी विषद केले आहे. मानस दिवाण यांचे हे पुस्तक वाचताना, आयुष्यातील श्रेयस आणि प्रेयसाचे भान आल्यावर आपण नक्की काय करायला हवे, या प्रश्नाचे उत्तर मिळते. मानस आणि अनुराधा दुचाकीवरून ४ महिने युरोप आणि आशियातील १८ देशांचा प्रवास करतात. मानस आपल्या जडणघडणीच्या काळात, अगदी लहानपणापासून ते आजवर कशाचा तरी शोध घेत होते. ते नेमके हेच असावे, असा भास वाचकाला व्हावा, इतकं खरंखुरं लेखन त्यांनी केलं आहे. एका प्रशंसनीय, साहसी आणि अवखळ वाटेने चालणाऱ्या या दोघांना या प्रवासातून नक्की काय साध्य करायचे होते? रोजचे सुरळीत चाललेले आयुष्य एकरेषीय वाटून त्यांनी ही अनवट वाट का निवडली? मोठ्या कष्टाने मिळवलेली नोकरी सोडून, पैशाच्या बचतीतून प्रवासासाठी महागडी गाडी घेऊन नक्की कशी सुरूवात झाली या प्रवासाची? लेखक हा प्रसंग सांगताना स्वत:ला एका प्रश्नाच्या शोधाकडे नेतो. तो प्रश्न म्हणजे, ‘तुम्ही तुमच्या स्वप्नाचा पाठलाग केला नसेल, तर तुम्ही खरोखर जगला आहात का?’ आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत या ध्येयवेड्या जोडप्याने अशा प्रवासाला सुरूवात केली खरी, पण त्यांच्यासमोर रोज एक नवीन आव्हान असणार होतं. प्रत्येक देशांत काही कठीण प्रसंगांचा सामना त्यांना करावा लागणार होता. अशा वेळी आपले मनोधैर्य आणि एकमेकांवरील विश्वास हीच या जोडप्याची खरी शक्ती होती. मानस-अनुराधा यांच्या या प्रवासाला स्पेनमधील व्हॅलेन्सियापासून सुरूवात होते. लेखकाने निवडलेल्या प्रत्येक स्थळाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. कधी त्यांचे मन हिरवाईने आच्छादलेल्या डोंगरांमध्ये रममाण होई, तर कधी समुद्र आणि डोंगरांच्या मनोहरी स्वप्नात दंग होत असे. आपल्या या प्रवासाचे वर्णन एकाच वेळी ललित आणि वैचारिक या दोन्ही शैलीत करण्याची किमया मानस यांनी साधली आहे. त्यांची बहुमुखी प्रतिभा इथे दिसून येते. या सगळ्यात स्वप्न पाहणारे, जोखीम घेणारे, वृत्तीने साहसी, पण मनाने रोमँटिक असलेले हे जोडपे एकमेकांसाठी कसे जगत होते, याचा प्रत्यय हे वर्णन वाचताना येतो. प्रत्येक देश, तिथली माणसे, भवताल लेखकाच्या मनावर एक ठसा उमटवत असतो. आग्नेय युरोपातील अल्बेनिया इथला असाच एक प्रसंग खूप लक्षवेधी आहे. तेथील स्थनिक लोक मानस आणि अनुराधा यांचे अगदी अगत्याने स्वागत करतात. भारतातील संस्कृतीबद्दल त्यांना पुरेशी माहिती असते. विशेषत: आपले सण, समारंभ, उत्सव आदींबाबत ते भरभरून बोलत असतात. ‘तुम्हा सगळ्यांना भारताविषयी इतकी माहिती कशी काय?’ असे लेखक त्यांना विचारतो. त्यावर ते लोक सांगतात की, “बालिका वधू’, ‘क्योंकी सांस भी कभी बहु थी..” अशा मालिका इथल्या स्थानिक भाषेत खूप लोकप्रिय आहेत. केवळ नकाशा किंवा चित्रे पाहून खरे जग जाणून घेता येत नाही, तर त्यासाठी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. तशी अनुभूती देणारे ‘डिअर जर्नी’ हे पुस्तक वाचकांच्या मनात भटकंतीची आणि नवोन्मेषाची भावना जागृत करते. ‘द कॉमन हाऊस स्पॅरो’ या कथेतील चिमणीचे मनोगत असो किंवा ‘एन्काउंटर अॅट द बोस्निया बॉर्डर’मधल्या एका प्रसंगात भेटणारा, लेखकाला धमकावणारा पासपोर्ट अधिकारी असो किंवा सेल्फीसाठी मनोभावे घेरणारा समूह असो; या सगळ्याच गोष्टी खूप विस्मयकारक आहेत. विविध संस्कारांनी नटलेले प्रदेश, तेथील भिन्न संस्कृती आणि माणसांना या दोघांनी जिंकून घेतल्याचे आपल्याला जाणवते. आयुष्याच्या पुस्तकातले एक मोरपीस अलगद बाहेर काढावं, त्याची मऊ-मुलायम अनुभूती घ्यावी आणि ते पुन्हा तसंच ठेऊन द्यावं.. अशी ही या दोघांसाठीची सुखद यात्रा आहे. एका रसिक मनाने घेतलेला जगाचा हा आत्मिक अनुभव वाचकांनाही आपल्या ‘आतल्या’ आनंदासाठी ‘बाहेर’च्या प्रवासाचे दार उघडायला नक्की उद्युक्त करेल. पुस्तकाचे नाव : डिअर जर्नीलेखक : मानस दिवाणप्रकाशक : द राइट प्लेस / क्रॉसवर्डपाने : डिअर जर्नी फ्री व्हीलिंग- १२२, विदिन- ९७किंमत : रु. २९९ (संपर्कः swapnilkashi566@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 18 May 2025 4:38 am

देश - परदेश:सर्वात आनंदी देशाची रहस्ये

फिनलंडमधील नागरिकांना आयुष्याची कोणतीही २१ वर्षे शिक्षण आणि जीवनभर आरोग्यसेवा मोफत मिळते. ज्या देशात शिक्षण आणि आरोग्यसेवा नि:शुल्क आहेत, तो देश जगात सर्वात आनंदी असणे अपरिहार्य आहे. फिनलंडमध्ये विश्वास (ट्रस्ट) हा परवलीचा शब्द आहे. तिथे नागरिक प्रशासनावर आणि प्रशासन नागरिकांवर विश्वास ठेवते. नागरिकही परस्परांवर विश्वास ठेवतात.’ दिल्लीतील फिनलंडच्या दूतावासातील अधिकारी आम्हाला सांगत होता.. ‘आमच्या आनंदी असण्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे.’ ते ऐकताना मी भारतीय जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत ‘विश्वास’आला तर काय होईल, याचा विचार करत होतो. मनातून उत्तर आले की, विश्वासार्हता ही आपल्या समाजाची फार मोठी उणीव आहे. दुर्दैवाने शासन - जनता, दुकानदार- ग्राहक, मालक - नोकर, शेजारी - पाजारी यांच्यातील विश्वासाचा अनुशेष हा विकासाच्या अनुशेषापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे आपल्याला अजून कळलेले नाही. एकदा विश्वास उडाला की, समाजाची प्रगती खुंटते, हे आपल्याला समजत नाही. या पार्श्वभूमीवर फिनलंडच्या एका आठवड्याच्या वास्तव्यात काय अनुभवले, ते सांगतो. फिनलंडकडे क्षेत्र भरपूर असले, तरी लोकसंख्या फक्त ५६ लाख आहे. या देशाकडे फारशी खनिज संपत्ती नसली, तरी वनसंपत्ती दृष्ट लागावी इतकी आहे.देशाचा ७४% भाग वृक्षांनी बहरलेला आहे. या देशात प्रवास करताना, तिथल्या शहरात झाडे नाहीत, तर ही गावे आणि शहरेच वनात वसली आहेत, असे भासते. मोबाइल फोन आले, तेव्हा सर्वांना परिचित झालेली नोकिया कंपनी इथलीच. नोकियामुळेच अनेक भारतीय, विशेषत: मराठी मंडळी इथे आली आणि स्थायिक झाली आहेत. या आनंदी देशात ५०% पेक्षा अधिक आयकर आहे, हे ऐकून चक्रावलो. आणि इथले सर्व लोक आनंदाने हा कर भरतात, हे ऐकून मोठा धक्का बसला. मात्र, फिनलंडमधील कराचा प्रत्येक युरो हा त्या देशाच्या प्रगतीसाठी कारणी लागतो. ती प्रगती आपल्या डोळ्यांना दिसते, अनुभवता येते. गाव असो वा शहर, छोटी वस्ती असो वा मोठी; सर्वत्र अशी स्वच्छता की जिची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. रस्ते, मग ते महामार्ग असो किंवा गल्लीबोळातील छोटे रस्ते असोत; सगळे इतके छान की प्रवासाचा शीण वाटणे शक्य नाही. पाणी सर्वत्र इतके उत्तम की, कुठेही गेलात तरी नि:शंकपणे नळाचे पाणी पिता येते. अशा व्यवस्थेत कर देण्याविषयी कुणाचीच तक्रार नसते. कर चुकवावा असे इथल्या लोकांच्या मनात येत नाही. इतकेच नव्हे, तर इथे कोणत्या व्यक्तीने किती कर भरला, हे सहज समजू शकते. शासन करदात्यांची नावे आणि त्यांनी किती कर भरला, याची माहिती एका डिरेक्टरीतून प्रसिद्ध करते. त्यात ज्यांनी जास्तीत जास्त कर दिला, त्यांच्या नावाने सुरूवात असते आणि हळूहळू कमी कर देणाऱ्यांची नावे येतात. प्रत्येक व्यक्तीला आपले नाव अधिकाधिक वरती यावे, अशी इच्छा असते, जेणेकरून आपण देशावर किती प्रेम करतो, हे दाखवण्याची संधी मिळते. भारतात कर देणाऱ्या नागरिकांची संख्या लाजेने मान खाली जावी, अशी आहे. पण, हे लोक सर्वात आनंदी का आहेत, याची आणखीही कारणे आहेत. इथल्या नागरिकांना आरोग्यसेवा, मग ती कितीही महागडी असो, संपूर्ण जीवनभर मोफत मिळते. शिक्षणाची सुविधा तर अशी की, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याची २१ वर्षे पूर्ण शिक्षण मोफत घेऊ शकते. हो, २१ व्या वर्षापर्यंत नव्हे, तर आयुष्यात केव्हाही २१ वर्षे शिक्षण घेण्याचं या लोकांना स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ एखादी व्यक्ती कधीही, कोणताही शिक्षणक्रम घेऊ शकते. इथे व्यवसाय किंवा नोकरी सहजासहजी बदलता येते. नोकरी करणाऱ्याला कंटाळा येऊन तो एखाद्या सुपर मार्केटमध्ये सेल्समन बनून जातो. ज्या देशात आरोग्य आणि शिक्षण संपूर्णपणे नि:शुल्क आहे, तो देश जगात सर्वात आनंदी असणे अपरिहार्य आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अशी व्यवस्था नाही. अशा समाजव्यवस्थेचा एक अत्यंत सुंदर परिणाम म्हणजे, इथले लोक आपल्याप्रमाणे महत्त्वाकांक्षी नाहीत. करिअर बनवण्याचे आणि जीवनात अधिकाधिक वरची पदे किंवा खूप पैसे मिळावेत, यासाठी इथले लोक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. याहून गंमत म्हणजे, वरच्या पदाचा कंटाळा आला की, अनेक लोक त्या कामातला ताण न आवडल्याने खालची पदे आनंदाने स्वीकारतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, इथले पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष सध्या एका बँकेत अधिकारी आहेत. मी मुद्दाम विचारले की, ते बँकेत काम करतात की, केवळ बँकेचा ब्रँड वाढावा, यासाठी नाममात्र काम करतात? त्यावर मला उत्तर मिळाले, ‘ते सर्वसाधारण अधिकाऱ्याप्रमाणे दिलेले काम नियमितपणे करतात, नियमितपणे कार्यालयात येतात.’ आपल्यासारख्याला हे सगळे प्रकरण धक्का देणारे होते. मी उत्तरेच्या रोवेनेमिनी शहरापासून दक्षिणेकडील हेलसिंकी या राजधानीच्या शहरांपर्यंत प्रवास केला. मला हेच जाणवलं की, इथे फार मोठ्या आवाजात कोणी बोलत नाही.भांडण सोडाच; पण आवाजात एक मार्दव आहे, नम्रता आहे. हे लोक फारसे बडबडे नाहीत आणि अनेक अर्थाने संकोची स्वभावाचे आहेत. निसर्गाने यांना भरभरून दिले आहे. साधारण दोन लाख तलाव या देशाला अप्रतिम सौंदर्य प्रदान करतात. नद्या असोत किंवा तलाव; तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण आढळत नाही. जशी स्वच्छ माणसं, तसाच इथला स्वच्छ, शुद्ध आणि कोमल असा निसर्ग. हेलसिंकीमध्ये मला काश्मीरचा एक युवक भेटला. तो वेटरचं काम करतो. तो म्हणाला, ‘हे रामराज्य आहे. मी सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो आणि इथं येऊन मुद्दाम वेटरची नोकरी घेतली. वेटर आणि इंजिनिअरच्या पगारात फारसा फरक नाही. आणि इथे फक्त चार तास काम असते. वर्षातून तीन महिने सुटी आणि १३ महिन्यांचा पगार मिळतो. वेटरच्या कामात बऱ्यापैकी धावपळ करावी लागते आणि मी फिट राहतो. आता मला पीएच. डी. करायची आहे. त्यासाठी इथले गव्हर्नमेंट मला पूर्ण फेलोशिप देईल.’ गंमत म्हणजे, हा काश्मिरी युवक बाळासाहेब ठाकरेंना खूप मानतो, कारण त्यांच्या प्रयत्नाने विस्थापित काश्मिरींना महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये एक जागा आरक्षित करण्यात आली. ‘उस आदमीने मेरा जीवन बनाया, और मराठी लोगोंका प्यार मुझे मिला..’ हे तो भावूक होऊन सांगत होता. हेलसिंकीमध्ये शीतल महाजन आणि वैभव राणे हे मराठी जोडपे त्यांच्या दोन मुलांसह वास्तव्य करते. उंच आकाशातून उडी मारण्याचे सगळे जागतिक विक्रम शीतलने मोडले आहेत. तिच्या नावावर अनेक उच्चांक आहेत. बँकेत काम करणारा पती वैभव आणि किशोरावस्थेतले वृषभ आणि वैष्णव या सर्वांनी मला उत्तम आदरातिथ्याबरोबरच मराठी भोजनाचा आस्वाद देऊन खुश केले. त्यानंतर जड अंत:करणाने मी या आनंदी देशाचा निरोप घेतला. (संपर्कः dmulay58@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 18 May 2025 4:30 am

कबीररंग:कृष्णमूर्तींच्या विचारप्रवाहाला लाभला कबीरांचा चेतना-स्तर

जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातील एक थोर विचारवंत होत. त्यांनी जगातील अनेक धर्मांत प्रचलित असलेल्या परंपरा, रूढी, रीती, साधनापद्धती आणि कर्मकांडे, ग्रंथप्रामाण्य आदींना शुद्ध तर्कानं प्रश्नांकित केलं. आपल्या संवादांतून समोरच्या श्रोत्यांना सस्नेह विचारलं: ‘या परंपरांचे पाईक होऊन आणि ग्रंथांना प्रमाण मानून तुम्हाला प्रेम नावाची आंतरिक स्थिती आजवर उमजलीय का? माणसामाणसांतला बंधुभाव तुमच्या रोजच्या जगण्यात उतरलाय का? मग आमूलाग्र परिवर्तन कसं होणार? तुम्ही आत्मनिर्भर कधी होणार?’ कृष्णमूर्तींनी आध्यात्मिक प्रवासाला निघालेल्या प्रेमशील माणसासाठी एक शाश्वत चिंतन ठेवलं : ‘सत्याकडे जाणारा एखादा विशिष्ट मार्ग नसतो किंवा सत्याकडे जाणारी चाकोरी नसते.’ स्थल - कालाचं मोठं अंतर असतानाही कबीर आणि कृष्णमूर्ती या दोन सत्पुरुषांमध्ये आपल्याला काही साम्य दुवे जाणवतात. ज्या काळात कबीर आपल्या श्रोत्यांना पदं आणि दोहे ऐकवत होते, तो काळ मूल्यांमध्ये संथपणे बदल घडण्याचा काळ होता. परंपरांनी संस्कारबद्ध असलेली आणि त्यांना ऐकणारी माणसं हळूहळू बदलत होती. पण, कृष्णमूर्ती आधुनिक काळातले होते. त्यांनी देशादेशांतील युद्ध, नरसंहार, बेचिराख झालेली शहरं आणि निर्वासित माणसं असं सारं पाहिलं. माणसांच्या संवेदना आणि वेदनांचा पट अनुभवला. पुढे औद्योगिकरण, यांत्रिकीकरण आणि जागतिकीकरणाचा माणसांच्या जीवनशैलीवर, विचारसरणीवर झालेला इष्टानिष्ट परिणामही पाहिला. कबीरांनी अभावग्रस्त माणसाच्या भोगासक्त मनाचं जे चित्र आतून जाणलं होतं, तेच कृष्णमूर्तींनी आधुनिक काळातील माणसांच्या मूल्यांच्या पडझडीत आपल्या अंत:पटलावर उमटलेलं पाहिलं. कबीर परिस्थितीनं अगदी साधे होते. या दोघांमध्ये अध्यात्मातील अद्भुत साम्य दिसतं. दोघेही अद्वैत दर्शन जगणारे सत्पुरुष होते. अहंकार हाच माणसाला समग्र जगापासून तोडणारा आणि चेतनेचं विघटन करणारा घटक आहे हे दोघांनी जाणून संस्कारबद्ध माणसाला मुक्त करण्याचा एकमेव प्रेममय जीवनमार्ग अवलंबला होता. माणसामाणसातील नात्यांच्या भावार्थानं कबीर आणि कृष्णमूर्ती यांची हृदयं करुणामय झालेली होती. लोकजीवनात उतरलेल्या एका दोह्यात कबीर म्हणतात... जा घट प्रेम न संचरे, सो घट जान मसान। जैसे खाल लोहार को, सांस लेत बिन प्रान।। लोहाराचा भाता हवा आत घेतो आणि सोडतो. पण, त्यात प्राण कुठं असतो? तद्वत यांत्रिकपणे श्वास घेणारा, निःश्वास सोडणारा माणूस कुठं जिवंत असतो? नुसता श्वास घेणं - सोडणं हे माणसाच्या जिवंतपणाचं व्यवच्छेदक लक्षण होऊ शकत नाही. प्रेमभावाशिवाय असलेलं परस्परांमधलं नातं असंच त्या लोहाराच्या भात्यासारखं आहे.आपल्या विलक्षण बुद्धीच्या सहाय्यानं विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती केलेला माणूस कृष्णमूर्तींना जीवनगंधास पारखा झाल्यासारखा वाटत होता. ते म्हणतात... ‘प्रेम हे मनाने कल्पिलेले साध्य नसते. म्हणून प्रेम प्राप्त करून घेण्याचे साधनही मिळणे शक्य नसते ही वस्तुस्थिती आहे. पण, आपण नेमके हेच कधी समजून घेत नाही आणि हीच आपली मुख्य अडचण आहे. या वस्तुस्थितीचे संपूर्ण आणि सखोल आकलन होते तेव्हाच या संसारी जगाच्या पार असलेले असे जे असते त्याचा स्पर्श होणे संभव होते. त्या निगूढ अज्ञाताचा स्पर्श झाल्याशिवाय आपण काहीही केले तरी मानवी नात्यात चिरंतन स्वरूपाचे सौख्य नांदणे शक्य नसते.’ हे चिरंतन स्वरूपाचं सौख्य म्हणजे कबीर म्हणतात ते प्रेम आहे. या थोर द्वयींतील आणखी एक साम्यस्थळ पाहू. कबीरांचा एक दोहा आहे... हद हद पर सब ही गया, बेहद गया न कोय। बेहद के मैदान में, रमै कबीरा सोय।। आपल्या ठायी असलेल्या खास गुणवैशिष्ट्यांमुळे आपण दुसऱ्या माणसाची प्रत ठरवतो. आपल्या आकलनाची कुंपणं तयार करतो. त्यामुळं आपल्याला मनाचे काठ मोडून उत्कटपणे वाहता येत नाही. कबीरांच्या दृष्टीनं प्रेम हे नदीच्या प्रवाहासारखं आहे. ते मनाच्या कुंपणांतून वाहत नाही. प्रेम करणाऱ्याला मनाचे काठ मोडून वाहावं लागतं. मी अशा मुक्त प्रवाहातला आहे, असं ते सांगतात. हाच भाव व्यक्त करताना कृष्णमूर्ती म्हणतात... ‘भेटायला आलेली सारी माणसे व्यावसायिक वृत्तीची होती. एक जण सांगत होता की तो शास्त्रज्ञ आहे, दुसरा गणितज्ज्ञ आणि तिसरा अभियंता आहे. सारेच तज्ज्ञ होते. त्यांपैकी एकही जण आपल्या मनाची कुंपणं ओलांडून पुरातल्या नदीसारखा वाहणारा नव्हता. नदीचं काठ मोडून वाहणंच तर मातीला सुपीक बनवतं.’ प्रेमातील भावोत्कटतेविषयीचं कबीर आणि कृष्णमूर्ती यांचं हे चिंतन एकाच अस्तित्व केंद्रातून प्रकट झाल्याचं जाणवतं. आयुष्य उत्कटतेनं जाणून घेणाऱ्यांसाठी ते आत्मीय आहे. कबीर आणि कृष्णमूर्ती यांचे विचारप्रवाह हे परंपरा, लोकमान्यता, ग्रंथप्रामाण्य, प्रस्थापित जीवनरीत नाकारणारे असल्यानं वेगवेगळ्या काळात ते समांतरपणे वाहताना दिसतात. त्यातूनच या दोन्ही सत्पुरुषांचा चेतनेचा स्तर एकच असल्याचं आपल्याला जाणवतं. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 11 May 2025 4:54 am

गोष्ट सांगतो ऐका...:इंग्लिश बाबा!

सुयश इंग्लिश बाबाविषयी खूप ऐकून होता. हरवलेले खूप लोक या बाबामुळं सापडल्याचं लोकांनी सांगितलं होतं. शेवटी मनाचा निर्धार करून तो बाबाकडं गेला... शहरात सगळे त्याला इंग्लिश बाबा म्हणायचे. कारण बाबा एकदा थेट देवाशी बोलायला लागला की इंग्रजीत बोलायचा. समोर बसलेले भक्त अवाक् होऊन जायचे. कारण बाबा साधारण सातवी शिकलेला आहे, हे त्याला ओळखणारे सगळे सांगायचे. एरवी अतिशय सुमार हिंदी बोलणारा बाबा देवाशी संवाद सुरू झाला की थेट इंग्रजीत बोलू लागतो. खूप वेळा देवावर रागावतो. कधी कधी देवाला मोठ्यानं बोलायला सांगतो. ऐकणारे भक्त चकित होतात. पण, बरेच लोक सांगतात, एकदा का इंग्रजीत संवाद झाला की बाबा सांगतो, ते खरं होतं. त्यामुळं बाबाकडं होणारी गर्दी वाढतच चाललीय. बाबा भविष्य सांगतो. म्हणजे साधारण काय होतं? तर बाबाकडं अडचण घेऊन आलेला माणूस रांगेत बसलेला असतो. एकदाचा त्याचा नंबर येतो. माणूस बसून राहतो. बाबा कधी डोळे मिटून बसतो. कधी त्या माणसाकडं एकटक बघत बसतो. कधी चक्क झोपी जातो. मध्येच कधी तरी तो जागा होतो. मग थेट इंग्रजीत बोलू लागतो. अशावेळी भक्त समजून जातात की, बाबाचा देवाला कॉल लागला. बाबा इंग्रजीत काय बोलतो, हे भक्ताला कळत नाही. भक्ताला कशाला, इंग्रजीच्या जाणकार माणसालाही कळत नाही. पण, बाबाचा एक शिष्य आहे. त्याला मात्र बाबाची भाषा कळते. तो डॉक्टरांसारखा एका छोट्या चिठ्ठीवर प्रीस्क्रिप्शन लिहिल्याप्रमाणं लिहितो. ती चिठ्ठी बाहेरच्या खोलीत कॅश काउंटरला पाठवली जाते. आता अडचण असलेल्या माणसाने बाहेर जायचं. तिथं पैसे जमा करायचे. चिठ्ठी घ्यायची. चिठ्ठीत उपाय लिहिलेला असतो. तो उपाय करायचा. एका माणसाची बायको खूप उपचार करूनही बरी होत नव्हती. तिला अर्धांगवायू झाला होता. बाबाने एक महिना कावळ्यांना गुलाबजाम खाऊ घालायला सांगितलं. आणि त्या माणसाची बायको बरी झाली म्हणे.. एका बाईचा नवरा गायब झाला होता. वर्ष झालं ती शोधत होती. शेवटी कुणीतरी बाबाचं नाव सांगितलं. ती बाबाकडं आली. बाबाने तिला सरड्याला शिरा खाऊ घालायला सांगितला. बाई चिंतेत पडली. पण, एका पडक्या घरापाशी सरडा दिसला. ती महिनाभर रोज शिरा बनवून त्या घराच्या पडक्या भिंतीवर ठेवत होती. एक दिवस नवरा स्वत: परत आला म्हणे.. म्हणजे सरड्याने शिरा खाल्ला बहुतेक.. ..तर अशा गोष्टी सोशल मीडियावर फिरत असतात. सुयश त्या वाचत असतो. पण, आज त्याला त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या. कारण दोन दिवस झाले त्याच्या बायकोचा पत्ता नव्हता. एक दिवसभर वाट पाहून त्याने स्वत:च्या घरी फोन केला. त्याची आई रडायला लागली. तिची मुख्य चिंता ही होती की लोकांना काय तोंड दाखवणार? मित्राला फोन केला तर तो म्हणाला, ‘मी तुला आधीच सांगितलं होतं की तिच्याशी लग्न करू नको. मला आधीपासूनच तिचं लक्षण ठीक नव्हतं वाटत..’ कंटाळून तिच्या घरच्यांना फोन केला, तर ते म्हणाले, ‘तूच काहीतरी बोलला असशील. आधीच आमची लेक एवढी हळवी, त्यात तुझ्यासारखा राक्षस नशिबी आला..’ सुयशला दोन दिवसांत काहीच माहिती मिळाली नाही. आणि मदतही. पश्चात्ताप मात्र खूप झाला. कारण लोक काहीबाही बोलू लागले होते. सगळे काही तोंडावर बोलत नव्हते. पण, माघारी काय चर्चा चालू असेल, याचा त्याला अंदाज येत होता. दोन दिवस खूप अस्वस्थेत गेले. पोलिस, मित्र-मैत्रिणी सगळ्यांना भेटून झालं. पण, काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी कितीही समंजस माणूस अशावेळी वाटेल ते करायला तयार होतो. त्यात सुयश इंग्लिश बाबाविषयी खूप ऐकून होता. हरवलेले खूप लोक बाबामुळं सापडले, असं लोकांनी सांगितलं होतं. शेवटी मनाचा निर्धार करून तीन - चार दिवसांनी तो बाबाकडं गेला. गर्दी होतीच. लोक समस्या सांगत होते. एका बाईने सांगितलं की, तिच्या नवऱ्याची दारू सुटत नाही. बाबाने उपाय सुचवला, पाच दिवस उंदराला टोपणभर दारू पाजा.. असे उपाय ऐकून सुयशला परत जायची इच्छा झाली. पण, लोकांची कामं होत असणार म्हणून तर एवढी गर्दी आहे, असं त्याने स्वत:ला समजावलं. थांबून राहिला. त्याला त्या गर्दीत काही श्रीमंत लोकही दिसले. मग त्याच्या मनाला अजून धीर आला. श्रीमंत माणसं जे करतात, ते मध्यमवर्गीय माणसाला नेहमी योग्य वाटतं. सुयश बसून राहिला. काही वेळाने बाबा झोपेतून उठला. इंग्रजीत बोलू लागला. त्याच्या शिष्याने चिठ्ठी लिहिली. सुयश पैसे देऊन ती चिठ्ठी घेऊन बाहेर पडला. पूर्व दिशेला रोज पाच किलोमीटर चालत जायला सांगितलं होतं. म्हणजे बायको पूर्व दिशेला सापडेल, असं बाबाला सुचवायचं होतं. सुयश तीन-चार दिवस रोज पूर्वेला पाच किलोमीटर चालू लागला. पण, कुठे काही सुगावा लागत नव्हता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे त्याचं लक्ष जायचं. पहिले दोन दिवस खूप आशा वाटत होती. पण, नंतर तो निराश झाला. मग आपल्याकडून सांगण्यात काही चूक झाली असेल, असं त्याला वाटू लागलं. त्याने पुन्हा एकदा बाबाकडं जावं, असा सल्ला बाबाच्या चाहत्यांनी त्याला दिला. सुयश गेला. यावेळी त्याला दक्षिणेकडे जायला सांगितलं.सुयशने तेही मनापासून केलं. चार - पाच दिवस त्या दिशेला शोध घेत राहिला. पण, काही उपयोग झाला नाही. आता खूप पैसेही गेले होते. तरीही बाबाचे चाहते ‘एकदा प्रयत्न करून पाहा’ म्हणाले. पण, सुयश यावेळी बाबाकडं गेला नाही. भरदुपारीच तो बिअर बारमध्ये गेला. तीन - चार बिअर प्यायला. शांत बसून राहिला. त्याला स्वतःची लाज वाटत होती. आपण या बुवाबाजीला कसे बळी पडलो? सुयश त्या दुपारच्या उन्हात रस्त्याने चालू लागला. एकटाच. त्याला काहीच सुचत नव्हतं. नीट चालताही येत नव्हतं. तो एका जागी थांबला. खूप वेळ. एवढी कधीच प्यायला नव्हता बिचारा.. अचानक त्याला एक स्त्री दिसली. सुयश तिच्यामागं चालू लागला. त्या स्त्रीला काही वेळाने संशय आला. ती घाईत चालू लागली. पण, सुयशला कुठं भान होतं? तो पाठलाग करत राहिला. ती घाईघाईत एका गल्लीत शिरली. सुयशही मागोमाग गेला. त्यानंतर काय घडलं माहीत नाही... रात्री इंग्लिश बाबाचा सुयशला फोन आला. ‘माझी बायको कुठं आहे?’ असं त्यानं विचारलं. सुयश ‘माहीत नाही’ म्हणाला. बाबा म्हणाला, ‘सीसीटीव्ही पहिलाय मी.. तू तिचा पाठलाग करत होतास. कुठं गेला सांग.. माझी बायको कुठं आहे सांग..’ अचानक सुयश बाबासारखा इंग्रजीत बोलू लागला. बाबा आणखी संतापला. सुयश म्हणाला, ‘आता तूच चिठ्ठी लिही आणि तूच शोध.. बघू तुला तुझी बायको सापडते का?’ बाबा माफी मागू लागला. गयावया करू लागला. सुयश पुन्हा इंग्रजी बोलू लागला. इंग्लिश बाबाने त्या दिवशीपासून इंग्रजीत बोलणं बंद केलं. खरं तर लोकांशीच बोलणं बंद केलं. (संपर्कः jarvindas30@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 11 May 2025 4:43 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:नूरजहां यांनी केला होता जॉनी वॉकरशी विवाह; 'आर-पार'मध्ये केले होते एकमेकांसोबत काम

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मेहबूब खान यांचा ‘अनमोल घडी’ हा एक खूप ‘अनमोल’ सिनेमा होता. त्यात नूरजहां यांनीही काम केले होते. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये नूरजहां यांच्याविषयी बोलूया. पण, त्या नूरजहां यांच्याविषयी नाही, ज्या फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्या. वास्तविक मी त्या नूरजहांबद्दल बोलतोय, ज्या जुन्या काळातील अभिनेत्री शकीला यांच्या लहान भगिनी होत्या आणि ज्यांनी नंतर जॉनी वॉकर यांच्याशी विवाह केला. ‘अनमोल घडी’ सिनेमा पूर्ण झाल्यावर मेहबूब खान यांच्यासमोर टायटल बनवण्यासाठी एक यादी ठेवण्यात आली. त्यावर नजर टाकल्यावर त्यांच्या लक्षात आले की, या सिनेमात एक नव्हे, तर दोन नूरजहां आहेत. एक तरुण नूरजहां आणि दुसरी वयाने लहान असलेली नूरजहां. विशेष म्हणजे, यामध्ये नूरजहांच्या लहानपणीची भूमिकाही नूरजहांच करत होती. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न पडला. मेहबूब खान यांनी विचार केला की, तरुण नूरजहांचे नाव तर बदलता येणार नाही, कारण तोवर त्या याच नावाने अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे लहान नूरजहांचे नाव बदलावे, असे त्यांना वाटले. या बालिका नूरजहांचे नाव बदलून ‘नूर महल’ करण्यात आले. म्हणूनच ‘अनमोल घडी’मध्ये त्यांचे नाव नूर महल असे दिसते. त्यांनी पुढेही बालकलाकार म्हणून अनेक सिनेमांत काम केले. त्या सगळ्या सिनेमांत त्यांचे नाव ‘बेबी बूर’ ठेवले गेले. नूर तरुण होईपर्यंत त्यांची मोठी बहीण शकीला स्टार बनल्या होत्या. त्यांच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या सिनेमाचे शूटिंग सुरू होते. एकेदिवशी लहान बहीण म्हणजे नूरजहांही त्यांच्यासोबत तिथे गेली. तिथे त्यांची जॉनी वॉकर साहेबांशी त्यांची भेट झाली. योगायोग म्हणावे की आणखी काही, ते माहीत नाही; पण त्यावेळी ‘आर-पार’ तयार करत असलेल्या गुरुदत्त यांनी या सिनेमासाठी जॉनी वॉकर यांच्यासमवेत नूर यांना घेतले. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जॉनी वॉकर आणि नूर यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली. दोघे जवळ आले, त्यांच्यात प्रेम निर्माण झाले आणि मग त्यांनी विवाह केला. जॉनी वॉकर यांच्या प्रेमात नूर यांनी एकाच सिनेमात काम करुन आपल्या करिअरचा निरोप घेतला. या गोष्टीवरुन मला प्रसिद्ध शायर मिर्जा गालिब यांचा एक शेर आठवतोय.. इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश ‘गालिब’ कि लगाए न लगे और बुझाए न बने। अशाप्रकारे १९५४ मध्ये रिलीज झालेला ‘आर-पार’ हा नूरजहाँ यांचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात त्यांनी आपली मोठी बहीण आणि पती या दोघांसोबत काम केले. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, लहान बहीण नूरजहां यांच्यामुळे मोठ्या बहिणीला ब्रेक मिळाला होता. त्याचे असे झाले होते की, नूर बालकलाकार असताना एकदा त्यांच्यासोबत शकीलाही शूटिंगच्या ठिकाणी गेल्या. तिथे निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदाद यांनी त्यांना पाहिले आणि आपल्या ‘दास्तान’मध्ये हीरोइनची भूमिका दिली. शकीला यांच्याविषयी साधारण अशी धारणा बनली आहे की, त्या इराणमध्ये राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या राजकन्या होत्या. त्या राजघराण्याशी संबंधित होत्या, असे कोणी सांगायचे. कोणी म्हणायचे की, त्या अरब राजघराण्यातील आहेत. या सगळ्या धारणा आणि अंदाज पूर्णपणे चुकीचे आहेत. मी त्यांच्या कुटुंबाला व्यक्तिगत ओळखतो. त्यांचे पित्र नासिर यांच्याकडून मी हे कन्फर्मही केले आहे. नूरजी आणि शकीलाजी दोघी मुंबईच्याच होत्या आणि इथेच त्यांचा जन्म झाला होता. दोघी इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. दोघींचे शिक्षणही इथेच झाले.वास्तविक शकील यांचे सिंदबाद द सेलर, शहंशाह, राज महल, लैला और मजनू, अलीबाबा और चालिस चोर, हातिमताई, अल हिलाल असे काही सिनेमे हिट झाल्यावर त्यांचा चेहरा अरबी किंवा इराणी आहे.. त्या अरब वा इराणच्या राजघराण्यातील आहेत.. वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या. त्यामुळेच मग त्यांचा चेहरा तिकडचा आहे, अशी लोकांमध्ये धारणा तयार झाली. पुढे १९६० - ६१ मध्ये त्या भारत सोडून लंडनला गेल्या. त्यानंतर लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की, त्या अरब राजकन्या होत्या आणि त्यामुळे आता तिकडे परत गेल्या आहेत. खरे तर या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. शकीलाजी आणि नूरजी भारतीय होत्या आणि मुंबईच्याच होत्या. आज नूरजहां आणि जॉनी वॉकर यांच्या आठवणीत त्यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘आर-पार’ या सिनेमातील हे गाणे ऐका... अरे न न न तौबा तौबा मैं न प्यार करुंगी कभी किसी से तौबा तौबा… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 11 May 2025 4:37 am

मुद्दे पंचविशी:'समाजभान' येण्याची हीच वेळ!

पुढच्या २५ वर्षांत एकसंध, एकात्म, बंधुत्वावर आधारित समाज उभा करण्यासाठी नवनवीन प्रयोग आणि प्रयत्न अधिक जोमाने व्हायला हवेत. अन्य काही देशांनी प्रगतिशील समाजव्यवस्था उभारुन हे साध्य करुन दाखवले आहे. भारतानेही ठरवले तर ही गोष्ट अशक्य नाही, कारण आपला देश वैभवशाली असून, त्यामध्ये निश्चितच अशी आंतरिक शक्ती आहे. आजवरच्या सामाजिक स्थितीचा आढावा घेणं आणि पुढच्या पंचवीस वर्षांत आपला समाज कसा असावा, हे ठरवणं हीच खरं तर आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची आणि त्यामुळेच पहिल्या प्राधान्याची गोष्ट आहे. आपल्यासमोर येणारे इतर सगळे मुद्दे अखेरीस एका गोष्टीवरच अवलंबून असतात आणि ती म्हणजे, आजचा समाज कसा आहे? आणि तो उद्या कसा असेल? माणसानेच उभी केली समाज - संस्कृती माणसाचं अस्तित्व दोन लाख वर्षांपासून असलं, तरी त्याच्या इतिहासाची खरी सुरूवात झाली, ती सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी. जंगलातील भटकंती संपवून शेतीस सुरूवात झाली आणि समाज अस्तित्वात आला.एकत्र राहण्यामुळे एकमेकांवरचं अवलंबित्व वाढलं. इतर सर्व प्राण्यांसारखे केवळ जगणं आणि प्रजोत्पादन याच्या पलीकडे जाऊन मानवाने एकत्रित येऊन एक नवी संस्कृती उभी केली- “समाज” या माध्यमातून. सुरुवातीला अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांभोवती फिरणारा हा समाज हळूहळू चालीरीती, धर्म, जाती, भौगोलिक सत्ता या संकल्पनांनी विभागला गेला. आणि एकत्रित जीवनाच्या संकल्पनेला पहिल्यांदा तडा गेला, जो अजूनही भरून निघालेला नाही. गेल्या पाचशे वर्षांपर्यंत विश्वातील एका अनामिक शक्तीच्या किंवा ‘देव’ या नावाने सांगितलेलं तत्त्वज्ञान आणि शेती या दोघांचं प्राबल्य टिकून होतं. मात्र, त्यानंतर आलेली वैज्ञानिक प्रगती आणि १७७६ पासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतींमुळे संपूर्ण धारणाच बदलून गेली आहे. विखुरलेपण बनले सामाजिक ओळख भारतात सुमारे साडेतीन हजार वर्षांपासून जातीपाती आणि मागील सुमारे बाराशे वर्षांपासून धार्मिक द्वेष आणि तेढ सुरू आहे. या सामाजिक तुकड्यांनी आणि त्यामुळे रुजलेल्या द्वेषाने समाजाला कायमस्वरूपी जायबंदी आणि विखुरलेलं ठेवण्याचं काम केलं आहे. स्वातंत्र्यापूर्वी दुष्काळ, महामारी, युद्ध यांमुळे लाखो मृत्यू होत असताना तशा प्रतिकूल परिस्थितीतही जातीधर्मांच्या आधारे सामाजिक द्वेष तेवत ठेवण्यात आला. आणि हीच यासमाजाची दुर्दैवी ओळख ठरली. सर्वांगीण प्रगतीचं श्रेयही समाजाचंच... स्वातंत्र्यानंतर मात्र चौफेर विकास झाला. दुष्काळजन्य मृत्यू इतिहासजमा झाले, समाज सुबत्तेकडे गेला. हजारो वर्षांच्या संस्कृतीची पार्श्वभूमी असलेला हा समाज प्रगल्भ, दूरदृष्टी असलेला, शांतताप्रिय आणि समंजस ठरेल, अशी अपेक्षा होती. गेल्या पंचाहत्तर वर्षांत अनेक सकारात्मक सामाजिक बदल झाले. दारिद्र्यरेषेखालील मोठा वर्ग वर आला, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या, शिक्षण काही लोकांसाठीच हजारो वर्षे आरक्षित केले गेले होते, त्याची फळे आता सर्व समाज आणि विशेषत: महिलांना होवून साक्षरता वाढली, सरासरी आयुष्य ३४ वरून ७० वर्षांपेक्षा जास्त झालं. अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक दुर्बलांना आरक्षण अशा अनेक पावलांमुळे समाजाला एकाच पातळीवर आणण्याचा प्रयत्न झाला. या स्तुत्य बाबींचं समाजाने श्रेय घेतलंच पाहिजे.विशेष म्हणजे, लोकांनी आवश्यक ते सुसंगत असं राजकीय नेतृत्व तयार केलं आणि त्यायोगे विकास आणि लोकशाहीची मशाल तेवत राहिली. देशाची एकता आणि अखंडता टिकवली गेली, देश हुकूमशाहीकडे गेला नाही. हे सगळं फार देदीप्यमान आणि गौरवास्पद आहे. वैचारिक प्रदूषणातून विद्ध्वंसाकडे... पुढील पंचवीस वर्षांत मात्र या समाजासमोर नवी आव्हानं उभी राहणार आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात एकसंध समाज तयार करणं, हे एक मोठं लक्ष्य ठरणार आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात समाज नैसर्गिकरित्या कृत्रिम भिंती भेदून एकत्र येतो. पण, भारतात साडेतीन हजार वर्षांपासून सुरू असलेल्या वैचारिक प्रदूषणातून तयार झालेल्या जातिव्यवस्थेमुळे हे एकत्र येणं अजूनही अशक्य वाटतं. हे प्रदूषण कमी होण्याऐवजी अधिक घातक होणार नाही, याची जबाबदारी आता समाजावर आहे. जातीधर्मांच्या आधारावर राजकारण करून सत्तास्थापन करणं, अल्पसंख्याक किंवा विशिष्ट समूहांनी आपलं तथाकथित वर्चस्व चालू ठेवण्यासाठी समाजात कायमस्वरूपी अस्थिरता निर्माण करणं हे थांबलं नाही, तर देशात पूर्वी कधीही न पाहिलेला विद्ध्वंस घडू शकतो. ‘आपलीच संस्कृती योग्य’ असा संकुचित, गर्भित विचार ठसवला गेला, तर देशाचं भवितव्यच धोक्यात येईल. आणि त्याचा सर्वांत मोठा, ‘न भूतो न भविष्यती’ असा फटका अशा संकुचित विचारसरणींनाच बसू शकतो.आता मूलगामी सुधारणाच हव्यात : आता हे सारं रोखायचं असेल, तर समाजाने आपली दिशा बदलली पाहिजे. समाज म्हणजे धर्मांधतेचं कुरण नाही की जातीय बुबुळाचं काजवेघर नाही. समाज म्हणजे भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक विविधता अंगीकारून एकत्र जगण्याचा प्रयोग. आणि हा प्रयोग पुढे न्यायचा असेल, तर त्या कंपूवृत्तीला, त्या लहानशा वर्चस्वप्रिय टोळक्याला.. ‘बंद करा हा तमाशा!’ असं ठामपणे सांगायला हवं. आपल्या जातींनी, धर्मांनी, पंथांनी आता स्वत:मध्ये मूलगामी सुधारणा केली नाही, तर समाजप्रलय आपल्या उंबरठ्यावर उभा आहे. आणि तो आल्यावर रडून उपयोग होणार नाही, कारण सर्वप्रथम हेच कंपू त्यात गिळंकृत होतील, जे आज ‘आमचं श्रेष्ठत्व’ अशा भ्रामक स्वप्नात हरवले आहेत. सामाजिक एकत्वाची अपरिहार्यता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर चिंपांझी आणि माणूस यांच्यातील डीएनएमध्ये केवळ एक टक्का फरक आहे. त्यामुळे मानवामध्ये जात, धर्म, वर्ण यांच्यामुळे भिंती उभ्या करणं केवळ अज्ञान आणि विषमता वाढवणारं ठरतं. अशा स्थितीत समाजामध्ये एकत्व निर्माण करणं केवळ आवश्यकच नाही, तर अपरिहार्य ठरले आहे. या दृष्टीने धर्मांधता, अंधश्रद्धा, बुवाबाजी, जातीय आणि धार्मिक तेढ, मंदिर - मशीद राजकारण या सर्व गोष्टींना समाजाने तिलांजली द्यायला हवी. नाही तर सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येईल आणि देश एका नव्या संकटाकडे झुकेल.गेल्या पंचाहत्तर वर्षांत आरक्षणासारखी धोरणं राबवून समाजातील तफावत दूर करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, हजारो वर्षांची विषमता केवळ पंचाहत्तर वर्षांत मिटेल, हा विचार अव्यवहार्य आहे. त्यामुळे पुढच्या २५ वर्षांत एकसंध, एकात्म, बंधुत्वावर आधारित समाज उभा करण्यासाठी नवनवीन प्रयोग आणि प्रयत्न अधिक जोमाने व्हायला हवेत. अन्य काही देशांनी प्रगतिशील समाजव्यवस्था उभारून हे साध्य करून दाखवले आहे. भारतानेही ठरवले तर ही गोष्ट अशक्य नाही, कारण आपला देश वैभवशाली असून, त्यामध्ये निश्चितच अशी आंतरिक शक्ती आहे. एकंदरीत, पुढील पंचवीस वर्षांत समाजाने समता, बंधुत्व, समभाव आणि आर्थिक समानता यावर भर दिला, तरच देशाचं भवितव्य उज्ज्वल असेल. अन्यथा, नाही! (संपर्कः maheshzagade07@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 11 May 2025 4:33 am

देश - परदेश:अमेरिकेची ढासळती विश्वासार्हता

ट्रम्प यांनी संपूर्ण निर्णय प्रक्रिया आपल्या हातात घेतली आहे आणि ते आपले निर्णय एकहाती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यातही सातत्य नसते. वारंवार स्वत:च्याच भूमिकेत ते बदल करतात. त्यामुळे आजवर जगासाठी मानदंड मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या विश्वासार्हतेला मात्र तडा जातो आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे धक्का देऊन प्रस्थापित नियमावलीला सुरुंग लावला आहे, त्यामुळे संपूर्ण विश्व चक्रावून गेले आहे. त्यांनी आयातीवर लागू केलेल्या टेरिफ म्हणजे करांमुळे जगाचा थरकाप उडाला आहे. हे करताना ट्रम्प यांनी तिथल्या संसदेला विश्वासात घेतले नाही. कोणत्याही प्रकारचा संवाद किंवा जनतेच्या मताचा अंदाज घेतला नाही. परिणामी अमेरिकेचा शेअर बाजार सुमारे आठ ट्रिलियनने डॉलरने खाली गेला. अमेरिकेच्या राज्यघटनेने राष्ट्राध्यक्षाला आणीबाणीच्या किंवा गंभीर परिस्थितीत वापरण्याचे अधिकार दिले आहेत. पण, याचा अर्थ तेथे काँग्रेस किंवा सिनेट अस्तित्वात नाही, असे नव्हे. खरे तर अमेरिकेच्या राज्यघटनेतील कलम एकच्या भाग आठप्रमाणे कोणत्याही कायद्याची सुरूवात संसदेच्या खालच्या गृहापासून व्हायला हवी. यातले काहीही न करता ट्रम्प यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये एखाद्या राजेशाही किंवा हुकूमशाहीमध्ये जसे निर्णय आणि फतवे जाहीर केले जातात, तशीच पद्धत अवलंबलेली दिसते. त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया ही वरकरणी ठरवून केल्यासारखी भासत असली, तरी त्यामध्ये वैचारिक खोली मात्र अभावानेच दिसते. ट्रम्प यांच्या एकंदरीतच कार्यपद्धतीविषयी माझ्यासारख्याच्या मनात अनेक शंका उपस्थित होतात. आता हेच पाहा. अमेरिका हा जगातील सर्वात ताकदवान देश आहे. या देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडे एका अर्थाने संपूर्ण जगाला दिशादर्शन करण्याचे काम आले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जगभर, मुख्यतः लोकशाही पसरवण्याच्या दृष्टीने आणि वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी काम केले आहे. त्यामुळेच अमेरिका काय करते, अमेरिकेची धोरणे काय आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रांसंदर्भात अमेरिका कोणते वक्तव्य करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. लष्करी सत्ता असण्याबरोबरच अमेरिका ही तंत्रज्ञानाची राजधानी आहे. शिक्षण आणि संस्कृतीबरोबरच जगाचे आर्थिक केंद्रही आहे. अशा देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडून संपूर्ण जग, जबाबदार वर्तन-व्यवहाराची अपेक्षा करत असते. या पार्श्वभूमीवर आपण फक्त एक - दोन विषयांबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जे बोलतात आणि करतात ते तपासून पाहूया. ‘राष्ट्राध्यक्ष होताच एका दिवसात युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवू,’अशी काहीशी गर्वोक्ती ट्रम्प यांनी केली होती. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या युद्धाचा परिणाम फक्त या दोन देशांपुरता मर्यादित नसून, आसपासच्या देशांबरोबरच संपूर्ण जगावर झाला आहे. उदाहरणार्थ, एका बाजूला संपूर्ण युरोप आणि दुसरीकडे रशिया व चीन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पारंपरिक नात्यांचा विचार करता, अमेरिका आणि युरोप हे ‘नाटो’ या आंतरराष्ट्रीय लष्करी संघटनेचे सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिका ‘नाटो’बरोबर काम करून रशियाविरुद्ध मोर्चेबांधणी करेल आणि युक्रेनला सहाय्य करेल ,अशी सर्वांचीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अगदी सुरूवातीपासूनच ट्रम्प हे अमेरिकेचा पारंपरिक शत्रू मानल्या गेलेल्या रशियाच्याच बाजूने बोलत आहेत. राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र भूमिका घ्यावी, याबाबत कोणाचेही दुमत नसले, तरी बहुधा आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या स्थायी धोरणांपलीकडे जाऊन वेगळ्याच देशाची बाजू घेण्याचा प्रकार मात्र पहिल्यांदा होत आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असे दोन राजकीय पक्ष आहेत. त्यांच्या धोरणांमध्ये करप्रणालीपासून विदेशातून येणाऱ्या मनुष्यबळापर्यंत अनेक बाबतीत मतभेद आहेत. पण, आतापर्यंत या मतभेदांचे स्वरूप फार उग्र नसायचे आणि असले तरी त्या बाबतीत काँग्रेस आणि सिनेटमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतले जात. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ट्रम्प यांनी संपूर्ण निर्णय प्रक्रिया आपल्या हातात घेतली आहे आणि आपले निर्णय जवळपास एकहाती अंमलात आणण्याच्या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. मात्र, यातही सातत्य नसते आणि वारंवार स्वत:च्याच भूमिकेत ते बदल करत असतात. आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबाबतच पाहा. ट्रम्प यांना सत्तेवर येऊन शंभर दिवस होऊन गेले आहेत. त्यांनी अलीकडेच वक्तव्य केले की, रशिया क्रिमियाचा प्रदेश स्वत:कडे घेईल. स्वतःच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा विचार करताना ते म्हणतात, ‘झेलेन्स्की यांना क्रिमिया युक्रेनजवळ ठेवणे कठीण जाईल.’ त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या ट्रम्प रशियाचा अजेंडा चालवताहेत, असे अनेकांना वाटत आहे. पण, हे करताना युक्रेनच्या बाजूने कोणताही समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत नाही. त्यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट झाले आहे की, ‘नाटो’मध्ये युक्रेनने प्रवेश करावा, या विचाराला त्यांचा अजिबात पाठिंबा नाही. एका बाजूला क्रिमिया रशियाकडे देणे आणि दुसरीकडे युक्रेनला ‘नाटो’मध्ये प्रवेश देण्याच्या बाबतीत विरोध करणे, यात ट्रम्प यांच्या कोणत्या राजनैतिक गुणांचा प्रत्यय येतो, हे सांगणे अतिशय कठीण आहे. ट्रम्प ज्याप्रमाणे रशिया - युक्रेनसंदर्भात वक्तव्ये करत आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी चीनवर लादलेले टेरिफ हाही अतिशय विवादास्पद विषय ठरला आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय अमेरिकेने जीनवर १४५ % टेरिफ लावले आहे. चीनने प्रत्युत्तरादाखल तितकेच टेरिफ लागू केले. याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोन आला होता आणि या करप्रणालीविषयी आमची फोनवर चर्चा झाली आहे. पण, ती केव्हा झाली याबाबत त्यांनी काही स्पष्टीकरण न दिल्यामुळे अशी चर्चा झालीच नसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील चीनच्या दूतावासानेही अशा प्रकारची चर्चा झाल्याचा इन्कार केला आहे. थोडक्यात, ट्रम्प धडधडीतपणे खऱ्याची साथ सोडत आहेत, हे आपण पाहतो आहोत. इतकेच नव्हे तर २०० देशांनी आपल्याशी टेरिफसंदर्भात करार करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही ते म्हणाले. अशा देशांची नावे सांगा, असा आग्रह पत्रकारांनी धरताच ते वेगळेच काहीतरी बोलत राहिले आणि मुख्य विषयाला बगल दिली. या सर्व गोष्टींतून एकच सत्य समोर येते. अमेरिकेच्या विश्वासार्हतेकडे आजपर्यंत जगामध्ये एक मानदंड म्हणून पाहिले जात होते. आज तिच्या या विश्वासार्हतेला तडा जातो आहे. यामुळे इतर देशांपेक्षा अमेरिकेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची वक्तव्ये आणि धोरणांबाबत जगभरातील देश साशंकच आहेत असे नव्हे, तर त्यांना ट्रम्प तर्कहीन निर्णय घेऊ शकतात, याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या धक्कादायक धोरणांचा आणि वक्तव्याचा भारत - अमेरिका संबंधावरही गंभीर परिणाम होईल, हे निश्चित. भारत – पाकिस्तानात यांच्यातील तापलेल्या वातावरणावर त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयीही न बोललेलेच बरे. ‘या दोन देशांमध्ये हजार - पंधराशे वर्षांपासून संघर्ष सुरू आहे,’ असे म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी याबाबतीत भारताच्या धोरणांना स्पष्ट पाठिंबा मात्र दिलेला नाही. ‘भारत माझा मित्र आहे आणि पाकिस्तानही मित्र आहे,’ अशा अर्थाचे वाक्य ते बोलले आहेत. ट्रम्प यांच्या बेभरवशीपणामुळे भारताला विचार करूनच आपली पावले टाकावी लागतील. (संपर्कः dmulay58@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 4 May 2025 4:41 am

रसिक स्पेशल:'सायबर युद्धा'चे नवे तंत्र, नवी रणभूमी!

जगभरातील वाढतं संगणकीकरण, त्याला असलेली इंटरनेटची जोड अन् आता मिळालेली ‘एआय’ची साथ यामुळे सायबर युद्धांची व्याप्ती, गांभीर्य नि परिणाम हे सगळंच अधिकाधिक खोल होत चाललं आहे. त्यामुळे भविष्यातील युद्धं केवळ पारंपरिक पद्धतीनं न होता ती ‘सायबर युद्धा’च्या रुपात होतील, असं म्हटलं जातं. पहलगाममधल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं नेमकं काय केलं पाहिजे, याविषयी होणाऱ्या चर्चेतील एक मुद्दा आहे ‘सायबर युद्धा’चा. दृश्य माध्यमांतील नेहमीच्या अतिरंजित आणि भावना भडकावण्याच्या हेतूनं केलेल्या विश्लेषणाला बाजूला ठेवलं, तरी खरोखरच सायबर युद्धाच्या माध्यमातून भारताला काय करणं शक्य आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचवेळी, पाकिस्तानकडून सायबर युद्ध म्हणून नेमकं काय केलं जाऊ शकतं, याचाही अंदाज घेणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळात ‘सायबर युद्ध’ हा शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत असला, तरी त्याची नेमकी व्याप्ती किती असू शकते, याचा अंदाज येण्यासाठी आपण आत्तापर्यंत या बाबतीत विविध देशांनी काय केलं आहे, याचा धावता आढावा घेऊ. इराणवरचा ‘स्टक्सनेट हल्ला’ ‘सायबर युद्ध’ हा शब्द प्रथम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला, तो २०१० च्या दशकात. इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा अमेरिकेला दाट संशय होता. इराणनं मात्र आपण शांततामय कामांसाठी, म्हणजे अणुऊर्जानिर्मितीसाठी युरेनियमशी संबंधित काम करत असल्याचं सांगितलं होतं. इराणचा हा खोटारडेपणा असल्याचा अमेरिकेचा दावा होता. त्यानंतर इराणमधल्या या कामाशी संबंधित असलेल्या संगणक यंत्रणांमध्ये संथपणा आणि बिघाड घडवून आणण्यासाठी अमेरिका व इस्त्रायल यांनी ‘सायबर युद्ध’ घडवल्याचं प्रकरण खूप गाजलं. या संगणकीय हल्ल्यामुळे इराणला आपल्या अणू कार्यक्रमाशी संबंधित असलेलं युरेनियमचं शुद्धीकरण करण्यात अपयश आलं. हे प्रकरण ‘स्टक्सनेट हल्ला’ म्हणून ओळखलं जातं. यामुळेच इंटरनेटच्या माध्यमातून शत्रूशी थेट युद्धभूमीवर न लढताही त्याला जेरीला आणता येतं, हे प्रथमच सिद्ध झालं. रशियाने केली युक्रेनची बत्ती गुल या प्रकारे एका देशातून दुसऱ्या देशात थेट सायबर हल्ले करता येत असतील, तर यातून मोठे धोके निर्माण होऊ शकतात, ही जाणीव झालेली असतानाच त्याचा प्रत्यक्ष अनुभव २०१५-१६ च्या दरम्यान आला. रशियाने सायबर हल्ला करून युक्रेनमधल्या वीजपुरवठा यंत्रणा बंद पाडल्या. यामुळे लाखो युक्रेनी नागरिकांच्या घरांमध्ये अंधार झाला. अर्थात, रशियाने अधिकृतपणे या हल्ल्याची जबाबदारी घेतली नसली, तरी त्यामागे त्याच देशाचा हात असणार, याविषयी अभ्यासकांच्या मनात कुठलीच शंका नव्हती. ‘नॉटपेट्या’ने मागितली खंडणी संगणकांमध्ये घुसून त्यांना ठप्प करून टाकणारं ‘नॉटपेट्या’ नावाचं ‘मॅलवेअर’ २०१७ मध्ये पुन्हा एकदा युक्रेनमध्ये शिरलं. हेसुद्धा रशियाकडूनच आलं होतं, हे वेगळं सांगायला नको. संगणकांमधला सगळा मजकूर अगम्य भाषेत बदलून टाकणाऱ्या या घातक सॉफ्टवेअरनं लवकरच आपला मोर्चा इतर देशांकडेही वळवला. मूळ मजकूर हवा असेल, तर यासाठी बिटकॉइन या आभासी चलनाच्या रूपातली खंडणी हवी असल्याचं या सॉफ्टवेअरनं जाहीर केलं. मर्क, कॅडबरी, फेडेक्स अशा मोठमोठ्या कंपन्यांना याचा जोरदार फटका बसला. फेडेक्स ही जगभरातल्या सामानाची वाहतूक करणारी कंपनी असल्यामुळे हा एका नव्हे, तर अनेक देशांवरचा हल्ला ठरला.या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. बहुतांश देशांमध्ये वीजनिर्मिती आणि वितरण, पाणीपुरवठा आणि त्याचं शुद्धीकरणं, कचरा हाताळणं, वाहतूकव्यवस्था आणि तिचं नियंत्रण अशा जवळपास सगळ्याच सार्वजनिक सुविधांमध्ये संगणकीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने असा एखादा हल्ला झाला तर काय हाहाकार होईल, या भीतीनं अनेकांचा थरकाप उडाला. उदाहरणार्थ, एखाद्या शहराच्या पाणीपुरवठा विभागानं पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यात ठरावीक प्रमाणात क्लोरिन मिसळण्यासाठीची यंत्रणा संगणकांद्वारे नियंत्रित केलेली असेल आणि यात सायबर हल्ला करून कुणी बिघाड घडवला तर? किंवा प्रचंड वर्दळीच्या रस्त्यांवरची वाहतूक नियंत्रित करत असलेल्या यंत्रणेमध्ये बदल केले तर? एकूण काय, तर जगभरातील वाढतं संगणकीकरण, त्याला असलेली इंटरनेटची जोड आणि आता मिळालेली ‘एआय’ची साथ या त्रिकुटामुळे सायबर युद्धांची व्याप्ती, त्यांचं गांभीर्य आणि त्यांचे परिणाम हे सगळंच अधिकाधिक खोल होत चाललं आहे. सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांकडून त्यामध्ये अनेकदा त्रुटी शिल्लक राहतात. या त्रुटींचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी हल्लेखोर सतत टिपूनच बसलेले असतात. यातूनच हे हल्ले घडतात. आता तर स्वयंचलित गाड्या, इस्पितळांमधली रुग्णसेवा, यंत्रमानवाधारित श्रम अशा गोष्टी अधिकाधिक स्वरूपात दिसत असल्यामुळे या सायबर युद्धांची भीती आणखीनच वाढलेली आहे. त्यापुढे शत्रू देशातील यूट्यूब चॅनलवर बंदी घालणं, तिथली काही फेसबुक किंवा ट्विटर खाती बंद करणं या गोष्टी अगदी बाळबोध वाटाव्यात, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच भविष्यातील युद्धं केवळ पारंपरिक पद्धतीनं न होता ती ‘सायबर युद्धा’च्या रुपात होतील, असं म्हटलं जातं. आणि हे भाकित फारसं चुकीचं नसल्याचं कदाचित येत्या काळात स्पष्टही होईल. सौदी तेल कंपन्यांना इराणने केले ‘टार्गेट’ ज्या इराणवर ‘सायबर युद्ध’ प्रकारचा पहिला जागतिक हल्ला झाला, त्याच इराणनं आपला दुसरा शत्रू सौदी अरेबियावर २०१२ आणि २०१६ मध्ये असाच हल्ला केला. सौदी अरेबियाचं सगळं अर्थकारण तेलावर चालत असल्यामुळे या तेलाच्या व्यवसायालाच काही काळ खिळखिळं करण्याचं धोरण इराणच्या मदतीनं हल्ले करत असलेल्या मंडळींनी अवलंबलं. यासाठी त्यांनी ‘अरामको’ आणि इतर बलाढ्य तेल कंपन्या वापरत असलेल्या संगणकीय यंत्रणांमध्ये बिघाड घडवून आणला. (संपर्कः akahate@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 4 May 2025 4:37 am

बुकमार्क:डॉ. अहंकारींनी घडवलेल्या आरोग्यक्रांतीचा दस्तावेज

ज्यांना समाजभान राखता येतं, तीच मंडळी चळवळ निर्माण करू शकतात. ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावताना तेथील लोकांचे आर्थिक आणि सामाजिक उन्नयन व्हावे, यासाठी आयुष्यभर सक्रिय असणारे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय करून देणाऱ्या ‘शशिकांत अहंकारी - दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाची ही गोष्ट. अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे डॉक्टरही पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी आपण काम करावं, असं डॉ. अहंकारींना का वाटलं असेल? वैद्यकीय शिक्षणादरम्यान प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध हा विषय त्यांना का महत्त्वाचा वाटला असेल? याच काळात त्यांना शिक्षक म्हणून लाभलेल्या डॉ. साठे, डॉ. घारपुरे, डॉ. भागवत या प्राध्यापकांचा त्यांच्या मनावर कोणता परिणाम झाला? अशा अनेक प्रश्नांचा वेध घेत आपल्या वाचनाची सुरूवात होते. तत्कालीन औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातील नोटिस बोर्डवर १९८० मध्ये लिहिलेल्या एका मजकुराने सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले जाते.. मग त्यावरून उठलेला गदारोळ, पुढे शशिकांत यांनी केलेले भाषण आणि अंत:र्मुख झालेले श्रोते.. हा प्रसंग वाचताना, वैद्यकीय पेशा स्वीकारल्यावर त्याचे नेमके प्रयोजन काय असले पाहिजे? या कळीच्या मुद्द्यापाशी आपण येऊन थांबतो. डॉ. अहंकारी वयाच्या अठराव्या वर्षीच भोवतालच्या परिस्थितीकडे किती डोळसपणाने पाहत होते, हे आपल्याला जाणवते. मळलेल्या वाटेने पुढे जाणे त्यांना पसंत नव्हते. समवयस्क विद्यार्थ्यांसमोर त्यांनी केलेल्या भाषणाचा प्रभाव एवढा पडतो की, आपण शिक्षण घेत असताना समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार प्रत्येकाच्या मनात डोकावू लागतो. ज्या काळात मराठवाड्यातील मुले घरातील आर्थिक परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेवर जात होती, अशा मोठ्या स्थित्यंतराच्या कालखंडात डॉ. अहंकारी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आपला समाज आरोग्यसंपन्न झाला, तरच येथील लोक आर्थिक स्वावलंबी होतील, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यासाठी शिक्षणही गरजेचे होते. अनेक रूढींचा पगडा, वैयक्तिक आरोग्याबाबत असलेले अज्ञान, गरिबी, स्थलांतर अशा कितीतरी समस्यांनी ग्रासलेले ग्रामजीवन त्यांनी जवळून अनुभवले. रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला असो वा दुष्काळात राबणारे कष्टकरी असोत, या सर्वांसाठी ‘आपण काहीतरी केलं पाहिजे,’ हाच एकमेव ध्यास ते बाळगून होते. ‘ज्वाला आणि फुले’ या बाबा आमटेंच्या काव्यसंग्रहातील कविता त्यांचासाठी प्रेरणा बनली होती. हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील अनेक नामवंत नेत्यांच्या सहवसात ते आले. मग विद्यार्थी आंदोलन असो वा अन्यायाविरुद्धची चळवळ असो; या सगळ्यांमध्ये ते अग्रणी राहिले. वैद्यकीय शिक्षण १९७८ मध्ये पूर्ण झाल्यावर डॉ. बानू कोयाजी यांच्या प्रेरणेने पुण्याजवळील एका लहानशा खेड्यात डॉ. अहंकारी यांनी ‘जनस्वास्थरक्षक पथदर्श प्रकल्पा’मध्ये काम सुरू केले. गावातील मंडळींना प्रशिक्षित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हे एक मोठे आव्हान होते. प्रबोधन शिबिर, तरुणांसाठी रोजगार मेळावा, मोफत आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रमांतून त्यांनी अल्पावधीतच गावातील मंडळींचा विश्वास संपादन केला. दरम्यान ही आरोग्य मोहीम केवळ एका गावापुरती मर्यादित न ठेवता ती महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी ‘हॅलो’ अर्थात ‘हेल्थ ॲन्ड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन’ या संघटनेची स्थापना केली. गावपातळीवरील सर्व समस्यांबाबत कार्य करण्यासाठी या संस्थेला मूर्त प्राप्त झाले. रोगराई पसरू नये म्हणून प्रतिबंधक उपचार करणे, गावकऱ्यांशी विद्यार्थी आणि तरुण वर्गाला एकत्र करून संवाद साधणे, गाव दत्तक घेऊन गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना आरोग्याच्या सर्व प्राथमिक सुविधा देणे अशा विविध पातळ्यांवर हे काम बहुआयामी होत गेले. हे काम बघून अनेक तरुण आणि नामांकित डॉक्टर संस्थेसोबत आले. आज ‘हॅलो’च्या मुशीतून बाहेर पडलेल्या चारशेच्या वर डॉक्टरांनी आपल्या स्वत:च्या परिसरात या कार्याचा ठसा उमटवला आहे. एकूणच, डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात उभी राहिलेली ही आरोग्य आणि ग्रामसुधार चळवळ समजून घ्यायची असेल, तर हे पुस्तक वाचायला हवे. प्रसिद्ध लेखक, विचारवंत अतुल देऊळगावकर यांनीही या कार्याचा योग्य सन्मान होईल, असे ओघवते लेखन केले आहे. डॉ. अहंकारींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’, ‘महिला बचत गट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ अशा कित्येक बहुउद्देशीय प्रकल्पांनी ग्रामीण आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सुधारणा घडवली. डॉ. अहंकारींचे आयुष्य समाजाला सावलीप्रमाणे लाभले, पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या ठायी कठोर निग्रह, निरलस सेवा आणि भूमीसारखी अपार सोशिक वृत्ती या गुणांचा संगम असल्याने एवढे मोठे कार्य उभे राहू शकले. देशपातळीवरही आरोग्य यंत्रणा सक्षम करुन समाजाला निरामय स्वास्थ्याचा लाभ द्यायचा असेल, तर डॉ. अहंकारी यांच्याप्रमाणेच समर्पित सेवाभावाने कार्य करणाऱ्यांची गरज आहे, याची जाणीव हे पुस्तक करुन देते. पुस्तकाचे नाव : शशिकांत अहंकारी - दृष्टी आरोग्यक्रांतीचीसंपादक : अतुल देऊळगावकरप्रकाशक : साधना प्रकाशनपाने : २१४, किंमत : रू. ३०० (संपर्कः swapnilkashi566@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 4 May 2025 4:33 am

‘एआय’च्या विश्वात...:‘एआय’च्या साथीने बेटिंग ॲप्सचा ‘खेळ’

सध्या ‘आयपीएल’चा हंगाम सुरू आहे. त्याबरोबरच बेटिंग अॅप्सनाही सुगीचे दिवस आले आहेत. ऑनलाइन गेमिंग – बेटिंगमधून, मग अगदी रमीसारख्या पत्त्याच्या खेळापासून ते अगदी सामन्याआधी आपापली टीम बनवून वरकमाई करु पाहणारे, आपले नशीब आजमावणारे अनेक खेळाडू उदयास येतात. या इंटरनेटवरच्या आभासी विश्वातील जुगारात आता जवळपास १५ कोटींहून अधिक भारतीय सक्रिय आहेत. जगातील सर्वाधिक बेटिंग अॅप्सवरील खेळाडूंच्या संख्येद्वारे पहिल्या पाच देशांत भारताची गणती होऊ लागली आहे. या क्षेत्राने नुकतीच भारतात ५७ दशलक्ष डॉलरची उलाढाल पार केली. वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळे या क्षेत्रात गेल्या काही काळापासून ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने शिरकाव केला आहे. कोट्यवधी वापरकर्त्यांचा डेटा वापरून, अगणित पद्धतींनी त्याचे पृथ:करण करून त्यातून अपेक्षित असा अंदाज वर्तवून या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काही गोष्टी आता सर्रास घडताना दिसत आहेत. वापरकर्त्यांना जाणूनबुजून ‘गाजर’ दाखवून या अॅप्सच्या आहारी पाडले जात आहे. अशा वापरकर्त्यांची Customer Lifetime Value (सीएलव्ही) अर्थात ग्राहकाकडून किती काळात किती पैसे काढता येतील, याचा अंदाज त्याच्या पहिल्या काही दिवसांतील हालचालींचा वेध घेत ‘एआय’मार्फत वर्तवला जातो. त्यानंतर असे पैसे उकळण्याच्या उद्देशाने ‘एआय’प्रेरित अनेक डीप लर्निंग अल्गोरिदम्सचा वापर करून ही ‘सीएलव्ही’ वाढवण्यासाठी डाव आखले जातात. त्या सगळ्यामध्ये जास्त गंडले जाणारे लोक म्हणजे १८ ते ३५ या वयोगटातील तरुण - तरुणी, गृहिणी, नोकरदार तसेच सेवानिवृत्त मंडळी. तसे पाहिले तर कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याची लालसा बाळगणारे सर्वच! यात मध्यमवर्गीय अन् ग्रामीण भागातील मंडळींची संख्या अधिक आहे. पैसे कमावण्याचा सोपा मार्ग.. घरबसल्या तुमचा आवडता खेळ खेळा आणि टीम बनवून जिंका.. अशी आमिषे दाखवली जातात. मग कोणी यातून जिंकून बुलेट घेतली, तर कोणी घर बांधले अशा भुलवणाऱ्या, खऱ्या वाटणाऱ्या जाहिरातींचा मारा सुरू होतो. काही ठिकाणी तुम्ही खेळायला सुरू करणार म्हणून काही गोष्टी मोफत दिल्या जातात. त्या पैशांमधून तुम्ही काही डाव खेळता. आता ‘एआय’ची गंमत बघा.. सर्रास असे दिसून येते की, या अशा सुरूवातीच्या डावात तुम्ही हमखास काही ना काही जिंकता. ही असते एका प्रोग्रामद्वारे तुम्हाला व्यसनाधीन करण्याची पहिली पायरी, जी अर्थातच आपल्या लक्षात येत नाही. मग जसजसे आपण जास्त पैसे लावत जातो, तसतसे काठिन्य पातळी असो किंवा डावतले पत्ते असोत; ते अवघड येत जातात आणि आपण हरू लागतो. पुन्हा ‘एआय’च्या मदतीने तुमच्या मनाचा अंदाज घेतला जातो. सलग पैसे हरू लागल्यावर भानावर येऊन तुम्ही हा जुगार खेळणं थांबवाल, असा अंदाज आला की मध्येच तुम्ही एखाद्या वेळेस जिंकता अन् परत खेळत राहता. अर्थात, तुमच्या लक्षात राहावे म्हणून रंगसंगती, अॅनिमेशन, संगीत अशा गोष्टींचा वापर केला जातो पैशांचा पाऊस, नाण्यांचा आवाज, सोनेरी मुकुट इ. गोष्टी दाखवून हे जिंकण ‘साजरं’ केलं जातं. म्हणून ते लक्षात राहते. पण, एक हजार रुपये लावल्यावर सहाशे परत आले तरी चारशे रुपयांचे नुकसान झाले, हे कोणाच्या लक्षातही येत नाही. या प्रकाराला “Loss Disguised as Win” म्हणजे जिंकल्याच्या आभासाखाली नुकसानही लपवण्याचा प्रयत्न असे म्हटले जाते. काही बेंटिग अॅपवर ‘एआय’चा सदुपयोग झालेलाही बघायला मिळतो. अर्थातच अशी उदाहरणे विरळाच! अशा अपवादांमध्ये बॉट्स नव्हे, तर खरी माणसेच खेळत आहेत, हे तपासण्यासाठी KYC Documents किंवा Face Recognition वापरले जाते. या अशा बाबींवर कायद्याच्या स्वरुपात भारत सरकारने काही प्रमाणात पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी जवळपास शंभरहून अधिक अॅपवर घातलेली बंदी असो किंवा डीप फेक व्हिडिओवर वाॅटरमार्क टाकणे असो; अशा अॅप्सना मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करणे अनिवार्य केले आहे. मित्रांनो, शेवटी पैसा तुमचा आहे. तो कुठे आणि कसा खर्च करायचा, हे तुमच्या हातात आहे. पण, या अशा अॅप्सवर ‘फेअर प्ले’ म्हणजेच सचोटीचा खेळ होत नाही, हे लक्षात ठेऊन तुम्ही खेळत असाल, तर हरकत नाही. आखिर समझदार को इशारा काफी होता है! (संपर्कः ameyp7@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 4 May 2025 4:30 am

डायरीची पाने:माडीतलं वाचन

ती माडी, तिथल्या देवळीतली त्याची पुस्तकं, तिथं ठेवलेली शेतीची अवजारं अन् बाजेवर वाचत पडलेला तो.. हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा! पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट.. एक गाव असतं. त्या गावात एक माडी असते. तिची उंची तशी थोडी असते. वर हात केला की जोडणीला लागतो. तिथं पंखा वगैरे काही नसतं. अजून गावात लाइटच आलेली नसते. उघड्या दारातून अन् खिडकीतून भरपूर हवा नि प्रकाश येत असतो. माडी हौसेनं बांधलेली असते, पण तिच्यात कोणी राहत नाही. अडगळीच्या खोलीसारखं शेतात कधीमधी लागणारं आणि एरवी पडूनच राहणारं सगळं सामान त्या माडीत ठेवलेलं असतं. हे सामान म्हणजे या माडीचंच भाग्य असतं किंवा त्या सामानाचंच भाग्य असतं की, त्याला माडीत राहायला मिळतं. घरात एक मुलगा असतो. तो शिकत असतो, वाचत असतो. वाचतो म्हणजे अभ्यासाची पुस्तकं नव्हे, तर ती सोडून इतर काहीबाही वाचत असतो. कथा, कविता, कादंबऱ्या, चरित्रं.. त्यात प्रामुख्यानं शेतीमातीच्या पुस्तकांचा भरणा जास्त. कारण त्याचं अनुभवविश्व शेतीमातीशी जोडलेलं.. मग तो व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, बहिणाबाई चौधरी, रा. रं. बोराडे, ना. धों. महानोर, भास्कर चंदनशिव अशा कितीतरी साहित्यिकांची पुस्तकं वाचतो. विकत घेऊन त्यांचा संग्रह करत असतो. माडीत एक बाज रिकामीच पडलेली असते. ती त्याच्या मालकीची होऊन जाते. त्या बाजेवर अंथरूण आणि उशी नसली तरी चालतं. बाजेच्या सुंभाचे वण त्याच्या पाठीला, दंडाला, पोटऱ्यांना पडतात, पण त्याच्या ते लक्षातही येत नाही. तो वाचण्यात इतका रंगून गेलेला असतो की, आडांग बदलायचंही भान त्याला राहत नाही. तहानभूक विसरून तो वाचत असतो. आई खालून जेवणासाठी हाका मारत असते. त्याही त्याला ऐकू येत नाहीत. तो हातातलं वाचन संपल्याशिवाय थांबत नाही. पुस्तक वाचून झाल्यावर मगच तो जेवायला जातो. घरातली सगळी माणसं रानामाळात कामाला गेलेली असतात. भाऊ - भावजया रानावनात पांगलेले असतात. बाप तालुक्याच्या गावी काहीतरी काम काढून निघून गेलेला असतो. आई एकटीच घरी असते. तिला आपल्या या पोराची काळजी वाटत असते. शाळेची पुस्तकं सोडून हा हे काय वाचत बसलाय? अशी तिला चिंता. घरातली आणि गावातली इतर मुलं परीक्षा संपली की, पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत पुस्तकांकडं ढुंकून बघत नाहीत. शाळा सुरू झाली की सांदीकुंदीत हरवलेली पुस्तकं शोधत बसतात. पण, याचं परीक्षा संपल्यावर वाचन सुरू होतं. काय वाचतो? कशासाठी वाचतो? याचा फायदा काय? माहीत नाही, पण वाचत राहतो. अशा वाचनामुळं डोकं सरकलेल्या गावातल्या अन् तिच्या माहेरच्या एक-दोन मुलांची उदाहरणं आईला माहीत असतात. त्यामुळं तिला आपल्या मुलाची चिंता वाटत असते. गावातल्या मुलांना वेगवेगळी व्यसनं लागलेली तिनं पाहिलेली असतात. पण, हे असं मुलखावेगळं वाचनाचं व्यसन तिनं कधी पाहिलेलं नसतं. हा पुस्तकापायी वेडा होतो, हे व्यसनच की! याला पुस्तकाशिवाय दुसरं काही सुधरंत नाही, हा पुस्तकाच्या बाहेर डोकं काढत नाही, नुसतं वाचत असतो.. याचं कसं होईल? याला कोण बायको देईल? याचा संसार कसा काठाला लागंल? याची तिला चिंता वाटते. गावजेवणाच्या सार्वजनिक पंक्तीला जा म्हटलं, तर हा जात नाही, लाज वाटते म्हणतो. आता लोकांमध्ये मिसळायचं, त्यांच्यासोबत जेवायचं यात कसली आली लाज? पण, हा मुलगा वेगळाच. कशाचाच हट्ट धरत नाही, काहीच मागत नाही. फक्त अधूनमधून पुस्तकांसाठी पैसे मागतो. नाही दिले तरी आग्रह करत नाही. मास्तरांकडून, वाचनालयातून पुस्तकं आणून वाचत राहतो. त्याच्यासारखं वाचन करणारा त्याला कुणी भेटत नाही आणि इतरांसारखं इतर गोष्टीत रमणं त्याला जमत नाही. त्यामुळं हा एकलकोंडा झाला आहे. तो आणि पुस्तक, एवढंच त्याचं जग आहे. या पुस्तकातून त्याला कुठला आनंद मिळतो, हे आईच्या समजण्याच्या बाहेरचं असतं. त्यामुळं तिला तो आनंदी आहे, हेही कळत नाही. तिला फक्त हा सगळ्यांसारखा नाही, म्हणून याचं कसं होईल, हीच चिंता सतावत असते. गावातला पीठ मागायला येणारा गोसावी, आठवड्याला एकदा येणारा पोस्टमन आणि घरात अधूनमधून येणारे साधुसंत हेच याचे सगेसोयरे. त्यांना मात्र हा भरभरून बोलत असतो. काहीबाही सांगत असतो. तेही त्याचं ऐकत असतात. त्याला काही सांगत असतात. त्याच्या वाचनवेडाचं या लोकांना कौतुक, त्यामुळं तो त्यांच्यात रमतो. वाचलेल्या पुस्तकातलं काहीतरी त्यांना सांगतो. तेच त्याला सखेसहोदर वाटतात. उलट घरात येणारे पाहुणेरावळे, सख्खं गणगोत मात्र त्याला नकोसं वाटतं. कारण त्या सगळ्यांना याचं हे असं वागणं विक्षिप्त वाटतं. त्याच्या वाचनात कुणालाही रस नसतो. त्यामुळं त्यालाही त्या कुणामध्ये रस नसतो. कारण, या लोकांशी काय बोलावं, हे त्याला कळत नाही. तो सहज काही बोलायला गेला, तर त्याला सगळे वेड्यात काढतात. याला व्यवहारातलं काही कळत नाही, म्हणून नेहमीच हिणवतात. त्यामुळं तो त्यांच्यापासून आणखीनच दूर आणि पुस्तकांच्या जवळ जात राहतो. त्याची ती माडी, तिथल्या देवळीतली त्याची पुस्तकं, तिथं ठेवलेल्या शेतीच्या अवजारांचं ते सगळं प्रदर्शन, त्या बाजेवर वाचत पडलेला तो.. हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा! हा आनंद तो मनसोक्त उपभोगत असतो. त्यातूनच त्याला त्याच्या आयुष्याचा मार्ग आखायचा असतो. त्याला मराठीचा प्राध्यापक व्हायचं असतं. त्यासाठी खूप वाचन सुरू असतं. त्याचे शिक्षक - प्राध्यापक त्याच्यावर खुश असतात. त्याला हवी ती पुस्तकं देतात, मार्गदर्शन करतात. शिदोरी बांधून आणावी तशा पुस्तकाच्या पिशव्या त्यांच्याकडून भरून आणत असतो. ही शिदोरी संपली की, तो पुन्हा त्यांच्याकडं, तर कधी कॉलेजच्या किंवा तालुक्याच्या ग्रंथालयात जातो. आपल्याला काय काय हवं, ते तिथून आणत असतो. ...आणि एक दिवस तो प्राध्यापक होतो. चांगल्या पगाराची नोकरी मिळते. तो काळ असा असतो की, नोकरीसाठी पैसे लागत नसत. पगारही चांगले वाढलेले असतात. हे सगळं समजल्यावर त्याच्याशी सगळ्यांचंच वागणं बदलतं. त्याच्यासाठी सोयरिकी येतात. आधी ढुंकूनही न पाहणारे लोक त्याच्याभोवती गोळा होतात. पण, त्याला त्यांच्याविषयी काहीही वाटत नाही. आपण एका वेडात वावरत होतो, ते वेड समजून घेणारे गावातले पीठ मागणारे गोसावी, आठवड्यात एकदा घरी येणारा पोस्टमन आणि अधूनमधून घरात येणारे साधुसंत हेच त्याला आपले आत्मीय सोयरे वाटत असतात. आतून काळजी करणारी आई तर खूप आत, अगदी काळजात ठाण मांडून बसलेली असते. बाकीचे सगळे संधिसाधू... (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 4 May 2025 4:26 am

रसिक स्पेशल:महासंघर्षाच्या उंबरठ्यावर...

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी झाली आहे. भारत - पाकिस्तानमधील तणाव पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारतातील जनमानसात आक्रोश निर्माण झाला आहे. परंतु, हा हल्ला अचानक झालेला नाही. गेल्या दोन वर्षांत जम्मू विभागात सुरक्षा जवानांवर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. काश्मिरातील दहशतवादाचा नवा प्रकार म्हणून तो समोर आला आहे. एक तर, पूर्वी या भागांमध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण अत्यल्प होते. पण, अलीकडे दहशतवाद्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य केले आहे. ११ जून २०२४ ला वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करत दहशतवाद्यांनी ११ निष्पापांचे बळी घेतले होते. हे दहशतवादी अत्यंत प्रशिक्षित आहेत आणि त्यांना नमवण्यात सुरक्षा दलांची बरीच शक्ती खर्च होत आहे. या सर्व घटना पाहता, जम्मू - काश्मिरातील दहशतवाद संपल्याचे मिथक जाणीवपूर्वक पसरवले गेल्याचे जाणवते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सहभाग तसेच कोरोना महामारीनंतर या केंद्रशासित प्रदेशातील पर्यटनात झालेली वाढ यांना सूचकांक मानत काश्मीर खोऱ्यातील असंतोष कमी झाल्याचे मानण्यात येत होते. परंतु, त्यापूर्वीही तिथल्या मतदारांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये हिरीरीने भाग घेतला होता आणि त्याआधी अनेकदा काश्मीर खोऱ्यातील पर्यटनही बहरले होते. तरीही तिथे दहशतवादी घटना नित्यनेमाने घडत होत्या, त्याचीच पुनरावृत्ती आता होते आहे. काश्मिरी जनमानसातील गुंतागुंत : काश्मिरी जनमानस अत्यंत क्लिष्ट आहे. काश्मिरी लोकांमध्ये प्रखर मतमतांतरे आहेत. दहशतवाद्यांच्या पूर्णपणे विरोधात असलेला मोठा वर्ग काश्मीर खोऱ्यात आहे, त्याचबरोबर भारतीय सुरक्षा दलांची तैनाती आणि त्यांच्या शोधमोहिमांनी अस्वस्थ होणारा वर्गही तेवढाच मोठा आहे. भारतीय पर्यटकांवर मनापासून प्रेम करणारे काश्मिरी जसे आहेत, तसेच भारत सरकारचा द्वेष करणारेही आहेत. विशेष दर्जाची आस ठेवत भारतीय संघराज्याचा भाग होण्यास हरकत नसलेले काश्मिरी जसे आहेत, तसे पाकिस्तानात अजिबात सामील व्हायचे नाही, ही स्पष्टता असलेले काश्मिरीही आहेत. भारतापासून वेगळे होण्याची आकांक्षा बाळगलेले युवक अद्याप काश्मिरी समुदायात आहेत आणि पाकिस्तानकडून भ्रमनिरास झालेले फुटीरतावादीही त्यात आहेत. पाकिस्तान अशा विखुरलेल्या काश्मिरी जनसमुदायात भारतविरोधी शक्तींना हवा देतो. पण, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणारे दहशतवादी ही भारताची डोकेदुखी आहे. पाकव्याप्त काश्मिरातून होणारी ही घुसखोरी बंद करणे भारताला अद्याप शक्य झालेले नाही. द्विपक्षीय संबंध मृत्युशय्येवर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याने दोन्ही देशांतील संबंध कमालीचे बिघडले होते आणि २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर द्विपक्षीय संबंध रसातळाला गेले होते. गेल्या ६ वर्षांत जे नाममात्र संबंध उरले होते, तेही आता जवळपास संपुष्टात आले आहेत. व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब परतण्यास भारताने सांगितले आहे आणि भारतासोबत जो किरकोळ व्यापार होता, तो पाकिस्तानने स्थगित केला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान प्रत्यक्ष व्यापार अगदीच कमी होता. पण, संयुक्त अरब अमिरातीमार्गे दोन्ही देशांच्या वस्तूंचा बऱ्यापैकी व्यापार होतो. अशा तृतीय पक्षीय व्यापारालाही पाकिस्तानने स्थगिती दिली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी केली आहे. पाकिस्तानची कारस्थाने आणि कोंडी : स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर भारताने पाकिस्तानचे सार्वभौमित्व मान्य करत द्विपक्षीय संबंधांना समानता व सन्मानाच्या चौकटीत विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताविरुद्ध सातत्याने काश्मीरचे पालुपद वापरल्याने भारताने बांगलादेश मुक्तिसंग्रामाला त्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचवत द्विपक्षीय संबंधांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले होते. काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय स्तरावर सामंजस्याने सोडवण्यात येईल, हे भारताने सिमला कराराद्वारे पाकिस्तानला मान्य करण्यास भाग पाडले होते. या करारामुळे काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणे बंद झाले; पण पाकिस्तानने हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याऐवजी छुप्या युद्धाचा मार्ग पत्करला. दरम्यानच्या काळात जागतिक परिस्थिती कमालीची बदलली. शीतयुद्धानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी दहशतवादाविरुद्धचे युद्ध ही प्राथमिकता झाल्याने पाकिस्तानची कोंडी झाली. चीन वगळता इतर कोणत्याही मोठ्या देशाचा त्याला पाठिंबा उरला नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सातत्याने हलाखीची होत गेली. आज त्या देशाची अर्थव्यवस्था चीन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या कर्जांवर कशीबशी श्वास घेते आहे. अण्वस्त्रसज्जतेचा बागुलबुवा : असे असले तरी भारताच्या तुलनेत झालेली स्वत:ची प्रचंड अधोगती पाकिस्तान मान्य करत नाही. १९९८ मध्ये भारताने केलेल्या अण्वस्त्र चाचणीनंतर पाकिस्ताननेही अशी चाचणी करत स्वत:ला अण्वस्त्रधारी देश घोषित केले. भारताप्रमाणे आपल्याकडेही अण्वस्त्रे असल्यामुळे आपण भारताच्या बरोबरीत आहोत, ही भावना पाकिस्तानी लष्कर आणि सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेत भिनली आहे. याच मानसिकतेतून भारताला सतत असुरक्षित ठेवायचे आणि जागतिक राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ द्यायचे नाही, हे कुतंत्र पाकिस्तानने अवलंबले आहे. अन्यथा; पंजाब, काश्मीर किंवा भारताचा कोणताही भाग दहशतवादी कारवाया करुन भारतापासून तोडता येणार नाही, हे १९९० च्या दशकाअखेरच स्पष्ट झाले होते. तरीही केवळ अण्वस्त्रांच्या बलाबलाचा फायदा घेत भारताला वेळोवेळी जखमी करत राहायचे धोरण पाकिस्तानने राबवले. तो ठराविक काळानंतर अण्वस्त्र-ढालीची चाचणी घेत असतो. १९९९ ची कारगिलमधील घुसखोरी, २००२ मधील भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ला, २००८ चा मुंबई हल्ला, २०१४ चा पुलवामा हल्ला आणि आता पहलगाममध्ये घडवलेले मृत्युकांड या सर्वांतून पाकिस्तानने हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की दोन्ही देशांदरम्यान प्रस्थापित झालेल्या अण्वस्त्र संतुलनामुळे भारताचे प्रत्त्युत्तराचे पर्याय मर्यादित आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा बागुलबुवा हाणून पाडल्याची खात्री अनेक सुरक्षातज्ज्ञांना वाटत होती. पहलगाम हल्ल्यानंतर याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. आता पाकिस्तानने भारताच्या पल्ल्यात चेंडू टाकत उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी केली आहे. पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी जे जे करणे गरजेचे होते, ते सर्व उपाय भारताने यापूर्वीही केले आहेत. यावेळी भारताने सिंधू नदी पाणीवाटप करार स्थगित ठेवण्याचे ब्रह्मास्त्र उपसले आहे. परिणामी भारत - पाकिस्तान संघर्ष पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे २०२५ हे दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. आपल्या दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल.सिंधु कराराचे ‘गहिरे पाणी’... भारत - पाकिस्तान संबंध १९८० च्या मध्यापासून सातत्याने खालावत गेले आहेत. मात्र, अत्यंत तणावाच्या काळातही ना भारताने सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्यासाठी पाऊल उचलले होते, ना पाकिस्तानने सिमला करार रद्दबातल ठरवण्याची दिशा पकडली होती. दोन्ही देशांनी केलेल्या या घोषणांचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे भारत - पाकिस्तान संबंधांमध्ये आता प्रचंड मोठी उलाढाल होऊ घातली आहे. त्यातही सिंधु पाणीवाटप कराराच्या स्थगितीचे गहिरेपण पाकिस्तानला सर्वार्थाने आणखी खोलात नेईल. (संपर्क - parimalmayasudhakar@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 27 Apr 2025 5:00 am

कबीररंग:कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श

चंद्रमोहन जैन हे आचार्य रजनीश तथा ओशो या नावानं आपल्याला ज्ञात आहेत. एक भारतीय दार्शनिक, विचारक आणि विश्ववाड्.मयाचे भाष्यकार म्हणूनही ते आध्यात्मिक क्षेत्रात सर्वपरिचित आहेत. धार्मिक रूढीरीतींचे कट्टर विरोधक अशीही त्यांची अनोखी ओळख आहे. वैश्विक वाड्.मयाची सूत्रं आणि मौलिक विचार हाच त्यांच्या भाष्याचा मूलाधार आहे. एक निभ्रांत चिंतनसूत्र ग्रंथित करण्याचा सफल प्रयत्न ही ओशोंची विदग्ध साधना आहे. या जगातला ओशोंचा प्रवेश म्हणजे नव्या माणसाचं, नव्या जगाचं आणि नव्या युगाचं दर्शन आहे. ओशोंची दर्शनसूत्रं कुठल्याही प्रचलित धर्मावर आधारित नाहीत; तसंच ती कुठल्याही विशिष्ट दार्शनिक विचार-पद्धतीतून निर्माण झालेली नाहीत. वर्तमानाशी जोडलेल्या धर्माशी ही दर्शनसूत्रं आपलं नातं सांगतात आणि जीवनाचं रहस्य सहजपणे उलगडून दाखवतात. कबीरांच्या दोह्यांचं आणि पदांचं ओशोंनी केलेलं रसग्रहण अद्भुत आहे. हिंदी वाड्.मयाच्या इतिहासातील मध्यकाळात कबीरांवर आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी, पंडित सीताराम चतुर्वेदी, डॉ. रामकुमार वर्मा इ. टीकाकारांनी खूप काही लिहून ठेवलं आहे. पण, ओशोंनी कबीरांवर केलेलं भाष्य विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. तत्त्वचिंतनाच्या दृष्टीनं महान आहे. एकाच वेळी ते भाष्य वर्तमानसंगत आणि नवंही आहे. ओशोंनी कबीरांमधील संतकवीला धर्म, दर्शन, विज्ञान, मनोविज्ञान, समाजशास्त्र आणि युगधर्म या टीकांच्या निकषांवर लोकांपर्यंत पोहोचवलं. ‘सुनो भाई साधो’, ‘कहै कबीर मैं पूरा पाया’, ‘कहै कबीर दीवाना’, ‘न कानों सुना न आँखों देखा’ हे ओशोंचे कबीरांच्या दोह्यांवर आणि पदांवर रसपूर्ण भाष्य करणारे ग्रंथ त्याची साक्ष आहेत. कबीर स्वाभिमानी, स्वतंत्र बाण्याचे कवी आहेत. त्यांची काव्यचेतना समन्वयवादी आणि प्रतिभा बहुमुखी आहे. कबीर साधक, सिद्ध, संत, व्यंगकार, साधू, हठयोगी, प्रेममार्गी, समाजसुधारक, आत्माभिमानी अशी अनेक गुणविशेषणं असलेले कवी आहेत. त्यांच्या भाषेला कवितेचा सुगंध असून ती हृदयस्पर्शी, तर्कशुद्ध आहे. वाचकाच्या मनाला संतुष्ट करणारी ही भाषा ओशोंनी सहजपणे आपलीशी करून तिचं मर्म आपल्यासमोर ठेवलं आहे. कबीरांचं काव्य महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकांत आहे, विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मुखात आहे. कबीरांचे दोहे आणि पदं अनेक विद्वानांनी संग्रहित केले आहेत. श्यामसुंदर दास हे त्याचं उत्तम उदाहरण. कितीतरी लोकगायकांनी कबीरांच्या काव्यातील भक्तिरस आपल्या स्वरांतून सर्वदूर पोहोचवला. अशा प्रकारे लोकचेतनेत सामावून कबीर आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. एक ओळही ग्रंथात न लिहिणारे कबीर काळाला दूर सारून आजही कवी म्हणूनच आपल्या साऱ्यांच्या स्मरणात आहेत! पोथीतील विचारधन काही अंशी कालबाह्य होणारं असलं, तरी त्यातून मिळणारं आत्मज्ञान मात्र व्यापक आहे. जीवन निरंतर आणि परिवर्तनशील आहे. पोथीतील शास्त्र जड आहे आणि जीवन गतिशील आहे. म्हणून कबीर म्हणतात... कबीरा संसा दूर कर, पुस्तक देय बहाई। जीवनाचा गाभा जाणून घ्यायचा, तर तो पोथीतून मिळेल का,असा प्रश्न स्वत:ला करून कबीर पोथीतील शास्त्राला प्रेमाचा विकल्प देतात. प्रेमाचा मार्गच केवळ जीवन समजून घ्यायला उपयोगी पडेल. कबीरांचं हेच सूत्र ओशोंनी आपल्या ओंजळीत ठेवलं आहे. पण, कबीरांना अपेक्षित असलेला प्रेमाचा अर्थ नीट समजून घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पोथी पढि-पढि जगमुआ, पंडित भया न कोय।ढाई आखर प्रेम का, पढै सो पंडित होय।। या दोह्यावरती ओशो भावसुंदर भाष्य करतात. ते म्हणतात, ‘कबीरांसाठी पांडित्याची परिभाषा ही ज्ञानाची परिभाषा आहे. प्रेमाची अडीच अक्षरं वाचण्याची सोय कुठल्याच विचार पोथीत नाही. प्रेमाची स्थिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्याला जीवनाची पोथी वाचावी लागेल, आयुष्याच्या शाळेत जाऊन प्रेम म्हणजे काय, ते शिकावं लागेल. ‘प्रेम’ हा अडीच अक्षरं असलेला शब्द आहे. कबीरांना यात गहन अर्थ दिसतो. एखादी व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडते, तेव्हा अडीच अक्षरं पूर्ण होतात. एक अक्षर प्रेम करणाऱ्याचं, दुसरं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं आणि दोघांमध्ये जे अज्ञात आहे, त्यामुळं अडीच अक्षरं होतात. कबीर दोघांमधल्या अज्ञाताला धरून तीन अक्षरं म्हणत नाहीत. याचं एक मधुर कारण म्हणजे प्रेम कधी पूर्ण होत नाही. प्रेम पूर्ण होत नाही, म्हणून मनाला संतुष्टी नाही. प्रेम परमात्म्यासारखं विकसनशील आहे. अपूर्णता हीच त्याची शाश्वतता आहे. प्रेम करणाऱ्या दोघांमधला जो अदृश्य सेतू आहे, तोच द्वैत संपून एकामध्ये रूपांतरित होऊ शकतो.’ माणूस म्हणून जन्माला येण्यानं ‘त्या’ विराट अस्तित्वापासून आपण दूर होतो. हा दुरावा जाणिवेत येण्यानं ‘त्या’ विराटाचा विरह हृदयाला एक अनामिक पीडा देतो. या विरहाची मात्रा म्हणजे प्रेम नाही किंवा त्याचं समाधान म्हणजेही प्रेम नाही. अखंड विरहाची अनुभूती म्हणजे प्रेम आहे. कबीरांच्या दोह्याचा हा अर्थ ओशोंच्या भाष्यामुळे आपल्या ध्यानात येतो. कबीर जसे आपल्या सूत्रशैलीचे शिरोमणी कवी आहेत; तसे ओशो आपल्या भाष्यासाठीचे शिखर-व्याख्याता आहेत. (संपर्क - hemkiranpatki@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 27 Apr 2025 5:00 am

वेबमार्क:गुलाबी डॉल्फिन्सचं रम्य अन् रोमांचक रहस्य

एकेकाळी उपग्रह वाहिन्यांचे जाळे नव्हते, तेव्हा डिस्कव्हरी वाहिनीचे काही कार्यक्रम दूरदर्शनवर रविवारी सकाळी प्रसारित केले जायचे. त्याला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला होता. कालांतराने या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आणि चोवीस तास प्रक्षेपण असणाऱ्या शेकडो वाहिन्या अस्तित्वात आल्या. या त्सुनामीतही डिस्कव्हरी वाहिनी आपलं अस्तित्व टिकवून राहिली, याला कारण तिचं वेगळेपण! या वाहिनीवरील कार्यक्रमांचा आशय विषय ज्यांना आवडतो अशांसाठी एका आगळ्यावेगळ्या डॉक्युमेंट्रीची ही माहिती.. ‘द मिस्ट्री ऑफ द पिंक डॉल्फिन’ हे त्या माहितीपटाचं नाव. तो रिलीज होऊन काही वर्षे झाली असली, तरी अॅमेझॉन प्राइम आणि ‘डॉक्यूबे’वर तो नुकताच दाखल झाला आहे. एरिक एलेना यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. अॅमेझॉनमधील ‘गुलाबी नदीय डॉल्फिन’ (Pink River Dolphin) ज्याला ‘बोटो’ म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या रहस्यमय उत्पत्ती आणि उत्क्रांतीचा शोध यात घेतला आहे. हा माहितीपट म्हणजे विज्ञान, निसर्ग आणि संशोधन यांचा सुंदर संगम असून, त्यात या अनोख्या, दुर्मिळ प्रजातीच्या पंचवीस दशलक्ष वर्षांच्या अनुकूलनाचा प्रवास मांडण्यात आला आहे. डॉक्युमेंट्रीची सुरूवात अॅमेझॉनच्या दाट पर्जन्यभारित जंगलातील एका अरुंद उपनदीच्या प्रवाहातून होते, जिथे समुद्रापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर गुलाबी नदीय डॉल्फिन आढळतात. डॉल्फिन्सच्या उत्पत्तीविषयी बोलताना, ते समुद्री डॉल्फिनचे वंशज आहेत की प्राचीन काळातील वेगळ्या वंशाचे आहेत, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या माशांनी अॅमेझॉनच्या उष्णकटिबंधीय पर्यावरणाशी कसे अनुकूलन केले, याचा थेसिस रंजक पद्धतीने समोर येतो. ही डॉक्युमेंट्री दोन भागात विभागली आहे. पहिला भाग माशांच्या जीवाश्म अभ्यास आणि भूवैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असून, त्याद्वारे डॉल्फिन्सच्या उत्पत्तीचा शोध लावण्यात आला आहे. यात डॉल्फिन्सच्या प्राचीन इतिहासाचा आणि समुद्रापासून नदीपर्यंतच्या प्रवासाचा समावेश आहे. तर दुसऱ्या भागात, गुलाबी डॉल्फिन्सच्या वर्तमान जीवनाचा आणि त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यक्ष शोध, ज्यात त्यांचे पाण्यातले देखणे स्ट्रीमिंग आणि त्यांच्या सुरक्षेचे आव्हान या गोष्टी सामील आहेत. वैज्ञानिक शोधाचा प्रवास कथानकाच्या केंद्रस्थानी असल्याने ते रोचक झाले आहे. शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि त्यांचे निष्कर्ष प्रेक्षकांची उत्सुकता चाळवतात. या डॉक्युमेंट्रीतील डॉल्फिन्सचे दर्शन अत्यंत सुखावह आहे. त्यांचे नैसर्गिक वर्तन आणि त्यांच्या प्रांतातला मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांच्यासमोर उत्पन्न झालेले धोके यांचा गोषवारा विचार करण्यास प्रवृत्त करतो. यातील मांडणी वैज्ञानिक आणि दृश्यात्मक घटकांचा समतोल साधते. अॅमेझॉनच्या जंगलातील सुंदर दृश्ये, शांत संगीत आणि क्रिस्टेल लेड्रोइट यांचे संयमित निवेदन यामुळे डॉक्युमेंट्री पाहताना उत्साह टिकून राहतो. पहिल्या भागात डॉल्फिन्सचे प्रत्यक्ष दर्शन घडत नसल्याने ज्यांना केवळ पिंक डॉल्फिन पाहायचे आहेत, त्यांना पहिला भाग काहीसा अनाकर्षक वाटू शकतो. मात्र, खरी माहिती याच हिश्श्यात आहे. अॅमेझॉनच्या जंगलातील दृश्ये तसेच डॉल्फिन्सचे ड्रोनने टिपलेले काही थेट शॉट्स अतिशय नयनरम्य आणि आकर्षक आहेत. यातला सर्वांत महत्त्वाचा संदेश जो जगभरातील सर्वच नागरिकांना लागू होतो तो म्हणजे, मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे जीवनचक्र विस्कळीत होत आहे. अनेक प्रजाती लुप्त झाल्यात, तर काही प्रजाती लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. अशा जिवांच्या बाबतीत आपण कसे दक्ष राहिले पाहिजे, हे अगदी नेमकेपणे स्पष्ट करण्यात आले आहे. पिंक डॉल्फिन्सची शिकार करण्याच्या पद्धती किती आधुनिक झाल्या आहेत आणि कसे कमालीच्या निर्दयी पद्धतीने त्यांना मारलं जातं, हे पाहून आपण व्यथित होतो. २०१८ मध्ये इंटरनॅशनल नेचर कन्झर्व्हेशन युनियनने धोक्यात असलेली प्रजाती म्हणून ती घोषित केली आहे. या डॉक्युमेंट्रीतील माहितीचे महत्त्व यावरुन लक्षात यावे. नदीपात्रात आढळणाऱ्या पिंक डॉल्फिन्सचा वंश समुद्री डॉल्फिन्सपासून कसा वेगळा आहे, हे यात लक्षणीयरित्या दाखवले आहे. जगभरातील समुद्रकिनारे गलिच्छ होत चाललेत, असं म्हणून आपण सुटका करून घेऊ शकत नाही. कारण आपण नद्यांच्या पात्रात नेमकं काय काय सोडत आहोत, हेच आपल्याला कळेनासे झाले आहे. यातील काही घटकांचा नदीतील जिवांच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो, तर काहींचे दुष्परिणाम नदीतील पाणी समुद्रात पोहोचलं तरी होतातच. पिंक डॉल्फिन्सना त्यांच्याशी करावा लागणारा संघर्ष पाहून कोणत्याही सहृदयी व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो. हा माहितीपट वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुलाबी डॉल्फिन्सच्या रहस्यमय जगाचा शोध घेण्याचा उत्तम प्रयत्न आहे. मुळात डॉल्फिन्स हे मानवी आकर्षणाचा स्नेहबिंदू आहेत, कारण त्यांचं अजातशत्रू वर्तन आणि मायाळूपण! बुद्धिमान आणि निरागसपणा हे दोन्ही गुण त्यांच्या ठायी असण्यानं त्यांना कितीही पाहिलं, तरी समाधान मिळत नाही. ‘आयएमडीबी’वर याला १० पैकी ७.४ रेटिंग आहे. जाता जाता... ‘इंटरस्टेलर’ हा ऑल टाइम ग्रेट सिनेमा आता ओटीटीवरून रजा घेईल. ख्रिस्तोफर नोलन यांचा हा मास्टरपीस एव्हरग्रीन सायफाय वर्गातील आहे. त्याचप्रमाणे, मनातल्या भीतीवर कशी मात करावी, याचे अद्भुत तत्त्वज्ञान सांगणारा ‘द कराटे किड’ही अल्पकाळच ओटीटीवर असेल. हे दोन्ही सिनेमे अॅमेझॉन प्राइमवर पाहता येतील. (संपर्क - sameerbapu@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 27 Apr 2025 5:00 am

गोष्ट सांगतो ऐका...:शहाणा!

अवस्थी शांत बसून होते. ते एवढंच म्हणाले, ‘मी सीआयडी ऑफिसर आहे. दिल्लीहून आलोय तुम्हाला अटक करायला. तुमचा सगळा भ्रष्टाचार मला माहिती झालाय..’ पोलिस स्टेशन तसं आडवळणाला होतं. पण, बाजूला खूप झाडी असल्यानं काही न काही गुन्हा असायचा. कुणी विचारणारा नसल्यामुळं इन्स्पेक्टर प्रकरण स्टेशनपर्यंत येऊच द्यायचे नाहीत. हवालदार पैसे घेऊन तिथल्या तिथं भानगडी मिटवायचा. ठराविक पैसे स्वत: ठेवायचा. बाकी साहेबांच्या हवाली करायचा. असा एकूण गुण्यागोविंदानं कारभार चालू होता. आजही एक जोडपं साहेबांच्या समोरच त्या दाट झाडीत गेलं होतं. साहेबांनी इशारा केला तसा हवालदार उठून निघाला. आता त्या जोडप्याकडून कमीत कमी हजार एक रुपये तर घेऊन यायचे होते. हवालदार निघाला. इन्स्पेक्टर साहेब निवांत झाले. आता काही काम नव्हतं. म्हणजे करायचं नव्हतं. त्यांनी मोबाइल काढला. एक एक रील बघू लागले. इन्स्पेक्टर खूप मनमोकळं हसायचे. खूपदा त्यांना वाटायचं, ही नोकरी सोडून रील्स बनवत बसावं. अचानक एक माणूस तावातावात आला. कारमधून उतरला तसा तो रागातच दिसत होता. इन्स्पेक्टर बघत होते. पण, त्यांची जागची उठायची इच्छा झाली नाही. अशा लोकांची त्यांना सवय होती. फक्त या चौकीत आल्यापासून एवढी पांढरपेशी माणसं त्यांना भेटत नव्हती. चांगल्या कपड्यातला हा अतिशय गंभीर माणूस दिसत होता. आल्या आल्या त्यानं खुर्ची ओढली आणि बसला. बसू का? असं विचारलं नाही. इन्स्पेक्टर जरा रागात आले. त्यांना अशा उर्मटपणाची सवय नव्हती. समोर बसलेल्या गृहस्थानं आपलं नाव सांगितलं. इंग्रजीत.. तसे इन्स्पेक्टर जरा सावरून बसले. त्या गृहस्थाचे नाव राजन अवस्थी होते. ते काही क्षण इन्स्पेक्टरकडं एकटक बघत राहिले. या गोष्टीचा इन्स्पेक्टरना त्रास होऊ लागला. सहसा लोक त्यांच्यासमोर उभे असतात आणि ते एकटक बघतात. इन्स्पेक्टर या माणसाला त्याची लायकी दाखवायचा विचार करू लागले. पण, अवस्थी इंग्रजीत बोलल्याने त्यांना जरा शब्द शोधायची वेळ आली. कुठलं वाक्य बोलू, हा विचार ते करतच होते, तेवढ्यात अवस्थींनी हातानंच.. ‘पाणी हवंय’ अशी खूण केली. हे जरा अतीच होतं. चौकीत इन्स्पेक्टर साहेबच एखाद्या जखमीला किंवा रडून तक्रार सांगणाऱ्या स्त्रीला पाणी द्यायला सांगायचे. पण, त्यांना आजवर कुणी पाणी द्या, असं म्हटलं नव्हतं. तेही एवढ्या थंडपणे. अवस्थी पुन्हा इंग्रजीत बोलले.. ‘मी बोललो ते ऐकू आलं नाही का?’ इन्स्पेक्टर साहेबांच्या संयमाचा बांध फुटला. चिडून ते एवढंच म्हणाले.. ‘हु आर यू?’ अवस्थी पुन्हा एकटक इन्स्पेक्टकडं बघू लागले. मग शांतपणे म्हणाले, ‘Are you mad or what? I told you. I’m Rajan Awasthi.. Bring me some water..’ आता हे जरा अतीच झालं होतं. इन्स्पेक्टर जागचे उठले. संतापलेले. अवस्थींच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, ‘काम काय आहे तुमचं?’ अवस्थी अजिबात विचलित झाले नाहीत. शांतपणे पण अस्खलित इंग्रजीत म्हणाले, ‘आधी पाणी आणा, मग सांगतो.’ इन्स्पेक्टर अवस्थीच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत शक्य तेवढी भीती दाखवत म्हणाले, ‘ही पोलिस स्टेशन आहे, पाणपोई नाही. इथं लोक स्वत:चे प्रॉब्लेम घेऊन येतात.’ अवस्थी तरीही विचलित झाले नाहीत. इन्स्पेक्टरच्या डोळ्यात डोळे घालून ते म्हणाले.. ‘प्रॉब्लेमच घेऊन आलोय; पण तुमचा..’ हे ऐकून इन्स्पेक्टरना खरं तर राग यायला पाहिजे होता. पण, पहिल्यांदा ते दचकले. त्यांना भीती वाटली. ते जरा वेळ शांत राहिले. आपण घाबरलोय, हे त्यांना अवस्थींच्या लक्षात येऊ द्यायचं नव्हतं. त्यांनी आपला चेहरा पुन्हा रागीट केला. अवस्थींना कामाचं बोलायला सांगितलं.. ‘केस काय आहे?’ अवस्थी म्हणाले, ‘तुमचीच केस आहे..’ आता आपण नॉर्मल आहोत, हे दाखवायला इन्स्पेक्टर हसले. म्हणाले, ‘तुमचं डोकं फिरलं का?’ अवस्थी तसेच शांत बसून होते. ते फक्त एवढंच म्हणाले, ‘मी सीआयडी ऑफिसर आहे. दिल्लीहून आलोय तुम्हाला अटक करायला. माझी टीम येईलच. तुमचा सगळा भ्रष्टाचार मला माहिती झालाय. सगळे पुरावे आहेत माझ्याकडं..’ इन्स्पेक्टर साहेबांची पाचावर धारण बसली. त्यांनी स्वत:ला नॉर्मल दाखवायचा खूप प्रयत्न केला. पण, ते अस्वस्थ झाले होते. अवस्थी पुन्हा इंग्रजीत म्हणाले, ‘माझं कार्ड आणि तुमच्या केसची फाइल माझ्या कारमध्ये आहे. घेऊन या..’ इन्स्पेक्टरनी कारकडं बघितलं, पण तिथं जायची हिंमत झाली नाही. उलट ते मागच्या बाजूला गेले. स्वत: पाण्याची बाटली घेऊन अवस्थींच्या समोर बसले. अवस्थी शांतपणे पाणी पिऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही विजयी उन्माद नव्हता. ते फक्त इन्स्पेक्टरकडं बघत राहिले. पाणी पिऊन झाल्यावर शांतपणे उठले. फाइल घेऊन येतो म्हणाले. अवस्थी कारकडं जायला वळले, तोच इन्पसेक्टर साहेबांनी त्यांचा हात धरला. ‘तुमचा काही गैरसमज झालाय..’ वगैरे खूप काही बोलू लागले. प्रेमाने. अवस्थी फक्त एवढंच म्हणाले, ‘तुमचा सहकारी कुठं आहे?’ एकटेच दिसता?’ हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब जास्तच घाबरले. अवस्थी म्हणाले, ‘आज कुणालाच सोडणार नाही.’ इन्स्पेक्टर आणखी मऊ झाले. पुन्हा विनवणीच्या सुरात बोलू लागले. काही देण्याघेण्याने प्रकरण मिटते का, याचा अंदाज घेऊ लागले. पण अवस्थी म्हणाले, ‘हेड ऑफिसचा नंबर घ्या, कुणालाही विचारा. अवस्थीने आजपर्यंत एक रुपयाची तरी लाच घेतली का?’ इन्स्पेक्टर खचले. त्यातच हवालदाराला येताना बघून तर त्यांच्यात काही त्राण राहिलं नाही. हवालदार सहसा समोर कोण आहे, याचा अंदाज न घेता, किती पैसे मिळाले, कसा येडा बनवला, हे सांगू लागतो. हवालदार जवळ आला. साहेबांना शांत बसलेलं बघून तो जरा गोंधळून गेला. इन्स्पेक्टर उठून अवस्थी साहेबांची ओळख करून देऊ लागले. हवालदाराने नमस्कार केला. चहा आणतो म्हणून निघून गेला. अवस्थी साहेब घड्याळात बघत होते. इन्स्पेक्टर पुन्हा त्यांना विनवायला लागले. पण, त्याचा काही उपयोग दिसत नव्हता. एवढ्यात हवालदार एका तरुणीसोबत आला. तिला बघून अवस्थी एकदम गोंधळून गेले. ती अवस्थींची मुलगी. झाडीत शोधत होती बापाला.. हवालदाराला तिनं फोटो दाखवला म्हणून लक्षात आलं. तिनं सांगितलं की अवस्थी मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीत. मध्येच घरातून निघून जातात.. सॉरी.. इन्स्पेक्टर साहेबांना खूप ओरडायचं होतं, पण ते शांत राहिले. अवस्थीकडे बघत राहिले. जाता जाता अवस्थी म्हणत होते.. ‘सोडणार नाही.’ हवालदार म्हणाला, ‘येडा कुठचा!’ इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणाले , ‘शहाणाय तो.. मला येडा बनवला राव फुकट!’ (संपर्क -jarvindas30@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 27 Apr 2025 5:00 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:जेव्हा प्रत्येक दगडावर लिहिले होते कुली नं. 1; सिनेमासाठी प्रमोशन किती आवश्यक असते, हे वासू भगनानी यांनी इंडस्ट्रीला शिकवले

गेल्या आठवड्यात १९ एप्रिलला फिल्म इंडस्ट्रीतील मोठे आणि प्रसिद्ध निर्माते वासू भगनानीजींचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या घरी डेव्हिड धवन, अभिषेक बच्चन, चंकी पांडे, तुषार कपूर यांच्यासह चार-पाच खास लोकांसाठी डिनर ठेवण्यात आले होते. पाहुण्यांचे स्वागत वासूजींचा मुलगा जॅकी आणि सून रकुलप्रीत यांनी केले. तिथून निघताना मनात विचार आला की, आपण अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, संगीत दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्याविषयी नेहमी लिखाण करतो; पण निर्मात्यांबाबत आजवर फारसे लिहिले नाही. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किस्स्यांमध्ये वासू भगनानीजींविषयी... वासूजींचा कोलकत्यामध्ये कपड्यांचा व्यवसाय होता. मुंबईत आल्यावर त्यांनी बांधकाम क्षेत्रात कामे करण्यास तसेच ऑडिओ कॅसेट बनवण्यास सुरूवात केली. त्या काळात ऑडिओ कॅसेट खूप विकल्या जायच्या आणि त्या कॅसेटचे कव्हर बनवण्याचे काम वासूजी करायचे. त्यामुळे सगळ्या म्युझिक कंपन्यांच्या मालकांशी त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे वासूजींनी सिनेमांची निर्मिती सुरू केली. त्यांच्या पहिला सिनेमा होता ‘कुली नं. वन’. तो मी लिहिला होता आणि डेव्हिड धवन साहेबांनी दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर मी त्यांच्या ‘हीरो नंबर वन’, ‘बीवी नंबर वन’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मुझे कुछ कहना है’ अशा लागोपाठ हिट झालेल्या सिनेमांचे कथानक लिहिले. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कौटुंबिक संबंध तयार झाले. मार्केटिंग, पब्लिसिटी या गोष्टी फिल्म इंडस्ट्रीला शिकवण्याचे श्रेय वासूजींना दिले जाते. सिनेमांसाठी पब्लिसिटी कशी आवश्यक आहे आणि ती किती चांगली ठरते, हे त्यांनी शिकवले. ‘कुली नं. वन’ रिलीज होणार होता, तेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांनी माझ्यासमोर पाण्याची एक बाटली ठेवली. त्यावर कुली नं. वन लिहिले होते, एक अॅश ट्रे होता, त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. मग त्यांनी स्कूटरच्या स्टेफनीचे काही कव्हर दिले आणि म्हणाले की, तुमच्या ज्या मित्रांकडे स्कूटर असेल त्यांना हे कव्हर द्या आणि स्टेफनीवर लावायला सांगा. त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. काही लेटरपॅड, पेनही दिले आणि त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. त्यानंतर काही छत्र्या माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि जाताना त्या घेऊन जा, असे सांगितले. त्यावरही लिहिले होते.. कुली नं. वन. कारण सिनेमा ३० जूनला रिलीज होणार होता. म्हणजे त्या आधी दोन आठवडे मुंबईत पाऊस सुरू होणार होता. हे सगळे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी विचारले, ‘वासूजी, हे सगळे काय आहे? मी आजवर अशा गोष्टी कधी पाहिल्या नाहीत..’ वासूजी नेहमी हसतमुख असतात. तेव्हाही ते हसून म्हणाले, ‘सरकार, हे तुमच्या सिनेमाचे प्रमोशन करतोय!’ आम्ही दोघे एकमेकांना ‘सरकार’ म्हणायचो. ते पुढे सांगू लागले.. ‘या गोष्टींची खूप गरज आहे. तुम्हा फिल्म इंडस्ट्रीवाल्यांना पोस्टर लावून, ट्रेलर दाखवून सिनेमा चालेल असे वाटते आणि तुम्ही त्यालाच पब्लिसिटी समजता. पण, तुम्ही आपल्या प्रॉडक्टची चौफेर पब्लिसिटी करणार नाही, तोवर लोकांना त्याविषयी कसे समजणार? प्रसिद्धीची गरज नसती, तर टाटा- बिर्लांसारख्या मोठमोठ्या कॉर्पोरेटनी आपल्या उत्पादनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले नसते. चहापासून तुपापर्यंत आणि अन्नधान्यापासून सिमेंटपर्यंत सगळ्या प्रॉडक्टच्या पब्लिसिटीवर ते कोट्यवधी रुपये खर्च करतात कारण त्याचा रिझल्ट मिळतो. तुम्ही बघा, आपल्या या पब्लिसिटीचाही रिझल्ट नक्की दिसेल.’ वासूजींच्या या गोष्टीवरुन मला शकील आज़मी यांचा एक शेर आठवतोय... हर घड़ी चश्म-ए-ख़रीदार में रहने के लिएकुछ हुनर चाहिए बाज़ार में रहने के लिए। असो. त्यानंतर वासूजी म्हणाले, सरकार, या सगळ्या गोष्टी घेऊन जा, मित्रांना वाटा आणि दोन दिवसांनी घराबाहेर पडा. चौकसपणे आजूबाजूला बघा, तुम्हाला सरप्राइज दिसेल.. दोन दिवसांनी मी घराबाहेर पडलो. जवळच्या बागेत फिरताना एका दगडावर नजर पडली, त्यावर लिहिले होते - कुली नं. वन. मी वांद्र्यापर्यंत गेलो. वाटेतला कुठलाही दगड कोरा नव्हता. भितींवर पोस्टर लागले होते. जिथे कुठे मोकळी जागा होती, तिथे कुली नं. वन लिहिले होते. सिनेमा रिलीज झाला, सुपरहिट ठरला. पुढे अनेक महिने ते दगड तसेच होते, ज्यावर लिहिले होते.. कुली नं. वन. त्यानंतर वासूजींनी पब्लिसिटीची मालिकाच सुरू केली, कारण सगळे सिनेमे हिट होत होते. गाडीतून जात असताना अचानक एखादी स्कूटर समोर यायची, जिच्या स्टेफनीवर ‘कुली नं. वन’ लिहिलेले असायचे. पावसातून जाताना एकाएकी कुणी तरी छत्री घेऊन यायचे, जिच्यावर ‘कुली नं. वन’ किंवा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ लिहिलेले असायचे. मुंबईत जितक्या स्कूटर, गाड्या, छत्र्या असतील, त्यांच्यावर कुठे ना कुठे तुम्हाला वासूजींच्या बॅनरचे नाव दिसेलच. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीचे डोळे उघडले आणि सिनेमांचे प्रमोशन किती आवश्यक आहे, ते सगळ्यांना कळून चुकले. मला आठवतेय की, शाहरुख खान, जूही चावला आणि अजीज मिर्झा यांनी मिळून ‘ड्रीम्स अनलिमिटेड’ ही कंपनी सुरू केली होती. त्यासाठी ऑफिस घेतल्यावर या तिघांनी तिथे पहिल्यांदा वासूजींना बोलावले आणि सिनेमांचे मार्केटिंग, प्रमोशन कसे करायचे ते आम्हाला शिकवा, अशी विनंती केली होती. तर, आज वासूजींसाठी ‘कुली नंबर वन’मधील हे गाणे ऐका... मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 27 Apr 2025 5:00 am

मुद्दे पंचविशी:नोकरशाही : गरज आत्मचिंतनाची...

नोकरशाही हे लोकशाहीचे शिर नसून हृदय आहे. ते न थकता आणि न डगमगता धडधडत राहावे, यासाठी त्याला नवा ऊर्जास्रोत हवा. हा ऊर्जास्रोत म्हणजे, आत्मपरीक्षण, सजगता, पारदर्शकता आणि नागरिकांप्रति निष्ठा. या व्यवस्थेची आजची दुरवस्था थांबवण्याचा भार राजकीय नेतृत्वावर टाकता येणार नाही. ती प्रशासकीय नेतृत्वाचीच जबाबदारी आहे.इतर कुठल्याही राज्यपद्धतीपेक्षा लोकशाही ही जास्त प्रगल्भ, व्यापक आणि न्यायप्रिय मानली जाते. परंतु, या व्यवस्थेतील मूलभूत त्रुटी म्हणजे, प्रत्येक वेळी समाजातले ज्ञानी, दूरदृष्टीसंपन्न, अनुभवसंपन्न व्यक्तीच सत्तेवर येतील, याची शाश्वती नसते. याच शंका आणि अनुभवातून सॉक्रेटिस, प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांच्यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी लोकशाहीच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यांचे मत होते की, अज्ञान, लोकप्रियता आणि भावनिक लाटांवर आरूढ होणाऱ्या नेतृत्वामुळे सरकारे अनिर्णयी, अस्थिर आणि कधी कधी विद्ध्वंसकही ठरू शकतील! या संभाव्य त्रुटीवर उपाययोजना म्हणून आणि शासनाची गाडी सतत रुळावर राहावी, यासाठी लोकशाहीतील एक स्थिर, प्रशिक्षित व अनुभवी यंत्रणा म्हणून ‘नोकरशाही’ची संकल्पना जन्माला आली. निवडणुकांचे चक्र सुरू असो वा नसो, सत्तांतर झालेले असो वा कलह निर्माण झालेला असो; शासनकार्याची अखंड गती थांबू नये, यासाठी नोकरशाही ही एक प्रकारची सतत कार्यरत असणारी राज्यपद्धती ठरली. लोकशाहीतील जबाबदार व्यवस्था राजशकट चालवणारी हीच नोकरशाही दृढ आणि निस्सीम अशी व्यवस्था म्हणून गेली अडीच हजार वर्षे अडथळ्यांमध्येही न थकता सत्तेच्या चाकांना ओढण्याचे काम करत असते. तिचे ज्ञान, अनुभव आणि दूरदृष्टी यामुळे ती फक्त एक प्रशासन व्यवस्था न राहता, शासनाचा अविभाज्य आणि प्राणवंत भाग बनलेली आहे. राजकारणाचे रंग बदलत राहतात, पण प्रशासनाचे रंग स्थिर, शिस्तबद्ध आणि नीतिमूल्यांशी निष्ठावान राहिले पाहिजेत, हेच लोकशाहीच्या शाश्वततेचे खरे गमक आहे. संविधानाने भाग १४ नुसार या प्रशासकीय सेवेला म्हणजे नोकरशाहीला एक पवित्र आणि अभेद्य स्वरूप दिले. नोकरशाही ही केवळ सरकारच्या आज्ञाधारक नोकरांची फौज म्हणून नव्हे, तर ती लोकशाहीच्या मूळ उद्दिष्टांची कार्यवाही करणारी एक स्थायी, प्रशिक्षित आणि जबाबदार व्यवस्था म्हणून निर्माण केली आहे. परंतु, गेल्या साडेसहा दशकांतील वास्तव पाहता, हीच नोकरशाही राजकीय व्यवस्थेची बटिक होवून जनतेपासून दुरावत चालली आहे की काय, अशी शंका मनात निर्माण होते. रथाची दिशा घोडेच ठरवणार..? लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही शासनरुपी रथांची दोन चाके आहेत, हा लोकशाहीतील सर्वात मोठा गैरसमज आहे. ही संकल्पना मुळातच चुकीची आहे. काही स्वार्थी नोकरशहांनी रचलेले हे कुभांड आहे, असे म्हणता येईल. सरकार किंवा शासन म्हणजे जनतेचे स्वत:चे राज्य आणि ते दैनंदिन, अविरत चालवण्यासाठी त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते व्यवहारात अमलात आणले जाते. नोकरशाही ही सरकारची एक सहायकारी यंत्रणा होय. रथाचंच रूपक वापरायचं, तर रथ म्हणजे राज्य, सारथी म्हणजे लोकप्रतिनिधी आणि रथ ओढणारे घोडे म्हणजे नोकरशाही. पण, घोड्यांनीच रथाची दिशा ठरवावी, असा गोंधळ असेल, तर रथ कोठे जाईल, याचा विचार केला पाहिजे. तो न करणे म्हणजे लोकशाहीला अंधारात ढकलण्यासारखे आहे. भारतीय लोकशाहीची रचना करताना संविधान समितीने नोकरशाहीचा विचार केला, तेव्हा ती राजकीय दबावांपासून स्वतंत्र, पारदर्शक आणि निष्पक्ष असावी, यासाठीच तिला राज्यघटनेत विशेष स्थान देण्यात आले. पण, आज राज्याच्या कारभारात जे बेजबाबदारपणाचे आणि दुर्बलतेचे प्रदर्शन होत आहे, ते पाहता नोकरशाहीने स्वत:ची संकल्पना, मूल्ये आणि उद्दिष्टे हरवल्याचे दिसते. ही अधोगती राजकीय हस्तक्षेपामुळे झाली असली, तरी त्याला खतपाणी घालणाऱ्या काही प्रशासकीय प्रवृत्तीही तितक्याच दोषी आहेत. नोकरशाही जेव्हा ‘होयबाशाही’ होते... महाराष्ट्राचा विचार केल्यास गेल्या काही दशकांत आपल्या राज्याचे प्रशासन संपूर्ण देशात सर्वोत्तम मानले जात होते. याचे श्रेय सामाजिकदृष्ट्या जागरूक राजकीय नेतृत्वाला आणि जबाबदारीने वागणाऱ्या प्रशासकीय नेतृत्वाला जाते. पण, अलीकडे हे संतुलन ढळले आहे. कारण नोकरशाहीने आपली भूमिका ‘सेवक’ म्हणून न ठेवता, ‘सत्तेचा अंगवळणी पडलेला भाग’ म्हणून स्वत:चे अवमूल्यन करून घेतले आहे. उदाहरणार्थ, या बदललेल्या मनोवृत्तीमुळेच आज राज्य शासनाच्या ७.२४ लाख मंजूर पदांपैकी तब्बल २.४६ लाख पदे रिक्त आहेत. म्हणजेच सरकारचा कारभाररुपी रथ एकतृतीयांश अपंग झालेला आहे! ही शोकांतिका केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. ही मानसिक दुर्बलतेची, नियोजनशून्यतेची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रशासकीय नेतृत्वाच्या आत्मसात शक्तीच्या अभावाची परिणामकारक परिणती आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीच ही भयावह रिक्तता राजकीय नेतृत्वासमोर ठामपणे मांडू शकत नाहीत, तेव्हा ती ‘नोकरशाही’ न राहता ‘होयबाशाही’ होते. प्रशासनाची जबाबदाऱ्यांपासून फारकत प्रशासनाच्या प्रमुख जबाबदाऱ्या म्हणजे, सध्याच्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या समस्यांचा वेध घेणे, त्यावर नेमक्या उपाययोजना आखणे, राजकीय नेतृत्वाकडून त्या मंजूर करून घेणे, कायदे आणि धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणे, राजकीय निर्णय चुकीचे असतील आणि ते राज्य व जनतेच्या हिताचे नसतील, तर त्याविरोधात ठाम भूमिका घेणे. परंतु, आजची नोकरशाही बहुतेक ठिकाणी भीती, लोभ, पदोन्नतीची आस आणि दबाव यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसते. काही अपवाद वगळता, ही व्यवस्था आपल्या संविधानिक जबाबदाऱ्यांपासून फारकत घेत असल्याचे ठळकपणे जाणवते. राजकीय नेतृत्व निवडणुकीच्या गणितात अडकलेले असते. हेच गणित अनेकदा नोकरशाहीतील निर्णयप्रक्रियेला लागणाऱ्या गतीचा गळा घोटते. मंत्री, आमदार, खासदार यांचे ‘सांगणे’, “कळवणे’, ‘बघा बरं..’ असे शब्दप्रयोग आज प्रशासकीय निर्णयांची व्याख्या ठरले आहेत. नियोजन, अंमलबजावणी, निरीक्षण, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या टप्प्यांवर आता ‘नजर’ नसते, तर ‘संदर्भ’ असतो. आणि यासाठी जबाबदार कोण? राजकीय नेतृत्वाला सत्तेच्या समीकरणासाठी ही सगळी विकृती पोसणे भागच असते. पण, प्रशासकीय नेतृत्व..? त्याला आपली जबाबदारी कशी टाळता येईल? राज्यघटनेच्या मूल्यांशी बांधिलकी हवीच नोकरशाहीच्या पातळीवर ही स्थिती असताना, पुढच्या २५ वर्षांची वाटचाल अधिक गंभीर आणि दूरदृष्टीची असणे आवश्यक बनले आहे. देशातील नव्या पिढीच्या अपेक्षा - आकांक्षा, सामाजिक ताणतणाव, आर्थिक विषमता, तांत्रिक क्रांती आणि हवामान बदल यांसारख्या अक्राळविक्राळ समस्यांचा सामना करण्यासाठी एक उत्क्रांत, ठाम, नैतिकदृष्ट्या सशक्त आणि वैचारिकदृष्ट्या दूरदृष्टीची नोकरशाही हवी आहे. ही नोकरशाही निवडणुकीनंतरच्या सत्तांतराच्या वेळी केवळ यंत्रवत आदेशांची पूर्तता करणारी न राहता, नव्या शासनाला राजकीय दृष्टिकोनास पूरक उपाययोजना सुचवणारी आणि स्वत: जनहिताच्या मुद्द्यांवर सजग असणारी हवी आहे. राजकीय नेतृत्व हे नेहमीच जनतेला गोंजारणाऱ्या घोषणांनी आपली सत्ता टिकवण्याच्या मोहात असते. अशावेळी खऱ्या अर्थाने “रिफॉर्म्स विदीन गव्हर्नन्स’ साध्य होण्यासाठी नोकरशाहीने पुढाकार घ्यावा लागतो. त्यासाठी ‘राजकीय आदेशाची वाट पाहणं’ हा दृष्टिकोन सोडून ‘राज्यघटनेच्या मूल्यांशी बांधिलकी’ हाच एकमेव मार्ग बनायला हवा. नोकरशाही हे लोकशाहीचे शिर नसून हृदय आहे. ते न थकता आणि न डगमगता धडधडत राहावे, यासाठी त्याला नवा ऊर्जास्रोत हवा. हा ऊर्जास्रोत म्हणजे, आत्मपरीक्षण, सजगता, पारदर्शकता आणि नागरिकांप्रति निष्ठा. या व्यवस्थेची आजची दुरवस्था थांबवायची असेल, तर हा भार कोणत्याही राजकीय नेतृत्वावर टाकता येणार नाही. ती जबाबदारी आहे प्रशासकीय नेतृत्वाची! त्यामुळं हे नेतृत्व तात्कालिक सत्तांवर नाही, तर दीर्घकालीन मूल्यांवर उभं राहिलं पाहिजे. तसे झाले तरच नव्या महाराष्ट्राची नवी दिशा निश्चित होईल... एक अशी दिशा, जिथे नोकरशाही ही सत्तेची गुलामगिरी करणारी नव्हे, तर संविधानाच्या सेवेसाठी झगडणारी स्वाभिमानी यंत्रणा ठरेल. (संपर्क - maheshzagade07@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 27 Apr 2025 5:00 am

रसिक स्पेशल:महाराष्ट्रातील शेती आणि ‘एआय’चा प्रभावी वापर

महाराष्ट्रात सरकार आणि शेतीशी निगडित संशोधन संस्थांनी कृषी क्षेत्रातील ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापराचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांची गती आणि दिशा कायम राहिल्यास नजीकच्या काळात शेतीची उत्पादन क्षमता वाढेलच; शिवाय शेतीचा खर्च कमी होऊन ती अधिक सक्षम होईल. त्यातूनच शाश्वत शेतीला चालना मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित यंत्रसदृश प्रणाली मानवासारखे विचार करणे, प्रशिक्षित होणे, निर्णय घेणे, समस्या सोडवणे आदी कामे स्वायत्तपणे करू शकते. अलीकडे आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित सर्व क्षेत्रांमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान वेगाने समरस होत आहे. कृषी क्षेत्रही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रातील शेती आणि ‘एआय’ : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे व त्याच्या वापरास प्रोत्साहन देणे याबाबत महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता ‘एआय’ तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करण्याबाबतही राज्याने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील ‘एआय’चा वापर आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाच्या विकसनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये; ऊस, कापूस, सोयाबीन, तांदूळ, कांदा आणि मका या पिकांचा प्राधान्याने समावेश आहे. तथापि, अन्य काही क्षेत्रांप्रमाणे इतरत्र विकसित झालेले ‘एआय’ तंत्रज्ञान हे शेतीसाठी जसेच्या तसे किंवा त्यात काही जुजबी सुधारणा करून वापरता येणे शक्य नाही. पीक, जमीन, हवामान, पीक व्यवस्थापन प्रणाली, मागणी - पुरवठा, शेतकऱ्यांचे विविध स्तर, शेत जमिनीचे क्षेत्र आदींमध्ये असलेली प्रचंड विविधता व अनिश्चितता, ही यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे शेती क्षेत्रात ‘एआय’चा प्रभावी वापर होण्यासाठी काही गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतील. पिकांच्या गरजेप्रमाणे पाणी, खते, रसायने देण्याचे निर्णय घेऊन त्यांच्या वापरात बचत करणे, पिकांच्या अपेक्षित उत्पादनाचे भाकीत आणि त्याप्रमाणे पिकाची काढणी करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे, हवामान अंदाज तसेच वातावरणातील बदल अचूकपणे वर्तवून त्यानुसार शेतीतील विविध प्रक्रिया करणे, निविष्ठांमध्ये बचत आणि उत्पादनात वाढ, शेतमालाची मागणी व पुरवठा यामध्ये संतुलन आदी गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. लहान-मोठे, बागायती-कोरडवाहू, नगदी-भरडधान्य पिके घेणारे, संगणक साक्षर - निरक्षर अशा सर्व स्तरांतील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी या प्रणाली स्थानिक स्तरावर विकसित करणे, चाचणी घेऊन त्या उपयोगक्षम करणे आणि शेतकऱ्यांना व शेतीशी संबंधित सर्व भागधारकांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांचे प्रकल्प : ‘एआय’चे शेतीमधील महत्त्व लक्षात घेता राज्यातील कृषी विद्यापीठे आणि शेतीशी निगडित संशोधन संस्थांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध पिकांची स्थानिक स्तरावरील माहिती संकलित करणे, पूर्वीची माहिती एकत्रित करणे सुरू केले आहे. उदा. ‘एआय’ आधारित काटेकोर सिंचनासाठी स्थानिक स्तरावर लागणारे “पीक गुणांक’ ठरवण्यासाठी राहुरी, परभणी आणि अकोला येथील कृषी विद्यापीठांनी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) प्रायोजित ‘डिजिटल लायसिमीटर संशोधन प्रकल्प’ हाती घेतला आहे. राहुरी विद्यापीठाने पिकांवरील जैविक आणि अजैविक ताण ओळखण्यासाठी पिकांच्या विविध अवस्थांतील वर्गीकृत प्रतिमा आणि वर्गीकृत वर्णकमीय प्रतिसाद स्वाक्षरी संचाचा प्रकल्प सुरू केला आहे. राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाने २०१८ पासून ‘कास्ट-कासम’ प्रकल्पाद्वारे राज्यातील विविध कृषी हवामान क्षेत्रांमधील वेगवेगळ्या पिकांना निर्दिष्ट सिंचनाद्वारे किती आणि केव्हा पाणी द्यावे याचा निर्णय घेणारी ‘फुले इरिगेशन शेड्युलर’ प्रणाली विकसित केली आहे. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पिकाला किती आणि केव्हा खत द्यावे, याचा निर्णय घेणारी ‘फुले फर्टिगेशन शेड्युलर’ प्रणाली तयार केली आहे. पिकाला पाणी देण्याबाबत फुले इरिगेशन शेड्युलरने घेतलेले निर्णय स्वायत्तपणे कार्यरत करणारी ‘ऑटो फुले इरिगेशन शेड्युलर’ ही डिजिटल प्रणालीही विकसित केली असून, शेतकऱ्यांच्या स्तरावर तिचा वापर होत आहे. राज्यस्तरावर सुरू असलेले उपक्रम : राज्य सरकारने ‘आयआयटी- मुंबई’सोबत सामंजस्य करार करुन आणि त्याद्वारे अर्थसहाय्य देऊन ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. शिवाय, ‘आयआयटी - मुंबई’ने राज्यात ड्रोन परिसंस्था विकसित करण्यासाठी ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन’च्या अनुदानातून संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये अन्य गोष्टींसोबतच कृषीसाठी पूरक असे ड्रोन आधारित ‘एआय’ तंत्रज्ञान विकसित करण्याविषयी संशोधन सुरू आहे. हवामान बदलांना सामोरे जाण्याची क्षमता असलेले ‘एआय’ तंत्रज्ञान पावसावर अवलंबून असणाऱ्या असुरक्षित शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. तथापि, ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा विकास करण्यासोबतच त्यासाठी लागणाऱ्या संशोधनाधिष्ठित ज्ञानाची निर्मिती करणेही आवश्यक आहे. अन्यथा, या तंत्रज्ञानाचे अपेक्षित फायदे मिळू शकणार नाहीत. एकंदरीत, महाराष्ट्र सरकार तसेच राज्यातील शेतीशी निगडित संशोधन संस्थांनी कृषी क्षेत्रातील ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांची गती आणि दिशा कायम राहिल्यास नजीकच्या काळात शेतीची उत्पादन क्षमता वाढेल. शिवाय, शेतीचा खर्च कमी करुन ती अधिक सक्षम करणे आणि त्यातूनच शाश्वत शेतीला चालना देणे शक्य होईल.फार्म ऑफ द फ्युचर... बारामतीच्या अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्राने ऑक्सफर्ड विद्यापीठ तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहाय्याने संवेदके, उपग्रहाद्वारे मिळालेल्या हवामान माहितीच्या आधारे पाणी आणि खत देणारी तसेच तणनियंत्रणाचा निर्णय स्वायत्तपणे घेणारी ‘फार्म ऑफ द फ्युचर’ ही प्रणाली विकसित केली आहे. जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर तिचे प्रात्यक्षिकही घेतले आहे. या प्रयोगाची नोंद राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. नागपूरच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेनेही कापूस उत्पादकांसाठी कृषी ‘एआय’ आधारित कीड नियंत्रण प्रणाली विकसित केली आहे. (संपर्क -sdgorantiwar@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 27 Apr 2025 5:00 am

टोकियो ते नवी दिल्ली:ट्रम्प यांच्या उच्च-स्तरीय व्यापार डिप्लोमसीने नवीन जागतिक व्यवस्थेसाठी पाया रचला

या आठवड्यात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानचे आर्थिक पुनरुज्जीवन मंत्री रयोसेई अकाझावा यांची भेट घेऊन परस्पर शुल्कांवरील वाटाघाटी सुरू केल्या. या मुद्द्यावर ही त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. येत्या आठवड्यातही वाटाघाटी सुरू राहतील. याचा निकाल महत्त्वाचा आहे - केवळ जपानसाठीच नाही, तर नवीन जागतिक व्यवस्था काय असण्याची शक्यता आहे हे समजून घेण्यास उत्सुक असलेल्या प्रत्येकासाठी. ट्रम्प आणि जपानी टीममध्ये जे घडते ते येणाऱ्या काळासाठी एक नमुना निश्चित करेल. अमेरिकेच्या अध्यक्षांना माहित आहे की दोन्ही बाजूंना त्रास होईल कारण समायोजन करणे सोपे नाही. देशांनी त्यांच्या चलनाचे कौतुक करावे आणि विनिमय दर योग्य ठेवावा अशी त्यांची इच्छा असेल. जपानी येन आधीच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 159 वरून 143 पर्यंत वाढला आहे. तो आणखी पुढे जाण्याची गरज आहे का? कदाचित आणखी 10%. देशांनी अमेरिकेत निवडक उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षा देखील ट्रम्प करतील. जपानच्या बाबतीत, टोयोटा आणि इतर कंपन्यांनी त्यांच्या पुरवठादार नेटवर्कसह अमेरिकेत त्वरित विस्तार करावा अशी त्यांची इच्छा असेल. इतर कंपन्या आणि उत्पादने देखील निवडली जातील. त्यांचे करार खर्च कमी करण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी संयुक्तपणे काम करण्यावर भर देतील, विशेषतः चीनच्या तुलनेत. अनुदाने आणि अन्याय्य विनिमय दर काढून टाकल्यानंतर चीनच्या हायपर-स्केल-बेस्ड मार्जिनल कॉस्टचा विचार करा. दोन्ही देश कालांतराने एकत्रितपणे चीनला मागे टाकू शकतात. ते कठीण असेल. कोणत्याही राष्ट्रावर सामान्य शुल्क आकारले जाणार नाही. ते उत्पादन दर उत्पादन असेल. परस्पर, परस्पर! जागतिक बाजारपेठेत चीनला मागे टाकण्याचा हेतू आहे. परस्पर करारांद्वारे संतुलित व्यापार परस्पर वाढीच्या शर्यतीचे दरवाजे उघडतो. यामुळे दोन्ही देशांना चीनसोबतच्या व्यापार युद्धात बाजारपेठेतील वाटा मिळू शकतो. ही एक नवीन जागतिकीकरण प्रक्रिया आहे. काही देशांमध्ये पॅटर्नमध्ये अद्वितीय भिन्नता असतील. जपान आणि अमेरिकेला राजकीय आणि लष्करी सहयोगी म्हणून एकमेकांची आवश्यकता आहे. चीनचा धोका जवळ आला आहे. चीन ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्सभोवती फिरत आहे आणि तैवानवर जवळजवळ नाकेबंदी केली आहे. म्हणून, जपानसाठी, काही गोपनीय करार देखील केले जातील. मी स्पष्टपणे सांगतो: मी चुकीचा असू शकतो, परंतु मी ट्रम्पचा बराच काळ अभ्यास केला आहे. माझ्या मते ते एक बांधकाम व्यावसायिक आहेत. ते सीसीपी (चीनी कम्युनिस्ट पक्ष) च्या जादूटोण्याविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी एक नवीन जागतिक व्यवस्थेचे बांधकाम करणारे असतील. त्यांचे काम आता दिसून येऊ लागले आहे. वेदना असतीलच. ती वेदना महागाई आहे. भारत भारत खूप चांगल्या स्थितीत आहे. मला अपेक्षा आहे की ट्रम्पच्या भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटीही अशाच पद्धतीने होतील, एका अपवादाशिवाय. आसियान देशांमध्ये चीनच्या व्यापार धोक्याचा आणि या प्रदेशातील कोणत्याही संभाव्य लष्करी संघर्षाचा सामना करण्यासाठी भारताने अधिक सहकार्य करावे अशी ट्रम्प यांची इच्छा असेल. माझ्या उद्योग संपर्कांवरून असे दिसून येते की मोदी सरकार उत्पादनानुसार आणि उद्योगानुसार वाटाघाटींसाठी तयारी करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे.. सचिव स्थानिक कंपन्यांकडून माहिती मागत आहेत. कापड आणि औषधनिर्माण यासारख्या अनेक भारतीय उद्योगांसाठी ही संधीची खिडकी आहे. भविष्यात काय घडणार आहे याबद्दल परिस्थिती बदलू शकते. एक परिस्थिती निश्चित आहे. चलनातील आणखी वाढ ही अजेंड्यावर आहे. तसेच, चीनशी स्पर्धा करण्यासाठी कमी खर्च आणि उच्च दर्जाची आवश्यकता आहे. म्हणून, अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींकडे दुर्लक्ष करून, सर्व कंपन्यांनी त्यांच्या खर्चाच्या रचनेचे आणि खर्चाच्या पातळीत बदल करायला हवेत. स्पर्धात्मक होण्यासाठी मार्जिनल कॉस्टसाठी डिजिटायझेशन किंवा एआयचा वापर आता निकडीचा आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी भारताला दरवर्षी अंदाजे ₹४१.७५ लाख कोटी ($५०० अब्ज) अमेरिकेत निर्यात करण्याचे आमंत्रण दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी विशिष्ट धोरणे शोधावी. यामध्येच वाढ आणि तांत्रिक प्रगती आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. चला मग लाट सुरू करूया आणि त्यावर स्वार होऊया.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2025 10:21 pm

देश - परदेश:ग्रीनलँडचे काय होईल?

ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक दरम्यान आहे. त्याचे राजकीय संबंध डेन्मार्कशी आहेत, कारण तो त्या देशाचा स्वायत्त भाग आहे. परंतु, अमेरिका, रशिया, चीन, नार्वे अशा शक्तिशाली देशांची या भागावरील वाढती नजर लक्षात घेता ग्रीनलँडचे पुढे काय होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेने ग्रीनलँड हा देश घशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तो केवळ अद्भुत म्हणावा लागेल. पण, आंतरराष्ट्रीय राजकारण हे असं असतं. ज्यांनी विविध पद्धतीने जगाचे शोषण केले आहे, ते अमेरिका, इंग्लंडसारखे देशच तिथे लोकशाहीविषयी सतत धडे देण्याचा प्रयत्न करत असतात. आता ग्रीनलँड घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न पाहण्यासारखा आहे.अमेरिकेने हा देश घेतला तर २१ लाख ६६ हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश मिळाल्याने भूक्षेत्राच्या बाबतीत अमेरिका कॅनडापेक्षा महाकाय आणि जगातील दुसरे मोठे राष्ट्र बनू शकेल.अमेरिका शंभर एक वर्षे येनकेन प्रकारे ग्रीनलँड घेण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकची अनेक वर्षांपासून ग्रीनलँडमध्ये, विशेषत: थुले एअर बेसच्या माध्यमातून लष्करी उपस्थिती आहे. २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा अनेकांना धक्कादायक वाटली. परंतु, ती “रिअल इस्टेट”च्या दृष्टिकोनातून नव्हे, तर भूराजकीय आणि सामरिक दृष्टिकोनातून होती. आर्क्टिक प्रदेशात चीन आणि रशियाची वाढती उपस्थिती अमेरिकेसाठी धोका असल्याचे भासवणे सुरू आहे. याच कारणामुळे ग्रीनलँडमध्ये अमेरिका दुसऱ्या महायुद्धापासून आपला लष्करी तळ ठोकून आहे. ग्रीनलँडचे परराष्ट्र आणि संरक्षण धोरण आजही डेन्मार्कच्या नियंत्रणात आहे. एका बाजूला ग्रीनलँडला स्वायत्त भूमी मानली जाते, पण दुसरीकडे याच ग्रीनलँडवर सार्वभौमत्व मात्र डेन्मार्कचे आहे. ग्रीनलँडच्या नैसर्गिक संसाधनांमुळे डेन्मार्कसाठी हे बेट अत्यंत मौल्यवान आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप डेन्मार्कला अस्वस्थ करतो. तरीही अमेरिकेशिवाय डेन्मार्क एकटा ग्रीनलँडच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आर्क्टिकमध्ये बर्फ वितळल्यामुळे नवीन समुद्री मार्ग, खनिज साठे आणि इंधन स्रोत उपलब्ध होत आहेत. रशिया आणि चीन या नव्या संधींचा वापर करत आहेत. चीनने ग्रीनलँडमध्ये गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू केले होते. विमानतळ बांधकाम प्रकल्पात रुची दाखवली होती. मात्र, अमेरिका आणि डेन्मार्कने हे प्रयत्न हाणून पाडले. नार्वे हे आर्क्टिक सर्कलमध्ये आधीपासून प्रभावशाली राष्ट्र आहे. त्याचे आर्थिक आणि लष्करी हितसंबंधही ग्रीनलँडशी जोडले गेले आहेत. एकेकाळी नॉर्वेनेही ग्रीनलँडची भूमी काबीज केली होती. ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीपासून त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने ग्रीनलँडविषयी बोलणं सुरू केले .कधी ते या विषयाला ‘रिअल इस्टेट प्रोजेक्ट’ म्हणतात, तर कधी अमेरिकेच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक बेट असे स्वत:च्या प्रयत्नांचे समर्थन करतात. ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आता अमेरिकी तसेच युरोपियन अधिकाऱ्यांच्या ग्रीनलँड आणि डेन्मार्क भेटींनी पुन्हा एकदा आर्क्टिकच्या भू-राजकारणाला गती आली आहे. नवीन संरक्षण करार, गुंतवणुकीचे प्रस्ताव आणि वातावरणविषयक सहकार्य यावर चर्चा झाली आहे. ट्रम्प यांच्या ‘खरेदी’च्या विधानामुळे सुरूवातीला थोडं हास्यास्पद वातावरण तयार झालं होतं, परंतु त्यामुळेच ग्रीनलँडच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश पडला. ट्रम्प यांनी ग्रीनलँडकडे ‘एक मोठे डील’ म्हणून पाहिलं. त्यांचं म्हणणं होतं की, अमेरिका हे बेट विकत घेऊ शकत असेल, तर ती एक ऐतिहासिक गुंतवणूक ठरेल. परंतु, प्रत्यक्षात ‘स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट’ म्हणजेच भू-राजकीयदृष्ट्या फायदेशीर असलेल्या जमिनीसाठीचा हा दृष्टिकोन मानता येईल. या बाबतीत भविष्यात नेमके काय होईल, याचा आत्ताच अंदाज बांधता येत नसला, तरी हे मात्र निश्चित आहे की, ट्रम्प सहजासहजी आपला अट्टाहास सोडणार नाहीत. त्यांच्या मनात एक व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे, ती म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात स्वत:चे नाव अजरामर राहील, अशी व्यवस्था करणे. ग्रीनलँड त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेकडे आले, तर निश्चितच त्यांच्या नावाची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही. आर्क्टिकचे बर्फ जसजसे वितळत जाईल आणि वाहतुकीसाठी अनुकूल वातावरण होईल, तेव्हा मात्र युरोपियन देश, अमेरिका एका बाजूला आणि रशिया व चीन दुसऱ्या बाजूला आमनेसामने येण्याची, त्यातून आर्क्टिकमध्ये लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान बदलामुळे बर्फ वितळत आहे आणि नवीन खनिज साठे, इंधन स्रोत आणि व्यापारी मार्ग खुले होत आहेत. त्यामुळे मोठ्या देशांमध्ये स्पर्धा वाढणार हे निश्चित. अलीकडच्या संशोधनानुसार, अत्यंत मौल्यवान अशा खनिजांचा प्रचंड साठा ग्रीनलँडमध्ये आहे. शिवाय, त्या ठिकाणी तेल आणि वायूंचे प्रचंड साठे दडलेले आहेत. अमेरिका ही संपत्ती स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक मानत असल्याने त्यांच्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ग्रीनलँडला अधिक स्वातंत्र्य हवे आहे. त्यांच्या राज्यघटनेनुसार ते स्वातंत्र्याचा निर्णय स्वत: घेऊ शकतात. अर्थातच असे स्वातंत्र्य टिकण्यासाठी त्यांना इतर देशांची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. इतक्या मोठ्या भूप्रदेशात फक्त ५५ हजार लोक राहतात. त्यांच्यासाठी हा भूप्रदेश सांभाळणे अवघड आहे. स्थानिक सरकार अधिक स्वायत्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नजीकच्या काळात ग्रीनलँड संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र होईल, अशी शक्यता वाटत नाही. दूरवरच्या अंतरामुळे भारत आज तरी प्रत्यक्षात आर्टिक प्रदेशात मोठ्या प्रमाणात उपस्थित नाही. पण, भारतही आर्क्टिकविषयक धोरण ठरवत आहे. भविष्यात ग्रीनलँडसारख्या भागांमध्ये भारताचीही वैज्ञानिक, आर्थिक उपस्थिती वाढू शकते. त्यासाठी भारताला अधिक सक्रियपणे या प्रदेशात आपले अस्तित्व दाखवणे आवश्यक आहे. निष्कर्ष ग्रीनलँड हे आता फक्त बर्फाचे बेट राहिलेले नाही. ते जागतिक शक्तींच्या राजकारणाचा, संरक्षण धोरणाचा आणि पर्यावरणीय मुद्द्यांचा केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळे येणाऱ्या दशकांमध्ये हे बेट जागतिक घडामोडींमध्ये निर्णायक भूमिका बजावेल, हे निश्चित. (संपर्कः dmulay58@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2025 4:49 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:नापास होण्याच्या भीतीने बनले अभिनेता; रघुवीर यादव यांनी घरातून पळून जाऊन गाठली होती नाटक कंपनी

प्रसिद्ध अभिनेते रघुवीर यादवजी आणि माझ्यामध्ये एका बाबतीत साम्य आहे. मुंबईत आल्यावर मी अन्नुभाई अर्थात अन्नू कपूर यांच्यासोबत नाटकांतून करिअरची सुरूवात केली आणि रघुवीरजींनीही अन्नूभाईंचे वडील मदनलाल कपूर यांच्या नाटक कंपनीतूनच कामाचा प्रारंभ केला. काही दिवसांपूर्वी अन्नूभाईंची बहीण सीमा कपूर यांच्या आत्मकथेचे प्रकाशन झाले. त्यावेळी रघुवीर भैयांनी काही किस्से ऐकवले. तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. रघुवीरजींना ॲक्टिंगची फारशी आवड नव्हती. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात यावे, हा नियतीचा फैसला असावा. या देशाला आणि जगाला एक अद्भुत कलाकार मिळावा, असे कदाचित तिला वाटत असावे. रघुवीरजींनी सांगितले की, आपल्या आजोबांनी त्यांच्या गावात मुलाच्या (म्हणजे रघुवीरजींच्या मामाच्या) स्मृती प्रीत्यर्थ लक्ष्मीनारायण यादव विद्यालय नावाची शाळा बांधली होती. रघुजीही तिथेच शिकत होते. त्यांना सायन्स शाखेत घातले होते, पण या विषयात त्यांना अजिबात रुचि नव्हती. बारावीचा निकाल यायच्या आदल्या दिवशी ते खूप तणावात होते. कारण आपण नक्की नापास होणार, हे त्यांना माहीत होते. मामाच्या नावाची शाळा असूनही भाचा नापास झाला, म्हणून घरी मारही बसणार होता. रघुवीर भैयांनी सांगत होते.. मी झाडाखाली बसून निकालाचा विचार करत होतो, तेवढ्यात नरेशकुमार सूरी नावाचा गावातील एक मुलगा तिथे आला. तो प्रोफेशनल पळपुटा होता. दर दोन-चार महिन्यांनी घरातून पळून जायचा. तो माझ्याजवळ आला आणि ‘कसला विचार करतो आहेस?’ असे विचारले. मी सांगितले की, उद्या निकाल आहे आणि मी नापास होणार, हे मला माहीत आहे. त्यामुळे काय करावे, काही कळत नाहीय. तो म्हणाला, घरातून पळून जाऊ.. आणि मग आम्ही दोघे पळून गेलो. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा रेल्वे बघितली होती. मी रेल्वेत बसलो. आम्ही ललितपूरला पोहोचलो. तिथे भटकत असताना भोपाळ नाटक कंपनीचा बोर्ड दिसला. तिथे कपूर साहब (मदनलाल कपूर) यांच्या कंपनीचे नाटक सुरू होते. नाटकाचे नाव होते- ‘नागिन’. दोघे जण आतमध्ये गेलो. आम्ही पाहिले की एक टकला माणूस हीरोची भूमिका करतो आहे आणि त्याच्या सोबत नागिणीची भूमिका करणारी एक सुंदर मुलगी नाचतेय. एका अजागळ, टकल्या माणसाबरोबर देखणी मुलगी नाचत असल्याचे पाहून मला खूप विचित्र वाटले. त्याचाच विचार करत करत आम्ही बस स्टँडवर आलो आणि तिथेच झोपलो. सकाळी सूरी त्याच्या आत्याच्या घरी घेऊन गेला. खाण्याचा कात विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आम्ही त्यांच्याकडे दोन-तीन दिवस राहिलो. मी एकेदिवशी छतावर झोपलो असताना मला तिथेच सोडून सूरी पुन्हा पळून गेला. मी पुन्हा भोपाळला नाटक कंपनीच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे किशन नावाचा एक मुलगा होता. या नाटक कंपनीच्या मालकाची भेट घालून दे, असे मी त्याला म्हणालो. तो मला आत घेऊन गेला. तिथे बाबूजी अर्थात कपूर साहेब बसले होते. त्यांच्या आजूबाजूला काही जण बसले होते. किशन बाबूजींच्या जवळ गेला आणि ‘याला तुम्हाला भेटायचे आहे,’ असे सांगितले. मी त्यांना म्हणालो की, मला तुमच्या कंपनीत ठेऊन घ्या.. ‘तुला काय येते?’ असे त्यांनी विचारले. मी म्हणालो, गाणी गातो.. त्यांनी मला काही गायला सांगितले. मग मी गझल ऐकवली.. बदली तेरी नजर तो नजारे बदल गए, ये चांदनी ये चांद सितारे बदल गए। लहरों से पूछ लीजिए साहिल भी है गवाह, कश्ती मेरी डुबोकर धारे बदल गए.. माझे गायन ऐकून बाबूजींना हसू आले. म्हणाले, तुम सुरीले तो हो, मगर तुम्हारा ‘तलफ़्फ़ुज’ बहुत खराब है.. मला ‘तलफ़्फ़ुज’चा अर्थ माहीत नव्हता. ते कुठल्या तरी तालाविषयी म्हणत असावेत, असे मला वाटले. मी म्हणालो, तबल्यासोबत गायलो, तर येईल व्यवस्थित.. त्यावर बाबूजी पुन्हा हसले आणि म्हणाले की, तबल्याने तलफ़्फ़ुज नीट होत नाही. तलफ़्फ़ुज म्हणजे उच्चार. तुझे उच्चार अशुद्ध आहेत. मी म्हणालो, तुम्ही मला भरती तर करुन घ्या, मी तलफ़्फ़ुज आणि उच्चार दोन्ही चांगले करतो. त्यांनी मला अडीच रुपये महिना पगारावर कंपनीत ठेऊन घेतले. त्यानंतर मला बाबूजींनी सोबत बसवून उर्दू बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकवले. त्यातून माझे ‘तलफ़्फ़ुज’ सुधारले. तिथूनच माझी ॲक्टिंगची सुरूवात झाली. बाबूजींनी तिथे मला इतके चांगले ट्रेनिंग दिले की, ॲक्टिंगमध्ये मी जे काही शिकलो आणि बनलो आहे, त्यात त्यांचा खूप मोठा हातभार आहे. या गोष्टीवरुन मला अल्ताफ हुसैन हाली यांचा एक शेर आठवतोय... फरिश्ते से बढ़ कर है इंसान बनना मगर इस में लगती है मेहनत जियादा। रघुजींचे आणखी एक टँलेन्ट इथे सांगितले पाहिजे. मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे. माझ्या ‘चेहरे’ या सिनेमातील त्यांचे पात्र बासरी वाजवणारे होते. मी कथावाचनासाठी त्यांना ऑफिसमध्ये बोलावले, तेव्हा ते दोन-तीन बासऱ्या घेऊन आले. त्यांनी त्या वाजवून दाखवल्यावर मी म्हणालो, ‘ही तर कमाल झाली! या बासऱ्या तुम्हाला कुठे मिळाल्या? बाजारात तर त्या मिळत नाहीत..’ त्यावर त्यांनी सांगितले की, मी स्वत:च त्या बनवल्या आहेत. माझा विश्वासच बसला नाही. दुसऱ्या दिवशी ते एक छोटा बांबू घेऊन आले, माझ्यासमोर बासरी बनवली आणि वाजवून दाखवली. रघुजींच्या बासरीचा आवाज ऐकल्यावर आमचे रेकॉर्डिस्ट ऑस्कर विजेते रसूल पूकुट्टी म्हणाले की, बॅकग्राउंड म्युझिकच्या वेळी वादकाला बासरी वाजवायला सांगू नका, रघुवीरजींच्या बासरीचा आवाजच ठेवा. तो खूप वेगळा आणि अनोखा आहे. या सिनेमात जो बासरीचा आवाज आहे, तो रघुवीरजींनी वाजवलेल्या बासरीचाच आहे. आज रघुवीरजींसाठी त्यांच्या ‘पीपली लाइव्ह’ सिनेमातील हे गाणे ऐका... सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2025 4:43 am

डायरीची पाने:रोजगारी बाया

शेतीत काम करणं ही लाज वाटण्याची गोष्ट नाही. त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. पण, तसं कुणाला आज वाटत नाही. त्यामुळं शेतीत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. परवा आमच्या जवळच्या नांदेड जिल्ह्यात रोजगारी बायांना शेतात घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला आणि सात जणींचा जागीच मृत्यू झाला. मालेगावजवळच्या शेतात सकाळी सात वाजता हा अपघात झाला. म्हणजे या बायकांना त्यांच्या गावावरून सकाळी किती वाजता निघावे लागले असेल? रोजगारासाठी त्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात का जावे लागले? त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नव्हता काय? त्या जात असलेल्या गावात रोजगारी बाया उपलब्ध नव्हत्या काय, या प्रश्नांसोबतच, माणसाचा जीव किती स्वस्त आणि शेती करणं किती महाग झालंय, असा परस्परविरोधी प्रश्नही या घटनेतून निर्माण झालाय. रोजगारी बायांना असे ट्रॅक्टर किंवा ऑटोरिक्षाने शेतात न्यावे आणि घरी नेऊन सोडावे लागते. जवळपास रोजगारी बाया मिळत नाहीत आणि दूरच्या बायांचा वेळ वाचवायचा असेल, तर असे वाहनाने आणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रोजंदारीने काम करणारे बहुतांश लोक आता गावं सोडून शहरातल्या झोपडपट्ट्यांतून स्थायिक झाले आहेत. तिथं शहरी जीवन जगायला मिळतं, झोपडपट्टीत अनेक सवलती मिळतात, समूहाने एकत्रित राहता येतं, गावातल्या इतकी जातीयवादाची झळ इथं पोहोचत नाही.. अशा अनेक कारणांमुळं गावोगावच्या कष्टकऱ्यांनी शहरात स्थलांतर केलं आणि त्यातून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ठीक आहे. शेतमजूर शेतीतून बाहेर पडला आहे. पण, शेतकरी तर शेतीतच आहे ना? तो तरी कुठं शेतीत काम करतो आहे? मजुरांना शेतीत काम करायचा कंटाळा येतोय, तसाच तो शेतमालकांनाही येतो आहे. स्वतःच्या शेतात काम करण्याची लाज वाटत असल्याने हा प्रश्न जास्त गंभीर झाला आहे. शेतकऱ्याच्या घरातली सगळी माणसं शेतात राबू लागली, तर कदाचित त्यांना शेतमजुराची गरज पडत नाही. आमच्या लहानपणी घरातली सगळी माणसं शेतात राबायची. शाळा संपल्यावर सकाळ-संध्याकाळ आम्हीही शेतात कामं करायचो. तुम्ही शेतात गेलात की शेत तुम्हाला आपोआपच काम सांगतं, असं जुने लोक म्हणायचे. पण, आजकाल कुणी शेतात जायलाच राजी नाही. त्यामुळं त्यांना शेतातली काम काय माहीत असणार? मग निव्वळ शेतमजुरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पूर्वी ज्यांच्या घरी शेती आहे, त्यांच्या शेतातली काम संपली की, त्या घरच्या बाया आणि माणसं दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात कामाला जायची. अर्थात, रोजगार म्हणूनच ते कामाला जायचे. कधी सावड म्हणून एकमेकांच्या शेतात मदत करू लागायला जायचे. काडीकाडी अन् पैसापैसा जमवावा, असं तेव्हा प्रत्येकालाच वाटायचं. घरातल्या सगळ्या माणसांनी असं केलं तर सगळ्या घराला आधार मिळतो, घर पुढं येतं, असं मानलं जायचं. काही घरातली माणसं अर्धपोटी राबताना मी पाहिली आहेत. त्या माणसांनी राबराबून थोडाफार पैसा मागं टाकून पुष्कळ शेती घेतल्याचंही मी पाहिलं आहे. आणि शेतीचा एक एक तुकडा विकून, ऐशआरामात जगणारी आणि एक दिवस आत्महत्या करणारी माणसंही पाहिली आहेत. शेतीत काम करणं ही खरं तर लाज वाटण्याची गोष्ट नाही. त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. पण, तसं कुणाला आज वाटत नाही. त्यामुळं शेतीत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ मजुरांनाच नव्हे, तर शेतकऱ्यालाही शेतीतून बाहेर पडायचं आहे. शेती कुणालाच नकोशी झाली आहे. पण, ते एक-दुसऱ्यावर निमित्त लोटत आहेत. शेती स्वत:च्या मालकीची नसल्यामुळं मजुरांना ती कधीही सोडून देता येते. पण, शेतकऱ्याला तशी ती चटकन् सोडून दुसरा पर्याय शोधता येत नाही. याबाबतीत मजूर आता भाग्यवान आहेत. पूर्वी बिचारे काहीच पर्याय नसल्यामुळं गुलामासारखे राबायचे, आता त्यांना त्याची गरज उरलेली नाही. लहानपणी मी पाहिलं आहे की, आमच्या गावात, शेतात रोजानं काम करणाऱ्या बायांचे जत्थे असायचे. त्यातली एक जण त्यांची प्रमुख असायची. ती सगळा व्यवहार ठरवायची. गुत्तं घ्यायचं असेल, तर ते कसं घ्यायचं, ते तीच ठरवायची. रोजानं जायचं असेल, तर किती बाया हव्यात, कामाचं स्वरूप काय, तेही तीच ठरवायची. तिच्यावर इतर सगळ्या बाया विश्वास टाकायच्या. शेतमालकालाही प्रत्येक बाईला भेटायची, बोलायची गरज पडत नसे. ती प्रमुख असलेली बाई भेटली आणि तिला बोललं, तिनं शब्द दिला की काम मार्गी लागायचं. यामध्ये सर्व जाती-जमातीच्या बाया असत. त्यांचा जत्था एकदा शेतात शिरला की शेतकरी बिनघोर होत असे. कारण तिथल्या कामाची सगळी जबाबदारी त्या घेत असत आणि अंगमेहनतीनं काम पूर्ण करत. अलीकडे समाजमाध्यमांवर मनीषा हजारे यांच्या रील खूप लोक पाहतात. त्या ऊसतोड कामगार आहेत. तोडणीचा हंगाम संपला की, आपल्या गावाकडं येऊन त्या शेतात मजुरी करतात. तिथले व्हिडिओ टाकतात. त्यांचे पती, दोन मुलं, एक मुलगीही शेतात काम करते. दोन मुलांनी शिक्षण सोडून आई-वडिलांना मदत म्हणून शेतात काम करायला सुरूवात केली. त्यांना शिक्षणाची इच्छाही नव्हती. मुलगी शिकते आहे. तरीही सगळे शेतात काम करू लागतात. त्यांनी दोन बैलजोड्या घेतल्या आहेत. ज्या शेतकऱ्याला शेतात ट्रॅक्टर लावणं परवडत नाही, ते या बैलजोडीने मशागत करून घेतात. त्या बैलांचा रोजगारही त्यांना मिळतो. ही माणसं कुणाविषयी तक्रार करत नाहीत. खूप मेहनत करतात अन् चांगलंचुंगलं खाऊन आनंदानं जगतात. त्या सगळ्या चित्रफिती समाजमाध्यमावर टाकतात. जगण्याची खरी कला त्यांना समजली आहे. लोकांना ते आवडतं. त्याचा हेवा वाटतो. पण, तसं वागायला, जगायला जमत नाही. खरं तर सगळ्यांनी तशी अंगमेहनत करायला सुरूवात केली, तर शेतीतले प्रश्न मजुरांपुरते तरी नक्कीच संपतील. बाकी समाज आणि सरकारकडून शेतमालाला किफायतशीर भावाची अपेक्षा करता येत नाही. कारण शेतमाल ही जीवनावश्यक गोष्ट आहे, त्यामुळं ती स्वस्तच राहिली पाहिजे, असं सर्व सरकारांना, समाजसेवकांना आणि लोकांनाही वाटतं. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्वस्तात मिळाव्यात, असं मात्र कुणालाही वाटत नाही.शेतात रोजगारानं काम करणाऱ्या बायकांचे चित्रण करणाऱ्या कितीतरी कविता, कथा, कादंबऱ्या मागच्या पिढीतल्या ग्रामीण साहित्यिकांनी लिहिल्या आहेत. आता कुणी असं काही लिहू म्हटलं, तर त्यांना विषयच मिळणार नाही. कारण रोजगारी बाया मिळणे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कथा लिहायची असेल, तर रोजगारी बायांवर नव्हे, तर रोजगारी बाया मिळत नाहीत, या प्रश्नावर लिहावी लागेल. अशा बिकट परिस्थितीत, ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात बायांचा जागीच मृत्यू होण्याच्या घटनेवरही कथा-कविता लिहिल्या जातील. खरं तर आता शेतीचाच विहिरीत पडून मृत्यू व्हायची वेळ आली आहे... (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2025 4:40 am

‘एआय’च्या विश्वात...:प्रॉम्प्ट ‘एआय’कडून नेमकं काम करून घेण्याचा मंत्र

आपण एखादं काम सांगितलं आणि ते तसंच झालं की कसलं भारी वाटतं ना? आता काळ नव्या तंत्रज्ञानाचा आहे. आपल्याला हवं ते फक्त व्यक्त करायचं, तंत्रज्ञान ती गोष्ट पूर्ण करणारंच! मी काही काल्पनिक, जादूई किंवा अतिरंजित गोष्ट अजिबात सांगत नाहीय. आज जनरेटिव्ह ‘एआय’मुळं आणि विशेषत: त्याला दिल्या जाणाऱ्या ‘प्रॉम्प्ट’मुळं हे सहजशक्य झालं आहे. प्रॉम्प्ट म्हणजे आपण जे एआय टूल वापरतो, त्याला उद्युक्त करून आपल्याला अभिप्रेत अशा गोष्टी बनवून घेणे. एआय टूल वापरताना हे प्रॉम्प्ट फार महत्त्वाचे ठरतात. मजकुराच्या अथांग सागरातून आपल्याला काय हवे, ते निवडणे / बनवून घेण्याच्या या प्रक्रियेत आपल्याला काय हवे, ते एआयला स्पष्टपणे सांगणे म्हणजे प्रॉम्प्ट. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे जनरेटिव्ह एआयमुळे तुम्ही जे मागाल ते मिळेल अन् जेवढं मागाल तेवढंच मिळेल! जशी प्रॉम्प्ट, तसे काम ही गोष्ट एका उदाहरणाने समजून घेऊ... समजा विद्यार्थ्यांना ‘जी - २० परिषदेमुळे भारताच्या अर्थकारणावर झालेला परिणाम’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला आहे. मग एक विद्यार्थी चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट देतो.. ‘राइट आर्टिकल ऑन जी- २० इन इंडिया.’ आता त्याला भारतात झालेल्या ‘जी - २०’ परिषदेबद्दल सविस्तर माहिती मिळेल. ती कधी, कुठे झाली? त्यात कशावर चर्चा झाली? वगैरे.. पण, या परिषदेचा अर्थकारणावर काय परिणाम झाला, ही माहिती त्याने मागितलीच नाही, म्हणून त्याला ती मिळणार नाही. दुसरा विद्यार्थी प्रॉम्प्ट देतो.. ‘जनरेट आर्टिकल ऑन कन्क्लूजन ऑफ “जी - २०’ इन इंडिया विथ इकॉनॉमी.’ या प्रॉम्प्टमुळे त्याला परिषदेचे प्रमुख निष्कर्ष दिसतील, अर्थकारणावर काय परिणाम झाला, याबद्दलही माहिती मिळेल. या विद्यार्थ्याने आपल्या प्रॉम्प्टमध्ये, तो कोण आहे? त्याला कशासाठी ही माहिती हवी आहे? अशा गोष्टी घेतल्या असत्या, तर त्याला अधिक नेमकी, समर्पक माहिती मिळेल. आपण एखाद्याला काही काम सांगतो, तेव्हा त्याची एकूण बौद्धिक पातळी बघून हे काम कसं सांगायचं, हे ठरवतो. हीच गत ‘एआय’ची देखील आहे. प्रॉम्प्ट हे उद्याचे कौशल्य ‘गुगल’सारखे सर्च इंजिन तुम्ही अनेक वर्ष वापरत आला आहात. दिवसभरात सामान्य माणूस १३ - १४ वेळा विविध कारणांसाठी गुगल वापरतो. त्यामुळं आपल्याला काय आवडतं किंवा आपण एखादी गोष्ट विचारतो, तेव्हा त्यामागचा मथितार्थ काय असतो, हे ‘गुगल’ला आता लगेच कळतं. पण, ‘एआय’ साधनांबद्दल असं घडायला काही वेळ लागेल. काही काळाने आपल्याला नेमकं काय हवं आहे, हे ‘एआय’लाही कळू लागेल. अशा पद्धतीने ‘एआय’ला काम सांगणं, ही कला बनली आहे. उद्याच्या काळात या कलेचे एका कौशल्यात रुपांतर होईल आणि ते फार मोलाचे ठरेल. आपण एखाद्या लहान मुलाला काही काम सांगतो, तेव्हा ते अनेक छोट्या कामांमध्ये विभागतो. सुरूवातीला सराव म्हणून प्रॉम्प्टसाठी ही पद्धत वापरून बघायला काहीच हरकत नाही. नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंग वरील दोन मुद्द्यांवरून कदाचित हा अंदाज आला असेल की, जनरेटिव्ह एआयला काहीबाही सांगणं अन् अर्थपूर्ण प्रॉम्प्ट देणं यात जमीन-अस्मानचा फरक आहे. नव्या युगात जसे नोकऱ्यांचे रूप बदलणार आहे, तसेच प्रत्येकाला लागणारी कौशल्येही बदलणार आहेत. प्रॉम्प्ट देण्याचे कौशल्य ही त्यातलेच एक. त्यातच आता नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंगमुळे (NLP) बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एखादी गोष्ट अभिव्यक्त करताना, त्यातील आशय तसाच टिकवून ठेवून ती सांगणं काहींना अवघड जातं. ‘एनएलपी’मुळं घडलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंगची (NLU) सुरूवात! यामुळे येत्या काळात एका भाषेतून प्रॉम्प्ट देऊन दुसऱ्या भाषेत मजकूर अथवा अभिप्रेषित गोष्ट घडू शकेल. (संपर्कः ameyp7@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2025 4:36 am

बुकमार्क:जेव्हा एक डॉक्टरच ‘इच्छामरण’ मागतात...

आयुष्यात कोणत्याही क्षणी बसलेली घडी विस्कटू शकते, तरीही काही प्रसंग निभावून न्यावे लागतात. आजाराच्या नेमक्या निदानाचा अभाव आणि परिणामी चुकीच्या उपचारांमुळे प्राण गमावावे लागलेल्या आपल्या डॉक्टर पतीच्या संघर्षाचा असाच कालपट संगीता भरत लोटे यांनी ‘इच्छामरण - एक सत्यकथा’ या आत्मकथनातून समोर आणला आहे. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानली जाते. मात्र, स्वत: निष्णात डॉक्टर असलेल्या (स्व.) भारत लोटे यांच्याच वाट्याला याच्या अगदी विपरीत अनुभव आला. या कुटुंबातील सदस्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जे असामान्य धैर्य, अदम्य साहस दाखवले त्याला खरोखरच तोड नाही. सर्वसामान्य कुटुंबाच्या बाबतीत घडलेली ही एक सत्यकथा आहे. विवाहानंतर कोकणातील ओणी या लहानशा गावात डॉ. भारत यांच्यासोबत लेखिकेचा संसार सुरू होतो. स्वत:च्या आयुष्याबद्दल दोघेही अत्यंत उद्दात्त आणि समंजस दृष्टिकोन बाळगून असतात. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना कित्येकदा अपुऱ्या संसाधानांमुळे डॉ. भारत यांना आहे त्या परिस्थितीत उपचार करावे लागत. मात्र तरीही रुग्णाला जीवनदान देण्याचा एकमेव ध्यास उराशी बाळगत ते सेवा देत राहतात. पावसाळ्यात वाट निसरडी होते, रुग्णाला डोंगरावरून खाली उतरवणे अशक्य होते, अशा परिस्थितीतही ते स्वत: रुग्णाच्या घरी जाऊन उपचार करत. एव्हाना या दाम्पत्याच्या संसारवेलीवर जय आणि प्रतीक ही गोंडस फुले उमलतात. काही वर्षांपूर्वी दुरवस्थेत असलेल्या या गावातील आरोग्य केंद्राला डॉ. भारत लोटे यांच्यामुळे नवसंजीवनी मिळते. रुग्ण मोठ्या विश्वासाने तिथे येत आणि उपचार घेऊन जात. डॉक्टरांचे काम इतके चोख की, रुग्णालयातील औषधे, स्वच्छता, आर्थिक व्यवहार नेटकेपणे पाहतानाच, लसीकरणासह सरकारच्या आरोग्य योजना ते समरसून लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या या समर्पित सेवाकार्याची दखल पंचायत राज समिती घेते आणि राज्य शासनाचा २००५-०६ चा ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ त्यांना जाहीर होतो. त्या अगोदर त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा डॉ. र. धों. कर्वे पुरस्कारही मिळालेला असतो. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ. भारत यांनी मोठ्या कष्टाने ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केलेले असते. त्यामुळे समाजव्यवस्थेत माणसाला माणूस म्हणून महत्त्वाचे स्थान आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. ‘निष्काम कर्मयोग’ हीच खरे तर त्यांच्या जगण्याची प्रेरणा! दिवसामागून दिवस जात असतात. लेखिका वर्णन करते त्याप्रमाणे... कधी सुखाचे पांघरूण, तर कधी दु:खाची झालर घेऊन संसाराची २५ वर्षे पूर्ण होतात. अशातच अचानक वीज कोसळावी त्याप्रमाणे एक दिवस पोटदुखीचं निमित्त होतं आणि डॉ. भारत यांना स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासल्याचे निदान होते. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडते. लेखिका पतीच्या उपचारांसाठी पैशांची कशीबशी सोय करते. पण, कोणतेही संकट एकटे येत नाही. शस्त्रक्रिया पार पडते खरी, पण डॉक्टरांच्या प्रकृतीत म्हणावे तसे सकारात्मक बदल दिसत नाहीत. नक्की काय झाले असावे, याचा अंदाज घराच्या मंडळींनाही येत नाही. डॉक्टरांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ‘गरिबांचा डॉक्टर’ म्हणून ज्यांनी शेकडो रुग्णांना आजारातून बाहेर काढले, त्या डॉक्टरांच्याच आजाराचे नेमके निदान होत नव्हते. पुढच्या ऑपरेशननंतर ते बरे होतील, अशी शाश्वती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर देत असतात. कोणताही रुग्ण एखाद्या मोठ्या रुग्णालयात खूप विश्वासाने भरती होत असतो. “आपण निश्चित बरे होऊ” ही आशा त्यांना तिथे घेऊन येते आणि ती त्याला जगवतही असते. इथे तर एक डॉक्टरच रुग्णशय्येवर होते. तरीही हे असे काय झाले? तीन ऑपरेशन होऊनही ते बरे का होऊ शकले नाहीत? नेमके कुठे आणि काय चुकले? अत्यवस्थ, असहाय अवस्थेतील या डॉक्टरांनाच दोन-अडीच महिन्यांनंतर ‘इच्छामरण’ का मागावे लागले? रुग्णसेवेसाठी गौरवलेल्या डॉक्टरांची ही स्थिती असेल, तर सामान्यांचे काय? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ उठलेला असतानाच डॉ. भारत जगाचा निरोप घेतात... संगीता आणि दोन्ही मुलांसाठी हा काळ प्रचंड जिकीरीचा होता. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल, याची कल्पनाही करवत नाही. वेळेत आणि योग्य उपचार किती महत्त्वाचे असतात, हे या पुस्तकातून स्पष्ट होतेच; पण ते न मिळाल्याने इच्छामरण मागावे लागणे, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. पती निधनाच्या मोठ्या धक्क्यातून सावरत लेखिकेने खूप धैर्याने ही वास्तवकथा वाचकांसमोर उभी केली आहे. मदतीबाबत सरकारने दाखवलेली अनास्था.. संकटकाळी विरुद्ध दिशेने फिरणारे जवळच्या माणसांचे खरे चेहरे.. वैद्यकीय खर्चाचा न पेलवणारा भार आणि त्या बदल्यात अनुभवलेली उपचारातील हलगर्जी... परिस्थितीपुढे हतबद्ध होऊन आकाशाकडे खिन्नपणे पाहणाऱ्या लेखिकेच्या डोळ्यांत यापैकी नक्की काय असेल..? कदाचित या सगळ्याच गोष्टींचा एक अक्राळविक्राळ कोलाज असावा.. कधीही धूसर न होणारा... पुस्तकाचे नाव : इच्छामरण - एक सत्यकथालेखिका : संगीता भारत लोटेप्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाउसपाने : २८६, किंमत : रु. ३५० (संपर्कः swapnilkashi566@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2025 4:32 am

आंबेडकर जयंती विशेष:तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हाला लाभला, तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला; जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराजांमधील ऋणानुबंध...!

'फुले-शाहू-आंबेडकर' ही त्रयी म्हणजे भारतातील सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे तीन महान स्तंभ आहेत. यामधील शाहू आणि आंबेडकर या द्वयींमधील मैत्री स्नेह आणि समतेचा इतिहास अजरामर आहे. माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारलेल्या अस्पृश्य समाजाला हक्क मिळवून देणे, ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणे, अस्पृश्यता निवारण करणे ही या दोघांच्या कार्यामध्ये असलेली समानता. आज डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्यातील ऋणानुबंध... 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' असे आवाहन डॉ. बाबासाहेबांनी केले. त्यामुळे दलित आणि वंचित वर्ग अन्यायाविरुद्ध पेटून उठला. बाबासाहेब महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत होते. शाहू महाराज नेहमीच त्यांचे पाठीराखे राहिले. शाहू महाराजांना नेहमी वाटे की, अस्पृश्य समाजाने स्वावलंबी व्हावे. आपल्या जातीचे पुढारी निवडावेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करावी. ते नेहमी जातीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले. अशातच भीमराव आंबेडकर नावाचा तरुण मुलगा परदेशात जाऊन, इतक्या उच्च पदव्या प्राप्त करून आला. ही बातमी समजतात महाराजांना विलक्षण आनंद झाला. शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेबांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. आंबेडकरांचा पत्ता मिळताच, हा कोल्हापूर संस्थानाचा राजा कोणत्याही मानापमानाचा विचार न करता, त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईमधील परळ चाळीमध्ये गेला. शाहू महाराजांनी आंबेडकरांना मिठी मारली आणि म्हणाले, ‘आता माझी काळजी दूर झाली, अस्पृश्यांना पढारी मिळाला. स्नेहाचे नाते... डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यात कमालीचा स्नेह होता. मैत्री आणि आपुलकी कशी असावी, याचे ते उत्तम उदाहरण होते. जातिव्यवस्थेविरुद्ध लढा देणारा आणि डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाला आकार देणारा हा राजा होताच. सोबतच त्यांनी महिला आणि मुलांच्या हक्कांचेही समर्थक केले. त्यांच्या सुधारणांमुळे वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या पुरातन संस्थांमध्ये अनेक बदल झाले. महाराजांच्यातील ही गोष्ट आंबडकारांना खूप आवडली. शाहू महाराजांचेच नाही तर संपूर्ण करवीर संस्थानांचे आंबेडकरांसोबत असणारे ऋणानुबंध वेगळे होते. हे ऋणानुबंध केवळ सामाजिक नव्हे, तर जिव्हाळ्याचे होते. महाराजांनी रमाबाईंना 'बहीण' म्हणून माहेरपणासाठी नेण्याची तयारी दाखविणे किंवा महाराजांचे पुत्र राजाराम महाराज व कन्या आक्कासाहेब यांनी बाबासाहेबांना 'मामा' म्हणून संबोधणे. यावरून शाहू महाराज व बाबासाहेब यांच्यामधील नाते कसे होते, ते समजते. यांची भेट खूप कमी वेळा झाली. पण बाबासाहेब इंग्लंडला जरी असले, तरी देखील यांच्यातील जिव्हाळ्याचे पत्रव्यवहार राहिले. शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुरू केले. याच विचारसरणीचा पुढे डॉ. आंबेडकरांनी भारताच्या संविधानात समावेश केला. महाराजांकडून आर्थिक मदत... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील उच्चशिक्षणासह जनजागृतीच्या कार्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आर्थिक पाठबळ दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भेटीत आपण मूकनायक हे वृत्तपत्र चालवत असल्याचे सांगितले. पण काही आर्थिक अडचणींमुळे मूकनायक हा मूक झालाय याची खंत व्यक्त केली. त्यानंतर हा बंद पडलेले मूकनायक पुन्हा सुरू झाले. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी अडीच हजार रुपयांची मदत केली. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षणासाठी लंडनला गेले, तेव्हा त्यांनी शाहू महाराजांना पत्र लिहले. त्यांनी त्या पत्रातून शिक्षणासाठी 200 पौंडची आर्थिक मदत मागितली आणि शाहू महाराजांनी ती त्वरित पाठवली. जातीय लढाईत शिक्षणाच महत्त्व माहित असलेल्या शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण खूपच महत्त्वाचे वाटत होते. त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये, यासाठी महाराज नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यानंतर 26 जानेवारी 1922 ला बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पुन्हा पत्र पाठवले. मला भारतात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी महाराजांनी 750 रुपयांची मदत केल्यास मी त्यांचा ऋणी राहीन, असे कळले. या पत्रानंतर लगेचच महाराजांनी 750 रुपयाची मनीऑर्डर पाठवण्याची व्यवस्था केली. बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणात कोणत्या ही प्रकारचा अडथळा येऊ नेऊ ही जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. बाबासाहेबांच्या जडणघडणीत महाराजांचे योगदान हे खूप मोलाचे होते. माणगाव परिषदेची तयारी... अस्पृश्य समाजात शिकून तयार झालेल्या एवढ्या मोठ्या विद्वानास कोल्हापुरात नेऊन, त्यांच्या हस्ते आपल्या संस्थानातील अस्पृश्यांची सुधारणा व उद्धार करावा असे शाहू महाराजांना वाटले. मात्र, सुरुवातीला आंबेडकरांनी यामध्ये कणभर ही रुची दाखवली नाही. डॉ. आंबेडकर म्हणाले की, 'आपल्यासाठी कुणी काही करत नाही. सर्वजण सारखे आहेत.' तेव्हा बहिष्कृत जातीतील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी दत्तोबा पवार यांनी आंबेडकरांना सांगितले की, महाराज त्यातले नाहीत. त्यांनी आपल्या संस्थानात अस्पृश्यांबद्दल कळवळ्याने काम चालू केले आहे.' त्यानंतर आंबेडकरांनी कोल्हापूर भेटीचे आमंत्रण स्वीकारले. डॉ. आंबेडकर कोल्हापूरस आले, तेव्हा महाराजांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे स्वागत केले. त्यांची आपल्या खास गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची सोय केली. या भेटीत दोघांमध्ये अस्पृश्यांच्या सुधारणांवर चर्चा झाली. त्यांनी एक सभा घेण्याचे ठरवले. या भेटीनंतर डॉ. आंबेडकर हे दोन दिवस कोल्हापुरात राहून मुंबईत परतले. त्यानंतर दत्तोबा पवारांनी पुढाकार घेऊन शाहू महाराज व कोल्हापुरातील अस्पृश्यांचे पुढारी डॉक्टर रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे या सर्वांशी चर्चा केली. त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर डॉ.आंबेडकरांशी पत्रव्यवहार करून 21 मार्च 1920 या दिवशी माणगावमध्ये अस्पृश्यांची पहिली सभा घेण्याचे ठरले. तशी पत्रके छापली. अन् पुढारी गवसला... जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देणारा, डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाला आकार देणारा राजा. ते महिला आणि मुलांच्या हक्कांचे समर्थक होते. त्यांच्या सुधारणांमुळे वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या पुरातन संस्थांमध्ये अनेक बदल झाले. शाहू महाराजांमधील ही गोष्ट आंबेडकरांना खूप आवडली. शाहू महाराजांचेच नाही तर संपूर्ण करवीर संस्थानांचे आंबेडकरांसोबत असणारे ऋणानुबंध वेगळे होते. अस्पृश्य समाजात शिकून तयार झालेल्या एवढ्या मोठ्या विद्वानास कोल्हापुरात आणावे. त्यांच्या हस्ते आपल्या संस्थानातील अस्पृश्यांची सुधारणा व उद्धार करावे, असे शाहू महाराजांना वाटले. त्यानुसार ही अस्पृश्य परिषद पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक काही ठराव प्रत्येक परिषदेत घेत असत. ठराव म्हणजे तत्कालीन समूहाचे लोकमत, असाच त्याचा अर्थ होता आणि सर्वांसमक्ष त्या ठरावाच्या मागण्यांना लोकाश्रय मिळविण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होत असत. त्यामुळे माणगाव परिषदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याने व कुशल मार्गदर्शनाखाली एकूण पंधरा ठराव घेतलेले गेले. या ठरावापैकी पहिले तीन ठराव हे तात्कालीक व औपचारिक स्वरूपाचे होते. ही परिषद ऐतिहासिकदृष्ट्या अंत्यत महत्त्वाची होती. माणगाव परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. माणगाव परिषदेच्या पहिल्या दिवशी शाहूंनी त्यांच्या रांगड्या भाषेत 'आता तुम्हाला पुढारी गवसला आहे. दुसऱ्या पुढाऱ्याच्या नादाला लागू नका. आता हाच पुढारी तुमचा उद्धार करणार आहे. सगळ्या भारतातील अस्पृशांचा हा पुढारी होणार आहे यात तीळमात्र शंका नाही.' असे सांगितले. दलित समाजाला डॉ. आंबेडकर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाल्याचे राजर्षी शाहूंनी जाहीर केले. माणगाव परिषदेत शाहूमहाराज म्हणाले 'आंबेडकर हे 'मूकनायक' पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातीचा परामर्ष घेतात. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.' माणगाव ची परिषद आंबेडकरांच्या उपस्थितीमुळे समृद्ध झाली. अस्पृश्यांना तिच्यामुळे प्रेरणा मिळाली व शाहूंनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर भारताचे फार मोठे नेते बनले. स्पृश्य-अस्पृश्यांच्या शाळा एकत्र... दलितांच्या हक्कासाठी माणगाव परिषदेत अनेक ठराव मंजूर केले गेले. यातील पहिले तीन ठराव हे तात्कालिक व औपचारिक स्वरूपाचे होते. ठराव क्रमांक चार बहिष्कृत लोकांच्या मानवी हक्कासाठी होता. सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा तसेच लायसन्स खाली असलेल्या करमणुकीच्या जागा, भोजनगृह, वाहने इत्यादी सार्वजनिक सोयींचा उपभोग घेण्याचा त्यांना हक्क आहे. त्याबरोबरच गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळण्याचा हक्क आहे. ठराव क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे शिक्षणासंबंधी होते. याठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील अस्पृश्य वर्गातील एकमेव उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते म्हणून ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदाची जाहीरपणे वाच्यता करण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी शिक्षण हीच परिवर्तनाची गुरूकिल्ली आहे, हे माणगावच्या सभेतून स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षण मुलामुलींना कोणताही भेदभाव न करता मिळावे, बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून त्याच वर्गातील इन्स्पेक्टर नेमावेत, अस्पृश्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, अशा मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. माणगाव परिषदेतला 9 वा ठराव हा महार वतनदारांना होत असलेला त्रासाचा होता. त्यामध्ये महार वतनदारांना पड वगैरे अगदी गलिच्छ कामे करावी लागत. त्यामुळे त्यांच्या वतनदारीवर कमीपणाची छटा उमटली आहे. वतनी जमीन वतनदारांना पिढ्यानपिढा विभागातून जात असल्यामुळे जमिनीचे इतके बारीक तुकडे झालेले आहेत की , दर एक महार वतनदारास पुरेशी पैदास होत नसल्यामुळे त्याची अगदी कंगाल स्थिती होत आहे, तर या परिषदेत यामुळे वतन पद्धतीत फेरफार करणे अगदी जरुरी झाले आहे, असे या परिषदेचे ठाम मत होते. महारकी वतन सर्व महार लोकात विभागून सर्वांनी दारिद्र्य व कंगाल राहण्यापेक्षा ते वतन थोड्या लोकात विभागून त्यांची स्थिती मानास्पद व सुखावह करावे, असा ठराव करण्यात आला. ठराव क्रमांक 10 हा मेलेल्या जनावरांचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे, असे कायद्याने मानले जावे हा होता. ठराव क्रमांक 11 तलाठ्यांच्या जाग्यांवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात, अशी या परिषदेची मागणी होती. ठराव क्रमांक 12 हा बहिष्कृत वर्गाचा राजकीय किंवा सामाजिक हितसंचय यावर होता. बहिष्कृत संस्थांचे आणि व्यक्तींचे उपाय या बहिष्कृत वर्गात सर्वस्वी मान्य होतात, असे सरकारने समजू नये असे या परिषदेचे आग्रहाचे सांगणे होते. ठराव क्रमांक 13, 14, 15 हे अधिकाऱ्यांनी या परिषदेच्या ठरावाला घेऊन कोणती कामे करावीत यावर होते. 'लोकमान्य 'ही पदवी दिली... डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील पत्रे अभ्यासूंनी जरूर वाचावीत. या पत्रव्यवहारात राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना 'लोकमान्य' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याकाळी लोकमान्य ही पदवी फक्त बाळ गंगाधर टिळक यांना होती. शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीची पारख काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी होती, याची प्रचिती अस्पृश्य समाजाच्या परिषदेच्या भाषणातून येते. शाहू महाराज बाबासाहेबांच्या प्रतिभेचा गौरव करताना म्हणतात, 'लोकहो तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. इतकंच नव्हे, तर एक वेळ अशी येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे.' पुढे जाऊन बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वात ओळख बनवली. दलितांचा स्वतंत्र राजकीय आवाज निर्माण केला. अस्पृश्यता निर्मूलणासाठी लढा दिला. दलित समाजातील तरुणांना शिक्षणासाठी प्रेरित केले. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्व भारतीयांना समान हक्क मिळवून दिले आणि शाहूनी म्हटल्या प्रमाणे ते त्यांचे पुढारी देखील बनले.

दिव्यमराठी भास्कर 14 Apr 2025 5:36 pm

कबीररंग:पाडगावकरांच्या ‘शब्द’कळेने तोलले कबीर-‘सब्दां’चे मोल!

मंगेश पाडगावकर हे नाव मराठी मुलुखातील कवितेच्या रसिकांना आत्मीय आहे. त्यांच्या कवितेतील कित्येक ओळी शाळा - कॉलेजात मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सुभाषितासारख्या सांगितल्या जातात. वृत्तांची उदाहरणं देताना पाडगावकरांच्या कविता व्याकरण विभागासाठी विचारात घेतल्या जातात. मराठी भाषेविषयी, शब्दांविषयी एक प्रकारची उत्कट संवेदनक्षमता हीच प्रेरणा होय, असं पाडगावकर मानायचे. कवितेच्या कलात्मक आकृतीविषयी ते खूप सजग असत. शब्दांवर प्रेम करत, शब्दांचा आनंद घेत कविता जीवनाला सामोरी जायला हवी, भाषेच्या नवनव्या सृजनशक्ती तिनं शोधायला हव्यात, अशी त्यांची दृष्टी होती. त्यांनी सहा दशकं आपलं कविता लेखन अखंडपणे चालू ठेवलं. कविता लिहीत असताना त्यांनी कधीच विचारवंताची, तत्त्वज्ञाची किंवा समीक्षकाची भूमिका घेतली नाही. पाडगावकर हे अबोलपणे सकाळची तरल उन्हे अंगावर झेलणाऱ्या वाटेवरच्या झाडासारखे होते. जगण्याच्या आतलं सूक्ष्म जगणं जगणारे एक संवेदनशील कवी होते. आनंदाचा स्त्रोत शोधणाऱ्या आणि तो दिसल्यावर आत्मरत होणाऱ्या पाडगावकरांना आचार्य काकासाहेब कालेलकर एकदा म्हणाले, ‘तुम्ही मीराबाईंच्या गीतांचा समवृत्त अनुवाद केला, त्याला मी प्रस्तावना लिहिली आहे. आता तुम्ही कबीरांच्या काव्याचा असाच समवृत्त अनुवाद करावा, अशी माझी इच्छा आहे.’ तब्बल तीस वर्षांनी पाडगावकरांनी ते मनावर घेतलं. १९९५ हे संपूर्ण वर्ष त्यांनी कबीरांच्या अनुवादासाठी वेचलं. खरं माणूसपण म्हणजे काय? माणूस दु:खी होतो म्हणजे काय? तो मोहात पडतो म्हणजे काय? ज्या यशाच्या मागे तो छाती फुटेपर्यंत धावत असतो, त्या यशाचा अर्थ काय? माणूस एकाकी का होतो? हे सारं जाणून घेण्यासाठी कवितागत ‘मी’ आणि सत्यनिष्ठ ‘मी’ म्हणून पाडगावकरांना कबीर खूप जवळचे वाटले. व्यक्तित्व, कवित्व आणि साधुत्व या तिन्ही गोष्टी त्यांना कबीरांमध्ये दिसल्या. पाडगावकर कबीरांच्या काही दोह्यांचा समवृत्त अनुवाद कसा करतात, ते पाहू... सब्द बराबर धन नहीं जो कोइ जानै बोल,हीरा तो दामौ मिलै सब्दहिं मोल न तोल। ​शब्दाऐसे धन नसे, ज्ञानाचे जर बोल,बाजारात हिरा मिळे, शब्दा मोल न तोल। लिखालिखी की है नहीं, देखादेखी बात,दुलहा दुलहन मिल गए, फीकी पडी बारात। ही नुसती न लिखापढी, अनुभव हा साक्षात,नवरानवरी भेटली, पडली फिकी वरात। लिखापढी में सब परै यह गुन तजै न कोइ,सबै परै भ्रमजाल में, डारा यह जिय खोइ। लिखापढीतच गुंतले, खरी न यांना जाण,भ्रमजाली हे अडकले, याचे नाही भान। ‘सब्द’ला आध्यात्मिक जगात खूप महत्त्व आहे. तोच आद्य ध्वनी, सर्वसमावेशक शब्द आहे. याविषयी कबीर सजग असणं स्वाभाविक आहे. कबीरांची वाणीशक्ती या ‘सब्द’मध्येच आहे. हा ‘सब्द’ जाणून घेऊन पाडगावकरांनी कबीरांच्या दोह्यांचा आणि पदांचा समवृत्त अनुवाद केला. तो शब्दार्थापेक्षाही अध्याहृत भावार्थाच्या वाटेनं गेला आहे. लौकिकातील एखादा कवी स्वत:चा अनुभव मांडतो तसा हा कबीरांचा आविष्कार नाही. सामान्य व्यवहाराच्या भाषेत असामान्य आशय व्यक्त करणं, हे त्यांच्या प्रतिभेचं वैशिष्ट्य आहे. बाहेरच्या जगात आनंद किंवा मुक्ती शोधणाऱ्या माणसाच्या मूढ वृत्तीविषयी कबीर म्हणतात... ज्यों नैनन में पूतरी यों खालिक घट माहिं,मूरख लोग न जानहीं, बाहर ढूँढन जाहिं। डोळ्यात जशी बाहुली, घटात त्याचा वास,मूर्ख लोक नच जाणिती, शोधित फिरती त्यास। कस्तूरी कुंडलि बसै, मृग ढुँढै बन माँहि,ऐसे घटि - घटि राम है, दुनिया देखै नाहिं। मृग नाभीतिल कस्तुरी, धुंडित फिरे वनात,घटाघटातुन राम तरि, दुनिया नाहि पहात। कबीर स्वाभाविक सहजतेनं आध्यात्मिक अनुभूती व्यक्त करतात. त्याच स्तरावरची सहजता पाडगावकरांच्या समवृत्त अनुवादात आलेली आपल्याला दिसते. दृष्टि न मुष्टि, परगट अगोचर, बातन कहा न जाई लो। याचा अनुवाद सत्त्वपरीक्षा घेणारा होता. पण, पाडगावकर शब्दांवर खरं प्रेम करणारे असल्याने आणि शब्दांच्या खोट्या गुंतागुंती करून व्यामिश्रता मिरविणारे नसल्याने त्यांना कबीरांची शब्दांपलीकडची अनुभूती उतरवता आली. त्यांनी त्याचा असा भावसुंदर आणि समवृत्त अनुवाद केला... प्रकट, अदृश्य न दिसे न गावे, शब्दांत न मावे ऐसा आहे। भावानुवाद ही एक सहजसमाधी असते. अनुवाद करणारा त्या विषयाशी पूर्ण तादात्म्य पावल्याशिवाय भावानुवाद शक्य नसतो. ही स्थिती दोघांच्या चेतनांचे स्तर एक झाल्याशिवाय येत नाही. अनुवाद हे मूळ विषयाचं आकलनरूपी प्रतिबिंब असतं. कबीरांच्या दोह्यांत आणि पदांत हे प्रतिबिंबित व्हावं, अशी शक्ती असली पाहिजे आणि ज्या हृदयात ती प्रतिबिंबित होतेय, तेही शुद्ध हवं. बिंब-प्रतिबिंबाच्या भेटीचा हा योग कबीर आणि पाडगावकर यांच्यात घडून आल्याचे जाणवते. आपणही त्याच्याशी एकरुप होण्याचा अनुभव घेऊ शकतो. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 13 Apr 2025 5:20 am

वेबमार्क:डोन्ट डाय... अमरत्वाच्या शोधाची डिजिटल गोष्ट

माणसाला जन्म-मृत्यूच्या संवेदना अधिकाधिक कळत गेल्या तेव्हापासून त्याला एका गोष्टीचे नेहमीच कुतूहल आणि आकर्षण राहिलंय, ते म्हणजे अमरत्व! आपल्याला मरणच नको, अशी इच्छा असणारे अनेक लोक आपल्या अवतीभवती आढळतील. याविषयी अनेक दावे करणारे वा अमुक एक व्यक्ती इतकी दीर्घायु आहे, असं सांगणारेही अनेक जण भेटतात. यातले बहुसंख्य अमरत्वाच्या प्राप्तीने झपाटलेले असतात. अशाच एका माणसाची खरीखुरी हकीकत ‘डोन्ट डाय : द मॅन हू वॉन्ट्स टू लिव्ह फॉरएव्हर’ या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवलीय. ‘टायगर किंग’ या गाजलेल्या सिरीजच्या कार्यकारी निर्मात्याने ही फिल्म बनवलीय. सत्तेचाळीस वर्षे वयाच्या एका प्रौढ पुरुषाच्या अमर होण्याच्या स्वप्नाची ही गोष्ट. मृत्यूवर मात करून अमर होण्यासाठी पणाला लावलेल्या कोट्यवधी डॉलरच्या प्रयत्नांचे वर्णन यात आहे. त्या व्यक्तीला असे का करावे वाटते आणि तो त्यात यशस्वी होतो का, हे सांगणे म्हणजे या फिल्मचा आत्मा काढून घेण्यासारखं आहे. ही कथा आहे ब्रायन जॉन्सन या एकेकाळी स्वत:ला अस्थिर, असुरक्षित समजणाऱ्या कोट्यधीश तरुणाची. तो स्वतःला डिप्रेशनच्या खोल डोहात असल्यागत समजायचा. जगापासून गोष्टी लपवल्या म्हणजे सारं सुरळीत होईल, असं त्याला वाटायचं. अगदी स्वत:च्या सावलीलाही तो आपलं मानायचा नाही. तरीही या माहितीपटात तो म्हणतो की, ‘जगातल्या बुद्धिमान व्यक्तींच्या लेखी मी एक आपत्ती आहे, मला मृत्यूची भीती वाटत नाही.’ एका प्रसंगात तो सांगतो की, मला जगायचे आहे; मात्र पळपुटा वा भेकड म्हणून नव्हे, तर धैर्यवान, धाडसी म्हणून. खरं तर त्याला ज्या भीतीचा उल्लेख करायचा होता, ती मृत्यूची भीती होती. फिल्ममध्ये एक प्रसंग असा आहे.. जॉन्सनला पक्की जाणीव होते की, तो आता किमान एकशेवीस वर्षे जगू शकतोय, तरीही अठरा वर्षांचाच दिसेल! पण, या टप्प्यापर्यंतच संशोधन करून थांबायचं की ते आणखी पुढं सुरू ठेवायचं, याचं उत्तर शोधताना त्याला जगातल्या अंतिम सत्याची प्रखर जाणीव होते! फिल्ममध्ये जॉन्सनच्या मृत्यूच्या चिंतेची सुरूवात त्याच्या वयाच्या मध्यापासून ते तिशीनंतर त्याच्या संतापी वृत्तीतून उद्भवते. त्यामुळे तो स्वत:विषयीचे चिंतन करू शकतो. एलडीएस चर्चविषयी (येशूच्या अंतिम काळातील संतांचे चर्च) त्याच्या मनात असणाऱ्या प्रतिमा एका रात्रीत ध्वस्त होतात. चर्चसोबतचे जीवनाच्या शाश्वततेचे त्याचे नाते तुटून पडते. एक तंत्रज्ञान उद्योजक म्हणून असलेल्या चोवीस तास ताणतणावांपेक्षा आयुष्यात आणखी काही आहे, याचा तो विचारच करत नाही. पती, वडील, मुलगा आणि मॉर्मन(एलडीएस चर्चचा फॉलोअर) या नात्यांचा त्याला कोणताही आनंद घेता येत नाही. त्यातून तो स्वत:च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावतो. आपण कोण आहोत आणि काय करत आहोत, या जाणिवेने त्याच्या मनात घृणा उत्पन्न होते. या नकारात्मक विचारांच्या शिखरावर त्याला तीव्र नैराश्य येते, आत्महत्येचे विचार येतात. एक वेळ अशी येते की, तो स्वत:ला संपवून टाकणारच होता. मात्र, त्याचवेळी त्याच्या मनात असा विचार येतो की आयुष्याला नवे वळण मिळते. आपण ब्रायन जॉन्सन नसतो, एक पती, वडील, मुलगा आणि तंत्रज्ञान उद्योजक नसतो, तर तो कोण असलो असतो, या प्रश्नावर तो खिळून राहतो. चर्चचा नाद सोडल्याशिवाय आपण खरे सत्य शोधू शकणार नाही, हे तो ओळखतो नि त्या दिवसापासूनच स्वत:ला शोधताना आयुष्याची दोरी कायमची बळकट करण्याची कल्पना जन्म घेते. तो पूर्णत: शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो. मनोआरोग्याचा शोध घेत नाही, कारण त्याला पुन्हा कन्फ्युजन नको असते. हे करताना सामाजिक संबंध आणि मानवी समुदायाचे महत्त्व त्याला आपसूक पटते. कसे ते फिल्ममध्येच पाहणे इष्ट! “डोन्ट डाय..’ ही केवळ एक फिल्म नसून एक उपक्रम झाला होता, ज्यात अनेक आहारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, डॉक्टर, समुपदेशक यांची मतमतांतरे मांडली गेली आहेत. यात एक कटूसत्य असेही आहे की, जॉन्सन आणि त्याच्या सहकाऱ्यांप्रमाणे जगातील अनेकांना अशा प्रकारच्या सुखसोयी मिळत नाहीत, कारण ते गरीब देशांमध्ये भयानक परिस्थितीत काम करण्यात व्यग्र असतात. दिवसरात्र मेहनत करून विविध वस्तूंचे उत्पादन करतात. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे फारसे पैसे नसूनही त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही. तर या उलट जॉन्सनसारखे अनेक लोक आढळतात ज्यांच्यापाशी सर्व आहे, तरीही त्यांना मरणाच्या भयगंडाने ग्रासलंय. मृत्यूचा वा अस्तित्व नसण्याचा खरा अर्थ ही फिल्म थेट सांगत नाही, तरीही प्रेक्षकाला तो उमगतो! एकेकाळी मोबाइल पेमेंट उद्योजक असलेल्या जॉन्सनची स्टार्टअप कंपनी पेपलने विकत घेतली होती. एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यावरही तरुण राहू शकते का, हे शोधण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली डिझाइन केलेल्या आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या सर्वसमावेशक प्रोग्रामवर तो दरवर्षी २ दशलक्ष डॉलरहून अधिक खर्च करतो. यासाठी तो स्वत:चा वापर गिनीपिगसारखा करू देतो. हे अत्यंत सफाईदार पद्धतीने या फिल्ममध्ये दाखवलंय. ‘नेटफ्लिक्स’वर ही डॉक्युमेंटरी पाहता येईल. जाता जाता... ‘सोनी लिव्ह’वर ‘रेखाचित्रम’ हा अत्यंत उत्कंठावर्धक थ्रिलर सिनेमा आला आहे. आवर्जून पाहण्याजोगा! (संपर्कः sameerbapu@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 13 Apr 2025 5:15 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:सिनेमातील पात्रावरून घेतले होते ‘मनोजकुमार’ नाव

मला माहीत आहे की, ४ एप्रिलनंतर मनोजकुमारजींविषयी खूप लिहिले गेले आहे. पण, हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा सदस्य आणि मनोजजींचा अनुयायी, चाहता या नात्याने त्यांच्याबद्दल लिहिणे ही माझी जबाबदारी आहे, असे मला वाटते. मनोजजींचा जन्म पाकिस्तानातील शेखपुरा गावात झाला. त्यावेळी हे गाव भारतात होते. जिथे सूफी संत वारिस शाह यांचा जन्म झाला, तेच हे शेखपुरा. वडिलांनी त्यांचे नाव हरीकृष्ण गिरी गोस्वामी ठेवले. मनोजजी शिक्षणासाठी लाहोरला आले. किशोरवयातच त्यांनी दिलीपकुमार यांचा ‘शबनम’ सिनेमा पाहिला आणि ते त्यांचे चाहते बनले. दिलीपकुमारांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी आपणही अभिनेता बनायचे, असा निश्चय केला. ‘शबनम’मध्ये दिलीपकुमारांच्या पात्राचे नाव मनोज होते, त्यामुळे आपले नावही ‘मनोजकुमार’ ठेवायचे, असे त्यांनी ठरवून टाकले. ईश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. मुंबईत आल्यावर ते हीरो बनले. त्यांनी स्वत:ला मनोजकुमार हेच नाव दिले. परंतु, त्यांना खरी ओळख लाभली ती ‘भारतकुमार’च्या रुपात. यातूनच प्रेरणा घेऊन मी ‘गली गली चोर है’ या सिनेमात हीरो अक्षय खन्नाचे नावही ‘भारत’ असे ठेवले होते. मनोजजींनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यावर ‘शहीद’ हा पहिला देशभक्तिपर सिनेमा बनवला. तो तयार होत असताना त्यांची भेट तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींशी झाली. त्यांनी मनोजजींना, ‘एखादा चांगला सिनेमा बनवा,’ असे सुचवले. मनोजजींनी सांगितले की, मी ‘शहीद’ नावाचा सिनेमा बनवतोय, तो तुम्हाला खूप आवडेल. शास्त्रीजींनी त्यांना हा सिनेमा आपल्याला दाखवा, असे सांगितले. तो १९६५ चा काळ होता. सिनेमा तयार झाल्यावर मनोजजींनी दिल्लीत त्याचा ट्रायल शो ठेवला. पण त्याचवेळी देशात युद्ध सुरू झाले. शास्त्रीजी म्हणाले, सिनेमा बघावा इतका वेळ माझ्याकडे अजिबात नाही. मनोजजी नाराज झाले. तुम्ही मला शब्द दिला होता, असे म्हणाले. शास्त्रीजी तयार झाले, पण ८-१० मिनिटेच सिनेमा पाहीन, असे त्यांनी स्पष्ट केले. मनोजजी त्यांच्या शेजारी बसले. सिनेमा सुरू झाला. ८-१० मिनिटांनी मनोजजींनी शास्त्रीजींकडे पाहिले, तर ते सिनेमात खूप गढून गेल्याचे दिसले. मग मनोजजींनी मागे इशारा केला आणि इंटर्व्हल न करता सिनेमा सुरू ठेवायला सांगितले. ८-१० मिनिटांसाठी आलेले शास्त्रीजी सिनेमा पूर्ण होईपर्यंत थांबले. तो संपला तेव्हा त्यांचे डोळे भरुन आले होते. शास्त्रीजींनी मनोजजींचे खूप कौतुक केले. मध्यरात्री मनोजजींना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला की, शास्त्रीजींना उद्या तुम्हाला भेटायचे आहे. मनोजजी सकाळी तिथे पोहोचले. शास्त्रीजी म्हणाले, ‘मी देशाला एक नारा दिला आहे.. जय जवान, जय किसान. त्यावर एखादा सिनेमा तयार होऊ शकतो का?’ मनोजजी उत्तरले, ‘का नाही? तुम्ही सांगितले आहे, तर या विषयावरील एखाद्या कथेचा मी नक्की विचार करतो.’ मनोजजी दिल्लीवरून ट्रेनने मुंबईला निघाले आणि त्या प्रवासातच त्यांनी ‘उपकार’चे संपूर्ण कथानक लिहून काढले. अशा प्रकारे शास्त्रीजींच्या सांगण्यावरुन ‘उपकार’सारखा सिनेमा तयार झाला. यावरुन मला शहीद भगतसिंग यांचा एक शेर आठवतोय... मेरे जज़्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम मैं इश्क़ भी लिखना चाहूँ, तो इंकलाब लिख जाता है! ‘शहीद’ हा माझ्याही खूप आवडीचा सिनेमा आहे. मी मनोजजींना भेटलो, तेव्हा विचारले की, तुम्ही या सिनेमाचे नाव ‘शहीद’च का ठेवले? ते भगतसिंग असेही ठेवता आले असते.. त्यावर ते म्हणाले, ‘हो. भगतसिंग असेही नाव ठेऊ शकलो असतो. पण, माझ्यावर दिलीपकुमार यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांचा ‘शहीद’ हा सिनेमाही देशभक्तीवर होता आणि त्यातील त्यांचे काम मला फार आवडले होते. त्यामुळे मी या सिनेमाचे नावही ‘शहीद’ असेच ठेवले. मनोजकुमारजी खूप उत्तम शायर, लेखक होते. मला आठवतेय, ऋषी कपूर ‘आ अब लौट चले’चे दिग्दर्शन करत होते. एकेदिवशी त्यांनी आपल्या घरी पार्टी ठेवली होती. मनोजजींनी ऋषीजींना एक गाणे लिहून दिले आणि ‘आ अब लौट चले’चे हे शीर्षकगीत मी तुमच्यासाठी लिहून आणलेय, असे सांगितले. ते गाणे मला नेमके आठवत नाही, पण ऋषीजींनी मला हे गाणे ऐकवले, तेव्हा सिनेमातील सगळी गाणी आधीच पूर्ण झाल्याचा आम्हाला खूप खेद वाटला. अन्यथा, ते गाणेही सिनेमात नक्की घेता आले असते. मनोजजी किती प्रतिभावान लेखक होते, हे सांगणारी आणखी एक घटना आठवतेय. त्यांचे सहायक जगदीश यांनी ती मला सांगितली होती. नंतर मनोजजींनीही तिला पुष्टी दिली होती. त्यांच्या ‘क्रांती’ सिनेमाची कथा-पटकथा सलीम-जावेद यांची होती. माझ्या माहितीप्रमाणे, सलीम-जावेद जोडी सुपरस्टार बनल्यानंतरचा हा एकमेव सिनेमा होता, ज्यामध्ये त्यांचे डायलॉग नव्हते. ‘क्रांती’चे डायलॉग स्वत: मनोजकुमारजींनी लिहिले होते. त्याविषयी त्यांनी सांगितले होते... या सिनेमात प्रेम चोप्रांचे पात्र षडयंत्र रचून दिलीपकुमार यांच्या पात्राला इंग्रजांच्या हाती पकडून देते. दिलीपकुमारांना गजाआड करण्यात येते, तेव्हा प्रेम चोप्रा कोठडीला कुलूप लावून जिना चढून जातात आणि कॅमेरा दिलीपकुमार यांच्यावर स्थिरावतो. नरीमन ईराणी या दृश्यासाठी तयारी करीत होते, तेव्हा दिलीपजी पंजाबीमध्ये मनोजजींना म्हणाले की, मनोज, मला वाटतेय की या दृश्यात मी केवळ नि:शब्द लूक न देता काहीतरी बोलले पाहिजे. मनोजजी म्हणाले, काय बोलणार? क्रांतीला अटक झालीय, त्यामुळे इथे बोलण्यासारखी काही जागाच नाही. दिलीपजी म्हणाले, असे काहीतरी हवे की हा माझा हिंदुस्थानी भाऊ आहे आणि यानेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीला गजाआड केलेय.. मनोजजींनी सांगितले, ठीक आहे, मी विचार करतो. त्या दृश्यासाठी लायटिंगची व्यवस्था होईपर्यंत त्यांनी डायलॉग लिहून आणला. तो दिलीपकुमार यांना ऐकवला. या दृश्यात दिलीपकुमार म्हणतात... कुल्हाड़ी पर गर लकड़ी का दस्ता न होता, तो लकड़ी के कटने का रस्ता न होता.. आपले सिनेमे, गाणी यांसाठी मनोजजी कायम स्मरणात राहतील. आज त्यांची आठवण म्हणून ‘पूरब और पश्चिम’चे हे गाणे ऐका... है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहीं के गाता हूँ... आपली काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 13 Apr 2025 5:02 am

मुद्दे पंचविशी:लोकप्रतिनिधी अन् भांडवलशाही

गेल्या काही दशकांतील लोकशाहीचा प्रवास पाहता, ती सामान्य जनतेसाठीची संपन्न व्यवस्था बनते आहे की श्रीमंतांसाठीची यंत्रणा होते आहे, हा प्रश्न पडतो. दूरदृष्टी, समस्यांची जाण आणि उपाय शोधण्यास सक्षम लोकप्रतिनिधी असतील, तरच तिचा भविष्यकाळ सुरक्षित असेल. लोकशाही ही केवळ एक शासनपद्धती नाही, तर ती लोकांचा सहभाग, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि समान संधी यांचे प्रतिबिंब आहे. गेल्या दोनशे वर्षांत जगभरात लोकशाही व्यवस्थेने मोठी वाटचाल केली असली, तरी हल्ली तिची घडी विस्कटताना दिसते. त्याचे मुख्य कारण म्हणजे भांडवलशाही आणि लोकशाहीतील वाढती गुंतागुंत व लोकप्रतिनिधींचे घटलेले महत्त्व. लोकशाहीत जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत शासन व्यवस्था कार्यरत असते. ही व्यवस्था नेहमीच जनहित साधण्यासाठी असते, असा संविधानिक चौकटीतील गृहितार्थ होता. परंतु, गेल्या काही दशकांत ही गृहितके बाजूला पडून नव्या समीकरणांचा जन्म झाला आहे. या समीकरणांचा गाभा असा आहे की, लोकशाहीत निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी म्हणून कमी आणि भांडवलदारांच्या स्वार्थाचे रक्षण करणारे अधिक झाले आहेत. त्यामुळेच आज लोकशाही व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकशाही राष्ट्रे, पण वर्चस्व भांडवलशाहीचे : प्राचीन काळापासून लोकशाहीची कल्पना अस्तित्वात होती. तथापि, आधुनिक लोकशाहीने स्वतंत्र राष्ट्रांच्या स्थापनेनंतरच मूळ धरले. १८-१९ व्या शतकातील स्वातंत्र्यलढ्यांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधान तयार करण्यात आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावत होते. स्वतंत्र भारताच्या प्रारंभीच्या दशकांतही हीच प्रक्रिया दिसते. परंतु, जसजशी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि भांडवलशाहीचा प्रभाव वाढला, तसतसे लोकशाहीचे मूळ उद्दिष्ट डळमळीत होऊ लागले. आज जगातील बहुतांश लोकशाही राष्ट्रांमध्ये भांडवलशाहीचे स्पष्ट वर्चस्व दिसते. निवडणुकीतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या मतदारांचे प्रतिनिधित्व करतात की भांडवलशाहीच्या हातातील बाहुले होतात, हा प्रश्न गंभीर झाला आहे. भांडवलदारांमुळे घटले लोकप्रतिनिधींचे महत्त्व : जागतिक अर्थव्यवस्थेत १९७० च्या दशकानंतर मोठे परिवर्तन झाले. अमेरिकेत तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १५ ऑगस्ट १९७१ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर भांडवलशाही अधिकच प्रभावशाली झाली. त्यानंतर, बँकिंग व्यवस्था, वित्तीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि खासगी उद्योग यांच्यावर भांडवलदारांचे नियंत्रण वाढत गेले. परिणामी, लोकशाहीने जी राजकीय आणि सामाजिक समतेची हमी दिली होती, ती एका विशिष्ट गटाच्या हातात केंद्रित होऊ लागली, त्यातून लोकप्रतिनिधींचे महत्त्व कमी होत गेले. आता परिस्थिती अशी आहे की, लोकशाही ही ‘लोकांची, लोकांसाठी, लोकांकडून’ चालवली जाणारी व्यवस्था राहिली नाही. तिचे रूपांतर पैशांची, पैशांसाठी आणि पैसेवाल्यांकडून चालवल्या जाणाऱ्या व्यवस्थेत झाले आहे, असे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ यांनी नमूद केले आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, लोकशाहीला भांडवलशाहीच्या विळख्यातून सोडवायचे कसे? आणि ही स्थिती पुढील २५ वर्षांत काय स्वरूप धारण करेल? आत्मपरीक्षणाची वेळ जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबोटिक्स, जिनोमिक्स, थ्री-डी प्रिंटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या क्रांतिकारी संशोधनांमुळे मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मोठा परिणाम होत आहे. या प्रगतीमुळे नवनव्या संधी निर्माण होणार असल्या, तरी भांडवलशाही आणि तंत्रज्ञान सम्राट (Tech Emperor) अधिक मजबूत होत जातील. उद्या लोकशाहीचे कार्यक्षेत्र संकुचित झाले तर काय होईल? नवतंत्रज्ञानाच्या नावाखाली लोकांचे अधिकार आणि खासगीपण गमावले गेले, तर ही लोकशाही राहील का? की ती केवळ निवडणुकांपुरती मर्यादित राहील? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकशाही वाचवायची असेल तर... आता खरी कसोटी लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीची आहे. तंत्र-सम्राट आणि भांडवलशाहीच्या प्रभावाखाली राहून लोकशाही चालवायची की ती अधिक सशक्त करायची, हा प्रश्न त्यांना निकाली काढावा लागेल. त्या दृष्टीने हे उपाय महत्त्वाचे... १. निवडणूक प्रक्रिया सुधारणे पैसा आणि प्रभाव यांचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर कायदे करणे. - राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर पारदर्शक नियंत्रण ठेवणे. २. आर्थिक विषमता कमी करणे तंत्र-सम्राट आणि भांडवलशाहीच्या ताब्यात गेलेल्या मूलभूत सेवांची पुनर्रचना करणे. - शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ करणे. ३. लोकशाहीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लोकशाही व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी करणे. - पारदर्शक प्रशासनासाठी डिजिटल व्यवस्थांचा उपयोग करणे. ४. सामाजिक जाणीव निर्माण करणे लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे. त्यात नागरिकांचा सततचा सहभाग आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे. - नागरिकांनी राजकीय निर्णयांवर सतत प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती जोपासणे. नव्या युगातील लोकशाहीचे स्वरूप भविष्यकाळात लोकशाही आणि भांडवलदार / तंत्र-सम्राट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल. पण, लोकशाही ही केवळ एक संकल्पना नाही, ती एक सजीव संस्था आहे. लोकांनी तिला मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर ती भांडवलशाहीला / तंत्र-सम्राटांना यांना तोंड देऊ शकेल. गेल्या काही दशकांतील लोकशाहीचा प्रवास पाहता, ती संपन्न जनतेसाठीची व्यवस्था बनते आहे की श्रीमंतांसाठीची यंत्रणा होते आहे, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे दूरदृष्टी, समस्यांची जाण आणि उपाय शोधण्याची क्षमता असलेले लोकप्रतिनिधी असतील, तरच लोकशाहीचा भविष्यकाळ सुरक्षित असेल. अन्यथा, ‘लोकांची सत्ता’ या संकल्पनेची जागा ‘पैशांची सत्ता’ हे नवे तत्त्वज्ञान घेईल आणि जनता त्या व्यवस्थेची केवळ मूक प्रेक्षक बनेल. म्हणूनच, लोकशाही वाचवायची असेल, तर पुढची पंचवीस वर्षे लोकप्रतिनिधींनी नव्या तंत्रज्ञानाची आव्हानांना समजून घेऊन, जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. तसे न झाल्यास येणाऱ्या काळात ‘लोकशाही’ ही केवळ इतिहासाच्या पानांवरच शिल्लक राहील. (संपर्कः maheshzagade07@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 13 Apr 2025 4:55 am

रसिक स्पेशल:डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रेरणांचा शोध...

अवघ्या ६५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य, दुर्बलांसाठी केलेले कार्य भारताच्याच नव्हे, तर मानवतेच्या इतिहासात अजोड असे आहे. उद्या, १४ एप्रिलला बाबासाहेबांची १३४ वी जयंती साजरी होत आहे. त्या औचित्याने त्यांच्या या असामान्य कार्यामागील जीवनप्रेरणांचा हा वेध... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातून त्यांच्या कार्यामागील विविध प्रेरणांचे दर्शन घडते. त्यापैकी कोणत्याही काळातील नव्या पिढीला मिळणारी सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे ‘ज्ञानसाधना’. बाबासाहेबांचे वडील रामजी यांचे इंग्रजी अतिशय चांगले होते. आमच्या घरामध्ये वडिलांनीच शिक्षणाविषयीची आस्था आणि आवड निर्माण केली, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. रामजी हे कबीरपंथी असल्याने त्यांना भजने आणि अभंग तोंडपाठ होते. शिवाय, घरात रामायण, महाभारत, पांडव-प्रताप आदी ग्रंथांवर निरुपण होत असे. वडील रोज संध्याकाळी संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणत, त्याचाही प्रभाव आम्हा भावंडांवर पडला, असे बाबासाहेब सांगायचे. अफाट ज्ञानसाधना, अपार निष्ठा अमेरिकन विदुषी डॉ. एलिनॉर झेलियट यांनी बाबासाहेबांवरील निबंध ग्रंथात त्यांच्या ज्ञानसाधनेबाबत खूप बारकाईने नोंदी केल्या आहेत. विशेषत: बाबासाहेबांचा अमेरिकेतील ज्ञानसाधनेचा कालखंड कसा होता आणि त्यांनी त्यासाठी केलेल्या तपश्चर्येचे वेगळेपण त्यातून समोर येते. अवघ्या बाविसाव्या वर्षी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाल्यावर ते अमेरिकेला रवाना झाले. या काळात त्यांनी एम. ए. चा अभ्यास केला. १९१५ मध्ये ही पदवी त्यांना मिळाली आणि १९१६ ला त्यांनी पीएच. डी. पूर्ण केली. म्हणजे अवघ्या तेविसाव्या वर्षी बाबासाहेब सर्वार्थाने उच्चविद्याविभूषित झाले होते. हजारो वर्षे उपेक्षेची आणि वंचनेची वागणूक मिळालेल्या समाजातील हा एक असाधारण तरुण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जाऊन तेथील सर्वोच्च पदवी संपादन करतो, हे खूप महत्त्वाचे होते. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, भारतातील जातिव्यवस्था यासह प्रगत देशांचे इतिहास आणि त्यांचे साहित्य यांचा सखोल अभ्यास या काळात बाबासाहेब करत होते. त्यांच्या ज्ञानसाधनेने आणि अपार निष्ठेने विद्यापीठातील अनेक प्राध्यापक आणि ग्रंथपाल भारावून गेले होते. १९२३ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी मिळवली होती. एकूणच बाबासाहेबांची ज्ञानाकांक्षा आणि तिला दिलेली साधनेची जोड ही एक अपूर्व अशी प्रेरणा म्हणता येईल. अस्पृशांच्या वेदनेचा हुंकार बाबासाहेब १९१८ नंतर सामाजिक जीवनात उतरले आणि शेवटच्या श्वासापर्यंत दलित समाजासाठी कार्य करीत राहिले. ‘अ‍ॅनिलिएशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात त्यांनी या देशातील जातिवादाला वैचारिक आणि तर्कशुद्ध उत्तर देणारे अभ्यासपूर्ण प्रतिपादन केले आहे. त्यावेळच्या सर्वच प्रस्थापित विचारवंतांना आणि नेत्यांना भारतातील जातिव्यवस्थेबाबत एक परखड मांडणी करणारा महान विद्वान आपल्यासमोर उभा ठाकल्याचे लक्षात आले. बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथलेखनही सुरू केले. केवळ लेखन करूनच नव्हे, तर प्रत्यक्ष अस्पृश्यांचे आणि दुर्बल वर्गाचे प्रश्न मांडून, त्या संबंधीच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन वाटचाल करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. ‘मूकनायक’ आणि“बहिष्कृत भारत’ ही त्यांनी सुरू केलेली पाक्षिके त्याचाच परिपाक होता. त्याचप्रमाणे सभा, मेळावे, परिषदांचे आयोजन करून त्यांनी अस्पृश्य वर्गाचे दु:ख आणि दैन्य शब्दश: वेशीवर टांगले. आत्मसन्मानाचा लढा मागास समाजाने कुप्रथांतून बाहेर पडावे, अशी हाक त्यांनी दिली. मढ्यावरचे नवे कापड घेऊन ते घालू नका, मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नका, असे त्यांनी ठणकावून सांगायला सुरूवात केली. देशातला हा मोठा समाज आपल्या हजारो वर्षांच्या रुढींमधून बाहेर पडून आत्मसन्मानाच्या जाणिवेने जागा होत होता, ही डॉ. आंबेडकरांच्या लढ्याची फलश्रुती गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी स्वातंत्र्यलढा सुरू असतानाही जाणवू लागली होती. माणगावात भरलेल्या महाराष्ट्र अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते, त्यासाठी करवीर संस्थानच्या शाहू महाराजांनी त्यांना पाठबळ दिले होते. महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी त्यांनी मागास समाजाला उभे केले आणि १९२७ च्या मार्चमधील हा लढा डिसेंबरपर्यंत सुरू ठेवला. लंडनला भरलेल्या गोलमेज परिषदेतही त्यांनी अस्पृश्य समाजाची गाऱ्हाणी मांडली आणि त्यासाठी प्रसंगी गांधीजींबरोबर संघर्षही केला. विद्या, स्वाभिमान, शील हीच दैवते बाबासाहेबांना मुंबईत १९५४ मध्ये त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त १ लाख १८ हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. त्यांनी ही रक्कम आपल्या प्रकृतीसाठी खर्च करावी, अशी लोकांची इच्छा होती. तथापि, गरीब समाजाकडून अशी थैली स्वीकारणे बेशरमपणाचे आहे, असे परखडपणे सांगत त्यांनी ती देणगी सामाजिक संस्थांच्या इमारत फंडाला दिली. या कार्यक्रमात बाबासाहेबांनी केलेले भाषण फार मोलाचे आहे. त्यांच्या जीवनप्रेरणा कशा स्वरूपात आकाराला आल्या असतील, याचा बोध त्यातून होतो. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले, ‘माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध, दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.’ जगाचे कल्याण फक्त बौद्ध धर्मच करू शकेल, हे सांगतानाच ज्योतिबा फुले यांचा मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. वडील कबीरपंथी असल्यामुळे कबीरांच्या विचारांचा परिणाम आपल्यावर झाला. या तिघांच्या शिकवणीने आपले आयुष्य बनले, असे त्यांनी म्हटले होते. विद्या, स्वाभिमान आणि शील ही आपली तीन उपास्य दैवते आहेत. माझे विद्येचे वेड भयंकर आहे. कोणाची याचना करीत नाही, म्हणून मी स्वाभिमानी आहे आणि आयुष्यात दगाबाजी, फसवणूक केल्याचे आपल्याला आठवत नाही, अशा शब्दांत त्यांनी या उपास्य दैवतांचा उल्लेख केला होता. देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही टिकली पाहिजे आणि समाजात बदल घडला पाहिजे, हे स्वप्न बाबासाहेब पाहात होते. त्यासाठी राजकीय लोकशाहीबरोबरच आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण व्हावी, ही त्यांची तळमळ होती. त्या दृष्टीने स्वातंत्र्य टिकवणे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सत्तेच्या जवळपास असणाऱ्या सर्वांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहिले पाहिजे, असे ते सांगत. आज बाबासाहेबांना अभिवादन करताना, त्यांनी दिलेल्या प्रेरणांचे मोल जाणून घ्यायला हवे. त्या केवळ दस्तऐवजांमध्ये किंवा पुस्तकात राहणार नाहीत, तर प्रत्येक पिढीला दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवण्याइतक्या सक्षम आहेत. (संपर्कः arunbk1954@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 13 Apr 2025 4:48 am

बुकमार्क:व्रतस्थ सेवाकार्यातील नव्या पिढीचा पायरव...

सेवावृत्तीने श्रम करणाऱ्या आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीच्या कार्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे डॉ. प्रकाश आमटे लिखित ‘नवी पिढी, नव्या वाटा’. (स्व.) बाबा आमटेंच्या जीवनसाधनेतून मिळालेला निष्काम सेवेचा वारसा डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी निरंतर पुढे चालवला. या कार्यात व्यक्तींचे उन्नयन आणि समाजाची प्रगती यांचा विचार करताना श्रम आणि सेवा यांची त्यांनी सांगड घातली. हे कार्य बहुआयामी झालं, ते दोन्ही मुलं आणि सुना यांच्या अथक प्रयत्नातून. तरुण खांद्यावर आलेली ही जबाबदारी पेलताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? भामरागडचं दुर्गम आदिवासी जग आणि लोकबिरादरी प्रकल्पातील कार्य लोकाभिमुख कसं झालं? याची नेमकी गोष्ट या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या सुरूवातीला ‘थोडी उजळणी’ या प्रकरणातील एका चित्राला लागून लेखक लिहितात... “बाबा आम्हाला घेऊन भामरागडच्या जंगलात आले, तोवर इथल्या आदिवासींबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आदिवासींचं जगणं पाहून आम्ही हबकलो.” या हृद्य चित्रात दोन आदिवासी बांधवांशी बाबा काहीतरी चर्चा करत आहेत. आमटे कुटुंबाचं कार्य त्यांच्या श्वासाइतकंच नैसर्गिक आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या भागात महाराष्ट्रातील तर सोडाच, पण चंद्रपूर जिल्ह्यातीलही माणसं कधी फिरकलेली नव्हती, असं लेखक सांगतात. काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने काम सुरू झालं खरं, पण ते सोपं नव्हतं. मुळात डॉक्टर म्हणजे काय? हे त्या आदिवासींना माहिती नव्हतं. त्यामुळं वैयक्तिक आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करणं क्रमप्राप्त होतं. आपला समाज हेच कुटुंब मानत आमटे दाम्पत्याने काम सुरू केलं. आनंदवनात बाबा - ताई आणि कार्यकर्त्यांच्या कामाची पार्श्वभूमी असली, तरी डॉ. प्रकाश यांच्यासाठी हे एक नवीन आव्हान होतं. लोकबिरादरी प्रकल्प महाराष्ट्राच्या एका टोकावरच्या दुर्गम, जंगली भागात असल्याने तब्बल २२ वर्षे या गावात वीज नव्हती. पाऊस आला की रस्तेही वाहून जात. अशा परिस्थितीत कित्येक दिवस गावाचा उर्वरित जगाशी संपर्क नसे. दरम्यान दिगंत आणि अनिकेत या दोघांचा जन्म झाला. त्याचं संस्कारक्षम मन हेमलकशातील असंख्य गोष्टी टिपत होतं. पुढं आरतीचे कुटुंबात आगमन, तिची जडणघडण या सगळ्याच गोष्टींचे वर्णन वाचनीय आहे. “आदिवासींचा विश्वास मिळवणं आणि त्याचं जगणं सुसह्य करण्यासाठी जास्तीत जास्त सोयी-सुविधा पुरवत राहणं, यात आमच्या आयुष्याची ३५ वर्षे कशी गेली हे कळलंच नाही, असे डॉ. प्रकाश सांगतात. कालांतराने मुलगा दिगंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा प्रकल्पात काम करण्याचा निर्णय असो किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावरही अनिकेतचे तिथल्या व्यवस्थापनात पूर्णवेळ झोकून देऊन देणे असो; या दोघांनीही आपापल्या परीने प्रकल्प चालवण्याची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. दोन्ही मुलांचे करिअर, त्यांची संवेदनशील वृत्ती, लग्न आणि नंतर प्रकल्पात काम करतानाचा प्रत्यक्ष अनुभव या सगळ्या टप्प्यांवर “हे काम माझं आहे आणि ते मी पुढे नेणारच!” हा भक्कम विश्वास डॉ. प्रकाश यांनी मुलांच्या मनात निर्माण केला. आमटे कुटुंबाच्या या सेवाकार्यात पत्नी, मुले - सुना तर होत्याच; पण असंख्य कार्यकर्त्यांची फौजही सोबतीला होती. कितीतरी प्रकारचे रुग्ण आणि त्यांची वाढती संख्या यामुळे प्रकल्पाचे कार्य विस्तारणे आवश्यक होते. ही गरज ओळखून दिगंत - अनघा आणि अनिकेत - समीक्षा यांनी नव्या अत्याधुनिक हॉस्पिटलची केलेली निर्मिती असो किंवा शाळेच्या माध्यमातून केलेला एक अभिनव शैक्षणिक प्रयोग असो; अशा सगळ्या गोष्टी करताना या पुढच्या पिढीमध्ये कल्पकता आणि जबाबदारीची जाणीव होती. आजच्या तरुणाईने आदर्श घ्यावा, असे आमटे कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांचे सेवाव्रती कार्य या पुस्तकरूपाने जगासमोर आले आहे. आदिवासींच्या कुटुंबातील शिक्षणाच्या प्रवाहात आलेली तरुण मंडळी आज प्रकल्पाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी काम करत आहेत. त्यापैकी आय सेंटरमध्ये डोळ्यांची तपासणी करणारे जगदीश बुरडकर आणि गणेश हिवरकर यांची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. डॉ. अनघा यांची प्रसुती विभागातील सहायक, तसेच प्रियांका मोगरकर, शारदा भावसार, दीपमाला लाटकर आणि समुपदेशन करणाऱ्या सविता मडावी हे सगळे या सेवाकार्याच्या नव्या पिढीचे शिलेदार आहेत. आश्रमशाळेतील काम असो वा वाड्या - वस्त्यांवर जाऊन आरोग्याच्या, शिक्षणाच्या सुविधा पोहोचवणे असो; ही आजची गरज असल्याचे ओळखून नव्या पिढीने उचललेले प्रत्येक पाऊल तिथल्या स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन स्वयंसिद्ध बनवत आहे. निकोप समाजाच्या निर्मितीसाठी सुरू असलेली आमटे कुटुंबाच्या पिढ्यांची ही व्रतस्थ, निरंतर वाटचाल समजून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे. पुस्तकाचे नाव : नवी पिढी, नव्या वाटालेखक : डॉ. प्रकाश आमटेसंपादन : सुहास कुलकर्णीप्रकाशक : समकालीन प्रकाशनपाने : १३६, किंमत : रु. २०० (संपर्कः swapnilkashi566@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2025 5:40 am

‘एआय’च्या विश्वात...:‘डीपसीक’ने भारतासाठी उघडली संधींची कवाडे!

‘डीपसीक’ हे चीनमध्ये २०२३ च्या मे महिन्यात स्थापन करण्यात आलेले एआय स्टार्टअप आहे. या कंपनीचे संस्थापक लियांग वेनफेंग यांनी २०२१ मध्ये ‘एनव्हिडीया’च्या जीपीयूची खरेदी सुरू केल्याने एआय मॉडेल्सच्या विकासाला गती मिळाली. ‘डीपसीक’ची एआय मॉडेल्स अत्याधुनिक कार्यक्षमतेची, किफायतशीर आहेत. हे तंत्रज्ञान अवघ्या ५० कोटी रुपयांत विकसित झाले. त्यामुळे जागतिक एआय क्षेत्रात ‘डीपसीक”ची प्रकर्षाने नोंद घेतली गेली. ‘ओपन एआय’चे सीईओ सॅम आल्टमन यांनी म्हटले होते की, चॅट जीपीटीसारखे प्रगत एआय साधन बनवणे कोणालाच सहज जमणार नाही. प्रत्यक्षात “डीपसीक’चे R1 मॉडेल लाँच झाल्यावर एनव्हिडीयासारख्या मोठ्या टेक कंपनीच्या शेअर्समध्ये २०% घसरण होऊन तिचे बाजारमूल्य सुमारे ६०० अब्ज डॉलरने घटले. परिणामी वैश्विक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली. दोन्हीकडून प्रचंड गुंतवणूक ‘एआय’च्या क्षेत्रातील वेगवान वाढ आणि नाविन्यामागे मोठ्या प्रमाणातील आर्थिक गुंतवणूक हे मुख्य कारण आहे. ‘ओपन एआय’ला मायक्रोसॉफ्टकडून सुमारे १० अब्ज डॉलरचा वित्तपुरवठा झाल्याचे वृत्त आहे. या प्रचंड गुंतवणुकीमुळे ‘ओपन एआय’ला डेटा सेंटर्सचा विस्तार, संशोधन आणि चॅट जीपीटीची कार्यक्षमता वाढवणे शक्य झाले. फेसबुकनेही आपल्या एआय विभागात अब्जावधी डॉलर गुंतवल्याची चर्चा आहे. शेकडो संशोधक, अभियंत्यांच्या सहयोगाने त्यांनी LLaMA सारखी मोठी भाषिक मॉडेल विकसित केली आहेत. दुसरीकडे, डीप माइंड आणि गुगल एआय यांनी हातमिळवणी करून ‘जेमिनी’सारखी मॉडेल तयार करण्यासाठी अब्जावधी डॉलर गुंतवले आहेत. गुगलच्या विस्तृत सेवांची पार्श्वभूमी पाहता, उच्चस्तरीय डेटा सेंटर आणि अल्गोरिदम संशोधनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. ‘डीपसीक’ने या तुलनेत कमी संसाधने असूनही R1 हे अत्याधुनिक एआय मॉडेल विकसित केले. ‘डीपसीक’च्या गुंतवणुकीत सरकारी अनुदानांशिवाय खासगी गुंतवणुकीचा आणि आंतरराष्ट्रीय मदतीचाही समावेश होता. अमेरिका-चीन संघर्ष गेल्या काही वर्षांत एकीकडे तंत्रज्ञानाची भरारी सुरू असताना दुसरीकडे विविध देशांतील राजकीय आणि व्यापाराशी संबंधित संघर्षही वाढत होते. २०२२-२३ मध्ये अमेरिकेने चीनला अत्याधुनिक चिप्स आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर निर्बंध घातले. त्यामुळे चीनमधील हाय-टेक उद्योग आणि एआय क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले. अमेरिकेच्या तत्कालीन बायडेन प्रशासनाचे म्हणणे होते की, चीनला चिप्सचा खुला पुरवठा होत राहिल्यास जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होईल. या भूमिकेमुळे केवळ व्यापारी संबंधच नव्हे, तर तंत्रज्ञान-विकासावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. अल्प संसाधनांत मॉडेल विकसन अमेरिकेच्या या निर्बंधांचा फटका चीनमधील अनेक कंपन्यांना बसला. विशेषत: एआयमधील संशोधन, प्रशिक्षण आणि मॉडेल-विकासनासाठी उच्च-कार्यक्षमतेचे जीपीयू अत्यावश्यक असतात. एनव्हिडियासारख्या अमेरिकी कंपन्यांकडून होणारा चिप्सचा पुरवठा मर्यादित झाल्याने चीनमधील स्टार्टअप्ससमोर मोठी अडचण उभी राहिली. अशा कठीण परिस्थितीत लियांग वेनफेंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या टीमने कमी जीपीयू संसाधने असतानाही अधिक परिणामकारक एआय मॉडेल तयार करण्यावर भर दिला. साधारणपणे जीपीयू आणि प्रचंड डेटावर अवलंबून राहणारे एआय संशोधन ‘डीपसीक’ने अधिक कुशलतेने राबवले. प्रशिक्षणाची प्रक्रिया, अल्गोरिदम ऑप्टिमायझेशन आणि हार्डवेअरच्या उपयोगात नावीन्यपूर्ण पद्धती वापरल्या. अल्प संसाधनांतही गुणवत्तापूर्ण एआय मॉडेल विकसित करणे शक्य असल्याचे ‘डीपसीक’ने दाखवून दिले. भारतासाठी नवी संधी भारतीय तंत्रज्ञान क्षेत्र जागतिक स्पर्धेत उतरत असताना, स्टार्टअप आणि इनोव्हेशन इको-सिस्टिमसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. भारतीय बँका, वित्त संस्था, उत्पादन क्षेत्र आणि लॉजिस्टिक उद्योगांमध्ये एआयवर आधारित स्वयंचलित सेवा आणखी बळकट होऊ शकतात. ‘डीपसीक’सारखी साधने वापरून तांत्रिक संस्थांचे अभ्यासक्रम अधिक अद्ययावत आणि उपयोजनक्षम बनवता येतील. संशोधन संस्थांनाही एआयच्या संदर्भात नवे प्रयोग आणि प्रकल्प हाती घेता येतील, त्यातून एआय निष्णातांची नवी पिढी तयार होऊन या क्षेत्रात नव्या स्टार्टअप्सची लाट येऊ शकेल. एआय आधारित सेवांची गरज वाढून डेटा विश्लेषक, मशीन लर्निंग इंजिनिअर, प्रॉडक्ट डेव्हलपर आदी तांत्रिक कौशल्यांना मोठी मागणी निर्माण होईल. कडक धोरणे आवश्यक ‘डीपसीक’सारखी साधने मोठ्या प्रमाणात वापरली जातील, तशी भारतीय नियामक संस्थांनाही डेटा संरक्षण व गोपनीयतेबाबत अधिक कडक धोरणे आखावी लागतील. या क्षेत्रातील तांत्रिक अधिष्ठान वाढवण्यासाठी अत्याधुनिक नियम, मानकांची अंमलबजावणी करावी लागेल, जेणेकरून तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करता येईल. जागतिक बाजारपेठेत भारतीय प्रतिभेची चमक दाखवण्यात किफायतशीर एआय साधने महत्त्वाची भूमिका बजावतील. योग्य नियमन, सुरक्षा आणि नैतिक मूल्यांचा आदर राखून, भारतही एआयमधील संभाव्य शक्ती म्हणून उदयाला येऊ शकतो. (संपर्कः ameyp7@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2025 5:35 am

डायरीची पाने:उन्हाळपाळी

नव्या, बदललेल्या काळाचं स्वागत करायला हवं. त्या भोवती आपली संस्कृती गुंफायला हवी. असंस्कृतपणे कुठलाच व्यवहार केला जाऊ नये. त्यामुळे कामाचा आनंद मिळत नाही. रानात औत घालून रान उलथून टाकण्याला ‘पाळी घालणे’ असं म्हणतात. खरं तर पाळी या शब्दाचा अर्थ रिकामी चक्कर मारणे असा होतो. त्या अर्थानं, रान रिकामं असतं तेव्हा मशागतीसाठी शेतात औत घालण्याला पाळी म्हटलं जात असावं. पेरणीसाठी, कोळपणीसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी शेतात औत घालतात त्याला पाळी म्हणत नाहीत. कारण तेव्हा पेरणी करणे, तण काढणे अशा काहीतरी कामानिमित्त शेतात औत घातलेले असते. पण, असं कुठलंच प्रत्यक्ष कारण नसताना रिकाम्या रानात औत घालण्याला ‘पाळी घालणे’ म्हणतात. रिकाम्या रानात चकरा मारत केलेलं काम म्हणून तिला पाळी म्हणत असावेत. त्यातही उन्हाळ्यात रान जास्त दिवस रिकामं असल्याने या काळात रानाची अधिक मशागत करणे शक्य असते. अशा मशागतीला ‘उन्हाळपाळी’ म्हटलं जातं. नांगराने जमीन खोलवर भेदून उलथून टाकणे, भुसभुशीत करणे, हे काम पाळीत केले जाते. त्यामुळं खालची माती वर येते. उन्हाळाभर ती उन्हात तापते. पावसाळ्यात पहिला पाऊस पडला की एकदम फुलून येते. तेव्हा पेर साधली की धान तरारून येते. अशी रानाची मशागत करणे, ही एका अर्थाने रानाची साधनाच असते. प्रत्यक्ष तसा फायदा काही दिसत नसताना केवळ रानाची तयारी करून घेण्याला मशागत म्हणतात. अशी नांगरून टाकलेली रानं, रानातली काळी माती जणू तपश्चर्येला बसलेली असते. तिचं हे तप पाऊस पडला की फळाला येतं. पाडव्याच्या दिवशी नवा सालगडी ठरला की, त्याचं हेच पहिलं काम असायचं. कारण तेव्हा रानात कुठलंच पीक नसायचं. त्यामुळं रिकाम्या रानाची मशागत करणे, हे एकच काम त्या नव्या गड्याच्या वाट्याला यायचं. आधीच्या काळात लोखंडी नांगर असायचे. त्याला चार, सहा, तर कधी कधी आठ आणि महाभारतातल्या नोंदीप्रमाणं बारा बैलही जुंपले जात. नांगर धरण्यासाठी एक आणि बैल हाकण्यासाठी दोन्हीकडून दोन माणसं लागत. कारण एकामागं एक असे चार बैल असायचे. एकाच बाजूच्या माणसाला ते हाकणं शक्य नसायचं. अशा वेळी त्यासाठी माणसेही एकापेक्षा जास्त लागायची. लोखंडी नांगर जमिनीत खोलवर रुतल्यामुळं दोन बैलांना ओढणे शक्य नसायचे. म्हणून दोनपेक्षा जास्त बैल जुंपावे लागायचे. लाकडी नांगर असेल, तर दोन बैल ओढू शकायचे, त्यामुळे त्याला दोनपेक्षा जास्त बैल जुंपता येत नसत. पण, लोखंडी नांगराला साखळीच्या मदतीने कितीही बैल जुंपता यायचे. चैताचा महिना या उन्हाळपाळीमध्ये निघून जायचा. पाडव्याच्या दिवशी नवा गडी कामावर आलेला असायचा, तो पुढचा सगळा महिना ही मशागतच करायचा. या कठीण काळातच नवा सालगडी कसा आहे, हेही कळायचं. तो लेचापेचा असेल, तर त्याला सालभर ठेवायचं की नाही, याचा फेरविचार करता यायचा. अर्थात फक्त सालगडीच हे काम करायचा, असं नाही. कधी कधी स्वत: शेताचा मालकही हे काम करत असे किंवा सालगड्याला करू लागत असे. अशावेळी घरून बायका टोपलंभर भाकरी आणि गाडगंभर भाजी, वाडगंभर ताक पाठवून देत. कौतुकाने जात्यावर गाणी म्हटली जायची... बंधु गं बंधू माझा, बंधू गं गुणाचाशेताला जातोया, चैताच्या उन्हाचा।असं चैताचं गं ऊन, जशी उन्हाची आगिनगोरी गं भावजय, शेता चालली नागिन।अशा नांगऱ्याच्या, पैजा लागल्या दोघाच्याहौशा या बैलानं, शिवळा तोडिल्या सागाच्या।अशा नंदी जोड्या, जोड्या चालती येगानीबापा गं समर्थानं, नांगर केले सागवानी।असं चैताचं ऊन, ऊन गोरीला सोसंनारानीवनी दूर दूर, झाडझुडुप दिसंना।बापाचं गं शेत, कसं बिघ्यामागं बिघंनाही शिनवटा थोडा, बंधू मपलं गं वाघ।बंधूची नांगरट, सुरू ठीक्यामागं ठीकंसोईऱ्या-धाईऱ्यानं, धरलिया इरजीक। तेव्हाच्या उन्हाळपाळीचं वर्णन अशा ओव्यांतून जुन्या बायकांनी करून ठेवलं आहे. त्यामुळं पुढच्या पिढ्यांना निदान त्याचं स्वरूप तरी लक्षात येईल. आजही उन्हाळपाळी होते, नाही असं नाही. पण, त्यासाठी नांगर आणि बैलांची गरज उरलेली नाही. आता गावात एक-दोघांकडं ट्रॅक्टर असतो. शिवारातल्या सगळ्या शेतांची मशागत, उन्हाळपाळी ट्रॅक्टरच करून देतो. त्यासाठी ना कामावर गडी ठेवावा लागतो, ना लोखंडी वा लाकडी नांगर लागतो, ना बैलांची गरज पडते. नांगर हाकणाऱ्याची जागा आता ट्रॅक्टर हाकणाऱ्यांनी घेतली आहे. तो एकरानुसार जमीन नांगरून देण्याचे भाव ठरवतो. सध्या अडीच हजार रुपये एकर असा भाव आहे. त्याला डिझेल वगैरे धरून एकरी हजारभराचा खर्च असतो. दिवसभरात पाच एकर वावर नांगरणं होतं. ट्रॅक्टरवाला रात्रंदिवस शेतात ट्रॅक्टर चालवून सगळ्यांची मशागत करून देतो. लोकांनाही आता बैल-बारदाना, त्यासाठी चारापाणी, झोपडी-मांडव या सगळ्या गोष्टी नको वाटू लागल्या आहेत. त्यामुळं हा सोपा पर्याय सगळ्यांनी स्वीकारला आहे. जमिनीला त्यामुळं काही फरक पडत नाही. उलट ट्रॅक्टरची नांगरणी लोखंडी नांगरासारखी खोलवर होते. त्यामुळे जमीन खोलवर उलथून पडते आणि उन्हाळाभर तापत राहते. काळाप्रमाणं माणसं बदलतात. त्याच्या काम करण्याच्या पद्धती अन् त्यासाठीची साधनं बदलतात. पूर्वी नांगर हाकणारा स्वत: गाणी म्हणायचा. आता ट्रॅक्टर चालवणारा पेनड्राइव्हमधली गाणी लावून ऐकत असतो. त्याची ती गाणी आख्ख्या शिवाराला ऐकू जातात. त्या नादात तो ट्रॅक्टर चालवतो. ती गाणी अर्थात गायकांनी गायलेली असतात, त्यात त्याचा स्वत:चा सहभाग नसतो. ट्रॅक्टरची मालकीण आपल्या ट्रॅक्टर चालवणाऱ्या मालकावर गाणी लिहिते का नाही, माहीत नाही. कशासाठी लिहिल? आणि ती कुठं गायिल? आता कुठं जातं राहिलं आहे? आणि कुठं दळण्याची गरज उरली आहे? त्यामुळं तिला गाणं रचण्याची, म्हणण्याची गरजच उरलेली नाही. काळ बदलतो. बदलायलाच हवा. नव्या काळाचं स्वागत करायला हवं. त्या भोवती आपली संस्कृती गुंफायला हवी. असंस्कृतपणे कुठलाच व्यवहार केला जाऊ नये. कारण त्यामुळे कामाचा आनंद मिळत नाही, इतकेच. (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2025 5:31 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:जेव्हा नावाबाबत कोर्टाने दिला होता निर्णय, ‘लव्ह स्टोरी’ सुपर-डुपर हिट ठरला, पण त्यात दिग्दर्शकाचे नावच नव्हते

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल आणि त्यांच्या सर्वांत पहिल्या सुपरहिट, संस्मरणीय ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमाविषयी.. मला आठवतेय, हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा मी १५ वर्षांचा होतो; पण तो मला खूप आवडला होता. सिनेमाच्या पडद्यावर पहिल्यांदाच नवतारुण्यातील आगळी प्रेमकहाणी पाहायला मिळाली होता. यातील सगळी गाणी सुपरहिट होती. कुमार गौरवची तर अशी क्रेझ बनली होती की प्रत्येक मुलगी जणू स्वप्नात त्यालाच पाहात होती. माझे नशीब म्हणजे मला रवैलजींसोबत काम करण्याची संधी मिळाली. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच्याशी माझा ऋणानुबंध आहे. या काळात मी त्यांच्याकडून खूप सारे किस्से ऐकले आहेत. आज मी तुम्हाला ‘लव्ह स्टोरी’शी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहे. या सिनेमातील हिट गाण्यांपैकी एक म्हणजे.. ‘तेरी याद आ रही है..’ राहुलजींनी मला सांगितले होते... आर. डी. बर्मन यांनी या गाण्याची चाल निश्चित केली आणि आनंद बक्षींसोबत बसून गाण्याच्या ओळी तसेच बोल निश्चित करण्यात आले. विजयता पंडितवर चित्रीत होणाऱ्या लताजींच्या ओळी कोणत्या आणि कुमार गौरववर चित्रीत होणाऱ्या अमितकुमारच्या ओळी कोणत्या, हेही ठरले. मग मी शूटिंगसाठी काश्मीरला गेलो. रेकॉर्डिंगच्या वेळी मी नव्हतो, पण निर्माते राजेंद्रकुमार मात्र उपस्थित होते. गाणे रेकॉर्डिंग होऊन माझ्याकडे आल्यावर ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. कारण ते पूर्णपणे उलट रेकॉर्ड झाले होते. अमितकुमारसाठी फायनल केलेल्या ओळी लताजींच्या आवाजात होत्या आणि लताजींसाठीच्या ओळी अमितकुमारच्या आवाजात होत्या. मला वाटले, कदाचित चुकून असे घडले असावे. पण, चौकशी केल्यावर कळले की, कोणत्या ओळी कुमार गौरवला आणि कोणत्या विजयता पंडितला द्यायच्या, हा बदल राजेंद्रकुमारजींनी केला होता. पण, मी ज्या ज्या ओळी ज्यांच्यासाठी फायनल केल्या होत्या, त्याप्रमाणेच त्या चित्रीत केल्या. शूटिंगच्या वेळी विजयता पंडितला मी अमितकुमारचा प्लेबॅक दिला आणि लताजींचा प्लेबॅक कुमार गौरवला दिला. नंतर या गाण्याचे एडिटिंग पाहताना खूप मजा आली, कारण त्यात अमितकुमारचा प्लेबॅक विजयता पंडितच्या वेळी आणि लताजींचा प्लेबॅक कुमार गौरवच्या वेळी ऐकू येत होता. पुढे लताजी आणि अमितकुमार यांच्या ओरिजनल ओळी त्यांच्या आवाजात डब करुन फिल्मसोबत जोडण्यात आल्या.. असो. सिनेमा पूर्णत्वाला आला असताना काही क्रिएटिव्ह गोष्टींवरुन राजेंद्रकुमार आणि राहुलजींमध्ये मतभेद झाले. सिनेमा तयार झाल्यावर त्याचे पहिले पोस्टर बनवण्यात आले. राहुलजींनी ते पाहिले तर त्यावर लिहिले होते, ‘राजेंद्रकुमार्स लव्ह स्टोरी’ आणि त्यावर दिग्दर्शक म्हणून राहुलजींचे नावच नव्हते. त्यामुळे राहुलजींना खूप वाईट वाटले. खरे तर राजेंद्रकुमार आणि राहुलजींचे लहानपणापासूनचे संबंध होते. राजेंद्रकुमारांनी पूर्वी राहुलजींचे वडील एच. एस. रवैल यांचे सहायक म्हणून काम केले होते. त्यामुळे राहुलजींनी राजेंद्रजींना सांगितले की, तुम्ही पोस्टरवर माझे नाव दिले नाही, त्यामुळे सिनेमातही ते देऊ नका. राहुलजींनी दिलेल्या माहितीनुसार, राजकपूर साहेबांनी त्यांना सांगितले होते की, सिनेमा खूप चांगला बनल्यामुळे दिग्दर्शक म्हणूनही आपले नाव देण्याची राजेंद्रकुमार यांची इच्छा होती. त्यानंतर मग राहुलजींनी कोर्टात धाव घेतली आणि विद्या सिन्हा, अमजद खान, डॅनी, अरुणा इराणी या कलाकारांची प्रतिज्ञापत्रे सादर केली. शेवटच्या दृश्यापर्यंत हा संपूर्ण सिनेमा राहुल रवैल यांनीच बनवल्याचे या सगळ्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने निर्णय दिला की, हा सिनेमा राहुल रवैल यांनी बनवला असल्याने आपले नाव द्यावे की देऊ नये, हा त्यांच्या इच्छेचा विषय आहे. परंतु, दिग्दर्शकाच्या जागी अन्य कुणाचे नाव देता येणार नाही. मला वाटते, हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील हा असा पहिला सिनेमा असेल, जो इतके प्रचंड यश मिळवून ब्लॉक बस्टर ठरला, पण त्यात दिग्दर्शकाचे नाव मात्र दिसत नाही. तथापि, हा सिनेमा राहुल रवैल यांनी दिग्दर्शित केला असल्याचे साऱ्या इंडस्ट्रीला माहीत आहे. मला राहुलजींच्या बाबतीत घडलेली आणखी एक घटना आठवतेय. राहुलजींचा थोरला मुलगा भरत हा मोठा फोटोग्राफर आहे. दुसरा मुलगा शिव रवैल याने ‘रेल्वे मॅन’ ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. राहुलजींना ही मुले झाली तेव्हा त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरील रिलीजन (धर्म) या रकान्यात त्यांनी ‘इंडियन’ असे लिहिले. तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांना तसे लिहिण्यास मनाई केली आणि या रकान्यात तुमचा धर्म लिहावा लागेल, असे सांगितले. राहुलजी म्हणाले, ‘मी हिंदुस्तानी आहे, माझा धर्म इंडियन आहे, तुम्हाला तसे लिहावेच लागेल.’ राहुलजींनी त्या अधिकाऱ्याला एक लेखी नोटिस पाठवली आणि अखेर त्यालाही ते मान्य करावे लागले. शिव आणि भरत यांच्या जन्माच्या दाखल्यावर धर्माच्या रकान्यात ‘इंडियन’ लिहिले आहे. राहुलजींनी याविषयी मला सांगिल्यावर माझ्या मनातील त्यांच्या विषयीचा आदर दुणावला. या गोष्टीवरुन मला नवाज देवबंदी यांचे दोन शेर आठवताहेत... रोशनी का कुछ न कुछ इमकान होना चाहिए बंद कमरे में भी रोशदान होना चाहिए। माथे पे आप के चाहे कुछ भी लिखा हो सीने पे मगर हिंदोस्तान होना चाहिए। उद्या, म्हणजे ७ एप्रिलला राहुलजींचा वाढदिवस आहे. माझ्याकडून, प्रत्येकाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा! ज्या गाण्याचा किस्सा मी नुकताच तुम्हाला सांगितला, ते ‘लव्ह स्टोरी’मधील गाणे आज राहुलजींसाठी ऐकूया... याद आ रही है, तेरी याद आ रही है... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2025 5:25 am

देश - परदेश:ट्रम्प (असे) कसे घडले?

ट्रम्प यांचे वडील फ्रेड हे अत्यंत कठोर स्वभावाचे रिअल इस्टेट व्यावसायिक होते. त्यांनी आपल्या मुलाला लहानपणीच शिकवले.. ‘जगात फक्त दोन प्रकारचेच लोक असतात. पहिला प्रकार जिंकणाऱ्यांचा किंवा मारणाऱ्यांचा आणि दुसरा प्रकार हरणाऱ्यांचा वा पराजित होणाऱ्यांचा.. या संस्कारांतून वाढलेल्या ट्रम्प यांनी फक्त आणि फक्त जेते किंवा विजयी होण्याचा दृढनिश्चय केला. सध्या जगभर ट्रम्प नावाच्या वादळाने ‘हडकंप’ निर्माण केला आहे. पहिल्यांदाच अमेरिकेच्या तथाकथित शत्रू राष्ट्रांबरोबरच मित्र राष्ट्रांचेही धाबे दणाणले आहे. गंमत म्हणजे, समस्त अमेरिकाही या वादळातून सुटलेली नाही. संपूर्ण जगाप्रमाणेच अमेरिका कुठे जाणार, याबाबत कोणतेही मतैक्य नाही. ट्रम्प एक तर अमेरिकेला अत्युच्च शिखरावर नेणार किंवा त्यांच्या धोरणांमुळे अमेरिका रसातळाला जाणार, असे दोन टोकाचे तर्क सध्या मांडले जात आहेत. या रणधुमाळीचे मुख्य कारण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त दोनेक महिन्यांत शंभराहून अधिक असे ‘कार्यकारी आदेश’ (फतवे) काढले आहेत. आणि हा सपाटा सुरूच आहे. त्यामुळेच जगभर चिंतेचे सावट आणि काळजीचे वातावरण पसरले आहे. आपल्यावर केव्हा गाज कोसळणार, याची प्रत्येक देशाला दहशत वाटत आहे. ‘राजा कालस्य कारणम्’ या वचनाचा शब्दश: अर्थ राजा हा ‘काळ’ घडवतो, असा होतो. प्रत्यक्षात मात्र आपण दोन अर्थ काढू शकतो. पहिला, वर सांगितल्याप्रमाणे आपल्या कार्यकाळावर त्या राजाच्या कर्तृत्वाची पदचिन्हे स्पष्ट दिसतात. तो राज्याला भरभराटीला आणतो, जनतेचे भविष्य उज्ज्वल करतो, असा होतो. दुसरा अर्थ, राजा काळाचे कारण असतो / ठरतो. ‘काळ’ याचा अर्थ मृत्यू किंवा सर्वनाश असा घेतला जाऊ शकतो. सुवर्णकाळ आणि कर्दनकाळ असे दोन्ही ‘काळ’ राजाच्या रुपाने जनतेसमोर येतात. या अर्थाने जगातल्या सर्वांत शक्तिशाली अमेरिकेसाठी ट्रम्प काय ठरतील, तेही ‘काळ’च सांगेल. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे किंवा व्यक्तित्वाचे विश्लेषण अनेक पद्धतीने करता येते. उदा. त्या व्यक्तीच्या निर्णयाची चिरफाड करणे, त्याच्या मित्रमंडळींचा विचारपूर्वक अभ्यास करणे, त्याच्या भूतकाळातील वर्तणुकीची तर्कसंगत मांडणी करुन काही निष्कर्ष काढणे. पण, याचबरोबर अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात की, व्यक्तीच्या बालपणाचा त्याच्या पुढच्या आयुष्यावर आणि कर्तृत्वावर खोल परिणाम होतो. त्यात परिवाराची पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, संस्कार, स्वभाव, परिसर या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे शिक्षण, धर्म आणि मित्र परिवार या गोष्टींचाही खोलवर परिणाम होतोच; पण नंतरच्या काळात या गोष्टी विविध पद्धतीने प्रकट होतानाही जा‌णवतात. उदा. संत ज्ञानेश्वरांच्या बालपणी आलेल्या कटू अनुभवाने त्यांना फक्त शहाणे केले नाही, तर जगाकडे पाहण्याचा एक उदार दृष्टिकोन तयार झाला. म्हणूनच ते संत आणि तत्त्वज्ञ झाले. हिटलरच्या बाबतीत सांगायचे झाले तर, जर्मनीविषयीचा राष्ट्रवाद ‘लिओपोल्ड पोएश’ या त्याच्या माध्यमिक शाळेतच किशोरवयात त्याला प्रभावित करुन गेला. त्याचे शिक्षण अपूर्ण राहिले, कलाकार होण्याचे स्वप्नही पूर्ण झाले नाही आणि त्याला मजुरी करत निराश्रितासारखे वसतिगृहे बदलत जगावे लागले. या सर्वच गोष्टींचा त्याच्या मनावर गंभीर परिणाम झाला असावा आणि त्यातूनच पुढच्या ‘हिटलर’ होण्याचे बीजही रुजले असणार. ट्रम्प यांच्या बाबतीत नेमके काय घडले? त्यांचा डीएनए नेमका काय आहे? परिवार, शिक्षण, शाळा, मित्र, परिसर या सर्व गोष्टी कशा होत्या? या गोष्टींचा विचार केला, तर ट्रम्प नेमके ‘कोण’ आहेत, हे समजायला मदत होईल. ट्रम्प यांच्या मनात डोकावायचे असेल, तर त्यांच्या बालपणाकडे वळून पाहावे लागेल. ट्रम्प यांचे वडील फ्रेड हे अत्यंत कठोर स्वभावाचे रिअल इस्टेट व्यावसायिक होते. त्यांनी आपल्या मुलाला अगदी लहानपणीच शिकवले.. ‘जगात फक्त दोन प्रकारचेच लोक असतात. पहिला प्रकार जिंकणाऱ्यांचा किंवा मारणाऱ्यांचा आणि दुसरा प्रकार हरणाऱ्यांचा वा पराजित होणाऱ्यांचा. जेते आणि पराभूत हे दोनच प्रकार. ट्रम्प याच संस्कारांतून वाढल्याने त्यांनी फक्त आणि फक्त जेते किंवा विजयी होण्याचा दृढनिश्चय केला. फ्रेड अजिबात संवेदनशील पिता नव्हते. कडक स्वभावाचे आणि प्रेम, आपुलकी या शब्दांपासून ते खूप दूर होते. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी तेराव्या वर्षी लष्करी शाळेत पाठवले. उद्देश अतिशय स्पष्ट होता.. तिथे इतरांवर अधिकार गाजवून नियंत्रण ठेवण्याचे शिक्षण मिळावे. त्यांचा चरित्रकार टिमोथी ओब्रियन यांनी, ‘लष्करी शाळेतील सुरूवातीच्या काळातच रांगेत उभे राहिल्याने डोनाल्डच्या थोबाडीत मारले गेले,’ याविषयी लिहिले आहे. अनेकांच्या मते, त्या शाळेतील पाच वर्षांत इतरांना ताब्यात ठेवण्याचे प्रशिक्षणच या महाशयांनी घेतले. ट्रम्प यांच्या नेतृत्व शैलीतील इतरांवर प्रहार करण्याचे, दुसऱ्यांना कमी लेखण्याचे, त्यांची खिल्ली उडवण्याचे कौशल्य ते या शाळेतच शिकले. डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्या आईशी असलेले नातेही फारसे प्रेमाचे नसावे. ते अडीच वर्षांचे असताना ती गंभीर आजाराने पडून राहिली. त्यामुळे आईच्या वात्सल्याच्या आठवणी ट्रम्प यांच्याकडे नाहीत. लहान डोनाल्डला इतर कुठल्याही मुलांप्रमाणे काळजी घेणारी आई हवी होती. पण, तो व्याकूळ होऊन ओरडायचा, तेव्हा त्याच्यावर रागावले जायचे. आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जायचे. आईवडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या डोनाल्डच्या व्यक्तित्वावर या वातावरणाचा फार जबरदस्त परिणाम झाला. आज ट्रम्प काही गोष्टी का करताहेत, याचा उलगडा बालवयातील डोनाल्डच्या अतृप्त भावनिक आणि मानसिक भुकेच्या शोधातून होऊ शकतो. अलीकडेच देशांतर करुन आलेल्या छोट्या मुलांना परिवारापासून अलग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कृष्णवर्णीय जनतेवरची पाळत वाढवली, पहिल्या कारकिर्दीत भाषणांमध्ये कोरोनाविषयी कधीच गांभीर्य दाखवले नाही. या आणि अशा अनेक गोष्टींच्या तारा ट्रम्प यांच्या बालवयातील जडणघडणीशी जोडलेल्या असाव्यात, असे वाटते. मेरी ट्रम्प या त्यांच्या पुतणीने लिहिलेल्या, ‘Too Much and Never Enough : How My Family Created the World's Most Dangerous Man’ हे पुस्तकाचे शीर्षक सर्व काही सांगून जाते. थोडक्यात सांगायचे तर, ‘ट्रम्प कुटुंबाने जगातील सर्वात धोकादायक माणूस कसा तयार केला?’ असे या पुस्तकाचे नाव आहे. त्यामुळेच, दुर्लक्षित बालपणातूनच इतरांच्या विचारांकडे दुर्लक्ष करणारे ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प’ तयार झाले नाहीत ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. (संपर्कः dmulay58@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2025 5:19 am

कव्हर स्टोरी:जल – कारभाराचं घातक ‘प्रदूषण’

गंगा की गटारगंगा..? नद्यांच्या प्रदूषणाकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष वेधल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रदूषित होत असलेल्या नद्यांच्या या अवस्थेच्या मुळाशी जाण्याची आपली तयारी नाही. नद्यांच्या स्थितीवरुन एकमेकांना दूषणे देताना, एकूणच आपल्या ‘प्रदूषित’ जल-कारभाराकडे आपण सोयिस्कर डोळेझाक करत आलो आहोत. नद्या या जीवनवाहिनी असल्याने साहित्य, संस्कृती, धर्म, राजकारण, पर्यावरण आणि एकूणच जीवनात त्यांना मूलभूत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषत: भारतात नद्यांभोवती अनेक धार्मिक श्रद्धा, धारणा आणि आचार-विचार एकवटले आहेत. नद्या या धार्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय भावनांचे प्रतीक बनल्याने कळत - नकळत राष्ट्रीयत्वाशी जोडल्या गेल्या आहेत. आपल्या जीवन व्यवहारातील यश, समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य, आरोग्य, दीर्घायुष्य, रोगनिवारण, पापक्षालन, उदरभरण, प्रेम, संतती, पुण्यसंचय आदी अनेक विषयांशी संबंधित धार्मिक दृष्टिकोनांचा / मूल्यांचा संबंध नद्यांशी जोडण्यात आला आहे. धार्मिक विधींमध्ये शुद्धीकरणासाठी बहुतांश वेळा नद्यांचे जल वापरले जाते. नद्यांच्या उगमस्थानांना आणि संगमांना तीर्थस्थळांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नद्यांमध्ये स्त्रीत्व असल्याचीही एक धारणा आहे. पण, याचा अर्थ काय होतो? तर भारतीय समाजात स्रियांना जशी वागणूक मिळते तशीच ती नद्यांनाही मिळते. एकीकडे तात्त्विक पातळीवर तिचे माता आणि देवता असे उदात्तीकरण केले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र नद्यांना दूषित केले जाते, अतिक्रमण करून त्यांचे प्रवाह आक्रसण्यात येतात. पाण्याचा अतिवापर, प्रवाहांवरील अतिक्रमण आणि पात्रांमध्ये होणाऱ्या प्रदूषणामुळे आपल्या नद्या निर्जीव बनू लागल्या आहेत. आपल्या नद्यांची विदेशातील स्वच्छ, नितळ, प्रवाही नद्यांशी तुलना करताना, त्यांच्या बाबतीत अवाजवी भावनिक दृष्टिकोन ठेऊन वास्तविक भूमिका घेण्याचे मात्र आपण टाळतो. या संवेदनशील मुद्द्यावर केवळ राजकारण न करता, नद्यांच्या स्थितीचा अभ्यास करुन त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. सध्या केंद्राची तसेच राज्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळे अस्तित्वात आहेतच; शिवाय नद्यांच्या स्वच्छतेसाठी सरकारांकडून अनेक अभियानांची घोषणाही झाली आहे. पण, नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी कठोर, काटेकोर आणि एकसमान राष्ट्रीय धोरण नसल्याने कुणाचेच उत्तरदायित्व निश्चित होत नाही. परिणामी नद्यांचे प्रदूषण रोखण्यास ना सरकार यशस्वी होते, ना समाज. खरे तर हा प्रश्न व्यवस्थांच्या तांत्रिक सक्षमतेचा नाही, तर जल-कारभारातील (Water Governance) ‘प्रदूषणा’चा आहे. ते कोण आणि कसे दूर करणार, यावरच नद्यांचे भवितव्य अवलंबून असेल. प्रदूषण-प्रवण पाणी :भूपृष्ठावरील ‘दृश्य स्वरूपातील’ पाणी प्रदूषित होण्याची शक्यता जास्त असते. पण, ते सार्वजनिक मालकीचे असल्याने त्याचे सामूहिक व्यवस्थापन शक्य होते. त्याचे रूपांतर भूजलात झाले की ते ‘अदृश्य’ आणि खासगी मालकीचे होते, तिथे व्यक्तिवाद फोफावतो. हे भूजल प्रदूषित होण्याची शक्यता तुलनेने कमी असते. पाण्याला भावना आणि मूल्ये नसतात. ते आपले उताराकडे वाहते, कोणी अडवले तर अडते, उपसा केला तर परत उताराकडे जाते. समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे, विषामध्ये विष, अमृतामध्ये अमृत, सुगंधात सुगंध आणि दुर्गंधामध्ये दुर्गंध होण्याच्या त्याच्या स्वभावामुळे ते मुळातच प्रदूषण-प्रवण आहे. महाराष्ट्रातील नद्यांची सद्यस्थितीराज्यातील बहुतांश नद्यांच्या प्रवाहात असंख्य अडथळे आणि अतिक्रमणे आहेत. नदीतील पाण्याचा अमाप उपसा आणि प्रचंड वापर होतो आहे. प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. नीती आयोगाच्या मते, देशातील ७० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित आहेत. पावसाळ्यानंतर नदीकडे वाहणाऱ्या भूजलात (बेस फ्लो) लक्षणीय घट झाली आहे. नद्यांसंदर्भातील आकडेवारी आणि माहिती उपलब्ध नसणे किंवा तिची विश्वासार्हता संशयास्पद असणे हा प्रकार नेहमीचा आहे. हवामान बदलामुळे तर आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. जलप्रदूषणाची मुख्य कारणे :- अशास्त्रीय, नियोजनशून्य, बेलगाम शहरीकरण.- पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत होणारे बेजबाबदार औद्योगिकरण.- कारखान्यांतील घातक रसायने, औद्योगिक सांडपाणी विनाप्रक्रिया नद्यांमध्ये सोडणे.- नागरी भागातील मलजल / सांडपाणी, गटारी-नाल्यांचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे.- शेतीतून वाहून जाणारे खते आणि किटकनाशके मिश्रित पाणी नदीत मिसळणे.- जलस्त्रोतांबाबतची बेपर्वाई, पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणातून फोफावलेला चंगळवाद. नियंत्रण व्यवस्था किती सक्षम?जलप्रदूषण रोखणे आणि जलगुणवत्ता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) आणि राज्यस्तरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) या संस्था, पाणी (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम १९७४ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ या कायद्यांनुसार कार्यरत आहेत. राष्ट्रीय जलगुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ‘एमपीसीबी’ पाण्याच्या गुणवत्तेचे संनियंत्रण करते. त्यासाठी जलगुणवत्ता निर्देशांक (Water Quality Index) वापरला जातो. याबाबतचा तांत्रिक तपशील गोदावरी नदीच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यात उपलब्ध आहे. तथापि, या सरकारी यंत्रणांनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने आणि पारदर्शकतेने काम केले असते, तरी बऱ्याच प्रमाणात चित्र बदलले असते. कसे रोखता येईल नद्यांचे प्रदूषण? नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी आणि पात्रालगतची अतिक्रमणे या दोन कळीच्या बाबींसंदर्भात ठोस निर्णय व कारवाई होण्याची आवश्यकता आहे. निळ्या आणि लाल पूररेषा क्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात नगरविकास विभागाच्या ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली’च्या आधारे नगरपालिका, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. या कारवाईसाठी महाराष्ट्र नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हे कायदे तसेच जलसंपदा विभागाचे २ मार्च २०१५ आणि ३ मे २०१८ रोजीचे शासन निर्णय वापरावेत. त्याचवेळी, सर्व प्रकारच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाण्याचा तिसरा स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे. (संपर्कः pradeeppurandare@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 6 Apr 2025 5:08 am

कबीररंग:कबीरांच्या ‘गुरू ज्ञानी’मुळे गंधर्वस्वरांना ‘निर्गुण’स्पर्श

संगीत हे परमेश्वरानं माणसांसाठी दिलेलं वरदान आहे. आजवर अनेक कलावंतांनी संगीताची साधना केली, या कलेसाठी आपलं जीवन समर्पित केलं. ज्यांच्या संगीतसाधनेला संतपरंपरेतील कवित्वाचा स्पर्श झाला आहे, असे कलावंत अध्यात्मधारेतील शाश्वत आनंदाला प्राप्त झाले आहेत. कितीतरी गायकांनी, संगीतकारांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगतगुरू संत तुकाराम, संत नामदेव तसेच कबीर, तुलसीदास, सूरदास आणि मीरेसारख्या अनेक संतांच्या भक्तिरचना गायनासाठी निवडल्या. त्यांची ही निवड अद्भुत आहे, कारण या रचनांना संगीतात्मक आणि गीतात्मक महत्त्व आहे. विशेष म्हणजे, या रचना उपलब्ध संकलनांमध्ये सापडल्या नाहीत तेव्हा त्यांनी त्यांचं संशोधन केलं. एवढे कष्ट त्यांनी वेचले म्हणून तर आध्यात्मिक आनंदाचा ठेवा आपल्यापर्यंत पोहोचला. संतांच्या भक्तिरचना गाणाऱ्या गायकांनी आणि संगीतकारांनी आपल्यावर हे मोठे उपकार केले आहेत. इथं आपल्यासाठी कुमार गंधर्वांचे उदाहरण अगदी प्रेरक ठरेल. संतवाणीचे पुष्कळसे ग्रंथ सगळ्या वाचकांच्या हाती लागले नाहीत. कुमारजींसारख्या भक्तिरचनेतील अंत:संगीत जाणणाऱ्या गायकाच्या हाती मात्र ते लागले. कुमारजी कबीरांच्या पदांच्या गायनामागची प्रेरणा सहजपणे सांगतात, ती अशी : देवासमध्ये ज्या बंगल्यात ते राहत असत, त्याच्या व्हरांड्यात एकेदिवशी आरामखुर्चीत बसलेले असताना तिथं एक भिक्षेकरी भीक मागण्यासाठी आला. कबीरांचं ‘सुनता है गुरू ज्ञानी..’ हे पद तो गात होता. त्यानं गायलेले अंतऱ्यातले शब्द तसे स्पष्टपणे पोहोचत नव्हते. पण, कुमारजी म्हणतात की, त्या पदाचे स्वर निर्गुणी भजनाचे होते. त्या स्वरांनी त्यांना वेड लावलं. मग त्यांनी एक ध्यासच घेतला. गंमत अशी की, हे पद सतत ते गुणगुणत राहिले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीच ते निर्गुणी भजन स्वरबद्ध केलं. आपल्या मनाला प्रश्न पडतो की, भजन निर्गुणी असतं म्हणजे काय असतं? निर्गुण म्हणजे सत्त्व, रज आणि तमविरहित सद्गुण होय. चित्त निरूपाधिक असण्याची स्थिती म्हणजे निर्गुणता. कुमारजी म्हणतात, निर्गुणामध्ये बाहेरचं जग शून्य करण्याचा सद्गुण असतो. हे ‘काही नाहीपण’ अद्भुत असतं. तेच आपल्याला आत्म्याशी जोडतं. कुमारजींच्या सांगण्यात कबीरांच्या जीवनातील स्वाभाविकता आहे. ती गाणाऱ्याला जाणवल्याशिवाय त्याच्या स्वरांत उतरणार नाही. गाणारा कबीरांएवढाच आर्त झाल्याशिवाय निर्गुणी भजन त्याला उत्कटपणे गाता येणार नाही. निर्गुणी भजन गाताना एकांतातली गोष्ट व्यक्त झाली पाहिजे, असं कुमारजी म्हणत. पुढं कुमारजींना कबीरांच्या पदांची गोडी लागली. त्यांनी ‘मैं जाँगू म्हारा सतगुरू जागे, आलम सारा सोवे..’, ‘माया महाठगिनि हम जानी..’, ‘रमैय्या की दुलहन ने लूटा बजार..’, ‘उड जायेगा हंस अकेला..’ , ‘नैया मोरी नीके नीके चालन लागी..’ अशा पदांचं गायन केलं. हे गायन संगीताची जाण असणाऱ्यांना आवडलं तसं भक्तिभाव असणाऱ्यांनाही आवडलं. कबीर अनासक्त होऊन आपल्या पदांतून देहभाव, मनोभाव आणि बुद्धिभाव वेगळा करतात. आत्मभाव जागवतात. पदं ऐकणारा ऐकता - ऐकता भवतालापासून अलिप्त होत जातो. भवताल विसरून अंतरात पोहचतो. या अंतरात कुणीच नसतं. आता ऐकणाऱ्यासाठी भौतिक रूपातही एकांत असतो. कबीरांच्या ‘निरभय निरगुन गुन रे गाऊँगा..’ यांतली निर्भयता स्वरबद्ध करताना कुमारजींना ते तीव्रतेनं जाणवतं. हे पद थेट नाभीतून गायलं जातं, चेतना उंचावत राहतं. त्यांच्या ‘युगन-युगन हम योगी..’ मध्येही हेच आहे. कबीर स्वत: गात होते की नाही, ते आपल्याला ज्ञात नाही. पण, कबीरांचं सर्वाधिक प्रातिनिधिक गायन कुणी केलं असेल, तर ते कुमार गंधर्व यांनीच केलं आहे. कबीरांनी आपल्या भक्तिरचना त्यांच्या समकालात किंवा पुढं कुणी गाव्यात म्हणून लिहिल्या नाहीत. त्यांच्यावर कुणी विद्वानानं भाष्य करावं म्हणूनही त्या लिहिल्या नाहीत. कबीरांची पदं, दोहे ही त्यांच्या आध्यात्मिक जगण्याची फलश्रुती आहे. कुठलाही संत हा संत होण्याच्या हेतूनं भक्तिरचना करत नाही. ईश्वरावरील परमप्रेमातून त्याची ही कृती सहजपणे घडत असते. त्याच्या सहज, निरपेक्ष, करुणामय जगण्यातून कवित्व आणि संतत्व फुलत असतं. पुढं हेच सकळांसाठी आणि सर्वकाळासाठी प्रेरक होतं. कुमारजींसारखा एक प्रतिभावंत गायक कबीरांच्या भक्तिरचनांतून सृजनासाठीची प्रेरणा घेतो, हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरक आहे. कबीर आध्यात्मिक मार्गावरील भक्तांना जवळचे आहेत; तसंच ते सृजनशील कलावंतांनाही जवळचे आहेत, हे अगदीच खरं आहे. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2025 5:58 am

रसिक स्पेशल:‘अर्थ’संपन्न आयुष्यासाठी उभारू मराठीची गुढी!

सर्वांना नववर्षाच्या दोन दोन शुभेच्छा! पहिल्या शुभेच्छा दोनच दिवसांनी, १ एप्रिलला नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे म्हणून आणि दुसऱ्या शुभेच्छा अर्थातच गुढीपाडव्याच्या, कारण आज मराठी नवीन वर्षाचा आरंभ होतो म्हणून. या दोन्ही नव्या वर्षांचे स्वागत करताना मनात विचार येतो की, अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारने मराठीचा सन्मान केल्याने एकाएकी तिच्यातील मरगळ संपून मराठी गौरव गीते गायिली जात आहेत. खरे तर मराठी भाषा आधीपासून अभिजात होती आणि आहेच, पण आता त्याबद्दल खूप बोललं, लिहिलं जाऊ लागलं आहे. मग या सगळ्यांचा मराठी भाषिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी काही लाभ होणार का? असाही सूर उमटतो आहे. त्यामुळे मराठी नववर्ष आणि आर्थिक नववर्ष असा दुहेरी योग गाठून मराठी भाषेच्या अर्थकारणाचा विचार करू... गोदाकाठच्या सातवाहन राजा हालने इ. स. पूर्व २०० मध्ये लिहिलेल्या गाथा सप्तशतीमधल्या काव्यातूनही त्या काळातील निसर्ग, समाजरचना आणि व्यवहारांबद्दलची माहिती मिळते. भाषिक व्यवहार हा फक्त साहित्यिक नसतो, तर आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक असतो. भाषा ही माध्यम असल्याने ती आयुष्यातील प्रत्येक घटकाला स्पर्श करते. प्रामुख्याने ती आपल्या जगण्याच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची ठरते. उदाहरण द्यायचे, तर स्थानिक व्यापाऱ्यांशी आपण मराठीतून खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करतो. पण, राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यांतील ग्राहकांशी किंवा व्यापाऱ्यांशी व्यवहाराची वेळ येते, तेव्हा हिंदी किंवा इंग्रजी वापरावी लागते. हाच आर्थिक व्यवहार आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो, तेव्हा इंग्रजीशिवाय पर्याय नसतो, कारण इंग्रजी ही आता जगाने व्यवहाराची भाषा म्हणून मान्य केली आहे. म्हणून जगातील बहुतेक देश आयात-निर्यातीचे करार इंग्रजीतच करतात. हेच उदाहरण उलट पद्धतीने घेऊ. ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपली बाजारपेठ वाढवायची आहे, त्यांना भारतात यायचे झाले तर प्रामुख्याने हिंदी आणि स्थानिक भाषांचा विचार करावा लागतो. कारण स्थानिक ग्राहकाशी त्याच्या मातृभाषेतून बोलले तरच त्याच्याशी भावनिक जवळीक वाढणार असते. उदाहरणार्थ, ट्रॅक्टर तयार करणारी कंपनी आंतरराष्ट्रीय असली, तरी त्यांना ट्रॅक्टर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विकायचा असेल, तर त्याला समजेल अशा भाषेतून म्हणजे मराठीतून जाहिरात करावी लागते. ती विविध माध्यमांतून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी लागते. त्यासाठी शेतकरी काय पाहतो, वाचतो याचा अभ्यास करावा लागतो. तो पंढरीच्या वारीला जात असेल, तर त्या मार्गावर त्याला दिसेल अशा जाहिराती कराव्या लागतात. याचाच अर्थ, ग्राहक हा राजा असेल, तर तो म्हणेल त्या भाषेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्यवहार करावे लागतात. थोडक्यात, ज्या भाषेत सर्व राज्य व्यवहार, न्यायनिवाडा आणि व्यापार-उदीम चालतो, ती भाषा तिच्या वापरामुळे टिकून राहते, नवनव्या शब्दांची भर घालून वाढत राहते. मराठीला समृद्ध बनवायचे असेल, तर आधी सर्व कायदे, न्यायनिवाडे, बँकेतील व्यवहार, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची पाठ्यपुस्तके मराठीतून व्हायला हवीत. फक्त कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, चित्रपटांतून येणारी सांस्कृतिक मराठी म्हणजे तिचा वापर नव्हे, तर सामान्य माणूस दैनंदिन व्यवहारात किती मराठी वापरतो, याला फार महत्त्व आहे. मराठी माणूस कोणीही परभाषिक व्यावसायिक दिसला की झटकन आपल्या तोडक्यामोडक्या हिंदीत किंवा इंग्रजीत बोलायला लागतो. जणू काही मराठीतून बोललो तर समोरची व्यक्ती वस्तू विकणार नाही किंवा नीट सेवा देणारच नाही! ही व्यवहारातील भाषिक मानसिक गुलामगिरी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यांनी फारसी आणि अरबीचे आक्रमण रोखण्यासाठी राज्यव्यवहार कोश तयार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही भाषाशुद्धी चळवळ राबवली आणि इंग्रजीतील अनेक शब्दांना पर्यायी शब्दांची निर्मिती केली. हे सर्व शब्द आजही आपण सहजपणे वापरतो. हा एका अर्थी भाषिक स्वातंत्र्याचा लढाच होता. इंग्रजी भाषा समृद्ध झाली, कारण त्यांनी सातत्याने सर्व भाषांतील शब्द जसेच्या तसेच उचलले आणि इंग्रजीतून वापरात आणले. त्यामुळे ती जागतिक भाषा झाली. मराठीलाही त्या उंचीवर आपली गुढी उभारायची असेल, तर जागतिक ज्ञान मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावे लागेल. या संदर्भात आपण कुठे आहोत, हे पाहताना जे चित्र दिसते ते अगदीच निराशाजनक नाही. जगातील १४ कोटींहून अधिक लोक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची, तर जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. ज्ञानकोश, विश्वकोश, शब्दकोश, संस्कृतिकोश आदी शेकडो कोश निर्माण करणारी मराठी भाषा मुळातच समृद्ध आणि संपन्न आहे. फक्त आपण तिचा आवर्जून वापर करत नाही. या आर्थिक नववर्षाच्या निमित्ताने, सगळे अर्थव्यवहार मराठीतून करायचा निर्धार मराठी भाषिकांनी करायला हवा. बँकेतील सही मराठीत असावी, तेथील सर्व व्यवहारांची नोंद मराठीतून ठेवण्याचा आग्रह असावा, व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी समाजमाध्यमांचा वापर मराठीतून करावा, ई कॉमर्स संकेतस्थळांवरुन मराठीतून वस्तू मागवाव्यात, ‘ओटीटी’वर मराठी भाषेतून जगभरातील चित्रपट आणि मालिका पाहाव्यात, इंटरनेटवर मराठीतून माहिती घ्यावी, साधे मेसेजही मराठीतूनच लिहिले जातील, हे पाहावे. यामुळे काय होईल की, मराठी भाषेला प्रचंड मागणी आहे, हे इंटरनेटला समजेल. या प्लॅटफॉर्म्सनी वापरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला कळेल की मराठी भाषेतून खूप व्यवहार होत आहेत. मग ते सर्व तंत्रज्ञान मराठीतून आणण्याचा प्रयत्न करतील. स्वाभाविकच मराठीत सगळे ज्ञान उपलब्ध झाल्याने तिचा वापरही वाढेल. भारतातील सर्वात जास्त क्रयशक्ती असलेल्या प्रदेशांत महाराष्ट्राचा समावेश होतो. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकच्या परिघातील चार कोटींहून अधिक मराठी भाषिक सर्वांत जास्त खरेदी करतात. या सर्व ग्राहकांनी सगळे आर्थिक व्यवहार मराठीतून करायचे ठरवले, तर स्वाभाविकच मराठीतून जाहिराती तयार होतील, त्या दाखवण्यासाठी मराठीत बातमीपत्रे आणि मालिका बनवाव्या लागतील. मराठी दैनिके, मासिके आणि नियतकालिके या जाहिरातींमुळे वाढतील. एकंदरीतच सृजनशील, प्रतिभावान मराठी लोकांची मागणी वाढेल. मराठी उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. मराठी वस्तू आणि सेवांना जगभरातून मागणी वाढली, तर जगभरातील लोकांनाही व्यवहारासाठी मराठीचा वापर करावा लागेल... मराठीच्या उत्कर्षाचे हे स्वप्न साकारण्यासाठी आजच्या इतका दुसरा चांगला मुहूर्त कुठला असेल? चला तर मग, नवसंवत्सराची अन् नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात करताना, आपल्या आयुष्याच्या ‘अर्थ’संपन्नतेसाठी मराठी भाषेची गुढी उभारुया! (संपर्कः prasadmirasdar@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2025 5:29 am

वेबमार्क:'बझ' भारतीय ‘टॅटू’चं जागतिक गोंदण!

सामान्यत: ज्या कला लोकांच्या जाणिवांशी घट्ट निगडीत नसतात, त्यांच्याविषयी समाजमनात फारसे आकर्षण नसते. मात्र, समाजाच्या विविध वयोगटांपैकी तरुण पिढीशी कनेक्ट असणाऱ्या एखाद्या गोष्टीवर आधारलेला सिनेमा अथवा माहितीपट ट्रेंडमध्ये आला की त्यावर समाजमाध्यमांत चर्चा सुरू होते. अशाच धाटणीतला ‘बझ’ हा माहितीपट २८ फेब्रुवारीला जिओ हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. भारतातील प्रसिद्ध टॅटू कलाकारांपैकी एक असलेल्या एरिक डिसूझा यांचा प्रवास दाखवणारा हा माहितीपट कला आणि व्यक्तिविकास यांच्यातील संबंध व त्याचे महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो निव्वळ माहितीपटापेक्षाही एक हळूहळू उलगडत जाणारी हृदयस्पर्शी कहाणी बनला आहे. व्यक्तीच्या जडणघडणीची सालपटे निघत जावीत, तसा त्यातील घटनापट समोर येतो. ‘बझ’चा विषय केवळ टॅटू काढण्याचा वा त्याच्या माहितीचा नाही, तर त्याआडच्या सामाजिक भावनांचा आहे. विविध वयातले लोक त्याकडे कसे पाहतात, यावरही त्यात कटाक्ष टाकला आहे. पूर्वीच्या काळी शरीराच्या विविध भागांवर गोंदवलं जायचं. त्यामध्ये आणि आताच्या लक्षवेधी टॅटूमध्ये काय फरक आहे, याचे मर्म माहितीपटात उत्तमपणे उलगडले आहे. नादिष्ट, नशेडी, क्रिंज, ठरकी, वाह्यात, छंदीफंदी, लक्ष वेधून घेऊ इच्छिणारे वा आकर्षणकेंद्री लोकच टॅटू काढतात असा समज रूढ आहे. तो कशामुळे रूढ आहे, याचा वेधक शोध यात घेतला आहे. मुंबईच्या रस्त्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीपर्यंतचा एरिकचा प्रवास ‘बझ’मध्ये चित्रित झाला आहे. टॅटूची कलाकृती एखाद्याच्या वैयक्तिक आवडनिवडीची, स्वभाव-गुणवैशिष्ट्यांची माहिती देत व्यक्तिविशेषाच्या बाबतीतले छुपे सत्य कसे समोर आणते, हे पाहण्यासारखे आहे. अंगावर गोंदलं जावं की नको, याविषयी आपल्यात मतभेद असूनही आपल्या सर्वांच्या मनात त्याचे स्वरूप एका हव्याहव्याशा अनुभूतीचे आहे. वास्तवात हा एक वैयक्तिक स्तरावरचा सर्वसामान्य मानवी अनुभव आहे. मात्र, तो दृश्य स्वरूपात इतरांच्या नजरेला पडत असल्याने ज्याने टॅटू काढून घेतलेला असतो, त्याच्या मनातले त्या विषयीचे भाव आणि त्याच्या टॅटूकडे पाहणाऱ्या इतरेजनांचे भाव नक्कीच भिन्न असतात. या दोन्हींची सांगड कशी घालणार, याचे मजेदार उत्तर ‘बझ’ देतो. एरिक डिसूझा यांची या क्षेत्रातील कारकीर्द तब्बल वीस वर्षांची आहे, यावरूनच या माहितीपटातली रंगीनियत लक्षात यावी! एरिक एका रात्रीत सर्वोच्च स्थानी पोहोचले नाहीत. त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलाय, तो स्क्रीनवरच पाहणे इष्ट! अनेक अडथळ्यांची शर्यत त्यांनी पार केली, अनेकदा अपयशही आले. पण, खचून न जाता ते पुढे जात राहिले. दिग्दर्शक माहिर खान यांनी या माहितीपटाच्या चित्रीकरणासोबतच एका अर्थाने एरिकच्या कलाकृतीही डिजिटल रुपात जतन केल्या आहेत. काहींना ही सर्व अतिशयोक्ती वाटू शकते, मात्र ज्या वेगाने तरुणाई आणि नवी टीनएजर पिढी या कलेकडे आकृष्ट होतेय, ते पाहता काही वर्षांनी टॅटू हा बहुताशांच्या देहभागांचा घटक झालेला असेल. लोकांचे सामाजिक, लैंगिक, वैयक्तिक दृष्टिकोनही त्यावरूनही निश्चित केले जातील. ‘बझ’च्या काही दृश्यांमध्ये टॅटू कसा काढला जातो नि विविध अवयवांवर टॅटू काढला जाताना कोणती दक्षता घ्यावी लागते, याची अतिशय रंजक माहिती मिळते. टॅटूचे आरेखन कसे होते, त्यात रंग कसे भरले जातात आणि त्याचे अंतिम टचअप कसे केले जाते, याचे विश्लेषण रंजक आहे. एरिक यामध्ये एकेठिकाणी सांगतात की, टॅटू काढणं हे कलेच्या परिवर्तनशीलतेविषयी सकारात्मक असण्याचं लक्षण आहे. लोकांना मनोआघात आणि अव्यक्त वेदनांवर मात करण्यासाठी तसेच सामाजिक सीमा ओलांडण्यास टॅटू कामी येऊ शकतो. एरिकचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम म्हणजे त्याच्या पत्नीच्या हातावरचा अत्यंत आखीवरेखीव बोलका टॅटू, ज्याला आंतरराष्ट्रीय टॅटू परिषदांमध्ये सहा पुरस्कार मिळाले आहेत. या टॅटूमध्ये टिपलेले तपशील आणि त्यातील गूढतेचे प्रमाण एरिकमधल्या कलाकाराच्या कौशल्याचा पुरावा आहे. एरिक वास्तववादी आणि ऑर्गनिक टॅटूमध्ये तरबेज आहेत, याची साक्ष जागोजागी येते. फ्री स्टाइल टॅटूवर त्यांचे हात सफाईदारपणे काम करतात. पूर्ण शरीरभरून काम करण्यासाठी केवळ अधिक शाई आणि संयम लागतो असे नव्हे, तर त्या जटिल प्रक्रियेसाठी वचनबद्ध क्लायंटची आवश्यकता असते. त्याशिवाय टोटल बॉडी टॅटू काढता येत नाही. अर्ध्यात सोडून दिलेले टॅटू विद्रूपीकरणास हातभार लावतात. ‘बझ’मध्ये एरिक डिसूझा, रॉबिन बहल, जोसी पॅरिस रेंटली, सचिन आरोटे, दीप कुंडू आणि व्हायलेट डिसूझा यांची प्रमुख कामे आहेत. अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क अंतर्गत अन्य सहनिर्मात्यांनी याची निर्मिती केली आहे. एका वेगळ्या विषयाची रंजक माहिती अनुभवण्यासाठी ‘बझ’ लक्षात राहील.जाता जाता... या महिन्यातील आवर्जून पाहण्यासारख्या मल्याळी थ्रिलर सिनेमांमध्ये.. सूक्ष्मदर्शिनी (जिओ हॉटस्टार), पानी, रेखाचित्रम (सोनी), गोलम (ॲमेझॉन) ही नावे महत्त्वाची. (संपर्कः sameerbapu@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2025 4:53 am

गोष्ट सांगतो ऐका...:चुरमा

निरंजन फोनवर बोलत होता, ते आता रीनाला भयंकर वाटत होतं. वाटणारच. कारण तो समोरच्या माणसाला बायकोच्या खुनाची तयारी कशी चालू आहे, हे सांगत होता... सकाळी निरंजन जरा लवकरच उठला झोपेतून. दोन दिवस लोणावळ्यात जायचं होतं राहायला. बायको म्हणत होती, सोबत येते म्हणून. पण, निरंजन ‘नाही’ म्हणाला. त्याला काम होतं तिथं. ‘मी सुटीसाठी नाही चाललो,’ म्हणाला. थोडी चिडचिड झालीच. निरंजन आवरून डायनिंग टेबलपाशी आला. समोर शिळ्या पोळीचा चुरमा बघून तर तिडीक गेली त्याच्या डोक्यात. या आठवड्यात तिसऱ्यांदा त्याच्या समोर तोच नाश्ता होता. निरंजन बायकोवर भडकला. दोघांची चांगलीच वादावादी झाली. भांडण झालं की, निरंजन एकटाच बोलत राहतो. बायको मोठ्या आवाजात टीव्ही लावते. ती मुळीच लक्ष देत नाही. निरंजन तसाच नाश्ता न करता निघून गेला. लोणावळ्याला जाणारी एसी बस पकडली. काही वेळ खिडकीबाहेर बघत राहिला. शहरातली गर्दी आणि त्याच त्याच जाहिराती असलेली होर्डिंग बघून त्याचा वैताग आणखी वाढला. होर्डिंगवर असलेल्या प्रसन्न चेहऱ्याच्या बायकाही आपल्या नवरोबाला शिळ्या पोळीचा चुरमाच खाऊ घालत असणार, असं काहीबाही त्याच्या मनात आलं. हळूहळू एसी आपला रंग दाखवू लागला. चुरमा हा विषय डोक्यातून जाऊन निरंजन पुन्हा एकदा डोळे मिटून झोपण्याच्या तयारीत होता. लोणावळ्यात दोन दिवस खूप काम होतं. कामाचे विचार डोक्यात चालूच होते. मागच्या सीटवर बसलेली रीना खूप वेळापासून विचार करत होती. अचानक तिला आठवलं की, हा तर आपल्या मैत्रिणीचा नवरा आहे. उल्काचा नवरा. खूप दिवसांनी बघत होती ती निरंजनला. खरं तर उल्का तिच्या कॉलेजमध्ये होती. पण, रीना नोकरीसाठी सिंगापूरला गेली. सगळ्यांशी संपर्क तुटला. मग इन्स्टावर मैत्रिणींची खबरबात. म्हणजे फक्त फोटो. लग्नाचे, पार्टीचे.. त्यातूनच तिला काही चेहरे ओळखीचे झाले होते. उल्का अधूनमधून निरंजनसोबत फिरायला गेल्याचे फोटो टाकायची. तिला त्यातूनच आठवलं. तिने पुन्हा उल्काचं इन्स्टा चेक केलं. तोच होता. तिला वाटलं, लगेच बोलायला सुरूवात करावी. पण, तिला काही अर्जंट मेल करायचे होते. आधी ते काम उरकून टाकू, असा विचार करून ती टाइप करू लागली. दरम्यान तिनं उल्काला मेसेज केला. खरं तर खूप वर्षांनी ती उल्काशी बोलत होती. उल्काने अजून रिप्लाय केला नव्हता. रीना मेल टाइप करत राहिली. निरंजन छान झोपी गेला होता. पण, अचानक फोन वाजला. रीनाने लॅपटॉपमधून डोकं वर करून पाहिलं. अतिशय डोक्यात जाणारी रिंगटोन होती. एका जगप्रसिद्ध क्राइम सिरियलची.. निरंजनने फोन उचलला. नाराजीनेच. रीनाला आश्चर्य वाटलं. एवढा साधा-सरळ दिसणारा निरंजन अशी खतरनाक रिंगटोन कसा ठेऊ शकतो? त्यातच झोपेतून उठला म्हणून तो अतिशय हळू आणि वैतागून बोलत होता. रीनाला वाटलं, नको या माणसाशी बोलायला, केवढा मग्रूर वाटतोय. ती मेल टाइप करू लागली. पण, मनात नसतानाही निरंजनचा आवाज तिला येतच राहिला. ती खूप ठरवत होती की, आपण आपलं काम करावं. पण, तो फोनवर बोलत होता, ते आता तिला भयंकर वाटत होतं. वाटणारच. कारण निरंजन समोरच्या माणसाला बायकोच्या खुनाची तयारी कशी चालू आहे, हे सांगत होता. बायकोचा विषय संपवायचा होता त्याला. आणि तोही आजच्या आज. रीना हादरून गेली. केवळ दोन मिनिटांत सगळी गोष्ट बदलून गेली होती. इन्स्टाग्रामवर निरंजनसोबतचे रोमँटिक फोटो टाकणारी उल्का.. कधी कधी तिचे फोटो बघून हेवा वाटायचा रीनाला. किती गोड जोडी आहे, असं वाटायचं. रीनाचा नवरा एका मोठ्या कंपनीत सेल्स हेड असल्यामुळं त्याला फार कमी वेळ मिळायचा. तिने एक-दोनदा त्याला उल्काचे फोटो दाखवले होते. लोक किती छान एन्जॉय करतात वगैरे सांगितलं होतं. तिच्या नवऱ्याने नेहमीच्या निर्विकारपणे पाहिलं होतं. ते सगळं रीनाला आठवलं. आणि आता ती भलतंच काहीतरी ऐकत होती. अर्जंट मेल टाइप करणं तिने बाजूला ठेवलं. ती बारकाईने निरंजनचा फोन ऐकू लागली. निरंजन फोनवर सांगत होता की, अडीच तासात तो लोणावळ्यात पोहोचेल. तोपर्यंत बायकोच्या खुनाची सगळी प्लॅनिंग झालेली असेल. उद्याचा दिवस तो लोणावळ्यात असणार आहे. लोणावळ्याहून परत जायच्या आधी बायकोचा खून झालेला असेल. आता आणखी वेळ वाया घालवणार नाही. रीना हादरून गेली होती हे ऐकून. तेवढ्यात तिला उल्काचा रिप्लाय आला. इन्स्टाग्रामवर. उल्का आनंदात विचारत होती, ‘कशी काय आठवण काढलीस?’ रीनाने तिला थेट प्रश्न केला.. ‘तुझं काही भांडण बिंडण झालंय का निरंजनशी?’ उल्का घाबरून गेली. एक तर रीनाने तिला किती तरी वर्षांनी मेसेज केला होता. त्यात पहिलाच प्रश्न हा असा. आणि आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे, तिचं सकाळी निरंजनशी खरंच भांडण झालं होतं. पण, ही गोष्ट रीनाला कशी कळली? उल्काला वाटलं, निरंजनने आपलं भांडण झाल्याचं सोशल मीडियावर तर नाही टाकलं? तिने चेक केलं. पण, तसं काही नव्हतं. उल्काने रीनाला फोन केला, पण तिने उचलला नाही. मेसेजवर बोलू म्हणाली. रीनाला तिला घाबरवायचं नव्हतं. तिने खुनाबद्दल काही सांगितलं नाही. फक्त म्हणाली.. तू फक्त घरी थांबू नको, काहीतरी डेंजर घडणार आहे. पण, डोन्ट वरी. मी आहे.. रीना तशी खमकीच होती. उल्का रडवेली झाली. पण, मैत्रिणीच्या सांगण्यावरून आहे तशीच बाहेर पडली. जवळच तिची मावशी राहात होती. तिच्या घरी गेली. इकडं निरंजन फोन ठेऊन पुन्हा शांत झोपला. जणू काही घडलंच नाही. रीना त्याच्या शांत चेहऱ्याकडं बघत होती. किती थंड आणि क्रूर गुन्हेगार आहे हा माणूस, असा विचार तिच्या मनात आला. तिने पोलिसांना मेसेज सुरू केले. लोणावळ्याला गाडी थांबली. पोलिसांनी निरंजनला ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली. पण, प्रकरण भलतचं होतं . निरंजन एक टीव्ही मालिका लेखक. त्यातल्या हिरोच्या मनात बायकोचा खून करायची गोष्ट चालू असते. ती लिहिण्यासाठी निरंजन लोणावळ्यात निघालेला होता. तेच तो दिग्दर्शकाला सांगत होता. लोणावळ्यात जाऊन खुनाचं पूर्ण प्लॅनिंग करतो, हे सांगत होता. खूप दिवस तो ट्रॅक लिहायचं राहून जात होतं.. रीनाला कळल्यावर ती उल्काला फोन करून ‘सॉरी’ म्हणाली. उल्का म्हणाली, अगं, तो टिव्ही मालिका लिहितो. दर महिन्याला कुणाच्या तरी खुनाचं प्लॅनिंग करत असतो.. इकडं निरंजन इन्स्पेक्टरना सांगत होता की, बायकोशी चुरम्यावरुन भांडण झालं, हे खरं आहे. पण, हे काही खुनाचं कारण असू शकत नाही. इन्स्पेक्टर म्हणाले, मी समजू शकतो. मी पण गेल्या दोन वर्षात दोनशे वेळा शिळ्या पोळीचा चुरमा खाल्लाय, तरी असा विचार एकदाही माझ्या डोक्यात आला नाही.. दोघंही कसनुसं हसले. (संपर्कः jarvindas30@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2025 4:48 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:'जगदीप' यांनी ॲक्टिंगला दिला होता नकार; असरानी यांनी तारखा न दिल्यामुळे निर्मात्याने गाठले होते घर

फिल्म इंडस्ट्रीतील प्रख्यात विनोदी अभिनेते जगदीप यांचा काल जन्मदिवस होता. त्यांना मी ‘भाईजान’ म्हणायचो. मी मुंबईत आलो तेव्हा सुरूवातीच्या काळात माझी ज्यांच्याशी ओळख झाली, अशा मोजक्या लोकांपैकी जगदीप भाईजान हे एक होते. ते सिनेमांमध्ये धमाल कॉमेडी करायचे, पण खासगी आयुष्यात मात्र गंभीर व्यक्ती होते. मी त्यांचा तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे, तो १९९३ चा आहे. ऋषी कपूर आणि तब्बू यांची भूमिका असलेल्या ‘पहला पहला प्यार’ या माझ्या सिनेमाचे काम सुरू होते. त्यामध्ये एका वृत्तपत्राच्या संपादकाची भूमिका होती आणि त्यासाठी असरानी यांना घेतले होते. पण, त्यांचे शूटिंग होणे बाकी होते. सिनेमाच्या इतर दृश्यांचे शूटिंग सुरू होते. त्यासाठी नटराज स्टुडिओमध्ये रेस्टॉरंटचा सेट लागला होता. तिथे संपादकाच्या व्यक्तिरेखेचे काम नव्हते, म्हणून असरानीजींची तारीख घेतली नव्हती. सिनेमाची कथा हनी ईराणी यांची होती. त्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचल्या. आम्ही रेस्टॉरंटमधील दृश्याविषयी बोलत होतो. हनीजी म्हणाल्या की, रेस्टॉरंटमधील हा प्रसंग खूप गंमतीशीर आहे. यामध्ये कथेतील वृत्तपत्राचा संपादक सामील झाला, तर आणखी मजा येईल. कसे वाटतेय? मी दिग्दर्शक मनमोहन सिंह यांना ही कल्पना सांगितली, त्यांनाही ती आवडली. निर्माते बी. एस. शाद यांनी असरानींजींशी संपर्क साधला आणि काहीही करुन शूटिंगसाठी एवढे दोन दिवस काढा, असे सांगितले. असरानीजी म्हणाले की, मी मुंबईत असतो तर काही करुन शूटिंगसाठी वेळ काढला असता. पण, मी मुंबईत नाहीय, आऊटडोअर शूटिंगला जातोय.. त्यांच्या उत्तरामुळे सगळे जण विचारात पडले की, आता असरानीजींच्या जागी कुणाला घ्यायचे, जो चांगला अभिनेता तर हवाच, पण या दोन दिवसांतच शूटिंग असल्याने लगेच त्याच्या तारखाही मिळतील. आणि अचानक जगदीप भाईजान यांचे नाव डोक्यात आले. हे नाव ऐकताच सगळ्यांची उत्सुकता वाढली. काही जण म्हणाले, जगदीप भाईजाननाच घ्या.. काय भारी रिअॅक्शन देतील, एकदम मस्त कॉमेडी होईल.. मग शाद साहेबांनीही, मी जगदीप भाईजानशी बोलतो, असे सांगितले. ते त्यांना भेटायला गेले. भाईजाननी त्यांचे स्वागत केले. मनमोहन सिंह, ऋषी कपूर यांची नावे ऐकून खूप खूश झाले. शाद साहेबांनी त्यांना सांगितले.. विषय फक्त एवढाच आहे की तुम्हाला उद्याच हे शूटिंग करावे लागेल. जगदीप भाईजान त्यांना म्हणाले, ‘उद्या? याचा अर्थ एकतर मी तुमची पहिली निवड नाही किंवा ही भूमिका फारशी महत्त्वाची नाही. तसे नसते तर शूटिंगच्या एक दिवस आधी कोणत्याही अभिनेत्याला निवडले जात नाही.’ हे ऐकून शाद साहेबांनी उत्तर दिले.. ‘तुमचे म्हणणे खरे आहे. आम्ही आधी असरानी साहेबांना घेतले होते, पण ते मुंबईच्या बाहेर आहेत आणि नेमके उद्या शूटिंग आहे. त्यामुळे आम्ही असा विचार केला की, असा कोणता अभिनेता आहे, जो तितकाच चांगला आणि उपलब्धही होऊ शकेल?’ त्यावर जगदीप भाईजान म्हणाले, ‘माझ्यापेक्षा दिलीपकुमार चांगले अभिनेते आहेत आणि सध्या उपलब्धही आहेत. त्यांच्याकडे जा आणि त्यांना घ्या..’ अशा प्रकारे जगदीप भाईजान यांनी नकार दिला. त्यांच्याकडे अशी धमक आणि उमदेपणाही होता. या गोष्टीवरून मला राहत इंदोरी यांचा एक शेर आठवतोय... बादशाहों से भी फेंके हुए सिक्के न लिए हमने ख़ैरात भी माँगी है तो ख़ुद्दारी से... साधारण त्याच काळातील हा दुसरा किस्सा.. मी काही कामानिमित्त हॉटेल होरायझनमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे शूटिंग सुरू होते. माहिती घेतल्यावर कळले की जगदीप भाईजानही तिथे आले आहेत. ते कुठे आहेत, असे विचारल्यावर युनिटमधील व्यक्तीने सांगितले की, आत्ता त्यांचे शूटिंग नसल्याने ते वरती रुममध्ये आहेत. मी त्यांना भेटायला गेलो. ते खूप खुश झाले. मला म्हणाले की, माझी मद्यपानाची सवय कशी सुटली, ते आज तुला सांगतो. ते म्हणाले... मी शूटिंगसाठी दिल्लीला गेलो होतो. पॅकअप झाल्यावर हॉटेलवर आलो, अंघोळ केली, फ्रेश झालो. टीव्ही सुरू केला. बाटली काढली, ग्लास ठेवला. टीव्हीवर कुणी गायक गालिबची गझल गात होता. ती ऐकताना मनात विचार आला.. गालिब मद्याचे शौकिन होते, मीपण तसाच आहे. गालिबना दिल्लीमध्ये दफन करण्यात आले आणि मी सुद्धा दिल्लीतच आहे. मग आज गालिब साहेबांची जिथे मजार आहे, तिथे जाऊन प्यावी.. मी बाटली घेतली आणि हॉटेलपासून टॅक्सी करून गालिब साहेबांच्या मजारीजवळ पोहोचलो. त्या काळी तिथे फारशी गर्दीही नसायची. मी मजारीला सलाम केला, फातिहा वाचली आणि बाटली काढली. मी जशी बाटली काढली, तसा मला अदृश्यपणे कुठून तरी आवाज आल्याचा भास झाला.. आकाशवाणी व्हावी तसा.. असे वाटले की, गालिब आपल्या मशहूर गझलेतील दोन शेर माझ्या कानात ऐकवताहेत... ये मसाईल-ए-तसव्वुफ़ ये तेरा बयान ‘ग़ालिब’ तुझे हम वली समझते जो न बादा ख़्वार होता। हुए मर के हम जो रुस्वा हुए क्यूं न ग़र्क़-ए-दरिया, न कभी जनाज़ा उठता न कहीं मज़ार होता। आणि एकाएकी माझा हात थांबला.. विचार आला की, स्वत: गालिबनाही आपण मद्य पीत असल्याची खंत होती. या दोन शेरमधून त्यांनी हेच सांगितलेय की गालिब, तू मद्यपान करत नसता, तर लोकांनी तुला अवतार मानले असते. मृत्यूनंतर तुझा मृतदेह नदीत वाहून गेला असता तर बरे झाले असते. तुझी मजार तरी बनली नसती. मजार आहे, तोपर्यंत लोक म्हणत राहतील की ही त्या गालिबची मजार आहे, जो मद्यपान करायचा... जणू गालिब स्वत:च मला हे सांगत आहेत, असे वाटले. मग ती बाटली मी एका झटक्यात थेट नाल्यात फेकून दिली. त्यानंतर मी मद्यपान सोडले, ते आजवर कधीही प्यायलो नाही. जगदीप भाईजान यांच्या आठवणीत त्यांच्या ‘भाभी’ सिनेमातील हे गाणे ऐका... चली चली रे पतंग मेरी चली रे... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2025 4:37 am

मुद्दे पंचविशी:ध्येय समतल समाजनिर्मितीचे...

येत्या २५ वर्षांत देशाची स्थिती बदलवण्यासाठी संविधानाला अपेक्षित असा आर्थिक, सामाजिकदृष्ट्या समतल असलेला एकसंध समाज निर्माण करावा लागेल. वाढते सामाजिक, आर्थिक, राजकीय तणाव संविधानिक तरतुदींच्या वापराने कमी करण्याला प्राधान्य दिले, तर देश जागतिक स्तरावरील एक मोठी शक्ती बनू शकतो. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात विशेष चर्चा झाली. भारताच्या विशाल लोकसंख्येने उभी केलेली लोकशाही संविधानाच्या भक्कम पायावर गेली ७५ वर्षे टिकून आहे. तथापि, पुढील पंचवीस वर्षांत संविधान आणि लोकशाहीचा प्रवास कसा असावा, यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. संविधानाने काय साध्य केले? अलीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान बदलण्याच्या शक्यता चर्चेत येऊ लागल्या आहेत. वास्तविक आपले संविधान तयार करताना अत्यंत व्यापक, सखोल आणि दूरदृष्टीचा विचार करण्यात आला होता. या संविधानाचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश होता की, पारदर्शक शासनव्यवस्था निर्माण करून त्याद्वारे आर्थिक विषमता विरहित आणि सामाजिक समतायुक्त असा देश उभा करणे, ज्यामध्ये प्रत्येकाला सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची संधी उपलब्ध असेल. शिवाय, कोणावरही अन्याय होणार नाही. गेल्या ७५ वर्षात संविधानाला अपेक्षित अशी व्यवस्था निर्माण झाली का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण, एका बाबतीत मात्र सर्वांचे एकमत होवू शकते, ते म्हणजे वैविध्यपूर्ण संस्कृती, भाषा, चालीरीती, मतप्रवाह असलेल्या खंडप्राय देशाला या संविधानाने केवळ एकसंधच ठेवलेले नाही, तर शेजारील देशाप्रमाणे हुकूमशाहीकडे झुकूही दिले नाही! पुढच्या पंचवीस वर्षांत किंवा त्यानंतरही संविधानामुळे या गोष्टी अव्याहतपणे सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा ठेवणे स्वाभाविक असेल. संविधानातील सापेक्ष बदल : आता जगभरात चौथी औद्योगिक क्रांती सुरू झाली आहे. त्यामुळे माणसाच्या जीवनात आजवर न अनुभवलेली स्थित्यंतरे भविष्यात दररोज, अतिवेगाने घडत राहतील. जगाच्या पटलावर विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये होणारी स्थित्यंतरे तसेच आपल्या देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय बदल यांमुळे नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा होत राहतील. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या संविधानात त्या सापेक्ष बदल होणे आवश्यक असेल. अर्थात, गेल्या ७५ वर्षात संविधानामध्ये १०५ वेळा बदल करण्यात आले आहेत. विषमतेचा विस्तार, लोकशाहीचा संकोच : संविधानाच्या बाबतीत दोन महत्त्वाचे पैलू विचारात घ्यावे लागतात. पहिला म्हणजे, संविधानाला ज्या बाबी अपेक्षित केल्या होत्या, त्याप्रमाणे परिपूर्ण शासन आणि समाजव्यवस्था देशात निर्माण झाली आहे की नाही? संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे बहुतांश बाबी घडत असल्या, तरी देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी करण्यासाठी संविधान राबवण्याचे प्रयत्न कमी पडले, असे म्हणावे लागेल. ७५ वर्षांत देशात सुबत्ता वाढली, पण आर्थिक विषमता आणि धार्मिक, जातीय तेढ पुन्हा उफाळून येत आहे. उदा. आस्थापनांमध्ये कामगारांचा सहभाग घेणे हा मार्गदर्शक तत्त्वांतील उद्देश अद्याप सफल झालेला नाही. दुसरा म्हणजे, राजकीय व्यवस्था काटेकरपणे चालावी म्हणून जी चौकट संविधानात घालून दिली आहे, ती अनेकदा भेदली जाऊन लोकशाहीविरोधी वातावरण निर्माण झाल्याचा भास होतो. लोकशाही हा संविधानाचा गाभा आहे. तथापि, तो सुद्धा काही वेळा कमकुवत केला गेल्याचे दिसते. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाच्या मताप्रमाणे, त्याच्या लोकप्रतिनिधीमार्फत निर्णय व्हावेत अशी अपेक्षा असते. ‘थ्री लाइन’ अशा प्रकारच्या तरतुदीनुसार लोकप्रतिनिधी ज्यांचे प्रतिनिधित्व करतात, त्या जनतेचे मत मांडण्याऐवजी ते ज्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, त्या पक्षाच्या निर्देशाप्रमाणेच कायदेमंडळात मत मांडू शकतात. हा लोकशाही संकुचित करण्याचा प्रकार ७५ वर्षांमध्ये दिसून आला. काही तरतुदी चांगल्या; पण... : लोकप्रतिनिधी मतदानातून निवडून येऊन लोकशाही भरभक्कम करतात. पण, संविधानातील तरतुदीमुळे राज्यांचे वैधानिक प्रमुख म्हणून राज्यपाल हे निवडून न येता नियुक्त करण्यात येत असल्याने अशा प्रकारात लोकशाही संस्थगित झाली असल्याचे दिसून येते. मग अनेकदा ते लोकशाही नियुक्त शासनाच्या निर्णयावरही विपर्यस्त भूमिका घेतात आणि त्यामुळे लोकशाही कमकुवत होते की काय, अशी शंका येते. दुसरीकडे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिक्षेत्रामधील सर्वांगीण विकासाच्या व रोजगारांच्या दृष्टीने आर्थिक विकास आराखडे, तसेच धार्मिक, जातीय आणि अन्य तणाव कमी करण्यासाठी सामाजिक न्याय आराखडे तयार करुन त्यांची अंमलबजावणी करावी, असे संविधानाने नमूद केले आहे. पण, देशभरातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. म्हणजे काही चांगल्या संविधानिक तरतुदींची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली किंवा ती झालीच नाही, असे दिसते. ही स्थिती कशी बदलेल? येत्या २५ वर्षांत देशाची स्थिती बदलवायची असेल, तर संविधानाला अपेक्षित असा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समतल असलेला एकसंध समाज निर्माण करावा लागेल. देशात अलीकडे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तणाव वाढल्याचे दिसून येते. संविधानिक तरतुदींचा वापर करून हे तणाव कसे कमी करता येतील, यावर लक्ष केंद्रित केल्यास आणि त्याची अंमलबजावणी केल्यास देश जागतिक स्तरावर एक मोठी शक्ती बनू शकतो. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे उद्योग - व्यवसायांच्या संधी किंवा नोकऱ्यांबाबत निर्माण होणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढतानाच, देश अस्थिर होणार नाही, याकडे आता प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल.संविधानातील तरतुदीप्रमाणे लोकशाही ही मतदानाद्वारे स्थापित केली जाते. त्या मतदान प्रक्रियेवरच शंका निर्माण होत असेल, तर जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो आणि त्यावरून त्या राज्यात किंवा देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी या गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून न पाहता, मतदान प्रक्रियेवर सर्वांचा विश्वास बसेल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. संविधानाने न्यायपालिकेला स्वातंत्र्य दिले आहे. सध्या देशातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा डोंगर पाहता जनतेला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. यामध्ये येत्या २५ वर्षांत कशी सुधारणा होईल, यासाठी कार्यपालिका म्हणजे सरकार आणि न्यायपालिका यांनी एकत्रित प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, न्यायदानाच्या बाबतीत अन्याय होत असल्याची सार्वत्रिक भावना निर्माण होऊ शकते. लोकशाही सुदृढ करण्यासाठी एकूणच व्यवस्थेचे कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यामध्ये विभक्तीकरण करून जगापुढे अमेरिकेच्या संविधानाने एक आदर्श ठेवला आहे. असे असूनही हाच आदर्श अलीकडे व्यवस्था राबवणाऱ्यांच्या कृतीमुळे डळमळीत झाला आहे की काय, असे वातावरण तेथे निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढच्या २५ वर्षांत आपल्या देशातील लोकशाही, संविधानिक व्यवस्था अधिकाधिक सुदृढ होत जाऊन, त्याद्वारे जनतेच्या सुखी, सामूहिक जीवनासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. (संपर्कः maheshzagade07@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2025 4:33 am

देश - परदेश:सुरम्य आठवणींचे बेळगाव

बेळगावमधला मराठी बोलणारा माणूस मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांना जपतो आहे. मराठी संस्था आपले कार्यक्षेत्र वाढवत आहेत. स्वभावत: गोड असणारा लाल मातीतील मराठी माणूस आपला गोडवा आणि ओलावा टिकवून आहे. सरस्वती वाचनालय, मराठा मंडळ, सांगाती अकादमी यांसारख्या संस्था जिवंत आहेत, तोपर्यंत बेळगावात मराठी जोमाने वाढणार हे नक्की. कोल्हापूरकरांना बेळगावविषयी अतिशय जिव्हाळा आणि आकर्षण आहे. शालेय जीवनातच माझा बेळगावशी परिचय झाला आणि मग तो महाविद्यालयीन जीवनापर्यंत वाढतच राहिला. या दरम्यान आठवणींचा एक फार मोठा खजिनाच तयार झाला. दोन महिन्यांपूर्वी बेळगावच्या सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे आमंत्रण आले आणि मी ते तत्काळ स्वीकारले. या निमित्ताने दोनेक दिवस तिथे राहण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा त्या लाल मातीचा सुगंध आणि बेळगावच्या मंडळींच्या स्नेहातील कुंदा अनुभवण्याची संधी मिळाली. प्रसन्न अशा नव्या आठवणींची वृद्धी झाली. सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांच्या प्रोत्साहनाने तयार झालेली वाचनालयांची दगडी दुमजली टुमदार इमारत स्वत:च एखाद्या संस्मरणीय आठवणीसारखी बेळगावच्या पटलावर उभी आहे. या वाचनालयाचे उद्घाटन सरस्वतीबाई राणीसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाल्याचा आणि इमारतीसाठी एकूण २६,९३० रुपये खर्च झाल्याचा उल्लेख असलेला शिलालेख प्रवेशद्वाराजवळच्या कारंजाच्या आधी लक्ष वेधून घेतो. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’ नाटकाचा पहिला प्रयोग दीडशे वर्षांपूर्वी सर्वप्रथम या वाचनालयात सादर केला गेला. त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करत पुन्हा एकदा या नाटकाचा प्रयोग नव्या दमाच्या कलाकारांनी अलीकडेच सादर केला. बेळगावकर सहजासहजी इतिहास विसरत नाहीत, हेच या निमित्ताने सिद्ध झाले. मी शालेय जीवनातच बेळगावच्या आणि बेळगावकरांच्या प्रेमात पडलो होतो. आमची कोल्हापूरची शाळा बेळगावच्या वाड्.मय चर्चा मंडळाच्या गोगटे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असे. मीही त्यात भाग घेतला आणि पारितोषिके पटकावली. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यामुळे बेळगावचा नकळत परिचय झाला. वाड्.मय चर्चा मंडळाची इमारत कृष्णा टॉकीजजवळ होती. अजूनही आहे. या वाड्.मय चर्चा मंडळाच्या स्पर्धांमध्ये दूरदूरच्या शाळा - महाविद्यालयांचे विद्यार्थी भाग घेत असत. माझ्या जडणघडणीत या संस्थेची फार मोठी भूमिका आहे. हळूहळू या गावातील संपर्क विस्तारत गेला. मारुती गल्लीत आत्माराम सावंत नावाचे कवी राहात असत. आमच्या संस्कृतच्या शिक्षिका करकरे बाई आणि त्यांचा परिचय होता. त्यांच्याकडील वास्तव्यात त्यांच्या आणि बाईंच्या कविता ऐकून आपणही कविता लिहाव्यात, असे वाटू लागले. नंतर आमच्या रामकुमार सावंत सरांच्या विवाहानिमित्त वडिलांच्या सोबत बेळगावला जाणे झाले. अनगोळपासून विवाहस्थळापर्यंत सायकलने जाणे - येणे खूप गंमतीशीर होते. महाविद्यालयात असतानाही बेळगावला वारंवार जाणे सुरू राहिले. तेव्हा नुकतेच ज्योती कॉलेज सुरू झाले होते. दाजीबा देसाई, एन. डी. पाटील अशी मंडळी या कॉलेजशी जोडली गेली होती. तशात आमचा कोल्हापुरातील मित्र हिंदी विषयात एम. ए. करुन ज्योती कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्याच्या स्वभावानुसार त्याने सांगाती साहित्य अकादमीची स्थापना केली. बाबूराव नेसरकर आणि अन्य तरुण मित्रांच्या मैत्रीचा गोफ गुंफला. अल्पावधीत सांगाती अकादमीच्या कार्याचा विस्तार वाढला. वाचनालय, पतपेढी, अभ्यासिका असा प्रवास सुरू झाला. सीमा भागात ‘सांगाती’द्वारा साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातल्या प्रतिथयश साहित्यिकांना बेळगाव परिसरातील सांगाती साहित्य संमेलन हे मोठेच आकर्षण ठरले. प्रा. तुकाराम पाटील यांच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि बेळगावला जोडणारा दुवा निर्माण झाला. तुकाराम यांच्या आग्रहामुळे अगदी तिशीतच मी स्वत:चे आत्मकथन लिहिले. त्यांच्यामुळेच मी कविता या साहित्य प्रकाराबरोबरच गद्यातही माझ्या लेखणीचा अंदाज घेऊ लागलो. पुस्तक तयार झाले आणि बेळगावच्याच जवळकर बंधूंच्या नवसाहित्य प्रकाशनाकडून ते प्रकाशित करुन घेतले. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्या पुढच्या साहित्य संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. त्यानंतर काही दिवसांतच तुकाराम यांच्या अपघाती निधनाचा धक्का आम्हा सर्व मित्रमंडळींना सहन करावा लागला. आजही त्यांच्या मित्रांनी साहित्यिक – सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे, ही मात्र विशेष अभिमानाची गोष्ट आहे. सुरुवातीच्या शालेय दिवसांपासून आजपर्यंत एकंदरीतच बेळगावातील अनेक आठवणींचा प्रवास मी अनुभवला आहे. आता कोल्हापूर – बेळगाव महामार्ग विस्तारला आहे. दिल्लीहून बेळगावला दररोज थेट विमानाने प्रवास करता येतो. पूर्वी पुण्याहून दिल्लीला येणारा मी आता बेळगावमार्गे येतो. दरम्यानच्या काळात सीमा चळवळ क्षीण झाली आहे. बेळगावचे बेळगावी झाले आहे. एकीकरण समितीलाही ग्रहण लागून घरघर लागली आहे. अधूनमधून मराठी आणि कानडी नेत्यांमध्ये शब्दांची चिखलफेक होते. पण, बेळगावच्या मागणीचा पाठपुरावा करण्याच्या बाबतीतील उदासीनता दिवसेंदिवस बळावत चालली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरही बेळगावमधला मराठी बोलणारा माणूस मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांना जपतो आहे. मराठी संस्था आपले कार्यक्षेत्र वाढवत आहेत. स्वभावत: गोड असणारा लाल मातीतील मराठी माणूस आपला गोडवा आणि ओलावा टिकवून आहे. सरस्वती वाचनालय, मराठा मंडळ, सांगाती अकादमी यांसारख्या संस्था जिवंत आहेत, तोपर्यंत बेळगावात मराठी जोमाने वाढणार हे नक्की. (संपर्कः dmulay58@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2025 5:55 am

कव्हर स्टोरी:रस्ते अपघात कसे रोखणार?

ॲक्सिडेंट कॅपिटल... जगातील सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात, म्हणून हे बिरुद आपल्याला लावले जाते. गेल्या काही वर्षांत देशात एकीकडे रस्ते आणि दळणवळण सुविधा विस्तारत असताना, अपघातांचे प्रमाण आणि त्यात बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. हजारो कुटुंबांच्या आनंदी आयुष्यावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर आघात करणाऱ्या अपघातांची ही कारणमीमांसा... देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही पक्के रस्ते तयार होत आहेत. रस्ते बांधणी आणि पुलांच्या उभारणीमुळे दळणवळणाला गती येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्याचवेळी देशातील अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी झटणारे या खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच, खराब रस्त्यांमुळे देशात अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे अलीकडे म्हटले आहे. रस्त्यांच्या प्रकल्पावर काम करणारे स्थापत्य अभियंते आणि त्यांच्या सल्लागारांनी चुकीचे प्रकल्प अहवाल तसेच निकृष्ट डिझाइन तयार केल्यानेच अपघात वाढले आहेत, परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे, असा ठपका त्यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे, भारतातील रस्ते अपघात आणि त्यात जाणाऱ्या बळींची संख्या जगात सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २०२१ मध्ये वैश्विक रस्ते सुरक्षेतील सुधारणांसाठी केलेला ठराव महत्त्वाचा आहे. त्यानुसार २०३० पर्यंत रस्ते अपघातांतील बळींचे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असेच ध्येय भारतातही केंद्र सरकारने ठेवले आहे. खराब रस्त्यांप्रमाणेच मद्यपान किंवा ड्रगसेवन करुन वाहन चालवणे, अतिवेग आणि अतिभार असलेल्या वाहतुकीवर नियंत्रण नसणे, वाहतुकीच्या शिस्तीचा अभाव, ‘हिट अँड रन’सारख्या घटना, हेल्मेटचा वापर न करणे अशा अनेक गोष्टी वाढत्या अपघातांना कारणीभूत आहेत. नागरिकांनीही वेळेशी मेळ घालण्याच्या प्रयत्नात वाहने वेगाने दामटून स्वत:च्या जीवाशी खेळ करण्याचे प्रकार तातडीने थांबवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि समाजाने अपघातांच्या प्रत्येक कारणावर उपाय शोधण्याचा, त्यानुसार कृती करण्याचा दृढनिश्चय केला, तरच ते कमी होऊ शकतील. अन्यथा, ‘जगातील रस्ते अपघातांची राजधानी’ हा देशाच्या नावापुढे लागलेला कलंक पुसला जाणार नाही. देशातील अपघात आणि बळींची वाढती संख्या वर्ष - अपघात - मृत्यू२०२० - ३.६६ - १.३२२०२१ - ४.१२ - १.५४२०२२ - ४.६१ - १.६८२०२३ - ४.८० - १.७२२०२४ - ४.९८ - १.८०(आकडे लाखांमध्ये) भारताचे अप‘घात’सूत्र... - रस्ते अपघातांमध्ये होणारे सुमारे ७० टक्के मृत्यू अतिवेगामुळे. - २००४ ते २०१३ या दशकात १२.१ लाख लोकांचा मृत्यू, ५०.३ लाख जखमी. - २०१४ ते २०२३ या दशकात १५.३ लाख लोकांचा मृत्यू, ४५.१ लाख जखमी. - देशात १० हजार कि. मी. मागे २५० मृत्यू; हे प्रमाण चीनमध्ये ११९, अमेरिकेत ५७, ऑस्ट्रेलियात ११. - २०२३ मध्ये दर तासाला ५५ अपघात आणि २० मृत्यूंची नोंद. - गेल्या वर्षी ३० हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा अपघातात बळी. - त्याच वर्षी अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी ६६ टक्के लोक १८ ते ३४ वयोगटातील. महाराष्ट्राचे ‘घात’चित्र... - २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत एकूण १ लाख ४ हजार ७१० अपघात. - या तीन वर्षांतील अपघातांमध्ये सुमारे ४५ हजार ९२५ जणांचा मृत्यू. - २०२२ मध्ये ३३ हजार ३८३ अपघातांमध्ये १५ हजार २२४ जणांचा मृत्यू. - २०२३ मध्ये ३५ हजार २४३ अपघातांमध्ये १५ हजार ३६६ जणांचा मृत्यू. - २०२४ मध्ये ३६ हजार ८४ अपघातांमध्ये १५ हजार ३३५ जणांचा मृत्यू. स्त्रोत : रस्ते वाहतूक मंत्रालय, इंडिया स्टेटस् रिपोर्ट ऑन रोड सेफ्टी आणि अन्य अहवाल. १२ वर्षांत दुपटीपेक्षा जास्त वाढली वाहनांची संख्या २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अपघातांमध्ये मोठी घट झाली. मात्र, नंतर हे प्रमाण वाढत गेले. देशात २०१२ ते २०२४ या १२ वर्षांत वाहनांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली. २०१२ मध्ये १५.९ कोटी वाहने होती. हा आकडा २०२४ मध्ये ३८.३ कोटींवर गेला. या कालावधीत रस्त्यांची लांबीही सुमारे ११ लाख कि. मी. ने वाढली. २०१२ मध्ये देशातील रस्त्यांची एकूण लांबी ४८.६ लाख कि. मी. होती, ती २०२४ पर्यंत ६६.७१ लाख कि. मी. वर पोहोचली. अपघातांमुळे ‘जीडीपी’ला ५ ते ७ टक्क्यांचा फटका नवे रस्ते तयार करणे, रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरूस्ती यावर देशात हजारो कोटी रुपये खर्च होतात. त्यातून रस्ते बांधणीशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल होते. दुसरीकडे, वाहनांची खरेदी आणि त्यासाठीचे कर्ज, इंधन विक्री, वाहनांचा तसेच व्यक्तिगत अपघात विमा, टोल आदी बाबींमुळे रस्ते वाहतूक क्षेत्राचे एक मोठे अर्थकारण उभे राहिले आहे. जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे जीडीपीच्या ५ ते ७% इतके नुकसान होते. याचा अर्थ, ज्यावर काही लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी आहे, त्या रस्ते वाहतूक क्षेत्रातील अपघातांमुळे लाखमोलाचे जीव जातातच; शिवाय देशाच्या आर्थिक वाढीलाही मोठा फटका बसत आहे. बहुतांश अपघात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे... रस्त्यांचा निकृष्ट दर्जा हे वाढत्या रस्ते अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. चुकीची रस्तेबांधणी, अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, दुरुस्तीची रेंगाळलेली कामे, रस्त्यावरचे खड्डे यांमुळे होणारे प्राणघातक अपघात टाळता येऊ शकतात. त्यासाठी या गोष्टींना जबाबदार रस्ते कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. टोल रोड असूनही रस्त्याचा दर्जा सुमार असेल, तर रस्ता उत्तम होईपर्यंत टोलवसुली थांबवणे, टोल कंत्राटदाराला दंड करणे असे उपाय केले पाहिजेत. वाहनचालकांना परवाना देताना कठोर परीक्षा घेणेही आवश्यक आहे. या प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे अकुशल ड्रायव्हर रस्त्यावर उतरतात आणि अपघात वाढतात. मद्यप्राशन करुन गाडी चालवणे, ओव्हरलोडिंग यामुळेही मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. त्यासाठी कायद्यांची कठोर आणि जाणवेल अशी अंमलबजावणी झाली पाहिजे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे दंडवसुली १०० टक्के होण्याची आवश्यकता... बेजबाबदारपणे वाहने चालवण्यामुळे ९० टक्के अपघात होतात. मद्यपान करुन वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, इंडिकेटर किंवा पार्किंग लाइट न लावता रस्त्यावर ट्रक / कंटेनर उभे करणे ही सुद्धा अपघातांची कारणे आहेत. महाराष्ट्रात या प्रकारे नियमभंग करणाऱ्यांकडून होणारी दंडाची वसुली जेमतेम ४० टक्के आहे. ती १०० टक्के होणे आवश्यक आहे. दंड भरत नाही तोवर संबंधिताला पेट्रोल / डिझेल किंवा गॅस मिळणार नाही, अशी व्यवस्था केली पाहिजे. अपघात घडल्यावर जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी महामार्गांवरील हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, लगतच्या गावातील तरुणांच्या सहभागातून आम्ही ‘मृत्युंजयदूत’ उपक्रम सुरू केला होता. या प्रकारे तरुणांना योग्य प्रशिक्षण दिल्यास अपघातग्रस्तांना लगेच मदत मिळून जीव वाचवता येतील. - डॉ. भूषणकुमार उपाध्याय, माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक (महामार्ग)

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2025 5:46 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:जेवण न पोहोचल्याने उपाशी राहिले होते बिग बी, ‘चेहरे’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी हॉटेलमध्ये केवळ सूप पिऊन काढली रात्र

आज, २३ मार्च हा माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवशीच मला पहिला सिनेमा मिळाला होता, हे मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितले होतेच. आज मी तुम्हा साऱ्यांना माझ्या वाढदिवसाशी संबंधित एक आणखी संस्मरणीय किस्सा सांगणार आहे. तो २३ मार्च १९९८ चा दिवस होता. माझा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी लोकांचे फोन येत होते. पुष्पगुच्छांनी घर भरले होते. त्या दिवशी मी पार्टी किंवा डिनर ठेवले नव्हते. दुपारच्या वेळी बच्चन साहेबांचा फोन आला. त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, ‘रूमी, मी बाबूजींना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. लवकर घरी पोहोचलो, तर रात्री तुमच्या घरी येईन.’ मला वाटले, बच्चन साहेब औपचारिकता म्हणून असे म्हणत असतील, ते थोडेच आपल्या घरी येतील? रात्री कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं, याची सायंकाळी आम्ही घरात चर्चा करत होतो. तेवढ्यात बच्चन साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला की, रूमीजी, बच्चन साहेब आठ वाजता तुमच्या घरी पोहोचतील. ही गोष्ट मी घरात सांगितली आणि साऱ्या कुटुंबात एकदम उत्साह संचारला. बच्चन साहेब घरी येणार असल्याने त्यांचे स्वागत, आदरातिथ्य कसे करायचे, या विचारात आम्ही पती-पत्नी पडलो. माझ्या पत्नीच्या हातच्या जेवणाची चव साऱ्या फिल्म इंडस्ट्रीला माहीत होती. पण, वेळच इतका कमी होता की बच्चन साहेबांसाठी काय बनवायचे, असा प्रश्न तिला पडला. तर, बच्चन साहेबांसोबत कंपनी देण्यासाठी कुणाला बोलवायचे, या विचारात मी होतो. मी गोविंदा, डेव्हिड साहेब, लाली भाभी, हनी इराणी, रमेश तोराणी यांना फोन करुन विनंती केली की, कृपया लवकर आमच्या घरी या, बच्चन साहेब येणार आहेत. बच्चन साहेब वेळेचे किती पक्के आहेत, ते सगळ्यांना माहीत आहेच. बरोबर आठ वाजता ते पोहोचले. सोबत जया भाभीजी, अभिषेकही आले होते. हनीच्या समवेत निशी प्रेमही आली. लोक आपल्यासाठी अगदी वेळात वेळ काढून येतात, ते आपल्यावर इतके प्रेम करतात आणि स्वत: बच्चन साहेबही घरी येतात, यापेक्षा वाढदिवसाची मोठी भेट काय असू शकते? माझ्या आयुष्यातील ती एक संस्मरणीय संध्याकाळ ठरली. या गोष्टीवरुन मला नूह नारवी यांचा एक शेर आठवतोय... आप जिन के क़रीब होते हैं वो बड़े ख़ुश-नसीब होते हैं... आपल्या घरी स्वत:च्या हाताने काही बनवून बच्चन साहेबांना आपण खाऊ घालू शकलो नाही, याची सल माझ्या पत्नीला पुढे कायम राहिली. असो. ही गोष्ट २०१९ ची आहे. डिसेंबर महिना होता. आम्ही ‘चेहरे’ सिनेमाच्या शूटिंगसाठी पोलंडला गेलो होतो. बर्फाच्छादित डोंगरावर असलेल्या एका स्किइंग रिसॉर्टमध्ये आम्ही बच्चन साहेबांसोबत शूटिंग करत होतो. तिथे बर्फामध्येच चारी बाजूंनी काचा लावलेले एक किचन होते. माझी पत्नी हनानने बच्चन साहेबांसाठी डिनर बनवायचे ठरवले आणि ती तिथे जाऊन कामाला लागली. शूटिंग सुरू असताना सगळे लोक किचनजवळ जाऊन डोकावायचे. कारण किचन काचेचे होते आणि आतमध्ये हनान स्वयंपाक करत होती. बच्चन साहेबांनीही तिथे जाऊन पाहिले. मी म्हणालो, बघा, आज हनान तुमच्यासाठी जेवण बनवतेय.. त्यांनी ‘काय बनवतेय?’ असे विचारल्यावर तिने भेंडी, बटाट्याची भाजी, दाल, पनीर अशा सगळ्या पदार्थांची नावे सांगितली. आज भाभीजींच्या हातचे जेवण मिळणार, म्हणून सिनेमाचे निर्माते आनंद पंडितही खुश झाले. बच्चन साहेबांनीही आपले रात्रीचे जेवण बनवू नका, असे त्यांच्या हॉटेलला कळवले. पॅकअप झाले. एव्हाना हनानने जेवण तयार केले होते. तो बच्चन साहेबांच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी ते परत जाणार होते. त्यामुळे किचनमधले सगळे कर्मचारी त्यांच्यासोबत फोटो काढण्यात गुंतले. मी त्यांना म्हणालो, आधी सगळ्यांचे जेवण पॅक तरी करा.. तर त्यांनी सांगितले की, रात्री सगळ्यांचेच जेवण पाठवून देऊ. बच्चन साहेब सात वाजता जेवतात, आम्ही त्या वेळेपर्यंत जेवण त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोच करु. सहनिर्माता वैशल मला म्हणाला, रूमी भाई, तुम्ही निश्चिंत राहा. जेवण वेळेवर पोहोचेल.. त्यानंतर आम्ही सगळे हॉटेलवर पोहोचलो. सायंकाळी साडेसातच्या सुमारास बच्चन साहेबांचा सहायक प्रवीणचा फोन आला की, जेवण अजून पोहोचले नाही.. मी वैशलला फोन केला. त्याने सांगितले की, आम्ही इथेच आहोत, जेवणाचे पार्सल पाठवतोच आहे. साडेआठला पुन्हा प्रवीणचा फोन आला. तो म्हणाला, सरांच्या जेवणाची वेळ उलटून गेलीय, त्यांना खूप भूकही लागलीय. जेवण कधीपर्यंत येईल..? मी वैशलला पुन्हा फोन केला. तेव्हा त्याने सांगितले.. स्किइंग रिसॉर्टचा पूर्ण रस्ता बर्फाच्छादित असल्याने मेन गेटपासून आतमध्ये, ज्या इमारतीच्या वर किचन आहे, तिथवर पोहोचायला ३५-४० मिनिटे लागतात. तिथे एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. वरून एखादी गाडी आली, तर ती जाईपर्यंत खालून गाडी सोडत नव्हते. पण, चुकीने दोन्हीकडून गाड्या सोडल्या गेल्या आणि त्या बर्फावरुन घसरत एकमेकांना धडकल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे बर्फ हटवला जाईल, गाड्या काढल्या जातील आणि रस्ता क्लिअर होईल तेव्हाच इथून जेवण पाठवता येईल. नऊच्या सुमारास पुन्हा प्रवीणचा फोन आल्यावर त्याला घडलेला प्रकार कथन केला आणि या कारणामुळे जेवण तयार असूनही ते बच्चन साहेबांपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगितले. मग प्रवीणने तिथल्या किचनमध्ये जाऊन सूप बनवून आणले आणि त्यांना प्यायला दिले. इतक्या उशिरापर्यंत त्यांना भुकेले राहावे लागले होते. मला आणि माझ्या पत्नीला आजपर्यंत या गोष्टीचे दु:ख वाटते आहे की, बच्चन साहेब घरी आले होते तेव्हा त्यांना स्वयंपाक करुन जेऊ घालू शकलो नाही आणि जेवण बनवले तेव्हा ते वेळेवर हॉटेलमध्ये पोहोचले नाही, म्हणून ते खाऊ शकले नाहीत. पण, बच्चन साहेब खूप मोठ्या मनाचे आणि महान व्यक्ती आहेत. दुसऱ्या दिवशी ते शूटिंगला आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर नाराजीची, तक्राराची जराशीही छटा नव्हती की, तुमच्या जेवण बनवण्यामुळे मला रात्री उपाशी राहावे लागले. बच्चन साहेबांना सलाम! आज त्यांच्यासाठी त्यांच्या ‘याराना’मधील हे गाणे ऐका... छूकर मेरे मन को, किया तूने क्या इशारा... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2025 5:40 am

डायरीची पाने:नवं साल, नवा गडी

नव्या सालगड्याला पाडव्याच्या संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं जायचं. त्याला त्या दिवशी बनवलेले कानवले खाऊ घालून आपल्या कुटुंबात दाखल केलं जायचं. पाडव्याला घराघरावर गुढ्या उभारल्या जातात. याच दिवशी शेतकऱ्यांचं नवं वर्ष सुरू होत असतं. आमच्या गावात महानुभावीय दत्त मंदिर आहे. पाडव्याच्या दिवशीच या मंदिराच्या कळसावर निशाण म्हणजे पताका लावण्याची पद्धत आहे. ही शुभ्र पांढऱ्या कपड्याची पताका असते. घराघरातून अशा पताका घेऊन, सनई आणि हलगीच्या सुरात, गावातून सगळ्या लोकांची मिरवणूक निघते. इतक्या सगळ्या पताका मंदिरावर कशा लावणार? म्हणून लोक मंदिराशेजारच्या झाडा-झाडांवर जागा मिळेल तिथे पताका लावतात. त्यामुळे पूर्वी मंदिराभोवतीची झाडेही या पताकांनी पांढरी होऊन जात. जणू काही त्यावर बगळ्यांचे थवे बसले आहेत, असे वाटावे. पाडव्याच्या दिवशीच मंदिरात सगळे गावकरी जमा व्हायचे आणि तेथेच सालगडी ठरवले जायचे. ज्याला कुणाला जुना मालक सोडायचा आहे, असा सालगडी नवा मालक धरीत असे आणि ज्याला कुणाला जुना गडी सोडायचा आहे, असा मालक नवा गडी धरीत असे. त्यांचं साल, सालचंदी आणि बाकीच्या बोलाचाली इथेच होत असत. सगळ्यांसमोर हे ठरवलेलं असल्यामुळं एका अर्थाने गाव पंचायतीच्या मान्यतेची मोहरच त्यावर उमटलेली असायची. नंतर वर्षभर गडी काही कामचुकारपणा करू लागला, तर त्याला जाब विचारता यायचा. पण मला आठवतं, असं फार क्वचित होत असे. शक्यतो आधीचेच सालगडी जुन्या मालकांकडं नव्याने साल धरीत असत आणि वर्षभर राबत असत. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एकाच मालकाकडं काम करणारे सालगडी त्या काळात होते. इतकंच नव्हे, तर आमच्या चुलत्यांच्या शेतात कामावर असलेल्या सोयऱ्या मामा नावाच्या गड्याने तर संपूर्ण आयुष्य तिथेच काढलं. ते आप्तच लागत असल्यामुळं त्यांना सगळे सोयऱ्या मामा असंच म्हणायचे, तर त्यांच्या पत्नीला सगळा गाव सोयरी मामी म्हणत असे. हे जोडपं आमच्याच घरातल्या एका बाजूला राहायचे. यांना अपत्य नव्हते. त्यांचे साल काय ठरत असे? ते पैसे कुठे ठेवत असत? यांची काही जमापुंजी होती का? बँकेचं खातं होतं का? याची काही माहीत नाही. बहुदा यातलं काही नसावंच, असं मला वाटतं. कारण या सोयऱ्या मामाचं निधन आमच्या चुलत्याच्या घरात झाले आणि आमच्या गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सोयऱ्या मामांवर मी एक कविताही लिहिली आहे. कृषी संस्कृतीमध्ये एक काळ असा होता की कामावर राहिलेला सालगडी आयुष्यभर साल सोडत नसे. आणि आज असाही एक काळ आला आहे की बहुतांश सालगडी कधीच साल शेवटाला नेत नाहीत. एकतर मधूनच पैसे घेऊन पळून जातात किंवा ‘मला तुमच्या घरचे काम निभत नाही,’ असं सांगून निघून जातात. सगळेच शेतमालक हैराण आहेत. माणसांना कामं मिळेनाशी झाली आहेत आणि कामांना माणसं मिळेनाशी झाली आहेत. ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल. असे कशामुळे झाले? याविषयी चिंतन करावे लागेल. हे चिंतन निरपेक्ष असायला हवे. ते मालक आणि नोकर या दोघांच्याही बाजू समजून घेणारे असले पाहिजे. पण, आज या विषयी कुठली तरी एकच बाजू घेऊन विचार मांडले जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला ते मान्य नसतात. दोन्ही बाजूंचा विचार करून कुठे तरी मेळ बसवायलाच हवा. कामं पडलेली आहेत आणि माणसंही रिकामी आहेत. तेव्हा या दोघांना एकत्र आणणारी काही तरी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. परिस्थितीत असणारे दोष दूर करायला हवेत. माणसं माणसाजवळ यायला हवीत. म्हणजे माणसं कामाजवळही येतील. माणसं माणसाजवळ यायची असतील, तर सर्वांना निरपेक्ष माणुसकी जपावी लागेल. पाडव्याच्या दिवशी मंदिरात केवळ सालगडीच ठरत असे नाही, तर इतरही अनेक गोष्टी ठरायच्या. गावाचे काही निर्णय घेतले जायचे. गावात काही महानुभाव साधू भिक्षा मागायला येत. त्यांना त्या दिवशी तिथे भिक्षा कबूल करून नंतर ती दिली जायची. असे काही सार्वजनिक निर्णय मंदिरात घेतले जात. सगळ्यांनीच घरून येताना एकेक नारळ आणलेला असे. तो देवासमोर फोडला जाई. त्यासोबत गुळ किंवा साखर असे. ती वाटली जायची. पाडव्याचं असं सार्वजनिक रूप साजरं केलं जायचं. यावर्षी ठरलेल्या नव्या सालगड्याला संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं जायचं. त्याला खास त्या दिवशी बनवलेले कानवले वाढले जायचे. कानवले हा ग्रामीण भागात बनवला जाणारा एक खास पदार्थ आहे. कणीक लाटून, त्यात करंजीसारखं खसखशीचं गोड सारण भरून मग त्याला तव्यावर भाजायचं. त्या सारणात गुळ असल्यामुळं आपोआपच त्याच्यात पाक तयार होऊन तो पोळीत मुरायचा. ही एका अर्थाने मोठ्या आकाराची पण पसरट करंजीच म्हणायची. कारण या कानवल्याचा आकार अर्धगोलाकार असे. हा चविष्ट कानवला तुपासोबत खाल्ला जायचा. सालावर ठेवलेल्या गड्याला हा गोड पदार्थ खाऊ घालून आपल्या कुटुंबात दाखल केलं जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो कामावर येत असे. आम्ही मंदिरातून मांडव राखण्यासाठी परस्पर शेतावर निघून जायचो. दुपारी मोठा भाऊ आमच्यासाठी गावाकडून कानवले घेऊन यायचा. दुपारच्या प्रहरी शेतातल्या मांडवात बसून, बैलाच्या पाठीला पाठ लावून मस्तपैकी हा कानवला खाणे आणि मांडवाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या बिनगीतलं थंडगार पाणी पिणे, याच्यासारखं सुख नाही! हे सुख पाडव्याच्या दिवशी आणखीनच गोड व्हायचं. या कानवल्याची चव खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहायची. पण, असा कानावला अध्येमध्ये खाऊ वाटला म्हणून कुणीही करून खात नसत. त्यासाठी पुन्हा पुढच्या वर्षीचा पाडवाच यावा लागायचा. पुरणाच्या पोळ्या, तिळगुळाच्या पोळ्या वर्षभरात कधी खाव्याशा वाटल्या, तर आपण अजूनही त्या करून खातो. पण, कानवला कुणी असा अधूनमधून करून खाल्लाय, असे आठवत नाही. तो फक्त आणि फक्त पाडव्याच्या दिवशीच बनवला आणि खाल्ला जायचा. तो त्याचा मान असायचा. बाकी पाडव्याच्या इतर गोष्टी सगळीकडं सारख्याच असल्यामुळं त्यांची इथे उजळणी करण्याची गरज नाही. (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2025 5:36 am

‘एआय’च्या विश्वात...:प्रत्येक क्षेत्रातील यशासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्तच!

सकाळी नऊ वाजता रामूशेठ त्यांच्या किराणा दुकानात पोहोचले. पण, तिथे आज काहीतरी वेगळे जाणवत होते. दुकानाच्या गल्ल्यावर एक नवीन मशीन ठेवलेले होते. त्यांच्या मुलाने सांगितले, ‘बाबा, हे ‘एआय’वर चालणारे मशीन आहे. आता आपण विक्री, उपलब्ध असलेला माल आणि ग्राहकांच्या सवयी समजून घेण्यासाठी याचा उपयोग करू शकतो.’ रामूशेठना फार काही समजले नाही. त्यांना प्रश्न पडला, ‘एआय म्हणजे नेमकं काय? आणि ते आपल्या दुकानासाठी कसं काय उपयोगाचं?’ ‘एआय’ म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे संगणकांना माणसांसारखे विचार करायला शिकवणारी प्रणाली. साध्या भाषेत सांगायचे तर, कुणा व्यक्तीने एखाद्या गोष्टीतून शिकावे तसेच संगणकालाही शिकवता येते. ‘एआय’ विविध पद्धतींनी शिकते आणि काम करते. मशीन लर्निंग (ML) म्हणजे काय? रामूशेठना त्यांचा मुलगा समजावू लागला.. बाबा, तुम्ही रोज कुठल्या वस्तू जास्त विकल्या जातात, हे लक्षात ठेवता. ही गोष्ट ‘एआय’ आपोआप शिकते आणि आपल्यासाठी त्या वस्तू जास्त मागवायला मदत करते. यालाच ‘मशीन लर्निंग' (ML) म्हणतात. थोडक्यात, ‘एमएल’ म्हणजे डेटा वापरून संगणक शिकतो आणि स्वत: निर्णय घेऊ लागतो. याची व्यवहारातील काही उदाहरणे पाहू... - बँका कर्ज देताना कोण कर्ज फेडू शकतो आणि कोण नाही, हे ‘एमएल’ वापरून ठरवतात. - अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर ई-कॉमर्स साइट तुमच्या आवडीच्या वस्तू सुचवतात. - गुगल मॅप तुमच्या रोजच्या प्रवासाची माहिती घेऊन, त्या मार्गावरच्या वाहतुकीचा अंदाज लावते. डीप लर्निंग (DL) कशाला म्हणतात? रामूशेठ विचारात पडले. ‘पण, कॉम्प्युटर स्वत: शिकतो, तर तो आणखी हुशार कसा काय होऊ शकतो?’ मुलाने त्यांना समजावले.. बाबा, तुम्ही कितीही वेळा एखाद्याला भेटलात, तरी अनेकदा तो तुमच्या लक्षात राहत नाही. पण, कोणी तुम्हाला वारंवार आठवण करून दिली, तर तुम्ही तो चेहरा विसरणार नाही. यालाच डीप लर्निंग (DL) म्हणतात. आता याचीही काही उदाहरणे बघू... - फेसबुकमध्ये तुमच्या फोटोतील चेहरा कोणाचा आहे, हे ओळखणारी प्रणाली. - स्वयंचलित कार चालवणारी प्रणाली. - डॉक्टरांना एक्स रे किंवा एमआरआय स्कॅनमधून रोग निदानासाठी मदत करणारी प्रणाली. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) म्हणजे काय? ‘बरं, मग हे मशीन माणसासारखं बोलू शकतं का?’ रामूशेठनी पुढचा प्रश्न विचारला. ‘हो!’ मुलगा म्हणाला.. ‘गुगल असिस्टंट’,‘सिरी’ किंवा “अॅलेक्सा’ हे सगळे NLP वापरतात. NLP म्हणजे ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग.’ म्हणजेच मशीनची मानवी भाषा समजण्याची आणि उत्तर देण्याची क्षमता. याची ही काही उदाहरणे... - बँकेत तुमच्या तक्रारी ऐकून उत्तर देणारे ‘चॅटबॉट'. - गुगल ट्रान्सलेट वापरून कोणतीही भाषा अनुवाद करणारी प्रणाली. - कॉल सेंटरमधील एआय आधारित ग्राहकसेवा. ‘एआय’चा विविध क्षेत्रातील प्रभाव रामूशेठना कल्पना आली की, ‘एआय’ केवळ मोठ्या कंपन्यांसाठीच नाही, तर ते लहान व्यवसाय, आरोग्य, शिक्षण आणि शेतीमध्येही मोठा बदल घडवू शकते. मुलाने त्यांना ‘एआय’चे या क्षेत्रांत सध्या होत असलेले काही प्राथमिक उपयोगही सांगितले... कृषी : ‘एआय’च्या मदतीने शेतातील मातीची गुणवत्ता तपासता येते. हवामानाचा अभ्यास करुन उत्पादनाचा अंदाज वर्तवता येतो. कीड आणि रोग ओळखून योग्य औषधांचा सल्ला दिला जातो. आरोग्य : रोगाच्या अचूक निदानासाठी ‘एआय’ डॉक्टरांना मदत करते. शिवाय, रक्तातील साखर, हृदयाचे ठोके यांचा त्वरित अभ्यास करून तातडीच्या उपचारासाठी सूचना देते, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ऑनलाइन सल्ला प्रणाली विकसित करता येते. व्यवसाय : ग्राहकांची मागणी ओळखून मालमत्ता साठवणुकीत सुधारणा, ‘एआय’ आधारित ऑटोमेशनमुळे ग्राहकांना जलद सेवा, डिजिटल पेमेंट आणि सुरक्षेसाठी ‘एआय’ प्रणालीचा वापर. शिक्षण : ‘एआय’आधारित स्मार्ट क्लासरूम, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अभ्यासक्रम, ऑनलाइन शिकण्याच्या अधिक प्रभावी सुविधा. बँकिंग आणि फायनान्स : घोटाळे ओळखण्यासाठी मदत करणारी प्रणाली, रोबो-अॅडव्हायजरच्या मदतीने शेअर बाजार गुंतवणुकीचे सल्ले, बँकेत टोल फ्री नंबरवर ग्राहक सेवा देणारे एआय चॅटबॉट. ‘एआय’चे धोके : रामूशेठ यांच्या मनात विचार आला की, ‘एआय’ फायदेशीर तर आहे खरे; पण त्याचे काही तोटेही असतीलच.. त्याविषयी मुलाला विचारल्यावर त्याने ‘एआय’मुळे होणारे काही बरे-वाईट परिणाम सांगितले... नोकऱ्यांवर परिणाम : काही पारंपरिक नोकऱ्या ‘एआय’मुळे कमी होतील, पण हे तंत्रज्ञान शिकल्यास नव्या संधीही निर्माण होतील. गोपनीयता आणि सुरक्षेचा प्रश्न : ग्राहकांचा डेटा योग्य प्रकारे वापरला जाईल, याची खात्री असणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञानाची गरज : लहान व्यावसायिकांना ‘एआय’ समजून घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. रामूशेठ आता त्यांच्या मुलाकडे पाहात म्हणाले, ‘म्हणजे आपलं किराणा दुकानही ‘एआय’ वापरून अधिक चांगल्या प्रकारे चालवता येईल!’ मुलगा हसून म्हणाला, ‘बाबा, आता जमाना बदलतोय. ‘एआय’ फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही, तर लहान उद्योजक-व्यावसायिकांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठीही आहे. जो हे नवे तंत्रज्ञान शिकेल, तोच यशस्वी होईल!’ (संपर्कः amey@aconsultancy.marketing)

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2025 5:30 am

बुकमार्क:अमोल पालेकरांच्या मनस्वी आत्मकथनाचा मौल्यवान ‘ऐवज’

“चप्पल पहनने वाले आदमीने यहाँ बंगला खरीद लिया?” अशा हिणकस टिप्पण्या कानावर पडूनही, जुहूतील प्रतिष्ठित फिल्मी मांदियाळीत उभ्या राहिलेल्या मराठमोळ्या, मध्यमवर्गीय कलावंताच्या ‘चिरेबंदी’ बंगल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.. पुढे हीच वास्तू देश - विदेशातून आलेल्या कित्येक मान्यवर कलाकारांचं हक्काचं घर बनली.. तिथं नाटक, साहित्य, संगीत, दृश्यकला क्षेत्रातल्या कलाकार आणि कलासक्त लोकांची वर्दळ वाढली... हे वर्णन आहे अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज - एक स्मृतिगंध’ या पुस्तकातले. आपल्या या आत्मकथनात्मक पुस्तकात ते पुढे म्हणतात की, एका वेगळ्या पद्धतीने माणसांची खरी रूपं समजायलाही ‘चिरेबंदी’ने मला शिकवलं. माझी भावनिक गुंतवणूक असूनही मी कधी त्याचा सौदा होऊ दिला नाही. अभिनेते, दिग्दर्शक, नाट्यकर्मी आणि लेखक अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या पालेकरांचे हे पुस्तक कला क्षेत्रातील गेल्या आठ दशकांच्या अनेक आठवणी आणि अनुभवांचा ‘ऐवज’ आपल्यासमोर खुला करते. मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक या प्रवासात विविध कलाकृतींचा आस्वाद घेताना, कलेची मूल्ये, त्यांची निर्मिती प्रक्रिया, तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा परामर्श कशाप्रकारे घेतला, हे पुस्तक वाचताना उलगडत जाते. मुंबईच्या बालमोहन शाळेतून बोर्डीच्या शाळेत जाण्याचा प्रसंग असेल किंवा आईचा विरोध असूनही केलेला विवाह, मुलगी शाल्मलीचे शालेय वयातच असलेले ठाम विचार आणि गुरुस्थानी असलेल्या पं. सत्यदेव दुबेंना केलेला विरोध हे ‘महापाप’ असल्याची प्रांजळ कबुली... हे सगळं दिसतं तेवढ सोपं नव्हतं. केवळ विरोधासाठी विरोध नव्हे, तर त्यातही विवेकी असणं ही शिस्त पालेकरांनी उमेदीच्या काळातच लावून घेतली. ‘गोची’ या नाटकाने झालेली अभिनय कारकिर्दीची सुरूवात असो की वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ऐंशी मिनिटे रंगमंचावर ‘ए. सी. पी. दंडवते’ हे पात्र साकारताना हाउसफुल्ल झालेले ‘कुसूर’ या नाटकाचे प्रयोग असोत; त्यांचा हा सगळा रोचक प्रवास तितक्यात रंजकपणे पुस्तकातून आपल्यासमोर उभा राहतो. ज्या काळात एकदा चित्रित झालेल्या दृश्याचे पुन्हा अवलोकन करण्याची सोय नव्हती, कॅमेऱ्याच्या लेन्स आणि चित्रीकरणाची निश्चित परिमाणे विकसित झालेली नव्हती, अशा काळात एक मनस्वी तरुण मराठी मन घेऊन आपल्या स्वतंत्र घडणीची एक वैचारिक दिशा ठरवत होता. अशी दिशा निश्चित करुन वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हाने पेलताना कोणता संघर्ष करावा लागला? अचानक घडणारी अपघातांची मालिका, जे. जे. स्कूल ऑफ आर्टसची पदवी घेतल्यावर चित्रकार म्हणून केलेली सुरूवात, बँक ऑफ इंडियातील नोकरी, याच कालावधीत व्यावसायिक रंगभूमीकडे वळताना विचारप्रवर्तक चित्रपटांच्या दुनियेत झालेला प्रवेश आणि नंतरचा तिथला लक्षवेधी वावर.. या सर्वांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. ‘बॉलीवूड’ म्हटल्या जाणाऱ्या मुख्यधारेमध्ये आपण कधी मिसळलो नाही, असे पालेकर ठामपणे सांगतात. हिंदी चित्रसृष्टीतील स्टार्सचे ज्या पद्धतीने अवाजवी लाड केले जायचे, त्याविषयीही त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. वेळेचा, पैशाचा अपव्यय करणे हा अव्यावसायिकपणा त्यांना खटकत असे. स्वत:च्या मागण्यांवर ठाम राहणे, प्रसंगी प्रतिकार करणे, डाव्या आणि उजव्या विचारांच्या सांस्कृतिक संघर्षात प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आग्रही राहणे असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी विशेष पैलू लक्षवेधी ठरतात. कातडी सोलून सांगतानाही आपल्या कथनाला काही एक मर्यादा आहे, हे भान राखतानाच नामदेव ढसाळ यांच्या.. “प्रत्येक कलावंताला स्वत:चं एक वर्गचित्र असतं..” या वाक्याचा संदर्भ पालेकर देतात. या कोलाहलात सगळं सांगूनही कलावंताच्या मनात काही रानोमाळ उरतो का? याचा धांडोळा घेण्यासाठी पालेकरांचं हे पुस्तक वाचायला हवं. संध्या गोखले यांनी या पुस्तकाच्या संकल्पनेपासून ते संस्करण आणि सजावटीपर्यंतची साधना उत्तमपणे साध्य केली आहे. नरसिंह बालाजी यांची रेखाटनेही अप्रतिम आहेत. एकूणच, सतत नव्या अनुभवाची भुरळ घालणाऱ्या अमोल पालेकरांनी स्वत:च्या आयुष्याच्या कॅनव्हासवर हे एक सुरेख चित्र रेखाटलं आहे. रसिक वाचकांना त्याची मोहिनी पडली नाही तरच नवल! - पुस्तकाचे नाव : ऐवज - एक स्मृतिगंध- लेखक : अमोल पालेकर- संस्करण : संध्या गोखले- प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन- पाने : २९६, किंमत : रू. ७५० (संपर्कः swapnilkashi566@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2025 5:26 am

कबीररंग:पानी के पीये बिना, कैसे मिटे पियास...

आपलं रोजचं जगणं म्हणजे आत-बाहेरच्या संगतीसोबतचा प्रवास आहे. ही संगत व्यक्तींची, वस्तूंची, वास्तूंची, भवतालातील सृष्टीची आहे. ही संगत अर्थपूर्ण, भावपूर्ण असेल, योग्य अवकाशासह असेल, तर असा प्रवास आनंददायीच असतो. अन्यथा, मनाला ही नुसतीच गर्दी वाटते. अनेकदा कळत - नकळतपणे आपण या गर्दीचे धनी होतो. हे सारं नीटसं उमगल्यावर आपण बाहेरच्या गर्दीपासून अलिप्त होत जातो, उथळ सहवासापासून वेगळं होत स्वत:च्या मनापाशी पोहोचतो, तेव्हा आपल्याला काय जाणवतं? गंमत वाटेल, पण अशा कृतीनं आपल्याला आपल्या मनाची खरी स्थिती जाणवते. मनातलं इष्ट - अनिष्ट संचित जाणवतं. त्याविषयी आपलं चिंतन घडतं.आपण कुणाविषयी तरी बाळगलेला द्वेष, शब्दांतून कुणाचा तरी अवमान करून घेतलेलं सुख, एखाद्याच्या माघारी त्याची निंदा करून झालेला क्षणिक संतोष आणि आपण कळत- नकळत केलेल्या आत्मप्रतारणेस बाजूला सारण्याची आपली चतुराई हा असाही त्या स्थितीतील आपल्या मनाचा आशय असतो. आपण स्वत:शी प्रामाणिक असलो की, हे सारं ध्यानात येतं. आपलं मन व्यर्थ गोष्टी सांभाळून ठेवतंय, हे उमजल्यावर आपल्याला आपल्या हृदयाचं मोल जाणवतं. तरल भावस्थितीत हृदयाचे बोल आठवतात. तिथं एक शांत स्रोत लख्ख दिसतो, जिथं शब्दांहून अधिक नितळ-निर्मळ भाव व्यक्त होत असल्याचं ध्यानात येतं. आपल्या ‘असण्या’चं गहिरेपण या हृदयात आहे. हेच तर आपल्या जीवनाचं केंद्र आहे! कबीर म्हणतात, आपला ‘मी’ आपल्याला कळत नाही. या ‘मी’चं स्वातंत्र्य, अवलंबन, स्वामित्व आणि दास्यत्व कळत नाही. ते साधकाशी कळवळ्याच्या परिभाषेत बोलतात... दासातन हिरदै नहीं, नाम धरावे दास। पानी के पीये बिना, कैसे मिटे पियास।। ज्या सद्गुरुंनी उजेडी राहून उजेडाची वाट आपल्याला दाखवलेली असते, त्यांचा दास होण्यात खळखळ कसली? पण, आपण थारा नसलेल्या मनाच्या ताब्यात असतो. या अशा मनाचा दास होणं आपल्याला आवडतं. मनानं निर्माण केलेल्या जगाचा दास होणं आपल्याला रुचतं. म्हणजे ‘असत्’चा दास होणं हीच आपली निवड असते. कबीर सांगतात की, दास्यत्व या नाशवंत जगाचं करायचं की या समग्र अस्तित्वाचं करायचं? याचा विचार साधकाला करावाच लागतो. याचं कारण म्हणजे सद्गुरुच साधकासाठी प्रकट ईश्वरी तत्त्वाचे वाटाडे असतात.कबीर म्हणतात, नुसत्या मुखानं उच्चारलेलं देवाचं नाम हृदयाशी जोडलेलं नसतं तर मनातून आलेलं असतं. आपलं मन कुठल्याही कामातील कर्तेपण सोडायला तयार नसतं. आतून या मनाला मालकी हक्क हवा असतो आणि म्हणून आपण सद्गुरुंचे दास न होता विषयसुखाचे म्हणजे कांचनकामिनीचे दास होऊन राहतो. या सत्याचा बोध खरं जगण्याचं कुतूहल असलेल्या तहानल्या जीवाला होतो. देहाचं दास्यत्व परमचेतनेला जाणून शरण गेल्यावरच संपतं. हे एक प्रकारचं स्वामित्व असतं, जे अशा चेतनेला जाणल्यानं सहज लाभतं. साधकाला हे अनुभवातूनच उमजतं. दास कहावन कठिन है, मैं दासन का दास। अब तो ऐसा होय रहूँ, पांव तले की घास।। सद्गुरुंचा ‘मी’ शुद्ध असतो. या ‘मी’पणाला अनुसरताना साधकाला आपला ‘मी’ शुद्ध झाल्याचा भास, भ्रम होऊ शकतो. म्हणूनच सद्गुरुंविषयी साधकाच्या ठायी असलेलं दास्यत्व महत्त्वाचं असल्याचं या दोह्यातून कबीर सुचवतात. हे दास्यत्व सद्गुरुंच्या पायांखालचं गवत होण्यासारखंच आहे, असं साधकाला हृदयातून वाटणं होय.सद्गुरुंचा दास म्हणजे काय, हे नीट उमजायला हवं. दास होणं म्हणजे समर्पणातील आत्यंतिकता होय. दास होणं म्हणजे गुलाम होणं नाही. इच्छेविरुद्ध जो समर्पित होऊ पाहतो, तो गुलाम. गुलामी सक्तीतून घडते, परमप्रेमातून नाही. भयानं एखाद्याचा माथा सद्गुरुंच्या चरणावर ठेवला जाईल, पण आत्मा असा कधी झुकतो? दास्यत्व म्हणजे सद्गुरुंप्रति स्वेच्छेनं केलेलं समर्पण आहे. यात मानसिक दबाव नाही, भय नाही. आनंदात, अहोभावात आपल्या मर्जीनं आणि समग्र संकल्पासह केलेलं समर्पण आहे. कबीरांना या दास्यत्वात साधकाच्या ठायी असलेल्या अहंकाराचं विसर्जन होईल, याचा विश्वास वाटतो. त्यांनी साधकाला घडवलेलं हे दर्शन देहाचा मालक समजणाऱ्या त्याच्यासाठी आरसा होऊ शकतं. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Mar 2025 5:55 am

वेबमार्क:'फायरबॉल' वेध पृथ्वी अन् खगोलाच्या अंतरंगाचा...

काही वर्षांपूर्वी अप्रूप वाटणारे ओटीटी प्लॅटफॉर्म आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहेत. पण, तिथे आठवड्याला शेकडो सिनेमे, वेब सिरीज येत असतील तर पाहणारा भांबावून अन् भंडावूनही जातो. मग तो काही वेगळे शोधू लागतो. वेगळेपणाची ही भूक भागवण्याचे पर्यायही ओटीटीवरच उपलब्ध आहेत. अशा वेधक कलाकृतींचा, त्यांच्या अनोख्या निर्मितीचा धांडोळा घेणारे हे पाक्षिक सदर... एखादा महाकाय लघुग्रह पृथ्वीवर आदळेल आणि त्यामुळे डायनासोरप्रमाणे मानवजातही अकस्मात नष्ट होईल, ज्यायोगे आपल्या सर्व चिंताही लुप्त होतील, अशी भीतीयुक्त आशा ज्यांना वाटत असेल, त्यांनी वर्नर हर्झोगचा ‘फायरबॉल : व्हिजिटर्स फ्रॉम डार्कर वर्ल्डस्’ हा माहितीपट नक्कीच पाहावा. केंब्रिज विद्यापीठाचे ज्वालामुखीशास्त्राचे प्राध्यापक क्लाइव्ह ओपेनहायमर यांच्यासोबत वर्नर यांनी ही डॉक्युमेंट्री सह-दिग्दर्शित केली आहे. या माहितीपटात पृथ्वीच्या विलोपनाच्या, सर्वनाशाच्या शक्यतेसह लघुग्रह, उल्कापिंड आणि उल्कापिंडांच्या संरचनात्मक जैवभौतिक बाबींचे विश्लेषण करून त्यावर भाष्य केले आहे. ओपेनहायमर यांनी ‘इन टू द इन्फर्नो’ या ज्वालामुखी माहितीपटासाठी वर्नर यांच्यासोबत काम केले होते. दक्षिण कोरियातील एका प्रयोगशाळेला भेट दिल्यावर त्यांना या माहितीपटाची कल्पना सुचली. इथे उल्कापिंडांवर आधारित प्रोजेक्टवर काम सुरू होते. मग त्यांनी आपली कल्पना हर्झोगच्या कानावर घातली. माहितीपटातील घटनाक्रम पाहताना, मक्का येथील काबा मशिदीत बसवलेल्या काळ्या दगडाची आपसूक आठवण होते. खरे तर, हा माहितीपट म्हणजे भूविज्ञानाचाच एक विषय आहे. तो भूगर्भाच्या, पृथ्वीच्या विविध घनस्तरांच्या अनोख्या संरचनात्मक घटकांचे आणि त्यांच्याशी संबंधित घटनांचे निसर्ग व विज्ञान एकत्रितरित्या मांडतो. या माहितीपटात जगभरातील खगोलीय घटना, धूमकेतू, उल्का, पृथ्वीवर पडणारे दगड यांच्याबद्दलचे कुतूहल आणि वास्तवातले शास्त्रीय प्रकटन यांचे देखणे चित्रण आहे, ते पाहताना मती गुंग होते. वर्नर आणि ओपेनहायमर यांनी अंटार्क्टिकातील एका सक्रिय ज्वालामुखीच्या शिखरावर आधी काम केलं. मग या माहितीपटासाठी जगभरातील सहाही खंडात डझनभर निबिड ठिकाणी प्रवास केला. यामध्ये; टोरेस सामुद्रधुनी, सहारा वाळवंट, भूमध्य समुद्राचा परिसर, आल्प्स पर्वतरांगा, पॅसिफिकचा समुद्रतळ, पोपचे उन्हाळी निवासस्थान आणि रिटर्न टू अंटार्क्टिका यांचा समावेश होता. या माहितीपटात रुक्षता नाही, कारण याची शैली नर्मविनोदी आणि उपहासगर्भ आहे. बिनकामाच्या माहितीचे भारंभर रकाने नाहीत. सखोल अभ्यासातून समोर येणारी माहितीही कमीत कमी किचकट आहे. तिच्या सुलभीकरणावर मेहनत घेतल्याचे जाणवते. या माहितीपटाचा टोन केवळ नॅरेटिव्ह नाही, तर त्यात काही संशोधनात्मक बाबींचा रंजक समावेश असल्याने सायन्समध्ये रुची नसणारी मंडळीही ही पाहताना दंग होतात. कित्येकांना शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच शास्त्रीय सैद्धांतिक विषयात अभिरुची नसते. त्याचे एक कारण म्हणजे, या विषयांचे सादरीकरण लोकप्रिय शैलीचे नसते, तर ते काहीसे रुक्ष, किचकट असते. शिवाय, याचे प्रयोजन माहिती देण्याचे वा संशोधनात्मक असते. परिणामी ज्यांना नवी शास्त्रीय माहिती घेण्यात स्वारस्य नसते, ती मंडळी अधिकच दूर जातात. मात्र, ही डॉक्युमेंट्री त्याला अपवाद ठरेल. उल्कापिंडांनी निर्माण केलेल्या विवारांचे व्हीएफएक्स विलक्षण बोलके आहेत. खऱ्या विवरांची आणि कृत्रिमरित्या निर्मिलेल्या विवरांची बेमालूम सरमिसळ केली आहे. या विवरांचा वैज्ञानिक प्रभाव दाखवताना, काल्पनिकतेची झालर लागू न देताही हा भाग रम्य झाला आहे. हा माहितीपट पाहताना, पृथ्वीच्या भूस्तराविषयी आपली माहिती किती तकलादू आणि कमालीची त्रोटक आहे, हे जाणवते. सायन्स आवडत नाही, असे खूप लोक असतात आणि सायन्स आवडते, पण भूगर्भशास्त्र कंटाळवाणे वाटते, अशांची संख्याही मोठी आहे. या सर्व न-प्रेक्षकांनीही हा माहितीपट अवश्य पाहावा. त्यांची टेस्ट बदलू शकते! टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १० सप्टेंबर २०२० ला या माहितीपटाचा जागतिक प्रीमियर झाला आणि जगभरात त्याचा गाजावाजा झाला. त्यानंतर दोनच महिन्यांत तो ॲपल टीव्ही+वर प्रदर्शित झाला. सध्या याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो पाहता येईल. काही ओटीटी बंडल्समध्ये आता ॲपलचे सबस्क्रिप्शन मोफत असल्याने याचा स्वतंत्र खर्च येत नाही. असो. जाता जाता... नेटफ्लिक्सवर ‘गिफ्टेड’ हा सिनेमा १४ मार्चपर्यंतच उपलब्ध आहे. जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांतच जिच्या आईने आत्महत्या केली आहे, अशा एका गणितीय कुशाग्रतेचे वरदान लाभलेल्या ‘मेरी’ या बुद्धिमान मुलीचा ताबा मिळावा म्हणून तिची आज्जी आणि मामा यांच्यामध्ये कोर्टात दावा दाखल होतो. मेरीची आई, आज्जी दोघीही विलक्षण प्रतिभेच्या धनी असतात, मात्र त्यांचे आपसातले वैचारिक मतभेद त्यांना एकमेकींविरोधात उभे करतात. पुढे जाऊन ही मुलगी त्यात होरपळून निघते. एखाद्या तरल कवितेसारखी मांडणी असणारा हा चित्रपट हटके कॅटेगरीतला आहे, त्यामुळे त्याची शिफारस! अवश्य पाहण्यासारख्या गोष्टींनाच या सदरात स्थान आहे, हे तुम्ही जाणताच! (संपर्कः sameerbapu@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Mar 2025 5:51 am

गोष्ट सांगतो ऐका...:सॉरी!

आता माघार घेऊन चालणार नव्हतं. प्रियाशी एकदा बोलायलाच पाहिजे होतं. काही क्षणापूर्वी माघारी जायचा विचार करणारा प्रशांत पुन्हा तिचा पाठलाग करू लागला... प्रशांत कपाटाला असलेल्या आरशात भांग पाडून बाल्कनीकडं गेला. समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहणारे अंकल खिडकीत उभे होते. दोघांची नजरानजर झाली. दोघांनीही नजर फिरवली. समोरच्या फ्लॅटच्या खिडकीत असलेले अंकल म्हणजे प्रियाचे वडील. प्रशांतला ते अजिबात आवडत नाहीत, पण बघावं तेव्हा खिडकीत असतात. प्रशांतने पुन्हा बघितलं, अंकल तिथंच होते. वैतागून तो बाल्कनीत आला. प्रिया बहुतेक कॉलेजला निघाली होती. तिने तिची स्कूटर चालू केली. पण, ती लगेच बंद झाली. मग ती खूप वेळ बटन दाबून स्कूटर चालू करण्याचा प्रयत्न करू लागली. पण, स्कूटर चालू व्हायचं नाव घेत नव्हती. प्रशांत बघत होता. पुन्हा त्याने वर बघितलं. अंकल त्याच्याकडं बघत होते. प्रशांत वळला आणि खाली जायला निघाला. आईने डोळे मोठे करून बघितलं. ‘पाच मिनिटांत आलो,’ म्हणून प्रशांत खाली गेला. त्याने खाली जाऊन बघितलं, तर प्रिया तिथं नव्हती. त्याने परत वर बघितलं, तर अंकल बाल्कनीत होते. पण त्यांचं त्याच्याकडं लक्ष नव्हतं. प्रशांत इकडंतिकडं बघू लागला. प्रिया उजवीकडून पायी जाताना दिसली. प्रशांत त्या दिशेने चालू लागला. दोन वर्षे झाले, प्रशांतच्या समोरच्या अपार्टमेंटमधल्या घरात प्रिया राहायला आली होती. आजवर बोलायचा योग आला नव्हता. कारणही घडलं नाही तसं काही. नजरानजर व्हायची. पण तेवढंच. कधी हसून एकमेकांना ओळख दिली नव्हती. पण, आठ-दहा दिवसांपासून प्रशांत मनाशी ठरवत होता. त्याला प्रियाला भेटायचं होतं. एकदा तरी बोलायला पाहिजे, असं त्याने ठरवलं होतं. किती दिवस मनात ठेवणार? प्रशांत अखेर आज तिच्या मागे निघाला. प्रिया तशी खूप दूर निघून गेली होती. वेगात पावलं टाकत प्रशांत तिच्या अगदी जवळ आला. पण जसा जवळ आला, तसा त्याचा धीर खचला. तो पुन्हा आपल्या निर्णयावर विचार करायला लागला. आपण चूक तर करत नाही ना? त्याच्या मनात विचार डोकावून गेला. तिला काय वाटेल? ती काय बोलेल? काय उत्तर देईल? भररस्त्यात आपल्या कानाखाली तर नाही ना मारणार? असे असंख्य विचार अवघ्या दोन - तीन मिनिटांत प्रशांतच्या डोक्यात आले. त्याचा चालण्याचा स्पीड थोडा कमी झाला. पण, आता माघार घेऊन चालणार नव्हतं. प्रियाशी एकदा बोलायलाच पाहिजे होतं. काही क्षणापूर्वी माघारी जायचा विचार करणारा प्रशांत पुन्हा वेगात तिचा पाठलाग करू लागला. याचं कारण होतं त्याची आई. प्रशांतचे वडील सहा वर्षांपूर्वी वारले. आजारी होते. त्यानंतर आईने घराची जबाबदारी सांभाळली. आई जवळच्या दवाखान्यात नर्स म्हणून काम करू लागली. तिने आजवर किती कष्ट केले, हे प्रशांतने पाहिलं होतं. गेलं वर्षभर तो नोकरी करू लागला होता. चांगला पगार होता. म्हणून त्याने आता आईला नोकरी सोडायला लावून आराम करायला सांगितलं. पण, आई काही आराम करत नाही. घरातली कामं चालूच असतात. स्वयंपाकाला बाई ठेऊ देत नाही. धुण्या-भांड्याला बाई ठेऊ देत नाही. प्रशांतला ते आवडत नाही. पण, आईवर त्याचं खूप प्रेम आहे. आज आईवरच्या प्रेमापायी तो प्रियाशी बोलायला निघाला होता. प्रशांत खूप वेळ आपला पाठलाग करतोय, हे दरम्यान प्रियाच्या लक्षात आलं होतं. तिने मागं वळून बघितलं होतं दोनदा. पण, प्रशांतने थांबायचं तर सोडा, नजरही फिरवली नाही. तो एकटक प्रियाकडं बघतच राहिला. प्रियाच मग नजर फिरवून वेगात चालू लागली. पण असं किती वेळ चालणार? वेगात चालून दम लागला तिला. पण, प्रशांत मागे मागे येतच होता. तिला प्रशांत माहीत होता. पण, तो काय करतो? किती शिकलाय? वगैरे गोष्टी तिला माहीत असण्याचं कारण नव्हतं. कारण कधी बोलायची वेळ आली नव्हती. फक्त आपल्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहणारा हा मुलगा आहे, हे तिला माहीत होतं. पण, म्हणून अचानक असा पाठलाग करावा? तिचा संताप वाढत चालला होता. अचानक तिला आवाज ऐकू आला. प्रशांत तिला थांबायला सांगत होता. तिने वळून पाहिलं. हो. प्रशांत होता. इशारा करत होता. ‘थांब’ म्हणत होता.. आता मात्र प्रिया घाबरली. पण, प्रशांतने पुन्हा आवाज दिला.. ‘बोलायचं आहे,’ म्हणाला. आता मात्र प्रिया संतापली. थेट उलट दिशेने चालू लागली. जाताना प्रशांतला म्हणाली, ‘थांब, तुझ्या आईलाच सांगते..’ प्रशांत तिला काही बोलायचा प्रयत्न करणार होता. पण, अचानक एक वयस्कर जोडपं तिथं आलं. प्रशांत काही बोलला नाही. प्रिया वेगात प्रशांतच्या घरी पोचली. धावतपळत प्रशांतही पोचला. प्रियाने त्याच्या आईला घडला प्रकार सांगितला. आईच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. आई म्हणाली, ‘मीच म्हणाले होते त्याला, एकदा बोलून घे तुझ्याशी..’ आता तर प्रियाला काही तरी फेकून मारावं वाटलं प्रशांतला. म्हणजे आपल्याला आधी वाटलं, हा मवाली फक्त पाठलाग करतोय. नंतर संशय आला की प्रपोज करतोय. पण, याने तर थेट आईसोबत योजना बनवलीय मला जाळ्यात ओढायची! आई पण काय पोचलेली आहे. सुंदर मुलगी दिसली की लागले तिला सून बनवायचं स्वप्न बघायला.. असं काय काय तिच्या मनात येऊ लागलं. पण, प्रशांत तिला शांत करत बोलू लागला. ती म्हणाली, ‘मला काही ऐकायचं नाही, मी माझ्या पप्पांना सांगते.’ प्रशांत म्हणाला, ‘प्लीज सांग. मी तुला तेच सांगणार होतो. या वयात ते सारखे आमच्या घरात डोकावून बघतात. सारखे माझ्या आईकडं बघून इशारे करतात. खरं तर मी त्यांना मारणार होतो. पण, विचार केला की एकदा तुझ्याशी बोलावं. तुझ्या कानावर घालावं. नाही फरक पडला, तर मी खरंच मारणार आहे त्यांना..’ प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला विश्वासच बसला नाही. तरीही तिने बाल्कनीकडं जाऊन डोकावून पाहिलं. खरोखरच तिचे पप्पा खिडकीत उभे राहून, लपून इकडंच बघत होते. प्रियाने बघितल्यावर त्यांनी लगेच तोंड फिरवलं. घरात निघून गेले. प्रियाची खात्री पटली. तिला उलगडा झाला. पप्पा आजकाल सारखे बाल्कनीजवळ का उभे असतात. ती शांतपणे घरातून बाहेर जाऊ लागली. जाता जाता तिने एवढंच सांगितलं.. ‘पुन्हा माझे पप्पा इकडं बघणार नाहीत.. सॉरी!’ (संपर्कः jarvindas30@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Mar 2025 5:46 am

मुद्दे पंचविशी:‘समस्या निरक्षरता’ हीच समस्या!

आपल्यावर ‘समस्या निरक्षरतेचा’ फार मोठा पगडा आहे. त्यामुळे पुढची वाटचाल करताना समस्यांचे आकलन होणे, ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. एकविसाव्या शतकातील पंचविसाव्या वर्षाच्या टप्प्यावरुन पुढच्या पंचवीस वर्षांकडे पाहताना, आपली दृष्टी आणि दिशा नेमकी काय असावी, यावर भाष्य करणारे हे पाक्षिक सदर... एकविसाव्या शतकाची पहिली पंचवीस वर्षे संपत आली असून, पुढच्या २५ वर्षांकडे म्हणजेच २०५० कडे जगाची वाटचाल सुरू आहे. मानवाचा या पृथ्वीवरचा इतिहास तसे पाहता सुमारे ७० हजार वर्षांचा आहे. त्याआधी तो एक प्राणी म्हणून इतर जीवसृष्टीच्या सर्वसाधारण घटकाच्या रुपात अस्तित्वात होता. पण, पुढे त्याने आहे त्याच स्थितीत राहण्याच्या इतर प्राणिमात्रांच्या तत्त्वापासून फारकत घेतली आणि निसर्गावर मात करून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणाऱ्या बुद्धिमत्तेमुळे त्याने मानवी संस्कृती निर्माण केली आणि तो आजपावेतो ती विकसित करीत राहिला आहे. या इतिहासात जाण्याची गरज नाही, कारण तो आपल्याला ज्ञात आहे. पण, त्यानंतरची स्थित्यंतरे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या दहा-बारा हजार वर्षांपूर्वी माणसाची जंगलातील भटकंती संपली आणि त्याने शेती करून एके ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पुढे अर्थ आणि प्रशासकीय व्यवस्थेची गरज निर्माण होऊन त्या व्यवस्था उत्तरोत्तर विकसित होत गेल्या. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, जे पूर्वी ६५-७० हजार वर्षांत घडले नाही, ते गेल्या अडीचशे वर्षांत घडले. म्हणजेच १७७६ मध्ये पहिल्या औद्योगिक क्रांतीची सुरूवात होऊन आतापर्यंत त्या क्रांतीचे तीन अध्याय झाले आणि आता २०११ पासून चौथ्या औद्योगिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हे जे घडले त्यातून या पृथ्वीतलावर विस्मयकारक असा बदल झाला. या अडीचशे वर्षांत जगाचा चेहरामोहरा, चलनवलन पूर्णपणे बदलून गेले. बदलाच्या या वेगाचे एक ‘टर्बो-वेग’ असे वर्णन करणे योग्य ठरेल. उदाहरणच द्यायचे, तर लोकसंख्येचे देता येईल. जगाची लोकसंख्या १०० कोटी होण्यास दोन लाख वर्षे लागली. पण, सन १८०० मधील शंभर कोटी लोकसंख्या पुढील केवळ २०० वर्षांत आठ पटीने वाढून आता ८०० कोटींवर गेली आहे. लोकसंख्या वाढीचा हा वेग विचार करण्यापलीकडचा आहे. मानवाच्या बाबतीत घडणाऱ्या बदलाच्या या वेगावर आणखी एक संख्या प्रकाश टाकू शकते. सन १८०० पर्यंत ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर होऊन केवळ तीन टक्के लोक शहरांमध्ये राहात होते. पण, नंतरच्या जेमतेम सव्वादोनशे वर्षांत शहरी भागात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण सुमारे ५८ टक्क्यांवर गेले आहे. एकंदरीतच गेल्या दोनशे-सव्वादोनशे वर्षांत मानवाच्या बाबतीत जे बदल घडत गेले ते प्रचंड मोठे आहेत. पण, यापुढे हे बदल “सुपर-टर्बो वेगाने” म्हणजेच “अतिअति वेगवान” असे होतील आणि ते कल्पनेच्या पलीकडचे असतील. या अफाट गतीमुळे मानवी जीवन केवळ ढवळूनच निघणार नाही, तर मानव प्रजातीची पुढे नव्या प्रजातीमध्ये उत्क्रांती होऊ शकते, असे भाकित केले जात आहे. बदलांची ही गती आता कोणीही थांबवू शकत नाही किंवा थांबवायची झालीच, तर ते आता कोणाच्या हातातही राहिलेले नाही. आणि हे सत्य स्वीकारण्यापासून माणसापुढे गत्यंतरही नाही. तथापि, त्या स्थिती-गतीला मानवी समुदाय पोहोचेपर्यंतच्या अवस्थेत म्हणजे या वर्तमानात जे काही घडत आहे आणि नजीकच्या २५ वर्षांच्या भविष्यात जे घडू शकेल, त्यावर विचारमंथन व्हायला हवे. त्यातही आपल्या देशात आणि राज्यात या बदलांचे काय परिणाम दिसू शकतील? अशा परिणामांमुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी काही विशेष सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, आर्थिक धोरणे असावीत का? यांवर सखोल चिंतन होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, सध्याच्या प्रतिक्रियाशील(Reactive) संस्कृतीमुळे, म्हणजेच काही घडल्यानंतरच त्यावर उपाययोजना करण्याच्या पद्धतीमुळे या समस्या इतके गंभीर स्वरूप धारण करू शकतील की त्यावर उपाय करणेही दुरापास्त होईल. त्यासाठी पुढच्या पंचवीस वर्षांत, आपल्या राज्याची आणि देशाची वाटचाल कशी असावी, यासाठी प्रत्येक नागरिक, विचारवंत, शासनकर्ते आदींनी विचारमंथन करून एक दिशा निश्चित केली पाहिजे. त्यानुसारच आपली धोरणे, कार्यप्रणाली, अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था यांबाबतीत सखोलपणे निर्णय घेऊन कार्यवाही करणे दूरदृष्टीचे ठरेल. तसे सध्या होत आहे का? मला तरी तसे वाटत नाही. या समस्यांची एकत्रित जंत्री तयार करून सरकारने तसा अजेंडा समाज, राज्य आणि देशासमोर आणला आहे का? की “आजचा दिवस ढकलला” या स्वरूपातच आपली वाटचाल सुरू आहे? याबाबतीत सर्वात प्रथम येणारा आणि कळीचा मुद्दा म्हणजे, सध्याच्या आणि भविष्यात वाढून ठेवलेल्या समस्यांबाबत समाज, शासनव्यवस्था आणि विचारवंत खरोखरच संवेदनक्षम आहेत का? आणि त्या समस्यांच्या तीव्रतेनुसार त्यांचा प्राधान्यक्रम ठरवला आहे का? मात्र, तसे होताना दिसत नाही. पण, हे करणे यासाठी गरजेचे आहे की, जसे रुग्णाच्या रोगाचे निदान होत नाही, तोवर त्याच्यावरचे उपचार निरर्थक ठरतात, तसे मूळ समस्याच आपल्याला माहीत नसतील, तर उपाययोजना काय आणि कशा करणार? आज आणि पुढच्या पंचवीस वर्षांत देशापुढे, राज्यापुढे काय समस्या उद्भवू शकतात, हे व्यवस्थेने जनतेला सांगितले पाहिजे आणि त्यांना तोंड देण्याची काय तजवीज ठेवली आहे, हे शासनाने लोकांसमोर आणले पाहिजे. देशाच्या आणि राज्याच्या समोर असलेल्या समस्यांच्या तीव्रतेनुसार त्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करण्याचे आवाहन मी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवरुन केले होते. त्या अनुभवावरून आणि एकंदरीत समाजात जे काही चालले आहे, त्यावरून मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की, आपल्यावर ‘समस्या निरक्षरतेचा’ फार मोठा पगडा आहे. अद्यापही आपण समस्या साक्षर झालेलो नाही. आपण सुशिक्षित झालो, पण एक समाजसमूह म्हणून समस्यांबाबत पूर्णपणे अनभिज्ञता आहे आणि हीच ती ‘समस्या निरक्षरता’. त्यामुळे पुढच्या पंचवीस वर्षांची वाटचाल करताना समस्यांचे आकलन होणे, ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. शासनव्यवस्था, त्यांची ध्येयधोरणे, मंत्रिमंडळाचे आणि कायदेमंडळाचे निर्णय, बजेट, राजकीय पक्षांचे जाहीरनामे आणि विशेषतः राजकीय पक्षांच्या भूमिकेवरून खऱ्याखुऱ्या समस्यांची किंवा प्रश्नांची जाणीव यांपासून आपण भरकटलो आहोत, असे वाटाण्यासारखी स्थिती आहे. मुळातच समस्या नसलेल्या अशा विषयांना ‘समस्या’ म्हणून कृत्रिमपणे उभे करून आणि त्यांना भावनिकतेचा मुलामा देऊन स्वार्थ साधण्याचे हे युग आहे. हीच बाब खासगी क्षेत्रालाही लागू पडते. त्यामुळे प्रथमत: समाजापुढे, राज्यापुढे, देशापुढे नेमक्या काय समस्या आहेत, त्या अधोरेखित केल्या नाहीत, तर त्यावर तोडगा निघूच शकणार नाही! पृथ्वीतलावरील स्थित्यंतराचा वेग अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. आणि त्यातही पुढची २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे जगाच्या, देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर काय समस्या उद्भवणार आहेत आणि त्यांना सामूहिकरित्या कसे तोंड द्यायचे, त्याचा उहापोह या स्तंभातून करूया. (संपर्कः maheshzagade07@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Mar 2025 5:36 am

रसिक स्पेशल:शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचं काय करायचं?

शिक्षकांवरचे अशैक्षणिक कामाचे ओझे कमी केले पाहिजे, याबाबत दुमत नाही. पण, या कामांमुळेच विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही, हा शिक्षकांचा बचावही फसवा आहे. काम न करणारे ही ढाल वापरतात. गुणवत्तेसाठी अशैक्षणिक कामे बंद व्हायला हवीतच; पण शिक्षकांनीही अध्यापन आणि पूर्वतयारीसाठी वेळ दिला पाहिजे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री एक प्रारूप तयार करत आहेत, हे स्वागतार्ह आहे. दादा भुसे शिक्षणमंत्री झाल्यावर पहिल्या भेटीत मी त्यांना निवेदन दिले. त्यात शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी शिक्षक आणि अधिकारी यांची एक समिती करावी, अशी मागणी केली. त्याला त्यांनी दिलेला हा प्रतिसाद समाधानकारक आहे. नवीन शैक्षणिक धोरणाने निवडणूक आणि जनगणना वगळता अन्य कामे शिक्षकांना दिली जाणार नाहीत, असे स्पष्ट करुनही अशी कामे वाढत गेली. निवडणूक आणि जनगणना या कामांची चर्चा होते. पण, जनगणना १० वर्षांनी असते (या दशकात तर तीसुद्धा नाही) आणि निवडणूक ५ वर्षांनी असते. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा या फार तर ५ निवडणुका. त्यांची प्रशिक्षणे धरून ५ वर्षांत साधारण २० दिवस खर्च होतात. त्यामुळे जनगणना आणि निवडणुका यामध्ये शिक्षकांचा फार वेळ जात नाही. मात्र, ज्या शिक्षकांना ‘बीएलओ’चे काम दिलेले असते, त्यांचा मात्र खूप वेळ जातो. त्यांना मतदार यादीच्या दुरुस्तीपासून स्लिप वाटण्यापर्यंतची सगळी कामे करावी लागतात. त्यांचे हे काम कमी केले पाहिजे. निवडणूक, जनगणना यापेक्षा शिक्षकांचा खरा वेळ कागदपत्रे जमवणे आणि विविध योजना, स्पर्धा, बैठकांमध्येच जातो. ‘सिस्कॉम’ या संस्थेने एकदा शिक्षण सचिवांच्या डायरीची पडताळणी केली, तेव्हा तीन महिन्यांत ते १२५ पेक्षा जास्त बैठकांना उपस्थित असल्याचे दिसले. हे शिक्षण सचिव संचालकांच्या बैठका घेतात, संचालक उपसंचालकांच्या.. याप्रमाणे बैठकांची मालिका खाली थेट शिक्षकापर्यंत येते आणि प्रत्येक विषयाचे नवे नवे कागद फिरत राहतात. वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी सुरू झालेली ‘व्हीसी’ ही सुविधा आता सर्वांत मोठी असुविधा बनली आहे. कधी कधी दिवसाला ३ ते ४ व्हीसी असतात. परिणामी अधिकारी कार्यालयातच अडकून राहिल्याने शाळा भेटी थांबल्या आहेत. त्यामुळे महिन्याच्या सुरूवातीचे आणि शेवटचे तीन दिवसच शिक्षण विभागात बैठका होतील आणि मधल्या काळात सचिव ते केंद्रप्रमुख फक्त शाळांना भेटी देतील, असे स्पष्ट निर्देश दिले पाहिजेत. सध्या एकीकडे बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि राज्यात सर्वत्र शिक्षकांचे प्रशिक्षणही सुरू आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना केवळ ‘मार्च एन्ड’ आल्याने खर्च पूर्ण करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का, असा प्रश्न पडतो. वास्तविक मे महिन्याच्या सुटीत असे प्रशिक्षण घेण्यास अडचण असणार नाही. त्यात विद्यार्थ्यांचे नुकसानही होणार नाही. पण, अशैक्षणिक कामात वेळ जातो, अशी ओरड करणाऱ्या शिक्षक संघटना सुटीत बोलावले तरीही ओरड करतात, हेही तितकेच खरे. या स्थितीमुळे बैठका, प्रशिक्षण सत्रे नियंत्रित होण्याची गरज आहे. अनेकदा विविध उपक्रम आणि स्पर्धांमध्ये वेळ जातो. महावाचन उपक्रमात विद्यार्थ्यांनी वाचन करून अभिप्राय द्यायचा होता. यामध्ये निवडक विद्यार्थ्यांचे अभिप्राय घेणे समजू शकतो; पण शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला तो देणे बंधनकारक करण्यात आले. शाळेत हजार विद्यार्थी असतील, तर त्या प्रत्येकाचा अभिप्राय अपलोड करायला लावण्यात आला. केंद्र सरकारच्या ‘परीक्षा पे चर्चा’पासून ते गावच्या ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्व उपक्रमात शिक्षकांना भाग घ्यावा लागतो. शिक्षण विभाग क्रीडा स्पर्धा, चित्रकला, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करतो. वास्तविक शालेय स्तरावर होऊ शकणाऱ्या अशा स्पर्धा शासनाने घेण्याची गरज नाही. शालेय पोषण आहार शिजवणे आणि त्याचा हिशेब ठेवणे यातही शिक्षकांचा खूप वेळ जातो. तथापि, अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही, हा शिक्षकांचा बचाव फसवा आहे. काम न करणारे ही ढाल वापरतात. या कामांमुळे मुले लिहीत-वाचत नसतील, तर राज्यातील सगळेच विद्यार्थी अप्रगत असायला हवे होते. पण, गुणवत्तेत अव्वल असणाऱ्या राज्यातील अनेक शाळा ही कामे करूनही गुणवत्ता कशी आणतात? वर्षात ८०० तास शाळा चालते. चौथीपर्यंत विद्यार्थी ३२०० तास शाळेत असतो. त्यातील अगदी ५०० तास अशैक्षणिक कामात गेले, तरी वाचन – लेखन, गणित शिकवायला २७०० तास कमी आहेत का? तेव्हा वाचन - लेखन सरावासाठी असे शिक्षक वेळ देत नाहीत किंवा ते शिकवण्याचे कौशल्य त्यांच्यात कमी आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. शाळेच्या वेळेत मोबाइल वापरण्यामुळे शिक्षकांचा जाणारा वेळ, हाही आज चिंतेचा विषय बनला आहे. आणि गुणवत्तेसाठी वेळ कमी पडत असेल, तर शिक्षण कायद्यानुसार आठवड्याला ३० तास अध्यापन आणि १५ तास अध्यापन पूर्वतयारी असा वेळ देणे अपेक्षित आहे. शिक्षक रोज २ तास या पूर्वतयारीसाठी शाळेत लवकर गेले, तर अशैक्षणिक कामांची तक्रार करण्याची वेळच येणार नाही. गुणवत्तेसाठी अशैक्षणिक कामे बंद करून हा पूर्वतयारीचा वेळ शाळेत वापरण्याची आवश्यकता आहे. ‘माहिती’ देण्याचा महाउद्योग शिक्षकांचा बराचसा वेळ मागवलेली ‘माहिती’ पुरवण्यात जातो. व्हाट्स अॅपमुळे तर आता माहिती मागवणे अधिक सोपे झाले. व्हाट्स अॅपवर दिवसभर अनेक पत्रं पडत असतात आणि प्रत्येकावर ‘तत्काळ’ हा शेरा असतो. विविध शिष्यवृत्ती, आर्थिक नियोजनाचे हिशेब यासाठी माहिती मागवणे गरजेचे असले, तरी अधिकाऱ्यांनी जून ते एप्रिल महिन्यात पाच तालुके निवडून वर्षभरात आपण तिथून किती माहिती मागवली, हे एकदा तपासावे आणि गरज नसताना कोणती माहिती मागवली, शासनाकडे असलेलीच माहिती किती वेळा मागवली, याचे वर्गीकरण करावे. केंद्रात, तालुका किंवा जिल्हा कार्यालयात उपलब्ध असलेली कोणती माहिती विनाकारण शाळेकडून मागवली, हेही बघायला हवे. तसे झाले तरच वारंवार माहिती मागवण्याचे प्रकार कमी होतील. खरे तर अशा कामांसाठी एखादे सॉफ्टवेअर विकसित केले, तर त्यामुळे बरीच सुलभता येईल. (संपर्कः herambkulkarni1971@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Mar 2025 5:32 am

बलिदान दिन विशेष:संभाजी महाराज 350  वर्षानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत, सरकारने जीवनचरित्रावर प्रकाश टाकावा, मिटकरींचा लेख

आज रोजी शंभूराजांच्या हौतात्म्याला ३५६ वर्ष पूर्ण झालीत. मात्र, अद्यापही त्यांच्या उज्ज्वल जीवनचरित्रावर महाराष्ट्र शासनाने प्रकाश टाकला नाही. विधिमंडळ परिसर व मंत्रालयात त्यांचे तैलचित्र लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. शासकीय मुद्रणालयात त्यांचे अधिकृत चित्र उपलब्ध नाही. यावेळी तरी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून इतिहास संशोधकांच्या देखरेखित चरित्र साधन समिती गठित करावी, अशी महाराष्ट्रातील मराठी मनाची जनभावना आहे. वढू तुळापूर येथे फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च १६८९ रोजी क्रूर औरंगजेबाने संभाजी राजांची हत्या केली. त्या दुर्दैवी दिवसाला आज रोजी ३३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या प्रदीर्घ काळानंतरही संभाजी नावाचे जबरदस्त आकर्षण आजही समाजात असल्याचे अलीकडे प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने दाखवून दिले आहे. शंभूराजांच्या जीवन चरित्राच्या समकालीन साधनांचा आधार घेत अभ्यास केला, तर मराठा इतिहासात (छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता) त्यांच्या इतका साहसी, पराक्रमी, स्वातंत्र्यप्रेमी, स्वाभिमानी व सुसंस्कृत असा दुसरा छत्रपती झाला नाही. राजनीतीशास्त्र, शृंगारशास्त्र, अध्यात्मशास्त्र आदींमध्ये पारंगत असलेल्या या राजाने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी संस्कृतमध्ये श्रीबुधभुषणम (राजनीतीपर),नखशिख व नायिकाभेद हे ब्रजभाशेतील (शृंगार शास्त्रपर), सातसतक (अध्यात्म शास्त्रापर) अशी ग्रंथरचना करून त्यांची सांस्कृतिक उंची व साहित्यातील योगदान स्वतःच अधोरेखीत केले. विद्वत्तेबरोबरच दुसरीकडे रणांगण गाजवताना सिद्दी, पोर्तुगीज, डच, इंग्रज व मुघलांशी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर विजयी झुंज देणारे ते अद्वितीय योद्धाही ठरले. मराठी, हिब्रू, पाली, संस्कृत, इंग्रजी, ब्रजभाषेसह ते १७ भाषेचे जाणकार होते. कवी व तेज:पुंज शरीर संपदा मिळविलेले युवराजही होते. गोव्याचा व्हाइसरॉय ज्याच्यासोबत १२०० गोरे, २५०० काळे शिपाई व ६ तोफा होत्या. त्याला अवघ्या ६०० मराठ्यांनी फोंड्या किल्ल्यावरून पिटाळून लावले. हे संभाजीराजांचे वेगळेपण होते! दिंडोरीतील रामसेज औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन खानाविरुद्ध अनेक वर्ष मूठभर मावळ्यांनी लढवीला. शिवाय जंजिरा मोहीम, अकबराला राजाश्रय, दंडाराजपुरीवर चाल, भागानगरवर हल्ला, बुऱ्हाणपूर, कारंजा, जालना, औरंगाबाद, सुरत अशा असंख्य १४० लढाया लढून एकाही लढाईत पराभूत न होणारा विजयी योद्धा असा आपला छत्रपती, किती शूर आणि कर्तबगार असेल? वयाच्या ३२ व्या वर्षी ४० दिवस अन्नाचा कणही पोटात नसताना सह्याद्रीचा हा छावा हाल सोसत स्वराज्य रक्षणासाठी समर्पित झाला. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईच्या शासकीय मुद्रणालयात मी काही पुस्तके चाळत असताना माझ्या हाती संपूर्ण गडकरी हे शासनाने १९८१ साली प्रकाशित केलेले पुस्तक पडले. त्यात राजसंन्यास हे नाटक छापलेले होते. राजसंन्यासबद्दल आजवर ऐकले होते. मात्र, केवळ तीनच पाने वाचल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली व कुणाचीही जाणार असेच लिखाण गडकर्‍यांनी केले होते. स्वराज्यासाठी एकीकडे कायस्थांनी दिलेले बलिदान, तर दुसरीकडे गडकरीने प्रकट केलेले त्यांचे वैचारिक दारिद्र्य या माध्यमातून वाचण्यात आले. गडकर्‍यांनी त्यांच्या राजसंन्यास नाटकात संभाजी राजांना रोमँटिक हिरोच बनविले होते. या विषयाचे गांभीर्य ओळखून मी तात्काळ ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री उदय सामंत , उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथराव शिंदे यांच्या लक्षात पत्राद्वारे आणून दिली. त्याचे कारण ही प्रत शासनाने छापलेली होती. त्यावर विविध चॅनेल्सला मी मुलाखती पण दिल्या. गडकरी प्रेमी कायस्थांनी माझ्याशी संपर्क साधून मला व्हाट्सअप वर धमक्यापण दिल्या, पण त्यांना वास्तव सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा ते मान्य केले. राजसंन्यासच्या निमित्ताने मी आणखी इतिहासात शिरलो. त्याच दिवशी दुपारी विधान परिषदेच्या सभागृहात काही सदस्यांनी संभाजीराजांचा धर्म न बदलणारा राजा असा त्यांच्या सोयीचा उल्लेख केला होता. अर्थात हा उल्लेख करताना त्यांच्याकडे साधनांचा कुठलाही आधार नव्हता किंवा तात्कालीन कुठलंही संदर्भ साधन या सदस्यांनी वाचलेले नव्हतं. प्रत्यक्षात विधिमंडळातील या महान सदस्यांनी ऐकीव माहितीच्या आधारावर असे धाडस केले असावे. त्यांना थोडी माहिती असावी म्हणून सांगावेसे वाटते. बादशाही छावणीत साकी मुस्तैदखान, ईश्वरदास नागर हे दोघे संभाजीराजांच्या देहादंडाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्या ग्रंथात कुठेही संभाजीराजांना धर्म बदल असा प्रस्ताव औरंगजेबाने दिला नसल्याचे लिहिले आहे. रहुल्ला खानमार्फत बादशहाने दोनच प्रश्न विचारले होते, १) बुऱ्हाणपूर व इतर ठिकाणी लुटलेला खजिना कुठाय? आहे आणि बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवत होते? (संदर्भ-मराठी रियासत मध्य विभाग १, रियासतकार सरदेसाई आवृत्ती दुसरी मुंबई १९२५)असो, मूळ मुद्द्यावर येऊ. संभाजी राजांवर आजपर्यंत जेवढी नाटके चित्रपटे व कथानके रचली गेली तितकी इतिहासात दुसऱ्या कुणावरही रचली गेली नाहीत. साहित्यिकांच्या लेखणीत शंभूराजांची प्रतिमा स्वैर, दुर्वर्तनी व राज्यबुडव्या अशीच रेखाटली गेली. हे महाराष्ट्राच्या साहित्याचे दुर्दैव म्हणावे लागेल! राजसंन्यास, राज मस्तकाचा आदेश, बेबंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते, थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, प्रणयी युवराज, सती गोदावरी, अश्रू ढळले रायगडाचे, दुर्दैवी छत्रपती, प्रतिज्ञा कंकण, अशी तब्बल ८० नाटकं, व ३२ चित्रपटे आजही युट्युब,विकिपीडिया व साहित्य क्षेत्रात जिवंत आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, जयसिंगराव पवार यांसारख्या इतिहास संशोधकांनी संभाजी महाराजांच्या चरित्रावरील डाग पुसलेले आहेत. अनेक वर्षानंतर वढू तुळापूर येथील निबिड अरण्यात वा. सी. बेंद्रे यांनी तब्बल २२ वर्ष शोध घेऊन संभाजी राजांची समाधी शोधून त्यावर चौथरा बांधला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर मागील सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असताना शंभूराजाच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी महाराष्ट्र सरकारकडून साडेतीनशे कोटी उपलब्ध करून दिले. आज रोजी शंभूराजांच्या हौतात्म्याला ३५६ वर्ष पूर्ण झालीत. मात्र, अद्यापही त्यांच्या उज्ज्वल जीवनचरित्रावर महाराष्ट्र शासनाने प्रकाश टाकला नाही. विधिमंडळ परिसर व मंत्रालयात त्यांचे तैलचित्र लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. शासकीय मुद्रणालयात त्यांचे अधिकृत चित्र उपलब्ध नाही. यावेळी तरी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून इतिहास संशोधकांच्या देखरेखित चरित्र साधन समिती गठित करावी, अशी महाराष्ट्रातील मराठी मनाची जनभावना आहे. सोबतच बलिदान दिनी त्यांना अभिवादन करावे, त्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत करावा. त्यांच्यावरील उरला सुरला बदनामीचा डाग धुऊन काढावा. त्यांच्यावर निर्माण झालेली अश्लील पुस्तके, नाटके व कथा कादंबऱ्या युट्युब आणि विक्री दुकानावरून हटवाव्यात. कारण सह्याद्रीचा छावा अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत झुंजत आहे. चित्रपट बघून मनोरंजन होऊ शकेल, मात्र देशातील या थोर छत्रपतींचा पराक्रम सानथोरांनी पाठ्यपुस्तकातून आत्मसात केला व सरकारने तसा तो अंत:र्भूत केला तरच हे पुण्याचे काम सरकारकडून घडेल. छत्रपती संभाजी महाराज उपेक्षित राहू नयेत, ही महाराष्ट्राची माफक अपेक्षा आहे. अलीकडेच आयनॉक्स मॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांनी एकत्र येऊन छावा चित्रपट बघितला, त्यातील कवी कलुषा औरंगजेबाला म्हणतो, हाथी, घोडे, तोफ, तलवारेफौज तो तेरी सारी हैपर जंजीर मे जकडा राजा मेरा,अब भी सब पे भारी है... जय शंभूराजे (लेखक आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत.)

दिव्यमराठी भास्कर 11 Mar 2025 6:27 am

रसिक स्पेशल:'एक देश - एक एमएसपी' महाराष्ट्रासाठी अन्यायी

‘एमएसपी’ची हमी देणे, हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा एकमेव मार्ग होऊ शकत नाही. पण तरीही, ‘एक देश - एक एमएसपी’चे अनाठायी धोरण राबवले जात आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांचा फायदा होत आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली जात आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ चाललेले शेतकरी आंदोलन सध्या पंजाबमध्ये सुरू आहे. त्यांच्या एकूण पंधरा मागण्या आहेत. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची मागणी आहे, ती सर्व शेतमालाची किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) खाली विक्री होणार नाही, याची हमी देणारा कायदा केंद्र शासनाने करावा आणि त्याची चोख अंमलबजावणी व्हावी. तसे पाहिले तर पंजाब - हरियाणातील शेतकरी पिकवत असलेला सर्व गहू आणि भात सरकार आधारभूत किमतीने खरेदी करतच आहे. नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान, पंजाब सरकरने २०२० मध्ये असा कायदाही केला आहे. मग ही मंडळी आंदोलन का करत आहेत, हा प्रश्न आहे. कशी ठरते ‘एमएसपी’? भारतात ‘एमएसपी’ ठरवण्याची “सरासरी’ पद्धत आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्यातील विविध सेंटरमधून, रँडम पद्धतीने शेतकऱ्यांकडून उत्पादन खर्चाची माहिती घेतली जाते. ती राज्य सरकारकडे सादर केली जाते. राज्य सरकार त्याची सरासरी काढून केंद्र सरकारला शिफारशीच्या रूपात पाठवते. अशा सर्व राज्यांतून आलेल्या शिफारशींची सरासरी काढली जाते आणि कृषी मूल्य व खर्च आयोग, केंद्र शासनाकडे संभाव्य एमएसपी कळवते. हे आकडे अन्न मंत्रालय, ग्राहक व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र व्यापार मंत्रालय यांच्याकडे पाठवले जातात. प्रत्येक मंत्रालय आपल्या सोयीने यात काटछाट सुचवते. महागाई नियंत्रण, अन्य देशांशी केलेले करार वगैरे सर्व बाबी लक्षात घेऊन अंतिम एमएसपी जाहीर केली जाते, ती कधीच खऱ्या उत्पादन खर्चावर आधारित नसते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तोटा गेल्या अनेक दशकांपासून केंद्र शासनाने जाहीर केलेली एमएसपी ही महाराष्ट्र सरकारने केलेल्या शिफारशींपेक्षा खूप कमी आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोग सुद्धा प्रत्येक राज्याचा उत्पादन खर्च काढत असते आणि त्यानुसार आधारभूत किमती जाहीर होतात. २०२२-२३ मध्ये केंद्र शासनाने भात पिकाला जाहीर केलेली एमएसपी २०४० रुपये प्रति क्विंटल होती, तर महाराष्ट्राने केलेली शिफारस ४४५२ रुपये प्रति क्विंटल इतकी होती. याच हंगामात गहू पिकासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली एमएसपी २०१५ रुपये इतकी, तर राज्य शासनाची शिफारस ३७५५ रुपये प्रति क्विंटल होती. यातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा किती तोटा होतो, हे दिसते. सरासरी पद्धतीत पंजाबातील शेतकऱ्यांचा मात्र मोठा फायदा होतो. २०२३-२४ या वर्षात कृषी मूल्य आयोगाने काढलेल्या पंजाबच्या गव्हाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल केवळ ७८६ रुपये आहे आणि एमएसपी प्रति क्विंटल २२७५ रुपये मिळाली. याच राज्याचा भाताचा (Paddy) उत्पादन खर्च प्रति क्विंटल ८६४ रुपये आहे आणि एमएसपी २१८३ रुपये प्रति क्विंटल मिळाली. याच वर्षात कृषी मूल्य आयोगाने महाराष्ट्रातील भात आणि गव्हाचा काढलेला उत्पादन खर्च अनुक्रमे २८३९ व २११५ रुपये प्रति क्विंटल आहे. या दोन्ही पिकांना राज्य सरकारची शिफारस चार हजार रुपयांपेक्षा जास्त दराची आहे. म्हणजे एमएसपी उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के कमी आहे. उत्पादन खर्चात फरक का? भारतातील प्रत्येक राज्यात सर्व पिके कमी-जास्त प्रमाणात पिकवली जातात. पण, काही राज्यांतील जमीन, हवामान, पाण्याची उपलब्धता ठराविक पिकांना पोषक असते. त्यामुळे त्या पिकाची उत्पादकता त्या राज्यामध्ये जास्त असते. उत्पादकता वाढली की उत्पादन खर्च कमी होतो. शिवाय, प्रत्येक राज्यात मजुरीचे दर सारखे नसतात, ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलचे दर वेगळे असतात. कुठे वीज मोफत, तर कुठे पाणी मोफत अशा गोष्टींमुळे उत्पादन खर्चात मोठा फरक पडू शकतो. पंजाबमध्ये अतिशय सुपीक जमीन आहे. विविध धरणांतून पाण्याची उपलब्धता आहे. वीज मोफत आहे. त्या राज्यात गव्हाचे सरासरी प्रति एकर २२ ते २५ क्विंटल उत्पादन येते आणि महाराष्ट्रात १२ ते १५ क्विंटल येते. मग सर्व राज्यांना सरसकट एकच एमएसपी देऊन कसे चालेल? पंजाब - हरियाणामध्ये एमएसपीवर होत असलेल्या धान्य खरेदीचा खर्च केंद्र शासन करते. म्हणजे करदात्यांचा, शेतकऱ्यांसाठी खर्च होणारा पैसा फक्त पंजाब - हरियाणातील शेतकऱ्यांच्याच पदरात पडतो. काय करायला हवे? मुळात किमान आधारभूत किमतीची म्हणजे एमएसपीची हमी देणे, हा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा एकमेव मार्ग होऊ शकत नाही. हमीभाव हा कमी भाव असतो, तो नफा देणारा नसतो. तथापि, अतिरिक्त उत्पादन झाले, खुल्या बाजारातील दर खूपच कोसळले, तर किमान काही संरक्षण असावे म्हणून सरकारने एमएसपी अर्थात हमीभाव द्यायचे ठरवले, तर कोणत्या पिकांना किती एमएसपी द्यायची, हे ज्या त्या राज्याने ठरवले पाहिजे. तसे झाले तरच त्या राज्यातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्याची शक्यता आहे. ज्या पिकांचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्त एमएसपी देऊन उत्पादन वाढवावे. पंजाब - हरियाणामध्ये भात आणि गहू जशी मुख्य पिके आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रात कांदा, कापूस, सोयाबीन, तूर व सर्व तेलबियांना एमएसपी जाहीर करून संरक्षण देण्यात यावे. या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. यासाठी हमीभावाचा कायदाच केला पाहिजे, असे नाही. या पिकांची देशांतर्गत आणि प्रदेशात किफायतशीर दरात विक्री करण्याची सुलभ व्यवस्था केली, तर एमएसपीची गरजच भासणार नाही. पण तरीही, ‘एक देश - एक एमएसपी’चे अनाठायी धोरण राबवले जात आहे. त्यातून अन्य राज्यांतील पिकांच्या वाढीव उत्पादन खर्चाच्या सरासरीमुळे उत्तर भारतातील राज्यांचा फायदा होत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली जात आहेत. इथले राज्यकर्ते याची दखल घेणार का, हाच प्रश्न आहे. (संपर्कः ghanwatanil77@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 9 Mar 2025 6:00 am

खलनिग्रहणाय:पोलिसांची खरी कसोटी

गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी हे गुन्हे उघडकीस आणणे आवश्यक ठरते. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्रज्ञानासह योग्य प्रशिक्षणाची गरज असते. शिवाय, कठोर परिश्रम आणि अखंड जागरूकताही आवश्यक असते. मी लातूरला १९९४ ते ९७ या काळात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. त्या दरम्यान कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा दरोडा पडला. त्यामध्ये दोन लोकांचा बळी गेला होता. क्राइम ब्रँचची टीम घेऊन आम्ही सगळे तिथे तातडीने दाखल झालो. संपूर्ण परिसराची घेराबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. त्या दरम्यान आमच्या एका अधिकाऱ्याला एक डायरी सापडली. त्यामध्ये पाच लोकांची नावे मिळाली. माहिती घेतली असता हे सगळे अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या गावात पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. हे सगळे लोक त्यांच्या घरीच सापडले. त्यांची चौकशी केली असता, या लोकांनी गुन्हा केला नसावा, असे तपास पथकाला वाटले. मग प्रश्न पडला की ही डायरी कोणाची? आणि तिच्यात या लोकांची नावे कशी काय आली? त्यामुळे त्या लोकांकडे आणखी विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की, हा दरोडा एका वेगळ्या टोळीच्या लोकांनी टाकला आहे आणि ती आमची दुश्मन टोळी आहे. म्हणून त्यांनी आमची नावे मुद्दाम त्या डायरीत लिहिली आणि ती सार्वजनिक ठिकाणी फेकून दिली, जेणेकरुन पोलिसांनी आम्हाला अटक करावी. मग याच लोकांच्या मदतीने पोलिस पथकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीचा तपास सुरू केला आणि ती आख्खी टोळी जवळच्या जंगलात हाती लागली. दरोड्यामध्ये लुटलेला सगळा मुद्देमाल त्या टोळीकडून हस्तगत करण्यात आला. गंभीर गुन्ह्यांचा तपास हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान असते. त्यामध्ये पहिल्यांदा घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे ठरते, कारण त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. त्यानंतर फिर्यादीची विचारपूस तसेच घटनेच्या साक्षीदारांचा जबाबही तितकाच आवश्यक असतो. गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी कशी आहे? म्हणजे ते कशा पद्धतीने गुन्हे करतात, हे लक्षात येणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे. शिवाय, अन्य भागाशी; विशेषत: आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क असणे आवश्यक असते. अशा गुन्ह्यांच्या तपासात फॉरेन्सिक टीमही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमाणे खबऱ्यांचे नेटवर्कही चांगले असायला हवे. गंभीर आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांच्या तपासात दिवसरात्र एक करावा लागतो. अशावेळी तपास पथक हे एक टीम म्हणून काम करते. त्यामुळे त्यांच्यातही चांगला समन्वय गरजेचा असतो. या पथकाला वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणेही महत्त्वाचे असते. नागपूर जिल्ह्याचा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक असताना, क्राइम कॉन्फरन्समध्ये मला पहिल्यांदा एक असा गंभीर गुन्हा दिसला, ज्यामध्ये वर्षभरापूर्वी एका सहायक फौजदाराची हत्या करण्यात आली होती. खूप प्रयत्न करूनही हा गुन्हा उघडकीस आला नव्हता. त्यामुळे या तपासासाठी आम्ही क्राइम ब्रँचची एक चांगली टीम तयार केली. ही हत्या सुनियोजित असल्याचे टीममधील सर्वांचे मत होते. पण, खूप तपास करुनही काही निष्पन्न झाले नाही. एकेदिवशी संध्याकाळी मी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अब्दुल रजाक यांच्यासोबत याच विषयावर बोलत मैदानात वॉकिंग करत होतो. तेव्हा त्यांनी सांगितले की, सर, मला तरी हा गुन्हा सुनियोजित वाटत नाही, तो अचानक घडला असावा. मग मी त्यांना त्या दिशेने तपास करण्यास सांगितले. ते जलालखेडा पोलिस ठाण्यात गेले आणि तिथेच सात दिवस तळ ठोकला. त्या परिसरात घडलेल्या सगळ्या जबरी चोऱ्यांची माहिती घेतली. त्यांना लक्षात आले की, हा गुन्हा घडला त्या काळात त्याच भागामध्ये रस्त्यावरील लुटीच्या अनेक घटना घडल्या होत्या आणि त्यातील बहुतांश उघडकीला आल्या नव्हत्या. त्यांनी त्या घटनांचा नव्याने तपास सुरू केला तेव्हा, या सगळ्या जबरी चोऱ्या एकाच टोळीने केल्या असाव्यात, हे लक्षात आले. आणखी तपास केल्यावर ही टोळी मध्य प्रदेशची असल्याचे समोर आले. त्यातूनच लूटमारीचे हे सर्व गुन्हे उघडकीला आले आणि त्या सहायक फौजदाराची हत्याही याच टोळीने केली होती, हे निष्पन्न झाले. त्याचे असे झाले होते की, ही टोळी एकदा रस्त्यावर ट्रॅप लावून बसली होती. हा अधिकारी त्याच रस्त्यावरुन दुचाकीने जात होता. त्याला या टोळीने घेरले आणि त्यावेळी झालेल्या झटापटीत त्यांनी गळा दाबून त्याचा खून केला. या गुन्ह्याच्या तपासाचा अहवाल ‘सीआयडी’ला पाठवण्यात आला आणि या कामगिरीला ‘बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड’ही मिळाले. गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते, हे पोलिस दलातील ३४ वर्षांच्या अनुभवावरून मी सांगू शकतो. सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी गंभीर गुन्हे उघडकीला आणणे खूप आवश्यक असते. अनेकदा गंभीर आणि संवेदनशील गुन्हे उघडकीस आले नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचाही मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरासह योग्य प्रशिक्षणाची गरज असते. शिवाय, कठोर परिश्रमांची तयारी आणि अखंड जागरूकताही आवश्यक असते. पोलिस दलात असे अनेक अधिकारी, कर्मचारी असतात, ज्यांना गुन्हे उघडकीस येत नाहीत तोपर्यंत चैन पडत नाही. स्वत:चा जीव धोक्यात घालून गुन्हे उघडकीस आणणारे अनेक अधिकारी, अंमलदार मी पाहिले आहेत. मुंबई क्राइम ब्रँच अशा प्रकारचे आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणण्यात तरबेज आहे. गुन्ह्यांचा योग्य तपास करुन गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात एकणूच महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी संपूर्ण देशात अव्वल मानली जाते. आपल्या पोलिस दलाला ही देदीप्यमान परंपरा लाभली आहे. ती पुढेही आणखी लखलखत राहावी, ही अपेक्षा. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 9 Mar 2025 5:55 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:अनुपम खेर यांनी पक्षाघात होऊनही पूर्ण केले शूटिंग; ‘पहला पहला प्यार’च्या शूटिंगदरम्यान अर्धा चेहरा झाला होता पॅरालाइज

परवा, ७ मार्चला माझे घनिष्ट मित्र आणि भारतातील एक महान अभिनेते अनुपम खेर यांचा वाढदिवस होता. त्यामुळे मनात विचार आला की, ज्यांना मी खेर साहेब म्हणून संबोधतो, त्या अनुपम खेर यांच्याविषयीच्या काही गोष्टी माझ्या हिश्श्याच्या आजच्या किश्श्यांमध्ये सांगाव्यात. ही गोष्ट १९८२ किंवा ८३ ची असेल. भोपाळमध्ये एशियाडच्या निमित्ताने टीव्ही आला होता. त्यावेळी केवळ दूरदर्शन हेच एकमेव चॅनल होते, त्यावरच कार्यक्रम सादर व्हायचे. तेव्हा आम्हाला टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा बघायला मनाई होती. त्यामुळे घरी टीव्ही आल्यानंतर त्यावर सिनेमा बघण्यात जो एक प्रकारचा कैफ किंवा उत्कंठा असायची, ती शब्दांत सांगता येणार नाही. अगदी कृषी दर्शनसह टीव्हीवरचे सगळे कार्यक्रम आम्ही बघायचो. एकेदिवशी मी टीव्ही सुरू केला, तेव्हा त्यावर ‘वापसी’ नावाचा एक सिनेमा सुरू होता. ही एका रुग्णाची कहाणी होती. त्याचे कथानक, त्यातील अभिनेत्याचे काम लक्षवेधक होते. ज्या कलाकाराने रुग्णाची ही व्यक्तिरेखा साकारली होती, त्याचा अभिनय इतका जबरदस्त होता की, कितीतरी दिवस त्या भूमिकेने माझ्या मनात घर केले होते. सिनेमाची टायटल्स लक्ष देऊन पाहिली नव्हती, त्यामुळे त्या अभिनेत्याचे नाव समजले नव्हते. पण, मी त्याचा चाहता मात्र बनलो होतो. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी मी केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेलो. आपला नंबर येण्याची वाट बघत बसलो असताना तिथे मला एक सिनेमॅगेझीन दिसले. मी ते चाळू लागलो, तेव्हा त्यामध्ये मला त्या अभिनेत्याचा फोटो दिसला. महेश भट्ट यांच्यासमवेत आपल्या नव्या कारसह त्यांचा हा फोटो होता. तेव्हा मला समजले की या अभिनेत्याचे नाव अनुपम खेर आहे. पुढे मी मुंबईला आलो आणि अन्नू कपूर (अन्नू भाई) यांच्यासमवेत नाटकांसाठी काम करायला सुरूवात केली. जुहूच्या एका शाळेमध्ये आम्ही ‘लैला मजनू’ नाटकाची तालीम करत होतो. तेव्हा अचानक माझे लक्ष तिथे उभे असलेल्या खेर साहेबांकडे गेले. त्या नाटकात त्यांचे अनेक मित्र काम करत होते, म्हणून त्यांना भेटण्यासाठी ते आले होते. मी त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष पाहिले. मी खिडकीजवळ गेलो आणि बाहेर उभ्या असलेल्या खेर साहेबांना निरखू लागलो. डोक्यावर केस नसतानाही इतका सुंदर दिसणारा माणूस मी त्यापूर्वी कधी पाहिला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर जी चमक होती, तशी चमक मी नंतर केवळ दिलीपकुमार साहेबांच्या चेहऱ्यावर पाहिली. या गोष्टीवरून मला इफ़्तिख़ार नसीम साहेब यांचा एक शेर आठवतोय... उस के चेहरे की चमक के सामने सादा लगा आसमाँ पे चाँद पूरा था मगर आधा लगा। पुढे मी लिहायला सुरूवात केली. माझ्या कारकिर्दीतील पहिल्या तीन सिनेमांमध्ये खेर साहेब काम करत होते. ते सिनेमे होते.. ‘श्रीमान आशिक’, ‘वक्त हमारा है’ आणि “पहला पहला प्यार’. त्यांनी एका मुलाखतीत माझ्याविषयी जे प्रशंसोद्गार काढले होते, ते मी कधी विसरु शकत नाही. ते म्हणाले होते, ‘एखाद्या पदार्थाच्या चवीप्रमाणे डॉयलॉगची लज्जतही जिभेवर रेंगाळत राहते. मला रूमी जाफरींच्या डॉयलॉगची अशी चव लागली आहे की, मी त्यांच्या सिनेमाच्या शूटिंगवरुन दुसऱ्या शूटिंगच्या ठिकाणी जातो आणि अन्य लेखकाने लिहिलेले डॉयलॉग म्हणतो, तेव्हा माझ्या जिभेला ती लज्जत जाणवत नाही.’ एवढ्या मोठ्या अभिनेत्याने असे म्हणणे हा त्यांचा उमदेपणा होता. पण, त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले. “पहला पहला प्यार’चे शूटिंग सुरू असताना एकेिदवशी खेर साहेबांच्या सेक्रेटरीचा फोन आला आणि लगेच भेटायला या, असा निरोप दिला. आम्ही भेटायला गेल्यावर सेक्रेटरीने सांगितले की, खेर साहेबांना पक्षाघाताचा झटका आला आहे, त्यांचा अर्धा चेहरा पॅरालाइज झाला आहे. हे ऐकून आम्हाला मोठा धक्का बसला. आता सिनेमाचे उरलेले शूटिंग कसे पूर्ण होणार, याचे सगळ्यांना टेन्शन आले होते आणि मला खेर साहेब कसे बरे होणार, याचे टेन्शन आले होते. मला खेर साहेबांची मन:स्थिती समजत होती. कोणाही व्यक्तीच्या चेहऱ्याच्या बाबतीत असे घडले तर त्याच्यावर काय वेळ येईल? आणि एखाद्या अभिनेत्यासाठी तर त्याचा चेहरा हेच सर्व काही असते. त्याचा चेहराच पॅरालाइज झाला, तर त्याने काय करावे? खेर साहेबांच्या मनावर या घटनेने काय आघात झाला असेल, याची मला जाणीव होत होती. मी त्यांना म्हणालो, खेर साहेब, तुमचा चेहराच इतका तेजस्वी, चमकदार आहे ना, त्याला नजर लागली असावी... इकडे आमचे निर्माते शाद साहेब आणि दिग्दर्शक मनमोहन सिंह खूप हैराण झाले. सिनेमाचा क्लायमॅक्स चित्रीत करायचा राहिला होता. खेर साहेबांसह ऋषी कपूर, तब्बू, कादर खान, अमरिश पुरी, टिक्कू तलसानिया अशा सर्व कलाकारांच्या तारखाही घेतलेल्या होत्या. पण, खेर साहेबांचा अर्धा चेहरा पॅरालाइज झाला असताना काम करणार तरी कसे? मग मी डोके वापरुन सिनेमाचा शेवटचा प्रसंग बदलून पुन्हा लिहिला आणि त्याप्रमाणे त्यांना दाढी - मिशा लावून, पंडित बनवून थेट क्लायमॅक्सच्या दृश्यामध्ये आणले. खेर साहेब सेटवर आले, शूटिंगही झाले. पण, त्यांना असा काही आजार झाला आहे, हे कुणाच्या लक्षातही आले नाही. खेर साहेबांना सलाम केला पाहिजे, कारण आपल्या हिमतीच्या, इच्छाशक्तीच्या जोरावर एवढ्या गंभीर आजाराशी लढून ते त्यातून सुखरूप बाहेर पडले आणि फिल्म इंडस्ट्रीत पुन्हा ताकदीने उभे राहिले, आपले काम सुरू ठेवले. त्यांनी आपल्या नाटकाला अगदी समर्पक नाव दिले होते- ‘कुछ भी हो सकता है’. खेर साहेब, ईश्वराने आपल्याला शंभर वर्षांपेक्षा अधिक दीर्घायुष्य द्यावे. खेर साहेबांसाठी ‘श्रीमान आशिक’मधील हे गाणे ऐका... अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 9 Mar 2025 5:50 am

डायरीची पाने:हे आम्हाला माहीतच नव्हतं!

आमच्या शाळेत दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. उंच आवाजात पाढे, उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला कवितेच्या तालावर ती झुलायची... आम्ही शिकत होतो, तेव्हा शिक्षण व्यवस्थेतले आजचे पुष्कळ शब्द आम्हाला माहीतच नव्हते. उदाहरणार्थ, कॉपी, ट्युशन, निरोप समारंभ, स्नेहसंमेलन हे शब्द दहावीपर्यंत माहीत नव्हते. असं काही असतं, हेही कुणाच्या बोलण्यातून आलं नव्हतं. या सगळ्या गोष्टींपासून आमचं शिक्षण मुक्त होतं. आधुनिक युगापासून कोसो दूर असलेल्या लहान गावात आम्ही राहत होतो. सध्या सगळीकडं परीक्षा सुरू आहेत आणि कॉपीमुक्त परीक्षा, कॉपीयुक्त परीक्षा, सामूहिक कॉपी असे शब्द कानावर पडत आहेत, वाचायला मिळत आहेत. आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला ‘कॉपी’ ही वस्तू तर सोडाच; पण हा शब्दही माहीत नव्हता. कारण तो तेव्हा अस्तित्वातच नव्हता. कॉपी हा शब्द अस्तित्वात कधी आला आणि लोक कॉपी कधीपासून करू लागले, याचं संशोधन व्हायला पाहिजे. अर्थातच परीक्षेत केल्या जाणाऱ्या कॉपीविषयी मी हे बोलतो आहे. की शहरातले लोक आधीपासून कॉपी करत होते? आणि आम्हा खेड्यातल्या मुलांना यातलं काहीच माहीत नव्हतं? आज याबाबतीत खेडीही पुढे गेली आहेत. काही गावंच्या गावं कॉपीसाठी कुप्रसिद्ध असतात. तिथं कॉपी सेंटर चालतात, असं म्हटलं जातं. परीक्षा सेंटर चालतं, असं म्हणत नाहीत. मग आमच्या परीक्षा कशा पार पडत? खरं तर तिसरीपर्यंतच्या परीक्षा आमचेच गुरुजी घ्यायचे. आणि ते कडक परीक्षा घेत असत. त्यांना कुणीही तसे सांगितलेले नसायचे. पण, परीक्षा कडक घ्यायला पाहिजे, हे तेव्हा सगळ्यांनाच माहीत होतं आणि मान्य होतं. त्यांच्या पातळीवर ठरवलं तर ते हवं त्यांना पास आणि हवं त्यांना नापासही करू शकत होते. त्यांना तसे विचारणारे कुणी नव्हते. पण, तरीही गुरुजी अनेक मुलांना नापास करीत. नापास केलेल्या मुलांचे पालक येऊन शिक्षकांना विचारत नसत की, आमच्या मुलाला नापास का केलं? कारण त्यांना माहीत असायचं की, आपल्या मुलाला काही येत नसणार, त्याचा अभ्यास पक्का झालेला नसणार, मग त्याला पुढच्या वर्गात घालून काय उपयोग? त्यामुळं गुरुजींना विचारायची काय गरज? असंच त्यांना वाटायचं. गुरुजीही कोणाविषयी अढी ठेवून उगाच कुणाला नापास करीत नसत. ज्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि लिहायला सांगितलेल्या गोष्टी जमत नसत त्यांना, ‘यंदाचं वर्ष तू याच वर्गात बस आणि अभ्यास पक्का कर,’ असं ते सांगत. विद्यार्थी, पालक यांच्यासह सर्वांना ते मान्य असायचं. तो मुलगा खरंच अभ्यास करून पक्का व्हायचा आणि पुढं निघून जायचा. आजच्यासारखी सर्वांना पुढे पळा, पुढे पळा, सर्वांच्या पुढे पळा.. अशी घाई नसायची.फक्त चौथी, सातवी आणि दहावीच्या परीक्षा शाळेबाहेर व्हायच्या. दुसऱ्या गावात जाऊन त्या द्याव्या लागत. नाही तर बाकी सर्व वर्गांच्या परीक्षा शाळेतल्या शाळेतच पार पाडत. गावातलेच गुरुजी त्या परीक्षा घेऊन मुलांचं पास / नापास ठरवायचे. ज्या परीक्षा बाहेरगावी जाऊन द्यायच्या, त्यांना बोर्डाची परीक्षा, असं म्हटलं जायचं. अशा परीक्षा अवघड समजल्या जायच्या. त्यांची तयारी जास्त करायला पाहिजे, असं गुरुजींना, शाळांना, गावाला आणि मुलांनाही वाटत असे. त्यामुळं त्यासाठी गुरुजी जास्तीचे तास घेत. संध्याकाळी मुलांना शाळेत बोलावून त्यांचा अभ्यास घ्यायचे आणि त्यांच्यासोबतच ते शाळेत झोपायचे. त्यामुळे ट्युशन हाही शब्द आम्हाला माहीत नव्हता. कारण तेव्हाचे गुरुजी केवळ शाळेपुरते मर्यादित नव्हते. शाळेबाहेरही त्यांचे लक्ष मुलांकडे असे. फक्त शिक्षणापुरते नव्हे, तर मुलांच्या आयुष्याच्या जडणघडणीचेही ते शिल्पकार असत. दहावीपर्यंत मी तीन शाळांमध्ये शिकलो. पहिली ते चौथीपर्यंत गावातच शाळा होती. पाचवी ते सातवी ही तीन वर्षे आहेरवाडी नावाच्या गावी जाऊन-येऊन शिकलो. पुढं आठवी ते दहावी अशी आणखी तीन वर्षे हयातनगरला जाऊन-येऊन शिकलो. अशा तीन वेळा शाळा सोडल्या, पण त्या सोडताना शाळेने अथवा गावाने निरोप समारंभ केला नाही. त्यामुळं शेवटच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा असतो, त्याचा एक कार्यक्रम करायचा असतो, त्यासाठी भाषणं करायची असतात, हे आम्हाला माहीत नव्हतं. निरोप समारंभ हा शब्दच माहीत नव्हता. तेव्हाचे सगळे मित्र अजून आमच्या काळजात आहेत, आम्ही त्यांना अजूनही निरोप दिलेला नाही. आज मी महाराष्ट्रभर शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून फिरत असलो, तरी दहावीपर्यंत स्नेहसंमेलन हा शब्दही आम्ही ऐकलेला नव्हता. ‘गॅदरिंग’ हा तर फार दूरचा शब्द. आमच्या शाळेत कधीच स्नेहसंमेलनं झाली नाहीत. ती होत असतात, असेही आम्हाला कुणी सांगितलं नाही. मग आमच्या शाळेत काहीच होत नव्हतं काय? तर असं अजिबात नाही. दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. गुरुजी परवचा घ्यायचे. उंच आवाजात पाढे आणि उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला सुंदर कविता म्हणत. सगळी शाळा त्या तालावर झुलत असे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टच्या मागेपुढे गुरुजी खेळांच्या स्पर्धा घ्यायचे. त्यामध्ये; लिंबू-चमचा, दोन मुलांचा एकेक पाय एकत्र बांधून धावणे, पोत्यात पाय घालून चालणे, नुसते धावणे, कबड्डी अशा काही स्पर्धा घेतल्या जात. सांस्कृतिक स्वरूपाच्या कुठल्याही स्पर्धा शाळा घेत नसे. गाणी, कविता, अभिनय अशा स्पर्धा आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या. शाळेत असं काही होत नव्हतं, तर मग आमचं सांस्कृतिक भरण-पोषण कसं झालं? तर, भोवतालच्या सांस्कृतिक घटना पाहून ते झालं, असं मला वाटतं. पारावरच्या पोथ्या, पारासमोरची कीर्तनं, सणावाराला होणारी सोंगं, मंदिरातल्या आरत्या, भूपाळ्या, शेजारत्या ऐकून आम्हाला बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. शिकाव्याशा वाटल्या. त्यात आम्ही सहभागी होत गेलो. त्यामुळे लहानपणापासून चांगलं काव्य कानावर पडलं, चांगला अभिनय पाहायला मिळाला, चांगल्या सुरात गाणारे ऐकता आले. जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, पाठ केल्या. शिवाय, दारी येणारे कितीतरी बांधव नाट्य, अभिनय, गीत, संगीत घेऊन येत असत. त्यांचे किती प्रकार सांगावेत? भल्या पहाटे येणारा वासुदेव होता, त्याच्या आधी येणारा कुडमुडे जोशी होता, वासुदेवानंतर येणारा पांगुळ होता आणि दिवसभर दारात येणारे कितीतरी भिक्षेकरी होते, जे गीत - संगीत आणि अभिनयाचे विविध प्रकार सादर करायचे. ते ऐकण्यात, पाहण्यात, त्यांचं अनुकरण करण्यात आम्ही गुंगून जायचो. मला वाटतं, त्यातूनच आमच्या पिढीचं भरणपोषण झालं असावं. आता या गोष्टी बंद झाल्या आणि शाळांमधून हे सगळे नवे प्रकार सुरू झाले. तिथून आता विद्यार्थी घडतात, असं म्हणायला हरकत नाही. कारण आता शाळेत विद्यार्थी स्वत:च हे सगळे प्रकार सादर करतात. त्यांना ते शिकवले जातात. काळाच्या प्रवाहात होत्याचे नव्हते होऊन जाते आणि जे नव्हते ते समोर येते. हा काळ काही गोष्टी संपवत असतो, काही नव्या गोष्टी जन्माला घालत असतो. बदल हा सृष्टीचा नियमच आहे, असे म्हटले जाते, ते खोटे नाही. (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 9 Mar 2025 5:45 am

‘एआय’च्या विश्वात...:‘एआय’ची धास्ती वाटतेय? चला, त्याच्याशी दोस्ती करू!

सध्या सगळीकडं ‘एआय’ची चर्चा आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळं आपलं जगणं अधिक सोपं, वेगवान आणि समृद्ध होऊ शकतं. त्यासाठी ते कुशलतेने आणि जबाबदारीने हाताळता आलं पाहिजे. ‘एआय’मुळे विविध क्षेत्रांत घडणारे बदल समजावून सांगतानाच, त्याचे रोजच्या जगण्यातील फायदे उलगडणारे आणि संभाव्य धोक्यांविषयी सावध करणारे हे पाक्षिक सदर... आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा परवलीचा शब्द झाला आहे. अवघ्या एका वर्षात चॅट जीपीटी आणि त्यासारख्या ‘एआय’ आधारित अनेक टूल्सनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये अफाट बदल घडवायला सुरूवात केली आहे. मग ते वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्र असो किंवा शेती, उद्योग क्षेत्र असो; ‘एआय’ची जादू सगळीकडे दिसून येत आहे. संगणक प्रणाली किंवा मशीनला माणसासारखी विचारशक्ती, शिकण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करणारी एक आधुनिक तंत्रज्ञानप्रणाली म्हणजे ‘एआय’. माणूस जसा अनुभवातून शिकतो, तसे ‘एआय’सुद्धा माहिती आणि डेटाच्या आधारे शिकतो आणि सतत सुधारणा करत जातो.दहा वर्षांत वेगाने विकसन : संगणकांनी माणसासारखं विचार करावा, यावर १९५० च्या दशकात संशोधन सुरू झालं आणि त्याचवेळी ‘एआय’चे बीज रोवले गेले. अलीकडच्या काळात मशिन लर्निंग (ML), डीप लर्निंग (DL) आणि बिग डेटा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांमुळे ‘एआय’चे वेगाने विकसन झाले. आता ‘एआय’ फक्त आकडेमोड किंवा माहिती प्रक्रिया न करता शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता बाळगतो. ‘एआय’च्या विकासाची ही वाटचाल काही दशकांपासून सुरू असली, तरी गेल्या १० वर्षांत त्याने झपाट्याने प्रगती केली. मोठ्या प्रमाणातील डेटा (Big Data), संगणकांची वाढती क्षमता आणि अल्गोरिदममधील सुधारणांमुळे त्याने वेग घेतला आहे. गुगलचे सर्च इंजिन, अॅमेझॉनची शिफारस प्रणाली आणि सिरी किंवा अॅलेक्सा यांसारखे व्हाइस असिस्टंट ही ‘एआय’च्या यशाची काही सोपी आणि वास्तविक उदाहरणे आहेत. ऑनलाइन शॉपिंग ते अभ्यासक्रम : एखादी वस्तू विकत घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी लागणारा वेळ आठवला, तर त्यामध्ये आणि ‘एआय’आधारित ई कॉमर्स मोबाइल ॲपमध्ये जमीन-अस्मानाचा फरक दिसतो. आता ‘एआय’च्या मदतीने गंभीर आजारांचे निदान अधिक अचूकपणे करता येते. रूग्णांच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करून उपचार सुचवले जातात. दुसरीकडे, नव्या औषधांच्या संशोधनालाही वेग आला आहे. वैयक्तिक शिकवणी (Personalized Learning) देणे, ऑनलाइन अभ्यासक्रम सुधारणे आणि विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढवणे यांसाठीही ‘एआय’ मदत करते. त्याशिवाय; स्वयंचलित कार, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि स्मार्ट सिटी यांसारख्या प्रकल्पांमध्येही ‘एआय’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याला तुमच्याविषयी सगळं माहितीय..! भारतीय माणूस दिवसातील सरासरी ७ तास ४२ मिनिटे मोबाइलवर घालवतो. त्यामुळे आता ‘एआय’ला तुमचा दिनक्रम, स्वभाव, वागणे, संवाद (आणि विसंवाद), कार्यपद्धती यातील मथितार्थ माहीत आहे. एका मोबाइल ॲपवरून तुम्ही विमानाचे पुणे ते बेंगळुरु तिकीट काढले, तर तुम्ही बेंगळुरुला किती दिवसांच्या अंतराने आणि कोणत्या कामासाठी जाता? कोणत्या ठिकाणी / परिसरात राहता? काय खाता-पिता? असा सगळा व्यक्तिगत ‘बिग डेटा’ त्याला माहीत असतो. आज ‘एआय’ ही फक्त एक वैज्ञानिक संकल्पना न राहता प्रत्यक्षात उपयोगात येणारे साधन बनले आहे. या नवतंत्रज्ञानामुळे आपल्याला ‘न भूतो’ अशी परिस्थिती अनुभवायला येत आहे. ‘एआय’ हे केवळ वर्तमानात थांबणारे तंत्रज्ञान नाही, तर त्याचा भविष्यातील प्रभावही अमर्याद आहे. त्याचवेळी या प्रगतीबरोबरच काही आव्हानेही उभी आहेत. गोपनीयता आणि सुरक्षिततेसंबंधी चिंता, मानवी नोकऱ्यांवरील परिणाम आणि डीपफेक तंत्रज्ञानासह ‘एआय’चा गैरवापर आदी गोष्टींवर तत्परतेने योग्य तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूणच, या तंत्रज्ञानाची धास्ती घेण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती केली पाहिजे. त्याच्याशी गट्टी जमली की मोबाइल वापरू शकणाऱ्या प्रत्येकाला हे तंत्रज्ञान आणि वापरायला सोपी अशी अगणित ‘एआय’ टूल्स हाताच्या बोटांवर खेळवता येतील! चला तर मग, आपापले सीट बेल्ट घट्ट करा, आपल्या मेंदूतील ‘न्यूरल नेटवर्क’ पकडून ठेवा... घाबरून न जाता, आत्मविश्वासाने आणि एकमेकांच्या साथीने ‘एआय’च्या या नव्या, जादुई विश्वाची सफर करूया! (संपर्कः amey@aconsultancy.marketing)

दिव्यमराठी भास्कर 9 Mar 2025 5:41 am

कव्हर स्टोरी:यंदाचा उन्हाळा ‘अतिकडक’

ग्लोबल वॉर्मिंग... हा एकविसाव्या शतकातील परवलीचा शब्द बनला आहे. २०१४ ते २०२४ या दशकात तापमानवाढीचा नवा उच्चांक झाला आहे. यंदा तर होळीच्या आधीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. एकीकडे सामाजिक, राजकीय वातावरणाचा पारा रोज वरती चढत असताना, नैसर्गिक वातावरणातील वाढत्या उष्णतेनेही डोकी तापू लागली आहेत. पर्यावरणासह मानवी आरोग्य तसेच शेतीवर परिणाम घडवणाऱ्या या वाढत्या उन्हाचा आणि त्याच्या बदलत्या तऱ्हांचा हा वेध... यंदाच्या जानेवारीतील तापमान गेल्या १२१ वर्षांतील सर्वाधिक असल्याची नोंद केली गेली. जानेवारीमध्ये सरासरी तापमानात १.५७ अंश, तर फेब्रुवारीत १.५८ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेरीस आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले. जानेवारी, फेब्रुवारीतील ही वाढ पाहता, यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांत पारा ४० अंशांवर किंवा त्याहीपुढे जाऊ शकतो. या उन्हाळ्यात देशात सरासरी तापमान ४५ अंश इतके राहण्याची शक्यता असून; दिल्ली, राजस्थान, गुजरातमध्ये ते कमाल ५० अंश, तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशात कमाल ४८ अंशांवर जाऊ शकते. शिवाय, या उन्हाळ्यात उष्णतेच्या दोन ते तीन लाटा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतासह एकूणच दक्षिण आशिया तापमानवाढीच्या बाबतीत ‘अतिसंवेदनशील’ असल्याचे ‘आयपीसीसी’चा अहवाल सांगतो. या पार्श्वभूमीवर एकीकडे दिल्ली आणि उत्तर भारतात उन्हाची तीव्रता वाढत आहे, तर दुसरीकडे मुंबईसारख्या ३५ ते ४० अंशांदरम्यान तापमान राहणाऱ्या, समुद्रकिनाऱ्यावरील महानगरालाही यंदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाची ही स्थिती असल्याने एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतचा कालावधी आबालवृद्धांसाठी सत्त्वपरीक्षा पाहणारा असेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे तापमानात भर पडत असल्याने पर्यावरणावरही दूरगामी परिणाम होणार, हे स्पष्ट आहे. त्यावर उपाययोजनांसाठी उशीर झाला असला, तरी काही गोष्टी प्राधान्याने करण्याची गरज या क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत. सिंचन सुविधांच्या अभावामुळे भारतातील शेती आजही प्रामुख्याने मान्सूनच्या भरवशावर आहे. अशा स्थितीत उन्हाचे वाढते दिवस, उष्णतेच्या लाटा, अवकाळी आणि अतिपाऊस यांमुळे शेतीपुढे नवी संकटे उभी राहिली आहेत. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या या आपत्तींना माणसाने ओलांडलेल्या मर्यादा हेच कारण आहे. त्यावर तात्कालिक उपचारांची तर आवश्यकता आहेच. पण, सुनियोजित, दीर्घकालीन आणि प्रभावी उपायही तातडीने हाती घ्यावे लागतील. भारतासाठी २०२४ ठरले ‘ताप’दायक... - ३७ : शहरांचे तापमान या वर्षीच्या उन्हाळ्यात ४५ अंशांपेक्षा जास्त होते. - ३०० : दिवस या वर्षात असह्य उष्णता निर्देशांकानुसार ‘तप्त’ होते. - ४८ हजार : लोकांची झाली उष्माघाताचे संशयित रुग्ण म्हणून नोंद. - २,०७४ : लोक मार्च ते जुलै दरम्यान देशात झाले उष्माघाताने बाधित. - ७६९ : लोकांना महाराष्ट्रात या कालावधीत बसला उष्माघाताचा फटका. - १६१ : जणांचा मार्च ते जुलै दरम्यान देशभरात उष्माघाताने झाला मृत्यू. स्त्रोत : इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज-आयपीसीसी, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि अन्य संस्थांचे अहवाल. वसुंधरेची ‘तप्त’पदी... - तापमान ०.५ अंश वाढण्यास १७५ वर्षे लागली, पण गेल्या २४ वर्षांत १.५ अंशांनी वाढले. - या पावणेदोनशे वर्षांच्या काळातील २०१४ ते २०२४ हे ‘सर्वांत उष्ण दशक’ ठरले. - विशेषत: २०२३ हे या १७५ वर्षांतील ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून नोंदवले गेले. - तापमानवाढ १.५ अंशांवर रोखण्याचे ध्येय, पण २०३० पर्यंतच २ अंशांवर जाण्याची भीती. - सागरी तापमान ०.६ अंशाने वाढले, परिणामी समुद्राच्या पातळीतही ४.७७ मिलीमीटरने वाढ झाली. - हवेतील आर्द्रतेत ४.९ टक्के वाढ; त्यामुळे अतिपाऊस, ढगफुटीच्या घटनाही वाढल्या. - कार्बनचे उत्सर्जन ५१ %, मिथेनचे १६२ %, नायट्रस ऑक्साइडचे २४ % वाढले. यामुळे होतेय तापमानवाढ... - सूर्यावरील विस्फोटांचे प्रमाण वाढले. - हरितगृह वायू उत्सर्जनात अपेक्षित घट नाही. - जंगलतोड, जलस्त्रोतांवर अतिक्रमण सुरूच. - अनिर्बंध नागरी आणि औद्योगिक प्रदूषण. - अनियंत्रित शहरीकरण, काँक्रिटीकरण. हे आहेत धोक्याचे संकेत... - वारंवार हिमवादळे येणे, हिमकडे कोसळणे. - प्रत्येक ऋतुबदलाच्या वेळी अवकाळी पाऊस. - पहाटेच्या वेळी ढगाळ वातावरण आणि पाऊस. - हिवाळ्यात अचानक थंडीचे प्रमाण वाढणे. - रात्रीचे सरासरी तापमान वाढणे. काय करावे? काय टाळावे? - दिवसातून किमान तीन लिटर पाणी प्या. - लिंबू सरबत, फळांचे ताजे रस, ओआरएस घ्या. - चहा, कॉफी, कृत्रिम शीतपेये, अतिथंड पाणी टाळा. - ताजा आहार घ्या; तळलेले पदार्थ, जंक फूड टाळा. - फिकट / पांढऱ्या रंगाचे, सैलसर, सुती कपडे वापरा. - उन्हाच्या वेळी स्वयंपाक टाळा, घरात हवा खेळती ठेवा. - उष्माघाताची लक्षणे जा‌णवल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या. भविष्यात मोठ्या आपत्तीची चिन्हे; युद्धपातळीवर उपाययोजना हव्या तापमानाचा गेल्या १२१ वर्षांचा उच्चांक २०२५ मध्ये होईल, असा अंदाज आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने आधीच सर्वाधिक उष्ण ठरले आहेत. जागतिक हवामान बदलासोबतच आपल्याकडील शहरांमधील काँक्रिटीकरण, वाढते प्रदूषण, वृक्षतोड यामुळे तापमानवाढीची ही समस्या गंभीर बनली आहे. जगभरात स्थानिक वातावरणात होत असलेले असे बदल आणि जागतिक पातळीवरील अभ्यासावरून, भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचे गंभीर परिणाम प्रामुख्याने आरोग्य, पर्यावरण, कृषी आणि आर्थिक क्षेत्रावर पडतील. त्यातूनच मग आजारांमध्ये वाढ, जलस्त्रोतांमध्ये घट, वनसंपदेचा ऱ्हास, अन्नसुरक्षेची समस्या, लोकांचे स्थलांतर आणि देशांच्या आर्थिक उत्पन्नात घट असे दीर्घकालीन परिणाम दिसू लागतील. यापासून बचावण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रितपणे युद्धपातळीवर, नियोजनबद्ध उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. - प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक वाढते तापमान आरोग्याला घातक, यंदा उष्माघाताचाही मोठा धोका अचानक वाढणारे तापमान आरोग्यासाठी घातक असते. या उष्म्याचे स्वास्थ्यावर काही तात्कालिक, तर काही दीर्घकालीन परिणाम होतात. उन्हामुळे त्वचेप्रमाणेच शरीराचे अंतर्गत तापमान वाढल्याने अनेक प्रक्रिया आणि पाचक रस अकार्यक्षम होऊ शकतात. अशावेळी मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्र जागृत होऊन शरीर थंड ठेवण्यासाठी पेशी तसेच रक्तातील पाणी वापरले जाते आणि घाम तयार होतो. परिणामी शरीरातील पाणी कमी होऊन खूप तहान लागते. लघवीचे प्रमाण कमी होते. तिचा रंग पिवळा, नंतर लालसर होतो. रक्तदाब कमी होतो. डोके दुखते, डोळ्यांची आग होते. अंधारी येते, उलट्या होतात. रस्त्याच्या कामावरील मजूर, शेतात राबणारे शेतकरी - शेतमजूर, मैदानात खेळणारे खेळाडू अशांना उष्माघाताचा धोका असतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे तो यंदा अधिक वाढला आहे. अनेकदा उष्णतेचे विकार आणि उष्माघात जीवावर बेतू शकतात. त्यामुळे प्रत्येकानेच या काळात योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. - डॉ. अविनाश भोंडवे, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ शेती उत्पादनांवर होतोय परिणाम, वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करा तापमानामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांसाठी ही स्थिती आव्हानात्मक ठरली आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे गव्हाच्या दाण्यांची भरणी कमी होऊन उत्पादन घटते. हरभऱ्यावर फुलगळ आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन कमी होते. भाजीपाला पिकांची पाने करपणे, फळधारणेत अडथळा येण्यासोबतच गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अशा स्थितीत संभाव्य नुकसान टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे हवामान सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पीक संरक्षित करावे. त्यासोबत मल्चिंग, ठिबक सिंचन आणि जैविक ताण व्यवस्थापन तंत्राने बदलत्या तापमानाचा प्रभाव नियंत्रित करता येईल. या उपायांमुळे पिकांची वाढ सुधारेल आणि उत्पादनही टिकवता येईल. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत, वैज्ञानिक पद्धती अवलंबल्यास शेतकरी आपल्या उत्पादनात स्थिरता राखू शकतील. - डॉ. श्रद्धा बगाडे, कृषी हवामानशास्त्रज्ञ, म. फुले कृषी विद्यापीठ

दिव्यमराठी भास्कर 9 Mar 2025 5:27 am

लाइनमन दिन विशेष:जीवाची बाजी लावून चांद्यापासून बांद्यापर्यंत कर्तव्य बजावणारे जनमित्र

अन्न, वस्त्र,‍ निवाऱ्यासारखीच वीज ही आपल्या आयुष्यातील आज मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येणार नाही, इतके अनन्यसाधारण महत्त्व विजेला आहे. मुंबईचा काही भाग वगळता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील घराघरात वीज पोचवण्याचे काम महावितरण करते. या वीज वितरण यंत्रणेचा कणा असलेल्या जनमित्रांच्या अर्थात लाइनमनच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी ४ मार्च हा दिवस देशभर ‘लाइनमन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. मिनिटभरही आपल्या घराचा वीजपुरवठा खंडित झाला की ग्राहक तो कधी सुरू होईल याची वाट पाहत असतात. यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना कोणत्या परिस्थितीत व विविध अडथळ्यांना तोंड देत रात्री-अपरात्री कोणती व कशी कामे करावी लागतात याची माहिती फारशी कोणाला नसते. परंतु अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विद्युतसेवा देण्याची धडपड आणि अथक प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना खरा न्याय दिल्यासारखे होईल. विजेच्या निर्मितीनंतर पारेषण, वितरण अशा टप्प्यांमध्ये ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. महानगरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत सर्व प्रकारच्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-अपरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील ८ ते ९ महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, अवकाळी पाऊस व त्यानंतरचा मान्सूनचा संततधार पाऊस, पूर अशा प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे जनमित्र सज्ज असतात. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये महाराष्ट्रात धडकलेली ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळे, राज्यातील विविध ठिकाणची पूरस्थिती आणि महाभयंकर कोविडच्या महामारीमुळे वीजक्षेत्रासमोर अत्यंत कठीण परिस्थिती होती. अशाही स्थितीत महावितरणच्या प्रत्येक जनमित्राने वीजग्राहकांना प्रकाशात ठेवण्यासाठी अविरत, अथक कर्तव्य बजावले आहे. खरे पाहता महावितरणच्या पुरुष व महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवर २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर विविध ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यासोबतच थकीत वीजबिलांची वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोरीविरोधात कारवाई करणे आदी महत्त्वाची कामे त्यांना करावी लागतात. महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी सुमारे १० लाखांची भर पडत आहे. सोबतच विजेची मागणीही सुमारे १० टक्क्यांनी वाढत आहे. ३३/११ किव्हो क्षमतेची ४००० पेक्षा अधिक उपकेंद्रे आणि स्विचिंग स्टेशन्स, सुमारे साडेनऊ लाख वितरण रोहित्रे, ११ किव्हो क्षमतेच्या ३ लाख ६१ हजार किमी वाहिन्या आणि ३३ किव्हो क्षमतेच्या ५१ हजार किमी वाहिन्यांचा समावेश असलेल्या विशाल वितरण यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ३.०८ लाख चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रामधील ४१ हजार ९२८ गावे आणि ४५७ शहरांमध्ये वीजपुरवठा करण्यात येत आहे. भूकंप असो की चक्रीवादळ, अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणच्या जनमित्रांनी काळोखात बुडालेल्या लाखो वीजग्राहकांना प्रकाशमान करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. अनेक प्रसंगी महापुरात बोटीने जाऊन किंवा नदीमध्ये पोहत जाऊन वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्याचे धैर्य दाखवत वीजपुरवठा सुरू करण्याचे कर्तव्य जनमित्र दरवर्षी बजावतात याचा प्रत्यय अनेक जिल्ह्यांमध्ये आला आहे. केवळ महावितरणच्या ग्राहकांसाठी नव्हे तर मुंबई शहरातील सन २००६ च्या प्रलयात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या जनमित्रांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांमधील ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ चक्रीवादळांनी जमीनदोस्त केलेली वीजयंत्रणा विक्रमी कालावधीत पूर्ववत केली. तसेच कोविड काळात लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या प्रत्येक ग्राहकाला प्रकाशात ठेवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनमित्रांनी मोठे योगदान दिले आहे. वीज यंत्रणेचा भलामोठा पसारा असल्याने जनमित्र यांना वेळी-अवेळी, रात्र असो की दिवस, ऊन असो, वादळ असो की पाऊस या सर्वच परिस्थितीमध्ये खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोके टाळून कर्तव्य पणाला लावावे लागते. धोकेही असे की, जाणते किंवा अजाणतेपणी झालेली चूक वीज माफ करत नाही आणि थेट मृत्यूच्या दारात नेते. त्यामुळे अशा वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याची कामे तशी जिकिरीची व प्रसंगी जोखमीचीही असतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वच जनमित्रांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. वीजग्राहकांनी जनमित्रांच्या धडपडीची कुठेतरी दखल घ्यावी, एवढीच अपेक्षा. (लेखक छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आहेत)

दिव्यमराठी भास्कर 4 Mar 2025 2:32 pm

राज्य आहे लोकांचे...:सत्ताकांक्षेच्या लाटांमध्ये लोकशाही टिकावी म्हणून...

आपण कसे आयुष्य जगत आहोत, जगणार आहोत आणि पुढच्या पिढीच्या ताटात काय वाढून ठेवले आहे? भारतीय राज्यघटनेवर आधारित लोकशाही कसा आकार घेत जाईल? याचा वेध समारोपाकडे आलेल्या या सदरातून आपण घेतला. राज्यघटनेच्या उद्देशिकेची सुरूवात होते तीच मुळात ‘आम्ही भारताचे लोक..’ या शब्दांनी. हे लोक म्हणजे परग्रहावरील कोणी दुसरे - तिसरे नसून तुम्ही - आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. बांधकाम करताना पाया कच्चा राहिला की इमारतही कमकुवत बनते. नागरिकाच्या रुपातील मतदार हा कोणत्याही लोकशाहीचा पाया असतो. तोच मजबूत नसेल तर लोकशाही भक्कम होणार नाही. त्यामुळे लोकशाही हे सर्वार्थाने लोकांचे राज्य असल्याची जाणीव दृढ करत, मतदाराला सतत भानावर आणणारे विषय या स्तंभातून मांडण्याचा प्रयत्न केला. लोकशाही प्रक्रियेतील सर्वसामान्यांचा सहभाग व्यापक असला पाहिजे. स्वातंत्र्यलढा सुरू असताना महात्मा गांधींचा अहिंसेचा आग्रह पाहून एकदा सरदार पटेलांनी त्यांना विचारले की, एवढ्या बलाढ्य, हिंस्र ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढायचे तर मोठ्या क्रांतीची गरज आहे. अहिंसेने ती साध्य होईल का? तेव्हा गांधीजी म्हणाले, ‘सरदार, आपल्याला क्रांती नव्हे, उत्क्रांती घडवायची आहे.’ देश स्वतंत्र कुठल्याही मार्गाने झाला असता, तरी नंतर देशाला स्वतंत्र म्हणून जगण्यासाठी, तग धरण्यासाठी संस्कार हवा होता. स्वातंत्र्यलढ्याने तो संस्कार देशाला दिला. पण, हा संस्कार आज कितपत टिकून आहे? आत्ताच्या चाळीशी- पन्नाशीतल्या पिढीसाठी स्वातंत्र्यलढ्याचे कवित्व संपले आहे. २००० नंतरच्या ‘मिलेनियम बेबीज’चा तर या इतिहासाशी काडीमात्र संबंध नाही. मग लोकशाहीची पुढची वाटचाल नेमक्या कुठल्या मूल्यांवर होणार आहे? आज लोकशाही वाचवण्यासाठी, तिचे पावित्र्य टिकवण्यासाठी एक नव्या उत्क्रांतीची गरज आहे. आपण कोणीही असू; लोकशाहीतील आपली नेमकी कर्तव्ये काय, हा धडा प्रत्येकाला नव्याने गिरवावा लागणार आहे. कुंभमेळ्यात कमी काळात काही कोटींचा जनसमूह पुण्य कमावण्यासाठी प्रयागराजच्या संगमावर एकवटला, तशाच श्रद्धा आणि भक्तिभावाने लोकशाही शाबूत ठेवण्याचा निग्रह करून सदसद्विवेकबुद्धीच्या महासागरात डुबकी मारण्याचा महाकुंभ १४० कोटी जनतेला एकत्रितपणे साजरा करावा लागणार आहे. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५० मध्ये आपले प्रजासत्ताक अस्तित्वात आले. त्यानंतर लगेचच २५ ऑक्टोबर १९५१ म्हणजे एकाच वर्षात देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसह सर्व नेत्यांना निवडणुकांना सामोरे जावे लागले. आयुष्याची अनेक वर्षे स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगामध्ये घालवलेल्या नेहरूंना निवडणुका लांबवणे आणि त्याशिवाय पंतप्रधानपदी राहणे शक्य होते. पण, देशाने सर्वांना सामावून घेणारी राज्यघटना निर्माण केली आणि तातडीने तिचे पालन करण्यास सुरूवात केली. हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे, स्वातंत्र्यासाठी जसे एका पिढीने बलिदान दिले, तसे राज्यघटनेचे पावित्र्य टिकवण्यासाठी आणखी एका पिढीने सर्वस्व दिले. अशा दीर्घ संघर्षाने मिळालेल्या प्रजासत्ताकाचे पावित्र्य राखण्यासाठी आपण काय करणार आहोत, हा प्रश्न ज्याने त्याने स्वतःला विचारायला हवा. लोकशाही आणि आपला देश पुढे जाणार की मागे, याचा निर्णय मतदानयंत्राचे बटन दाबताना आपण घेत असतो. त्यावेळी या लोकशाहीच्या आणि देशाच्या बळकटीसाठी आपण काय केले, याची मनोमन उजळणी प्रत्येकाने केली पाहिजे. कारण आपण कसे वागतो - बोलतो, विचार करतो, कर्तव्य बजावतो, देशाप्रति निर्णय घेतो या गोष्टींच्या एकत्रित परिणामांतून आपले आणि पर्यायाने देशाचे भविष्य बिघडणार वा सुधारणार असते. देशाची स्वातंत्र्यानंतरची पहिली पन्नास वर्षे संघर्षात गेली. पुढे एका वर्गाचा संघर्ष संपला आणि देशात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गातील दरी खूप मोठी झाली. ‘देशात काहीही घडले तरी माझे काय बिघडते?’ ही भावना बहुतांशांमध्ये प्रबळ होणे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते. देश कशामुळे प्रगती करतात किंवा कशामुळे अधोगतीला जातात, हे सांगणारा जगाचा मोठा इतिहास आपल्यासमोर आहे. युद्ध कशी जिंकली जाऊ शकतात, हे सांगणारी ‘आर्ट ऑफ वॉर’सारखी अनेक पुस्तके आहेत. पण, लोकशाहीच्या जतन - संवर्धनाची प्रक्रिया मांडणारे आणि त्यासाठीचे तत्त्वज्ञान सांगणारे मार्गदर्शक साहित्य मात्र उपलब्ध नाही. ही उणीव काही अंशी भरून काढण्याचा प्रयत्न या स्तंभातून करण्यात आला. लोकांचे, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले राज्य हवे असेल, तर हक्कांसोबत कर्तव्यपालनाचे भान आणि राज्यघटनेच्या मूलतत्त्वाचे ज्ञान प्रत्येकाला असले पाहिजे. ही जाणीव ठेऊन आपण देशाच्या हितासाठी ठाम राहिलो, तरच सत्ताकांक्षेच्या लाटांमध्येही देशातील सामान्य माणसाचे स्वातंत्र्य अबाधित राहिल, पर्यायाने लोकशाहीसुद्धा चिरायु होईल. (संपर्क - dramolaannadate@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 2 Mar 2025 5:06 am

गोष्ट सांगतो ऐका...:बँड!

उत्तम वाद्य हातात घेऊन, गर्दीला दूर करत चालत गेला. खूप पुढं.. घरात जाऊन बसला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काही वेळात मिरवणूक जवळ येऊ लागली...फार जुनी गोष्ट नाही. उत्तम हिरो होता. बँडमध्ये ट्रम्पेट वाजवायचा. आजही वाजवू शकतो. पण.. पण काही वर्षांपूर्वी उत्तमचा दबदबा होता. बँड बुक करताना, ‘उत्तम पाहिजे’ अशी अट घातली जायची. उत्तम होताच तसा वादक. नवरीला वाटे लावायच्या वेळी तर स्वत:ची लेक असल्यासारखा भावूक होऊन वाजवायचा. पोरं नाचत असली की त्याला नशाच चढायची. भले भले नाचणारे त्याच्यापुढं हात जोडायचे. नागीण डान्सवाले तर तो नुसती फुंकर मारून लोळवायचा. नवं गाणं वाजवायला उत्तम नाराज असायचा. त्याच्या मते जे बँडवाल्यांना वाजवता येतं, ते खरं संगीत. पण, उत्तम संगीताचा जाणकार. दर्दी. प्रत्येक गाण्याचा कसून सराव करणारा. लग्नसराईमध्ये तर एकदम बिझी असायचा. बाकी सहकारी थकून जायचे, पण उत्तमचा उत्साह मावळायचा नाही. जोपर्यंत वाजवतोय तोपर्यंत प्रसन्न. चेहऱ्यावर कधीच ओढाताण नाही. कुठून येतो एवढा उत्साह? त्याचं म्हणणं असायचं, कामावर प्रेम. आणि तो कुठं नोकरी करत होता? कलावंत होता. आवडती कला जोपासत होता. फार नाही पण पोटपुरते पैसे येत होते. सोबतचे लोक थकले होते. पोरांना या क्षेत्रात आणू बघत होते. पण, पोरं तयार नव्हती. एकेकाळी बँडवाल्याचा पोशाख भारी वाटायचा. लांबून बघायचो तेव्हा. पण, जवळून पाहिल्यावर लक्षात येतं. तो लाल पोशाख घामाच्या धारा लपवत असला, तरी डाग कसा लपवणार? आणि सारखा धुणार कोण? बँड वाजत असला की नाचणाऱ्या पब्लिकच्या हे लक्षात येत नाही. बँडवाल्यांच्या पायाकडं कुणाचं लक्ष जात नाही. उपाशीपोटी त्यांच्या छातीचे भाते कुठून एवढी ऊर्जा आणतात, हा प्रश्न त्यांना पडत नाही. जोशात नाच चालू असताना बँडवाला थोडा थांबला तरी बोंब होते. वाजवणारा, म्हातारा होत चाललेला जीवन खोकू लागतो बाजूला होऊन. बिड्यांमुळे छातीचे खोके करून बसलेला दिलीप तरीही तुतारीत हवा फुंकत राहतो जीव तोडून. उत्तम हे सगळं बघून न बघितल्यासारखं करतो. शांत राहतो. तो नवरदेवाकडं सहसा बघत नाही. पण, घोड्याकडं लक्ष जातच त्याचं. घोडा शांत असतो. खूपदा उत्तमला घोड्याच्या डोळ्यात कणव दिसते बँडवाल्याविषयी. घोडा तरी आपलं दु:ख समजू शकतो, या विचारानं बरं वाटतं. पण, हे सगळं आता होत नाही. दोन-तीन वर्षांपासून बँडला काम मिळणं बंद झालंय. दहा वर्षे आधीच हळूहळू डीजे आले. नव्याचे नऊ दिवस असतील म्हणून उत्तम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फार मनावर घेतलं नाही. शेवटी जुनं ते सोनं म्हणत राहिले. पण, डीजेचा जोर ओसरला नाही. डीजे तरुण पिढीला आवडत राहिला. एक-दोन स्पीकरच्या जागी दहा-दहा स्पीकर आले. आणि वीस-पंचवीस लोकांचा बँड हळूहळू पाच-सहा लोकांचा झाला. डीजेवाल्या स्पीकरच्या भिंती एवढ्या मोठ्या झाल्या की बँडवाले त्या उंचीपुढे लपून जाऊ लागले. काम कमी झाले. त्या आवाजाशी स्पर्धा तरी कशी करणार? एकेकाळी उत्तम विचार करायचा की, सीडीवर लोकांचं गाणं वाजवणं ही कोणती कला आहे? अस्सल ते अस्सल असतं. आपल्या कलेला मरण नाही. पण, त्याचा अंदाज फार बरोबर नव्हता. लग्नसराईत पण पाच-सहा कामं मिळायची मारामार होऊ लागली. लाल पोशाख धूळखात पडू लागला. ट्रम्पेट हातात कमी आणि भिंतीवर जास्त दिसू लागलं. पण, काहीही झालं तरी ती कला होती. ती सोडून चालणार नव्हतं. उत्तमसारखे चार-दोन लोक अजून खचले नव्हते. अशा प्रचंड आशावादी लोकांनाही हताश करायला कोरोना आला. सगळे व्यवहार ठप्प झाले. चांगले दोन वर्ष. कलेची जाण असणारी माणसं होती. उगाच काहीतरी जुनी गाणी वाजवायला सांगायची आणि उत्तमच्या हातात पाच-दहा रुपये टेकवून जायची. एरवी उत्तम मातीच्या घरात एकटाच बसून राहायचा. डोक्यावर पत्रे. उन्हात अंगातून घाम निघायचा. त्याचा एकुलता एक मुलगा बायकोसोबत पुण्यात निघून गेला. उत्तम थांबला. बोलायला चार-दोन मित्र होते. बोलताना त्याची बोटं बटन दाबल्यासारखी व्हायची. भल्याभल्यांना कोरोना उद्ध्वस्त करून गेला, पण उत्तमने हार मानली नाही. पुन्हा बँड सुरू करायचं ठरवलं. बाकीचे सहकारी वेगळ्या कामधंद्याला लागले होते. कसेबसे चार जण गोळा झाले. सराव सुरू झाला. लाल पोशाख धुतला गेला. बुकिंग मिळावी म्हणून ओळखीपाळखीच्या लोकांशी बोलणी सुरू झाली. लोक पैसे तर एवढे कमी सांगत होते की एकेकाळी ही दोन माणसाची रक्कम होती. पण, पर्याय नव्हता. एवढं होऊन काम मिळत होतं असंही नाही. फक्त निराशाच पदरी येत होती. गावचा सरपंच बघत होता. चांगला माणूस होता. त्यानं ठरवलं की, गणपतीच्या मिरवणुकीत उत्तमच्या बँडला काम द्यायचं. पैशाची बोलणी झाली. सरपंच काम देतोय, हे ऐकूनच उत्तम आनंदी होता. सांगितले ते पैसे घेईन म्हणाला. नवीन गाण्यांचा सराव सुरू झाला. पण, गावातल्या पोरांना डीजे पाहिजे होता. पोरांच्या हट्टापुढं सरपंच तरी काय करणार? डीजेही लावला. मिरवणूक सुरू झाली. डीजेच्या आवाजापुढं बँडचा आवाज काय टिकणार? काही वेळ उत्तम आणि त्याचे सहकारी वाजवत राहिले. पण, ते अगदीच केविलवाणे वाटत होते. त्यांची गाणीही जुनी वाटत होती. उडत्या चालीची गाणी त्यांच्या गाण्याचा जणू गळा घोटत होती. सरपंचही हवालदिल झाले. उत्तमचा सहकारी वाजवायचं सोडून एका क्षणी मोठमोठ्यानं रडू लागला. काय करणार? अशी वेळ कधी आली नव्हती. चार-दोन लोकांना हळहळ वाटली. उत्तम वाद्य हातात घेऊन, गर्दीला दूर करत चालत गेला. खूप पुढं.. रस्त्यात त्याचं घर होतं. तो घरात जाऊन बसला. उदास. पहिल्यांदाच त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. काही वेळात मिरवणूक जवळ येऊ लागली. डीजेचा आवाज उत्तमला असह्य झाला. एरवीही तो आवाज सहन न होणारा असतो. उत्तमला तर तो जखमेवर मीठ चोळल्यासारखा वाटू लागला. त्यानं जोरात दार बंद केलं. भिंतीला टेकून बसला. आवाज कुठून कमी होणार? दहा स्पीकरची भिंत होती ती. त्याच्या लाकडी दाराला कुठं जुमानणार होती? डीजे जवळ आला. उत्तम टेकून बसला ती भिंत हादरू लागली. उत्तमचा संताप वाढू लागला. हे स्पीकर फुटून जातील, असं वाटलं त्याला. नाचणारे बेभान होते. गाणी सारखी सारखी बदलत होती. हा आवाज बंद व्हावा, एवढीच उत्तमची मनापासून इच्छा होती. त्याला सहन होण्यापलीकडं आवाज होता. त्याची इच्छा पूर्ण झाली. अचानक आवाज बंद झाला. एकदम शांतता. पण, ही शांतता उत्तम ऐकू शकला नाही. कारण डीजेच्या आवाजाने त्याचं मातीचं घर कोसळलं होतं. त्या ढिगाऱ्यात उत्तमचा शेवट झाला. त्याचं ट्रम्पेट मिळालं. कुणी त्यात आपल्या श्वासाने प्राण फुंकेल की नाही माहीत नाही. (संपर्क - jarvindas30@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 2 Mar 2025 5:05 am

कबीररंग:नैया मोरी नीके नीके चालन लागी...

कबीरांनी आपल्या दोह्याच्या ओळीओळींत आणि पदाच्या चरणांत अभय आणि शक्ती यांनी भारलेल्या जीवनबोधाच्या खुणा रेखून ठेवल्या आहेत. परमेश्वरप्राप्तीच्या वाटेवरील वाटसरूसाठी या खुणा म्हणजे अनमोल ठेवा आहेत. जन्माला आल्यापासून माणसाचं काळीज काही मूलभूत प्रश्न विचारत असतं. हे प्रश्न म्हणजे : आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आपण दुबळे आहोत का? देहाचं, मनाचं, बुद्धीचं दुबळेपण आपण दूर करू शकतो का? हे दुबळेपण हटवायला आपल्याला बळाची आवश्यकता भासते का? कोणतं आहे ते बळ? त्याचं स्वरूप काय? ते आपल्या बाहेर आहे की आत? असे अनेक प्रश्न मनाच्या अवकाशात पिंगा घालत असतात. आपलं मन सतत सुरक्षित राहू इच्छितं. ते एकटं राहत नाही. ते दुसऱ्यात आधार शोधत राहतं. विविध नात्यांच्या माणसांसोबत जगताना दुःखाच्या तावडीत सापडतं. कधी मोहाच्या आकर्षणानं स्वत:ला विसरतं, कधी आसक्तीतल्या भयानं व्याकुळ होतं, तर कधी लाभलेल्या सुखाचा शेवट पाहून शोकात बुडून जातं. अशा या विविध आवर्तांमधल्या आपल्या मनाला बळाचा खरा स्रोत उमजावा म्हणून कबीर देहबळ, मनोबळ, बुद्धिबळ या पलीकडं असलेल्या आत्मबळाच्या दृढतेचं साक्षात् दर्शन घडवतात. एका नितांत बोधसुंदर पदांतून कबीर आत्मबळाची दृढता साधकाच्या प्रत्ययास आणतात. ते पद असं आहे : नैया मोरी नीके नीके चालन लागी।आंधी मेघा कछु ना व्यापे, चढे संत बढभागी।।उथले रहत डर कछु नाही, नाही गहरे को संसा।उलट जाय तो बाल न बांका, वाह रे अजब तमासा।।औसर लागे तो परबत बोझा, तोउ ना लागे रे भारी।धन सतगुरू जी ने राह बतायी, वाकई रे मैं बलिहारी।।कहे कबीरा जो, बिन सिर खेवे, सो यह सुमति बखाने।या बहु हित की अकथ कथा है, बिरले खेवट ही जाने।।नैया मोरी नीके नीके चालन लागी... हे पद म्हणजे, ईश्वरावरील अपार भक्तीचं भावचित्र आहे. या चित्रातील ‘मी’ सत्यवाचक, ईश्वरवाचक किंवा अस्तित्ववाचक आहे. कबीरांनी या ‘मी’ला झालेल्या अभय आणि शक्तीचं स्पष्ट दर्शन साधकांना पदांतून घडवलं आहे. आपण कितीएक वेळा नावेत बसून भरलेल्या नदीतून पैल जाण्यासाठीचा प्रवास करतो. पण, कधी आपल्याला खोल पाण्याचं, कधी अनोळखी नावाड्याच्या वल्हवण्याचं तर नावेत गर्दी करून बसलेल्या प्रवाशांचं भय वाटतं. आपल्याला घेऊन नाव नदीत बुडाली तर काय होईल, या कल्पनेनं आपलं मन भयकातर होतं. एखादा भोळा प्रवासी देवाचं नाव पुटपुटत राहतो. पण, कबीरांच्या या पदातील भक्ताचा नावेतील प्रवास वेगळा आहे. देवे लाभलेल्या जीविताच्या नावेतून भक्त या जन्माची नदी पार करतो आहे. नदीच्या पाण्यातून ही नाव चुबूकss चुबूकss असा आवाज करत, पाणी सहज मागं सारत पुढं निघाली आहे. भक्ताच्या पैलपार जाण्याच्या इच्छेची दिशा आणि गती सद्गुरुंनी सूचित केली आहे. त्यामुळं नदीतून प्रवासताना या नावेला, भरून आलेल्या आभाळाचं आणि वादळाचं भय वाटत नाही. कबीर म्हणताहेत, ही नाव रिकामी नाही, इंद्रियांचं जडपण असलेल्या माणसांनी ओझावलेली नाही, तर नावेत सगळी चेतनेनं भारावलेली संत मंडळी आहेत. म्हणूनच तर नदीचं पाणी उथळ असो वा खोल; भक्ताच्या मनात प्रवास निर्धोक होईल, याविषयी संशय नाही. कुठल्याशा कारणानं नाव पाण्यात उलटली, तरी आपल्या जीवाला कसलाही धोका होणार नाही, ही श्रद्धा भक्ताला आहे. सद्गुरुंचा शब्द भक्ताच्या हृदयात आहे. तो नुसता सद्गुरुंवरील प्रेमातून हृदयस्थ झालेला नाही तर तो हिताचा आहे, याचा श्रद्धेनं निर्णय झालेला आहे. म्हणून भक्ताच्या या हृद्गतात ‘बहु हित की अकथ कथा है’ असं चरण कबीर योजतात आणि एखादाच आंतरिक दिव्य प्रकृतीला जाणणारा विरळा नावाडी हे श्रद्धासूत्र जाणेल, असं सांगतात. माणसाच्या आयुष्यात असण्या-नसण्याची आणीबाणी आली की, तो जिथं निर्धारानं, उच्चतम बुद्धीच्या निश्चयानं आपल्या जीविताची नाव नांगरून ठेवतो, तिथं त्या नावेचे नावाडी आपण असत नाही. पैल जायचा निर्णयसुद्धा आपला नसतो. ईश्वरच आपल्या जीविताच्या नावेचा नावाडी असतो. तोच दृष्टीत पैलपार कोरतो. या पदांतून कबीर हेच सूचित करत असावेत, असं वाटतं. (संपर्क - hemkiranpatki@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 2 Mar 2025 5:05 am

जितेंद्र, हसन यांनी नाकारला होता ‘चालबाज’:24 फेब्रुवारीला होती श्रीदेवीची पुण्यतिथी, त्यांचा ‘चालबाज’ ठरला होता सुपरहिट सिनेमा

ज्यांना मी भाभीजी म्हणायचो, त्या श्रीदेवीजींची २४ फेब्रुवारीला पुण्यतिथी होती. त्या दिवशी आम्हाला त्यांच्यासोबत व्यतित केलेला काळ आठवत होता. त्यांच्या संस्मरणीय सिनेमांपैकी एक म्हणजे ‘चालबाज’. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये या सिनेमाविषयी... ‘चालबाज’चे दिग्दर्शक पंकज पराशर माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत कामही केले आहे. या सिनेमाच्या प्लॅनिंगविषयी त्यांना विचारले. ते म्हणाले की, माझा ‘जलवा’ सिनेमा पाहून एल. व्ही. प्रसाद यांनी दक्षिणेतील दिग्गज निर्माते ए. पूर्णचंद्र राव यांना सांगितले, तुम्ही याला घेऊन सिनेमा बनवा, हा खूप मोठा दिग्दर्शक होईल. मग राव यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. त्यांच्याकडे निघाल्यावर मनात विचार घोळत होता.. आपण त्यांना सांगावे की, तुम्ही अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘अंधा कानून’, ‘आखिरी रास्ता’ असे दोन्ही सुपरहिट सिनेमे बनवले आहेत. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे प्लीज अमिताभ बच्चन यांना आणा, मी तुम्हाला एक सुपरहिट सिनेमा देतो.. त्यांच्या ऑफिसात शिरताच मला श्रीदेवीच्या कोणत्या तरी दाक्षिणात्य सिनेमाचे पोस्टर लावलेले दिसले. हे पोस्टर पाहिल्यावर माझा विचार बदलला. मी पूर्णचंद्र रावांना विचारले, तुम्ही श्रीदेवीला ओळखता? ते म्हणाले की, माझे श्रीदेवीशी कौटुंबिक संबंध आहेत. मी तिच्याशी बोलेन, पण विषय काय आहे? मी तर अमिताभ बच्चन यांचा विचार डोक्यात ठेऊन गेलो होतो. पण, अचानक ‘सीता और गीता’ असे मी बोलून गेलो. पूर्णचंद्र रावांनी लगेच ‘ठीक आहे’ म्हणत साइनिंग अमाउंट म्हणून ११ हजार रुपयांचा चेक मला दिला आणि म्हणाले, पप्पी सध्या अमेरिकेत आहे, पण उद्या दुपारपर्यंत मी तुम्हाला तिच्या तारखा मिळवून देईन. आणि खरोखरच त्यांनी दुसऱ्या दिवशी मला श्रीदेवीच्या तारखा कळवल्याही. श्रीदेवीचे पूर्णचंद्र रावांशी किती जवळचे नाते असेल बघा, त्यांनी कथानक न ऐकताच केवळ ‘सीता और गीता’ एवढ्या नावावरच तारखाही मिळवून दिल्या. त्यानंतर पूर्णचंद्र रावांनी सांगितले की, तुम्ही लगेच पटकथा लिहायला सुरूवात करा. मी विचारले, सर, हीरो कोण घ्यायचे? ते म्हणाले, धर्मेंद्रने केलेल्या भूमिकेसाठी रजनीकांतला आणि संजीवकुमारच्या भूमिकेसाठी जितेंद्रला घेऊ. दोघांशीही माझे घनिष्ट संबंध आहेत, तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. मग त्यांनी जीतूजींची अपॉइंटमेंट घेतली आणि मी जाऊन त्यांना कथानक ऐकवले. जितूजींना त्यात मजा वाटली नाही. ते मला म्हणाले, पंकज, तू ‘करमचंद’सारखा स्टायलिश शो बनवला, ‘जलवा’सारखा जबरदस्त सिनेमा तयार केला, मग रमेश सिप्पीच्या सिमेनाचा रिमेक का करतोयस? आपल्या शैलीतले काही ओरिजनल बनव. ही गोष्ट पूर्णचंद्र रावांना सांगितल्यावर ते म्हणाले, आपण दुसऱ्या कुणाला तरी घेऊ. तुम्हाला ‘सीता और गीता’ बनवायचाय ना, तुम्ही त्यावरच काम करा. मग मी ‘सीता और गीता’पेक्षा ही कथा कशी वेगळी करता येईल, हे डोक्यात ठेऊनच ती लिहिली. मी परत आल्यावर राव मला म्हणाले की, मी कमल हसनसोबत अपॉइंटमेंट फिक्स केली आहे, तुम्ही त्यांना कथानक ऐकवा. मी कमल हसन यांना नॅरेशन दिले. त्यावर ते म्हणाले, तुम्ही ‘सीता और गीता’मध्ये का बदल केला? मी उत्तर दिले की, मला ‘सीता और गीता’ जसाच्या तसा बनवायचा नाहीय. हे एेकून कमल हसन म्हणाले की, तुम्ही हे चुकीचे करताय. ‘सीता और गीता’ बनवायचे ठरवलेय तर तेच बनवा. तुम्ही समजा शेक्सपिअरची कहाणी घेतली आणि म्हणालात की मी यावर सिनेमा बनवतोय, पण आता त्यातून शेक्सपिअर बदलतोय, तर सगळे बिघडून जाईल. तुमचे संवाद वेगळे असतील, व्यक्तिरेखा वेगळ्या असतील, शॉट डिव्हिजन वेगळे असेल, लोकेशन वेगळे असेल, तर सिनेमाही वेगळा वाटेलच. पण, ‘सीता और गीता’ची जी मूळकथा आहे, ती बदलू नका. हे ऐकून मनात विचार आला की, मी पुन्हा ‘सीता और गीता’च बनवतोय असे वाटल्याने जितेंद्र यांनी नकार दिला आणि मी ‘सीता और गीता’ बदलतोय म्हणून कमल हसन नकार देत होते. असो. मी परत येऊन हे पूर्णचंद्र रावांना सांगितले. ते म्हणाले, अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या मनातील कल्पनेप्रमाणे ‘सीता और गीता’ लिहा, आपल्याला दुसरा हीरो मिळेल. मग ही भूमिका सनी देओलने केली. आणि त्यानंतर हा सिनेमा किती गाजला, हे सगळ्यांना माहीत आहे. ‘चालबाज’ हा श्रीदेवीच्या आणि माझ्याही आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय सिनेमांपैकी आहे... यावरुन मला शकील बदायुनी यांचा एक शेर आठवतोय... चाहिए ख़ुद पे यक़ीन-ए-कामिलहौसला किस का बढ़ाता है कोई। मला पंकज यांनी सांगितले की, या सिनेमाची पहिली प्रिंट आली, तेव्हा मी रमेश सिप्पीजींना बोलावले आणि त्यांच्या पायाशी बसून त्याची पहिली ट्रायल पाहिली. सिनेमा संपल्यावर त्यांनी मला शाबासकी दिली. या गोष्टीवरुन मला जावेद साहेबांनी सांगितलेला एक किस्सा आठवतोय. त्यांनी सांगितले होते की, आम्ही सिप्पी फिल्ममध्ये काम करत होतो तेव्हा ‘राम और श्याम’ हा सिनेमा खूप हिट झाला होता. त्यावेळी सिप्पी फिल्मने असा विचार केला की, या सिनेमाप्रमाणेच दिलीपकुमार यांच्याऐवजी एखाद्या हीरोइनला घेऊन का सिनेमा बनवू नये? आणि मग हेमामालिनी यांना घेऊन ‘सीता और गीता’ बनवला, जो सुपरहिट झाला. ‘राम और श्याम’चे निर्माते होते बी. नागीरेड्डी. एकेदिवशी सिप्पी फिल्मच्या ऑफिसमध्ये नागीरेड्डीचींचा फोन आला की, मी मुंबईत आलो आहे आणि मला सिप्पी साहेबांना भेटायचेय. सिप्पी साहेबांनी दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ दिली. पण, नागीरेड्डीजी येणार आहेत आणि आपण त्यांच्या ‘राम और श्याम’ची कॉपी करुन ‘सीता और गीता’ बनवलाय, त्याचा रिमेक केलाय. आता त्यांना सामोरे कसे जायचे, या विचाराने सिप्पींच्या ऑफिसात अस्वस्थता पसरली. ठरल्याप्रमाणे नागीरेड्डीजी आले, सिप्पी साहेबांसोबत चर्चा केली आणि निघून गेले. ते कशासाठी आले होते, असे सगळ्यांनी विचारल्यावर सिप्पी साहेबांनी सांगितले की, ते तमिळसाठी ‘सीता और गीता’च्या रिमेकचे राइट घेण्यासाठी आले होते. मी त्यांना म्हणालो, सर, का आम्हाला लाजवताय? आम्हीच तुमच्या ‘राम और श्याम’ला मुलगी बनवून रीमेक केलाय. तर नागीरेड्डीजी म्हणाले की, हीरोने केलेल्या भूमिकांमध्ये मुलगी काम करेल, ही आयडिया तुमचीच होती ना! पैसे तर अशा आयडियाचे असतात. त्यामुळे तुमच्याकडून राइट घेतल्यावरच मी त्यावर दक्षिणेत सिनेमा बनवेन. नागीरेड्डी यांच्यासारख्यांची नैतिकता आणि चारित्र्य असे होते. श्रीदेवीजींनी अंगात ताप असतानाही चित्रीत केलेले ‘चालबाज’चे हे गाणे आज त्यांच्या आठवणीत ऐका... न जाने कहाँ से आयी है, न जाने कहाँ को जाएगी... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 2 Mar 2025 5:04 am

रसिक स्पेशल:राजधानीतील साहित्यपूर्ण संमेलन

मराठी माणसाने आता तरी बहिर्मुख होण्याची गरज आहे. केवळ १९६० मध्ये भाषावार प्रांतरचना होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीत साहित्याचे पीक जोरदार वाढीस लागले आहे, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपून जेमतेम आठवडा झाला आहे. या संमेलनात नेहमीप्रमाणे अनेक विषयांवर टीकाटिप्पणी करणारी चर्चा झाली. खरे तर ती अजूनही सुरूच आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांप्रमाणे समाजमाध्यमांतही आपापल्या मगदुराप्रमाणे आणि आकलनाप्रमाणे कुणी आसूड ओढत आहे, कुणी पाठ थोपटत आहे. कुणी चिमटे काढत आहे, तर कुणी तोंडसुख घेत आहे. आणखी एक-दोन आठवडे चर्चा सुरू राहील आणि मग हा विषय थंड होऊन लोक नव्या विषयांवर मतमतांतरे व्यक्त करु लागतील. या संमेलनात मीही काही अंशी सहभागी होतो आणि एका सत्रात भागही घेतला. पण, तीनही दिवस मी संमेलनाला जवळपास पूर्ण म्हणता येईल अशी हजेरी लावली. पंतप्रधानांच्या उपस्थितीतील उद्घाटनापासून महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील समारोपापर्यंत महत्त्वाची सर्व सत्रे मी पाहिली आणि ऐकली. आयोजनातही एक स्वयंसेवक म्हणून मी जमेल तितके काम केले. या पार्श्वभूमीवर कोणताही पूर्वग्रह न बाळगता आपली काही निरीक्षणे मांडण्याचा प्रयत्न मी इथे करत आहे. ‘विचारकलहाला का भिता?’ असं आगरकरांनी म्हटलं होतं, तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. समाज अनेक अनिष्ट प्रथांमध्ये लिप्त होता. आता स्वातंत्र्याच्या अवकाशात ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही अपवाद वगळता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बहुसंख्य नागरिक लाभ घेत आहेत. आणि त्याबाबतीत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे मतमतांतरे असणार, यात शंका नाही. या वेळीही संमेलनाची व्यवस्था, आमंत्रणपत्रे देताना उडालेला गोंधळ, राजकीय नेत्यांचा सहभाग, अमुक साहित्यिकांचा अनुपस्थिती अशा अनेक विषयांवर चर्चा आणि टीकाही झाली, ती अद्याप सुरू आहे. संमेलनात अनेक उणिवा होत्या. खरे तर प्रत्येकाची प्रत्येक इच्छा किंवा सूचना विचारात घ्यायची झाली, तर (लोकशाही मान्य करुनही) संमेलन होणे अशक्य आहे. महाराष्ट्रात पत्रकार आणि विचारवंत, लेखक आणि टीकाकारांची अजिबात कमतरता नाही. शिवाय, प्रत्येकाचा स्वत:चा एक अजेंडा आणि फुगलेला अहं असतो. या पार्श्वभूमीवर संमेलन शेवटपर्यंत चांगले चालले आणि संपन्न झाले, हीच एक कामगिरी आहे. पण, या सगळ्या धामधुमीतून आणि चर्वितचर्वणातून काही शिकण्यासारखे आहे का? हो, आहे. आणि तेच खरे तर आपण करत नाही. संमेलनाची चर्चा ही त्याचे स्थळ आणि अध्यक्ष जाहीर झाल्यावर सुरू होते आणि संमेलनाचे सूप वाजल्यावर काही काळापर्यंत चालते. पुन्हा चर्चा होते ती पुढच्या वर्षीचे स्थळ आणि अध्यक्ष निवडीच्या वेळी. साहित्य महामंडळाची एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण पारदर्शक करुन सर्वांना या प्रक्रियेची माहिती देणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया सर्वांना समजली तरी अर्धी-अधिक टीकाटिप्पणी टळेल. उदा. पूर्वी निवडणुका व्हायच्या. आता अध्यक्षांची निवड होते. निवडणुका होत्या तेव्हा अनेक अनिष्ट गोष्टींना वाव होताच; शिवाय साहित्यिकांचे राजकारण बघायची संधी सगळ्यांना मिळायची. आता मैफिलीचा तो भाग काहीसा नीरस झाला आहे. पण, निदान राजकारणाने येणारी कटुता तरी दिसत नाही. दुसरी बाब म्हणजे, आधीच्या आणि होऊ घातलेल्या संमेलनाची अवास्तव चर्चा. अवास्तव यासाठीच की, ही चर्चा फक्त व्यवस्थेसंबंधी असते. ती साहित्याविषयीच्या प्रश्नांवर अजिबात नसते. दिल्लीच्या संमेलनाची इचलकरंजीच्या किंवा जळगावच्या संमेलनाशी तुलना करणे योग्य आहे का? महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या आपल्या सैन्याची पानिपतावर थंडीमुळे दैना झाली, असे इतिहास सांगतो. प्रत्येक ठिकाणची व्यवस्था, वातावरण आणि संदर्भ वेगळे असतात. दिल्लीत तर अनेक हितसंबंध आपोआप सक्रिय होणे साहजिक होते. ७० वर्षांनी आणि अभिजात भाषेच्या मान्यतेनंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत राजधानीमध्ये आपल्या साहित्याचा सन्मान होणे, ही गोष्ट महाराष्ट्राला भूषणावह नाही का? त्या समारंभातही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष दृष्टिकोनाच्या वेगवेगळ्या छटा व्यक्त झाल्या, हा भारतीय लोकशाहीचा विजय नाही का? ही भाषणे परिपूर्ण नव्हती, पण ती मुख्यत: मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्र यावर केंद्रित होती, हे महत्त्वाचे. आयोजकांची दिल्लीतील कसरत गेली चार – पाच महिने सुरू होती. या दरम्यान वातावरण निर्मितीसाठी अनेक उपक्रम घेण्यात आले. पुस्तक प्रकाशने, वक्त्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम यातून स्थानिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. महादजी शिंदेंची लेखनकामाठी प्रकाशात आणली गेली. तीन दिवसांच्या कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले. त्या दरम्यान आणि आजही प्रशंसा व टीका या दोन्ही गोष्टींना समबुद्धीने, समभावनेने स्वीकारले गेले. साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे स्वरुप बदलायला हवे. कारण कवींची प्रचंड संख्या ही स्वागतार्ह गोष्ट असली, तरी तासन् तास कविता शांतपणे एेकणारा श्रोतृवंृद संमेलनात नसतो. यावर उपाय म्हणजे, कवितांचे वेगळे संमेलन ठेवणे किंवा कवींच्या संख्येला गुणात्मकतेच्या कठोर निकषांवर कात्री लावणे. पण, चांगली कविता कोण ठरवणार? शिवाय, प्रत्येक कवीचा अभिनिवेश ‘मंच हा आपला अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असा असेल, तर महामंडळाने तरी काय करायचे? संमेलनाचा ‘भव्यता’ हाच केवळ एक निकष कशासाठी हवा? एका विशाल अखिल भारतीय साहित्य संमेलनाऐवजी तीन किंवा चार संमेलने चार वेगवेगळ्या ठिकाणी का करु नयेत? त्यामुळे अनेकांनी संधीही मिळेल. छोट्या संमेलनांमुळे खर्चही कमी येईल. जिथे कधीच झाले नाही किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणीही संमेलने होतील. शिवाय, या विविध ठिकाणी साहित्यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलनाइतक्याच मराठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्याशी संबंधित गोष्टींवरही संमेलनाच्या निमित्ताने चर्चा व्हायला हवी. दिल्लीतील संमेलनाच्या औचित्याने ती काही प्रमाणात झाली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासन, नूतन मराठी विद्यालयासाठी मदतीची घोषणा, मराठी माणसांसाठी दिल्लीत भव्य मराठी संकुल, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित व्यवस्था अशी काहीशी चांगली सुरूवात या संमेलनाच्या निमित्ताने झाली. पण, त्याची नाममात्र दखल घेण्यापलीकडे आपण सर्वांनी काय केले? मराठी माणसाने आता तरी बहिर्मुख होण्याची गरज आहे. केवळ १९६० मध्ये भाषावार प्रांतरचना होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीत साहित्याचे पीक जोरदार वाढीस लागले आहे, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. पुढच्या काही वर्षांत बृहन्महाराष्ट्रातील मराठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांचे पुनरुज्जीवन किंवा संवर्धन, अटकपासून कटकपर्यंत घडलेल्या मराठी इतिहासाच्या अवशेषांचे दस्तावेजीकरण व संरक्षण, तसेच देशातील १० प्रमुख विद्यापीठांमध्ये मराठी अध्यापनासाठी अध्यासनांचे प्रावधान या गोष्टींना साहित्याइतकेच महत्त्व शासन व मराठी जनतेने दिले पाहिजे. साहित्य म्हणजे सर्वांना ‘सहित’ अर्थात सोबत घेऊन जाणारे अशी व्याख्या असेल, तर ते सर्जनशील आणि समावेशक असणे आवश्यक आहे. (संपर्क - dmulay58@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 2 Mar 2025 5:03 am

रसिक स्पेशल:राज्यभर पसरलेल्या ‘फिक्सर्स’चे काय..?

‘फिक्सर’ असा बदलौकिक असलेल्यांना पीए, ओएसडी नेमणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले, हे बरेच झाले. त्यामुळे मंत्रालयातील फिक्सर काही काळ मुख्य प्रवाहाबाहेर राहतीलही. पण, सर्वसामान्यांच्या घामाच्या कमाईवर दररोज डल्ला मारणाऱ्या राज्याच्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाऱ्यांवर ते काही उपाय करणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आपल्याला स्वीय सचिव किंवा विशेष कार्यअधिकारी नेमण्याचेही अधिकार नाहीत, असे जाहीर विधान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलीकडेच केले. आता पीए किंवा ओएसडी यांची नेमणूक करण्याचे अधिकारही मुख्यमंत्र्यांकडे आहेत, असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यानंतर या नेमणुकांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतात, हे कोकाटे यांचे नाव घेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. तसेच, आपल्याकडे विविध मंत्र्यांकडून आलेल्या १२५ नावांपैकी १०९ नावांना मंजुरी दिली असून, १६ नावांना ती दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात ज्या पीए किंवा ओएसडींबद्दल ‘फिक्सर’ असल्याचा बदलौकिक आहे, ज्यांची नावे गैरप्रकारांमध्ये गुंतलेली आहेत किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत, अशांची नावे आपण क्लिअर केलेली नाहीत, हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ‘फिक्सर’ हा शब्द वापरल्याने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या नसत्या, तरच नवल! ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे लोकांच्या अंगवळणी पडले आहे. सहा महिने थांबायला लागते, कारण अगदी साधी साधी कामेही कूर्मगतीने होतात आणि ती करताना शक्य तितकी ‘लक्ष्मीदर्शना’ची संधी साधली जाते. पदार्थविज्ञानानुसार जड वस्तूच्या हालचालीचा वेग कमी, तर हलक्या वस्तूचा वेग जास्त असतो. पण, सरकारी कामांमध्ये याच्या उलट घडते. तिथे फायलींवर वजन ठेवल्याशिवाय त्या पुढे सरकत नाहीत, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांनी १२५ पैकी १०९ नावांना मंजुरी दिली आणि फिक्सर असल्याचा संशय असलेली किंवा गैरप्रकारांचे आरोप असलेली १६ नावे मंजूर केली नाहीत. पण, मग सर्वसामान्यांना हे पीए किंवा ओएसडी नेमके काय ‘फिक्स’ करतात, हेही कुतूहल निर्माण झाले असणारच. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी, ‘रुपयातील पंधरा पैसेच लोकांपर्यंत पोहोचतात,’ असे विधान केले होते, त्याला किमान पस्तीस वर्षे लोटली आहेत. महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या अर्थसंकल्पातील आकड्यांशी शंभरपैकी १५ आणि ८५ च्या या गुणोत्तराचा हिशेब मांडला, तर मग अशा फिक्सर मंडळींच्या उलाढालींचा अंदाज येऊ शकेल. सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे वाटेकरी केवळ हे फिक्सर असतात? की ज्यांच्यासाठी हे लोक फिक्सिंग करतात, ते असतात? की हे सगळे मिळूनच लाभार्थी असतात? असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे लाभार्थी कोण असतात, हे आता सर्वसामान्यांपासूनही लपून राहिलेले नाही. दिवसाला एक कोटी रुपये घरी नेले नाहीत, तर त्या अमुकतमुक मंत्र्याला झोप येत नाही, असे मंत्रालयात सर्रासपणे सांगितले जायचे. चार वेळा मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या शरद पवारांनीच एका विरोधी पक्षनेत्याबाबत ‘तोडी करणारा विरोधी पक्षनेता,’ असे शब्द वापरले होते. इथे ‘तोडी’, “फिक्सर’ हे शब्द राज्याच्या सर्वोच्च पदावरील नेत्यांनी वापरले आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. आणि अशा प्रकारांना आळा घातला जावा, या हेतूनेच त्यांनी ते वापरले असावेत, असे आपण म्हणू शकतो. पण, भ्रष्टाचाराचे आकडे समजून घ्यायचे म्हटले तर कदाचित भोवळ येईल, इतक्या प्रमाणात तो होतो, हे सत्य आहे. ही पीए किंवा फिक्सर मंडळी त्या भ्रष्टाचाराच्या कडीतील मंत्रालय पातळीवरील छोटे मोठे मासे असतात. मूळ प्रश्न हा आहे की, महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि गतिमान राज्यातील छोट्या छोट्या गावांतही सरकारी कर्मचाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय सर्वसामान्य माणसाचे कोणतेही काम होत नाही. भ्रष्टाचाराबद्दल प्रत्येक निवडणुकीत बोलले जाते, पण सरकारी कामात शंभर टक्के पारदर्शकता येत नाही. खरे तर एखादे काम विहित मुदतीत न झाल्यास संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला शिक्षेची; विशेषत: आर्थिक दंडाची, तसेच पदोन्नती नाकारण्याची किंवा पदावनतीच्या शिक्षेची तरतूद सेवा हमी कायद्यामध्ये असायला हवी. सध्या अशी कोणतीही भीती नसल्याने एकदा कुणी सरकारी नोकरीत पर्मनंट म्हणजेच कायम झाला की मग साक्षात परमेश्वरही त्याचे फारसे नुकसान करू शकत नाही, असे उपहासाने म्हटले जाते. त्यामुळेच, सरकारी व्यवस्थेच काम करण्यापेक्षा ते अडवण्याकडे जास्त कल दिसून येतो. सामान्य माणसाला लहान-मोठ्या कामांसाठी मंत्रालयात हेलपाटे घ्यावे लागू नये, म्हणून प्रादेशिक, जिल्हा आणि तालुका पातळीवर कामकाजाचे विकेंद्रिकरण केल्याचे सांगितले जाते. पण, तरीही बहुतांश कारभार मंत्रालयातच केंद्रित झाला आहे. दुसरीकडे, विभागीय पातळीवरील आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी किंवा महसूल यंत्रणा आणि एकूणच सर्व सरकारी खात्यांतील राज्य, प्रादेशिक, जिल्हा व तालुका पातळीवरील कथित विकेंद्रित कार्यालयांमध्येही सर्वसामान्यांना रोज कमी-अधिक प्रमाणात भ्रष्टाचाराचा अनुभव येतो. मुख्यमंत्र्यांनी वगळलेले मंत्रालयातले काही फिक्सर काही काळ मुख्य प्रवाहाच्या बाजूला राहतील. पण, राज्यभर अशा विकेंद्रित पद्धतीने सर्वसामान्य लोकांना नाडणाऱ्या, त्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट सरकारी यंत्रणेवर मुख्यमंत्री प्रभावी उपाययोजना करतील का, हाच खरा प्रश्न आहे. (संपर्क - shailendra.paranjpe@gmail.com )

दिव्यमराठी भास्कर 2 Mar 2025 5:01 am

कव्हर स्टोरी:‘शक्तिपीठ’चं काय होणार?

नागपूर ते गोवा... महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांसह अनेक तीर्थस्थळांना जोडणाऱ्या, ८०२ किलोमीटर लांबीच्या सहापदरी द्रुतगती महामार्गासाठी राज्य सरकारने पुन्हा कंबर कसली आहे. तर, केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांसाठी सरकार हा प्रकल्प लादत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आपला विरोध आणखी तीव्र केला आहे. वाढत्या उन्हासोबत तापू लागलेल्या या विषयाचा वेध... नागपूर ते ग‌ोवा ‘शक्तिपीठ महामार्गा’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची घोषणा केली. या नव्या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती येईल, असा दावा सरकारने केला होता. २८ फेब्रुवारी २०२४ ला शासनाने एका राजपत्राद्वारे या ‘पवनार ते पत्रादेवी द्रुतगती महामार्गा’ला राज्य महामार्ग क्र. १० म्हणून मान्यता दिली. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकल्पाला शेतकऱ्यांमधून विरोध होऊ लागला. विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत प. महाराष्ट्रात विरोधाची ही धार खूप तीव्र होती. या प्रकल्पाच्या आडून केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आपल्या सुपीक जमिनींचा घास दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. विशेषत: प. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाल्या. शेतकऱ्यांचा विरोध पाहता, लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकल्प रद्द करावा लागला. परंतु, निवडणुकीनंतर पुन्हा महायुती सरकार सत्तारुढ झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्ग सुरू करण्याची घोषणा केली आणि हा मुद्दा नव्याने तापू लागला. मधल्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांचा विरोध काहीसा कमी झाला. मात्र, नांदेडसह मराठवाड्याच्या काही भागातील तसेच प. महाराष्ट्रातील, विशेषत: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध अजूनही कायम आहे. तिथे पुन्हा आंदोलन उभे राहिले आहे. या भागातील मंत्री आणि सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा दावा करत आहेत. पण, शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते मात्र विरोधाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सर्व बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची बैठक नुकतीच २० फेब्रुवारीला कोल्हापुरात झाली. १२ मार्चला विधानभवनावर ‘गळफास मोर्चा’ काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते, त्यावरच या प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आणि तीन प्रदेशांतून जाणाऱ्या या महामार्गासमोरचे अडथळे दूर होऊन तो राज्यासाठी शक्तिदायी ठरतो की उभा राहण्याआधीच शक्तिहीन होतो, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दृष्टिक्षेपात प्रकल्प... - लांबी : ८०२ किमी. - रुंदी : १०० मीटर (सहा पदरी) - अंदाजित खर्च : ८६ हजार कोटी रु. - भूसंपादन : २७ हजार हेक्टर - पूर्णत्वाचा कालावधी : ५ वर्षे (२०३० पर्यंत) नागपूर टू गोवा... १२ : जिल्ह्यांतून जाणार महामार्ग. १८ : तास सध्या लागतात या प्रवासाला. ०८ : तास लागतील महामार्ग पूर्ण झाल्यावर. या तीर्थस्थळांना जोडणार... रेणुकामाता (माहूर), तुळजाभवानी (तुळजापूर), महालक्ष्मी (कोल्हापूर) ही शक्तिपीठे; औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे तसेच पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, औदुंबर, नरसोबाच्या वाडीसह १९ तीर्थस्थळे या महामार्गाने जोडली जाणार आहेत. विरोधाची धार कमी करण्याचे प्रयत्न या ‘महा’प्रकल्पाचा ‘मार्ग’ मोकळा करण्यासाठी कोल्हापुरात अलीकडेच ‘क्रेडाई’ने एक चर्चासत्र घेतले. प्रकल्पाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी त्यातून पुढे आली. यावेळी करण्यात आलेल्या काही सूचना अशा : - प्रकल्पबाधितांना योग्य दराने आर्थिक मोबदला मिळावा, त्यांचे प्राधान्याने पुनर्वसन व्हावे. - महामार्गालगत व्यवसाय उभारणीत प्रकल्पबाधित आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावे. - प्रकल्पाच्या कामात प्राधान्याने स्थानिक मनुष्यबळाचा वापर करावा. - दळणवळण गतिमान होण्यासाठी या महामार्गाशी सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जोडण्यात यावा. - महामार्गात नद्यांचे संगम क्षेत्र येत असल्याने पुरामुळे शेतीची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. - कोल्हापूर ते शिर्डी आणि कोल्हापूर ते गुजरात सीमेचा भाग जोडण्याचाही प्रयत्न व्हावा. उद्योग - पर्यटनवाढीमुळे नवा महामार्ग ठरेल वरदान कोल्हापूर - सांगली जिल्ह्यात उद्योग - व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत, पण ते दळणवळणासाठी मुंबईवर अवलंबून आहेत. चांगल्या वाहतूक सुविधेअभावी कोल्हापुरातील फाउंड्री उद्योगाची वाढही खुंटली आहे. नव्या महामार्गामुळे मुंबईऐवजी रत्नागिरी पोर्टचा वापर करून वेळ वाचवता येईल. कोल्हापुरातील विमानतळावर आता नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नवे उद्योग उभे राहून स्थानिक पातळीवर हजारो रोजगार निर्माण होतील. त्याचवेळी, कोल्हापूर - सांगलीसह प. महाराष्ट्रातील धार्मिक, ऐतिहासिक तसेच वन पर्यटनालाही चालना मिळेल. त्यामुळे हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल. या महामार्गावर उभे राहणारे पूल हे पेन्सिल ब्रिज असल्याने त्यातून पाणी पुढे जाऊ शकेल. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीतील पुराची समस्याही नियंत्रित होईल. या प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ दोन टक्के शेतजमिनी लागणार आहेत. बाकी सर्व जमीन वन विभागाची आहे. त्यामुळे केवळ दोन टक्के नुकसानीकडे बोट दाखवत प्रकल्पाच्या ९८ टक्के लाभाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. - सचिन ओसवाल, उपाध्यक्ष, क्रेडाई, कोल्हापूर कंत्राटदार, भांडवलदारांसाठी प्रकल्प थोपवला जातोय सरकार जनतेने मागणी न केलेले आणि केवळ कंत्राटदार, भांडवलदारांच्या हिताचे प्रकल्प घेऊन येत आहे. शक्तिपीठ महामार्ग त्यापैकी एक आहे. रत्नागिरी - नागपूर हा सहापदरी महामार्ग वाहनांअभावी रिकामा असतो. अनेक समांतर रस्तेही या दिशेने जात आहेत. त्यांचे रुंदीकरण करण्याऐवजी सरकार हा नवा महामार्ग जनतेवर, शेतकऱ्यांवर थोपवत आहे. सह्याद्रीतील किंवा मराठवाड्यातील खनिज संपत्तीवर भांडवलदारांचा डोळा आहे. ती वाहून नेण्यासाठी हा महामार्ग बनवला जात आहे. विदर्भातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे, मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी तहानली आहे. या स्थितीत बारा जिल्ह्यांतील जमिनी या प्रकल्पासाठी घेतल्या गेल्या तर शेतकरी भूमिहीन होतील. हजारो झाडे तोडली जाणार आहेत; शिवाय खोदकामामुळे भूजल पातळीवरही परिणाम होईल. मुळात सांगली - कोल्हापूरमध्ये पुरामुळे हानी होते. हा रस्ता झाल्याने पुन्हा महापूर येऊन गावेच्या गावे बुडतील. निवडणुकीपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची किंवा तो न लादण्याची भाषा करणारे नेते आता निवडणूक जिंकल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या पाठीत सुरा खूपसून तो पुढे रेटत आहेत. - गिरीश फोंडे, समन्वयक, महामार्गविरोधी संघर्ष समिती वाहत्या प्रवाहांचा गळा न आवळता प्रकल्प व्हावा नवीन रस्ते तयार करताना लहानमोठ्या नदी - नाल्यांवर आणि प्रसंगी मोठ्या नद्यांवर पूल बांधावे लागतात. अशी कामे करताना महत्त्व दिले जाते, ते रस्त्याच्या प्लॅनिंग आणि डिझाइनला. मात्र, पुलाखालून वाहणाऱ्या नदी / नाल्यांच्या प्रवाहाला अशा नवीन पुलामुळे अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जातेच, असे नाही. साहजिकच अशा पुलांखाली नद्या - नाल्यांच्या प्रवाहाचा गळा आवळला जातो. त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. बऱ्याचदा पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे भराव असलेले पोहोच रस्ते (Approach Road) असतात. त्या भरावात पुरेशा संख्येने आणि मोठ्या आकाराच्या मोऱ्या ठेवल्या जात नाहीत. परिणामी भरावांचे रूपांतर छोट्या धरणात होते आणि त्यामध्ये पाणी साठून राहते. त्यामुळे पुराचा धोका असलेल्या सांगली - कोल्हापूरसारख्या भागात नवा महामार्ग तयार करताना नद्यांवरील रस्ता आणि पुलांचा काटेकोर आढावा घेऊन नद्यांचा प्रवाह खुंटणार नाही, याला प्राधान्य दिले पाहिजे. पुलांच्या पोहोच - भरावाऐवजी आरसीसी बॉक्स कल्व्हर्ट्सचा वापर केला तर पाण्याच्या प्रवाहाला कोठेही अडथळा येणार नाही.- प्रदीप पुरंदरे, जलनियोजन विषयाचे अभ्यासक

दिव्यमराठी भास्कर 23 Feb 2025 5:49 am

वेब वॉच:'मिसेस' हे ‘ती’च्या विदारक मनोवस्थेचे चकाचक रूप

ज्यो बेबी लिखित-दिग्दर्शित ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला ‘मिसेस’ अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. २०२१ मध्ये मूळ मल्याळी सिनेमा ‘प्राइम’वर आला होता, तर त्याचा रिमेक ‘झी फाइव्ह’वर प्रदर्शित झाला आहे. अर्थात, या दोन्हींचा विषय सारखाच असला, तरी त्यांच्या कथानकात आणि त्याच्या सादरीकरणात कमालीचे अंतर आहे. त्यामुळे ‘द ग्रेट इंडियन किचन’प्रमाणे ‘मिसेस’च्या नायिकेची मनोवस्था प्रेक्षकांना भिडत नाही. मूळ मल्याळी सिनेमातून स्वयंपाकघरात तासनतास राबणाऱ्या स्त्रियांची कुचंबणा दाखवली होती. त्या कथेच्या केंद्रस्थानी कुटुंबातील नवविवाहिता होती. व्हरांड्यात आरामखुर्चीवर वृत्तपत्र वाचत बसलेल्या सासऱ्याला टूथब्रश हातात आणून द्यावा लागणे, डायनिंग टेबलवर ताट मांडल्यावर पानात वाढल्याशिवाय न खाणारा सासरा आणि नवरा बघितल्यावर तिला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येते. मल्याळी सिनेमात संवाद खूप मोजके आहेत. इतके की आपल्याला नायिकेचे नावही समजत नाही. तिच्या रोजच्या कामातून कथानक उलगडत जाते आणि एका नृत्यकुशल, हुशार स्त्रीची स्वयंपाकघर आणि रोजच्या कामात कशी कुचंबणा होत आहे, हे लक्षात येते. कथानक पुढे सरकताना, सबरीमला आंदोलन, अय्यप्पा मंदिर आणि त्या अनुषंगिक परंपरा यांचा उल्लेख येत राहतो; पण ठोस विधाने, चटपटीत संवाद नसतानाही आपल्याला तिथल्या वास्तवाचे गांभीर्य समजते. निमिषा सजयन आणि सूरज वेंजरामोड्डू यांच्या नैसर्गिक अभिनयाने रोजचे प्रसंग जिवंत होतात. निमिषाच्या मनातले द्वंद्व, होणारी फरपट तिच्या कृतीतून आणि चेहऱ्यावरून जाणवत राहते. हिंदीमध्ये ‘मिसेस’ नावाने या सिनेमाचा रिमेक तयार करताना लेखक हरमन बावेजा आणि अनुसिंग चौधरी यांनी नवरा व सासरा या दोघांना डॉक्टर बनवले आहे. मूळ सिनेमात सासरा कर्मठ होता. हिंदीमध्ये त्याला डॉक्टर दाखवून लेखकाने नेमके काय साध्य केले आहे, कळत नाही. नववधूला मासिक पाळीच्या दिवसांत ‘बाहेर बसण्याची’ प्रथा या डॉक्टरांच्या घरातही पाळावी लागते, हे जरा विचित्र वाटते. मल्याळीमध्ये नायिकेला सतत स्वयंपाकघरात बघून प्रेक्षकांना काहीसा उबग येतो. पण हिंदीमध्ये मात्र, डिझायनर ड्रेस घालणारी सुंदर नायिका सासूकडून अनेक उत्तमोत्तम पदार्थ शिकून घेताना अशाप्रकारे दाखवली आहे की, नायिका आणि प्रेक्षकही स्वयंपाक बनवण्याची प्रक्रिया बघण्याचाच आनंद घेतात. स्वयंपाकघरात रोज दिवसभर काम करणाऱ्या नायिकेला उत्तमोत्तम ड्रेस परिधान करुन इतके सजवले आहे की, अशा उत्तम दृश्यांमुळे तिला होणारा मनःस्ताप प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही. ‘मिसेस’मधील नायिका नृत्याचा रियाज करण्याऐवजी नृत्य करताना दिसते. ती भरतनाट्यम किंवा कथक न शिकता बॉलिवूड डान्स करते. मल्याळी सिनेमाच्या सुरूवातीला नायिका नृत्याचा रियाज करताना दिसते. त्यातून तिचा नृत्याचा ध्यास जाणवतो. पण, हिंदीत सिनेमाची सुरूवातच नायिकेच्या बॉलीवूडछाप नृत्याने होते. मूळ सिनेमा एकूणच केरळची संस्कृती, तिथले निसर्गसौंदर्य, स्थानिक लोकांची मानसिकता निर्भीडपणे दाखवतो. ‘मिसेस’मध्ये तो आणि ती नेमके कोणत्या राज्याचे आहेत, हे कळत नाही. सासरच्या लोकांची जुनाट मते दाखवताना कोणत्याही संस्कृतीवर भाष्य वा टीका करणे हेतुपूर्वक टाळले आहे. त्यामुळे हिंदी सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक इतके कडेकडेने का पोहतात, हा प्रश्न पडतो. मूळ सिनेमात सलू थॉमस कॅमेरा यांचा बोलतो. नायिका सर्वांच्या पानातले खरकटे काढत असल्याचे बघताना आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, तर आपल्या घरातल्या स्त्रिया रोज हेच काम कसे करत असतील, असा विचार प्रेक्षकांच्या मनात येतो. बेडरूममध्येही स्त्रीला स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, नकाराधिकार वापरता येत नाही, हे दृश्य मूळ मल्याळी सिनेमामध्ये जितके प्रभावी झाले आहे, तितके हिंदी रिमेकमध्ये ते मनाला भिडत नाही. ‘मिसेस’च्या शेवटी नायिका नवऱ्याच्या कारची किल्ली घेऊन घर सोडते, तेव्हा आतमध्ये सासऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते. ती कार स्वत: चालवत माहेरी जाते आणि लगेच बॉलीवूडछाप नृत्य करते. ते नृत्य होताच तिला उदंड प्रतिसाद मिळतो. मूळ मल्याळी सिनेमाच्या शेवटी नायिकेच्या घरात पुरुषप्रधान कर्मकांड सुरू असते. ती घर सोडून रस्त्याने तडफेने चालू लागते, त्यावेळी पार्श्वभूमीवर घरातल्या बायका रोजची कामे करताना दिसतात. मुली घरकाम करताना आणि मुलं खेळताना दिसतात. काही स्त्रिया मंदिरात प्रवेश न मिळणे आणि रीतीरिवाज पाळण्याविरुद्ध निषेध करताना दिसतात. कालांतराने ती नृत्यामध्ये करिअर करताना जे नृत्य-नाट्य सादर होते, तेसुद्धा अर्थपूर्ण आहे. एकूणच, मूळ मल्याळी सिनेमा आणि त्याच्या हिंदी रिमेकमधील फरक जाणवण्यासारखा आहे. ‘मिसेस’ची नायिका सान्या मल्होत्राचा अभिनय उत्तम आहे. पण, दिग्दर्शकाने तिची व्यक्तिरेखा उजळवून दाखवण्याचा अनावश्यक प्रयत्न केल्याने सिनेमा अपेक्षित परिणाम साधत नाही. प्रतीक उत्पल यांचे कलादिग्दर्शन सिनेमा सुंदर आणि प्रेक्षणीय करण्यावर भर देते, जे या विषयाला अजिबात अनुरूप नाही. हिंदीवाले सिनेमा चकाचक करण्यावर भर देतात. त्या उलट मल्याळी दिग्दर्शक कथेचा विषय प्रभावीपणे पोहोचवण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे मल्याळी सिनेमे आशयघन ठरतात आणि त्यांचे हिंदी रिमेक केवळ प्रेक्षणीय होतात. (संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Feb 2025 5:43 am

वेध मुत्सद्देगिरीचा:गौरवशाली भविष्यासाठी... साद वैभवशाली इतिहासाची!

भारतीय जनमानसात सैन्य, पोलिस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तुलनेत राजनयिक अधिकारी आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीचे आकर्षण खूप कमी आहे. सामाजिक जीवनात अथवा चित्रपटांतून सुरक्षा दलांचे जवान, पोलिस, गुप्तचर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जसे ‘सिंघमत्व’ बहाल केले जाते, ते ‘सुख’ अपवादानेच अशा मुत्सद्द्यांच्या वाट्याला येते. जागतिक राजकारण आणि देशाचे परराष्ट्र धोरण हा जणू आपला प्रांतच नाही, अशा मानसिकतेत असणाऱ्या भारतीय समाजाकडून मुत्सद्द्यांच्या कामगिरीकडे होणारे दुर्लक्ष ही अतिशय खेदाची बाब आहे. भारतीय जनमानसाकडून होणारी मुत्सद्द्यांची ही उपेक्षा राजकीय विश्वातही जाणवते. अन्य देशांतही साधारण अशीच स्थिती असते. परराष्ट्र धोरणातील असामान्य कामगिरीचे श्रेय बहुतांश वेळा त्या देशाचे पंतप्रधान किंवा परराष्ट्रमंत्र्यांकडे जाते. या पार्श्वभूमीवर भारतातील अशा प्रतिभावंत मुत्सद्द्यांच्या असामान्य कामगिरीची ‘दिव्य मराठी’च्या वाचकांना ओळख व्हावी म्हणून या ‘वेध मुत्सद्देगिरीचा’ सदराचे प्रयोजन करण्यात आले. मुत्सद्द्यांचे जीवनचरित्र उलगडण्यापेक्षाही जागतिक राजकारण आणि परराष्ट्र धोरणात त्या त्या काळात निर्माण झालेले गुंते या मुत्सद्द्यांनी कसे सोडवले, हे वाचकांसमोर आणण्याचा उद्देश यामागे होता. जागतिक राजकारण आणि परराष्ट्र संबंध हा विषय तसा अत्यंत गुंतागुंतीचा. नेतृत्व, भौगोलिक रचना, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान, देशांतर्गत राजकारण, विविध संघटना, स्वतंत्र संस्था, पक्षीय पद्धती, लोकमानस या सर्वांमध्ये समन्वय साधत देशाला आपले धोरण पुढे रेटावे लागते. आपले इप्सित साध्य करण्यासाठी व्यक्तीमध्ये असतील नसतील त्या सर्व गुणांचा कल्पकतेने वापर करावा लागतो. मुत्सद्देगिरीची ही दुनिया महासागरासारखी खूप खोल असते आणि कितीही हातपाय मारले तरी इच्छितस्थळी पोहोचण्याची शाश्वती कमीच असते. परंतु, प्रयत्नांची कास सोडून चालत नाही. या क्षेत्रात एखाद्या गोष्टीच्या बाबतीत चूक की बरोबर, चांगले की वाईट असे कोणतेही परिमाण नसते. कायदा-सुव्यवस्था, न्याय, अधिकार, समानता या सगळ्या गोष्टी जणू काही कागदावरच असतात. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत मुत्सद्दी आपले कर्तव्य बजावत असतात. अशा राजनयिक धुरंधरांच्या कार्याचा, संघर्षाचा इतिहास जाणून घेणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहेच, पण देशाच्या भविष्यासाठी हा इतिहास सामान्य माणसांपर्यंत पोहोचणेही महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून आजपर्यंत असंख्य मुत्सद्द्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला आकार देण्याचे काम केले. या सदराच्या अनुषंगाने ज्यांच्या कार्याचा परामर्श घेता आला, त्यांचे कर्तृत्व पूर्णपणे शब्दांकित करणे अशक्यच होते. परंतु, ज्यांच्या कार्याचा असा परामर्श घेता आला नाही, अशा असंख्य मुत्सद्द्यांचे योगदानही शब्दांकित होण्याची इतिहास आतुरतेने वाट पाहात आहे. ब्रिटिश साम्राज्यात राहून, त्यांच्या व्यवस्थेचा भाग बनून प्रतिकूल परिस्थितीत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ब्रिटिशांना त्यांच्या साम्राज्यातील भारताचे स्थान आणि परदेशातील भारतीयांच्या अधिकारांचे रक्षण याची दखल घ्यायला लावणारे सत्येन्द्र प्रसन्न सिन्हा, स्वातंत्र्यानंतर परराष्ट्र धोरणाला आकार देणारे गिरीजा शंकर बाजपेयी, गांधीवादाची बीजे परराष्ट्र धोरणात रुजवणारे पास्कल अॅलन नझरेथ, मुत्सद्देगिरी म्हणजे निव्वळ शह-काटशह नव्हे, तर कला-संस्कृती-इतिहास यांना एकाच धाग्यात गुंफून समाजाला सर्जनशील बनवणे असा संदेश देणारे मदनजीत सिंग, १९९१ नंतरच्या जागतिक राजकारणातील बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास मदत करणारे ब्रिजेश मिश्रा ते भविष्यातील आपल्या परराष्ट्र धोरणासाठी दिशादर्शक कार्य उभारणारे शिवशंकर मेनन.. अशा अनेक मुत्सद्द्यांची गौरवशाली परंपरा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला लाभली आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा इतिहास हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा इतिहास आहे. आज जागतिक राजकारणात भारत अनेक नव्या क्षितिजांना स्पर्श करत आहे. भारताच्या या यशस्वी प्रवासात राजकीय नेते, वैज्ञानिक, संशोधक, कलाकार, खेळाडू, लेखक यांच्याइकतेच मुत्सद्द्यांचेही योगदान मोठे आहे, हे नाकारता येणार नाही. आपल्या देशाला भविष्यात ही वाटचाल अशीच ठेवायची असेल, तर नियोजनपूर्वक चांगले मुत्सद्दी घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतात सध्या मुत्सद्द्यांची मोठी कमतरता असून, देशाच्या परराष्ट्र सेवेत केवळ ८०० अधिकारी आहेत. याउलट ब्राझीलकडे १२००, तर चीनकडे ६००० मुत्सद्दी आहेत. जागतिक राजकारणाचा एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा डोलारा सांभाळण्यासाठी मुत्सद्देगिरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत या क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करावी लागेल. गौरवशाली भविष्य निर्माण करायचे असेल, तर वैभवशाली इतिहास ज्ञात असायलाच हवा. आता समारोप होत असलेले हे सदर म्हणजे त्या दृष्टीने पाऊल टाकण्यासाठी वाचकांना दिलेली आर्त सादच आहे! (संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Feb 2025 5:38 am

डायरीची पाने:सरवा

सरवा पाहण्याच्या निमित्तानं शेतात कामाची सवय लागली आणि नकळत मी एक शेतकरी झालो. आज कशाची कमी नाही. फक्त कमी आहे, तेव्हासारख्या आनंदाची. सुगी संपली, राने उलंगली की जनावरं मोकळी सोडली जातात. ही जनावरं शेतात पडलेला काडीकचरा खात, उन्हाच्या झळा सोसत, आपलं पोट जगवून दुपारच्या वेळी झाडाखाली रवंथ करत बसतात. त्याचवेळी या शेतात सुगी संपल्यावर राहिलेला दाणादुणा गोळा करण्याचं काम शेतमजूर स्त्रिया करत असतात. शेतातली कामं संपल्यामुळं त्या रिकाम्या असतात. घरात बसून काय करायचं? म्हणून त्या सुगी उलंगलेल्या शेतात चुकून राहिलेला दाणा-दुणा, कणीस-ओंबी गोळा करतात आणि थोडेफार धान्य साठवतात. याला ‘सरवा’ असं म्हटलं जातं. सुगी सरुन शेतात चुकून राहिलेला धान्याचा उरवा या अर्थाने सरवा हा शब्द तयार झाला असावा. माझ्या ‘पीकपाणी’ या पहिल्या कवितासंग्रहात हा शब्द मी वापरला आहे. म्हणजे त्या अर्थाची एक कविताच मी त्यात लिहिली आहे. रानात चुकून राहिलेल्या या दाण्यादुण्यावर आणि काडीकचऱ्यावर एकाच वेळी पक्षी-पाखरं, रानातली गुरं-जनावरं आणि गरजू-गरीब माणसं कसा दावा सांगत असतात, तो एकेक दाणा मिळवण्यासाठी कसा झगडा करीत असतात, त्यातून त्यांच्यात कसा संघर्ष निर्माण होतो, त्या संघर्षातून या जित्या जिवांची भुकेची शोकांतिका दिसत असते. ती त्या कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. ती कविता अशी... खळे दळे उरकले झाला कुणबी मोकळा चैती वहाटुळीसंगं उडू लागला पाचोळा। झाला कुणबी मोकळा मजुराला हावधाव काम नाही शेतामधी काय युगत करावं। पाहू लागल्या सरवा बाया रानोमाळ झाल्या उंदराच्या भोकाडात वंब्या उकरू लागल्या। वंब्यासंगं उंदराचे पिले उघडे पडले लोंबवित चोचीमधी वरी कावळे उडाले। उंदरीण रानोमाळ करू लागली ची ची ची आली घारीची झडप मिटविली तिची चुची। व्हल्या चिमण्या साळुंक्या दाण्यादाण्याला भिडल्या सरवा पाहणारनिनं माती फेकली उडाल्या। उमगल्या रानी ढोरं चरू लागले मोकळे लेकराच्या मुटकुळ्या झोंबू लागले कावळे। गेली कावळे हाणाया देला सरवा सोडून सरव्यात गेली गाय गेलं टोपलं मोडून। लहानपणी शेतात पाहिलेली ही दृश्ये मला आजही जशीच्या तशी दिसतात. त्यामुळंच मी ती कवितेत मांडू शकलो. ही कविता लिहूनही आता चाळीस वर्षे होत आली. पण तरीही ते दृश्य मला जसंच्या तसं दिसतं. कारण त्याची काळजावर उमटलेली प्रतिमा कधी मिटणार नाही. ती इतकी काळजावर उमटली, कारण या वरच्या दृश्याचा मीही एक भाग होतो, एक घटक होतो. शाळा संपलेली असायची. सुट्या लागलेल्या असायच्या. अशावेळी शेतात सरवा पाहण्याचं काम मीही करायचो. हा शेतातला एक एक दाणा, एकेक कणीस, एकेक ओंबी गोळा करून त्याचं धान्य जमवायचो. वेगळं ठेवायचो. आणि एक दिवस वडिलांना देऊन टाकायचो. वडील म्हणायचे, मी तुला याचे पैसे देईन. ते पैसे वडिलांकडंच ठेवायचे असत. पुढं कधीतरी मी एखादी वस्तू आणायला सांगितली की वडील ती आणून देत. कधी पैसे मागितले, तर मी आणायला सांगितलेल्या सगळ्या वस्तूंचा हिशेब सांगत आणि म्हणत, ‘तुझे माझ्याकडचे पैसे आता फिटले आहेत.’ मला तेव्हा वडिलांचा राग यायचा. पण, या चलाखीमागं असलेलं त्यांचं दारिद्र्य आज माझ्या लक्षात येतं. शेतकऱ्याला आपली मुलं कामाला लावायची असतील, तर त्यांना थोडीफार लालूच दाखवावी लागते. शाळा शिकून उरलेल्या वेळात मुलांनी शेतात काम करावं, आपल्या कामात त्यांची मदत व्हावी, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. पण, मुलं शाळेतून आल्यावर खेळण्याच्या मन:स्थितीत असतात, कंटाळलेली असतात. अशावेळी मारून, मुटकून त्यांना कामाला लावणारेही काही पालक असतात. पण, माझे वडील कधीच मारत नसत. ते गोड बोलून आमच्याकडून काम करून घेत. त्यातलाच हा प्रकार होता. शेतात काम करताना, ‘हे एवढं काम कर, मी तुला इतके पैसे देतो,’ असं ते म्हणायचे. प्रत्यक्षात काम संपल्यावर तसे पैसे ते कधीच देत नसत. ते आपल्याकडं जमा आहेत, असं सांगत. पाहिजे तर तू तुझा हिशोब ठेव, असंही म्हणत. मग त्यांचा-आमचा हिशेब कसा फिटला, तेही नीट समजावून सांगायचे. अर्थात, गरजेच्या वस्तूंची वडिलांनी आम्हाला कधीही कमी पडू दिली नाही. सुरूवातीच्या काळात त्यांचा आलेला राग मी आईजवळ बोलून दाखवायचो. पण, आई गोडीगुलाबीनं वडिलांचेच कसं योग्य आहे, ते समजून सांगायची. रडत असलेल्या माझं सांत्वन करायची. हा सरवा पाहण्याच्या निमित्तानं शेतात काम करण्याची सवय लागली आणि नकळत मी एक शेतकरी झालो. आज मला कशाचीही कमी नाही. फक्त कमी आहे, ती तेव्हासारख्या निरागस आनंदाची. त्या काळात पैशाची कमी होती. पण, आनंद भरपूर मिळायचा. पैसा उंबराच्या फुलासारखा कधीच न दिसणारा भासायचा. दिसला तर तो गाडीच्या चाकाएवढा मोठा वाटायचा. पैसा कधी आवश्यक वाटायचाच नाही. कारण आपण आपल्या हातानं काही विकत घेण्याची गरजच पडत नसे. त्यामुळे पैसा लागतो कशाला? असंही वाटायचं. जसा आम्ही सरवा पाहायचो तशीच बोंदरीही जमा करायचो. कापूस वेचणी संपली की रानात राहिलेल्या एकेका बोंडातला कापूस जमा करायचा आणि तो दुकानात नेऊन विकायचा. कापसाच्या वजनाइतकी साखर किंवा पेंडखजूर आम्हाला मिळायची. तो गोड पदार्थ खाऊन आम्ही खूप आनंदित राहायचो. कारण रोज गोड पदार्थ खायला मिळत नसे. असं कधीमधी मिळालं तर तो आनंद आवर्णनीय असे. स्वतःच्या कमाईने कमवलेल्या पैशातून अशी वस्तू विकत घेऊन खाताना आणखी अधिकचा काही आनंद त्यात मिसळत असावा. त्यामुळं ती पेंडखजूर, ती साखर गोडच गोड लागायची. तो गोडवा जसा मी विसरलेलो नाही, तशी सरव्याची गोडीही अजून सरलेली नाही. (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Feb 2025 5:32 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:जेव्हा दिव्याला लोकांनी ‘डुप्लिकेट’ मानले...

परवा, म्हणजे २५ फेब्रुवारीला दिव्या भारतीचा जन्मदिवस आहे. गेल्या आठवड्यात साजिद नाडियादवालाचा वाढदिवस होता, म्हणून मी त्याच्याविषयी लिहिले होते आणि या आठवड्यात दिव्याचा जन्मदिवस आहे. साजिदला मी भाऊ मानल्यामुळे एका अर्थाने दिव्या माझी वहिनी होती. पण, त्यापूर्वी म्हणजे लग्नाच्या आधीपासून ती मला राखी बांधायची. त्यामुळे अगोदर ती माझी बहीण होती. मनात तिच्याविषयीच्या खूप आठवणी आहेत. तसे पाहिले तर दिव्या स्टार होती; पण तिचे मन आणि बुद्धी एखाद्या लहान मुलासारखी होती. ती कधी कधी अशा गोष्टी करायची की, ही अगदी लहान, अल्लड मुलगी आहे, असे वाटायचे. आज तिचा असाच एक किस्सा सांगतो.माझ्या ‘वक्त हमारा है’ या सिनेमाचा मुहूर्त एसएनडीटी कॉलेजमध्ये होणार होता. दिव्या तिथे शुभेच्छा द्यायला आली आणि थोड्या वेळात लिंकिंग रोडवर जाऊन येते, असे सांगून निघून गेली. इकडे आम्ही शूटिंगमध्ये गुंतलो. अक्षयकुमार, पहलाज निहलानी, सुनील शेट्टी असे अनेक जण आले होते. गोविंदाही क्लॅप देण्यासाठी पाहुणा म्हणून हजर होता. साधारण दीड तासाने दिव्या दोन टी शर्ट घेऊन आली. एक माझ्यासाठी आणि दुसरा साजिदसाठी. ‘हे माझ्याकडून गिफ्ट’ असे म्हणत तिने पिशवी हातात दिली आणि जाणूनबुजून हात समोर धरून उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. मी तिच्या हाताच्या पंजाकडे पाहिले, तेव्हा जखम झाल्याचे दिसले. काय झाले? म्हणून विचारल्यावर तिने सांगितले, लिंकिंग रोडवर एका मुलाने मला मारले. हे ऐकून सगळ्यांना खूप राग आला. ‘मग त्या मुलाला का पकडले नाही?’ असे विचारल्यावर ती म्हणाली, त्या मुलाचे घर कुठे आहे, ते मी बघून आले आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांना जोर आला. म्हणाले, चला, जाऊन बघूया. पण, एखाद्या मुलीला कुणी मुलगा मारेल, ही गोष्ट माझ्या पचनी पडत नव्हती. तरीही ‘ठीक आहे, चला जाऊया..’ म्हणून मीही निघालो. दिव्याच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसलो, ती माझ्या शेजारी बसली. दोन गाड्या घेऊन आम्ही निघालो. लिंकिंग रोडवरुन आतमध्ये, डावीकडे वळत एका बिल्डिंगजवळ पोहोचलो. दिव्या म्हणाली, हीच बिल्डिंग आहे, इथे थांबा. आम्ही कंपाउंडमधून आत गेलो. दिव्या म्हणाली, ते बघा.. तो गोल टोपी घालून खेळतोय ना, त्या मुलाने मला मारलेय.. माझी नजर पुन्हा दिव्याच्या पंजाकडे गेली. मी तिला विचारले, तुझ्या हाताची कातडी कशी काय निघाली? तिने सांगितले की, मी या मुलाला पंच मारायला गेले, तेव्हा त्याने तोंड बाजूला घेतले. त्यामुळे या गेटच्या खांबावर माझा हात आदळला आणि सोलटून निघाला. बोलता बोलता तिच्या लक्षात आले की आपण भलतेच बोलून गेलो. मी तिच्याकडे पाहिले आणि म्हटले, तू पंच मारला, याचा अर्थ..? इतक्यात बाकीचे लोक त्या मुलाला घेऊन आले. तो १४- १५ वर्षांचा एक निरागस मुलगा होता. इतर मुलेही तिथे जमा झाली. मी त्या मुलाला ‘काय झाले होते?’ असे विचारले. त्याने सांगितले की, आम्ही इथे बॅडमिंटन खेळत होतो. यांनी आमच्या खेळाच्या मध्येच गाडी आणून लावली आणि लॉक करुन जाऊ लागल्या. आम्ही विचारले की, कुठे जाताय? आणि आमच्या बिल्डिंगमध्ये गाडी का लावताय? तर, बाहेर पार्किंगला जागा नाही, असे यांनी सांगितले. आम्ही म्हणालो, म्हणून काय तुम्ही कोणत्याही बिल्डिंगखाली गाडी लावणार का? तुमची गाडी इथून घेऊन जा. तरीही ऐकले नाही, म्हणून यांना थांबवले आणि सांगितले की, इथून गाडी घेऊन गेला नाहीत तर आम्ही सोसायटीकडे तक्रार करु, नाहीतर गाडीची हवा सोडू. मी असे म्हणताच यांनी मला ठोसा लगावला. मी बाजूला सरकलो अन् यांची मूठ भिंतीवर आदळली. मग यांनी माझे रॅकेट हिसकावले आणि बघा मला किती मारलेय ते.. असे सांगून तो मुलगा आपल्या अंगावरचे व्रण दाखवू लागला. हे ऐकून मी डोक्याला हात लावला. ज्या मुलाला अद्दल घडवायला गेलो होतो, त्याचीच माफी मागून परत आलो. यावरुन दिव्यासाठी मला कैफ भोपालींचा एक शेर आठवतोय... खेल यही खेला हमने लड़कपन से, जो भी मिला शीशा तोड़ दिया छन से। असेच एकेदिवशी साजिद आणि मी ऑफिसमध्ये बसलो होतो, तेव्हा ‘मला फॅशन स्ट्रीटवरुन कपडे घ्यायचेत,’ असे सांगून दिव्या बाहेर निघाली. लिंकिंग रोडवरही कपडे मिळतात, असे मी सांगितले. पण, मला टाउनमध्ये जायचंय, असे म्हणत ती निघून गेली. दुपारनंतर साजिदच्या ऑफिसात तिच्या ड्रायव्हरचा फोन आला की, मॅडम कारमधून उतरल्या आणि आज मला बसमधून जायची इच्छा झालीय म्हणत बसने निघून गेल्या. आम्ही त्याला म्हणालो, तू तरी परत ये. साजिद आणि मी विचारात पडलो की, ही कशी काय बसने यायला निघाली? कुणाशी वाद किंवा झगडा झाला नसेल? स्टार आहे, तिला सगळे ओळखतात.. त्याकाळी मोबाइल तर नव्हतेच. आम्ही हैराण झालो होतो. दोनेक तास झाले असतील. समोरच्या स्टॉपवर बसमधून उतरुन दिव्या हसत हसत येताना दिसली. ‘काय झाले?’ असे आम्ही विचारले तर म्हणाली, ‘काही नाही. मी तिथे विचारले की अंधेरीला कुठली बस जाईल? त्यांनी मला एका बसमध्ये बसवले. त्या बसने मी अंधेरी स्टेशनला उतरले. मी तिथे पुन्हा विचारले की चार बंगला वर्सोव्याला कुठली बस जाईल? त्यांनी सांगितलेल्या बसमध्ये बसले आणि इथे उतरले.’ लोकांनी तुला ओळखले नाही का? असे विचारल्यावर म्हणाली, ‘बसमध्ये काही लोक बोलत होते.. बघ, बघ.. दिव्या भारती. तर काही जण म्हणत होते.. ही दिव्या भारती असती तर बसमध्ये कशाला आली असती? मजेची गोष्ट म्हणजे, मी अंधेरीहून इकडे येतानाही माझ्या बाजूचे दोघे जण असेच बोलत होते. एक म्हणाला, ही दिव्या भारती वाटत नाही का? दुसरा म्हणाला, ही दिव्या असती तर बसमधून थोडीच फिरली असती? मग पहिला पुन्हा म्हणाला, याला म्हणतात नशिबाचे फेरे. चेहरा तिच्यासारखाच आहे, पण मात्र नशीब तसे नाही. ती कारमधून फिरतेय आणि ही बसमध्ये धक्के खातेय.. मी मनातल्या मनात हसत बसमधून उतरले. तर अशी होती दिव्या. आज तिच्या आठवणीत तिच्याच ‘दीवाना’ सिनेमातील हे गाणे ऐका... ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 23 Feb 2025 5:18 am

खलनिग्रहणाय:भावनिक प्रज्ञेमुळे घटतील गुन्हे

प्रत्येकाला स्वत:च्या भावनांची जाणीव असणे आणि त्यावर नियंत्रण मिळवता येणे महत्त्वाचे असते. आपल्या भावनांबद्दल जागरूकता आली की दुसऱ्यांच्याही भावना समजणे सोपे जाते. अशा जाणिवेतूनच भावनिक प्रज्ञा विकसित होते. लहानपणापासून ती निर्माण झाली, तर भविष्यात गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. महाराष्ट्राच्या कारागृह विभागाच्या प्रमुखपदी असताना २०१६ मध्ये मी नागपूर केंद्रीय कारागृहाला भेट दिली होती. तेव्हा मला तिथे अंदाजे २८ वर्षे वयाचा एक जन्मठेपेचा कैदी भेटला. तो उंचापुरा, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा होता. शिवाय, इंग्रजी उत्तम बोलत होता. चांगले पेंटिंग करायचा आणि गाणीही छान म्हणायचा. माहिती घेतली तेव्हा त्याची वर्तणूकही चांगली असल्याचे समजले. कारागृहाच्या कामातही तो बराच हातभार लावत होता. कमी शिकलेल्या अनेक कैद्यांना तो शिकवत होता. पॅरोल आणि फर्लोवर जाऊनही वेळेवर कारागृहात परत यायचा. त्याला पाहिल्यावर, त्याच्याविषयी ऐकल्यावर मला उत्सुकता निर्माण झाली. मी त्याला कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयात बोलावून घेतले. चौकशी केल्यावर त्याने शिक्षा होण्यामागची गोष्ट सांगितली. त्या आधीच्या पाच - सहा वर्षांपूर्वीची ती घटना होती. त्यावेळी तो ‘बीए’ करत होता. रोज संध्याकाळी घराजवळच्या मैदानावर क्रिकेट खेळायला जायचा. एके दिवशी खेळताना किरकोळ भांडण झाले आणि रागाच्या भरात याने त्या मुलाला बॅटने मारले. दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यू झाला. याच्यावर खुनाच्या गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. एका क्षणात त्याला राग आला आणि त्या क्षणानेच त्याचा सद्सदविवेक, त्याचे तारतम्य गमावले. त्याच्या हातातून एवढा मोठा गुन्हा घडला. या तरुणासारखे अनेक कैदी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. देशातील कारागृहांमध्ये सुमारे ९० टक्के असे कैदी आहेत, जे अट्टल किंवा सराईत गुन्हेगार नाहीत, तर ज्यांच्या हातून चुकून गुन्हा घडला आहे. कारागृहात पोषक वातावरण मिळाले, तर त्यांच्यात चांगली सुधारणा घडून येते. मनोविज्ञान सांगते की, अशा अचानक भावना उफाळून आल्या की बुद्धी काम करत नाही. भावना शांत झाल्यावर माणसाला पश्चाताप होतो. पण, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. उर्दूमध्ये एक सुंदर शेर आहे... ये जब्र भी देखा है तारीख़ की नज़रों ने, लम्हों ने ख़ता की थी सदियों ने सज़ा पाई। संतुलित आयुष्य जगण्यासाठी भावना आणि बुद्धीमध्ये समन्वय आवश्यक असतो. त्यासाठी भावनिकदृष्ट्या प्रज्ञावंत असणे महत्त्वाचे असते. डॅनियल गोलमनने ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या आपल्या पुस्तकात याची वैज्ञानिक व्याख्या दिली आहे. प्रत्येक माणूस प्रशिक्षणाद्वारे भावनिकदृष्ट्या प्रज्ञावंत बनू शकतो. याचा पहिला टप्पा म्हणजे स्व-जागरूकता. आपली भावना कशी आहे, याविषयी सर्वप्रथम माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाच्या भावनांचा एक पॅटर्न असतो. सातत्याने त्याच प्रकारच्या भावना उफाळून येतात. या भावनेबाबत जाणीव झाली की स्वनियंत्रण करणे आवश्यक असते. स्वनियंत्रण म्हणजे भावना उफाळून आल्यावरही बुद्धीचा तोल न जाऊ देणे. एकदा स्वत:च्या भावनांबद्दल अशी जागरूकता आली की, दुसऱ्यांच्याही भावना समजणे सोपे जाते. त्यामुळे इतर लोकांशी वागताना समतोल येतो आणि चांगले संबंध तयार होतात. अशी सामाजिक जाणीव तयार झाल्यावर सामाजिक कौशल्ये शिकता येऊ शकतात. सामाजिक कौशल्य हे वागणुकीचे असे तंत्र आहे, ज्याच्या माध्यमातून एक चांगले आयुष्य जगता येते. नियमित योगसाधनेमुळे भावनिक प्रज्ञा विकसित करता येते, असे भारतीय ज्ञान परंपरा सांगते. योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा या तीन गोष्टी अतिशय उपयुक्त आहेत. या योगक्रियांमुळे चांगल्या प्रकारे भावनिक बुद्धिमत्ता विकसित होते, हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. राज्याच्या कारागृह विभागाचा प्रमुख म्हणून काम करताना मी सर्व कारागृहांमध्ये योगसाधनेचे अनेक उपक्रम सुरू केले. योगतज्ज्ञांकडून प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले. याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. अनेक कैद्यांमधील चिडचिडपणा कमी झाला. त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही सुधारले. बरेचसे कैदी ध्यानधारणेमध्ये रमले. ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ हे कारागृह प्रशासनाचे ब्रीद यशस्वी होताना दिसले. बिहार स्कूल ऑफ योगाने त्या राज्यातील अनेक कारागृहांमध्ये कैद्यांना मोठ्या प्रमाणात योगसाधना शिकवली. त्यानंतर कैद्यांच्या एकंदरीत मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात चांगली सुधारणा झाल्याचे त्यांच्या सर्वेक्षणातून दिसून आले. अनेक देशांतील अतिसुरक्षित कारागृहांमध्येही कैद्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर बहुतांश कैद्यांची आक्रमकता कमी झाल्याचे दिसून आले. अनेक कैद्यांनी कारागृहातून बाहेर पडल्यावर गुन्हे करणार नाही असा संकल्प केला, तर बऱ्याच जणांनी कैदेतून मुक्त झाल्यावर योगशिक्षक बनण्याचा मनोदय व्यक्त केला.मी स्वत: ४५ वर्षांपासून योगाभ्यास करीत आहे. पोलिस खात्यात ३४ वर्षे काम केल्यानंतरही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य शाबूत राहिले, त्यामध्ये योगसाधनेचे मोठे योगदान आहे. मुलांची भावनिक प्रज्ञा विकसित व्हावी म्हणून परदेशात अनेक ठिकाणी लहानपणापासूनच त्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाते. खरे तर योगसाधना ही आपल्या देशाने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे आपल्याकडे योग्य नियोजन करून बालवाडीपासूनच मुलांना भावनिकदृष्ट्या प्रज्ञावान होण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. या प्रकारे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होण्याने भविष्यात गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. अलीकडे मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसनही वाढले आहे. त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठीही योगसाधना आणि भावनिक प्रज्ञेच्या प्रशिक्षणाचा मोठा लाभ होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत सरकार आणि सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Feb 2025 5:13 am

रसिक स्पेशल:सोशल मीडियावरचा वाह्यातपणा आणि आपण

अलाहाबादियाच्या प्रकरणात पूर्ण दोष त्याचा, त्या ‘शो’च्या संयोजकांचा आणि तो सादर करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आहेच. पण, आपणही कधी अंतर्मुख होणार की नाही? की वाह्यातपणा करणाऱ्यांनी करत राहावा, न्यायालयाने कान उपटावे, सरकारने कायदे करावे अन् आपण मात्र अशा गढूळ पाण्यात डुंबत राहावं? अलीकडं ‘सोशल मीडिया’ म्हणजेच समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेला लिखित किंवा दृकश्राव्य प्रकारचा आशय आणि त्यासंबंधीच्या निकषांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आहे. त्याच जोडीला, डिजिटल विश्वातील ‘इन्फ्ल्युएन्सर’ नावाची नवी जमात प्रचंड प्रभावी ठरत असल्याचंही ठळकपणे समोर येत आहे. या दोन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून एका शोमध्ये रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या अश्लाघ्य संभाषणामुळे देशभर संतापाची लाट उसळली. ‌अगदी सर्वोच्च न्यायालयालानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यावर खरमरीत टिप्पणी केली. त्यामुळं सोशल मीडियाचं आणि त्यावर होत असलेल्या गैरप्रकारांचं काय करायचं, हा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. पहिला मुद्दा सोशल मीडियाचा. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही यांसारख्या मुख्य माध्यमांच्या तुलनेत अलीकडे सोशल मीडिया विलक्षण लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे. प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाइल, स्वस्तातील इंटरनेट आणि नोबेल पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञांच्या मुलाखतींपासून ते अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदूंच्या कारनाम्यांपर्यंतचे सगळे प्रकार इथे उपलब्ध असतात. खरी करमणूक आणि ज्याला करमणूक का म्हणावं, असा प्रश्न पडावा अशा प्रकारच्या पाचकळपणात तर अख्खा देश बुडून गेला असल्याचं विदारक चित्र सतत डोळ्यासमोर येतं. साहजिकच या सोशल मीडियावर आपला जम बसवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी असंख्य लोकांची धडपड सुरू असते. त्यातूनच जन्मलेले ‘इन्फ्ल्युएन्सर’ आपल्या प्रेक्षकांनी चुकूनही दुसरीकडं जावू नये, यासाठी सतत निरनिराळ्या क्लुप्त्या करण्याच्या धडपडीत व्यग्र असतात. सध्या गाजत असलेला अलाहाबादियाचा प्रकार यातूनच घडला आहे. विशेष म्हणजे, संबंधित शोमध्ये करण्यात आलेली विधानं मूळची या इन्फ्ल्युएन्सरची नव्हती, तर ती त्याने एका विदेशी कार्यक्रमात ऐकून त्यांचा वापर आपल्याही कार्यक्रमातही करायचं ठरवलं होतं, याचे काही पुरावे समोर आले आहेत. म्हणजेच, ‘टीआरपी’सदृश लोकप्रियता मिळवत राहण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कुठलीही पातळी गाठली जाते, हे या निमित्तानं दिसून आलं. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा. अशी घटना घडल्यावर अनेक जण सोयिस्कररीत्या याचं खापर सरसकटपणे सोशल मीडियावर फोडून मोकळे होतात. खरं म्हणजे, यात सोशल मीडियाची चूक काय आणि किती आहे? हा एक खुला मंच आहे. तिथं कोण काय करेल, यावर या माध्यमाचं नियंत्रण नाही. एखादी घटना घडली किंवा तक्रार आली आणि त्यात तथ्य असूनही त्यासंबंधी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी काही केलं नाही, तर त्यांच्यावर ठपका ठेवणं बरोबर आहे. मुळात सोशल मीडिया हा वर्तमानपत्रासारखा नाही. उदाहरणार्थ, संबंधित कार्यक्रमात केलेली विधानं त्या माणसानं वर्तमानपत्रातल्या आपल्या एखाद्या लेखात लिहिली असती, तर त्या वर्तमानपत्राने ती छापली असती का? अजिबातच नाही. म्हणजेच वर्तमानपत्रे, ‘लाइव्ह’ नसलेले रेडिओ आणि टीव्हीचे कार्यक्रम याठिकाणी एक संपादकीय फळी असते. लोकांपर्यंत काय पोहोचवायचं आणि नाही, हे ठरवण्याचं तारतम्य त्यांच्याकडं असतं. याउलट एखादा आपल्या इन्स्टा अकाउंटवर किंवा यूट्यूब चॅनलवर काय करेल, यावर सोशल मीडिया नियंत्रण कसं ठेवणार? म्हणूनच आता आपण दुसरा मुद्दा विचारात घेतला, तर सोशल मीडिया कसा वापरायचा, याचं तारतम्य लोकांकडेच असलं पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये लहान मुलांवर सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतातही पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मीडिया अकाउंट वापरता येणार नाही, असा नियम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सगळं स्तुत्य आहेच; पण म्हणून आत्ता घडला तसा प्रकार पुन्हा घडणार नाही किंवा एकूणच सोशल मीडियावर एकदम जबाबदारीनं वागणारे लोक येतील, अशी आशा बाळगणं अक्षरश: दुधखुळेपणाचं ठरेल. उदाहरणार्थ, यूट्यूब आणि व्हॉट्स ॲ‍प यांवर मिळत असलेल्या ‘टिप्स’च्या आधारे शेअर बाजारात ‘गुंतवणूक’ करून हात पोळून घेणारे लोक आणि सतत नशा चढल्यासारखे सोशल मीडियाला चिकटलेले लोक यांना कोण शहाणं करणार? आणि कसं? म्हणजेच यामधला खरा मुद्दा तुमच्या-आमच्यासारख्या लोकांपर्यंतच येऊन ठेपतो. कुणी आजूबाजूला कचरा केला म्हणून त्याच्याशी काही संबंध नसताना आपण त्या माणसाच्या घरात जाऊन नंतर त्याविषयी तक्रार करण्यासारखा हा प्रकार आहे. त्या कचऱ्याकडं दुर्लक्ष करणं, हा त्यावरचा वैयक्तिक पातळीवरचा पहिला उपाय असतो. सोशल मीडियावरच्या अफाट कचऱ्याच्या बाबतीत आपण हेच म्हणू शकतो. अपवाद वगळता बहुतांश प्रमाणात आपल्यालाच या सगळ्याची चटक लागली आहे. आपल्याला सतत काहीतरी नवं, अचकट विचकट, ‘हटके’ हवं असतं. त्यातूनच आपण अशा नवनव्या ‘इन्फ्ल्युएन्सर’ना जन्माला घालतो आणि आहेत त्यांना फुगवत राहतो. त्यामुळं आपला ‘अटेन्शन स्पॅन’ अत्यंत कमी झाला आहे आणि तो आता १० ते ३० सेकंदांच्या रील्सपलीकडे जाऊ शकत नाही. एवढ्या अल्पकाळात जो आपल्याला हसवेल, आपली कसली का होईना; करमणूक करेल किंवा आपल्याला ‘व्हॉट्स ॲ‍प युनिव्हर्सिटी’चं बौद्धिक पाजेल, त्याचे आपण ‘फॉलोअर’ झालेलो असतो. अलाहाबादियाच्या प्रकरणातील दोष पूर्णपणे त्याचा, संबंधित शोच्या संयोजकांचा आणि तो सादर करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आहेच. पण, वेळोवळी घडणाऱ्या अशा प्रकारांचा सगळा दोष संबंधित ‘इन्फ्ल्युएन्सर’ आणि सोशल मीडियावर ढकलून मोकळं होताना आपणही जरा अंतर्मुख होणार की नाही? की वाह्यातपणा करणाऱ्यांनी तो करत राहावा, पोलिसांनी कारवाई करावी, न्यायालयाने कान उपटावे, सरकारने कायदे करावे आणि आपण मात्र अशा गढूळ पाण्यात डुंबत राहावं, असं आपल्याला वाटतंय? (संपर्कः akahate@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 23 Feb 2025 5:08 am

सूर्यप्रकाश अन् आर्थिक जोखीम:अर्थसंकल्पाच्या निर्णयांवर हवामानाचा प्रत्यक्ष परिणाम होतोय का, जाणून घ्या...!

देशाचा ताजा अर्थसंकल्प नुकताच सदर केला गेला आहे. त्याचा आर्थिक बाजारातील चढ-उतारावर काय परिणाम होतो, ते आपण वर्षभर बघणार आहोतच. याच विषयात एक नवीन आयाम समोर आलाय त्याची माहिती असावी म्हणून हा प्रपंच... आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करताना असे मानले जाते की, हवामान हा काही सहज बोलून सोडून देण्याचा नाही, तर त्यावर सखोल विचार करण्याचा विषय आहे. साधारपणे असे मानले जाते की, आर्थिक व्यवहार हे शेतीवर अथवा काही जागतिक घटनांवर आधारित असतात, परंतु आता आर्थिक निर्णयांवर हवामानाचा प्रत्यक्ष परिणाम होत असावा, असा विचार समोर आला आहे. असा परिणाम होतो असा युक्तिवाद करताना सिडनी आणि न्यूयॉर्क विद्यापीठ येतील अभ्यासकांनी आपल्या दोन वर्षांच्या अभ्यासाचा दाखला दिला आहे. या अभ्यासकांच्या मते सूर्य प्रकाशाच्या परिणामामुळे गुंतवणूक पर्यायांवर परिणाम होऊ शकतो आणि तो झाल्याचे आढळले आहे. प्रखर सूर्यप्रकाशाच्या या दिवसांना अभ्यासात ‘तेजस्वी’ दिवस असे नाव दिले गेले आहे. अभ्यासात असे दिसून आले की अशा ‘तेजस्वी’ दिवसात जोखीमेची कल्पना असेल तेथे आर्थिक व्यवहारात फारशी संधी घेतलेली नाही. मग प्रश्न असा येतो की सूर्यप्रकाशाचा परिणाम शेअर बाजारावर देखील होत असतो का? या अभ्यासात असे दिसले की प्रखर प्रकाश असेल तेव्हा लोक आपले अर्थकारण जोखमीत टाकतात आणि त्यामुळे आर्थिक बाजारावर ‘लक्षणीय’ परिणाम होतो. आश्चर्याची बाब अशीही समोर आली की, अशा तेजस्वी दिवशी जोखमी बद्दल अनभिज्ञ असूनही लोक अधिक संधी घेताना दिसले. या अभ्यासाच्या सह-लेखिका अग्निस्का तैमूला (अग्निशिखा असे नाव असू शकेल का) यांनी म्हटले आहे की, 'सर्वसाधारणपणे असे परिणाम प्रचंड नसले तरी त्यात सातत्य आहे, ते लक्षणीय आहेत आणि त्यात आर्थिक बाजारावर परिणाम करण्याची शक्ती आहे असे दिसते. इतकेच नव्हे तर प्रकाशाची तीव्रता अधिक असेल अशा दिवशी लोकांनी ‘वाईट’ निर्णय घेतलेले दिसले. आणि त्यांच्या पर्यायांमध्ये सातत्यही नव्हते.' हे निष्कर्ष नवीन असले तरी चित्तवेधक नक्कीच आहेत. त्यातच अशीही माहिती मिळते की आपल्या मेंदूचा जो भाग भूक, झोप अशा गोष्टींचे नियंत्रण करतो, तो भाग प्रकाशाच्या स्तराच्या बाबतीत डोळ्यांच्या माध्यमातून सतत माहिती मिळवीत असतो. झोपी जाण्याआगोदर मोबाइल अथवा संगणक पडदा बघण्यासाठी निळा रंग बाद करणारे चष्मे वापरावेत, असेही सांगितले जाते. सुप्रसिद्ध अशा वॉल स्ट्रीट जर्नलमधील 2015 सालच्या एका अभ्यासात असे म्हटले होते की, खराब हवामानामुळे काहीसे नैराश्य येऊ शकते आणि त्यामुळे बाजारातील धुरंधर सुद्धा विचलित होतात आणि आपले निर्णय खात्रीलायक माहिती मिळेपर्यंत स्थगित ठेवतात. या अभ्यासकांच्या मते ज्या परिणामांची त्यानी चर्चा केली आहे, ते परिणाम वैयक्तिक पातळीवर छोटे वाटत असले तरी त्याचा बाजारात प्रसार होत असेल तर परिमाण अधिक शक्तिमान असू शकतात, हेच मत बाजाराच्च्या चढ-उतारामध्ये सहभागी असणाऱ्या काही तज्ञांनी देखील व्यक्त केले. बाजारातील गुंतवणूकदारांचा विचार करताना अभ्यासकांनी त्यांच्या वयाचाही विचार केला गेला असून ते म्हणतात की वाढत्या वयाच्या लोकांवर प्रकाशाच्या तेजाचा परिणाम जोखीम घेण्यावर अधिक होताना दिसतो. वाढत्या वयात माणूस हवामानातील बदलामुळे स्वत:ला अधिक असुरक्षित समजतो असेही पुरावे आहेत. पीएलओएस वन या नियतकालिकात आपल्या अभ्यासाचे निष्कर्ष थोडक्यात मांडताना अभ्यासक म्हणतात की, अर्थकारणातील बाजारांमध्ये असलेली प्रकाश व्यवस्था या दृष्टीनेही तपासली जायला हवी जेणेकरून आपण बाजारात प्रकाशावर आधारित चैतन्य निर्माण करू शकू. (संपर्कासाठीः shyamtare@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 18 Feb 2025 4:14 pm

संडे पोएम:सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी; ऐका विंदांची कविता! VIDEO

दिव्य मराठी डिजिटलच्या संडे पोएम मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांची कविता, देणाऱ्याने देत जावे...आपल्या बालकवितेतून लहानग्यांना मंत्रमुग्ध करणारे विंदा मोठ्यांना अष्टदर्शने घडवितात. स्वेदगंगा, मृदगंधात तल्लीन करतात. सोबतच ललित, समीक्षा, अनुवाद असा सर्वत्र संचार करून आपल्या गारूडाने भुलवतात. विदांचे गाव कोकणातले. त्यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. मात्र, काव्यलेखनासाठी त्यांनी विंदा हे टोपण नाव धारण केले. त्याच नावाने ते परिचित झाले. विदांचे वडील विनायक करंदीकर पोंभुर्ल्यात रहायचे. त्यांचे शिक्षण कोल्हापुरात झाले. पेशाने ते प्राध्यापक. इंग्रजी शिकवायचे. केवळ लेखनासाठी त्यांनी निवृत्ती घेतलेली. विंदांचा प्रवास उजव्या बाजूचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते थेट डाव्यांचा मार्क्सवाद असा झालेला. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात उडी घेतली. त्यासाठी कारावास भोगला. साहित्य अकादमी ते ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारांसह अनेक मान सन्मान त्यांना लाभले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट्यांच्या सोबतीने त्यांनी महाराष्ट्रभर काव्य वाचनाचे कार्यक्रम केले. त्यांची कविता आजही भुरळ घालते. काव्यसंग्रह- स्वेदगंगा - मृद्‌गंध - धृपद - जातक - विरूपिका - अष्टदर्शने बालकविता संग्रह - राणीची बाग - एकदा काय झाले - सशाचे कान - एटू लोकांचा देश - परी गं परी - अजबखाना - सर्कसवाला - पिशीमावशी आणि तिची भुतावळ - अडम तडम - बागुलबोवा - टॉप - सात एके सात ललित निबंध - आकाशाचा अर्थ - करंदीकरांचे समग्र लघुनिबंध - स्पर्शाची पालवी समीक्षा - उद्गार - परंपरा आणि नवता इंग्रजी समीक्षा - अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज - लिटरेचर अ‍ॅज अ व्हायटल आर्ट अनुवाद - अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र - फाउस्ट - राजा लिअर संबंधित वृत्त संडे पोएम:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं; ऐका मंगेश पाडगावकरांची कविता संडे पोएम:अस्सल लाकूड, भक्कम गाठ, ताठर कणा, टणक पाठ; ऐका वसंत बापट यांची कविता बाभूळझाड! संडे पोएम:ऐका, सत्तेत जीव रमत नाही म्हणत एका ज्वालामुखीची, निर्वाणाअगोदरची पीडा सांगणारी नामदेव ढसाळ यांची कविता संडे पोएम:ऐका, कवी ना. धों. महानोर यांची कविता - एकदा आई गाणं म्हणाली काळीज कापणारं... संडे पोएम:काव्याच्या अद्भूत जगाची सफर घडविणाऱ्या पहिल्या भागात ऐका, दत्ता हलसगीकरांची 22 भाषांमध्ये अनुवादित कविता!​​​​​​

दिव्यमराठी भास्कर 16 Feb 2025 5:23 am

कव्हर स्टोरी:अंधाराला दूर सारत... पूर्वेला होतोय नवा सूर्योदय!

गडचिरोली... हे नाव घेताच एकेकाळी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याच नव्हे, तर सामान्य माणसाच्याही अंगावर काटा यायचा. कारणही तसेच होते. राज्याच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेला, जंगलांनी वेढलेला अत्यंत दुर्गम भाग.. सामान्य सोयी-सुविधांचीही वानवा आणि नक्षलवाद्यांकडून सतत होणारे हल्ले.. पण, आता हे भयाण, भयग्रस्ततेचं चित्र बदलतंय... इथल्या नक्षलवादाचा पाया खचला आहे. नक्षल्यांबद्दल तिरस्कार आणि सरकारी यंत्रणांविषयी विश्वास वाढल्याने स्थानिक तरुणांना उज्ज्वल भविष्याची आस लागली आहे. लोहखनिजाने समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात पोलाद निर्मितीचे प्रकल्प उभे राहात आहेत. अन्याय, अत्याचार, अज्ञान अन् अविकसिततेचा अंधार दूर सारत महाराष्ट्राच्या पूर्वेला नवा सूर्य उगवतोय... गडचिरोली जिल्ह्याचे प्राक्तन एकेकाळी पूर्णपणे अंधारलेले होते. तिथे केवळ माओवादी नक्षल्यांची दहशत होती. असं म्हटलं जायचं की, पानगळीच्या दिवसात झाडावरचं सुकलेलं पानही नक्षल्यांच्या परवानगीशिवाय खाली पडत नसे. पोलिस नक्षल्यांसमोर फारसे कधी येत नव्हते. त्यामुळं खाकी गणवेश म्हणजे वन खाते अशीच अनेक वर्षे धारणा बनली होती. बहुतांश वेळा थेट अन् प्रसंगी छुपे हल्ले करुन हे नक्षली मोठा विद्ध्वंस घडवायचे. गावांमध्ये जावून जलसा करायचे. जल, जंगल, जमिनीवर आदिवासींचा अधिकार असल्याचे त्यांच्यावर बिंबवून हिंसेला पाठबळ मिळवायचे. जन्मापासून मृत्यूपर्यंत गावाबाहेरचे जगही न पाहिलेल्या आदिवासींना हे नक्षली म्हणजे देवानं धाडलेली माणसं वाटू लागली होती. दहशतीचा भूतकाळ... या भागात वन खाते वगळता अन्य सरकारी खात्याचे फारसे अस्तित्व दिसत नव्हते. शासकीय यंत्रणा गावांमध्ये पाेहोचल्या नव्हत्या. त्या पोहोचल्या असत्या तर कदाचित नक्षलवाद फोफवायला इतकी सुपीक जमीन मिळालीही नसती. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ‘टार्गेट किलिंग’ करत केवळ पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयाने कित्येक निष्पाप आदिवासींची हत्या केली. सरकार विकास करत नाही असा ठपका ठेवत, भूसुरूंगांनी घातपात घडवून प्रत्यक्षात कुठेही विकासाची कामे होणार नाहीत, याची खबरदारी ते घ्यायचे. या भागातून महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगडच्या सीमावर्ती क्षेत्रावर नजर ठेवत शक्य तिथे थेट हल्ले करणे, यंत्रसामग्री जाळून टाकणे, स्फोटात वाहने उडवणे, कामांवरच्या मजुरांची हत्या करणे असा नक्षली उच्छाद नित्याचाच झाला होता. परिणामी या भागात काम करायला कोणी धजावत नव्हते. ‘पनिशमेंट’चं दुसरं नाव नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात वा घातपातात पोलिस आणि ‘सी-६०’चे जवान शहीद होत होते. २००९ मध्ये पोलिस मदत केंद्र ग्यारापत्ती येथे सशस्त्र जवान पॅट्रोलिंगसाठी गेले असताना मरकेगावच्या जंगलात नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ जवान, तर २१ मे २००९ ला धानोरा पोलिस ठाण्याचे जवान पॅट्रोलिंग करीत असताना १५० ते २०० नक्षल्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात २ पोलिस अधिकारी आणि १४ जवानांसह १६ जण शहीद झाले होते. ८ आॅक्टोबर २००९ या दिवशीच्या हल्ल्यात १७ आणि २७ मार्च २०१२ च्या घातपातात १३ जवान वीरगतीला प्राप्त झाले. २०१९ च्या महाराष्ट्र दिनी नक्षल्यांनी ‘सी-६०’ पथकाची गाडी आयईडी स्फोटात उडवली. त्यात पथकातील १६ जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाले. अशा प्रकारच्या घटनांमुळे गडचिरोली जिल्ह्यावर सतत भीती आणि दहशतीचे सावट पसरले होते. परिणामी पोलिस दलासह अन्य सरकारी खात्यांमध्ये ‘गडचिरोलीला बदली’ हा ‘पनिशमेंट पोस्टिंग’साठी परवलीचा शब्दप्रयोग बनला. बदलते वर्तमान... गेल्या काही वर्षांतील पोलिस आणि सुरक्षा दलांच्या कारवायांमुळे, विशेषत: महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त मोहिमांमुळे नक्षल चळवळीचा मध्य भारतातील कणा मोडला आहे. २२ एप्रिल २०१८ ला सर्च आॅपरेशनदरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात ३४ नक्षली ठार झाले आणि तिथूनच या चळवळीचा पाया हलला. मधल्या काळात चकमकीत पाच - सहा नक्षली मारले जात होते. पुढे २१ मे २०२१ ला पोलिसांच्या गोळीबारात १३ आणि त्याच वर्षी १३ नोव्हेंबरला २७ नक्षली ठार झाले. गेल्या वर्षी १७ जुलैच्या चकमकीत १२ नक्षली मारले गेले. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादा संपवण्याचे ध्येय ठेवून सर्व संबंधित राज्यांची पोलिस दले आणि विशेष दलांना सक्रिय केल्यानंतर या वर्षभरात झालेल्या चकमकींमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षली मारले गेले. नक्षलवादविरोधी अभियानाच्या आक्रमक मोहिमांमुळे ‘नक्षल दलम’ संपण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी १५ दलम होते, त्यातील ११ पूर्णपणे संपले असून, दक्षिण गडचिरोलीत ४ दलम उरले आहेत. नक्षली चळवळीच्या केंद्रीय समिती सदस्यापासून ते कमांडरपर्यंत एकूण ३३६ नक्षली आजवर चकमकींमध्ये ठार झाले आहेत, तर ६९५ शरण आले आहेत. सध्या दक्षिण गडचिरोलीत ४६ नक्षली उरले आहेत. शांततेने जगायचे की पोलिसांच्या गाेळीने मरायचे, यापैकी एकच पर्याय उरल्याने अनेक नक्षली आत्मसमर्पण करत आहेत. अर्थात, चकमकीत मारले जाण्याच्या भीतीप्रमाणेच वाढते वय, दुर्धर आजार, उपचारांचा अभाव आणि ही चळवळ चालवणाऱ्या माओवादी संघटनेकडे त्यासाठीच्या सुविधा, साधनसामग्री नसणे, हेही त्यामागचे प्रमुख कारण आहे. विश्वासाची वाट एकीकडे नक्षल्यांच्या बीमोडासाठी धडक कारवाया करतानाच, सरकारी यंत्रणांनी स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याला प्राधान्य दिले आहे. सोबतच दुर्गम भागात विकासकामे, कल्याणकारी योजना पोहोचवण्यात येत आहेत. आत्मसमर्पण केलेल्यांना विविध सोयीसुविधा आणि त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिणामी नव्याने नक्षल भरतीही होत नाही. आता नक्षल्यांचा प्रभाव असलेल्या अतिदुर्गम भागात पोलिस मदत केंद्र उभारली जात आहेत. रस्ते, पाणी, वीज, बोअरवेल आदी सुविधा दिल्या जात आहेत. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आणि घनदाट जंगलातील नेलगुंडा हे गाव नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानले जायचे. तिथे आजवर कुठल्याच सरकारी विभागाचे अस्तित्व नव्हते. पोलिस आणि सुरक्षा दलही जात नव्हते. तिथे अवघ्या एका दिवसात पोलिस चौकी उभारण्यात आली. नेलगुंडासह मन्नेराजाराम, पीपली बुर्गी, वांगेतुरी, गर्देवाडा आणि पेनगुंडा येथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आश्वासक भविष्य... गडचिरोली हा राज्यातील शेवटचा जिल्हा मानला जायचा. त्याची ‘मागास’ आणि ‘नक्षलग्रस्त’ ही ओळख बदलण्याचा निश्चय करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे पालकत्व स्वत:कडे घेतले आहे. इथे नवीन एअर पोर्ट सुरू होणार असून, त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. या भागात जलवाहतूक सुरू करण्यासाठीही सर्वेक्षण होत आहे. स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास १५ गावांना पहिल्यांदाच एसटी बस मिळाली. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी या सेवेचे उद्घाटन केले. ‘पोलादी’ भवितव्याकडे गडचिरोलीतील लोह खनिजाचा ग्रेड ६४ टक्के असल्याने भविष्यात इथे मोठ्या प्रमाणात पोलाद उत्पादन सुरू होईल. या क्षेत्रात काही वर्षांत टप्प्याटप्प्याने सुमारे २५ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, नव्या उद्योगांतून हजारो स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. लाॅयड मेटल्स कंपनीला गडचिरोलीत ३४० हेक्टर लोह खनिजाचा पट्टा ३० वर्षांच्या लीजवर मिळाला आहे. या खनिजापासून पोलाद उत्पादन करण्यासाठी कंपनी प्रारंभी ५ हजार कोटी रुपये गुंतवत आहे. त्यातून १० हजार रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. दोन वर्षांत ही गुंतवणूक २० हजार कोटींपर्यंत वाढेल आणि २० हजार रोजगार निर्माण होतील, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्णन प्रभाकरन यांनी सांगितले. कंपनीने कामगारांना तब्बल एक हजार कोटी रुपयांचे शेअर दिले आहेत. विशेष म्हणजे, या कामगारांमध्ये ४७ आत्मसमर्पित नक्षल्यांचाही समावेश आहे. जेएसडब्ल्यू समूहानेही नुकतेच दाओस येथे गडचिरोलीतील तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले. समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी नागपुरात बोलताना, ‘भविष्यात गडचिरोली पोलादाचे भाव ठरवेल,’ असे सांगितले. तिथे उभारण्यात येणाऱ्या वार्षिक २५ दशलक्ष टन उत्पादन क्षमतेच्या स्टील प्लँटमुळे स्थानिकांना रोजगार मिळण्यासोबत या भागाचा चेहरामोहराही बदलेल, असे ते म्हणाले. त्याशिवाय, कल्याणी समूहही जिल्ह्यात पोलाद आणि संरक्षण क्षेत्रामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करत आहे. या उद्योगामुळे ४ हजार रोजगार निर्माण होतील. गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण, सौरऊर्जा प्रकल्प उभे राहणार आहेत. ‘गडचिरोली’ हे नाव घेताच एकेकाळी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याच नव्हे, तर सामान्य माणसाच्याही अंगावर काटा यायचा. कारणही तसेच होते. राज्याच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेला, जंगलांनी वेढलेला अत्यंत दुर्गम भाग.. सामान्य सोयी-सुविधांचीही वानवा आणि नक्षलवाद्यांकडून सतत होणारे हल्ले.. पण, आता हे भयाण, भयग्रस्ततेचं चित्र बदलतंय. इथल्या नक्षलवादाचा पाया पुरता खचला आहे. नक्षल्यांबद्दल तिरस्कार आणि सरकारी यंत्रणांविषयी विश्वास वाढल्याने स्थानिक तरुणांना उज्ज्वल भविष्याची आस लागली आहे. लोहखनिजाने समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात पोलाद निर्मितीचे प्रकल्प उभे राहात आहेत. वर्षानुवर्षांचा अन्याय, अत्याचार, अज्ञान अन् अविकसिततेचा अंधार दूर सारत महाराष्ट्राच्या पूर्वेला नवा सूर्य उगवतोय! नक्षली दहशत संपवणारी ‘टीम गडचिरोली’ गडचिरोलीतील नक्षली दहशतीचा बीमोड करुन वातावरण बदलवण्यात पोलिस दलाचे योगदान उल्लेखनीय आहे. पोलिसांच्या सातत्यपूर्ण सांघिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. नक्षलवादविरोधी अभियानाचे महानिरीक्षक संदीप पाटील पोलिस दलाच्या या टीमचे कॅप्टन आहेत. गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांचा समावेश असलेल्या या तगड्या टीमने एकीकडे नक्षल्यांच्या उरात धडकी भरवत त्यांचा खातमा करतानाच, दुसरीकडे स्थानिक आदिवासींमध्ये विश्वास आणि आपुलकीची भावना निर्माण करण्यात यश मिळवले. (संपर्कः atul.pethkar@dbcorp.in)

दिव्यमराठी भास्कर 16 Feb 2025 4:52 am

देश - परदेश:जगावेगळा शिक्षक

जो. म. साळुंखे सरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात स्वप्नांची पेरणी करणे, त्यांच्यात ध्येयवाद चेतवणे. त्यासाठी आमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचे काम त्यांनी हाती घेतले. सरांची ही पुण्याई म्हणून ग्रामीण भागातून आलेल्या अशा सुविद्य विद्यार्थ्यांचे मळे आज महाराष्ट्राला संपन्न करताहेत. गेल्या महिन्यातील घटना. १९ जानेवारीला आमच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या वार्षिक मेळाव्यात सरांनी हजेरी लावली. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत त्यांनी कधीही हा मेळावा चुकवला नाही. आता त्यांचे वय ९२ वर्षे झाले. दोनेक महिन्यांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटकाही आला होता. पण, विद्यार्थ्यांचा मेळावा आणि सर येणार नाहीत, हे शक्य आहे का? आम्हालाच शंका होती, पण सरांना अजिबात नव्हती. त्या दिवशी सर नेहमीपेक्षा खूप लवकर उठून, आंघोळ वगैरे आटोपून तयार झाले आणि ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास आधीच दरवाजाजवळ बसून न्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाट बघत राहिले. इतकेच काय, सभागृहात आल्यावरही ते बोलतील की नाही, असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात होता. खरं तर या आजारानंतर त्यांना थकवा आला होता. त्यामुळे त्यांनी भाषण करू नये, असंही अनेकांना वाटत होतं. पण, कार्यक्रमाला येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार नाहीत, तर ते साळुंखे सर कसले? तशाही अवस्थेत ते १० मिनिटे बोलले. तोच स्पष्ट आणि खणखणीत आवाज, तीच अधिकारवाणी, तीच विद्यार्थ्यांविषयीची आपुलकी आणि तेच प्रेम. त्यांनी शाळेच्या आजवरच्या प्रगतीचा आलेख घेतला. अडचणींविषयी मार्गदर्शन केले. ‘तुम्ही सर्व शेतकऱ्यांची शिकली-सवरलेली मुलं आहात. पण, पूर्वार्जित शेतजमिनी विकू नका,’ असा आगळावेगळा सल्ला दिला. आणि शेवटी ‘तुमच्याबरोबरचा अशा प्रकारचा हा माझा अखेरचा संवाद आहे..’ असेही सांगायला विसरले नाहीत. आमच्यापैकी कुणालाच त्यांचे हे विधान आवडले नाही. मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकली. आणि तो संशय खरा ठरला. केवळ चार दिवसांनंतर, म्हणजे २२ जानेवारीला सरांची प्राणज्योत मालवली. जो. म. साळुंखे सर हे कोल्हापुरातील आमच्या जि. प. च्या विद्यानिकेतन शाळेचे प्राचार्य. शालेय जीवनातील ६-७ वर्षे त्यांच्या अद्वितीय छत्राखाली घालवली. पण, त्यानंतरही गेली ५० वर्षे ते शिक्षकाच्या त्याच भूमिकेत होते आणि आम्हीही विद्यार्थ्याच्याच भूमिकेत त्यांच्या कृपाछत्राखाली राहिलो. आमचा संपर्क तुटला नाही, त्यांनीही तो तुटू दिला नाही. किंबहुना त्यांच्याबरोबरच शाळेतील आजी-माजी शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद कायमचा घट्ट राहावा, हाच त्यांचा सतत प्रयत्न राहिला. विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रचंड सन्मान आणि प्रेम दिले. आमची शाळा एका आदर्शवादापोटी तत्कालीन राजकीय नेत्याने सुरू केली होती. त्यात बाळासाहेब देसाई, मधुकरराव चौधरी यांच्यासारखे मोठे नेते आणि जिल्हा पातळीवरचे जि. प. चे अध्यक्ष दिनकरराव यादव, उपाध्यक्ष बाळासाहेब माने यांचा समावेश होता. ग्रामीण भागातील गुणी मुलं संधीअभावी मागे राहू नयेत आणि पुढे भविष्यात या मुलांनी राष्ट्रबांधणीत प्रशासक म्हणून भूमिका करावी, अशा दुहेरी उद्देशाने ही शाळा सुरू करण्यात आली होती. पाचवी ते अकरावीपर्यंतचे (तत्कालीन मॅट्रिक) विद्यार्थी या निवासी शाळेत राहात होते. या शाळेची आमची पहिली बॅच आणि ‘जो. म.’ सर प्राचार्य. एका उत्तम शिक्षकाच्या सगळ्या गुणांचा संगम सरांमध्ये झाला होता. बघता बघता त्यांनी एकापेक्षा एक नवे उपक्रम सुरू केले. प्रत्येक मुलाच्या गुणावगुणांची त्यांना अचूक ओळख होती. ते प्रत्येकाला नावाने ओळखत होतेच; पण सभागृहातील कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्याकडे न पाहता ते केवळ आवाजावरुन ओळखत. पहाटेची पी. टी. कोण चुकवतो? कुणाची नखे वाढलेली आहेत? कुणाच्या केसांची लांबी तीन इंचांपेक्षा जास्त आहे? कोण प्रार्थनेला उशिराने येतो? आणि कुणाला फ्रुट सॅलड, मटण आवडते? अशा अनेक बारीकसारीक गोष्टीही त्यांना माहीत असत. या झाल्या लहानसहान गोष्टी. ‘जो. म.’ सरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात स्वप्नांची पेरणी करणे, त्यांच्यात ध्येयवाद चेतवणे. त्यासाठी आमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचे काम त्यांनी हाती घेतले. वृत्तपत्रांच्या वाचनाची सवय लावली. सायंप्रार्थनेच्या वेळी आम्ही सारे जमलेलो असताना ते कुणालाही ‘आजची बातमी सांग,’ असा आदेश द्यायचे. त्यात अनेकांचे अवसान गळायचे. काही विद्यार्थी मनातल्या मनात तत्काळ तयार केलेल्या ‘रस्ता अपघातात दोन ठार’ वगैरे बातम्या सांगायचे. पण, ते सहज पकडले जायचे. सरांचा त्यानंतरचा आवडता उपक्रम म्हणजे ‘आक्स एनी क्वेश्चन.’ त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. शाळेत दररोज ज्ञानेश्वरीचे वाचन व्हायचे आणि गीता पठणामध्ये शाळा सातत्याने बक्षिसे मिळवायची. वक्तृत्व, वादविवाद यांमध्ये प्रवीण असे शाळेचे विद्यार्थी सगळीकडे चमकत राहिले. मुलांमधील संगीत, कला-क्रीडा गुण वाढवतानाच सरांनी सर्वांना नदीत पोहायलाही शिकवले. ‘जो. म.’ सर हे खऱ्या अर्थाने ‘जोम’ आणि उत्साहाचे प्रतीक होते. मी घडलो ते या शिक्षकांमुळेच. मी आठवीत असतानाच, ‘अकरावीच्या परीक्षेत संस्कृतला पहिला येऊन ‘जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती’ तुझ्या माध्यमातून शाळेला मिळाली पाहिजे,’ असे लक्ष्य ठेऊन सरांनी ते साध्य करवूनही घेतले. आपल्या शाळेतील विद्यार्थी ‘आयएएस’ झाला पाहिजे, अशी आदेशवजा कार्यसूची त्यांनी दिल्यामुळेच मी भारतीय परराष्ट्र सेवेत आलो. आज शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर तर आहेतच; पण अनेक जण जिल्हाधिकारी झाले आहेत, बरेच विदेशातही गेले आहेत आणि अधिकारीपदावर काम करत आहेत. सरांची पुण्याई म्हणून ग्रामीण भागातून आलेल्या अशा सुविद्य विद्यार्थ्यांचे मळे महाराष्ट्राला संपन्न करताहेत. आणि हीच त्यांना सर्वोत्तम श्रद्धांजली! (संपर्कः dmulay58@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Feb 2025 4:48 am

माझ्या हिश्श्याचे किस्से:रिकाम्या खिशाने फाइव्ह स्टार हॉटेलात गेलो

आज मी अशा व्यक्तीबद्दल लिहिणार आहे, जो माझ्यासाठी मित्राच्या रूपातील भाऊ आणि भावाच्या जागी असलेला मित्र आहे. १८ तारखेला त्याचा वाढदिवस आहे. होय, हा मित्र आहे साजिद नाडियादवाला. ज्या दिवशी साजिदने आपल्या काकांकडील काम सोडून सिनेनिर्माता व्हायचे ठरवले, त्या दिवसापासून तो माझा मित्र आहे. त्याला भाऊ संबोधणे अधिक उचित होईल, कारण साजिदच्या आईनेही मला आपला मुलगा मानले, आईचे प्रेम दिले. त्याची बहीण ही माझी बहीण, त्याचे मामा, आजी-आजोबा हे माझेही मामा आणि आजी-आजोबा. मुंबईत आल्यावर मी कुटुंबापासून दुरावलो होतो. पण, एका अर्थाने साजिदसोबत मला एक संपूर्ण कुटुंबच मिळाले. जवळपास ६ - ७ वर्षे आम्ही दोघे २४ तास एकमेकांबरोबरच राहिलो. सिनेमे, कथानके, भूमिका, शायरी अशा गोष्टींवर खूप गप्पा मारायचो. किती तरी वेळा आम्ही दोन-तीन दिवस घराच्या बाहेरही पडायचो नाही, पण एकमेकांच्या सोबतीत कधीही आम्हाला बोअर व्हायचे नाही. इंडस्ट्रीत साजिदला त्याच्या आजोबांमुळे, वडिलांमुळे आणि नाडियादवाला या आडनावामुळे खूप मान होता. पण, इंडस्ट्रीत स्वत:च्या ताकदीवर आपले स्थान, आपले ध्येय प्राप्त करायचा निर्धार त्याने केला होता. कुणा नातेवाईकाच्या मदतीशिवाय इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करायची, हे त्याने मनाशी ठरवले होते. सुरुवातीपासून तो भव्य-दिव्य विचार करायचा. २१-२२ व्या वर्षी त्याने त्या काळातील सर्वांत मोठी स्टार कास्ट उभी केली होती. धरमजी खूप मोठे आणि तितकेच व्यग्र अभिनेते होते. त्यांना त्याने साइन केले. गोविंदा तर शूटिंगलाही काही तासांसाठी यायचा, त्यादरम्यान कारमध्येच झोप घ्यायचा. त्या काळी त्याला साइन करणे तर दूरच, त्याची भेट होणेही कठीण होते. पण, साजिदने गोविंदालाही साइन केले. त्याशिवाय किमी काटकर, मौसमी चटर्जी, परेश रावल, अर्चना पूरणसिंग, रजा मुराद, शक्ती कपूर, नीना गुप्ता असे त्यावेळचे जवळपास २५ मोठे कलाकार यामध्ये घेतले होते. या सिनेमाचे नाव होते- ‘जुल्म की हुकूमत’. सिनेमासाठी व्हाइस ओव्हरही अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड केला. आम्ही दोघांनी मिळून एवढी प्रदीर्घ वाटचाल केली आहे की, सदराच्या एका भागात ती सामावणे कठीण आहे. आमचे खूप किस्से आहेत. त्यातील एक इथे सांगतो. त्याकाळी आम्ही हलाखीतून मार्ग काढत होतो. खूप भूक लागली म्हणून आम्ही हॉटेल हॉलिडे इनमध्ये जेवायला गेलो. जेवणाची ऑर्डर दिल्यावर साजिद म्हणाला, ‘बिल तुला द्यावे लागेल, माझ्याकडे पैसे नाहीत.’ मी म्हणालो, ‘तुलाच द्यावे लागेल, माझ्याकडेही पैसे नाहीत.’ साजिदला वाटले, मी खोटे बोलतोय आणि मला वाटले की तो खोटे बोलतोय. जेवण आले, आम्ही ते संपवले. बिल आले तेव्हा लक्षात आले की आम्ही दोघेही खरे बोलत होतो. दोघांचेही खिसे रिकामे होते, कुणाकडेच पैसे नव्हते. आता काय करायचं, अशा विचारात बसून राहिलो. वेटर समोर येऊन उभा राहिला. मग त्याला आम्ही ‘गोड काय आहे?’ विचारले. त्याने सांगितल्यावर आम्ही गोड पदार्थाचीही ऑर्डर दिली. टाइमपास करण्याच्या नादात बिल आणखी वाढले. त्यावेळी मोबाइल तर नव्हतेच. साजिदने काउंटरवरच्या फोनवरुन आपल्या एका मित्राला कॉल केला. नशिबाने तो फोनवर भेटला आणि त्याच्याकडे पैसेही होते. तो पैसे घेऊन हॉटेलवर येईपर्यंत त्याची वाट बघण्यात आम्ही कॉफीचीही ऑर्डर दिली. त्याने येऊन बिल चुकते केले तेव्हा कुठे आम्ही तिथून बाहेर पडून घरी गेलो. आणि आज त्याच साजिदमुळे कितीतरी लोकांना काम मिळालेय, त्यांचा उदरनिर्वाह होतोय, त्यांचे घर चालतेय. आपल्या हिमतीवर, क्षमतेवर साजिदने हे नाव कमावले आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत आघाडीच्या निर्मात्यांमध्ये आज त्याची गणती होते. यावरुन मला मजरूह सुलतानपुरींचा एक शेर आठवतोय... मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया। एकदा साजिदने नवी कार घेतली. ही गाडी घेऊन दूरवर फिरून यायचे आम्ही ठरवले. आम्ही दोघे त्या कारने नाडियादला, साजिदच्या आजोळघरी गेलो. तेथून मग उदयपूर, जयपूर, अजमेर आणि दिल्लीला गेलो. दिल्लीपर्यंतच्या प्रवासात कुठेही थ्री स्टार वा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबायचे नाही, रस्त्यालगतच्या ढाब्यांवर खायचे, तिथल्याच बाजांवर झोपायचे, हे आम्ही निघतानाच ठरवले होते. जयपूरला पोहोचल्यावर एका हॉटेलात आंघोळी करुन आम्ही अजमेरला गेलो. अजमेरहून दिल्लीला जाताना पुन्हा ढाब्यांवरच थांबलो. आम्ही दिल्लीत हॉटेल हॉलिडे इनमध्ये पोहोचल्यावर गाडी पार्किंगकडे पाठवून आत गेलो, तेव्हा आम्हाला पाहून लोकांच्या नजरेतले भाव बदलले. एवढ्या लांबच्या प्रवासामुळे आमचे चेहरे, कपडे धुळीने माखले होते. केसांची तर अवस्था अशी झाली होती की आपण फाइव्ह स्टार हॉटेलात येण्याच्या योग्यतेचे नाही, असेच आम्हाला वाटू लागले. रिसेप्शनजवळ लोक उभे होते म्हणून आम्ही लॉबीतच थांबलो. आम्ही तिथे बसलो, तेव्हा लॉबीतील कर्मचारी ‘हे इथे कसे काय बसले?’ अशा नजरेने आमच्याकडे बघत होता. मला चांगले आठवतेय, आम्ही तिथून उठून रूम बुक करण्यासाठी रिसेप्शनवर गेलो, तेव्हा तो कापडाने सोफा स्वच्छ करू लागला. असो. साजिद आणि माझे असे अनेक आंबटगोड किस्से आहेत. कधीतरी ते मी या सदरातून किंवा माझ्या आत्मचरित्रात लिहीन. आज साजिदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, येणाऱ्या काळात त्याने खूप चांगल्या सिनेमांची निर्मिती करुन साऱ्या जगाचे मनोरंजन करावे. साजिदच्या ‘टू स्टेट्स’ या सिनेमाचे हे गाणे ऐका... मन मस्त-मगन मन मस्त-मगन बस तेरा नाम दोहराये... स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

दिव्यमराठी भास्कर 16 Feb 2025 4:41 am

गोष्ट सांगतो ऐका...:ते डोळे!

वंदना पुन्हा एकदा सासूकडं खूप वेळ एकटक पाहू लागली. सासूला आता तिची भीती वाटू लागली. अचानक वंदना सासूच्या दिशेने चालू लागली... वंदना ओट्यावर बसून ऐकतेय. सकाळपासून अतिशय करुण आवाज ऐकू येतोय. मांजर आपल्या पिलासाठी कधी कधी रात्री-बेरात्री रडत असते तसा. पण, तेवढा जोरात नाही. आवाजात अजिबात त्राण नाही. जीव नाही. वंदना अस्वस्थ आहे. सारखी इकडंतिकडं बघतेय. कुठल्याच कामात तिचं मन लागत नाही. खरं तर दुपार होत आलीय. आतापर्यंत तिचा स्वयंपाक झालेला असायचा. समोरच्या विहिरीपाशी नळ आहे. तिथून पाच- सहा हंडे आणून माठ भरून ठेवायचा. दिवसभर पुरेल एवढं पाणी साठवून ठेवायचं. सासूला पुजेसाठी सगळी तयारी करून द्यायची. अशा दहा-बारा गोष्टी तरी या वेळेपर्यंत उरकलेल्या असायच्या. पण, आज ती झोपेतून जागी झाली. कसाबसा चहा घेतला आणि जी ओट्यावर येऊन बसली, ती अजून तिथंच आहे. रात्रीपासून तो आवाज तिला अस्वस्थ करतोय. तिला काहीच सुचत नाहीय. सारखा तो केविलवाणा सूर तिच्या कानात घुमतोय. हळूहळू क्षीण होत जाणारा.. आधी जरब असलेला, धाक असलेला तो आवाज नंतर नंतर खूप क्षीण होऊ लागला. आधी वंदना दुर्लक्ष करत होती. पण, जसजसा तो आवाज घशाला कोरड पडल्यासारखा होऊ लागला, तसतशी ती बेचैन होऊ लागली. रात्री पुसट शब्द ऐकू येत होते.. पाणी.. पण, नंतर ते शब्द बंद झाले. फक्त घरघर ऐकू येऊ लागली. नवरा घरी असता तर परिस्थिती वेगळी होती. पण, तो व्यापारानिमित्ताने बाहेरगावी होता. वंदना आणि सासू दोघीच घरी होत्या. आणि तो आवाज तिच्या सासूचा होता. सासूला रात्रीपासून अचानक बरं वाटेना झालं. तिची तब्येत एकदम ढासळली. आधी खोकल्याची उबळ आली. मग छातीत काही तरी अडकल्यासारख वाटू लागलं. दिवसभर अगदी ठणठणीत असलेली सासू अचानक सिरियस झाली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. लोखंडी पलंगच्या दांड्याला पकडून कशीबशी खोकू लागली. पण, छातीत काहीतरी अडकल्यासारखं होत होतं. जीव घाबराघुबरा झाला होता. वंदना समोरच उभी होती. एकटक बघत होती. निर्विकार. खरं तर सासूचा आणि तिचा अशात काही वादही झाला नव्हता. नवरा घरात नसला की ती सासूशी गप्पा मारत असायची दिवसभर. सासू तिला आपल्या बालपणीच्या आठवणी सांगायची. वंदना तिला आपल्या माहेरच्या गावातल्या गोष्टी सांगायची. दोघी एकमेकींना आवडणारी भाजी आणि खीर करायच्या. नवरा असताना कायम त्याच्या आवडीचा स्वयंपाक असायचा. त्यामुळं तो नसला की, सासू-सून एकमेकींच्या आवडी पूर्ण करायच्या. पण, ते सगळं दिखाव्यासाठी होतं. आज सासू अशी अचानक श्वास घ्यायला धडपड करतेय आणि वंदना शांत उभी आहे. जिवाच्या आकांताने सासू बोलण्याचा प्रयत्न करतेय. अधूनमधून वंदनाकडं बघतेय. वंदना एकटक सासूच्या डोळ्यात बघतेय. सासू पाणी मागतेय, पण ती नुसतीच बघत बसलीय. सासूचा चेहरा केविलवाणा झाला; पण वंदना जागची हलत नव्हती. कसाबसा खोकायचा प्रयत्न करणारी सासू. कुणाला तरी बाहेर आवाज जावा म्हणून मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करणारी सासू. आणि या सगळ्याचा जिच्यावर काहीही परिणाम होत नाही अशी वंदना. तिथं तिसरं माणूस नव्हतं. होती ती एक मांजर. जी सारखी आवाजाने घाबरून जात होती. सासूच्या पलंगापाशी फिरत होती. पण, तिचीही वंदनाजवळ जायची हिंमत नव्हती. मांजर डोळ्यात केविलवाणा भाव आणून सासूचे हाल बघत होती. वंदना सासूच्या आवाजाने त्रस्त झाली होती. एरवी नवरा घरी नसताना घर शांत असायचं. टीव्हीवर रात्री एखादी मालिका बघून सासू - सून झोपायच्या. कधी तरी बाहेरून कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज यायचे. ते सासूची झोप मोडायचे. सासू पडल्यापडल्या रागात काहीतरी बोलायची. वंदनाच्या लग्नाला तीसेक वर्षे झाली असतील. आता घराचे सगळे व्यवहार तिच्या हाती आले होते. सासू आता पूजा आणि टीव्ही बघणे एवढंच काम करायची. घर शांत असायचं. पण, रात्रीपासून त्या घराची शांती भंगली होती. सासू खोकत होती. पाणी मागत होती. रात्री उशिरा वंदना माठापाशी गेली. ग्लासभर पाणी प्यायली. सासूला ते सगळे आवाज ठळक ऐकू येत होते. माठावरचं झाकण उघडलंय. नेहमीप्रमाणं सुनेने तांब्यात पाणी घेतलंय. ते ग्लासात ओतलंय. आता तिच्या घशाचा आवाज येतोय. तिने पाच- सहा घोट पाणी पिलंय. एरवी या आवाजाकडं सासूने कधी लक्षही दिलं नाही. पुढेही दिलं नसतं. पण, आज सासूला एवढी तहान लागलीय, तरी सून पाणी आणून देत नव्हती. स्वतः दोनदा पाणी प्यायली, पण तिनं सासूला पाणी दिलं नाही. सासू संतापली काही क्षण. पण, तोंडातून शब्द निघत नव्हता बिचारीच्या. डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. वंदना पुन्हा एकदा सासूकडं खूप वेळ एकटक पाहू लागली. सासूला आता तिची भीती वाटू लागली. अचानक वंदनाला काय वाटलं, कुणास ठाऊक? ती सासूच्या दिशेने चालू लागली. आधीच सासूची छाती भरून आली होती. आता तर सुनेला आपल्या दिशेनं अगदी निर्विकार चेहऱ्यानं येताना बघून तिच्या छातीत कळ येऊ लागली. वंदना सासूच्या पलंगाजवळ येऊन थांबली. थंड चेहऱ्यानं आणि तेवढ्याच थंड नजरेनं सासूकडं बघत राहिली. सासूला घाम येऊ लागला. वंदना तशीच उलट्या पावलांनी मागे फिरली, तेव्हा कुठं सासूच्या जीवात जीव आला. वंदना रात्रभर भिंतीला टेकून उभी राहिली. सासू पाणी, पाणी ओरडत होती. मग घशातून आवाज निघेनासा झाला. फक्त घरघर. आताही वंदना ओट्यावर बसलीय. भर उन्हात. आतून येणारा आवाज बंद झालाय कधीचा. पण, ती काही उठली नाही. घरातून एकदम ओरडण्याचा आवाज आला मोठ्यानं.. ‘वंदनाss’ वंदना धावत आत गेली. सासू दचकून जागी झाली होती. ती वंदनाकडं बघत होती. शेजारी पाण्याचा तांब्या होता. त्यावर फुलपात्र होतं. मग आपण ‘पाणी, पाणी..’ असं का ओरडत होतो? सासूच्या लक्षात आलं, आपण स्वप्न बघत होतो. तब्येत बरी नसली की, आजकाल सासूला असं स्वप्न पडतं, ज्यात सून तिला पाणी देत नाही. फक्त बघत राहते. याला कारणही तसंच आहे. तीस वर्षापूर्वी वंदना घरात नवीन नवरी होती. सासूनं पाणी मागितलं. वंदनाने ग्लास भरून दिला. सासूला कळलं की वंदनाला शिवायचं नाही. तिनं रागात ग्लास फेकून मारला. जखम झाली तरी वंदना काहीच बोलली नाही. एकटक बघत राहिली. पण, ती थंड नजर सासूच्या कायम डोक्यात राहिली. वंदना ते विसरूनही गेली. जखम लगेच बरी झाली. पण, आजही स्वप्नात सासूला वंदना तशीच बघत असल्याचं दिसतं.. थंडपणे.. एकटक.. निर्विकार... (संपर्कः jarvindas30@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Feb 2025 4:37 am

राज्य आहे लोकांचे...:मागासांचे सामाजिक स्थान आणि उत्थान

स्वातंत्र्यानंतर समानतेचे तत्त्व अंगिकारण्यामागे समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी, त्यांना सर्वार्थाने सामाजिक न्याय मिळावा, हा उद्देश होता. आज जमिनीवरील वास्तव डोळसपणे पाहिले, तर हा उद्देश पूर्णपणे साध्य झाला आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. याचे पहिले कारण म्हणजे, स्वातंत्र्यापासून समाजकारण आणि राजकारणातील मागास समाजाच्या सहभागाचे एक प्रारूप निर्माण झाले होते. मागास घटकांचे नेते त्यांच्या मतांची जबबदारी घेतील आणि सत्तेची काही पदे या नेत्यांना देऊन त्यांना ताब्यात ठेवता येते, हे राजकीय पक्षांच्या लक्षात आले. यातून मागास, वंचित, पीडित समाजाचे कल्याण न होता त्यांच्या काही मोजक्या नेत्यांचेच भले झाले. पुढे हे प्रारूप इतक्या टोकाला गेले की, कुठलाही पक्ष सत्तेत असला, तरी त्याच्या बाजूने जाऊन आपले स्थान टिकवून ठेवणे, एवढेच काय ते मागासांच्या नेतृत्वाचे एकमेव ध्येय उरले. मागास समाजाच्या व्यक्तीला मोठ्या पदावर बसवून सगळ्या समाजाचे कल्याण होईल, हे कोठे ठरले आहे? आणि तसे सांगून आम्हाला मते मागू नयेत, हे या बांधवांनी सर्व प्रमुख पक्षांना ठणकावून सांगायला हवे. द्रौपदी मुर्मू या आपल्या राष्ट्रपती बनल्या, याचा साऱ्या देशाला आनंद आणि अभिमानही आहे. पण, राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यावरही, त्या आदिवासी असल्याचा उल्लेख सतत का केला जातो? आदिवासी समाजातील व्यक्ती राष्ट्रपती झाली, याचे कौतुक पुन्हा पुन्हा करणे, हाही त्या पदाचा एका अर्थाने अवमान नव्हे का? खरे तर आदिवासी, मागास बांधवांना उच्चपदाची संधी मिळण्यात गैर काय आहे? या गोष्टी तर स्वाभाविकपणे व्हायलाच हव्यात ना! संविधान आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारुन पंचाहत्तर वर्षे उलटल्यावरही हे होणार नसेल आणि त्याचे कौतुकच साजरे करण्यात आम्ही धन्यता मानत असू, तर आपली लोकशाही प्रगल्भ झाली, असे म्हणता येईल का? मुळातच आदिवासी किंवा इतर कुठल्याही मागास व्यक्ती देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाली म्हणून त्या समाजाचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटत नाहीत, हे समजून घ्यायला हवे. लोकशाहीतील न्यायाचा हक्क शाबूत ठेवण्यासाठी मागास समाजांनी सर्वप्रथम आपल्या मतांची एकगठ्ठा मालकी मागास नेतृत्वाला देणे पूर्णपणे बंद करावे, म्हणजे तिचा राजकीय सौदेबाजीसाठी उपयोग होणार नाही. सामाजिक न्यायासोबत इतर सर्व धोरणे तपासूनच आदिवासी, मागास, वंचित समाजाने मतदान करावे. सर्वाधिक भ्रष्टाचार मागास समाजासाठीच्या योजना आणि संबंधित विभागांमध्ये होतो. उदाहरणच द्यायचे तर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचाराचे देता येईल. या मोठ्या प्रकरणाचा निकाल अजूनही लागलेला नाही. मागास समाजासाठी असलेल्या योजनांचे नेमके काय होते? हजारो कोटींचा निधी जाहीर आणि मंजूर होतो, तरीही मागास समाजातील असंख्य लोकांचे उत्थान का होत नाही? या योजनांतील भ्रष्टाचार रोखून त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करणारी एक तटस्थ संस्था आवश्यक आहे. एक काळ होता जेव्हा साहित्य, गाणी, स्फूर्तिगीते, जलसे यांनी मागास समाजाला जागृत करण्याचे काम केले. पण, आता तेवढ्यात अडकून चालणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशातील ‘शिका आणि संघटित व्हा’ हे दोन टप्पे साध्य झाले आहेत. एका वर्गातील मागास बांधवांचा संघर्षही संपला आहे. पण, संघर्ष न संपलेला एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘संघर्ष करा’ या संदेशाच्या बरोबरीने प्रत्यक्षात जमिनीवर काम करण्याचे ध्येयही ठेवावे लागेल. आदिवासी, मागास घटकांसाठी याच वर्गातील नेतृत्वाने काम करावे, हा संकेतही मोडीत निघायला हवा. या समाजांच्या भल्याचा विचार करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. अन्य जाती-समुदायातील एखादी व्यक्ती मागास समाजाच्या कल्याणाच्या विचाराने झपाटलेली असेल, तर प्रसंगी तिचे नेतृत्वही मागास बांधवांनी स्वीकारायला हवे. किंबहुना स्त्रीवादी संघटनांनाही जशी समतेचा पुरस्कार करणाऱ्या पुरुषांची साथ मिळते, त्याप्रमाणे सर्व समाजांच्या सहभागाशिवाय मागास समाजाचा विकास होणे शक्य नाही. ज्यांना आपली वैचारिक भूमिका पटते त्यांच्यापेक्षा ज्यांना ती पटत नाही, अशांना आपल्या बाजूने वळवणे, हे कोणत्याही चळवळीचे मुख्य ध्येय असते. मागास बांधवांसाठीच्या चळवळींना वर्षानुवर्षे डॉ. बाबासाहेबांविषयीच्या अस्मितेभोवती खेळी करून गुंतवून ठेवले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इतके थोर होते की, त्यांचा अभिमान भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला असायलाच हवा. त्यामुळे अन्य समाजही खांद्याला खांदा लावून सोबत यावेत, या दृष्टीने मागासांच्या चळवळींची पुनर्रचना करावी लागेल. संविधानाच्या प्रती छापण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करते. पण, त्यातील काही भाग सामाजिक न्याय, समता आणि मागास समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे वापरला, तर वेगळ्या चळवळींची कदाचित गरजही पडणार नाही. (संपर्कः dramolaannadate@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Feb 2025 4:33 am

कबीररंग:प्रेम - प्रेम सब कोई कहे, प्रेम न जाने कोय...

आपलं ज्याच्यावर अतिशय प्रेम असतं, त्याच्या भेटीसाठी आपण सदासर्वकाळ आतुर असतो. तीच आतुरता परमेश्वराच्या भेटीसाठीही आपल्या हृदयात असावी म्हणून आपल्या तरल नि संवेदनशील मनाचा अट्टाहास असतो. प्रेमातली ती उत्कंठा, ती जिज्ञासा, ती आतुरता आपल्याला आदर्शभूत वाटत असते. आपल्या प्रेमाच्या माणसाच्या विरहामुळं मनाची झालेली तगमग, विरहानं भावकातर करणारी ती वेदनादायक स्थिती, या मानसिक अवस्थेचं यथार्थ दर्शन आपल्याला प्रेमाच्या या उत्कट नि शुद्ध अनुभवाशिवाय इतरत्र कुठं दिसून येणार? म्हणूनच परमेश्वर आणि भक्त यांच्यातील नात्याचं वर्णन करताना प्रेममार्गावरून चालणारे कबीर अनेक वेळा प्रेमी जीवांच्या प्रेमाचा दाखला देतात. सत्ता, संपत्ती आणि गुणवंत यांवर कुणीही प्रेम करतं. आपल्याला प्रिय असलेला मार्ग निवडण्याची आपली स्वतंत्र रीत असते. पण, आपलं प्रेम जिथं जडतं, तिथं काही वेगळं घडतं. ते वेगळेपण जाणून घेतलं, तर प्रेमामागच्या आत्मीयतेचा साधा - सरळ अर्थ आपल्या ध्यानात येऊ शकतो. कबीर म्हणतात, प्रेम जेव्हा हृदयातून जन्माला येतं तेव्हाच ते प्रेम खरं समजावं. असं प्रेम कसं करावं, त्याचं दर्शन ते खूप कलात्मकतेनं घडवतात. देहाची, मनाची संवेदना शुद्ध करणारी तसंच जाणीव व्यापक करणारी प्रेमासाठीची प्राणसूत्रं सार्थ दृष्टांतातून आपल्यापर्यंत पोहोचवतात... प्रेम तो ऐसा किजिये, जेसे चंद चकोर। चींच टूटि भुईं मांगिरे, चितवे वाही ओर।। चंद्र आणि चकोर यांच्या नशिबी मीलन कुठलं! तरीही चंद्राकडं चोच फिरवून चकोर बघत राहते. वाट पाहून भोवळ येऊन पडली, तरी तिची चोच चंद्राकडं असते. कबीर म्हणतात, भोगप्राप्तीची आस रुखरुख निर्माण करणारी असली, तरी मन विचलित होत नाही, कारण खऱ्या प्रेमाचं केंद्र फक्त सुख-दुःख देणाऱ्या भोगाशी जोडलेलं नसतं, तर ते त्या पलीकडच्या आनंदमयी ध्यासमग्नतेलाही सामावून घेणारं असतं. दुसऱ्या दृष्टांतातून कबीर सांगतात... कबीर सीप समुद्र की, रटै पियास पियास। और बूँद को ना गहै, स्वाति बूँद की आस।। खऱ्या प्रेमातला ध्यास कसा असतो, ते उमजून घेणं आपल्या हिताचं असतं, आपल्यासाठी श्रेयस्कर असतं, असं कबीर म्हणतात. हा ध्यास, हे प्रेमस्वरूप होऊन जाणं स्वाती नक्षत्रातल्या पावसाच्या थेंबाला प्राशून घेणाऱ्या शिंपलीसारखं असतं. ती शिंपली समुद्राच्या तळाशी तहानेली होऊन पाण्यासाठी निःशब्द आकांत करत असते. एका थेंबासाठी व्याकुळ होऊन वाट बघत असते. कधीतरी वर्षातून एकदा भेटीस येणाऱ्या स्वाती नक्षत्राच्या पावसाची आस धरून राहते. पावसाच्या अन्य थेंबांना ती शिंपली स्पर्शही करत नाही. कबीरांच्या दृष्टीनं प्रेम करणाऱ्या मनाची ही अनन्यता भक्तीच्या जाणिवेची असते. प्रेम हृदयातून जन्माला आलं आणि ते अनन्य असलं की भक्तीत रूपांतरित होतं. बसता-उठता प्रेमाचा नुसता उच्चार करणाऱ्यांना कबीर ‘प्रेमळ’ समजत नाहीत. प्रेमळाचं आचरण प्रेमाचं असतं, असं सूचकपणे ते सांगतात. विशिष्ट वस्तूच्या, व्यक्तीच्या नात्यावरचं प्रेम संपूर्ण चेतनेएवढं होतं, तेव्हा आपण उन्नत होतो. पण, या उन्नत स्थितीत आपल्या प्रेम करणाऱ्या मनाला ईश्वराच्या भेटीची अखंड ओढ असावी लागते. कबीर म्हणतात, हीच भक्ताची अभंग भावस्थिती असते. प्रेम - प्रेम सब कोई कहे, प्रेम न जाने कोय। जा मारग साहिब मिले, प्रेम कहावे सोय।। प्रेमभाव जेव्हा सतत आंदोलित होणाऱ्या मनाचा असतो, तेव्हा तो परम प्रेमाचा नसतो. प्रेमभाव परम स्थितीला पोहोचला की, मनाला ईश्वरप्राप्तीचं ध्येय आढळतं आणि त्या मनाचा शोध - बोध केवळ ईश्वर असतो. भक्ताचा परम प्रेमभाव हा त्याच्या ‘मी’पणरहित उत्कट प्रेमात, कधीच कोमेजून न जाणाऱ्या जिव्हाळ्यात दिसून येतो. त्याचंच दर्शन कबीरांनी या भावपूर्ण दोह्यांतून केलं आहे. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 16 Feb 2025 4:27 am

खलनिग्रहणाय:जीवघेणी चेंगराचेंगरी रोखणार कशी?

पोलिस प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे. चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहायला हवे. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्या गर्दीच्या ठिकाणी नेऊन या विषयाचे वास्तविक प्रशिक्षण दिले पाहिजे. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन तीस जणांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी तिरुपती येथील बालाजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविक ठार झाले होते. गेल्या साधारण दोन दशकात चेंगराचेंगरीच्या अशा घटनांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराजमधील अलीकडची दुर्घटना वगळता यातील बहुतांश घटनांची चौकशी पूर्ण झाली आहे. यापैकी काही प्रशासकीय, तर काही न्यायालयीन आहेत. या चौकशांच्या अहवालांमध्ये त्या त्या घटनेचे कारण देतानाच, संभाव्य उपाययोजनेबाबतही शिफारशी करण्यात आल्या आहेत. या घटनांच्या कारणांमध्ये; जास्त प्रमाणात झालेली गर्दी, गर्दीमध्ये निर्माण झालेली घबराट, तोकडी पोलिस व्यवस्था, अव्यवस्थित नियोजन, अफवा आदी महत्त्वाची कारणे दिली आहेत. अशा अहवालांच्या आधारे, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होणार आहे, तेथे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, याचे सखोल नियोजन करणे महत्त्वाचे असते. पूर्वी त्या ठिकाणी किती गर्दी झाली होती? अशा काही घटना घडल्या होत्या का? तसेच यंदा तिथे किती गर्दी होण्याची शक्यता आहे? आदी सर्व गोष्टींची माहिती प्रशासनाकडे असायला हवी. त्यानुसार गर्दीचा प्रवेश कुठून आणि कसा राहिल? गर्दीचा बाहेर पडण्याचा मार्ग कसा असेल? याचे नेमके नियोजन होणे महत्त्वाचे असते. काही कारणाने आतील गर्दी पुढे सरकत नसेल, तर प्रवेशद्वारातून येणारी गर्दी थांबवली पाहिजे, तसेच ठरविक अंतरांवर होल्डिंग एरिया ठेवला पाहिजे, जेणेकरुन गर्दी अनियंत्रित होणार नाही. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था चांगली असावी. गर्दीच्या नियंत्रणात कम्युनिकेशन अर्थात संप्रेषण प्रणाली फार महत्त्वाची ठरते. बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये व्यवस्थित संभाषण असले पाहिजे. त्यासाठी वॉकीटॉकीचा योग्य वापर आवश्यक आहे. अनेकदा अफवा पसरल्यानेही दुर्घटना घडतात. काही दिवसांपूर्वी जळगावजवळ ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या आणि दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रेनखाली १२ जण चिरडले गेले, तितकेच जखमी झाले. रांगेतील गर्दीतही अफवेमुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अफवा पसरु नयेत तसेच लोकांना अचूक आणि परिपूर्ण माहिती देणारी (पब्लिक अॅड्रेसिंग) सक्षम यंत्रणा असणे आवश्यक आहे. ही यंत्रणा प्रभावीपणे वापरण्यासाठी स्थानिक पोलिस, प्रशासन आणि देवस्थान समिती यांच्यात सुयोग्य समन्वय असला पाहिजे. जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे बाहेर जाण्याचे स्वतंत्र मार्ग आधीच निश्चित करावेत. या यंत्रणांना गर्दीच्या मानसिकतेचाही (मॉब सायकॉलॉजी) अभ्यास असायला हवा. त्याप्रमाणे जाण्या-येण्याचे मार्ग, प्रसाद वाटपाची वा थांबण्याची ठिकाणे निश्चित करुन त्यानुसार बंदोबस्त लावावा. पोलिसांचे ड्रिल आणि बंदोबस्ताचा सराव प्रत्यक्षातील परिस्थिती हाताळताना उपयुक्त ठरतो. अशा धार्मिक यात्रा, सोहळ्यांच्या ठिकाणी प्रथमोपचारासोबतच गंभीर प्रसंगी लागणाऱ्या वैद्यकीय उपचार सुविधांची उपलब्धता असणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय, सुस्थितीतील अग्निशमन वाहने योग्य ठिकाणी उभी असावीत. योग्य ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग असावे. गर्दीचे रिअल टाइम अवलोकन करुन आवश्यकतेनुसार तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे वापरली पाहिजे. गर्दी कुठे जास्त आणि कुठे कमी आहे, यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी नियंत्रण कक्षात कार्यक्षम अधिकारी नियुक्ती करावेत. गर्दीमुळे होऊ शकणाऱ्या दुर्घटनेसंदर्भात जनतेतही जागरुकता निर्माण केली पाहिजे. त्यासाठी देवस्थान समितीच्या सहाय्याने स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना पोलिसांसोबत नियुक्त केले जावे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबाबत आणि चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. मोठी गर्दी अपेक्षित असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, परिणामकारक पॅनिक मॅनेजमेंट, गर्दीचे लाइव्ह ट्रॅकिंग तसेच थर्मल आणि लेझर सेन्सरचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अशा महत्त्वाच्या उपायांचा त्यामध्ये समावेश आहे. पोलिस प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे. या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्या गर्दीच्या ठिकाणी नेऊन या विषयाचे वास्तविक प्रशिक्षण द्यायला हवे. ‘एनडीएमए’ याबाबत अनेक ठिकाणी प्रशिक्षणही आयोजित करते. चेंगराचेंगरीत लोकांचे बळी जाण्यामागे मानवी चुका हेच प्रमुख कारण असते. योग्य नियोजनाने अशा चुका दूर करुन हकनाक बळी जाणारे अमूल्य जीव वाचवता येतील. चेंगराचेंगरीच्या ठळक घटना (वर्ष - ठिकाण - बळी) - २००५ - मांढरदेवी यात्रा (महाराष्ट्र) - २९१ - २००८ - नैनादेवी यात्रा (हिमाचल प्रदेश) - १६२ - २००८ - चामुंडादेवी मंदिर (राजस्थान) - २२४ - २०१० - प्रतापगड (उत्तर प्रदेश) - ६३ - २०१३ - रतनगड (मध्य प्रदेश) - ११५ - २०१३ - प्रयागराज रेल्वे स्टेशन (उत्तर प्रदेश) - ३७ - २०१७ - एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन (मुंबई) - २२ - २०२२ - वैष्णोदेवी (जम्मू-काश्मीर) - १२ - २०२४ - हाथरस (उत्तर प्रदेश) - १२१ - २०२५ - तिरुपती (आंध्र प्रदेश) - ०६ - २०२५ - प्रयागराज संगम (उत्तर प्रदेश) - ३०

दिव्यमराठी भास्कर 9 Feb 2025 4:55 am

वेब वॉच:'पाताल लोक - 2' व्यवस्थेशी  नव्या लढाईचा नवा थरार

हाथीराम चौधरी हा दिल्लीतील अतिशय हुशार पोलिस अधिकारी आहे. पण, त्याने केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय त्याचे उच्चपदस्थ घेतात. त्याच्या चुका काढण्यात पुढे असलेल्या अधिकारी वर्गाने त्याच्यातील धाडसी वृत्तीचे कधी कौतुक केलेच नाही. कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी असलेला हाथीराम सहृदयी आहे. मितभाषी असल्याने आपण केलेल्या कामाचा ढोल बडवणे त्याला जमत नाही. पण, त्याची खंत आहे की, इतके चांगले काम करूनही त्याच्या कामाची कुठेच कदर झाली नाही. घरी कमी वेळ दिल्यामुळे पत्नी नाराज आहे, मुलगाही त्याचे ऐकत नाही. एक दिवस एका गुन्ह्याचा तपास करताना, एका अनाथ झालेल्या बालकाला तो घरी घेऊन येतो. या मुलाच्या वडिलांच्या गायब होण्याचा तपास करताना त्याला वेगळेच धागेदोरे सापडतात. त्याची पाळेमुळे नागालँडमध्ये पोहोचलेली असतात. तिकडे दुसराच गुन्हा घडलेला असतो... अलीकडेच प्राइमवर रिलीज झालेल्या ‘पाताल लोक -२’मधील पहिल्या भागाचे कथानक असे सुरू होते. ‘पाताल लोक’ या गाजलेल्या वेब सिरीजचा पाच वर्षांच्या खंडानंतर आलेला हा दुसरा सीझन. यातील आठही एपिसोड प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि त्याचे मुख्य कारण आहे जयदीप अहलावतचा संयत अभिनय. हाथीराम चौधरी ही एका मितभाषी पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा आहे. कमीत कमी बोलणाऱ्या या व्यक्तीच्या मनात काय चालले असावे, हे जयदीपच्या चेहऱ्यावरून समजते. त्या अनाथ मुलाकडे बघणाऱ्या हाथीरामकडे बघितल्यावर प्रेक्षकांच्या लक्षात येते की, आता तो त्या बालकाला घरी घेऊन जाणार. पोलिस अधिकाऱ्याची कष्टप्रद नोकरी सोडून दरमहा दोन लाखाच्या नोकरीची ऑफर मिळताच जयदीपचा चेहरा बघून लक्षात येते की, पगारासाठी हा चौकीदारी करणार नाही. आणि घडतेही तसेच. अत्यंत चतुराईने, जीवाची बाजी लावून मोठी टोळी पकडल्यावर त्याचे श्रेय वरिष्ठ अधिकारी घेतात. ते प्रसिद्धीसाठी फोटो काढत असतता, तेव्हा हाथीराम बाजूला एका पायरीवर बसलेला असतो. त्याच्या शेजारी पोलिसांचा श्वान दिसतो. असे अनेक सूचक प्रसंग यामध्ये समोर येतात. हाथीराम अगदी मोजकेच बोलतो. जेव्हा एक अधिकारी म्हणतो, “प्रोटोकॉल की वजह से विर्क सर को इन्फॉर्म करना पडा।” त्यावेळी हाथीराम म्हणतो, “जरुरी हैं सर, प्रोटोकॉल फॉलो करना बहोत जरुरी है। वैसे भी रेस के घोडे को पता होता है की जितने के बाद मेडल उसको नही मिलनेवाला..” अशा संवादावेळी जयदीपने केलेला अभिनय ही एखाद्या इमानदार पोलिस अधिकाऱ्याची खंत वाटते. ‘थ्री ऑफ अस’ या उत्कृष्ट चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण धावरे यांचे उत्तम दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी ही या सिरीजची जमेची बाजू, तर एका मागोमाग एक एपिसोड बघण्यास भाग पाडणारी राहुल कनोजिया यांची बांधीव पटकथा, हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य. ही गुन्ह्याचा तपास असलेली थ्रिलर वेब सिरीज असली, तरी त्यातून अनेकांचे स्वभाव विशेष समोर येतात. पोलिस यंत्रणा कसे काम करते? त्यात इमानेइतबारे काम करणाऱ्या आणि संख्येने कमी असलेल्या पोलिसांची कशी फरपट होते? राजकीय व्यवस्था पोलिसांना कसे वापरून घेते? मोठ्या व्यवहारांमध्ये छोटे मासे जाळ्यात कसे अडकतात? अशा वास्तवावर हा सिरीज संयतपणे भाष्य करते. पहिल्या दोन भागांत घडणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना एकमेकांशी कशा संबंधित आहेत, याचे धागेदोरे प्रेक्षकांना पुढे उलगडत जातात. याचे श्रेय पटकथेप्रमाणेच संयुक्ता कझा यांच्या संकलनालाही आहे. कोणती घटना अंधारात घडते? लख्ख प्रकाशात काय घडते? प्रत्येक घटना वेगवेगळ्या रंगामध्ये कशाप्रकारे दाखवावी, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि त्यावर दिग्दर्शकाने विचार केला आहे. या सर्वाचा प्रेक्षकाच्या मानसिकतेवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होतो आणि त्यामुळेच ती कलाकृती मनाला भिडते. जयदीप अहलावतच्या अभिनयाप्रमाणेच ईश्वक सिंग, गुल पनाग, अनुराग अरोरा, तिलोत्तमा शोम यांचा अभिनय दाद देण्यासारखा आहे. यातील बरेच प्रसंग नागालँडमध्ये घडतात. त्यामुळे त्या राज्याचे सौंदर्य आणि तिथली संस्कृती यांचे दर्शनही घडते. जहनु बरुआ, प्रशांत तमंग अशा तिथल्या अनेक स्थानिक कलाकारांना या सिरीजमुळे आपले कलागुण दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले, हे महत्त्वाचे. अर्थात, त्यांनी या संधीचे सोने केले आहे. ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील निसर्गसंपन्न राज्यांचा या निमित्ताने परिचय होत आहे, ही बाब तितकीच सकारात्मक आहे. (संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 9 Feb 2025 4:31 am

रसिक स्पेशल:अशा ‘दंगली’ने कसा निर्माण होणार ‘दबदबा’?

‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावणे हा प्रत्येक पैलवानासाठी गौरवाचा क्षण असतो आणि त्यासाठी त्यांचा प्रवास निर्विवाद, पारदर्शक आणि न्याय्य असला पाहिजे. प्रशासनाने, संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी यामध्ये अनावश्यक हस्तक्षेप न करता फक्त खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य केले पाहिजे. तसे झाले तरच कुस्तीमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा दबदबा निर्माण होईल. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा गेल्या आठवडाभरापासून वादामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. १९६१ मध्ये सुरूवात झालेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रातील सर्वांत प्रतिष्ठेचे कुस्तीचे मैदान मानले जाते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या पैलवानांचे राष्ट्रीय स्तरावरील स्थान अधिक भक्कम होते. आजवर यातून अनेक कुस्तीपटूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेपही घेतली आहे. त्यामुळे ‘हिंदकेसरी’पासून ते जागतिक स्पर्धांतील सहभागासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हा महत्त्वाचा किताब मानला जातो. या स्पर्धेने आजवर असे अनेक दिग्गज पैलवान घडवले आहेत, ज्यांनी पुढे राज्यासाठी, देशासाठी पदके मिळवली. अहिल्यानगरमध्ये नुकत्याच झालेल्या यंदाच्या स्पर्धेत पराकोटीचा वाद झाला. दोन संघटनांतील चढाओढीमुळे या स्पर्धेला, त्यातून उद्भवलेल्या वादाला वेगळे वळण देण्याचाही प्रयत्न होत आहे. त्यातच दुर्दैवाने काही राजकीय नेतेमंडळीही आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर खाशबा जाधव यांच्या रुपाने देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची परंपरा आणि लौकिक वेगळा आहे. त्याला असे प्रकार कदापि शोभणारे नाहीत. या खेळाच्या व्यापक हितासाठी ते तत्काळ थांबले पाहिजेत. परवाच्या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये रेफ्रीची चूक झाली असेल, तर त्याबाबत एक समिती नेमून चौकशी व्हायला हवी. खेळाडूंना निर्णय वा निकाल चुकल्याचे वाटत असेल, तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज देऊन संबंधित रेफ्रीवर बंदीची मागणी केली पाहिजे. मात्र, त्यासाठी हीन भाषेचा वापर वा लाथा मारण्यासारखे प्रकार होणे पूर्णत: चुकीचे आहे. अशा गोष्टींमुळे कुस्ती आणि कुस्तीगीर या दोहोंची प्रतिष्ठा खालावते. म्हणून घडल्या प्रकाराचे समर्थन होऊच शकत नाही. तथापि, त्यानंतर संबंधित पैलवानांवर तब्बल तीन वर्षे बंदी घालण्याचा निर्णयही तितकाच अवास्तव आणि अनाठायी आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. या स्पर्धेपर्यंत येण्यासाठी पैलवानांना अनेक वर्षे कसून मेहनत करावी लागते. त्यामुळे एकदम एवढी मोठी शिक्षा देणे त्यांच्या आणि एकूणच राज्याच्या कुस्ती क्षेत्राच्या भवितव्यासाठी हानिकारक ठरू शकते. बंदी घातलेल्या शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्याकडून महाराष्ट्राला देश पातळीवर खूप मोठ्या अपेक्षा आहेत, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. खेळाडूंनीही कुस्तीगीर संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आपल्यावरील बंदी उठवण्यासाठी दाद मागायला हवी. आणि संघानेही कुस्ती क्षेत्राच्या तसेच खेळाडूंच्या हिताचा विचार करुन बंदी उठवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कुस्ती क्षेत्राची संघटनात्मक स्थितीही समजून घेतली पाहिजे. राज्याच्या कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हे दोन प्रमुख गट आहेत. भारतीय कुस्ती महासंघाने दोन वर्षांपूर्वी राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केली. त्यामुळे मान्यता असलेल्या राज्य कुस्तीगीर संघाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू पाठवले जातात. कुस्तीपटूंना अधिकृत स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना या संघाच्या माध्यमातून पुढे जावे लागते. उत्तराखंडमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही महाराष्ट्राचा संघ या संघटनेने पाठवला आहे. अर्थात, या दोन्ही संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी ‘मान्यता’ किंवा ‘श्रेष्ठत्वा’पेक्षाही या क्षेत्रातील आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा कुस्तीगीरांना कसा लाभ होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या वर्षीच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्याच. मात्र, या स्पर्धेतील निकालांपेक्षा ज्यांना कुस्तीतले काही कळत नाही अशांनीही या वादातून आपली प्रसिद्धी करून घेतली. राजकीय पक्षांनीही या वादावर आपले भांडवल केले. त्यामुळे खरी कुस्ती आणि पैलवानांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झाले. शिवाय, या सगळ्या वादामुळे राज्यातील कुस्तीपटूंना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खेळाडूंनी कोणत्याही संघटनांच्या संघर्षात न अडकता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची पायरी असते. त्यामुळे राजकारण आणि माध्यमांतील चर्चा, आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात खेळाडू अडकले, तर त्यांच्या सरावावर, एकाग्रतेवर आणि एकूणच कारकिर्दीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. एक तर कुस्ती क्षेत्रातील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि पैलवान महाराष्ट्रातील पैलवानांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आपल्या पैलवानांच्या मनोबलाचे अशाप्रकारे खच्चीकरण झाले, तर महाराष्ट्राच्या कुस्तीवर संकटाचे सावट येईल. त्यामुळे इथल्या संघटनांबरोबरच सर्व खेळाडू, वस्ताद, प्रशिक्षक, संघटकांनी परस्परांमध्ये एकी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राज्याच्या कुस्ती क्षेत्राच्या व्यापक हितासाठी ‘महाराष्ट्र केसरी’चे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहिले पाहिजे. संघटनांतील वाद, राजकीय हस्तक्षेप आणि मीडिया ट्रायलमुळे कुस्तीपटूंना अडथळे निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी. ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावणे हा प्रत्येक पैलवानासाठी गौरवाचा क्षण असतो आणि त्यासाठी त्यांचा प्रवास निर्विवाद, पारदर्शक आणि न्याय्य असला पाहिजे. प्रशासनाने, संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी यामध्ये अनावश्यक हस्तक्षेप न करता फक्त खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य केले पाहिजे. तसे झाले तर कुस्तीपटूंच्या परिश्रमांमुळे ‘महाराष्ट्र केसरी’चा लौकिक तर उंचावेलच; शिवाय त्यातूनच गुणवत्ता असलेले पैलवान राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचा दबदबा निर्माण करतील. (लेखक ज्येष्ठ कुस्ती संघटक आहेत.) (संपर्कः datjadhav1@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 9 Feb 2025 4:28 am

वेध मुत्सद्देगिरीचा...:'सय्यद अकबरुद्दीन' पाकिस्तानचे मनसुबे उधळणारा करारी अधिकारी

भारताने जम्मू - काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याबाबत १६ ऑगस्ट २०१९ या दिवशी संयुक्त राष्ट्रांमध्ये चर्चा सुरू होती. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाला विरोध करत हा विषय संयुक्त राष्ट्रांकडे नेला होता. या मुद्द्याचे भांडवल करून, काश्मीरप्रश्नी आम्ही किती संवेदनशील आहोत आणि भारत कसा काश्मिरी जनतेच्या विरोधात आहे, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. या विषयावरील बैठक संपल्यावर भारताकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तिच्या आडून भारताला काश्मीर मुद्द्यावर घेरण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानच्या तीन पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. परंतु, पाकिस्तानचे हे मनसुबे लीलया उधळून लावले, ते भारताचे संयुक्त राष्ट्रांतील तत्कालीन राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी. या परिषदेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने अकबरुद्दीन यांना, ‘तुम्ही पाकिस्तानसोबत संवाद कधी सुरू करणार?’ असा थेट प्रश्न विचारला. वरकरणी हा प्रश्न सहज आलेला आणि तसा सोपा वाटत असला, तरी मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने तो फसवा होता. ‘तुम्ही पाकिस्तानसोबत संवाद कधी सुरू करणार?’ या प्रश्नाचा गर्भित अर्थ असा होता की, तुम्ही पाकिस्तानसोबतचा संवाद बंद केला आहे, पाकिस्तान संवादासाठी आसुसलेला आहे, त्याची इच्छा आहे की तो पुन्हा सुरू व्हावा आणि भारत त्यात अडथळा आणत आहे. अशा वेळी एक मुत्सद्दी म्हणून किती दक्ष असले पाहिजे, याचे उदाहरण म्हणजे ही घटना. अकबरुद्दीन आपल्या स्थानावरून उठून त्या पत्रकाराकडे गेले आणि त्याच्याशी हस्तांदोलन करत ठामपणे म्हणाले, ‘भारत सिमला कराराला बांधील आहे आणि पाकिस्तानकडूनही तीच अपेक्षा आहे.’ त्यांच्या या वागणुकीने उपस्थितांची मने तर जिंकलीच; पण पाकिस्तानने केलेल्या कुरघोडीच्या प्रयत्नांमधली हवाच निघून गेली! पाकिस्तानच्या त्या पत्रकाराला उत्तर देताना त्यांनी समयसूचकता आणि सभ्यतेसोबतच करारीपणाचेही दर्शन घडवले. सय्यद अकबरुद्दीन यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत १९८५ मध्ये प्रवेश केला. १९९५ - ९८ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायमस्वरूपी मिशनमध्ये प्रथम सचिव म्हणून कार्य केले. याच दरम्यान १९९७ - ९८ मध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च संस्थेपैकी एक असलेल्या प्रशासन आणि अंदाजपत्रकीय प्रश्नांवरील सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. १९९८ - २००० या कालावधीत त्यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात कौन्सिलर म्हणून जबादारी पार पाडली. या काळात भारत - पाकिस्तान संबंधांविषयी त्यांचा सखोल अभ्यास झालाच; शिवाय पाकिस्तानच्या अंतर्गत स्थितीचाही अनुभव त्यांना मिळाला. २००६ - ११ दरम्यान व्हिएन्नातील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये (IAEA) बाह्यसंबंध आणि धोरण समन्वय विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या महासंचालकांचे विशेष सहायक म्हणूनही त्यांनी कार्य केले. २०१२ - १५ या काळात देशातील आणि जगातील राजकारण संक्रमणावस्थेत असताना भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. एप्रिल २०२० मध्ये संयुक्त राष्ट्रांतील भारताचा कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते निवृत्त झाले. संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय नागरी सेवक’ म्हणून काम करण्याचा मान मिळालेल्या मोजक्या भारतीय मुत्सद्द्यांमध्ये अकबरुद्दीन यांचा समावेश होतो. आपल्या अनुभवाचा नेमका उपयोग आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृती करण्याची तत्परता या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांची कारकीर्द अनन्यसाधारण राहिली. देशाच्या परराष्ट्र धोरणाचा वेध घेण्याचा ध्यास निवृत्तीनंतरही त्यांनी निरंतर सुरू ठेवला. ‘इंडिया व्हर्सेस यूके : द स्टोरी ऑफ अॅन अनप्रीसिडेंटेड डिप्लोमॅटिक विन’ या आपल्या पुस्तकात अकबरुद्दीन यांनी २०१७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ) निवडणुकीतील भारताच्या राजनैतिक संघर्षाचा सखोल आढावा घेतला आहे. स्वत: संयुक्त राष्ट्रांत कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना त्या घटनेची इत्यंभूत माहिती होती. त्यामुळे त्यांचे हे पुस्तक अधिक विश्वसनीय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपल्या देशाचे प्रतिनिधी असले पाहिजेत, याची जाणीव भारताला कुलभूषण जाधव प्रकरणानंतर झाली. संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीचा सदस्य असलेल्या ब्रिटनला मात देऊन भारताने ही ऐतिहासिक निवडणूक जिंकली. या निवडणुकीची यशोगाथा कथन करतानाच, आंतरराष्ट्रीय राजनयिक व्यवहारांचे बारकावे, अशा प्रकारच्या निवडणुकांतील जागतिक आव्हाने, अडचणी आणि रणनीती यांचे विस्तृत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. जागतिक स्तरावरच्या एरवी छोट्या वाटणाऱ्या घटनाही परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. त्यांची नोंद घेत, योग्य ती पावले उचलत आपल्या देशाचे हित साधण्यासाठी अशा मुत्सद्द्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. अशा प्रयत्नांच्या पराकाष्ठांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर अकबरुद्दीन यांचे हे पुस्तक वाचायला हवे. (संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 9 Feb 2025 4:25 am

डायरीची पाने:खळे

माणूस माणसाला अडवण्याच्या संधीची वाट बघत असतो. पण, या अडवाअडवीत आपण आनंदाऐवजी दुःखाची रास निर्माण केली आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. आता हळूहळू रानावनात खळी सुरू होतील. ज्वाऱ्या बेहाड्या पडू लागल्या आहेत. काही अजून हुरड्यात आहेत. तसे तर हे हुरड्याचे आणि खळ्याचेही दिवस आहेत. जिथं लवकर ज्वाऱ्या पेरल्या होत्या, तिथली खळी आता सुरू झाली आहेत. काही ठिकाणी कमी पाऊस पडला होता. त्यामुळं तिथली ज्वारीही लवकर बेहाड्या पडली. खळे म्हणजे कणसांनी भरलेली बखळ अन् कडब्याची परसड. खळे म्हणजे शेतकऱ्याच्या घामाचे फळ नि त्याच्या कष्टाची रास. खळे संपले की रानात काहीच शिल्लक राहत नाही. तिथं जायची गरजच उरत नाही. सुगीत सगळीकडं पीक उभं असतं. शेतकऱ्याचं कुटुंब आनंदानं उधाणलेलं असतं. थंडीचे दिवस असतात, ऊनही कोवळं लागू लागतं. धुऱ्यावर हिरवंगार गवत वाढलेलं असतं. ही सगळी हिरवाई दवावर पोसलेली असते. पावसाळा संपून बरेच दिवस झालेले असतात, पण तरीही या दवावर रान हिरवं असतं आणि हिवावर माणूस गार असतो. त्यामुळं सगळ्या सृष्टीलाच पोषक असा हा ऋतू. या ऋतूचा समारोप म्हणजे खळे. खळे झाले की रान उनगते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होऊ लागतो. चुकार आणि मोकार गुरं रानावनात पालापाचोळा खात फिरत असतात. रान उदास-भकास वाटू लागतं. कुठं तरी जीव रमवावा म्हणून नंतर जत्रा-यात्रा सुरू होतात. त्याची मजा शेतकरी घेतच असतो; पण रानातली निसर्गाने प्रसन्न होऊन दिलेला आनंद संपलेला असतो. खळ्यातील कणसांची रास पाहून शेतकऱ्याचे काळीज भरून येते. टच्च दाण्याने भरलेली कणसं खळ्यात पसरलेली असतात, तेव्हा शेतकऱ्याच्या मनालाही मोती लगडतात. दाणे भरपूर होतील आणि वर्षभराची बेगमी होईल, याची त्याला खात्री वाटत असते. आजकाल रानात ज्वारीचे खळे करायला मजूर मिळणे अवघड झाले आहे. पण, एकेकाळी ज्वारीच्या खळ्यावर मजुरी मिळावी म्हणून गावातल्या बायाबापड्यांची धडपड असायची. त्यांच्या वाट्याला ओटी भरून कणसं यायची. शेतातली कसदार ज्वारी आपल्या वाट्याला यावी म्हणून या बायकांची कामावर घेण्यासाठी धडपड असायची. हे चित्र आता उलटे झाले आहे. कामाला माणूस मिळत नाही. जमाना बदलणारच, तो बदलतच असतो, त्याला इलाज नाही. त्यावर यंत्रयुगाने पर्याय दिले आहेत. आता हल्लर काम भागवत आहेत. माणसं पुढे जात आहेत. माणसं माणसांची नेहमीच अडवाअडवी करतात. मजुराला गरज होती, तेव्हा मालक अडवून पाहायचे. आता मालकाला गरज आहे, तर मजूर अडवून पाहताहेत. माणूस माणसाला अडवतो, हेच खरं. अडवण्याच्या संधीची तो वाट बघत असतो. या अडवाअडवीत आपण दुःखाची रास निर्माण केली आहे, हे माणसाच्या लक्षातच येत नाही. माणसाने माणसासाठी आनंदाची रास निर्माण करावी, हे अपेक्षित असताना असे काहीतरी भलतेच होत असते. त्यालाही नाईलाज आहे. कदाचित यालाच मानवी जीवन म्हणत असावेत. कुणीतरी कुणाची तरी मजा घेतो आणि कुणीतरी कुणाची तरी मजा पाहतो. एकेकाळी ज्वारीचे खळे हा एक उत्सवच असायचा. सगळे गावकरी खळ्याची वाट पाहायचे. आई या खळ्यावर खास जेवणाचा बेत करायची. दूरच्या रानात झोपडी किंवा मांडव नसल्यामुळं कडब्याच्या पेंढ्यांचेच तात्पुरते खोपे केले जायचे. त्यात दोन-तीन माणसं बसू शकायची. पण त्याखाली स्वयंपाक करायला गेलं, तर ठिणगीनं पेंढ्या पेटायची भीती वाटायची. त्यामुळं बैलगाडीच्या साट्याखाली तीन दगडाची चूल करून आई स्वयंपाक करायची. स्वयंपाक काय? तर घरून दह्याचं लोटकं भरून आणलेलं असायचं. भरपूर लसूण घातलेली शेंगदाण्याची चटणी कुटून आणलेली असायची. आई धपाटे करायची. खमंग, चवदार धपाटे. एका छिद्राचं, दोन छिद्राचं, पाच छिद्राचं, बारा छिद्राचं अशी ती भेंडुळं असायची. धपाट्याला आमच्याकडं भेंडुळं म्हणायचे. ‘बारा मिसळ्याचं भेंडुळं’ असंच त्याचं नाव होतं. गहू, ज्वारी, हरभरा, मूग, उडीद अशा अनेक धान्याचे मिश्रण दळून बारा मिसळीची भेंडुळं केलेली असायची. त्यात लसूण, कांदा, मेथी, चटणी, मीठ, सुंठ, कोथिंबीर असे पदार्थ टाकलेले असायचे. पाच धान्ये आणि सात मसाल्याचे पदार्थ असे मिळून ते बारा मिसळ्याचं भेंडुळं असायचं. त्यामुळं ते अतिशय खमंग लागायचं. आई भेंडुळे करायची. आम्ही त्याची वाटच पाहायचो. त्यातही खळ्यावरच अशी भेंडुळी खायला मिळायची. कारण तो खळ्याचाच मान असायचा. संध्याकाळी खळ्यावर निवद असायचा. त्यासाठी गावातले निवडक लोक बोलावलेले असायचे. चांदण्याच्या उजेडात खळ्याभोवती पंगत बसायची. खळ्याच्या मधोमध रास असायची. त्यावर दिवा लावलेला असायचा. आधी खळ्याला निवद दाखवला जायचा आणि मग माणसं जेवायला सुरुवात करायची. जेवण झाल्यावर कुणीतरी कथा सांगायचा. जमलेल्यांपैकी पंधरा-वीस माणसं रात्रभर कथा ऐकत तिथंच बसायची. त्या निमित्तानं राशीचं संरक्षण व्हायचं. चोराचिलटाची भीती नसायची. दुसऱ्या दिवशी रास उधळायला सुरूवात व्हायची. वाऱ्याची वाट पाहावी लागायची. बहिणाबाईंनी या वाऱ्याला ‘मारुतीचा बाप’ असं म्हटलेलं आहे. मरूत म्हणजे वारा. मारुती म्हणजे वाऱ्याचा पुत्र. हनुमानाला आपण वायुपुत्र म्हणतच असतो. बहिणाबाई म्हणतात.. ‘येरे येरे वाऱ्या, येरे मारुतीच्या बापा.. हात जोडीते मी तुला, बापा नको मारू थापा..” या वाऱ्याची वाट बघत शेतकरी रास उधळायचा. कधी कधी वारा थंड पडायचा आणि शेतकरी मेटाकुटीला यायचा. तिव्ह्यावर अण्णा उभे असायचे. मोठ्या वहिनी राशीतून टोपली भरून द्यायच्या. लहानग्या वहिनी तिव्ह्याखाली हातणी घेऊन बसलेल्या असायच्या. वाऱ्याने ज्वारीमधलं भुसकट निघून जायचं. निखळ दाणे खाली पडायचे. त्यात काही गोंडर असायचे. वहिनी हातणीने गोंडर बाजूला करायच्या. ताव्ह्याखाली निखळ शुभ्र पांढऱ्या दाण्याची रास दिसायची. ती जसजशी वाढंल तसतसा शेतकऱ्याचा ऊर आनंदानं भरून यायचा. संध्याकाळच्या वेळी वडील यायचे. राशीची पूजा होऊन रास मोजायला सुरूवात व्हायची. पोती भरली जायची. मग पोत्यांनी गाड्या भरल्या जायच्या. भरलेली एक एक गाडी घराकडं जायची. घरी आई ताट सजवून तयारच असायची. या गाडीच्या बैलांच्या पायाची पूजा करून रास घरात घेतली जायची. सगळीकडंच श्रद्धाभाव होता. रानाविषयी श्रद्धा, बैलाविषयी श्रद्धा, कामावरच्या मजुराविषयी श्रद्धा, कामावर श्रद्धा.. या श्रद्धाभावांनी अवघं आयुष्य उजळून निघालेलं असायचं. आता हा भाव राहिलेला नाही. काळ बदलला तसा भावही बदलला. त्यामुळं श्रद्धेच्या ठिकाणी व्यवहार आला. व्यवहार आला की रुक्षता येते. कामातला आनंद संपतो. (संपर्कः inbhalerao@gmail.com)

दिव्यमराठी भास्कर 9 Feb 2025 4:14 am